Leave a message

Wednesday, July 23, 2008

हे जग मी सुंदर करुन जाईन....

मित्रांनो,
 
'तो' मीच का 'तो मी नव्हेच' अशी शंका प्रेक्षकांनी कृपया घेऊ नये. तो 'मी'च पु. ल. देशपांडेच आहे. माझे मित्र श्री. वसंतराव कानेटकर यांनी माझी ओळख करुन देताना माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. अत्यंत निकटचे स्नेही असल्यामुळे अशी अतिशयोक्ती होणे स्वाभाविक आहे. मला भीती वाटू लागली होती की, आता हे मी त्यांना अगदी खाजगीत सांगितलेल्या गोष्टी अशा उघड्यावर बोलतात की काय? आणि त्यांनी तसे केले असते तर मी त्यांच्याच एखाद्या सुंदर नाटकाचा विषय घेऊन त्यावर बोलण्याचे ठरविले होते. वास्तविक "कानेटकरांचे सुंदर नाटक" असे म्हणण्यात द्विरूक्ती झाली आहे; कारण कानेटकरांचे प्रत्येकच नाटक सुंदर असते. परंतु कानेटकरांनी तेवढा संयम राखला आणि मला ती संधी दिली नाही.

आताच प्राचार्यांकडून मला असे सुचविण्यात आले की, मी काही मार्गदर्शनपर गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना उपदेश करावा. वास्तविक माझा असा उपदेश करण्यावर आणि तो उपदेश लोक ऐकत असतील या दोन्हींवर विश्वास नाही.प्रथम ह्या प्रसंगी ज्यांना बक्षिसे मिळाली आहेत आणि ज्यांनी त्यांना ती मिळू दिली अशा दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः स्वतःचे जीव धोक्यात घालून इतरांचा बचाव करण्यात श्री. तिजारे व श्री. शिंदे यांनी दाखविलेल्या सहजस्फ़ूर्त धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तुमच्या ह्या नाशिक शहराला एक विशेष परंपरा आहे. ती म्हणजे कधी तरी राम येथे पंचवटीत येऊन राहिला आणि सीतामाईने त्याचे पाय चुरले म्हणून नव्हे किंवा नाशिकच्या चिवड्यासाठीही नव्हे. परवाच मी कोणाला तरी सांगितले की मी नाशिकला जात आहे. त्यांनी "ऑं!" असा उद्गार काढला व अगदी चेहरा पाडला. मी म्हटले तसे काही नाही-- स्नेहसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी जात आहे. नाशिक शहराला सावरकर, कान्हेरे यांच्यासारख्या क्रांतिकारकांची परंपरा लाभली आहे आणि आजही जशी ह्या आठवणींची ज्योत माझ्या ह्रदयात तेवत आहे तशीच ही आठवण तुमच्याही ह्रदयात सतत तेवत राहील अशी माझी खात्री आहे. असले प्रसंग किरकोळ म्हणून नाउमेद व्हायचे कारण नसते. कल्पना करा की,सूर्य मावळताना त्याला चिंता पडली की,माझा उजेड संपल्यावर या सर्व जगाचे कसे होणार?--- सर्व सत्ताधारी व्यक्तींची हीच भीती असते की, माझ्यानंतर या खुर्चीचे काय होणार? सूर्य तरी याला अपवाद कसा? सर्व विद्युद्दीप पेटले होते, मशाली पेटल्या होत्या, अशा वेळी एक बारीकशी पणती---केवढी मिणमिणती ज्योत होती त्या पणतीची !---ती म्हणाली,"भगवन , मला होईल तेवढे मी आपले कार्य करीन. कदाचित आपल्याइतके सामर्थ्य नसेल माझ्या या प्रकाशात. परंतु म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही." स्वा. सावरकर, कान्हेरे यांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांच्या साहसाइतके तुमच्या तिजारे, शिंदेंचे साहस मोठे नसेल, पण त्यालाही महत्व आहेच. त्यांच्या कर्तव्यतत्पर साहसप्रवृत्तीला महत्त्व आहे.

मी असे ठरविले होते की, काही भाषण तयार करुन जाण्यापेक्षा येथे आल्यावरच तुमच्याशी काही हितगुज करावे. असे भाषण तयार करुन जाण्याचे माझ्यावर अनेकदा प्रसंग येतात आणि येथे तर ते नेहमीच येत असतील. आजचा विद्यार्थीवर्ग बदलला आहे, असा गहजब नेहमी कानांवर पडतो, पण मला तरी हा विद्यार्थीवर्ग बदलला आहे असे वाटत नाही. विद्यार्थ्यांचे बाह्यांग बदलले आहे, पॅंट्सची रूंदी कमी झाली आहे. तरुणींच्या पोषाखाबाबत मी जास्त तपशीलात शिरत नाही. गॅदरींगच्यावेळी एखादा विद्यार्थी बक्षीस घेत असताना 'वशिला' करुन ओरडणे...सर्व तेच आहे. मीही तुमच्यासारखा असताना असेच ओरडत होतो, आणि म्हणून मला वाटते, जे लोक असे म्हणतात की, विद्यार्थी बदलले आहेत ते लोक स्वतःची विद्यार्थीदशा पूर्णतया विसरलेले असतात. मला काही सांगायचंय ह्या कानेटकरांच्या नाटकाच्या नावाचा आधार घेउन मी असे सांगतो की, प्रत्येकाच्या कृतीत 'मला काही सांगायचंय' ही भावना असते. आणि ऐकू इच्छिणाऱ्या समोरील व्यक्तिमध्येही त्याचा अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा असते. बस पकडण्यासाठी काय माणसे धावत नाहीत ? परंतु त्या धावण्यामागे आणि आताच्या या 'रनिंग'च्या स्पर्धकांच्या धावण्यामागे काही निराळा दृष्टीकोण असतो. त्यामधून त्याला काही सांगायचे असते. त्याचप्रमाणे रांगोळीस्पर्धा. त्या स्पर्धकांना माहीत असते की, रांगोळी फार तर उद्यापर्यंत राहील आणि परवा हा दिवाणखाना झाडणारा नोकर ती रंगोळी, ती कलाकृती झाडून टाकणार आहे. आणि हे माहीत असूनही ते कलावंत पाच पाच, सहा सहा तास खपून ती रांगोळी काढीतच असतात.कारण त्या कलाकृतीतून त्यांना काहीतरी सांगायचे असते. परंतु ते सांगणेसुद्धा सुंदर व आकर्षक असावे लागते. उदारणार्थ, एखाद्या मुलीचे लग्न ठरले---मुलीचे येथे नाव मुद्दामच घेत नाही, नाहीतर उद्यापासून तिचा कॉलेजमध्ये छळ सुरु व्हायचा. म्हणूनच मी 'क्ष' असे म्हणतो. आणि क्ष वगैरे म्हटल्याने आपण विद्वान असल्याचा आनंद होतो---तर समजा, त्या मुलीचे लग्न ठरले, तर लागलीच तिची आई पहिल्या शेजारणीला सांगते,"अहो ऐकलं का ?" ती एकदम सांगत नाही, आमच्या मुलीचे लग्न ठरले म्हणून ! "अहो ऐकलं का ?" की त्यावर ती शेजारीण म्हणते,"का हो,काय झालं ?" ती आई मग सांगते ," बरं का ! आमच्या 'क्ष'चं लग्न ठरलं ! आणि अगदी अचानक , अकल्पितच ठरत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी चूक अत्यंत आनंदात साजरी होत असते आणि ह्या सर्व गोष्टी सारे जण रस घेऊन ऐकत असतात.

साहित्य-संगीत-कला या सर्वांच्या मुळाशी 'मला काही सांगायचयं' हीच भावना आहे. उक्तीने व कृतीने आपले म्हणणे सांगण्याची ऊर्मी तुम्हा-आम्हा सर्वांत आहे. सूर्योदय आपण कधी नव्हे तो चुकून एखाद्या वेळी पाहिला असला तरी सूर्योदयाचे चित्र आपण आनंदाने पाहतोच. म्हणजेच या सांगण्यामध्ये आनंद असावा. नाहीतर एखाद्या विद्यार्थ्याला "का रे झाला का बक्षीसमारंभ ? किती बक्षीसे वाटली ?" असे विचारल्यावर त्याने " वाटले पन्नाससाठ कप " असे उत्तर दिल्यास विचारणाऱ्याला पुढे हिंमतच व्हायची नाही. पण तेच जर "वा ! केवढी गर्दी झाली होती पु. लं. च्या भाषणाला ! काय त्यांची लोकप्रियता !" (मी पु. ल. नाव फ़क्त उदाहरणादाखल घेतले आहे व 'क्ष' जागी ते घेतले आहे.) असे सांगितल्यावर विचारणाही साहजिकच "ही आली होती का, ती आली होती का," असे विचारील आणि सांगणाराही अत्यंत आनंदाने सांगेल---कॉलेजमध्ये कधी न दिसणाऱ्या मुली आज दिसत होत्या...आणि त्या बोलण्याच्या आनंदात मग पु. ल. आपोआप केव्हाच मागे पडतील.

जीवनातील आपले अनुभवाचे संचित दुसऱ्यापुढे मांडावे, दुसऱ्याचे आपण पहावे, अशी जी आपली इच्छा असते तीतच माणसाचे माणूसपण आहे. परंतु जेव्हा एखादा पालक आपल्या मुलाला "मला तुझं काही ऐकायचं नाही, तुला काही सांगायचं नाही" असे म्हणतो आणि हे सांगणे व ऐकणे जेथे संपते तेथेच त्या माणसातला माणूसही स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो.परंतु माणसामाणसांचे हे प्रेम व सहानुभूती इतकी उत्कट असते की, माणसाला मरतानासुद्धा निर्जीव उशीचा आधार चालत नाही तर त्याला थरथरणाऱ्या मांडीचा आधार डोक्याखाली लागतो. पाकिस्तानमध्ये झालेल्या वादळाच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या वा घरकुले विस्कळित झालेल्यांबद्दल आपणाला सहानुभूतीच वाटते. त्या वेळी आपण त्यांच्याकडे पाकिस्तानी म्हणून न बघता एक माणूस या दृष्टीनेच पाहतो.

दुर्दॆवाने 'सहानुभूती' हा शब्द आजकाल दुःखद घटनांच्या वेळीच वापरला जातो. वास्तविक सहानुभूती म्हणजे सह + अनुभूती = दुसऱ्याचा अनुभव आपला मानून त्याच्या अनुभवविश्वात शिरणे, ही माणसाची महान शक्ती आहे. उदाहरणार्थ, कानेटकरंचे शिवाजीवरील नाटक ! आपणांला माहीत आसते की शिवाजीचे काम करणारा माणूस हा शिवाजी नाही, तर तो रंगमंचावर काम करणारा एक नट आहे आणि तो आपल्याशी बोलत आहे---खरा शिवाजी असता तर आपणांशी बोललाही नसता. कारण आपण नालायक बनलो आहोत---परंतु आपण हे नाटक पाहण्यासाठीसुद्धा पैसे खर्चून जातो आणि विकत काय घेतो तर शिवाजीची व्यथा ! आपल्याही नकळत आपला त्यातील पात्रांशी नाट्यगृहात एक मूक संवाद चाललेला असतो. असे एखादे यंत्र निघाले आणि त्यातून हा मूक संवाद टेप झाला तर तो आपणाला स्पष्टपणे ऐकू येईल. ह्यालाच सहानुभूती ---सह + अनुभूती---म्हणतात. ही शक्ती निसर्गाने फ़क्त मानवालाच दिली आहे आणि ही सहानुभूती जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हाच आपणांस आपण माणूस असल्याचा आनंद होतो आणि त्यातील प्रेक्षक हा त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तारांपैकी निगेटीव्ह तार बनलेला असतो. त्यातूनच आनंददान नि आनंदग्रहण अखंडतया सुरु असते.

म्हणून साहित्य, संगीत, कला या सर्वांच्या मूळाशी मला काही सांगायचयं हीच भावना असते आणि माणसाची स्वाभाविक भावना दुसऱ्याच्या अनुभवविश्वात रममाण होण्याची असल्यामुळे आपण ही ते अनुभवितो आणि त्यातील कलेचा आस्वाद घेतो. गडकऱ्यांचे 'एकच प्याला' बघायला गेल्यावर आपण आपोआप म्हणतो," काय सुंदर श्ब्दांत यांनी सिंधूचं दुःख वर्णन केलं आहे !" त्या कलेच्या आस्वादापासून आपणांस एक प्रकारचा आत्मिक आनंद प्राप्त होतो आणि एक मूक संवाद पुन्हा आपल्या ह्र्दयात सुरु होतो. परंतु उद्या जर तुमच्या शेजारी एखादा दारुड्या आपल्या बायकोला मारीत असेल आणि ती रडत असताना तुम्ही तिथे जाऊन "वा ! काय सुंदर देखावा आहे !" असे म्हणालात तर पुढचा फटका कोणाला बसेल हे तुम्ही जाणताच !

निराशावादी माणसालासुद्धा "मला मरावंसं वाटतं" असे दुसऱ्या कोणाला तरी सांगावेसे वाटते आणि तो आपल्या कवितेद्वारा आपले ते विचार बोलून दाखवतो. आपण जर त्याला म्हटले," मग आपण गेलात तरी चालेल " तर तो म्हणतो," पुढची कविता तर ऐका ! " खरे म्हणजे आजच्या कॉंग्रेसच्या राज्यात जीव देण्यासारख्या अनेक जागा मला दाखवता येतील.

संगीताच्या मैफलीच्या वेळी मला अनेकदा विचारले जाते, गाणे किती वाजता सुरु होणार आणि किती वाजता संपणार ? मी त्या गृहस्थाला नमस्कार करतो आणि सांगतो, कृपा करुन आपण येऊ नका. गाणे रात्री सुरु होईल आणि पहाटेपर्यंत केव्हातरी संपेल. संगीतातील सूर, लय, ताल यांचे ज्ञान माणसास हळूहळू येते. लहानपणी मुलाला खेळवताना त्यांच्या साऱ्यांच्या आया गाणे म्हणतात---"अडगुलं मडगुलं." पण मला वाटते, शेकडा ४ टक्के मुले बरोबर त्या त्यालावर हातपाय हलवतात. बाकीची मुले इतकी मठ्ठ असतात की त्यांच्या आया स्वतः नाचल्या तरी ती गप्पच असतात. ही मुले बहुतेक पुढे कुठेतरी तत्वज्ञानाचे प्राध्यापक होत असतील.

आजचा विद्यार्थी असंतुष्ट आहे असे आज सर्वत्र म्हटले जाते. पण मी विचारतो विद्यार्थ्यांनी काय संतुष्ट असायला पेन्शन घेतले आहे, की त्यांनी म्हणावे बायकोमुले सुखात आहेत ? विद्यार्थ्यांनी असंतुष्टच असायला हवे. पण तो असंतोष विघातक नको. त्यातून मशाली पेटल्या पाहिजेत. नाहीतर आपण कचराच पेटवाल. हा असंतोष पूर्वापार चालत आल आहे. तुकाराम काय संतुष्ट तरुण होता ? ज्ञानेश्वर असंतुष्ट होते म्हणूनच 'अमृतातेही पैजा जिंके' अशा भाषेत गीतेचे तत्त्वज्ञान मराठीत आणले. एकाच चिखलात कमळ आणि बेडूक दोन्ही असतात, पण बेडूक चिखलातच बुडालेला असतो आणि कमळ मात्र चिखलातूनही मान वर करुन उभे असते. आपण बेडूक होणार की कमळ होणार ते आपणच ठरवा.

आपण आज ह्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनासाठी मला बोलावले. वास्तविक आपण जे रोज येथे जमता तेव्हा का तुमच्यत स्नेह नसतो ? कधीकधी तर स्नेह जुळावासा वाटतो पण तो जुळत नाही. परंतु अशा स्नेहसंमेलनातून आपणांला काहीतरी सांगायचे असते. अशा वेळी वक्त्याचे भाषण पाडून ओरडा करणे हे विद्यार्थ्याचे साहस नाही. त्या वक्त्याचे त्यात काही जात नाही ! मुले मूर्ख आहेत असे म्हणून तो निघून जातो. परंतु वर्गातील १०० मुलांमध्ये ' मला हे समजलले नाही ' म्हणून उभे राहून प्राध्यापकाला ताडकन विचारणे हे साहस ! परंतु हे साहस कोणी करीत नाही. दोन हजारांतील फक्त पाचशे विद्यार्थीच खरे विद्या + अर्थी या नात्याने आलेले असतात. बाकीचे आई-वडिलांनी पाठविले म्हणून आलेले असतात. या बाबतीत पालकांचे अज्ञानही बघण्यासारखे असते. एखाद्या मुलाने जर म्हटले की " मी 'अर्ध' मागधी घेतो ; ते स्कोअरिंग आहे." तर पालक म्हणतात, "मग 'पूर्ण' मागधी का घेत नाहीस ? 'अर्ध'-मागधीच का घेतोस ?" आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये खरी ज्ञानलालसा कमी असते. पण पुढच्या वर्षी जर ती ज्ञानलालसा असलेली पाचशेच मुले ह्या कॉलेजमध्ये राहिली तर मी ह्या कॉलेजची भरभराट झाली असेच म्हणेन ! मग येथे एवढाल्या लायब्ररीज, लॅबोरेटरीज नसतील तरी ज्ञानलालसेच्या ईर्षेमुळे एखाद्या झाडाखाली फिजिक्सकेमिस्ट्री आणि मॅथ्ससारखे विषयही शिकता येतील.

मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या एका मुलीला विचारले,"तुम्हांला ज्ञानेश्वरांचं काय काय आहे ?" तर ती म्हणाली,"१० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे." मी पुढे विचारणार होतो की, "माझं किती साहित्य आहे ?" पण पहिल्या उत्तराने मला पुढील प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण ज्ञानेश्वरच दहा मार्कांचा तर मला १ लक्षांश तरी मार्क असेल की नाही कोणास ठाऊक ! आजकाल समग्र ज्ञान मिळविण्याची ईर्षा कमी झाली आहे. त्यांचा ज्ञान मिळविण्याचा 'स्पॅन' लिमिटेड झाला आहे. एका डिग्रीच्या बिनमहत्त्वाच्या कागदासाठी ही सर्व झटापट आहे. या बाबतीत एका पीएच.डी.च्या विद्यार्थिनीचा मला आलेला अनुभव आपणापुढे मांडतो. तिने पीएच.डी.साठी 'मराठी कादंबरी' हा विषय घेतला होता. मी तिला नंतर विचारले, आपणाला 'रणांगण'बद्दल काय माहिती आहे ? तिने विचारले,'रणांगण'? कारण तिच्या पीएच.डी.साठीच्या कादंबरीच्या स्पॅनच्या पलीकडील हा विषय होता. केवळ डिग्रीसाठी हा खटाटोप होता. ज्ञान मिळवण्याची आस बिलकूल नव्हती. तिच्या परीक्षकाने जर 'नाशिकमधील गाढवे व गाढवांचे प्रकार' या विषयावर प्रबंध लिहिण्यास सांगितला असता तर तोही तिने ह्या डिग्रीच्या कागदासाठी लिहिला असता---स्वतःचाही त्यात समावेश करुन ! आणि तो प्रबंध व ती बाई दोन्हीही बघण्यासारखे नव्हते हे आणखी एक नवल !

आज मला येथे सांगण्यात आले की पारितोषिके बरीच वाटायची आहेत, आपणांला त्रास नाही ना वाटणार ? परंतु मला यात कंटाळा नाही ! अहो त्यासाठीच तर मी येथे आलो आहे. आज येथे स्टेजवर येऊन मोकळेपणाने मुली संगीताची, खेळांची पारितोषिके घेऊन जात असताना मला आठवण होते ती आगरकर, फुले यांनी घेतलेल्या कष्टांची आणि झेललेल्या चिखलमातीची ! मग मला समोर त्या मुली दिसत नाहीत, पारितोषिके दिसत नाहीत, आणि एका निराळ्याच अनुभवविश्वात मी स्वत:ला हरवून बसतो.

माझ्याबद्दल अशी एक हकिगत सांगितली जाते की, माझे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. खरे म्हणजे गरिबीत वगैरे काही गेले नाही, पण आजच्याइतके ते चांगल्या स्थितीत गेले नाही एवढे मात्र निश्चित ! पण तेव्हाही आम्हांला आम्ही गरीब आहोत ह्याची आठवण व्हायला फुरसत नसायची. आज काय बालगंधर्वाचे गाणे आहे, पळा तिकडे ! उद्या काय सी.के.नायडूंची मॅच आहे, जा तिकडे. मग कधी ती झाडांवर चढून बघ, तर कधी दुसऱ्याच्या गच्चीवरुन ! (फुकट बघायला मिळते म्हणून.) आमच्या पाठीमागे इतकी व्यवधाने असत की आमच्या गरिबीचीसुद्धा आम्हांला आठवण होत नसे. ह्याबाबत टागोरांची एक कविता सांगतो.---एक माणूस असतो. त्याच्या गळ्यात एक लोखंडाची साखळी असते. ती सोन्याची करण्यासाठी त्याला परीस शोधायचा असतो. समुद्राच्या काठाने जाताना तो सारखा दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि खाली टाकून द्यायचा ! असे करता करता निराश होऊन खूप पुढे गेल्यावर त्याने सहज साखळीला हात लावून पाहिला तर ती केव्हाच सोन्याची झालेली होती ! त्याच्या हातातून परीस केव्हाच निसटून गेला होता. तुमच्याही प्रत्येकाच्या हातात परीस आहे. कोणाच्या हातात तो चित्रकलेच्या रुपात आहे,कोणाच्या हातात संगीताच्या रुपाने ! फक्त त्याकडे नीट बघावयास शिका. याबद्दल मला एक उर्दू शेर आठवतो---"बगीच्यात फुलांचे ताटवे फुलले आहेत, गुलाबाची फुले डुलत आहेत, पण त्यांकडे बघण्यासच कोणी नाही."

साहित्यकार, लेखक होण्याची इच्छा असणारे अनेक तरुण माझ्याकडे येतात आणि मला विचारतात,आम्ही काय वाचू ? कशाचा प्रथम अभ्यास करु ? मी त्यांना सांगतो, बाहेर पडल्यापासून नाक्यावरच्या जाहिरातीपासून तुम्ही बघत चला. मग ती जाहिरात अगदी 'दो या तीन बच्चे बस !' ही जाहिरात असली तरी चालेल. परंतु फक्त तेच बघू नका. जीवनाच्या महान अर्थाकडे बघण्यास शिका आणि कशावरही लिहा. मग ते झोपडपट्टीचे वर्णन असो अगर एखाद्या ताजमहालाचे ! यावरुन मला मर्ढेकरांच्या एका कवितेवरुन झालेल्या वादाची आठवण होते. विषय होता 'उंदीर' ! त्यावर टीकाकार म्हणाले, एवढ्याशा उंदरावर काय कविता काय करायची ? दुसरे विषय नव्हते ? परंतु काव्यविषय हा त्याच्या आकाराच्या लहानमोठेपणावर ठरत नाही.असे असते तर प्राण्यामधील सर्वात मोठा प्राणी हत्ती आणि निसर्गातील सर्वात उच्च हिमालय ह्यांशिवाय काव्याला विषयच उरले नसते. मग गुलाबाच्या एखाद्या फुलावर किंवा पाकळीवर काव्यच झाले नसते. कारण ते फूल आकाराने लहान होते ना !

लायब्ररीत अनेक ग्रंथ असतात, पण त्यांतील माझे पुस्तक पाहण्याचा मला अजिबात धीर होत नाही. कारण त्यावर अनेक शेरे ठिकठिकाणी मारलेले असतात ! भिकार विनोद ! यापुढे लेखन बंद करावे ! ---कित्येकदा वा ! वा ! फारच सुंदर ! असेही लिहिलेले असते आणि मलाही वाटते नेमके तेच पान उघडले जाईल याची खात्री नसते. व्यावहारिक समीक्षकांच्या टीकेचे काही वाटत नाही. कारण टीका लिहून लिहून त्यांचे कातडे अगदी जाड झालेले असते ! पण तो त्यांचा व्यवसायच असतो. त्याविषयी ते करणार तरी काय बिचारे ! पण ह्या अशा उत्स्फूर्त शेऱ्यांना मात्र एक सत्याची फार मोठी किनार असते. ज्यातून मला फार शिकायला मिळते.

जीवनाच्या तीन अवस्था आहेत. तारुण्य, संयम नि निवृत्ती. तुम्ही तरुण विद्यार्थी जर एखादी सुंदर तरुणी जात असताना आकाशाकडेच डोळे लावून बसलात तर तो तारुण्याचा अपमान आहे. पण हे जाणूनही आपणांकडे नंतरच्याही अवस्था आहेत हे तुम्ही विसरुन चालणार नाही. 'मौनं सर्वार्थसाधनम' अशी पूर्वीच्या गुरुंच्या प्रेरेणेत शक्ती होती. परंतु आज तसे नाही. असले विचारधन अवलोकनाने आपण समृद्ध करायला हवे. गुरुंनी समजावून सांगायला हवे व ऐकणाऱ्याने ते ऐकायला हवे. मौनं म्हणजेच गुरुपण असते तर शिष्यालाच गुरु केले असते.

मला नेहमी विचारण्यात येते, कलावंत जन्माला यावा लागतो का? कलावंत जन्माला यावा लागत नाही. पण जगाकडे आपण सूक्ष्मपणे उघड्या डोळ्यांनी बघावयास हवे ! जे पाहिले ते सुंदर, आकर्षक शब्दांत सांगता आले पाहिजे ! जनतेची नाडी ज्याने पाहिली त्याला आपला अनुभव सांगण्याची ओढ असते. तेथेच कलावंत असतो.

ज्या जगात मी आलो ते हे जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी जिद्द हवी. केवळ विद्यार्थ्याबद्दलच नव्हे तर आपल्या सर्वच समाजाबद्दल माझी ही तक्रार आहे की, आपण जीवनाकडे पाहतच नाही. तरुण असंतुष्ट म्हणून ओरड होते. मी म्हणतो तरुण असंतुष्ट नाहीत तो काय देश आहे ? तरुणांनी असंतुष्टच राहिले पाहिजे. पण ते या अर्थाने की त्यांनी जीवनाचे आव्हान स्वीकारायचे.-"प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा" असे केशवसुतांनी सांगितले आहे. त्यातील 'लेणी' हा शब्द फार सुंदर आहे. त्यांनी चित्रे रंगवा असे म्हटले नाही. तर, कलानिर्मिती ही त्याहून अवघड कामगिरी आहे. ही निर्मिती सहजासहजी होत नाही.त्यासाठी पत्थर फोडून त्याच्याशी झुंज द्यावी लागते. हे आव्हान तुम्ही स्वीकारा, तशी जिद्द बाळगा, एवढेच माझे आजच्या तरुण पिढीला सांगणे आहे.

- पु.ल. देशपांडे

13 प्रतिक्रिया:

Unknown said...

apratim.

Anonymous said...

atishay sundar!

Unknown said...

This is indeed great, Hats off to Pu La and his thoughts.

Tyanche Vichar vachun navin umed milate.

Keep this BLOG live.

Thanks,

Mahesh

sgshende said...

Sundar, Dhanyawad

भारद्वाज said...
This comment has been removed by the author.
भारद्वाज said...

"ज्या जगात मी आलो ते हे जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करुन जाईन"...kharach apratim vichar mandla aahe. Sunder.

Anonymous said...

SPEECHLESS.....!!!! thanks alot
pls keep this block live.. please....

please write or maintain blog on SHIVAJI SAWANT and V. S. KHANDEKAR..

Anonymous said...

akela chal pada tha sahil..
phul khilate gaye, log aate gaye...
aur KARAVA ban gaya

aditi's said...

Keval Apratim !!!

Unknown said...

apratim..........

Deepak said...

gr8 yaar

संगमनाथ खराडे said...

"प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा"
Ekdum jhakkas...

Unknown said...

Khup khup chan ... vachun agadi sakaratmak vatale 🥰

a