Leave a message

Monday, June 15, 2015

पु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी - (उपेंद्र चिंचोरे)

पूज्य पु. ल. देशपांडे ह्यांचे मला आलेले पत्र आणि आमच्या दोन संस्मरणीय भेटी :

११ जून १९८२ रोजी, मी सकाळी डेक्कन क्वीनने मुंबईस निघालो होतो ! पुणे स्टेशनवर अगदी सकाळी सकाळी फलाटावर गाणं ऐकू येत होतं, "भेटी लागी जीवा", संत श्रेष्ठ तुकारामांचा हा अभंग, श्रीनिवास खळे - आण्णांचे संगीत आणि स्वरसम्राज्ञी तीर्थस्वरूप लतादीदींचा मधाळ आवाज ! मी भारावल्या अवस्थेत गाणं ऐकता ऐकता गुणगुणत होतो. पुणे स्टेशन मागे पडलं. माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने मला बोलतं केलं. "काहो, तुम्ही गुणगुणताहात, एव्हढं आवडतं कां हे गाणं ? चाल, शब्द कां स्वर ?"

मी उत्तरलो, "तिन्ही गोष्टी अप्रतिम आहेत. विशेष म्हणजे लतादीदींच्या स्वरांचा मी वेडा आहे".


दादर येईपर्यंत ते मला दिदिंविषयी विचारात होते, अन मी बोलत होतो. दादर जवळ आले, तसे ते म्हणाले, " हे माझे कार्ड, मी माधव कानिटकर, प्रपंच, बुवाचा संपादक, मला दोन-चार दिवसात, लताबाईंवर लेख लिहून द्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी छापतो. तुमची भाषा सुंदर आहे."

झालं, ह्या गोष्टीला आठएक दिवस लोटले. अन मी नोकरी करत होतो, त्या गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये एक दिवशी एक युवक मला भेटायला आला. तो म्हणाला, "मी केदार कानिटकर, बाबांनी लेख मागितला आहे. मी केदारला म्हणालो, "अरे अजून मी लिहिला नाही ". दोन दिवसांनी केदार कानिटकर पुन्हा मला भेटला, म्हणाला, "बाबांनी तुम्हांला संध्याकाळी घरी बोलावलंय". मी पुण्याच्या टिळक रोडवरील माधवराव कानिटकर ह्यांचे घरी गेलो खरा, ते म्हणाले, "अहो, लेख का ना लिहिला, लवकर लिहा, मी छापतो तुमचा लेख"! मी लेख लिहून, कानिटकर साहेबांना नेऊन दिला. सप्टेंबर १९८२ च्या विशेषांकामध्ये तो लेख प्रसिद्ध झाला. त्याकाळी विशेषांकामध्ये लेखक- कवींच्या नावाबरोबरच त्यांचा पत्तासुद्धा छापला जात असे !

रसिकहो, २ नोव्हेंबर १९८२ रोजी मला एक पत्र आलं, "१०१ रुपाली, शिवाजीनगर, पुणे ५", ह्या पत्त्यावरील पांढ-या स्वच्छ पोस्ट कार्डावर, शाई पेनने लिहिलेले ते पत्र होतं, आदरणीय "पु. ल. देशपांडे" ह्यांचे ! त्यांनी पत्रात लिहिले आहे :

" प्रिय उपेंद्र चिंचोरे, नमस्कार,
लताबाईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे,
पण आपल्या लेखातील भाव मला खूप आवडला,
त्याला आवर्जून दाद देण्यासाठी हे पत्र,
आपला,
पु. ल."

पु.लंचे पत्र पाहून अन् वाचून मी आनंदाने नाचू लागलो, ज्याला त्याला ते पत्र दाखवू लागलो !

बरोब्बर सहा दिवसांनी म्हणजे ८ नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस होता. रुपाली ह्या त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मी ८ नोव्हेंबर ८२ रोजी समक्ष गेलो. मोठ्या श्रद्धेने, मनोभावे मी पु.लंना नमस्कार केला. ती माझी त्यांच्याशी झालेली पहिली भेट होय !

पुण्यातील भांडारकर रोडवरील, वंदनीय पु. लंच्या "मालती माधव" ह्या निवासस्थानीही जायची सुसंधी मला लाभली होती !

पूज्य शांताबाई शेळके पुण्याच्या के. ई.एम. रुग्णालयात तीनशे पंधरा क्रमांकाच्या खोलीत औषधोपचार घेत असतांना, एके दिवशी, अचानक पु. ल. आणि सुनीतावहिनी भेटायला आले आणि मग काय विचारता ? हास्य कल्लोळ, आणि हास्य कल्लोळच !

शांताबाई म्हणाल्या, "भाई हे चिरंजीव चिंचोरे".....
त्यावर पु. ल. पटकन म्हणाले, "हो, लताबाईंविषयी संग्रह करणारे, लेख लिहिणारे,"

मी लगोलग त्यांचे चरणस्पर्श दर्शन घेतले. मी धन्य धन्य झालो. रसिकांनो, अश्या नामवंतांच्या सहवासाने म्या पामराच्या जीवनाचे खरोखर सोनं झालं . तुम्हीच सांगा, ह्या पेक्षा वेगळे सोने ते कोणतं ?

पुढे शांताबाई ब-या होऊन, दवाखान्यातून घरी गेल्या, आणि एक दिवशी पु.लंना देवाज्ञा झाल्याची कुवार्ता कानावर पडली, हाय, बालगंधर्वमध्ये झालेल्या शोकसभेला, स्वतःची तब्येत बरी नसतांना, शांताबाईंनी, पु. लंच्या शोकसभेला जाण्याचा हट्ट धरला. मी त्यांना घेऊन बालगंधर्वमध्ये गेलो. शांताबाई भरभरून बोलल्या. पु.लंच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या.

मी माझ्या शालेय जीवनापासूनच पु.लंचा रसिक वाचक झालो. असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, खिल्ली, तुका म्हणे आता, अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, ती फुलराणी, वटवट वटवट, आम्ही लटिके ना बोलू, वयं मोठं खोटं, पुढारी पाहिजे, अपूर्वाई, पूर्वरंग, गोळाबेरीज, हसवणूक, कोट्याधीश पूल. गणगोत, गुण गाईन आवडी, खोगीर- भरती, लेकुर उदंड झाली, वा-यावरची वरात, अशी अनेक पुस्तके एकरूप होऊन वाचली.

आजही ब-याचवेळा पुलंचं कुठलंही पुस्तक हातात घ्या आणि वाचायला सुरवात केल्यावर पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो.

मला आठवतंय, माझ्या कॉलेजच्या जीवनात मी "अंमलदार"मध्ये भूमिका केली होती.

गुळाचा गणपती, दुधभात, देवबाप्पा, देव पावला, हे पु. लंच्या सुंदर संगीतानी सजलेले चित्रपट आजही मनाच्या गाभा-यात जसेच्या तसे ठाकले आहेत !

निर्माते-दिग्दर्शक राम गबाले आणि माझी गप्पांची मैफल अनेकवेळा राम गबाले ह्यांच्या निवासस्थानी रंगायची, पुलंच्या आठवणी हमखास त्यात असायच्या. रसिक वाचकांनो माझ्या जीवनातील ते खरोखरच मंतरलेले दिवस होते ! पु.लंची पुण्याच्या शनिवार वाड्यावर झालेली भाषणेही आवडीने ऐकली होती.

त्याकाळी पुणे आकाशवाणी केंद्रावरून पु.लंची प्रसारित झालेली भाषणेही ऐकण्याची संधी आम्ही चुकवायचो नाही. पु.लंच्या "नारायण"चे पारायण कितीवेळा करतो, त्याला गणतीच नाही.

आज बारा जून, पु. लंची पुण्यतिथी, वंदनीय पु. ल.आपल्यामुळेच आमचे भावविश्व खुलले, फुलले ! आपल्या चिरतरुण पवित्र स्मृतीला भावपूर्ण वंदन,

लेखक : उपेंद्र चिंचोरे
www.facebook.com/upendra.chinchore
a