हे मी माझ्या दुखर्या हिरडीला स्मरून सांगत आहे. वेदना नेहमी सत्य बोलते हे मी आपल्यासारख्या दंतकाळावेत्याला सांगायलाच नको. शिवाय दाखवायचे दात निराळे हा दंतपंक्तिप्रपंच आपल्याला मानवणारा नाही. अजूनही मुखी जन्मजात दात आहेत. पाऊणशे वयमान झाले तरी दंताजींचे ठाणे अजून उठणे नाही.
दंतपतनाच्या संपाच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत. दात दाखवून अवलक्षण करीत आहेत, पण मी त्यांच्याकडे ढूंकूनही पाहत नाही. दातबोध हा आपला दंतकाव्यग्रंथ दंतग्रस्तांना कवळीमोलाचा वाटेल यात संशय नाही. अलीकडेच काही कारणाने कवळीच्या किमंतीची चौकशी केली. आकडा ऐकून दातखिळीच बसली. अशा समयी तुमच्या दातबोध हाती आला.
गेल्या महिन्यात मराठीतील सलमभूत कवी मंगेशजी पाडगावकरांच्या उदासबोधाची प्रत हाती आली. त्यात मंगेशजींनी भल्याभल्याचे दात उपटून हातात दिले आहेत. ह्याच काळात तुमचा दातबोध हाती यावा हा दंतरंखंडी योग म्हणायला हवा. दातबोधात काय किंवा उदासबोधात काय वैयक्तिक दाढदुखी नाही. सार्वजनिक मंडळींना दाती लागेल ते चावासचा दुर्गुण जडला आहे. त्यामुळे नुसते अर्थशून्य चर्वितर्वण चालले आहे.
सार्वजनिक जीवन साफ किडून गेले आहे. जो जे वांछील तो ते खावो हे खरे, पण ते बेताने खावे. अपचन होईल दतके नव्हे. हे खाणे नव्हे हादडणे झाले. विधात्याने मनुष्य प्राण्याला रवंथ करायची सोय ठेवलेली नाही. नाहीतर सकाळच्या भोजनावर आडवा हात मारून कर्मचारीगण कचेरीत आरामात रवंथ करीत बसला असता. ती सोय नसूनही सरकारी कचेर्यातून रवंथ चालू असते, हा भाग निराळा. अशो अधिक काय लिहिणे? मला तुमचा दातबोध अतिशय आवडला. वाचकांनाही आवडेल याची मला खात्री आहे. दातबोधाच्या, सुरूवातीला माझ्या विषयीची आपुलकी व्यक्त करणारे चार शब्द तुम्ही लिहिले आहेत.
त्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद.
- पु.ल. देशपांडे
----
‘दातबोध’ ह्या सदाशिव जावडेकरांच्या पुस्तकाला पुलंनी दिलेली दाद
दाद - पु.ल.