Wednesday, November 21, 2012

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही - पु.ल.

भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा.

बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो. जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे काही जात, धर्म, पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात, दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात. तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात. आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, बुध्द, जैन, शीख- सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे. एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात. मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी, कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत. केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मेथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.
मनुष्यस्वभावात हा जात नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक विलक्षण कोडे आहे.

आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते. कामगार-चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील, असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही. त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-गिरण्यांतल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते. खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसताहेत. ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’ अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे. अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान घालताना दिसताहेत. खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.

आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर बुद्धिप्रामाण्य वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही. कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फेडतात. आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय. जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातेत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलिनांना उध्द्वस्त करण्यात येते. मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती, की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले फुले आणि कसले काय?

एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.

विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.

पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.

संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.
त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.

कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’.

मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.


(’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन)

Thursday, November 8, 2012

भारतीय अशी रंगभूमी आहे काय?

पु.ल. देशपांडे यांनी वेळोवेळी केलेल्या विविध विषयांवरील भाषणांचं संकलन ' पाचामुखी ' या नावाने आज ' परचुरे प्रकाशन ' तर्फे प्रकाशित होत आहे. याच पुस्तकातील भारतीय रंगभूमीवर भाष्य करणारा पुलंचा लेख...

' भारतीय रंगभूमी ' नावाचं काही वैशिष्ट्यपूर्ण रसायन आहे का ? किंवा ' भारतीय रंगभूमी ' म्हणून एखादी रंगभूमी निर्माण करता येईल काय ? याचा शोध गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चालू आहे. तीन वर्षांपूर्वी संगीत नाटक अकादमीनी दिल्लीत ' लोककला-लोकनाट्य किंवा पारंपरिक नाट्य यांचा आजच्या आधुनिक रंगभूमीशी काय संबंध आहे ?' याविषयी एक परिसंवाद आयोजित केला होता. काही वर्षांपूर्वी रंगभूमीविषयी बोलताना ब्रेख्त , इब्सेन , आयनेस्को या पाश्चात्त्यांची नावं घेऊन बोलायचं , असं जवळजवळ ठरून गेलं होतं , परंतु या परिसंवादात कुठल्याही युरोपीय नाटककाराचा उल्लेख झाला नाही. मी हे राष्ट्रीय अहंकारानी बोलत नाही. या परिसंवादात भाग घेतलेला प्रत्येक जण तोंडाला रंग लावून नाटकात काम करणारा होता. या परिसंवादातून असं एक लक्षात आलं की , लोककला किंवा पारंपरिक नाट्य , ज्याला आपण folk form म्हणतो , त्यातली पुष्कळशी शक्ती आपण दुर्लक्षितच केलेली आहे. हे सर्व फॉर्म्स आहेत तरी काय , याचा विचार करण्यासाठी अलीकडेच बंगळुरूला नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता.

बंगळुरूच्या भारतीय नाट्य संघानी संगीत नाटक अकादमीच्या सहकार्यानी हा महोत्सव साजरा केला. या महोत्सवात अव्यावसायिकांचे आणि व्यावसायिकांचे परिसंवादही झाले. कानडी रंगभूमीवरच्या बऱ्याचशा नाटक कंपन्या तालुक्याच्या गावाला , खेडोपाडी प्रयोग करणाऱ्या आहेत. ही माणसं शहरात जाऊन चर्चेत भाग घ्यायला बुजतात , पण या परिसंवादात आधीच ' तुमचे प्रश्न मोकळेपणाने , निःसंकोचपणे मांडा ' असा दिलासा दिल्यामुळे प्रत्येक जण आवेशाने आणि पोटतिडकीने बोलत होता.

मास्टर हिरण्णा यांच्या ' लंचावतार ' या फार्सचा प्रयोग पाहिला. हे तमाशासारखं नाटक. आपल्याकडच्या ' विच्छे ' सारखंच याचं थोडंफार स्वरूप. तत्कालीन दिवसांत घडलेल्या राजकीय घटनांवर रोज संध्याकाळी मार्मिक उपहासात्मक भाष्य , असं त्याचं स्वरूप. हे नाटक बंद पाडण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले , पण ते चालूच राहिलं. त्या नाटकामुळे या प्रकाराकडे शहरातल्या नाट्यरसिकांचं लक्ष वेधलं गेलं. याच काळात गिरीश कर्नाड आपली चांगली नोकरी सोडून ' यक्षगान ' चा अभ्यास करू लागले. ज्या खेड्यात या नाट्यविषयाचा उगम आहे , तिथे राहून , अभ्यास करून पुढे त्यांनी ' हयवदन ' लिहिलं. त्यांनी ' यक्षगान ' चं जे कानडीकरण केलं , त्यातली ताकद मराठी रूपांतरात आली नाही. ती केवळ कोरडी नक्कल होती. या सुमारास आपल्याकडच्या अनेक लेखकांचं लक्ष या folk forms कडे गेलं. याच सुमारास महाराष्ट्रात बादल सरकार आलं होतं. त्यांना मी बरेच तमाशे वगैरे दाखवले. लोकनाट्याचा हा प्रकार पाहून एखाद्या मराठी माणसानं हिरिरीनी तमाशाचा पुरस्कार करावा तसं ते म्हणाले , ' नवी नाटकं लिहिण्यासाठी मला तमाशातल्या शक्तीचा निश्चितपणे खूप उपयोग होईल! ' आंध्रमधल्या लोकांचं ' विथीनाटकम् ' म्हणजे street plays आहेत. यांत इतकी शक्ती आहे की , रंगपीठाचा अभाव असतानाही या नाटकाचा प्रयोग फार सुंदर होतो. उत्तर प्रदेशातल्या ' रामलीले ' चा तर प्रेक्षकांवर इतका प्रभाव पडतो आणि प्रेक्षक त्या प्रयोगाशी इतके समरस होऊन जातात की ; राम , लक्ष्मण आणि सीता वनवासाला जाण्याच्या प्रसंगाच्या वेळी सारे जण शरयू नदीच्या तीरापर्यंत त्यांना पोहोचवायला जातात. ' छाऊ ' हा कलाप्रकार पाहताना तर मी त्यातल्या एका कलावंताच्या आंगिक अभिनयातल्या कौशल्यानी भारावून गेलो. प्रयोग संपल्यानंतर त्याला मी भेटलो तेव्हा कळलं की , दिवसभर सायकलरिक्षा चालवणारा हा माणूस रात्री ह्या नाटकात काम करतो! तेव्हा साहजिकच मी त्याला विचारलं , ' दिवसभर सायकलरिक्षा चालवून दमूनभागून आल्यानंतर या प्रयोगात काम करायला उत्साह कसा राहतो ?' तेव्हा तो म्हणाला , ' यहाँसे शक्ती मिलती है! '

बदलत्या परिस्थितीमध्ये एका विशिष्ट परंपरेत चालत आलेले हे जे सर्व folk forms आहेत , हे कसे टिकणार आहेत ? त्यांचं नुसतं पुनरुज्जीवन करून भारतीय रंगभूमी निर्माण होणार आहे का ? त्यातून नेमका असा कुठला धागा आहे की ज्या धाग्याचा रंग आपल्याला सगळीकडे सापडतो , म्हणून त्याला भारतीय रंगभूमी म्हणावं ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ' भारतीय रंगभूमी ' असा शब्द वापरताना माझ्या मनात अनेक शंका येतात. मात्र हे सगळं पाहताना मला कुठेतरी मांडणीतलं साधर्म्य आढळतं. त्यातला आशयाचा भाग बाजूला ठेवून अभिव्यक्तीच्या बाबतीत तर मी सांगू शकेन की , सबंध भारतभर जे बरेचसे नाट्यप्रकार आहेत , त्यांच्यामध्ये विलक्षण साधर्म्य आहे. हे साधर्म्य कुठपर्यंत आहे , तर काश्मिरातल्या श्रीनगरच्या लोकांचं लोकनाट्य मी एकदा पाहिलं. पाहतो , तर त्यातल्या सूत्रधाराचा वेष आपल्या कोकणातल्या दशावतारातल्या खेळीयातल्या सूत्रधारासारखाच! संस्कृत नाटकातला सूत्रधार अनेक तऱ्हांची कामं करणारा असतो. सगळीकडे हा असलाच प्रकार दिसला. हा सूत्रधार आपलं स्वतःचं सूत्रधाराचं काम करताकरता नाटकातलं पात्र बनून बोलतो. दक्षिणेकडे आणि ओरिसा वगैरे भागांत खूपच विविधता दिसून येते. आपल्याकडे त्या मानाने विविधता कमीच! अभिनय किंवा नाटक किती तऱ्हांनी लोकांपर्यंत पोहोचवता येतं , त्याच्यासाठी कायकाय माध्यमं वापरायची ; अशा अनेक बाबतींत त्या भागातल्या लोकांनी खूपच प्रगती केलेली आहे. कधी शब्दांतून , कधी गीतांतून , कधी शब्द आणि गीत यांच्या एकत्रीकरणातून , तर कधी अभिनय आणि नृत्य यांच्या एकत्रीकरणातून नाट्य आकाराला येतं ; तर कधी मूकनाट्य हा रूपबंध स्वीकारून एकीकडे स्वगत आणि दुसरीकडे मूकाभिनय साकारला जातो. काही ठिकाणी नाटकातला अभिनय आणि नृत्यातला अभिनय यांच्या सीमारेषेवरील अभिनय सादर केला जातो ; तर काही ठिकाणी संपूर्णपणे नाटकातला अभिनय किंवा संपूर्णपणे नृत्यातला अभिनयही सादर केला जातो. या भागांत सादरीकरणाचे इतके विविध प्रकार सापडतात की , ह्या प्रकारांकडे दुर्लक्ष करणं पाप ठरेल. हे एवढं मोठं धन आहे ; आणि आत्तापर्यंत आपलं लक्ष त्यातल्या सामर्थ्याकडे गेलं नव्हतं! आपण आत्तापर्यंत जे बघत होतो , ते कौतुकानी आणि patronization च्या दृष्टीनी. पूर्वी जर कधी यातल्या कलावंतांना भेटलो , तर आम्ही त्यांचं नुसतं कौतुक करत असू. आता , ' हे असं केलंत , ते कसं केलंत , ते पुन्हा करून दाखवा आम्हांला ' असं सांगतो. आत्ता नाट्यक्षेत्रात सुदैवानी चांगलं वातावरण निर्माण झालं आहे.

साध्या अभिनयाकडून नृत्यातल्या अभिनयाकडे जाणारा आणि ज्याच्यामध्ये अभिनयाची अगदी परमावधी गाठली आहे असा folk form म्हणजे ' कथाकली '. या कथाकलीचं असामान्य दर्शन आम्हांला बंगळुरूमध्ये घडलं. गायन आणि अभिनय यांचा सांधा तिथे साधला गेला. त्या कलावंतांचं शिक्षण परंपरेनी चाललेलं होतं. पण ज्यांनी सगळ्या जगातील रंगभूमी पाहून येऊन तिचा अभ्यास केलेला आहे असे लोक त्या शिक्षणामध्ये आल्यावर त्यांनी कथाकलीतील सौंदर्य आणखी वाढवलं. कथाकली हा नृत्यनाट्यप्रकार तसा मल्याळम गीतांचा. पण सध्या कथाकलीचा एक नवा प्रयोग चालला आहे. कथाकलीसाठी हिंदी भाषेत गीतरचना केल्या जात आहेत. हिंदी चिजांना आणि हिंदी गीतांना कर्नाटकी संगीताची जोड दिली , तर अगदी काहीतरीच वाटेल , असं आपल्याला वाटतं. हे अगदी चूक आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की , तंजावरच्या राजांनी लिहिलेल्या मराठी गाण्यांना कर्नाटकी चाली होत्या. या गाण्यांमध्ये हे संगीत अभिनयाशी इतकं एकरूप झालेलं आहे की , त्यातल्या सुरावटींच्या , त्यातल्या लयकारींच्या आणि संगीताच्या अनुरोधाने गेल्याबरोबर त्या अभिनयाला फार उत्तम साथ मिळते. त्या गीतांपैकी ऐंशी टक्के गीतं संस्कृतच आहेत. रंगभूमीवरील नाट्यसंगीताचं - ते कसं आदर्श असावं याचं उदाहरण मला त्या कथाकलीच्या गायनात सापडलं. त्या गायकाचं नाव हैदरअली - त्याचे संस्कृत उच्चार अगदी शुद्ध आणि सुरेल आहेत. त्यामुळे कथाकलीमध्ये गायनाला किती महत्त्व आहे , हे मला कळलं.

या सगळ्या folk forms मधून , त्यांच्यातल्या सामर्थ्यातून , त्यांच्या वैशिष्ट्यांमधून आधुनिक रंगभूमीला पुष्कळ देणगी मिळेल. कारण त्यांचे विषय जरी रामायण-महाभारत आदी ग्रंथांतले असले , तरी तो form च इतका तेजस्वी आहे की , वाटेल तो आधुनिक विषय त्याच्यात येणं फारसं कठीण आहे , असं मला वाटत नाही. अर्थात form कुठला स्वीकारावा , हे पुष्कळ वेळा तो विषयच लेखकाला आतून सांगत असतो. मला असं वाटतं की , तुमच्या मनात जर उर्मी आली , तर या देशात पन्नास-साठ असे चांगले forms आहेत की , जे आपल्याकडे आणता येतील. त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. या प्रयत्नांतून जी रंगभूमी निर्माण होईल , तिला खऱ्या अर्थानी ' भारतीय रंगभूमी ' म्हणता येईल!
-- पु.ल. देशपांडे

रविवार ४ नोव्हेंबर २०१२
महाराष्ट्र टाईम्स

एक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून

प्रिय पु.ल.,
द्वारा देवबाप्पा

१२ जूनचा तो अशुभ दिवस. दुपारी एक बावीसला आपली प्राणज्योत मालवली. उभा महाराष्ट्र पोरका झाला.
८ नोव्हेंबर १९७९ रोजी आपला साठावा वाढदिवस होता. या शुभदिनी 'रुपाली' ला स्नेहजत्रेचे रूप आले होते.

'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे' या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे आपण उदंड धन जमा केले व जे लोक तळमळीने व स्वच्छ हातानी चांगली कामे करतात अशांना आपण मुक्त हस्ताने देणग्या दिल्या.

दानात समाधान मानणाऱ्या आपल्या लोभस व्यक्तीमत्वाबद्दल काय लिहिणार ?

१३ जून २००० पासून वर्तमानपत्रांनी आपली स्तुती केली. ' माणसातला साहित्यिक ', 'साहित्यीकातला माणूस', 'असा शब्दगंधर्व न होणे' ,' पुरुषोत्तमाय नम:' असे अनेक कार्यक्रम आकाशवाणीने प्रसारित केले.
आपल्या भाषणाच्या,एकपात्री- बहुरूपी प्रयोगांच्या ध्वनिफिती तसेच पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊन रसिकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.

एकदा इंदूर येथील एका भाषणातून आपण विनयाने म्हणाला होता , " आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी निघाली कि माझे अंत:करण भरून येते. असे वाटते, आमच्यानंतर आमची पुस्तके दुरदुरच्या गावी शेकडो मैल मिरवायची गोष्ट सोडा, पण कोणी वाचनालयातून घरापर्यंत तरी नेईल का ? " आपल्या विनयशील भाषणाची आठवण दूर ठेवून आपणास वरील घटना कळवली आहे.

आपण प्रकृतीच्या कारणास्तव " मालतीमाधव" मध्ये राहायला आलात. परंतु आपल्याच शब्दात सांगायचे झाल्यास १२ जून ला आपण ' देवबाप्पा' कडे कुणालाही न सांगता निघून गेलात. आपण ' गणगोत' मध्ये 'रावसाहेब' या व्यक्तिचित्रणाचा समारोप करताना लिहिले," देवाने आमची लहानशी जीवने समृद्ध करायला दिलेल्या ह्या मोलाच्या देणग्या न मागता दिल्या होत्या,त्या न सांगता परत नेल्या."

आता 'मुक्तांगण','रुपाली' येथे नेमाने भरत असलेल्या बैठकी, मैफिली होणे नाही, मैफिलचा बादशाहाच निघून गेला आहे. आपल्या आधीच मैफिलीचा चांद रसिकाग्रणी रामुभैया, सिद्धहस्त कवी ग.दि. मा.,गानसम्राट वसंतराव देशपांडे , कुमार गंधर्व असे कितीतरी दिग्गज मैफिल सोडून गेले आहेत.
आपली बालमैत्रीण जोस्त्ना भोळे आपली वाट पाहत आहे. ती म्हणते आहे, ' परतुनी ये घरा.... ! '

आपले नम्र,
रसिक चाहते.
प्रणव उंडे
https://www.facebook.com/pranavaunde

Tuesday, November 6, 2012

परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..

जगभरातील मराठी माणसांचे लाडके पु. ल. देशपांडे ऊर्फ भाईंची ८ नोव्हेंबर रोजी जयंती. त्यानिमित्त येत्या गुरुवारी परचुरे प्रकाशनतर्फे ‘पाचामुखी..’ हे पुलंचे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. यात आहेत पुलंची काही गाजलेली भाषणे आणि त्यांच्या मुलाखती. त्यातील नामवंत समीक्षक प्रा. स. शि. भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश..
भावे : या पु. ल., नमस्कार!
पु. ल. : नमस्कार!

भावे : लेखन, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, प्रयोगनिर्मिती अशा पंचशरांनी आणि गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही अंगांनी मराठी मनाला विंधणारा असा हा पुरुषोत्तम ऊर्फ पी.एल., ऊर्फ पु.ल., ऊर्फ भाई, ऊर्फ डॉ. पु. ल. देशपांडे, ऊर्फ पी. एल. साहेब आज इथे आलेले आहेत. तर श्रोते मंडळी, आपल्या सर्वाच्या साक्षीने, आपल्या सर्वाच्या उपस्थितीत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. हे काम आवडतं आहे आणि अवघडही! आवडतं अशासाठी की, पु. लं.शी गप्पा मारणं हा कोणत्याही वेळी प्रसन्न करणारा अनुभव असतो. अवघड अशासाठी की, पु.लं.चा कलाविष्कार आणि आत्माविष्कार लोकांना इतका माहीत झालेला आहे की, नवं काय विचारावं असा प्रश्न कोणालाही पडावा. तुमच्या अफाट कर्तृत्वाच्या एकेका अंगावर एकेक संवाद व्हायला हवा आहे. असो. तर या उदंड कालविश्वाच्या पसाऱ्यात आता एक पहिला प्रश्न :
 इतकी र्वष इतक्या निर्मितीत तुम्ही रमलात. यातली कोणती कला तुम्हाला सर्वात आवडते?

पु. ल. : हा तसा फार कठीण प्रश्न आहे आणि तुम्ही अगोदर केलेल्या स्तुतीमुळे मी अशा चमत्कारिक रीतीने संकोचून गेलो आहे की, आता त्या सबंध गुणवर्णनाला मी योग्य वाटावं ही एक नवी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. तरीसुद्धा सांगतो. या ज्या निरनिराळ्या कला आहेत, त्या कलांत मला सर्वात कुठली आवडत असेल, तर.. आपलं मन जर एक खोली आहे असं मानलं, तर जास्तीत जास्त जागा कोणी व्यापली असेल म्हणाल, तर ती संगीतानी! संगीत हे माझं पहिलं प्रेम आहे. फर्स्ट लव्ह आहे. पण..

भावे : पण असं दिसतं की, लेखनामध्ये, तुमच्या इतर बहुरंगी प्रयोगांमध्ये संगीताला तसं दुय्यम स्थान राहिलं आहे.

पु. ल. : नाही, दुय्यम स्थान राहिलेलं नाही. संगीताच्या क्षेत्रात निर्मिती करणारा एक मनुष्य म्हणून माझी योग्यता काय आहे, हे मला कदाचित लवकर कळलं असलं पाहिजे. असं काहीतरी झालं असणार. म्हणजे हा एक प्रकारचा डिफिडन्स म्हणायचा किंवा स्वत:चं एक योग्य मूल्यमापन म्हणा. काहीही म्हणा! या संगीताच्या क्षेत्रात वावरताना मी त्याचा अभ्यासही केलेला आहे. किंबहुना थोडीफार निर्मितीही केलेली आहे आणि ‘लोकप्रियता’ हा जर निकष असेल, तर ती निश्चित यशस्वी झालेली आहे, असंही म्हणायला हरकत नाही; पण हे सगळं करताना ‘आपण जिथे पोचायला पाहिजे तिथे पोचू शकत नाही’ याची जाणीव देणारे फार मोठे संस्कार माझ्यावर झाले.

भावे : कुणामुळे?

पु.ल. : मी फार अप्रतिम अशी गाणी ऐकली, अप्रतिम असं वाजवणं ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर साहजिकच असं वाटायचं की, इथे कुठे आपल्याला पोचता येईल? म्हणजे असं आहे की, एव्हरेस्ट चढून गेलेल्या माणसाकडे पाहिल्यानंतर आपण कुठपर्यंत चढू शकू याचा आपल्याला एक अंदाज येतो. मी हजारो वेळा म्हटलं आहे की, मी जेव्हा बालगंधर्वासारखा कलावंत ऐकला, जेव्हा कुमार ऐकले, मल्लिकार्जुन मन्सूरांसारखा तपस्वी कलावंत ऐकला, बेगम अख्तर ऐकल्या, माझ्याबरोबरच वाढलेले वसंतराव देशपांडे ऐकले; तेव्हा वाटलं की, तिथे पोचण्याइतकं सामर्थ्य परमेश्वरानं माझ्या पंखांत दिलेलं नाही. हे माझ्या लक्षात आलं आणि माझी उडी जिथपर्यंत जाईल, तिथपर्यंत जे काही करायचं ते मी केलं. अर्थात, Not failure but low aim is crime असं काही लोक म्हणत असतील, परंतु मला असं काही वाटत नाही.  Whether my aim low or high is for somebody else to decide. मला तर ते ’६ वगैरे वाटलं नाही. माझी ताकद इतकीच आहे, असं वाटलं.


भावे : हे मला चांगलं वाटलं. कारण इतकी वर्ष तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर लेखकाप्रमाणेच एक परफॉर्मर म्हणूनही आहात.

पु.ल. : परफॉर्मर हीच माझी भूमिका आहे. म्हणजे ‘परफॉर्मर’हा फार मोठा शब्द आहे. तमाशा परिषदेमध्ये मी अध्यक्ष म्हणून भाषण केल्यानंतर जी बाई आभाराला उभी राहिली, ती म्हणाली, ‘यांनी भाषण वगैरे केलं, ठीक झालं. पण इथे, या बोर्डावर लावणी म्हटल्याशिवाय काही खरं नाही. कारण पु. ल. देशपांडे हे कोणी विद्वान वगैरे असतील, आम्हाला नाही माहिती. ते खरे आमच्यासारखे तमासगीरच आहेत!’ तमाशा इज अ शो आणि तो मी खूप लहानपणापासून करत आलो आहे.

भावे : यातून मला एक वेगळा प्रश्न सुचतो. तो थोडा समीक्षकासारखा वाटेल. तुमचा समीक्षकांवर जरा राग आहे, म्हणून जरा संकोचाने विचारतो. ते असं की, तुमच्या सगळ्या परफॉर्मन्समध्ये क्वचित दिसणारी अशी लवचीकतेची जाणीव मला दिसते. ती संगीतामुळे आली असेल; पण तुमचं भाषण पाहा, तुमचं लेखन पाहा, त्याच्यामध्ये अनियंत्रितता आणि लयबद्धता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असतात.

पु.ल. : तुम्ही आत्ता जे विधान केलंत ना, असं यापूर्वी पाच-सहा लोकांनी म्हटलं आहे. एका गृहस्थांनी सांगितलं, ‘तुमचं भाषण ऐकताना, तुमचं वाक्य ऐकताना आम्ही मुक्तच्छंदातली वाक्यं ऐकतो आहोत, असं वाटतं.’ मीसुद्धा विचार करायला लागलो. मग एकदा मला एकाएकी साक्षात्कार झाला की, लहानपणी माझा खरा आदर्श कीर्तनकार होता!

भावे : बरं!

पु.ल. : लहानपणी मी कीर्तनं फार ऐकली. पार्ल्याला खूप कीर्तनं होत असत आणि कीर्तनं ऐकायला मी मुंबईतही जात असे. कीर्तन ऐकायला मला भारी आवडायचं आणि म्हणून माझ्यामध्ये तो एक कीर्तनकार राहिलेला आहे. म्हणजे माझ्या लिखाणातला दोष कोणता? आत्ता मी जेव्हा माझी पुस्तकं वाचतो, तेव्हा त्यात पाल्हाळ आहे असं जाणवतं, पण जे पाल्हाळ आहे, ते कीर्तनकारी पाल्हाळ आहे. विषयाला सोडून जातोय असं दाखवीपर्यंत पुन्हा एकदम मूळ पदाकडे जायचं. कथा आणायची असते, पण सांगताना मात्र अशा रीतीने सांगायचं की, गद्य आणि पद्य यांच्या सीमारेषेवरचं गद्य असलं पाहिजे. अशा रीतीने सांगितलं की, ते जास्त चांगलं होतं, व्यवस्थित होतं. हे मी मुद्दाम करतोय असं नाही. हा संस्कार झाल्यामुळे मी ते करायला लागलो.

भावे : मराठीत असे छान बोलते लेखक कोण आहेत, असं तुम्हाला वाटतं?

पु.ल. : पुष्कळ आहेत. म्हणजे लिखित मराठी हे मला कधी आवडलंच नाही. कारण मी साध्या संस्कृतीत वाढलेला मनुष्य आहे. कुठल्याही तऱ्हेची कृत्रिमता आली की ती मला नकोशी वाटते.

भावे : एक गंभीर शब्द वापरू का? तुम्ही लोकपरंपरेतले आहात का?

पु.ल. : लोकपरंपरेतला म्हणा. त्यामुळे बोलत्या भाषेत लिहिणारे लेखक मला जवळचे वाटतात. त्यांच्यामध्ये.. चटकन आठवलं म्हणून सांगतो, व्यंकटेश माडगूळकर! व्यंकटेशचं पुस्तक घेतल्यानंतर प्रत्येक पानातून तो ही गोष्ट मला सांगतो आहे, असं वाटतं. तसेच आपल्यातले एक मोठे लेखक की यांच्यामुळे मी अगदी हैराण होऊन जातो. ते म्हणजे माटे- श्री. म. माटे! माटय़ांचं वाङ्मय वाचायला लागलं की माटे माझ्या कानात गोष्ट सांगताहेत, हे माझं फीलिंग कधीही सुटलेलं नाही. ‘मास्तराचं त्यातल्या त्यात चांगलं डगडगीत होतं!’ अशी त्यांची वाक्यं ऐकली, वाचली की इतकं बरं वाटतं! माटय़ांचा आणि माझा परिचय होता. मी त्यांचा विद्यार्थी नव्हतो. ‘जे  बोलणं होतं तेच कागदावर उतरवलं जायचं!’ असं ते म्हणायचे. विवेकानंदांनीही एकदा म्हटलं आहे, ‘लेखी निराळी का करता? मनामध्ये बोललेलं हाताच्या वाटे शाईतून उतरत असताना तुम्हाला त्याची निराळी भाषा करायची काय गरज आहे?’ विवेकानंदांचं बंगाली काय सुंदर आहे, म्हणून सांगू! मी वाचलंय, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. त्यांच्या भाषांतरात त्यातला एक शतांशसुद्धा नाही. ती ताकद आणि तो खळखळाट-  अशी ती बोली भाषा त्यांच्या लिखाणात आहे.

भावे : हे तुम्ही फार चांगलं सांगितलंत. आत्ता तुम्ही पाल्हाळ हा जो तुमचा दोष सांगितलात तो दोष वाटत नाही. कंटाळा आला, तर पाल्हाळाचा दोष! आणि असं की, अमुक एका व्यवसायाच्या चाकोरीत तुम्ही बांधून घेतलेलं नाही आणि मग पहिलं प्रमोशन, दुसरं प्रमोशन, मग बढती असं कुठेच नाही. तसा हौशीपणा तुमच्यात पहिल्यापासून आहे का?

पु. ल. : रेडिओची नोकरी सोडल्यापासून  मी नोकरी वगैरे केलीच नाही. त्याच्यापूर्वी थोडय़ा-थोडय़ा केल्या होत्या; प्राध्यापकाची वगैरे. मला तर असं वाटतं की, माझ्या सगळ्या जीवनाचं जर काही सार काढायचं असेल तर एकाच गोष्टीचं काढलं पाहिजे की, मी अतिशय हौशी मनुष्य आहे. प्रत्येक गोष्टीत मी हौशी आहे. आय एम अँटी रुटीन. मला "सर्वे जन्तु रुटिना" असं मर्ढेकरांनी म्हंटले असेल तर त्यातला मी मात्र जंतू होऊ शकलो नाही. ह्याचं कारण म्हणजे मी माझ्या आयुष्याकडे मागे बघताना मला नेहमी असं वाटतं की इंग्रजीत सांगतो म्हणून रागवू नका. माय लाईफ हॅज बीन लॉंग हॉलिडे. माझं आयुष्य ही एक सुट्टीच आहे. आणि तसंच मला जगता आलं की जसं रविवारी माणसं जगतात ना तसं मी सातही वारी माझं आयुष्य जगत आलेलो आहे.

भावे :
तुम्हाला तुमचे टीकाकार ‘मध्यमवर्गीय’ मानतात.

पु. ल. : मी आहेच मध्यमवर्गीय. माणसाचं वर्गीकरण करायचं असेल तर त्या वर्गीकरणात मी मध्यमवर्गीय! माझ्या नसानसांत कारकुनाचंच रक्त आहे.

भावे : तुम्ही कधी कारकुनी केली आहे का?

पु. ल. : केली. ती ऑफिसला काळिमा लागावा इतकी वाईट केली. मला आमचे हेड क्लार्क सांगायचे, ‘तू कुठेतरी नाटकात जा, नाचकाम कर, तिकडे विनोदी काम कर. यू विल ड्रॉ क्राऊड्स अ‍ॅण्ड वेल्थ टूगेदर.’ पण मध्यमवर्गीय म्हणजे काय, ते मला कळत नाही. मला जी मूल्यं आवडतात त्यांना वर्गाचं कुठलं लेबल मी लावूच शकत नाही. मी कसं लावू? मला तुम्ही सांगा, मी देवळात जात नाही. तशा अर्थाने मी नास्तिक आहे. माझा नमस्कार स्वीकारण्याचं कुठल्या देवाच्या नशिबात नाही; परंतु एखादं सुंदर भजन असेल तर ते मला आकर्षित करतं, जवळ ओढतं, हे मी नाकारू कशाला? मी लहानपणी मध्यमवर्गीय कुटुंबात झालेल्या समारंभांत भाग घेतला आहे. एक उदाहरण सांगतो. माझ्या बहिणीची मंगळागौर झाली. त्या देवीची पूजा करणं चांगलं की वाईट ते माहीत नाही. मी त्या वादात शिरू इच्छित नाही. त्या वेळचा घरातला जो हास्यकल्लोळ होता, जे वातावरण होतं, जॉय होता, आनंद होता तो नव्हताच, असं म्हणू का मी? त्याने मला आनंद दिलाच नाही, असं म्हणू का?

भावे : हा बेहिशेबीपणा आणखी एका वैशिष्टय़ात दिसतो. असं बाहेर आलं आहे की, तुम्ही लाखा-लाखांनी देणग्या दिल्या आहेत. हा काही मध्यमवर्गीयपणा नाही. त्या लाखाच्या देणग्या जाऊ देत, पण तुमच्या दोन देणग्या माझ्या मनात घर करून राहिल्या आहेत. एक ‘मुक्तांगण’साठी दिलेली देणगी आणि दुसरी फर्गसन कॉलेजच्या साहित्य सहकारच्या आठवणीत माधव आचवलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘किमया’साठी दिलेली देणगी! मला ती कलात्मक निर्मितीच वाटते. तुम्ही त्याच्याविषयी थोडं सांगा.

पु. ल. : त्याच्याविषयी बोलायला मला फार संकोच वाटतो. त्याच्यामागचा खरा हेतू काय, तो सांगतो तुम्हाला. समाज गंभीरपणे कुठल्या तरी कार्याला लागला आहे, हे दृश्य माझ्या डोळ्यांपुढे येऊच शकत नाही. माझ्या डोळ्यांपुढे रांगेत जाणारी माणसं येत नाहीत. माझ्या डोळ्यांपुढे येतात ती जत्रेत हिंडणारी माणसं, आनंदात असणारी माणसं! ती माझी सुंदर समाज पाहण्याची कल्पना आहे आणि म्हणून मला नेहमी वाटतं की, शंभर मुलं हसताना बघायला मिळाली पाहिजेत. चार तरुण जमलेले असतील तर त्यातल्या एकानं काही चित्रं काढलेलं असावं. बाकीचे तरुण ते पाहत असावेत. एक तरुण गात असला तर बाकीच्या तरुणांनी त्याचं गाणं ऐकावं. कविता वाचत असताना एक तरुण आणि एक तरुणी यांनी एकत्रितपणे जोरजोरात हसावं; हे  वातावरण पाहिजे. ‘मुक्तांगण’मध्ये ते वातावरण व्हावं म्हणून मी तिकडे पैसे दिले. बाबा आमटय़ांच्या इथे जे अंध-अपंग आहेत, त्यांना तिथे आनंदाचा प्रत्यय यावा म्हणून तिथे पैसे दिले. ‘किमया’च्या मागेसुद्धा माझी हीच कल्पना आहे की, मुलांनी इकडे जा, तिकडे हिंड असं करण्यापेक्षा त्यांना एकत्र बसण्याकरिता जागा करून देऊ आणि ‘साहित्य सहकार’ ही जी फर्गसन कॉलेजमधली संस्था आहे, त्यात मीही असल्यामुळे माझ्यावर शिक्षकांचा नसेल इतका संस्कार त्या ‘साहित्य सहकार’चा आहे. त्या काळात, हल्लीच्या काळाप्रमाणे अमुक ‘चळवळ’ असे शब्द वापरात नव्हते. त्यामुळे ‘साहित्यप्रकार चळवळ’ असं काही नव्हतं. ‘साहित्य सहकार’ म्हणजे काय की, समान आवड असलेली आम्ही मुलं आणि मुली एकत्र जमत होतो. जोगांसारखे एक आदर्श गुरू आमच्याबरोबर बसलेले आहेत की, ज्यांचा गुरू म्हणून धाक वाटला नाही; परंतु त्यांच्याबद्दल एकप्रकारचा आदर वाटे.

भावे : हा जो तुमचा सगळा हौशीपणा आहे, तुम्ही जी प्रोफेशनलशिप नाकारलीत यामध्ये सुनीताबाईंची भूमिका काय होती? मी प्रश्न गंभीरपणे विचारला आहे.

पु. ल. : मी तुम्हाला गंभीरपणेच उत्तर देतो. मी तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेला मी- ‘मी’ असं म्हणून काही बोलतो ना, ते ‘आम्ही’ असंच समजा.

भावे : मी असं विचारतो की, तुम्ही हौसेनं जो बहुरूपीपणाचा मुखवटा चढविला आहे, त्यातले रंग आम्हाला संगा ना!

पु. ल. : मी सांगू का, मुखवटा काढून टाकता येतो, पण मला वाटतं, मला तो जन्मजात चिकटला आहे. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणा किंवा अष्टपैलू म्हणा, काहीही म्हणा! तुमची माझ्याबद्दलची जी भावना असेल त्याप्रमाणे शब्द येईल. हे ज्यांना चांगलं वाटत नाही, ते म्हणतील याला जमत नाही.

भावे : काही काहीजण म्हणतात, जे जे विनोदी असतं ते ते थिल्लर असतं. ते श्रेष्ठ होणं शक्य नाही. तुमच्या लेखनात तर मला असं दिसतंय की, त्यात मूलभूत जीवनाची जाणीव आहे..

पु. ल. : माझं लेखन विनोदी आहे की नाही, यावरून मला श्रेष्ठत्व मिळेल किंवा नाही, असं मला वाटत नाही. एखाद्या माणसाला सभोवतालच्या जीवनाविषयी किती प्रेम असतं, त्या बाबतीत त्याची इन्टेन्सिटी किती, हे महत्त्वाचं! मी नेहमी म्हणतो की, विनोदी लेखक विसंगती दाखवतो, याचं कारण त्याला सुसंगतीची ओढ असते. ती लयबद्धता असते. ताल चुकला, तर मनुष्य हास्यास्पद होतो. विनोदातसुद्धा एक लयबद्धता असतेच. उलट नाटकाच्या संवादांत ती विलक्षण आहे. तिथे तुमचं भांडण सारखं काळाशीच चाललेलं असतं.

भावे : तुम्ही कविता करीत नसलात, तरीही आत्ता तुम्ही कविताच केलीत. मी असं म्हणेन, तुम्ही या सर्व प्रकारची निरनिराळी भव्य शिखरं काबीज केली आहेत, पण आत्ता असं एखादं शिखर राहिलंय का की, जे काबीज करावं अशी ओढ तुमच्या मनाला लागली आहे?


पु. ल. :
मी शिखरं काबीज केली आहेत की नाही, मला माहीत नाही. मी शिखरं हा शब्द वापरत नाही, पण चांगल्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आहे, एवढं मीसुद्धा सांगतो. मोठा विनय दाखविण्याचं काही कारणच नाही; पण काही काही खंती मनात असतातच. तिथे पोहोचायला पाहिजे आपण. तुम्ही एक पाहिलंय का? रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आहे, ‘माझी अवस्था द्रौपदीसारखी आहे. मला पाच नवरे आहेत, पण तरीही कर्ण दिसला की प्रेम निर्माण होतं!’ तसा या सगळ्या कलांचा मला मोह आहे, पण माझी भूमिका अशी आहे की, मी उद्या कोणाचं गाणं ऐकलं, गाणं अप्रतिम झालं, तर ‘मला त्याच्यासारखं गाता यायला हवं होतं,’ असं वाटण्याऐवजी ‘त्याचं गाणं मला ऐकायला मिळालं,’ या आनंदातच मी असतो. हे मला कळतं, यात अहंकार असेल, पण मी या आनंदात असतो की, कुमार गंधर्व ऐकू शकण्याची क्षमता माझ्यात आहे. लिखाणाचं क्षेत्र असं आहे की, मला वाटतं, मी विनोदी क्षेत्रामध्ये मोठय़ा सहजतेनं वावरतो. संगीत करताना माझ्या मनामध्ये बुकबुक असते; अभिनय करतानाही थोडी असेल, पण लिहायला बसल्यानंतर बुकबुक वगैरे काही नसते.

रविवार ४ नोव्हेंबर २०१२
लोकसत्ता

ही मुलाखत इथे ऐका. 



Friday, August 31, 2012

पु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही - रवी आमले

पुलं इतिहासजमा झाले आहेत काय, हा प्रश्न तसा संतापजनक आहे. पुलं म्हणजे मराठी संस्कृतीची समृद्ध साठवण आहे. आजच्या भाषेत सांगायचे, तर महाराष्ट्राचे 'आयकॉन' आहेत. मराठी रसिकतेचे मानिबदू आहेत. 1942 पासून आजतागायत मराठी वाचकांच्या काही पिढ्यांना त्यांच्या विनोदाने शहाणीव दिलेली आहे. अशा परिस्थितीत ते, म्हणजे त्यांचे लेखन इतिहासजमा झाले आहे काय, असे विचारणे कुणासही वाह्यातपणा वाटू शकतो. पण आज अनेक ठिकाणांहून, खासगी वाड्मयीन चर्चातून हा प्रश्न समोर येताना दिसतो. त्या प्रश्नाचा सोपा अर्थ एवढाच असतो, की पुलंचे साहित्य आजच्या, समाजातील मध्यमवर्ग नामशेष होऊ घातलेल्या काळात शिळे झाले आहे काय?

आता येथे सर्व प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जेव्हा आपण पुलंचे साहित्य म्हणतो तेव्हा आपल्या नजरेसमोर केवळ त्यांचे विनोदी लेखन तेवढेच असते. त्यात आपण राजा ओयदिपौसची रंगावृत्ती धरत नाही की काय वाट्टेल ते होईल वा एका कोळीयाने या कादंब-या पकडत नाही. पुलंनी निखळ विनोदाच्या पलीकडे जाऊन खूप लिहिलेले आहे. त्यांनी त्यांच्या मिश्किल खुमासदार शैलीत आपल्या गणगोतांची व्यक्तिचित्रे लिहिलेली आहेत. नाटके लिहिली आहेत. त्यांच्या भाषणांचे संग्रहही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक प्रस्तावना गाजलेल्या आहेत. तर याबद्दल कुणाचे काही म्हणणे दिसत नाही. हे लेखन कालबाह्य झाले आहे असे काही कुणी म्हणत नाही. कालबाह्यतेचा आक्षेप येत आहे तो त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, असा मी असामी, मराठी वाड्मयचा गाळीव इतिहास, खोगीरभरती आदी पुस्तकांतील विनोदाबद्दल. आक्षेप घेणारांचे म्हणणे असे असते, की पुलंचे विनोद ज्या कालपटलाच्या व संस्कृतीच्या पाश्र्वभूमीवर घडत आहेत ती आज स्वाभाविकच उरलेली नाही. नव्या पिढीला तर तिच्या स्मृतीही नाहीत. 'त्यांनी तुम बीन मोरीत तोंड घातले' यातील विनोद समजायचा, तर या पिढीला घरातलीही मोरी माहिती नाही आणि गाण्यातलीही. तेव्हा त्या काळी ज्या विनोदाने लोकांना खळखळून हसविले, तो विनोद आज वायाच गेला.

पुलं लिहित होते, तो काळ येथे लक्षात घेतला पाहिजे. त्यांची गाजलेली बटाट्याची चाळ 1958 मधली आहे आणि व्यक्ती आणि वल्ली 1966 मधील. हा स्वतंत्र भारताच्या दृष्टीनेही संक्रमणाचा काळ होता. जुनी संस्कृती, जुन्या जाणीवा निखळून पडत तेथे नवीन काही आकाराला येत होते. धोंडो भिकाजी जोशी हा पुलंच्या असा मी असामीचा नायक. तो या काळातल्या मध्यमवर्गीयांचा प्रतिनिधी होता. पुलं लिहित होते, ते या मध्यमवर्गीयांसाठीच. मराठी वाचक हा निर्वविादपणे मध्यमवर्गीय असल्याचे विद्याधर पुंडलिक यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत पुलंनीच म्हणून ठेवलेले आहे. पुलं हे त्यांच्याच गोष्टी त्यांनाच सांगत होते. त्यात नव्या जगण्यातले भेलकांडलेपण होते, खुपसे स्मरणरंजन होते आणि लोक ते ऐकून खळखळून हसत होते. एकूण लोकशाहीच्या व्याख्येप्रमाणे मध्यमवर्गीयांचे मध्यमवर्गीयांसाठी मध्यमवर्गीयाकडून असेच पुलंच्या विनोदाचे स्वरूप होते. आणि ते छान निर्मल होते. हे येथे आवर्जून सांगायचे कारण म्हणजे, मध्यमवर्गीय या शब्दाकडे आपल्याकडे उगाचच साम्यवादी चष्म्यातून पाहण्याची रुढी पडलेली आहे. या मध्यमवर्गाची खास अशी पांढरपेशी संस्कृती होती. पुलंचे विनोद त्या संस्कृतीतले आहेत.

नव्वदच्या दशकात आलेल्या जागतिकीकरणाच्या वा-याने या संस्कृतीला जोरदार हादरा दिला. खुल्या अर्थव्यवस्थेने आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तंत्रक्रांतीने समाजातील मध्यमवर्गावरच घाला घातला. आज समाजात तसा वर्गच राहिलेला नाही. त्या वर्गातल्या अनेकांच्या हाती भगवी रेशनकार्डे आली. बाकीच्यांना नवश्रीमंत हा वेगळाच दर्जा मिळाला. स्वाभाविकच त्यांच्या जगण्याच्या पद्धती आणि सांस्कृतिक प्राधान्यक्रम बदलले. मराठी माणसे मराठी (ललित) पुस्तके वाचत नाहीत, ही ओरड होण्याचे कारणही हेच आहे. या काळाच्या अपत्यांना पुलंचे मध्यमवर्गीय संस्कृतीतून, त्यांच्या जगण्याच्या त-हांमधून आलेले विनोद न समजणे स्वाभाविकच होते. त्या दृष्टीने, पुलंचे विनोद कालबाह्य झालेले आहेत, या आक्षेपात तथ्य आहे.
पण येथे मौज अशी आहे, की पुलंचे विनोद नव्या पिढीच्या डोक्यावरून जात आहेत, असे म्हणताना दुसरीकडे आजही पुस्तकांच्या दुकानांतून, ग्रंथप्रदर्शनांतून, ग्रंथालयांतून त्यांना मागणी असल्याचे चित्र आहे. त्याहून कडी म्हणजे आज पुलंचे नाव गुगल केल्यास एका निमिषात तेथे सव्वा लाख शोधनिकाल येतात. तेच नाव देवनागरीतून गुगल केल्यास साडेअठरा हजार संकेतस्थळे समोर येतात. इंटरनेटवर आज त्यांच्या नावाचे गुगल ग्रुप आहेत, फेसबुक ग्रुप आहेत, ब्लॉग्ज आहेत आणि संकेतस्थळेही आहेत. पिकासावेबवर त्यांच्या कोणा चाहत्याने त्यांची अनेक छायाचित्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. यूट्यूबवर त्यांच्या अनेक ध्वनीचित्रफिती आहेत. या सगळ्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. फेसबुकवरील पुलंच्या नावाचे एक पान तब्बल एक लाख 40 हजार 234 जणांनी 'लाईक' केले आहे. पुलं या ग्रुपचे 309 सदस्य आहेत, तर पुलं आनंदाच्या दाही दिशा नावाच्या एका ग्रुपमध्ये 268 जण आहेत. लक्षात घ्या, ही सगळी तरूण मंडळी आहे. त्यातल्या अनेकांची प्रोफाईल्स तपासून पाहिली, तर हेही लक्षात येईल, की पुलंचे लिखाण ऐन भरात असल्याच्या काळात त्यांचा जन्मही झाला नव्हता. पुलंच्या नजरेसमोर जो मध्यमवर्ग होता, त्याच्याशी या मुलांचे सांस्कृतिकदृष्ट्या कोणतेही नाते नाही. ती संस्कृती, ते संस्कार, त्या जाणीवा, ते विचार यांपासून ते खूप दूर आहेत. त्यातील काही जण तर मायभूमीपासूनही खूप अंतरावर आहेत आणि तरीही त्यांना पुलंचे साहित्य साद घालीत आहे. हे पाहिल्यावर आता येथे वेगळाच प्रश्न निर्माण झाला. या मोबाईल पिढीला पुलंचे साहित्य आवडते, त्यांचे किस्से, कोट्या, आख्यायिका हे सगळं हे तरूण 'एंजॉय' करतात आणि मराठीत हा एवढा मोठा साहित्यिक झाला याचा अभिमान बाळगतात याची कारणे काय असावीत?

याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे पुलंचे विनोद हे काही संता-बंताचे वा कॉमेडीच्या सर्कशीतील विनोद नाहीत. त्यांच्या विनोदीच नव्हे, तर सर्वच साहित्यात जगण्यावरील नितळ प्रेम, सत्य आणि शिवाची असोशी, असुंदराने संतापणारी सात्विकता यांचे नितांत छान रसायन आहे. त्यात कुठेही असभ्यपणा नाही, विध्वंसकता नाही. छान गाणे असावे तसा त्यांचा विनोद आहे. आणि त्याच्या तळाशी कुठल्याही संस्कृतीत, कोणत्याही काळात कालबाह्य न ठरणारी माणूसपण, सौंदर्य ही मूल्ये आहेत. त्यामुळे तो सहजच तत्कालिकतेच्या पलिकडे जातो. त्यातील संदर्भ कदाचित आजच्या पिढीला माहित नसतील, संकल्पना, वस्तू, माणसे अपरिचित असतील, पण त्याने त्यांचे काही बिघडताना दिसत नाही. विनोदाने आपणांस सेन्स ऑफ प्रपोर्शनची जाणीव दिली असे पुलंनी म्हटले आहे. आजच्या अस्थिर, प्रदुषित पर्यावरणात वावरणा-या तरुण पिढीला हीच जाणीव पुलंचा - जीवन पुरेपूर कळलेल्या माणासाचा - अभिजात विनोद देत असावा. असा विनोदकार इतिहासजमा होत नसतो.
- रवी आमले
रविवार, ६ नोव्हेंबर २०११
लोकसत्ता

Wednesday, August 1, 2012

॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥

१९६४-६५ च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रावरील भाषणांचा कार्यक्रम मुंबईत विलेपार्ले येथे पु. ल. देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. पु. लं. नी बाबासाहेबांना लिहिलेले मानपत्र त्याप्रसंगी काढण्यात आलेल्या स्मरणिकेत प्रसिद्ध झाले होते. आज ती स्मरणिका उपलब्ध नाही. परंतु पु. लं. च्या हस्ताक्षरात सापडलेला हा कच्चा खर्डा पु. लं. चे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी खास ‘लोकसत्ता’साठी उपलब्ध करून दिला.. आज नव्वदी पार करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या झपाटल्या व्यक्तिमत्त्वाचा हा ‘पुल’कित प्रत्यय..


श्री बलवन्त मोरेश्वर तथा बाबा पुरंदरे यांसी-
शिवराय मंडळाच्या समस्त सदस्यांचे आणि हितचिंतकांचे सादर प्रणाम.
आपणास मनापासून जी गोष्ट मानवत नाही, ती आज आम्ही करीत असल्याबद्दल प्रथम आपली क्षमा मागतों. आपल्या स्नेहाचा मान लाभलेले आम्ही आपले सवंगडी आहों. मानसन्मानापासून अलिप्त रहाण्याचा आपला स्वभावधर्म आम्हास ठाऊक आहे. आपला स्नेह हा जसा आमचा सन्मान आहे, तसाच त्या स्नेहापोटी आम्हाला आपल्यापाशीं कांहीं हट्ट धरण्याचा अधिकारही आहे. त्या अधिकारापोटींच आम्ही ह्य़ा मानपत्राचा स्वीकार करण्यास आपणास भाग पाडणार आहों.

‘शिवरायाचे आठवावे चरित्र। शिवरायाचा आठवावा प्रताप।’ ही ऊर्मी आपण आमच्या मनांत उत्पन्न केलीत. जिथे कोणी कोणाचा नाहीं ह्य़ा भावनेपरती दुसरी भावना निर्माण होत नाहीं अशा ह्य़ा अफाट मुंबई शहरांत आपण शिवरायाचे चरित्र आमच्यापुढें उलगडून दाखवलेत आणि आमची अंत:करणे एका अलौकिक आणि चैतन्यमय बंधनाने एकत्र आणलीत. कैलासापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या ह्य़ा अफाट देशाला आपण सारे एका नात्यानें, पावित्र्याच्या एकाच कल्पनेने बांधलेले लोक आहों.. ह्य़ा लोकांचे हिंदवी स्वराज्य असावे ही श्रीं ची इच्छा आहे.. हा एकतेचा पहिला पाठ देणाऱ्या श्री शिवरायाच्या चरित्राच्या वाचनानें आमच्या मनातली किल्मिषें दूर झाली. परकीयांच्या अमलाखालीं केवळ स्वरक्षणार्थ बाहेर पडणाऱ्या म्यानांतल्या तलवारीच गंजत नाहीत, तर मनेही गंजतात. प्रथम घासूनपुसून उजळावी लागतात ती मनं. मनं उजळली की मनगटं उफाळतात. साडेतीन हात उंचीच्या मावळ्यांची भेदरलेली मनं सह्य़ाद्रीच्या गगनचुंबी कडय़ाएवढी उंच आणि कणखर करणाऱ्या शिवरायांच्या चरित्राचे आपल्या तेजस्वी शैलीतले लेखन हा आजच्या निराशजनक वातावरणांत आम्हाला दिसलेला पहिला आशेचा किरण.

श्री शिवरायांच्या महान कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वीचा तो पारतंत्र्याचा काळ. आपल्याच शब्दांची उसनवारी करून सांगायचं म्हणजे- हुंदकादेखील मोठय़ाने द्यायचा नाहीं असली दुरवस्था. साऱ्या जनतेची अवस्था ‘कोठें जावे, काय करावें’ अशी व्हावी ह्य़ात नवल नव्हतं. पण आज तर आम्ही आमचे धनी आहों, तरीही मनाच्या तसल्याच अवस्थेंत जगण्याचा प्रसंग उभा रहावा ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट. सर्वत्र निराशा. सर्वत्र अपेक्षाभंग. सर्वत्र ध्येयहीनता. असल्या ह्य़ा काळांत आपल्या अभ्यासिकेतला दिवा मात्र रात्र उलटून गेली तरी जळत होता. भोवती महागाईची खाई पेटलेली. पण आपण पानात पडलेल्या चतकोराला पक्वान्न मानून शिवचरित्राच्या लेखनांत रंगला होता. जिथे जिथे श्री शिवरायाचे चरण उमटले, त्या त्या ठिकाणची यात्रा करीत होता. जिवाची तमा न बाळगतां गडकोट चढत होतां. शिवचरित्राच्या ध्यासात रानावनातल्या काटय़ाकुटय़ांची आपल्या पायदळी जणु मखमल होत होती. भीषण रात्री, पावसाळी वादळें, अंगी चिकटून रक्त शोषण करणाऱ्या जळवा यांची तमा न बाळगतां शिवकालातला एखादा शिलालेख, एखादा कागद, एखादी नोंद, एखादे नाणे, एखादं शिवकालीन शस्त्र.. नव्हे, जिथे ह्य़ा हिंदवी स्वराज्यासाठी देहाची चाळण केलेल्या शिलेदार बारगिराच्या रक्ताचा थेंब सांडला असेल तिथली माती भाळी लावण्यासाठी आयुष्याची थोडीथोडकी नव्हेत, तर वीस र्वष आपण एखाद्या परिव्राजकाच्या निष्ठेने हिंडत राहिलात.

बाबासाहेब,
असल्या ह्य़ा तपश्चर्येतून निर्माण झालेले आपले शिवचरित्र. मुळांतच ओजस्वी. हिऱ्यासारखे लखलखणारे. त्या हिऱ्याला आपल्या तप:पूत प्रतिभेचे अलौकिक कोंदण लाभलें. आपण स्वत: इतिहासकार न म्हणतां बखरकार म्हणवतां. विद्वान न म्हणवतां शाहीर म्हणवतां. पण इतिहास म्हणजे केवळ तपशिलांची जंत्री नव्हे. इतिहासानें देशाचे शील दाखवावे; केवळ तपशील नव्हे. शिवरायाच्या स्मरणानें आपल्या भावना उफाळून येतात. ज्यांची अंत:करणे पूर्वजांच्या उपकारांची कृतज्ञता स्मरतात, ती उफाळून येणारच. शिवचरणांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या कडय़ाकपाऱ्यांच्या दर्शनाने जी अंत:करणे उचंबळून येत नाहीत त्यांच्या दुर्भाग्याची त्या दगडी कडेकपाऱ्याही कींव करीत असतील. पण आपल्या भावनांना शास्त्रकाटय़ांची कसोटी लागलेली असते. निरुपणामागे खात्री-पुराव्यांचे आधार असतात. प्रतिभेचे वारू सत्यावरची मांड सोडून उधळत नाही. प्रतिभेला परिष्करणाची जोड आहे. प्रज्ञेची धगधगती ज्वाला आहे. आपण शिवरायाच्या ठिकाणी सश्रद्ध आहात; अंधश्रद्ध नाहीं. आणि म्हणूनच आजच्या युगातही आमच्या अंतकरणाला स्पर्श करून जाते तें शिवचरित्रातील अंतर्यामीचे तत्त्व. लढायांचा तपशील नव्हे.
ज्या राज्यात अन्यायाचा नि:पात होईल, पापी माणसाला शासन होईल, शीलाचा सन्मान होईल, चारी धामाच्या तीर्थयात्रा सुखरूप पार पडतील, ज्याचा जो देव असेल त्याची उपासना तो तो निर्वेधपणे पार पाडील, शेतातल्या धान्याला शत्रूचा धक्का लागणार नाही आणि माताभगिनींच्या हातची कंकणं अखंड किणकिणत राहतील, असल्या शांतितुष्टिपुष्टियुक्त राज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले. आपल्या आचरणानें प्रत्यक्षात आणले. आपण तो सारा चरित्रपट आमच्या डोळ्यांपुढे उभा केलात. आमच्या गंजू पहाणाऱ्या मनांना मानाने जगण्याचा अर्थ शिवचरित्रातून उलगडून दाखवलात.
बाबासाहेब, त्या कृतज्ञतेची ही पावती आहे. मानपत्राची भाषा आम्ही जाणत नाहीं. छत्रपतींच्या मावळ्याइतक्याच रांगडय़ा बोलीशी परिचय असलेले आम्ही आपले स्नेही. आपले संकल्प थोर. त्या संकल्पाचा जगन्नाथाचा रथ एकटय़ानें ओढण्याचे आपले सामथ्र्य आम्ही जाणतो. पण त्या रथाच्या दोराला आम्ही हात घातला तो आमच्या पदरी चिमुकल्या पुण्याचा संचय व्हावा म्हणून. शिवचरित्राचे सहस्रावधी श्रोत्यांपुढे आपल्या ओजस्वी वाणीने निरुपण करून आपण लक्ष रुपये समाजकार्याला देण्याचा संकल्प पार पाडलात. आज भोवताली द्रव्यलालसेची आणि सत्तालालसेची हिडिस भुतें नाचत असताना, केवळ आर्थिक गरिबीचा वसा घेतलेल्या शिक्षकाच्या आपल्यासारख्या सुपुत्राने लक्ष रुपये मिळवण्याचा संकल्प करायच्या या काळात लक्ष रुपये मिळवून एका महान कार्याला ते ‘इदं न मम’ ह्य़ा भावनेने अर्पण करण्याचा संकल्प करून तो पुरा करावा, हा एक चमत्कार आहे. व्यवहारी जगात हे वेड ठरेल. पण व्यवहारी जगाला ही भाग्याची वेडं कळत नाहींत. आम्ही आमच्या दुबळ्या डोळ्यांनी आणि चिमुकल्या अंत:करणांनी आपला हा पराक्रम पाहून चकित झालों आहोत. अंतर्यामी समाधान एवढेच, की ह्य़ा कार्यात आपल्यासोबत चार पावलें चालण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
बाबासाहेब, हे महान कार्य करण्याची जिद्द आपणांत श्री शिवरायांच्या चरित्रामुळे निर्माण झाली हे तर खरेंच; परंतु आपल्या जीवनातल्या सहचारिणीचा- सौभाग्यवती निर्मलावहिनींचा गौरवपूर्वक उल्लेख केलाच पाहिजे. यज्ञकर्म हे यजमान आणि यजमानपत्नी दोघांनी जोडीने केले तर सफल होते. आपण मांडलेल्या शिवचरित्राच्या वाग्यज्ञातले आपल्या सहधर्मचारिणीचे स्थान फार मोठे आहे. आपला यज्ञ निर्वेध चालावा म्हणून विकल्प निर्माण करणाऱ्या कुठल्याही प्रसंगाची झळ आपणापर्यंत पोहोंचू न देण्याचे सौ. निर्मलावहिनींचे कार्य हे यज्ञातल्या संरक्षक देवतेसारखे आहे अशी आमची मनोमन धारणा आहे. म्हणून हे मानपत्री त्यांना आमचे लक्ष प्रणाम.

बाबासाहेब, महन्मंगल कुलस्वामिनी श्री जगदंबेच्या चरणी आमची शेवटी एकच प्रार्थना आहे कीं, आपणा उभयतांना आणि आपल्या सुकन्या-सुपुत्रांना उदंड यश आणि दीर्घायुरारोग्य लाभों. आपल्या महान कार्यात आम्ही सहाय्य तें कसले करणार? पण शिवचरित्राच्या कार्यविषयक चाकरी सांगावी, आम्ही इमानाने पार पाडू असे अभिवचन देतो. आम्हास साक्षात् रोहिडेश्वराची आण. सेवा करावया लावा। देवा हा योग्य चाकर.

लोकसत्ता 
रविवार , २९ जुलै २०१२

हा लेख ब्लॉगसाठी सुचविल्याबद्दल पिनाकीन गोडसे ह्यांचे आभार.

Tuesday, June 12, 2012

बहोत अच्छे - वसंतराव देशपांडे

पी.एल. अन् मी, आज गेली अडतीस वर्षे एकमेकांचे आहोत; मित्र, दोस्त, जिगरजान वगैरे शब्द काहीच  सांगू शकत नाहीत इतकं आमचं नातं सप्तकात गुंतलेलं होते.
सुराची एक लगन लागावी लागते. सुराची बेचैनी यातना जरूर देते. तो सूर आपल्या अगदी जवळ असतो. मनात त्याची आळवणीही सतत चालू असते. पण तो तसा भलताच सुळसुळीत असतो. हमखास हाती लागत नाही. असं माझं- पी.एल.चं नातं होते. तसं पाहिलं तर पी.एल. फार मोठे आहेत. मी त्यांच्या वर्तुळात कुठेतरी असावं हे त्यांना शोभून दिसणारं नाही. त्यांचा आवाका मोठा. नजर साडेतीन सप्तकांत फिरणारी. विदेही जनकाच्या परंपरेतला हा माणूस. सगळं काही खूप खूप मोठं पाहणारा, मोठं जपणारा, मोठं जाणणारा. मी त्या मनानं सर्वसामान्यांतला एक. नाही म्हणायला नफ्फड तबियतीचा अन् गाण्या-बजावण्यात बराचसा रुतलेला. बस, एवढा एकच धागा आमची पतंग उडवत बसला आहे गेली कित्येक वर्षे. गाण्या-बजावण्याचा मनसोक्‍त आनंद आम्ही दोघंही भोगतो. मी गाणं पुढे चालू ठेवलं. त्यातच रमलो. पी.एल. लिहिण्यात रंगले.

संगीत हा आमचा प्रांत तसा स्वतंत्र आहे. आपल्या अंगानं पूर्ण आहे. त्याची सगळी भिस्त सूर, ताल, लय, वेगवेगळे आकृतिबंध अन् जाणीवपूर्वक मांडणी यांवर आहे. म्हणजे संगीत खऱ्या अर्थानं शब्दांपलीकडलं आहे. शब्दांची दुनिया यात फार नंतर आली. सुरांना त्यांच्या वेगवेगळ्या अवस्थांचं दर्शन घडविण्यासाठी काही आघात देणं सुरू झालं अन् त्यासाठी सुरांना शब्दांची जोड मिळायला सुरुवात झाली. स्वराकृतींचे राग झाले. त्या रागांतून नादमधुर शब्दांचा वापर सुरू झाला. पुढे बंदिशी तयार झाल्या. त्याच रचना आम्ही गाणारे शतकानुशतकं भक्‍तिभावानं आळवत बसतो. अधूनमधून काही नव्या रचनांची भर जरूर पडत असते. नव्या असतात त्या बंदिशी (गीतं). राग जुनेच असतात. म्हणजेच गवयाची पेशकारी तशी जुनीच असते. तीच जुनी गोष्ट पुन:पुन्हा रंगवून, खुलवून सांगायची असते.

लेखकमंडळींचं तसं नाही, निदान नसावं. त्यांना रोजच्या रोज काहीतरी पाहायचं असतं, शोधायचं असतं, अनुभवायचं असतं. त्यातून ते पटेल, रुचेल ते आपापल्या प्रकृतिधर्माप्रमाणे अक्षरांत बसवायचं असतं. हा असा फरक आहे गाणाऱ्यात आणि लिहिणाऱ्यात. आमच्यापेक्षा या लोकांचा रियाज जास्त असायला हवा. सगळेच तसा रियाज करतात की नाही, कोण जाणे? पण गाण्यातून म्हणा, लिहिण्यातून म्हणा, एकूण तबियत ओळखता येते. असा या दोन जातींत फरक आहे.

पी.एल. आमच्या जातीतले आहेत. त्यांनी संगीताचा पद्धतशीर अभ्यास केला आहे. गाण्यातला अन् लिहिण्यातला फरक त्यांना ताबडतोब समजतो हे आमचं गाणाऱ्यांचं भाग्य. म्हणूनच पी.एल. गाण्या-बजावण्यावर काही लिहीत नाहीत. जे काही त्यातलं म्हणून पी.एल. लिहितात ते गाण्यासंबंधीचं नसतं. ऐकणाऱ्यांच्यावर होणाऱ्या परिणामासंबंधी असतं. त्यातून श्रोत्यांच्या विधानांच्या विसंगतीतला विनोद भरपूर वाचायला मिळतो. गाणं-बजावणं हे फक्‍त मन लावून ऐकायचं असतं. त्यातून मिळणारा आनंद वर्णनापलीकडचा असतो. तो शब्दांनी सांगता येत नाही. सांगायचा प्रयत्न म्हणजे पांगुळगाडा हाती घेऊन 'एक पाय नाचीव रे गोविंदा' करण्यासारखा प्रकार. पी.एल. हे पुरते ओळखून आहेत.

आमच्या गायकीत दोन प्रकारचं गाणं ऐकायला मिळतं. एक थंड गाणं, दुसरं तेज म्हणजे गरम गाणं. थंड गाणं सुस्त प्रकृतीचं अन् तेज गाणं चुस्त प्रकृतीचं. गाणं कसंही असेना, त्यात फारसं बिघडत नाही. सुस्त गाण्यानं सावकाश रंग भरत जाईल. मैफलीत एक सन्नाटा पसरेल. ऐकणारे गाण्याच्या आकृतीपेक्षा संथ-संथ सुरांच्या सावलीत आराम करू शकतील. या संथ प्रकृतीच्या गाण्यात गाणारा मात्र काटेकोर सुरीला लागतो. चुस्त प्रकृतीचं गाणं एखाद्या गोंडस गुटगुटीत पोरासारखं मैफलभर बागडत असतं. मैफलीत एकदम रंग भरतो. चुस्त गाणं तसं महाखट्याळ असतं. या जातीचं गाणारे हाताच्या बोटावर मोजावे लागतात. आम दुनिया या प्रकारच्या गाण्यावर भाळलेली असते. पी.एल.चं लिहिणं असंच चुस्त गायकीतलं आहे. त्यांचे लेख वाचताना मैफलीचा मजा येतो. भारी सुरीला माणूस आहे हा.

आम्ही तसे जवळजवळ रोज एकमेकांना भेटतो. चुकून दोघे कुठे बाहेरगावी गेलो असलो, तरच भेटीत खंड पडतो. बोलण्यात इकडचं तिकडचं बरंच असतं; पण मुख्य गाडी अडायचं ठाणं म्हणजे गाणं-बजावणं. गाण्यावर बोलणं सुरू झालं म्हणजे मग वेळ किती अन् कसा जाईल, हे भान राहत नाही. सुनीताबाईदेखील आम्हाला गाण्याच्या गप्पांतून सहसा भानावर आणत नाहीत. माझ्याच घरून कुणाचा निरोप आला तर ती बैठक संपते. पी.एल.ना भेटायला येणारे अनेक. बरेच वेळा त्यांचा मूड घालवणारेही अनेक. शिवाय मैत्रीतले, दोस्तीतले यार-जिगरवाले, नात्यागोत्यातलेही अनेक असतात. पण या सगळ्यांच्या बरोबर होणाऱ्या गप्पांत अधूनमधून गाण्याचा, एखाद्या सुंदर संस्कृत उक्तीचा, छानशा कवितेच्या ओळीचा आवर्जून उल्लेख पी.एल. करतात. गप्पा समान प्रकृतीच्या वर्तुळात सुरेल होतात. नापसंतीचं बोलणंदेखील बेसुऱ्या गाण्याची उपमा देत देत चालतं. पी.एल. जास्त रमतात लहान मुलांत. बच्चेकंपनी त्यांना एकदम पसंत. मुलांसाठी त्यांनी पुष्कळ केलं आहे, लिहिलं आहे, लिहितात. या त्यांच्या सगळ्या लकबी, सवयी, आवडींतून पी.एल. पिंडानं खरं गाणारे आहेत असं माझं ठाम मत आहे. जितका जास्त सुरांत बुडालेला गवई असेल, तितका तो मनानं लहान मुलासारखा असतो. त्याचं बालपण संपतच नाही. पी.एल.ची तीच तबियत आहे.

माझी पी.एल.ची भेटच मुळी खां महम्मद हुसेन खांसाहेब यांच्या गायन शाळेत झाली. मजेचं बोलणं झालं. एकमेकांचे विचारधागे एकाच साच्यातले वाटल्यानं जाम खूश झालो, बहोत बढिया दोस्त मिळाला आयुष्यात. पुढे लगेच काही दिवसांनी एका मैफलीत ऐकायला म्हणून जाऊन बसलो. पहातो तर समोर हातात हार्मोनियम घेऊन पी.एल. गायच्या तयारीत होते. त्यांचे आणि माझे असे मोजकेच दोस्तलोक त्या मैफलीत होते. तबलजींची वाट पाहत मैफल खोळंबली होती. त्या काळात मला लोक तबलजी म्हणून जास्त ओळखत होते. कुणीतरी हळूच मला विचारून पाहावंच्या पवित्र्यात पुढे सरकला. पण सुदैवानं एकदाचे तबलजी आले. गाणं सुरू झालं. एकेचाळीस किंवा बेचाळीस सालची गोष्ट आहे ही. पी.एल.च्या साथीला बसलेला तबलजी कसाबसा ठेका सांभाळून वाजवायची कसरत करणारा होता. पी.एल. मराठी गझलाच्या जातीचं एक गाणं पेश करायच्या तयारीत होते.


त्या दिवशी प्रथमच पी.एल.चा हार्मोनियमवरचा हात ऐकायला मिळाला. निहायत खूश झालो. प्रत्येक वाद्याची एक प्रकृती असते. त्या तरकिबीने जर ते वाद्य वाजलं तरच शोभून दिसतं. बऱ्याच वेळा वाद्याचा वकूब लक्षात न घेता वाद्याच्या प्रकृतिधर्माला न मानवणारा बाजदेखील वाजवला जातो. तयारी, चमत्कार, गंमत म्हणून थोडा वेळ ते शोभून दिसतं, पण ते तितकंसं खरं नाही. तो असतो नाकानं सनईचे सूर काढून दाखवण्याचा खटाटोप. पी.एल.नी पेटीवर हात टाकला की त्यांची पेटी पेटीच्या अंगानं वाजते. त्या वेळी मलाच राहवलं नाही. उठलो, सोटा सावरला, या गाण्याला ''अरे, तुम क्या बजाओगे, लाओ इधर तबला,'' म्हणत मी तबलजीच्या हातातला तबला-डग्गा माझ्या हातात घेतला. माझ्या त्या काळातला अवतार पाहण्यासारखा होता. पी.एल. जरा बिचकले. कुणीतरी त्यांच्या कानात कुजबुजलं, ''तबला मस्त वाजवतात, पण प्रकरण जरा तऱ्हेवाईक आहे हो! सांभाळा. उगीच बेरंग नको व्हायला.''

मी तबला मनासारखा जुळवत होतो. पी.एल.नी त्यांच्या नेहमीच्या तरकिबीने अन्् खुषमिजाज तबियतीने ''बुवा, आम्हाला सांभाळून घ्या'' म्हटलं.

''क्या बात है? जीओ मेरे भाई, हो जाओ शुरू-'' मी.

गाणं सुरू झालं. 'हसलं मनि चांदणे' हे राजा बढ्यांचं उडत्या चालीचं गीत पी.एल. गायला लागले. लग्गीचार माझीही खुलायला लागली. ती मैफल शेवटपर्यंत चढत गेली. मोठं ढंगदार गाणं पी. एल.नी ऐकवलं. गाणं संपल्यावर मीच त्यांना म्हणालो, ''यार, बहोत अच्छे गाते हो! सुरीले हो. क्या बात है, ऐसेही हमेशा गाया करो.''

त्या वेळी शिष्टाचार वगैरे माझ्यापासून जरा दूरच होते. पण चांगल्या गोष्टीला दिल खोलून दाद देणं यात गैर काहीच नव्हतं. आजदेखील आम्ही दोघं चांगलं काही ऐकायला मिळालं, भले तो बडा ख्याल असो, लडीहार जोडाची चीज असो, ठुमरी- दादरा- गझल- लावणी- नाटकातलं पद- सिनेमातलं गाणं- काहीही असो, खळखळून दाद देऊन मोकळे होतो. त्या दिवशीच्या त्या माझ्या बोलण्याचा पी.एल.नी गंभीरपणे विचार केला असता तर? नाही केला हेच बरं झालं. संगीताचं प्रेम त्यांनी तसंच टिकवलं. लिहिण्यावर जास्त भर दिला. फार चांगलं झालं. पुढे त्यांच्या कित्येक मैफली मी वाजवल्या. मी गाणारा आहे, हे पी.एल.ना आमच्या पहिल्या भेटीतच समजलं होतं. अन् गाण्याच्या प्रेमामुळेच पुढे माझी कित्येक गाणी पी.एल.नी त्यांच्या पेटीच्या साथीत रंगवली. अजूनही सवड मिळाली तर ते मजेत पेटी घेऊन बसतात.
पी.एल. नाटकांतून काम करायला लागले, तेदेखील संगीत नट म्हणून. 'भावबंधना'त प्रभाकर, 'शारदे'त कोदंड, 'राजसंन्यासा'त रायाजी या त्यांच्या भूमिका गाण्यामुळेसुद्धा मजा देऊन गेल्या. रांगणेकरांच्या नाटकांतून, चित्रपटांतून पी.एल. गायले. पुढे त्यांनी चित्रपटाचं क्षेत्र काही काळ निवडलं. त्या क्षेत्रातदेखील त्यांचा सब कुछ पी.एल., म्हणजे लेखक- कथालेखक- संवाद- गीतं अन् भूमिकादेखील हा विक्रम वाखाणण्यासारखा ठरला.
गाण्याची चाल लावायची म्हणजे सुरुवातीला ती एक महा-डोकेदुखी असते. काही केल्या मनासारखं चालीचं तोंड लागत नाही. हा अनुभव कित्येक रचनाकारांना आहे. लोकांना चटकन ताल धरायला लावील, गुणगुणायला लावील अशी चाल बांधणं हे खरंच महाजिकिरीचं काम आहे. पी.एल. आमच्या जातीचे आहेत असं जे मी म्हणतो, त्याचं कारणच हे आहे. मोठी माणसं, देवबाप्पा, देव पावला, दूधभात, गुळाचा गणपती या चित्रपटांतल्या पी.एल.च्या चाली अजूनदेखील लोकांच्या तोंडी आहेत. अस्सल मराठी माणूस आहे हा.

पी.एल.ची कुठलीही चाल ऐका, चटकन लक्षात येईल की, त्यांनी दिलेल्या चाली आपल्याच माजघरातल्या असल्यासारख्या आहेत, वाटतील. त्या चालींना खानदान आहे. आकाशवाणी दूरचित्रवाणीत काही काळ पी.एल. अडकले. त्या काळात त्यांनी ज्या संगीतिका पेश केल्या, त्यांतली 'अमृतवृक्ष' ही संगीतिका म्हणजे एकाहून एक सरस अशा बहारदार चालींची खैरात होती. दुसरी गाजलेली संगीतिका होती 'बिल्हण'. त्यातलं आजदेखील आवडणारं गाणं म्हणजे 'माझे जीवन गाणे'.

संगीतातलं जे जे म्हणून अभिजात आहे, त्याचे ते आशिक आहेत. तशी त्यांची श्रद्धास्थानं अनेक आहेत. काय बिघडलं त्यात? आम्ही गाणारे लोक क्वचितच स्वत:ला दाद देत असतो. आमच्या कायम माना मोडायच्या जागा वेगळ्याच असतात. पी.एल.च्या आणि माझ्या त्या जागेत बालगंधर्व, मा. दीनानाथ, बडे गुलाम अलीखां, बरकत अली, बेगम अख्तर, मल्लिकार्जुन मन्सूर, सौ. पद्मा गोखले, कुमार गंधर्व ही महाप्रचंड मंडळी आहेत. ही नावं केवढी मोठी आहेत हे सर्वांना माहीत आहे. यातल्या प्रत्येकाचा मजा वेगळा. तो आम्ही मनमुराद लुटतो.
गायला बसलं की कधीतरी त्यात स्वत:ला हरवून बसल्याची अवस्था जाणवायला लागते. काही ठरावीक सूर किंवा एखादं लहानसं स्वरवर्तुळ शरीराचा, मनाचा पूर्ण ताबा घेतं. लगन लागते त्या वर्तुळाची. सगळा आकृति-बंध डोळ्यांसमोर दिसत असतानादेखील तो पूर्ण करणं मुश्कील होऊन जातं. अशी अवस्था क्वचित अनुभवायला मिळते. गवयानं स्वत:ला दाद द्यायची तीच खरी जागा. पी.एल. गाण्यातले आहेत. त्यांचं गाणं लेखणीतून कोरलं जातं. त्यांच्याही बेचैनी वाढवणाऱ्या स्वत:ला दाद द्यायच्या जागा असतीलच.

पी.एल. आता वयाची साठी ओलांडताहेत. यार पी.एल., आम्ही तुमचे आशिक. तेव्हा भाईसाब, आम्ही दाद देत आलो. तुमचं समाधान नसेल झालं त्यानं. असेच एखाद्या बेचैनी वाढवणाऱ्या जागेची दाद स्वत:ला द्या. आम्ही 'बहोत अच्छे' म्हणायला टपलो आहोत.

- वसंतराव देशपांडे
(महाराष्ट्र टाइम्स, रविवार पुरवणी, ४ नोव्हेंबर १९७९)
हा लेख उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रणव उंडे ह्यांचे आभार.

Monday, June 4, 2012

झपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)


झपताल

पार्श्वभूमी : चाळीतली खोली

"मेले शंभरदा ओरडा - फुटलेयत कान!"
"जरा गप्प बसाल का?"
"मुकी बायको करायची होतीत-"
"तेच चुकलं!"
"मग पुन्हा बांधा बाशिंग - नाहीतरी दिवसभर खिडकीतून पलीकडल्या बिर्हाडात पाहत असताच कॉलेजवालीकडे!"
"मग भीती आहे की काय कुणाच्या बापाची."
"त्या पोरीच्या बापाची तरी बाळगा! पोलिसांत आहे तो! जरा वयाची ठेवा!"
"उगीच बडबडू नकोस - भांडखोर बायको म्हणजे पाप आहे -"
"काय?"
"नाही, शाप आहे - शापच बरोबर!"
"दिवसभर मेले चौकोन भरतात - दोन रुपड्यांचं तरी बक्षीस लागेल तर शपथ!"
"पंचवीस हजार मिळतील तेव्हा पाटल्या मागायला येऊ नकोस!"
"पाटल्या घालताहेत! होत्या त्या विकल्या!"
"विकेन नाहीतर समुद्रात फेकून देईन -"
"मलाही द्या फेकून -"
"चल ऊठ!"
"ट्यँ -"
"काय कारटी आहेत! लोकांची पोरं कशी हसत असतात."
"आमची कारटी बाप मरत नाहीत म्हणून रडतात -"
"फार लवकर समज आलीय त्यांना -"
"बाबा, मास्तरनी वही आणायला सांगितलंय!"
"मास्तरला म्हणावं - वहीबिही काही मिळणार नाही! किती वह्या लागतात तुझ्या मास्तराला?"
"मास्तरला नाही - मला लागतात."
"मिळणार नाहीत! हा आणा घे. विड्या घेऊन ये लालधागा -"
"आणि वह्या?"
"थोबाड फोडीन! अहो, जरा शिस्त लावा पोरांना -"
"आधी अंग घ्या जरा विसळून! दिड मिंटाची मेली आंघोळ - तीन तास पेटतोय बंब!"
"पंचा आण! एकदा शेवटली आंघोळ करतो तुझ्या नावाने - तांब्या कुठाय?"
"तो काय समोर? घ्या आतून -"
"ते तू नको सांगायला."
बुडबुडबुडूक -
"ओय ओय मेलो! अग, हे आंघोळीचं पाणी आहे की चहाचं आधण? - ओय ओय ओय -"

- काही (बे)ताल चित्रे - अघळ पघळ

Friday, April 13, 2012

पडद्यामागील ‘भाई’!

एफएमने रेडिओचा पुनर्जन्म झाला. तरुण पिढी परत त्याच्याकडे वळली. नाहीतर टेलिव्हिजनने त्याला अगदी तडीपार करण्याची वेळ आणली होती. एफएम येण्यापूर्वीच्या आणि टेलिव्हिजन जिकडेतिकडे झाल्यानंतरच्या काळात तेरा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास सोसत तो कुठे कुठे छोट्या गावांत, पानाच्या दुकानांत, चांभाराच्या हत्यारांबरोबर, लोकवस्ती कमी असलेल्या आणि वीज नसलेल्या गावांत बॅटरी सेल्सच्या आधारावर, लहानग्या ट्रांझिस्टर सेटच्या आधारावर तग धरून राहिला होता. कॉम्प्युटर आल्यावर धुगधुगी उरलेल्या टाइपरायटरसारखा.

माझ्या लहानपणी, म्हणजे 1950च्या काळात, रेडिओची स्थिती अगदी वेगळी होती. तो प्रसारमाध्यमांचा राजा होता. त्याचा रुबाब मोठा होता, आकार मोठा होता. त्याचे कॅबिनेट उत्तम प्रतीच्या लाकडाचे असायचे. मध्यमवर्गातल्या अनेक दिवाणखान्यात त्याच्याकरता एक खास ‘रेडिओ केस’ करून घेतलेली असायची. तो ट्रांझिस्टरसारखा कुठेतरी ठेवता येत नसे. तो एरियलने जोडलेला असे आणि त्याला ध्रुवासारखे अढळ स्थान असे.
महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता कधी कधी संपूर्ण कुटुंब त्याच्याभोवती जमत असे. टेलिव्हिजनमधला आणि रेडिओतला मोठा फरक म्हणजे रेडिओ तुम्हाला इतर कामे करताना ऐकता येतो. आईला तो जरा मोठ्याने लावला की स्वयंपाकघरातून आणि आजी-आजोबांना आपली बैठक न सोडता ऐकू येऊ शकत असे. माझ्या एका मैत्रिणीच्या आजीला तो इतका आवडायचा, की ती त्याला प्रेमाने रेडोबा म्हणायची. घरात काम करणा-या नोकरमंडळींना ग्रामीण कार्यक्रम किंवा कामगार सभा ऐकता यायची. घरात एकटे राहणारे लोक एकटेपणा भासू नये म्हणून रेडिओ लावून ठेवत असत. मग तो ऐकलाच पाहिजे अशी सक्ती नसे.

रेडिओच्या कार्यक्रमात भाग घेणा-यांना ‘रेडिओ स्टार’ म्हणत असत. त्यांना सिनेस्टारइतका पंचतारांकित मान नसला, तरी तीन ते चार तारे त्यांच्या वाट्याला यायचे. कुणाच्या घरी रेडिओ-स्टार आल्यास शेजारची मंडळी कोणते ना कोणते निमित्त काढून जरा डोकावून तरी जायची.

मुलांकरता रेडिओत मराठीत खास कार्यक्रम असायचा तो ‘गंमत जंमत’ आणि त्याचे सहनिर्माते होते मायाताई - माया चिटणीस आणि नानोजी - नारायण देसाई.

‘गंमत जंमत’च्या एका कार्यक्रमात मला काम मिळाले. आमची तालीम चालू असताना एक जाड भिंगाचा चष्मा लावलेले, कुरळ्या केसांचे, अंगाने स्थूल आणि वर्णाने सावळे असे गृहस्थ आले आणि तालीम ऐकू लागले. खरे म्हणजे रेडिओच्या शिस्तीप्रमाणे स्टुडिओत कोणत्याही परक्या गृहस्थाला प्रवेश देत नसत आणि थारा तर बिलकुल देत नसत. तरी एवढे धार्ष्ट्य करणारा हा गृहस्थ कोण, असे आम्हा सगळ्या मुलांनाच वाटले. आता त्याला मायाताई रागावतील आणि बाहेर काढतील असेही वाटत होते. पण त्यादेखील या गृहस्थांशी आदराने बोलून परत तालमीला लागल्या. पाच-एक मिनिटे तालीम झाल्यावर या गृहस्थांनी मायातार्इंना बोलावून त्यांच्याशी हलक्या आवाजात काही हितगुज केले. मग त्या आमच्यात परत आल्या आणि मला म्हणाल्या, ‘अरुण, तालमीनंतर तू जरा थांब.’

तालमीनंतर मायाताई मला त्या गृहस्थांकडे घेऊन गेल्या आणि त्यांची ओळख करून दिली. त्यांचे नाव पु. ल. देशपांडे. ते त्या वेळी आकाशवाणीवर निर्माते होते. मी त्यांचे नाव लेखक म्हणून ऐकले होते आणि पाठ्यपुस्तकात त्यांच्या ‘नस्ती उठाठेव’ या पुस्तकातला धडा तर मला बेहद्द आवडला होता. त्यांना त्यांच्या रेडिओ-नाटकात भूमिका करायला एक मुलगा हवा होता. तालमीतला माझा आवाज आणि बोलण्याची पद्धत त्यांना आवडली. तिथून ‘भाईं’च्या बरोबर काम करायला सुरुवात केली. कारण ते लवकरच ‘भाई’ झाले. त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केल्यानंतर मी त्यांची पुस्तके वाचायला लागलो. ती मला आवडलीच, पण शिवाय अनेकांप्रमाणे मी भाईंच्या प्रेमात पडलो. त्यांची विनोदबुद्धी, त्यांचा प्रेमळ आणि लाघवी स्वभाव, हलक्या हाताने दिग्दर्शन करण्याची पद्धत हे सारे पटकन आपलेसे करणारे होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सात-आठ नाटिकांत काम केल्यानंतर त्यांनी मला श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हत्या’ कादंबरीचे आपण आठ भागांत नभोनाट्य करणार आहोत, त्यात हत्याची भूमिका करतोस का म्हणून विचारले. मला आणि माझ्या घरच्यांना फार आनंद झाला.

‘हत्या’ ही पेंडसे यांची एक मनाला चटका लावणारी कादंबरी आहे. शिवाय तिच्यातले मुख्य पात्र कोकणातल्या पडझड झालेल्या कुटुंबातील एक लहान मुलगा आहे. त्याचेच नाव हत्या किंवा संपूर्ण नाव हणमंत आणि त्याचे छोटे रूप हत्या. कादंबरी एकूण ज्याला (जर्मन भाषेत) बिल्डुंग्सरोमान म्हणतात तशी. जीवनशिक्षणाची कथा.

भाईंच्या दिग्दर्शन शैलीबद्दल थोडे काही सांगतो. अर्थात हे सारे त्या वेळी स्पष्ट जाणवले नव्हते. पण हळूहळू अंगात भिनत होते. भाई एक अत्यंत उत्तम नकलाकार होते हे त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’च्या श्रोत्यांना सांगायला नको. मी मुद्दामच श्रोत्यांना म्हणतोय. कारण भाईंच्या दिग्दर्शनाचे आणि लेखनशैलीचे अनुभव ग्रहण करणारे सर्वात समर्थ ज्ञानेंद्रिय म्हणजे त्यांचा कान. त्याला संगीताचे सारे सूक्ष्म हेलकावे आणि भाषेचे सारे हेल समजत असत. त्यांच्या दिग्दर्शनात एखादे पात्र निर्माण करताना त्याचे बोलणे त्यांना ऐकू येते आहे अशा बारकाईने ते तुम्हाला सूचना देत. मात्र या सूचना वाक्यावाक्याला दिल्या जात नसत. ते तुम्हाला त्या पात्राच्या नाडीवर बोट ठेवायला लावून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकवत. ते एकदा लक्षपूर्वक ऐकलेत, की मग पुढचे तुमच्यावर. हे पात्र त्यांनी पाहिलेले असण्यापेक्षा त्यांनी कल्पनेत ‘ऐकलेले’ असायचे. एकदा त्यांना ते नीट ऐकू आले, की ते नखशिखान्त तयार झाले. हत्यातली विविध पात्रे पेंडश्यांच्या लेखणीतून बाहेर पडून पुराणातल्या कथांसारखी भाईंच्या कानातून पुन्हा जन्मून रेडिओलहरींवर तरंगू लागली. या नभोनाट्याला अमाप लोकप्रियता मिळाली. महाराष्टÑाच्या, विशेषत: कोकणातल्या कानाकोप-यातल्या छोट्या छोट्या खेड्यांतूनदेखील पत्रे यायची. आठवड्याला सुमारे पाचशेच्या वर पत्रे येत असत. भाईंच्या या नवीन प्रकारच्या निर्मितीने त्यांच्या सर्व लेखनाप्रमाणे महाराष्टाला वेडच लागले आणि मी अचानक ‘रेडिओस्टार’ झालो. त्याबद्दल विविध वृत्तपत्रांतून फोटोही येत असत. प्रसिद्धीचा माझा हा पहिला अनुभव आणि तो काही वाईट नव्हता. वय वर्षे आठ. जवळजवळ एक वर्षभर महाराष्टात मी ‘हत्या’ म्हणूनच प्रसिद्ध होतो. मलाही या हत्याबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली. त्याली मी आतून ओळखू लागलो. सुमारे दोन-एक महिने एकत्र काम केल्याने बाकीच्या संचातले सारे एकमेकांना कादंबरीतल्या नावाने हाका मारत. विनायक महाजन हा भुत्या, ताराबाई तळवलकर या माझ्या आई, इत्यादी.

साधारण चौदाव्या वर्षापर्यंत माझा रेडिओशी आणि मराठी रंगभूमीशी संबंध होता. वयोमानाप्रमाणे माझे आकर्षण कमी झाले. अधूनमधून एखादे नाटक पाहावे किंवा वाचावे इतपत. कधीतरी त्या काळातले कोणीतरी भेटले किंवा काही संदर्भ आला तरच या आठवणींना उजळा मिळायचा. पण मला माझे असे काही या काळात नक्कीच सापडले.

बरीच वर्षे लोटली.

1988च्या सुमारास शांता गोखले यांनी केलेले पेंडश्यांच्या ‘जुम्मन’ या दीर्घकथेचे भाषांतर मला पेंडशांना नेऊन द्यायचे होते. मी पेंडश्यांचे घर शोधत त्यांच्याकडे पोचलो. त्यांनी माझे आगतस्वागत केले. मी शांताबार्इंचे आणि माझे नाते त्यांना सांगितले. ते शांताबार्इंच्या वडलांना म्हणजे श्री. गोपाळ गुंडो गोखले यांना ओळखत होते. त्यांच्याविषयी गप्पा झाल्या. पेंडसे बोलताबोलता एकदम थांबले, माझ्याकडे वळले आणि त्यांनी मला विचारले, ‘‘अहो, अरुण खोपकर नावाचा एक मुलगा होता. त्याने माझ्या हत्या कादंबरीचे भाईने नभोनाट्य केले होते त्यात हत्याची भूमिका केली होती. तो तुमचा कोण?’’ मी त्यांना तो मुलगा मीच असे सांगितल्यावर त्यांनी एकदम माझा हात घट्ट धरला आणि म्हणाले, ‘‘काय योगायोग आहे पाहा! मी त्या हत्याला तीस-एक वर्षे शोधतोय. आणि आज तो असा मिळाला. वाह वा! किती सुंदर काम केले होतेत तुम्ही. अगदी माझ्या मनातला हत्या उभा केला होतात.’’ दोन तीन दिवसांनी शिवाजी पार्कला सकाळी फिरताना मला दोघातिघांनी सांगितले, की आदल्या दिवशी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेंडश्यांचा सत्कार झाला होता. त्यात त्यांनी हत्या त्यांना तीस वर्षांनंतर कसा परत भेटला याची कथा माझ्या नावासकट सांगितली होती. कादंबरीतले पात्र परत भेटल्याची कथा. माझा एक जुना शाळकरी मित्र या कार्यक्रमाला गेला होता. त्याने मला पाहताच लांबूनच हाक मारली, ‘‘काय हत्या!’’ तीस वर्षांनी हत्याचा पुनर्जन्म झाला. दोन दिवसांकरता का होईना.

- अरुण खोपकर
दिव्यमराठी.इन
(सतीश काळसेकर संपादित ‘आपले वाङ्मय वृत्त’ मासिकातून साभार)
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-p-l-deshpande-all-india-redio-2544593.html

Tuesday, March 13, 2012

आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा!

दिवंगत लेखक पु. ल. देशपांडे यांचं 'गाठोडं' हे पुस्तक नुकतच 'परचुरे प्रकाशन मंदिर'तर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकातील 'मार्मिक'च्या चौथ्या वाढदिवसाला उपस्थित न राहता आल्याबद्दल पुलंनी बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या बंधुंना पाठवलेलं हे 'मार्मिक' पत्र...

१४ ऑगस्ट १९६४
वरळी, मुंबई १८

प्रिय बाळ आणि श्रीकान्त,

तुम्हां दोघांपैकी कुणाच्याही हातात सापडलो असतो, तर आजच्या 'मार्मिक'च्या वाढदिवसाला मोठ्या आनंदाने अध्यक्षीय पगडी घालून बसलो असतो. तो योग हुकल्याचे मला खरोखरीच दु:ख होत आहे. दुसऱ्या एका कार्यक्रमाची सुपारी आधीच घेतल्यामुळे येता येत नाही. म्हणून ह्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी तुम्हांला, 'मार्मिक'ला, श्री. द. पां. खांबेटे आदी करोन तुमच्या समस्त सहकारी मंडळींना 'आयुष्यमान व्हा - यशस्वी व्हा' असा आशीर्वाद देतो.

अध्यक्ष म्हणून जे चार शब्द सांगितले असते, ते पत्रातूनच सांगतो. ह्या शब्दांना थोडा वडिलकीचा सूर लागला असला, तर रागावू नका. तो सूर थोडासा अपरिहार्य आहे. कारण आजही तुम्ही दोघे जण माझ्या डोळ्यांपुढे येता ते आपापली दप्तरे आणि अर्ध्या चड्ड्या सावरीत शाळेत येणारे दोन चुणचुणीत आणि काहीसे खट्याळ विद्यार्थी म्हणूनच. बाळने शाळेची हस्तलिखित मासिके सजवायची आणि श्रीकान्तने व्हायोलिन वाजवून गॅदरिंगमध्ये टाळ्या मिळवायच्या, हे तुमचे पराक्रम तुमच्या चिमुकल्या वयात मी पाहिले आहेत.

कुठल्याही कलेतला का असेना 'झरा मूळचाचि खरा' असावा लागतो, तरच तो टिकतो. उदाहरणच द्यायचे तर मार्मिकमधून येणारे तीर्थस्वरूप दादांचे आत्मचरित्रच पाहा. त्यांनी ऐन जवानीची वेस ओलांडल्याला कित्येक वर्षे लोटली, पण जन्माला येतानाच नसानसांतून वाहणारा त्वेष आजही टिकून राहिला आहे. अन्याय दिसला की तारुण्यातला हा तानाजी वार्धक्यात शेलारमामासारखा उठतो आणि स्वत:ला उदय भानू म्हणवणारे ते चिमटीत चिरडण्याच्या लायकीचे काजवे आहेत हे दाखवून जातो; आणि म्हणूनच वृत्तपत्रव्यवसायातच काय पण सर्वत्रच प्रलोभनकारांचा सुळसुळाट झालेल्या ह्या अव-काळात हा प्रबोधनकार आजही निराळा उठून दिसतो.

हे व्रत खडतर आहे. आपल्या हातून या व्रताचे पालन किती काटेकोरपणाने होत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याचा आजचा हा दिवस आहे. सुदैवाने असले निर्दय आत्मपरीक्षण करायला लागणारी विनोदबुद्धी तुम्हांला उपजत मिळाली आहे. निर्मळ विनोदबुद्धी हे देवाच्या देण्यातले एक ठेवणीचे देणे आहे. मत्सर, पूर्वग्रह, क्षुद्रता, वैयक्तिक हेवेदावे असल्या संकुचित आणि स्वत:लाच दु:खी करणाऱ्या भावनांपासून ह्या देण्यामुळे माणूस दूर राहतो; आणि म्हणूनच निर्मळ विनोदाचा उपयोग जेव्हा शस्त्र म्हणून करायचा, तेव्हा व्यक्तीचा द्वेष न राहता, वृत्तीतला दोष दाखवणे हे मुख्य कर्तव्य राहते. आणि जेव्हा व्यक्तिद्वेष नसतो, तेव्हाच निर्भयता येते. तोंड चुकवून पळावे लागत नाही किंवा स्वत:च्या क्षुद लिखाणाचे त्याहूनही दुबळे असे समर्थन करीत बसण्याची नामुष्की स्वीकारावी लागत नाही. सभ्यतेचा धर्म सोडून वर्म हुडकीत बसणे, हे अत्यंत क्षुद मनाचे लक्षण आहे. इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्रे काढून दोषदिग्दर्शन करण्याची प्रतिज्ञा करणाराला इष्टाची ओळख हवी आणि स्पष्टपणाची सभ्य सीमारेषा कुठली, त्याचे तारतम्य हवे. घाव असा हवा की, मरणाऱ्याने मरतामरता मारणाऱ्याचा हात अभिनंदनासाठी धरावा. शेतातले काटे काढताना, धान्याची धाटे मोडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. व्यंगचित्रकाराला अव्यंगाचे स्वरूप नीट पारखता आले पाहिजे. व्यंगचित्राने प्रथम हसवले पाहिजे. थट्टेमागे आकस आला, विनोदात कुचाळी आली की ते व्यंगचित्र निर्मळ पाण्यात रंग न कालवता गटारगंगेच्या पाण्याने काढल्याची घाण येते. उत्साहाच्या आणि गंमत करण्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशाने तुटून पडण्याच्या भरात आपणा सर्वांच्या हातून मर्यादांचे उल्लंघन होते. सुदैवाने तुमच्यावर डोळा ठेवायला दादा आहेत. त्यांच्या स्वत:च्या हातून लेखनात मर्यादांचे जे उल्लंघन झाले असेल, ते तुम्हांला खिलाडूपणाने सांगण्याचे धैर्य त्यांना आहे. तुमचे भाग्य म्हणून तुम्हांला साक्षात जन्मदाताच गुरू म्हणून लाभला; पण गुरू जितका समर्थ, तितकी शिष्याची जबाबदारी अधिक.
                                
' मार्मिक'च्या छोट्याशा कारकिदीर्तल्या कार्याचा आढावा घेण्याचा माझा हेतू नाही, परंतु गेल्या वर्षातल्या तुमच्या ठळक कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. दोन-तीन बाबतींत मला तुमचे अभिनंदन करावेसे वाटते. शब्दस्पर्धा क्षेत्रांतली लबाडी तुम्ही उघडकीला आणलीत, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. जुगाराला माझा विरोध नाही, पण तो खेळणाराने आणि खेळवणाराने हा जुगार आहे म्हणून खेळावे व खेळवावे. धर्मराजसुद्धा द्यूत हे द्यूत म्हणूनच खेळले. धर्मयुद्धासारखे ते धर्मद्यूत होते. पण ह्या शब्दकोड्यांच्या जुगारातून साहित्याची गोडी लागते, हे वाचून मात्र मी थंड पडत होतो. असल्या जुगाराला साहित्य प्रचाराचे साधन म्हणून परवानगी देणाऱ्या आपल्या राज्यर्कत्यांच्या निष्पाप मनाचे कौतुक करायला हाती मीठमोहऱ्याच हव्यात.

' मार्मिक'मधले माझे दुसरे आवडते सदर म्हणजे, सिने-प्रिक्षान. वास्तविक सिनेमा हे तर नियतकालिकांचे 'डोंगरे बालामृत' आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या जाहिरातींवर नियतकालिके बाळसे धरतात. त्या भूगंधर्वनगरीतल्या यक्षयक्षिणींना आणि त्यांच्या कुबेरांना प्रसन्न ठेवण्याची अहमहमिका लागलेली दिसते. मराठी भाषेत तर आता नवी विशेषणे निर्माण करण्याची वेळ आली आहे. महान शब्द केव्हाच लहान झाला. कलामहर्षी तर बाबूलनाथाच्या पायरीवरच्या बैराग्यांइतके वाढले आहेत. अभिनयाचे सम्राट आणि सम्राज्ञी वृत्तपत्रीय स्तंभास्तंभांना टेकून उभ्या आहेत. अशा वेळी बोलपटांतले कचकडे उघडे करून दाखवणे हे किती अव्यवहार्य धोरण; पण तुम्ही ते पाळले आहे, याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.

जगातल्या कुठल्याही चांगल्या व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींशी तुलना केल्यावर उणेपण वाटू नये, असे गुण तुमच्या व्यंगचित्रांमध्ये आहेत. आवश्यक निर्भयता आहे. रेखाटणांत विलक्षण सहजता आहे. आमच्या बोरूच्या बहादुरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती दांडगी. दोन रेषांत तुम्ही मी-मी म्हणवणाऱ्याला लोळवू शकता. कुठल्याही स्तंभलेखकापेक्षा तुमचे सार्मथ्य मोठे; पण सार्मथ्य जितके मोठे, तितके ते किती बेताने वापरावे, याची जबाबदारीही मोठी.

अत्यंत जिव्हाळ्याने तुम्हांला मी हे पत्र लिहीत आहे. त्यामुळे काही धोक्याच्या सूचना दिल्या, तर रागावू नका. हे पत्र आहे, मानपत्र नव्हे. शिवाय तुमच्या बाबतीत मास्तरकीची माझी जुनी छडी थोडा वेळ पुन्हा हाती धरतो. स्तुतीचा 'वा'देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडावा. भलत्या ठिकाणी 'वा' दिल्यावर 'नर'देखील 'वानर' होण्याची भीती असते. सिनेप्रिक्षान, ती. स्व. दादांची आत्मकथा किंवा खांबेट्यांचा गुरू-बाजीची करुण कहाणी सांगणारा लेख, असले अपवाद वजा केले, तर लेखी मजकूर तुमच्या व्यंगचित्रांच्या तोडीचा होत नाही. चित्रे इतकी चांगली आणि लेखी मजकूर मात्र सामान्य. विनोदी लेख तर कित्येकदा केविलवाणे असतात. चांगले आणि हुकमी विनोदी लेखन ही दुमिर्ळ गोष्ट आहे. अशा वेळी कै. दत्तू बांदेकरांची आठवण होते. माझ्या मते कै. दत्तू बांदेकर हे मराठी पत्रसृष्टीतील एकमेवाद्वितीय असे विनोदी स्तंभलेखक. विनोदी लिखाणाच्या दृष्टीने अधिक जोरदार खटपट हवी.

दंभस्फोटाच्या वेळी तुमच्या संपादकीय विभागातल्या लेखण्यांना धार चढते; परंतु काही वेळा जिथे चापटीने भागेल, तिथे तुम्ही एकदम दात पाडायला निघू नये. अलीकडेच कॉलेजातल्या टेक्स्ट बुकातील धड्यांसंबंधीचा लेख मला असाच भडकून लिहिल्यासारखा वाटला. तुमचा हेतू प्रामाणिक होता. यौवनाच्या उंबरठ्यावरच्या पोरांना अगदी सिनेमातले हिरो अगर हिरोइन बनवणारे शिक्षण देऊ नये हे खरेच. तसे ते कॉलेजातून दिलेही जात नाही. खरे म्हणजे विद्यार्थ्यांनी काय व्हावे, काय होऊ नये याची चिंता करण्यात आपली प्राध्यापक मंडळी वेळ फुकट घालवीत नाहीत; गाइडे लिहिण्यात त्यांचा किती वेळ जातो, याची तुम्हांला कल्पना नाही. इंटरला शेक्सपिअरचे रोमिओ-ज्युलिएटही असते, संस्कृत नाटकांत शृंगार असतो. 'कातरवेळ' ही मराठीतली एक अतिशय सुंदर कथा आहे. षोडश वर्षे प्राप्त झाल्यावर पुत्रांशी मित्रांसारखे वागा, असे शास्त्रवचन सांगते. पोरांचे 'हिरो' होऊ नयेत, पण त्यांचे 'मोरू'तरी का करावेत? तात्पर्य, तुमच्या व्यंगचित्रांच्या सोयीसाठी नाक ओढताना उगीचच गळा आवळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. उत्साहाच्या भरात तारतम्य सुटू नये. विनोदी लेखक-चित्रकारांचे तर अजिबात सुटू नये. लोक तारतम्य सोडतात, तिथे विनोदी लेखकाचे काम सुरू होते. थोडक्यात म्हणजे गुळगुळीत करावी, पण रक्त न काढता! ज्याची झाली, त्यालादेखील आपण 'स्वच्छ' झालो; असे वाटले पाहिजे.

तुम्हांला उत्तरोत्तर यश मिळो आणि त्या वाढत्या यशाबरोबर 'अहंकाराचा वारा न लागो, पाडसा माझ्या विष्णुदासा, नामदेवा'!

ह्या प्रसंगी श्री. द. पां. खांबेटे यांचे व तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तुमच्या यशात तुमच्या मातापित्यांच्या आशीर्वादाइतकाच त्यांच्या सहकार्याचाही वाटा आहे. वडिलांच्या तेजस्वी लेखनाची परंपरा चालू ठेवा आणि व्यंगचित्र साप्ताहिकाचे रामलक्ष्मण होऊन दुष्टांचे निर्दाळण करून सुष्टांच्या सदिच्छांचे मानकरी व्हा, असा आशीर्वाद केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन देतो.

प्रत्यक्ष हजर राहता न आल्याबद्दल राग मानू नका, असे पुन्हा एकदा सांगून आणि मार्मिकच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तुम्हां दोघांच्या हाती लागून, नव्हे हातांचा आधार घेऊन व्यासपीठावर प्रत्यक्ष येऊन भाषण करीन, असे आश्वासन देऊन हे लांबलेले पत्र संपवतो.

तुमचा,
पु. ल. देशपांडे

महाराष्ट्र टाईम्स
११ मार्च २०१२
(हा लेख पु.ल.प्रेम ब्लॉगसाठी सुचवल्याबद्दल श्री धीरज पाटील आणि श्री चंद्रशेखर मोघे ह्या पु.ल.प्रेमींचे मन:पूर्वक आभार)