पी.एल.
अन् मी, आज गेली अडतीस वर्षे एकमेकांचे आहोत; मित्र, दोस्त, जिगरजान वगैरे
शब्द काहीच सांगू शकत नाहीत इतकं आमचं नातं सप्तकात गुंतलेलं होते.
सुराची एक लगन लागावी लागते. सुराची बेचैनी यातना जरूर देते. तो सूर आपल्या अगदी जवळ असतो. मनात त्याची आळवणीही सतत चालू असते. पण तो तसा भलताच सुळसुळीत असतो. हमखास हाती लागत नाही. असं माझं- पी.एल.चं नातं होते. तसं पाहिलं तर पी.एल. फार मोठे आहेत. मी त्यांच्या वर्तुळात कुठेतरी असावं हे त्यांना शोभून दिसणारं नाही. त्यांचा आवाका मोठा. नजर साडेतीन सप्तकांत फिरणारी. विदेही जनकाच्या परंपरेतला हा माणूस. सगळं काही खूप खूप मोठं पाहणारा, मोठं जपणारा, मोठं जाणणारा. मी त्या मनानं सर्वसामान्यांतला एक. नाही म्हणायला नफ्फड तबियतीचा अन् गाण्या-बजावण्यात बराचसा रुतलेला. बस, एवढा एकच धागा आमची पतंग उडवत बसला आहे गेली कित्येक वर्षे. गाण्या-बजावण्याचा मनसोक्त आनंद आम्ही दोघंही भोगतो. मी गाणं पुढे चालू ठेवलं. त्यातच रमलो. पी.एल. लिहिण्यात रंगले.
संगीत हा आमचा प्रांत तसा स्वतंत्र आहे. आपल्या अंगानं पूर्ण आहे. त्याची सगळी भिस्त सूर, ताल, लय, वेगवेगळे आकृतिबंध अन् जाणीवपूर्वक मांडणी यांवर आहे. म्हणजे संगीत खऱ्या अर्थानं शब्दांपलीकडलं आहे. शब्दांची दुनिया यात फार नंतर आली. सुरांना त्यांच्या वेगवेगळ्या अवस्थांचं दर्शन घडविण्यासाठी काही आघात देणं सुरू झालं अन् त्यासाठी सुरांना शब्दांची जोड मिळायला सुरुवात झाली. स्वराकृतींचे राग झाले. त्या रागांतून नादमधुर शब्दांचा वापर सुरू झाला. पुढे बंदिशी तयार झाल्या. त्याच रचना आम्ही गाणारे शतकानुशतकं भक्तिभावानं आळवत बसतो. अधूनमधून काही नव्या रचनांची भर जरूर पडत असते. नव्या असतात त्या बंदिशी (गीतं). राग जुनेच असतात. म्हणजेच गवयाची पेशकारी तशी जुनीच असते. तीच जुनी गोष्ट पुन:पुन्हा रंगवून, खुलवून सांगायची असते.
लेखकमंडळींचं तसं नाही, निदान नसावं. त्यांना रोजच्या रोज काहीतरी पाहायचं असतं, शोधायचं असतं, अनुभवायचं असतं. त्यातून ते पटेल, रुचेल ते आपापल्या प्रकृतिधर्माप्रमाणे अक्षरांत बसवायचं असतं. हा असा फरक आहे गाणाऱ्यात आणि लिहिणाऱ्यात. आमच्यापेक्षा या लोकांचा रियाज जास्त असायला हवा. सगळेच तसा रियाज करतात की नाही, कोण जाणे? पण गाण्यातून म्हणा, लिहिण्यातून म्हणा, एकूण तबियत ओळखता येते. असा या दोन जातींत फरक आहे.
पी.एल. आमच्या जातीतले आहेत. त्यांनी संगीताचा पद्धतशीर अभ्यास केला आहे. गाण्यातला अन् लिहिण्यातला फरक त्यांना ताबडतोब समजतो हे आमचं गाणाऱ्यांचं भाग्य. म्हणूनच पी.एल. गाण्या-बजावण्यावर काही लिहीत नाहीत. जे काही त्यातलं म्हणून पी.एल. लिहितात ते गाण्यासंबंधीचं नसतं. ऐकणाऱ्यांच्यावर होणाऱ्या परिणामासंबंधी असतं. त्यातून श्रोत्यांच्या विधानांच्या विसंगतीतला विनोद भरपूर वाचायला मिळतो. गाणं-बजावणं हे फक्त मन लावून ऐकायचं असतं. त्यातून मिळणारा आनंद वर्णनापलीकडचा असतो. तो शब्दांनी सांगता येत नाही. सांगायचा प्रयत्न म्हणजे पांगुळगाडा हाती घेऊन 'एक पाय नाचीव रे गोविंदा' करण्यासारखा प्रकार. पी.एल. हे पुरते ओळखून आहेत.
आमच्या गायकीत दोन प्रकारचं गाणं ऐकायला मिळतं. एक थंड गाणं, दुसरं तेज म्हणजे गरम गाणं. थंड गाणं सुस्त प्रकृतीचं अन् तेज गाणं चुस्त प्रकृतीचं. गाणं कसंही असेना, त्यात फारसं बिघडत नाही. सुस्त गाण्यानं सावकाश रंग भरत जाईल. मैफलीत एक सन्नाटा पसरेल. ऐकणारे गाण्याच्या आकृतीपेक्षा संथ-संथ सुरांच्या सावलीत आराम करू शकतील. या संथ प्रकृतीच्या गाण्यात गाणारा मात्र काटेकोर सुरीला लागतो. चुस्त प्रकृतीचं गाणं एखाद्या गोंडस गुटगुटीत पोरासारखं मैफलभर बागडत असतं. मैफलीत एकदम रंग भरतो. चुस्त गाणं तसं महाखट्याळ असतं. या जातीचं गाणारे हाताच्या बोटावर मोजावे लागतात. आम दुनिया या प्रकारच्या गाण्यावर भाळलेली असते. पी.एल.चं लिहिणं असंच चुस्त गायकीतलं आहे. त्यांचे लेख वाचताना मैफलीचा मजा येतो. भारी सुरीला माणूस आहे हा.
आम्ही तसे जवळजवळ रोज एकमेकांना भेटतो. चुकून दोघे कुठे बाहेरगावी गेलो असलो, तरच भेटीत खंड पडतो. बोलण्यात इकडचं तिकडचं बरंच असतं; पण मुख्य गाडी अडायचं ठाणं म्हणजे गाणं-बजावणं. गाण्यावर बोलणं सुरू झालं म्हणजे मग वेळ किती अन् कसा जाईल, हे भान राहत नाही. सुनीताबाईदेखील आम्हाला गाण्याच्या गप्पांतून सहसा भानावर आणत नाहीत. माझ्याच घरून कुणाचा निरोप आला तर ती बैठक संपते. पी.एल.ना भेटायला येणारे अनेक. बरेच वेळा त्यांचा मूड घालवणारेही अनेक. शिवाय मैत्रीतले, दोस्तीतले यार-जिगरवाले, नात्यागोत्यातलेही अनेक असतात. पण या सगळ्यांच्या बरोबर होणाऱ्या गप्पांत अधूनमधून गाण्याचा, एखाद्या सुंदर संस्कृत उक्तीचा, छानशा कवितेच्या ओळीचा आवर्जून उल्लेख पी.एल. करतात. गप्पा समान प्रकृतीच्या वर्तुळात सुरेल होतात. नापसंतीचं बोलणंदेखील बेसुऱ्या गाण्याची उपमा देत देत चालतं. पी.एल. जास्त रमतात लहान मुलांत. बच्चेकंपनी त्यांना एकदम पसंत. मुलांसाठी त्यांनी पुष्कळ केलं आहे, लिहिलं आहे, लिहितात. या त्यांच्या सगळ्या लकबी, सवयी, आवडींतून पी.एल. पिंडानं खरं गाणारे आहेत असं माझं ठाम मत आहे. जितका जास्त सुरांत बुडालेला गवई असेल, तितका तो मनानं लहान मुलासारखा असतो. त्याचं बालपण संपतच नाही. पी.एल.ची तीच तबियत आहे.
माझी पी.एल.ची भेटच मुळी खां महम्मद हुसेन खांसाहेब यांच्या गायन शाळेत झाली. मजेचं बोलणं झालं. एकमेकांचे विचारधागे एकाच साच्यातले वाटल्यानं जाम खूश झालो, बहोत बढिया दोस्त मिळाला आयुष्यात. पुढे लगेच काही दिवसांनी एका मैफलीत ऐकायला म्हणून जाऊन बसलो. पहातो तर समोर हातात हार्मोनियम घेऊन पी.एल. गायच्या तयारीत होते. त्यांचे आणि माझे असे मोजकेच दोस्तलोक त्या मैफलीत होते. तबलजींची वाट पाहत मैफल खोळंबली होती. त्या काळात मला लोक तबलजी म्हणून जास्त ओळखत होते. कुणीतरी हळूच मला विचारून पाहावंच्या पवित्र्यात पुढे सरकला. पण सुदैवानं एकदाचे तबलजी आले. गाणं सुरू झालं. एकेचाळीस किंवा बेचाळीस सालची गोष्ट आहे ही. पी.एल.च्या साथीला बसलेला तबलजी कसाबसा ठेका सांभाळून वाजवायची कसरत करणारा होता. पी.एल. मराठी गझलाच्या जातीचं एक गाणं पेश करायच्या तयारीत होते.
त्या दिवशी प्रथमच पी.एल.चा हार्मोनियमवरचा हात ऐकायला मिळाला. निहायत खूश झालो. प्रत्येक वाद्याची एक प्रकृती असते. त्या तरकिबीने जर ते वाद्य वाजलं तरच शोभून दिसतं. बऱ्याच वेळा वाद्याचा वकूब लक्षात न घेता वाद्याच्या प्रकृतिधर्माला न मानवणारा बाजदेखील वाजवला जातो. तयारी, चमत्कार, गंमत म्हणून थोडा वेळ ते शोभून दिसतं, पण ते तितकंसं खरं नाही. तो असतो नाकानं सनईचे सूर काढून दाखवण्याचा खटाटोप. पी.एल.नी पेटीवर हात टाकला की त्यांची पेटी पेटीच्या अंगानं वाजते. त्या वेळी मलाच राहवलं नाही. उठलो, सोटा सावरला, या गाण्याला ''अरे, तुम क्या बजाओगे, लाओ इधर तबला,'' म्हणत मी तबलजीच्या हातातला तबला-डग्गा माझ्या हातात घेतला. माझ्या त्या काळातला अवतार पाहण्यासारखा होता. पी.एल. जरा बिचकले. कुणीतरी त्यांच्या कानात कुजबुजलं, ''तबला मस्त वाजवतात, पण प्रकरण जरा तऱ्हेवाईक आहे हो! सांभाळा. उगीच बेरंग नको व्हायला.''
मी तबला मनासारखा जुळवत होतो. पी.एल.नी त्यांच्या नेहमीच्या तरकिबीने अन्् खुषमिजाज तबियतीने ''बुवा, आम्हाला सांभाळून घ्या'' म्हटलं.
''क्या बात है? जीओ मेरे भाई, हो जाओ शुरू-'' मी.
गाणं सुरू झालं. 'हसलं मनि चांदणे' हे राजा बढ्यांचं उडत्या चालीचं गीत पी.एल. गायला लागले. लग्गीचार माझीही खुलायला लागली. ती मैफल शेवटपर्यंत चढत गेली. मोठं ढंगदार गाणं पी. एल.नी ऐकवलं. गाणं संपल्यावर मीच त्यांना म्हणालो, ''यार, बहोत अच्छे गाते हो! सुरीले हो. क्या बात है, ऐसेही हमेशा गाया करो.''
त्या वेळी शिष्टाचार वगैरे माझ्यापासून जरा दूरच होते. पण चांगल्या गोष्टीला दिल खोलून दाद देणं यात गैर काहीच नव्हतं. आजदेखील आम्ही दोघं चांगलं काही ऐकायला मिळालं, भले तो बडा ख्याल असो, लडीहार जोडाची चीज असो, ठुमरी- दादरा- गझल- लावणी- नाटकातलं पद- सिनेमातलं गाणं- काहीही असो, खळखळून दाद देऊन मोकळे होतो. त्या दिवशीच्या त्या माझ्या बोलण्याचा पी.एल.नी गंभीरपणे विचार केला असता तर? नाही केला हेच बरं झालं. संगीताचं प्रेम त्यांनी तसंच टिकवलं. लिहिण्यावर जास्त भर दिला. फार चांगलं झालं. पुढे त्यांच्या कित्येक मैफली मी वाजवल्या. मी गाणारा आहे, हे पी.एल.ना आमच्या पहिल्या भेटीतच समजलं होतं. अन् गाण्याच्या प्रेमामुळेच पुढे माझी कित्येक गाणी पी.एल.नी त्यांच्या पेटीच्या साथीत रंगवली. अजूनही सवड मिळाली तर ते मजेत पेटी घेऊन बसतात.
पी.एल. नाटकांतून काम करायला लागले, तेदेखील संगीत नट म्हणून. 'भावबंधना'त प्रभाकर, 'शारदे'त कोदंड, 'राजसंन्यासा'त रायाजी या त्यांच्या भूमिका गाण्यामुळेसुद्धा मजा देऊन गेल्या. रांगणेकरांच्या नाटकांतून, चित्रपटांतून पी.एल. गायले. पुढे त्यांनी चित्रपटाचं क्षेत्र काही काळ निवडलं. त्या क्षेत्रातदेखील त्यांचा सब कुछ पी.एल., म्हणजे लेखक- कथालेखक- संवाद- गीतं अन् भूमिकादेखील हा विक्रम वाखाणण्यासारखा ठरला.
गाण्याची चाल लावायची म्हणजे सुरुवातीला ती एक महा-डोकेदुखी असते. काही केल्या मनासारखं चालीचं तोंड लागत नाही. हा अनुभव कित्येक रचनाकारांना आहे. लोकांना चटकन ताल धरायला लावील, गुणगुणायला लावील अशी चाल बांधणं हे खरंच महाजिकिरीचं काम आहे. पी.एल. आमच्या जातीचे आहेत असं जे मी म्हणतो, त्याचं कारणच हे आहे. मोठी माणसं, देवबाप्पा, देव पावला, दूधभात, गुळाचा गणपती या चित्रपटांतल्या पी.एल.च्या चाली अजूनदेखील लोकांच्या तोंडी आहेत. अस्सल मराठी माणूस आहे हा.
पी.एल.ची कुठलीही चाल ऐका, चटकन लक्षात येईल की, त्यांनी दिलेल्या चाली आपल्याच माजघरातल्या असल्यासारख्या आहेत, वाटतील. त्या चालींना खानदान आहे. आकाशवाणी दूरचित्रवाणीत काही काळ पी.एल. अडकले. त्या काळात त्यांनी ज्या संगीतिका पेश केल्या, त्यांतली 'अमृतवृक्ष' ही संगीतिका म्हणजे एकाहून एक सरस अशा बहारदार चालींची खैरात होती. दुसरी गाजलेली संगीतिका होती 'बिल्हण'. त्यातलं आजदेखील आवडणारं गाणं म्हणजे 'माझे जीवन गाणे'.
संगीतातलं जे जे म्हणून अभिजात आहे, त्याचे ते आशिक आहेत. तशी त्यांची श्रद्धास्थानं अनेक आहेत. काय बिघडलं त्यात? आम्ही गाणारे लोक क्वचितच स्वत:ला दाद देत असतो. आमच्या कायम माना मोडायच्या जागा वेगळ्याच असतात. पी.एल.च्या आणि माझ्या त्या जागेत बालगंधर्व, मा. दीनानाथ, बडे गुलाम अलीखां, बरकत अली, बेगम अख्तर, मल्लिकार्जुन मन्सूर, सौ. पद्मा गोखले, कुमार गंधर्व ही महाप्रचंड मंडळी आहेत. ही नावं केवढी मोठी आहेत हे सर्वांना माहीत आहे. यातल्या प्रत्येकाचा मजा वेगळा. तो आम्ही मनमुराद लुटतो.
गायला बसलं की कधीतरी त्यात स्वत:ला हरवून बसल्याची अवस्था जाणवायला लागते. काही ठरावीक सूर किंवा एखादं लहानसं स्वरवर्तुळ शरीराचा, मनाचा पूर्ण ताबा घेतं. लगन लागते त्या वर्तुळाची. सगळा आकृति-बंध डोळ्यांसमोर दिसत असतानादेखील तो पूर्ण करणं मुश्कील होऊन जातं. अशी अवस्था क्वचित अनुभवायला मिळते. गवयानं स्वत:ला दाद द्यायची तीच खरी जागा. पी.एल. गाण्यातले आहेत. त्यांचं गाणं लेखणीतून कोरलं जातं. त्यांच्याही बेचैनी वाढवणाऱ्या स्वत:ला दाद द्यायच्या जागा असतीलच.
पी.एल. आता वयाची साठी ओलांडताहेत. यार पी.एल., आम्ही तुमचे आशिक. तेव्हा भाईसाब, आम्ही दाद देत आलो. तुमचं समाधान नसेल झालं त्यानं. असेच एखाद्या बेचैनी वाढवणाऱ्या जागेची दाद स्वत:ला द्या. आम्ही 'बहोत अच्छे' म्हणायला टपलो आहोत.
- वसंतराव देशपांडे
(महाराष्ट्र टाइम्स, रविवार पुरवणी, ४ नोव्हेंबर १९७९)
हा लेख उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रणव उंडे ह्यांचे आभार.