Friday, April 13, 2012

पडद्यामागील ‘भाई’!

एफएमने रेडिओचा पुनर्जन्म झाला. तरुण पिढी परत त्याच्याकडे वळली. नाहीतर टेलिव्हिजनने त्याला अगदी तडीपार करण्याची वेळ आणली होती. एफएम येण्यापूर्वीच्या आणि टेलिव्हिजन जिकडेतिकडे झाल्यानंतरच्या काळात तेरा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास सोसत तो कुठे कुठे छोट्या गावांत, पानाच्या दुकानांत, चांभाराच्या हत्यारांबरोबर, लोकवस्ती कमी असलेल्या आणि वीज नसलेल्या गावांत बॅटरी सेल्सच्या आधारावर, लहानग्या ट्रांझिस्टर सेटच्या आधारावर तग धरून राहिला होता. कॉम्प्युटर आल्यावर धुगधुगी उरलेल्या टाइपरायटरसारखा.

माझ्या लहानपणी, म्हणजे 1950च्या काळात, रेडिओची स्थिती अगदी वेगळी होती. तो प्रसारमाध्यमांचा राजा होता. त्याचा रुबाब मोठा होता, आकार मोठा होता. त्याचे कॅबिनेट उत्तम प्रतीच्या लाकडाचे असायचे. मध्यमवर्गातल्या अनेक दिवाणखान्यात त्याच्याकरता एक खास ‘रेडिओ केस’ करून घेतलेली असायची. तो ट्रांझिस्टरसारखा कुठेतरी ठेवता येत नसे. तो एरियलने जोडलेला असे आणि त्याला ध्रुवासारखे अढळ स्थान असे.
महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता कधी कधी संपूर्ण कुटुंब त्याच्याभोवती जमत असे. टेलिव्हिजनमधला आणि रेडिओतला मोठा फरक म्हणजे रेडिओ तुम्हाला इतर कामे करताना ऐकता येतो. आईला तो जरा मोठ्याने लावला की स्वयंपाकघरातून आणि आजी-आजोबांना आपली बैठक न सोडता ऐकू येऊ शकत असे. माझ्या एका मैत्रिणीच्या आजीला तो इतका आवडायचा, की ती त्याला प्रेमाने रेडोबा म्हणायची. घरात काम करणा-या नोकरमंडळींना ग्रामीण कार्यक्रम किंवा कामगार सभा ऐकता यायची. घरात एकटे राहणारे लोक एकटेपणा भासू नये म्हणून रेडिओ लावून ठेवत असत. मग तो ऐकलाच पाहिजे अशी सक्ती नसे.

रेडिओच्या कार्यक्रमात भाग घेणा-यांना ‘रेडिओ स्टार’ म्हणत असत. त्यांना सिनेस्टारइतका पंचतारांकित मान नसला, तरी तीन ते चार तारे त्यांच्या वाट्याला यायचे. कुणाच्या घरी रेडिओ-स्टार आल्यास शेजारची मंडळी कोणते ना कोणते निमित्त काढून जरा डोकावून तरी जायची.

मुलांकरता रेडिओत मराठीत खास कार्यक्रम असायचा तो ‘गंमत जंमत’ आणि त्याचे सहनिर्माते होते मायाताई - माया चिटणीस आणि नानोजी - नारायण देसाई.

‘गंमत जंमत’च्या एका कार्यक्रमात मला काम मिळाले. आमची तालीम चालू असताना एक जाड भिंगाचा चष्मा लावलेले, कुरळ्या केसांचे, अंगाने स्थूल आणि वर्णाने सावळे असे गृहस्थ आले आणि तालीम ऐकू लागले. खरे म्हणजे रेडिओच्या शिस्तीप्रमाणे स्टुडिओत कोणत्याही परक्या गृहस्थाला प्रवेश देत नसत आणि थारा तर बिलकुल देत नसत. तरी एवढे धार्ष्ट्य करणारा हा गृहस्थ कोण, असे आम्हा सगळ्या मुलांनाच वाटले. आता त्याला मायाताई रागावतील आणि बाहेर काढतील असेही वाटत होते. पण त्यादेखील या गृहस्थांशी आदराने बोलून परत तालमीला लागल्या. पाच-एक मिनिटे तालीम झाल्यावर या गृहस्थांनी मायातार्इंना बोलावून त्यांच्याशी हलक्या आवाजात काही हितगुज केले. मग त्या आमच्यात परत आल्या आणि मला म्हणाल्या, ‘अरुण, तालमीनंतर तू जरा थांब.’

तालमीनंतर मायाताई मला त्या गृहस्थांकडे घेऊन गेल्या आणि त्यांची ओळख करून दिली. त्यांचे नाव पु. ल. देशपांडे. ते त्या वेळी आकाशवाणीवर निर्माते होते. मी त्यांचे नाव लेखक म्हणून ऐकले होते आणि पाठ्यपुस्तकात त्यांच्या ‘नस्ती उठाठेव’ या पुस्तकातला धडा तर मला बेहद्द आवडला होता. त्यांना त्यांच्या रेडिओ-नाटकात भूमिका करायला एक मुलगा हवा होता. तालमीतला माझा आवाज आणि बोलण्याची पद्धत त्यांना आवडली. तिथून ‘भाईं’च्या बरोबर काम करायला सुरुवात केली. कारण ते लवकरच ‘भाई’ झाले. त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केल्यानंतर मी त्यांची पुस्तके वाचायला लागलो. ती मला आवडलीच, पण शिवाय अनेकांप्रमाणे मी भाईंच्या प्रेमात पडलो. त्यांची विनोदबुद्धी, त्यांचा प्रेमळ आणि लाघवी स्वभाव, हलक्या हाताने दिग्दर्शन करण्याची पद्धत हे सारे पटकन आपलेसे करणारे होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सात-आठ नाटिकांत काम केल्यानंतर त्यांनी मला श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हत्या’ कादंबरीचे आपण आठ भागांत नभोनाट्य करणार आहोत, त्यात हत्याची भूमिका करतोस का म्हणून विचारले. मला आणि माझ्या घरच्यांना फार आनंद झाला.

‘हत्या’ ही पेंडसे यांची एक मनाला चटका लावणारी कादंबरी आहे. शिवाय तिच्यातले मुख्य पात्र कोकणातल्या पडझड झालेल्या कुटुंबातील एक लहान मुलगा आहे. त्याचेच नाव हत्या किंवा संपूर्ण नाव हणमंत आणि त्याचे छोटे रूप हत्या. कादंबरी एकूण ज्याला (जर्मन भाषेत) बिल्डुंग्सरोमान म्हणतात तशी. जीवनशिक्षणाची कथा.

भाईंच्या दिग्दर्शन शैलीबद्दल थोडे काही सांगतो. अर्थात हे सारे त्या वेळी स्पष्ट जाणवले नव्हते. पण हळूहळू अंगात भिनत होते. भाई एक अत्यंत उत्तम नकलाकार होते हे त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’च्या श्रोत्यांना सांगायला नको. मी मुद्दामच श्रोत्यांना म्हणतोय. कारण भाईंच्या दिग्दर्शनाचे आणि लेखनशैलीचे अनुभव ग्रहण करणारे सर्वात समर्थ ज्ञानेंद्रिय म्हणजे त्यांचा कान. त्याला संगीताचे सारे सूक्ष्म हेलकावे आणि भाषेचे सारे हेल समजत असत. त्यांच्या दिग्दर्शनात एखादे पात्र निर्माण करताना त्याचे बोलणे त्यांना ऐकू येते आहे अशा बारकाईने ते तुम्हाला सूचना देत. मात्र या सूचना वाक्यावाक्याला दिल्या जात नसत. ते तुम्हाला त्या पात्राच्या नाडीवर बोट ठेवायला लावून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकवत. ते एकदा लक्षपूर्वक ऐकलेत, की मग पुढचे तुमच्यावर. हे पात्र त्यांनी पाहिलेले असण्यापेक्षा त्यांनी कल्पनेत ‘ऐकलेले’ असायचे. एकदा त्यांना ते नीट ऐकू आले, की ते नखशिखान्त तयार झाले. हत्यातली विविध पात्रे पेंडश्यांच्या लेखणीतून बाहेर पडून पुराणातल्या कथांसारखी भाईंच्या कानातून पुन्हा जन्मून रेडिओलहरींवर तरंगू लागली. या नभोनाट्याला अमाप लोकप्रियता मिळाली. महाराष्टÑाच्या, विशेषत: कोकणातल्या कानाकोप-यातल्या छोट्या छोट्या खेड्यांतूनदेखील पत्रे यायची. आठवड्याला सुमारे पाचशेच्या वर पत्रे येत असत. भाईंच्या या नवीन प्रकारच्या निर्मितीने त्यांच्या सर्व लेखनाप्रमाणे महाराष्टाला वेडच लागले आणि मी अचानक ‘रेडिओस्टार’ झालो. त्याबद्दल विविध वृत्तपत्रांतून फोटोही येत असत. प्रसिद्धीचा माझा हा पहिला अनुभव आणि तो काही वाईट नव्हता. वय वर्षे आठ. जवळजवळ एक वर्षभर महाराष्टात मी ‘हत्या’ म्हणूनच प्रसिद्ध होतो. मलाही या हत्याबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली. त्याली मी आतून ओळखू लागलो. सुमारे दोन-एक महिने एकत्र काम केल्याने बाकीच्या संचातले सारे एकमेकांना कादंबरीतल्या नावाने हाका मारत. विनायक महाजन हा भुत्या, ताराबाई तळवलकर या माझ्या आई, इत्यादी.

साधारण चौदाव्या वर्षापर्यंत माझा रेडिओशी आणि मराठी रंगभूमीशी संबंध होता. वयोमानाप्रमाणे माझे आकर्षण कमी झाले. अधूनमधून एखादे नाटक पाहावे किंवा वाचावे इतपत. कधीतरी त्या काळातले कोणीतरी भेटले किंवा काही संदर्भ आला तरच या आठवणींना उजळा मिळायचा. पण मला माझे असे काही या काळात नक्कीच सापडले.

बरीच वर्षे लोटली.

1988च्या सुमारास शांता गोखले यांनी केलेले पेंडश्यांच्या ‘जुम्मन’ या दीर्घकथेचे भाषांतर मला पेंडशांना नेऊन द्यायचे होते. मी पेंडश्यांचे घर शोधत त्यांच्याकडे पोचलो. त्यांनी माझे आगतस्वागत केले. मी शांताबार्इंचे आणि माझे नाते त्यांना सांगितले. ते शांताबार्इंच्या वडलांना म्हणजे श्री. गोपाळ गुंडो गोखले यांना ओळखत होते. त्यांच्याविषयी गप्पा झाल्या. पेंडसे बोलताबोलता एकदम थांबले, माझ्याकडे वळले आणि त्यांनी मला विचारले, ‘‘अहो, अरुण खोपकर नावाचा एक मुलगा होता. त्याने माझ्या हत्या कादंबरीचे भाईने नभोनाट्य केले होते त्यात हत्याची भूमिका केली होती. तो तुमचा कोण?’’ मी त्यांना तो मुलगा मीच असे सांगितल्यावर त्यांनी एकदम माझा हात घट्ट धरला आणि म्हणाले, ‘‘काय योगायोग आहे पाहा! मी त्या हत्याला तीस-एक वर्षे शोधतोय. आणि आज तो असा मिळाला. वाह वा! किती सुंदर काम केले होतेत तुम्ही. अगदी माझ्या मनातला हत्या उभा केला होतात.’’ दोन तीन दिवसांनी शिवाजी पार्कला सकाळी फिरताना मला दोघातिघांनी सांगितले, की आदल्या दिवशी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेंडश्यांचा सत्कार झाला होता. त्यात त्यांनी हत्या त्यांना तीस वर्षांनंतर कसा परत भेटला याची कथा माझ्या नावासकट सांगितली होती. कादंबरीतले पात्र परत भेटल्याची कथा. माझा एक जुना शाळकरी मित्र या कार्यक्रमाला गेला होता. त्याने मला पाहताच लांबूनच हाक मारली, ‘‘काय हत्या!’’ तीस वर्षांनी हत्याचा पुनर्जन्म झाला. दोन दिवसांकरता का होईना.

- अरुण खोपकर
दिव्यमराठी.इन
(सतीश काळसेकर संपादित ‘आपले वाङ्मय वृत्त’ मासिकातून साभार)
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-p-l-deshpande-all-india-redio-2544593.html

1 प्रतिक्रिया:

अपर्णा said...

Khupach Chana lekh...itka sundar lekh milwun to waachyala upalabdh Karun dilyaabaddal Deepak khup khup aabhar...


Aparna