Friday, November 26, 2021

मी सिगारेट सोडतो

‘‘मी सिगारेट सोडली - मी सिगारेट सोडली - कायमची सोडली - यापुढे सिगारेट वर्ज्य - प्राण गेला तरी सिगारेट नाही ओढणार - माझा निश्चय कायम - त्रिवार कायम.’’ - वास्तविक हे मी कुणालाही सांगत नाही - माझे मलाच सांगतो आहे. हा आजचा प्रसंग नाही -‌ हे अनेकवेळा मी माझे मलाच सांगितले आहे. सिगारेट सोडण्याविषयी मी माझ्या धुरकट मनाला आजपर्यंत जो उपदेश केला आहे तो जर श्लोकबद्ध केला असता तर मनाच्या श्लोकासारखे माझे धुराचे श्लोक घरोघर म्हटले गेले असते. पण चार चरणांचा श्लोक तयार करणे हे माझ्या आवाक्यापलीकडले काम आहे. म्हणून बहुधा हा उपदेश मी गद्यातच करतो - मना, ह्या धुराच्या भोवऱ्यात फसू नकोस. रोज अडीच-तीन रुपयांची राख करणे हे बरे नव्हे. हे सज्जन मना - हा मोह आवर. बाकी मनातल्या मनात देखील माझ्या स्वत:च्या मनाला ‘मना सज्जना’ म्हणताना मला लाजल्यासारखे होते. ह्या माझ्या अचपळ मनाची-माझी बालपणापासूनची ओळख आहे-तरी देखील त्या माझ्या मनाला माझा मीच गोंजारीत असतो. वास्तविक हे स्वत:च्या गळ्यात हात घालून आपणच आपल्याला आलिंगन देण्यापैकी आहे.

बाकी सिगारेट सोडण्याचा किंवा अशाच प्रकारच्या सन्मार्गाने जाण्याचा उपदेश करणारा हा कोण आपल्या अंत:करणात दडून बसलेला असतो हे काही कळत नाही. पुष्कळदा वाटते की ‘आत्मा आत्मा’ म्हणून ज्याला म्हणतात तो हा प्राणी असावा. पण मन देखील अंत:करणातच असावे. मला वाटते ‘मन’ हे आत्म्याकडे पोटभाडेकरू म्हणून रहात असेल आणि एखाद्या प्रेमळ घरमालकाने गच्चीवरच्या एका खोलीत भाड्याने रहाणाऱ्या आणि वेळीअवेळी भटकणाऱ्या कॉलेजविद्यार्थ्याला नीट वागण्यासंबंधी उपदेश करावा त्याप्रमाणे हा ‘आत्माराम’पंत त्या ‘मन्याला’ उपदेश करीत असावा. पूर्वी काही नाटकांतून आत्मारामपंत, विवेकराव, क्रोधाजीबुवा, मनाजीराव वगैरे पात्रे असत. त्यांची अशावेळी आठवण येते. ‘मन’ हे नेहमी उनाड. ते नाही नाही त्या ठिकाणी जडते. कुठे कुणाच्या केसांच्या महिरपीतच गुंतेल - तर कुठे एखाद्या नाजूक जिवणीजवळ उगीचच फेरी घालून येईल - बरे ही जडायची ठिकाणे काय मोठी - काव्यमय - सुंदर - मोहक असायला हवीत असे थोडेच आहे. नाक्यावरच्या हॉटेलात संध्याकाळी - पहिली कांद्याची भजी चुरचुरायला लागली की मन धावले तिथे. चौपाटीवरच्या वाऱ्याबरोबर येणाऱ्या भेळवाल्याच्या ठेल्याची खबर नाकाशी आली की विवेकराव - क्रोधाजीराव - आत्मारामपंत वगैरे मंडळींना न जुमानता धावले तिथे - छे - ‘मन ओढाळ ओढाळ’ म्हटले आहे ते काय खोटे नाही. मला वाटते मनाचा ओढाळपणा सिगारेट, विडी, हुक्का, चिलीम वगैरे ओढण्यात जितका शाबीत होतो तितका इतरत्र कुठेही होत नसेल.

बाकी ज्या कुण्या मराठी माणसाने धूम्रपानाला ‘ओढणे’ हे क्रियापद लावले त्याची धन्य आहे. इतर भाषांत विडी पितात - आपण ‘ओढतो.’ इंग्रजीत तर सरळ ‘धूर सोडणे’ अशाच अर्थाचे क्रियापद वापरले जाते. याचे मुख्य कारण सिगारेट किंवा बिडीत काय ‘ओढतात’ हे पुष्कळांना कळलेले नसते. ‘काय, ‘फू फू फू फू’ करण्यात सुख वाटते कोण जाणे - हा आणि अशा चालीचा फुंफाट कुठल्या दिशेने येतो हे काय सांगायला हवे. बरे बायकाच नव्हे तर चांगले पुरुष म्हणवणारे लोक देखील ह्या ‘ओढण्या’ला विरोध करतात. पुरुषांच्या ओठाशी लडिवाळ खेळ करणाऱ्या आणि बोटाशी खेळणाऱ्या कुठल्याही वस्तूचा बायकांनी हेवा करावा हे मी समजू शकतो-पण पुरुषांनी? हॅ. अर्थात ह्याचे मुख्य कारण एकच. सिगारेट ओढणाऱ्याच्या ओठी असते ते पोटी नसते हे येरागबाळांना कसे कळावे. सिगारेट पिण्याला माझा विरोध आहे. कोरडी - धगधगती वस्तू प्यायची कशी? - बरे फू फू फू फू करायला सिगारेट ही काय फुंकणी आहे. 'विड्या फुंकतात' म्हणणाऱ्या लोकांना फुंकण्याचा अर्थ कळत नाही. काही लोक तर चक्क 'धूर काय ओढीत बसता?' म्हणतात. ह्या बाळबुद्धीला काय म्हणावे-सिगारेट ओढणारा माणूस हा धूर सोडणारा असतो - ओढणारा नव्हे. एका जिज्ञासू माणसाने मला 'तुम्ही सिगारेटीत नेमके काय ओढता?' असा सवाल केला होता. हा खरा अर्जुनाचा प्रश्न. त्याला उत्तर मात्र एकच-ओढून पहा.

बाकी सिगारेट ओढून पहा हे सांगणे जितके सोपे तितकेच सोडून पहा हे सांगणे बिकट आहे. कधी कधी मनाजीरावावर आत्मारामपंताचा विजय होतो आणि सिगारेट सोडण्याची आपत्ती ओढवते. काही दिवस आत्म्याचे राज्य सुरू होते -‌सिगारेट सोडायचा निश्चय झाला रे झाला की आत्म्याचा अंमल चढायला लागतो. अध्यात्माची पहिली प्रतिक्रिया म्हणजे वैराग्य. सिगारेट सोडण्याचा निश्चय करून तास - अर्धा तास होईपर्यंत ती वैराग्याची कळा चेहऱ्यावर दिसायला लागते - समोर चहाचा कप असतो. वास्तविक रोजचा क्रम एक घुटका चहाचा आणि सोबत झुरका सिगारेटचा असा असतो. आता चहा 'एकला पडलो रे' म्हणत ओठांतून पोटात जातो. पुष्कळ वेळा मला आतला आवाजच नव्हे तर आतले अनेक आवाज ऐकू येतात. पोटातली पचन विभागातली यकृत-प्लीहा-पित्ताशय-अन्ननलिका वगैरे स्त्री-पुरुष कारकूनमंडळी - त्या एकट्याएकट्याने येणाऱ्या घुटक्याला ‘काय आज एकटेच?’ असा प्रश्न विचारू लागलेले आतल्या आत उमगते. सिगारेट सुटली की - पोटात चहाला एकलेपणाची आग लागली आहे हे ताबडतोब समजते आणि सिगारेटबरोबर चहादेखील सोडायचा निश्चय व्हायला लागतो. चहा-सिगारेट आणि पान ही त्रिगुणात्मक विभूती आहे. जरा खोलवर विचार केला तर अत्रिने दिलेल्या तीन शिरांच्या दत्तगुरूप्रमाणे पत्रीने दिलेले हे त्रिविध दर्शन आहे. चहाचीही मूळ पत्री-तंबाखूचीही पत्री आणि पान म्हणजे तर साक्षात पत्री.

ह्या तिघांचा सोडा पण एकेकाचा त्याग करणे म्हणजे आपत्तीच म्हणायला पाहिजे. पण तरीदेखील आत्यंतिक रतीनंतर उपरती यावी त्याप्रमाणे सिगारेट ओढण्याप्रमाणे सोडण्याची लहर येते. आत्म्याचे प्राबल्य म्हणा किंवा त्याहूनही जबरदस्त असे पत्नीचे वर्चस्व म्हणा आपण सिगारेट सोडतो. इथे मी आपण हा शब्द ‘माझिया जातीच्या’ मंडळींना उद्देशून वापरला आहे. तात्पर्य - एखादा दिवस असा उजाडतो की त्या दिवशी भल्या पहाटेच आत्मा मनाला गाफील अवस्थेत गाठतो. मला ‘आत्मा’ हा इसम नेहमी गोरापान-थोडेसे दोंद सुटलेला-उघडा-आखूड धोतर नेसलेला-रूपेरी शेंडी तुळतुळीत डोक्यावर चमकते आहे-भरघोस मिशा आहेत-जानवे स्वच्छ आहे-आणि गाईचे धारोष्ण दूध पिऊन भेटायला आला आहे-असे वाटते. त्याच्याबरोबर विवेकराव असतात. हे गृहस्थ एखाद्या ग्रामसुधार कमिटीच्या चिटणीसासारखे पांढरे स्वच्छ कपडे घातलेले-बुटुकले-रोज दाढी करणारे-काळसर असले तरी नीटनेटके असे असतात. ही थोर माणसे शिरली की माझ्या गटातले मोह, क्रोध, लोभ वगैरे लोक निरनिराळी निमित्ते काढून पळतात. हा लाभ मात्र वारंवार पगडी बदलणाऱ्या पुढाऱ्यासारखा कधी आत्मारामपंताच्या गटांत तर कधी मोहाच्या पार्टीत आढळतो. आत्मा आणि विवेक एखाद्या निवडणुकीतल्या उमेदवाराने नवशिक्या मतदाराला पकडावे तसे - माझ्या मनाला पकडतात. एक अध्यात्माची जडीबुटी देतो. हृदय म्हणजे देवाचा देव्हारा - तो मंगल ठेवा - पवित्र ठेवा - तिथे तंबाखूचा का धूर न्यायचा? - तिथे पानाची थुंकी का साठवायची? व तिथे तो कोवळ्या पानांना चुरगळून केलेला चहा का ओतायचा? माझ्या हृदयात सोन्या मारुतीसारखे लहानसे देऊळ आहे - आणि एरवी पोटात जाणारी घाण - जीवजंतू - रक्तवाहिन्या वगैरे त्या देवळाच्या आजूबाजूंनी वहाणाऱ्या - गटारांसारख्या वाहतात. हे ऐकून मी गदगदतो. ह्या हृदयातल्या खेळांत बडवण्यासाठी घंटा असतील का असा एक चावट विचार मनाच्या मनात येतो. आणि मग विवेक आपल्या हातांतली कातडी पिशवी उघडतो. त्यांत निकोटीन, टॅनिन वगैरे भयंकर मंडळींची यादी असते. ही शरीराचा विध्वंस करणारी माणसे सिगारेट, चहा वगैरे मंडळींच्या पोटातून आपल्या पोटात जातात - शिवाय कॅन्सर. अरे बापरे! माझे भित्रे मन दचकून थरथरायला लागते आणि पोटातल्या ह्या खलबतांतून ओठांत उद्‌गार येतात -‌ मी सिगारेट सोडली. आजन्म सोडली.

तास-दोन तास जग किती पवित्र, मंगल दिसायला लागते. स्वत:च्या बायकोवर देखील खूप प्रेम करावेसे वाटायला लागते. वास्तविक तिचे ‘सिगारेट सोडा, सिगारेट सोडा’ हे टुमणे लग्न ठरल्या दिवसापासून चाललेले आहे. हर हर! ह्यासाठी मी त्या माऊलीचा किती वेळा अपमान केला. एकाएकी तिच्यापुढे जाऊन सौभद्रातल्या अर्जुनाप्रमाणे ‘‘कोण तुजसम सांग मज गुरुराया कैवारी सद्‌या’’ हे पद अंगविक्षेपासह म्हणावे असे वाटू लागते. पण आजूबाजूच्या विड्या ओढणाऱ्यांबद्दल मला घृणा वाटायला लागते. कचेरीत - ‘हं काढा सिगारेट’ म्हणणाऱ्या मित्रांना मी शांतपणाने - ‘मी सोडली सिगारेट’ असे सांगतो. ते हसतात मला. पण मी दाद देत नाही. मग नंतर सिगारेट सोडलेले लोक मला उपदेश करतात. कुणी म्हणतात हळूहळू कमी करा नाहीतर हार्टवर परिणाम होतो. कुणी म्हणतात - छे छे सोडायची म्हणजे सोडायची. - दिवसभर माझ्या डोक्यात एकच विचार. मी सिगारेट सोडली - त्या नादात कचेरीतल्या कामात चुका होतात. चेकवर सही करताना 'आपला नम्र' असे लिहून सही होते-डिस्पॅच्‌ क्लार्कदेखील हसतो - डिसोझा चिरूट ओढीत खोलीत येतो ती घाण सहन होत नाही म्हणून त्याला मी अत्यंत तुटकपणे खोलीतून हाकलून देतो - तो पलीकडल्या खोलीतून मला टेलिफोन करून "बायकोचा राग आमच्यावर कशाला काढतोस रे?" असे विचारतो. सगळ्यांचा समज आमचे घरात काहीतरी वाजले आहे असा होतो. माझे मलाही माझे असे का होते ते कळत नाही.

नेहमीप्रमाणे - ऑफिसच्या लंचरूममध्ये मंडळी जेवायला जमतात. आमच्या सेक्शनमधली नुकतेच लग्न होऊन रजेवर काश्मीरला गेलेली टायपिस्ट आजच रिझ्यूम झालेली असते - ती लडिवाळपणे जवळ येते - आणि - माझ्या नवऱ्याने हे तुम्हाला काश्मीरहून छोटेसे प्रेझेंट दिलेय म्हणते‌ - मी त्याला तुम्ही कसे जॉली आहात - तुम्ही आम्हाला आमचे बॉस आहात असे मुळीसुद्धा कसे वाटत नाही हे सगळे सांगितले आहे… वगैरे सांगून सुरेख कागदात बांधलेले प्रेझेंट देते - त्यात अक्रोडच्या की कसल्या लाकडाची सिगारेट केस असते. त्यात सिगारेटी देखील भरलेल्या असतात.

"हाच ना तुमचा ब्रॅण्ड?" मी निमूटपणाने हो म्हणतो. माझ्या अंत:करणात एका खाटेवर दम्याची उबळ आलेल्या म्हाताऱ्यासारखा आत्मा बसलेला आणि त्याच्या बाजूला डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारासारखा विवेक उभा असतो. आणि ते सज्जन मन एकेका झुरक्याबरोबर उर्दू मुशाहिऱ्यांतल्या रसिकांसारखे ‘‘वाहवा-क्या बात है-बहोत अच्छा सुभानल्ला’’ करीत असते.

- पु. ल. देशपांडे
अंक: केसरी सप्टेंबर १९६० (आकाशवाणी-मुंबईच्या सौजन्याने)
a