मिरजमधल्या ‘मिरज विद्यार्थी संघा’चे एक धडपडे कार्यकर्ते वसंतराव आगाशे पुलंचे वर्गमित्र होते. एकदा एका समारंभाच्या निमित्ताने पुलं मिरजला गेले होते. त्यावेळी मिरज विद्यार्थी संघाने एक अद्ययावत सभागृह बांधायला घेतलं होतं. बांधकाम बरंच रखडलं होतं. पुलंनी वसंतरावांना विचारलं; ‘‘आतापर्यंत किती खर्च झालाय या बांधकामावर?’’ ‘‘अडीच लाख रुपये.’’ वसंतराव म्हणाले. ‘‘शिवाय अजून गिलाबा करायचाय, साऊंड सिस्टिम बसवायचीये, वरचा मजला बांधायचाय, परिसराचं सुशोभन करायचंय!’’ वसंतरावांनी बर्याच कामांची यादी पुलंना ऐकवली. पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे, आता माझ्याकडून किती मदत हवीये तुला तेवढं सांग!’’ पुलंच्या या जिव्हाळ्यानं वसंतराव पुरते भारावून गेले. ते म्हणाले; ‘‘भाई, एक रुपया दिलात तरी आम्ही धन्य धन्य होऊ!’’ वसंतराव आणि पुलंची ही भेट ज्या दिवशी झाली होती, तो दिवस विजयादशमीचा आदला दिवस होता. निरोप घेताना पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे वसंता; उद्या येतो शिलंगणाला!’’ दुसर्या दिवशी ते मिरज विद्यार्थी संघाच्या कार्यालयात पोहोचले. जाताना ते आपल्याबरोबर एक लाख रुपयांचा चेकच घेऊन गेले होते. तो चेक पाहून वसंतरावांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू वाहू लागले होते.
नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पुलंनी पन्नास हजार रुपये दिले. एक अद्ययावत, डौलदार सभागृह उभे राहिले. त्याचं उद्घाटन पुलंच्या हस्ते झालं. समारंभाला कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी उपस्थित होते. समारंभानंतर वाटवे नावाच्या एका सद्गृहस्थांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी सव्वा लाख रुपये मिरज विद्यार्थी संघाला दिली. चिंतामणराव गोरे नावाच्या आणखी एका गृहस्थाने वीस हजार रुपये दिले. ‘दिवा दिव्याने पेटतसे’ असं म्हणतात ते खरंच आहे. वसंतराव आगाशेंच्या चेहर्यावरून कृतज्ञता अक्षरशः ओसंडून वाहत होती.
आपल्या भाषणात पुलं म्हणाले; ‘‘जगातला सर्वात सुंदर चेहरा म्हणजे कृतज्ञ चेहरा! खरं तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावी!’’ आयुष्याचं जटिल गणित सोडवण्याची यापेक्षा अधिक सोपी अशी दुसरी कोणती पद्धत असेल? पुलंनी त्या विजयादशमीला जे आनंदाचं, सुखाचं, माणुसकीचं सोनं लुटलं, मिरजेत त्याचा सुगंध आजही त्या सभागृहाच्या रुपानं दरवळतो आहे.
प्रकाश बोकील
-- नवशक्ती
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Friday, November 8, 2013
Subscribe to:
Posts (Atom)