लहानपणी सुट्टीत सायकल शिकणे आणि
वाचनालय लावणे ह्या दोन गोष्टी
घरोघरी अनिर्वाय होत्या.
नुकतेच आम्ही गुलबकावली आणि ठकसेन ह्यांच्या
राज्यातून टोम सायर आणि रॉबिन्सन क्रुसो
ह्यांचे वाचन संपवले होते…
आता हा थोडा मोठा झाला असे समजून
आईने “असा मी असामी ” हे पुस्तक वाचायला दिले…
तिथून ह्या माणसाने जे “गारुड” घातले
ते अजून सुटलेले नाही…
“असा मी ..” नंतर “चाळीत” गेलो..
तिथून “व्यक्ती आणि वल्लींना” घेवून
“खोगीर भरती” केली…
तर “गण-गोतांनी” आमची “खिल्ली” उडवली…
सहज म्हणून “पूर्वरंग” घेतले ते “जावे त्यांच्या देशात” असे म्हणून “पश्चिम रंग” करून आलो….
“तुझे आहे तुजपाशी” असे म्हणत असतांनाच “सुंदर मी होणार” कधी ओठावर आले ते समजलेच नाही..
“पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे” ह्या लेखकाने उत्तमोत्तम साहित्य देतांना विनोदाची लक्ष्मण-रेषा कधीही ओलांडली नाही.
विनोद करीत असतांना ते थोडे-फार चावट विनोद करत असत पण ते कधीही अश्लील पणाकडे झुकले नाहीत…
आपली पुस्तके एका कुटुंबात वाचली जाणार आहेत आणि ती दिवाणखान्यात ठेवली जाणार आहेत ह्याची त्यांना पूर्ण जाणीव असावी..
त्यांचे लेख कधी कधी विचार करायला भाग पाडत होते पण कधीही दुखी: करत न्हवते.
मध्येच कधीतरी दिवाळीत “वाऱ्यावरची वरात” हे नाटक दाखवले…
आणि हा माणूस कलाकार पण होता हे समजले…
कथाकथन म्हणजे नक्की काय आणि ते कसे करायचे ह्याचे ज्ञान फार कमी लोकांना असते..पु.ल., व.पु, द.मा आणि शं.ना. हे त्यापैकीच..
पण मुकुटमणी म्हणजे पु.ल.
“चाळ” असो की “असामी” केवळ एकट्याच्या जीवावर हा कार्यक्रम खेचणे हे खायचे काम नाही…
स्वत: एक उत्तम कवी असल्याने ”कविता वाचनाचा” कार्यक्रम पण ते उत्तम करीत असत…
आज कदाचित आमची ही शेवटचे पिढी की जी मराठीची गोडी अनुभवते असे वाटत
असतांनाच परवा माझा मुलगा एक पुस्तक वाचत असतांना जोरात हसायला लागला…
सहज म्हणून पुस्तक बघितले तर…”असामी असा मी”….
जो पर्यंत ह्या जगात हे पुस्तक आहे तो पर्यंत मराठीला मरण नाही…
अमरत्व काय फक्त देवालाच आहे काय?
मुळ स्त्रोत - http://full2dhamaal.wordpress.com/