Thursday, March 28, 2013

पुलंची विनोदबुद्धी - डॉ. शरद सालफळे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पुल देशपांडे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र सारस्वताला परमेश्‍वराने दिलेले वरदान आहे. पुल देशपांडे हे साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत वावरलेत. विपुल लेखन केले. नाटके लिहिलीत. एकपात्री प्रयोग केलेत. चित्रपटांची निर्मिती केली. भावगीतांना व गाण्यांना सुंदर चाली लावल्यात. पुल सुंदर अभिनय करीत, सुरेल पेटी वाजवीत. या सार्‍या गुणांवरही ताण म्हणजे पुल एक उत्तम रसिक होते. चांगल्या गाण्याला, चांगल्या संगीताला, चांगल्या लिहिण्याला आणि चांगल्या बोलण्याला पुल मनमोकळी दाद देत. असल्या बहुशृत कलाकारास महाराष्ट्र कधी विसरूच शकणार नाही. सार्‍या महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्राला पुल कायमचे स्मरणात रहातील, ते त्यांच्या विनोदबुद्धीमुळे. पुलंना विनोदाची निसर्गदत्त देणगी होती. पुल शाब्दिक कोट्या करीत, त्यावर सारा रसिकवर्ग खळाळून हसायचा.
 पुलंचे समाजमनाचे व समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे कमालीचे सूक्ष्मतम निरीक्षण असायचे. त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे, त्यांच्या स्वभावाचे, गुणदोषांचे निरीक्षण करायचे. त्याला विनोदाची मखर देऊन त्या व्यक्तीविषयीचे अभ्यासपूर्ण लेखन करायचे. त्यातूनच त्यांचे विनोदी लेखन झाले. पुलंचे लिखाण केवळ विनोदासाठी विनोद असे नसून, ते आपल्या लेखनातून समाजातील दोषांना उघडे करून दाखवीत. व्यक्तींचे स्वभाव त्यांच्या गुणदोषांसह वाचकांसमोर येत. त्यांच्या स्वभावाला पुल विनोदाचे पांघरूण घालीत, पण दोष मात्र उघडे पाडीत.
 पुलंच्या लिखाणातून जीवनाचे सुंदर दर्शन होते. वाचताना आपल्या लक्षात येते की, या गोष्टी, या घटना प्रत्यही आपल्या सभोवती घडत असतात. आपल्या लक्षात कशा येत नाहीत? साधी ‘म्हैस’ घ्या. बसने झालेल्या अपघातात म्हैस जखमी होते. इतरांना वैताग येतो, पण पुलंना त्यात ‘सुबक ठेंगणी’ दिसते. इंप्रेशन मारणार्‍या हिरोची पुढे पुढे करण्याची वृत्ती दिसते. पंचनामा करणारा शिपाई दिसतो.

 पुल आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण रसिकतेने जगले. छोट्या छोट्या व्यक्तींमध्ये त्यांना लिहिण्यासारखं सापडायचं. लेट झालेल्या गाडीने आपण वैतागतो. पुल तोच वेळ प्लॅटफॉर्मवरील विविध व्यक्ती, त्यांचे खाणेपिणे, इतरांवर खेकसून बोलणे इत्यादींचा अभ्यास करून त्याची नोंद करतात.

 पानवाल्याच्या पानाबरोबरच पुलंना त्याच्या लादीचं आणि स्मरणशक्तीचं कौतुक आहे. रावसाहेबांची शिवराळ भाषा व त्यामागची कळकळ केवळ पुलंनाच कळली. नामू परिटाचा शर्ट हा आपलाच आहे, हे कळल्यावर संतापून न जाता नामूही त्यात जास्त खुलून दिसतो, असे सांगून पुल आपली खेळकर वृत्ती दाखवितात. पाळीव प्राण्यांपैकी एकालाही न दुखविता त्या प्राण्यांच्या मालकाची अशी खिल्ली उडविली आहे की, ते प्राणीही खुष व्हावेत.

 आवाजाच्या दुनियेचा पुलंनी घेतलेला कानोसा मजेदारच आहे. दररोज दारावर वस्तीतून हिंडणारे विक्रेते यांचा पुलंचा अभ्यास कमालीचा आहे. शेंगावाला, भाजीवाला, कुल्फीवाला, कल्हईवाला या सर्वांच्या आवाजाचे पृथ:करण करून त्यांच्या पोटापाण्याला तेच आवाज कसे पोषक असतात, ते पुलंनी सप्रमाण दाखविले आहे.

 प्राण्यांच्या ध्वनिविश्‍वातली व्यंजनं शोधण्याचे महाकठीण काम पुलंनी केलं आहे. पुलंना बहुधा तमाम प्राणिमात्रांची भाषा समजत असावी. कुत्र्यांच्या सभेतलं भाषण माणसांना समजावं, असं त्यांनी भाषांतरित केलेलं आहे.

 स्वत:ला लेखक-कवी म्हणविणार्‍या तथाकथित साहित्यिकांची पुलंनी मस्त खिल्ली उडविली आहे. या सार्‍यांचीच नोंद मराठी वाङ्‌मयाच्या गाळीव इतिहासात आली आहे. चोरलेल्या कवितांचे व लेखांचे साहित्यिकाच्या परिचयासह या इतिहासात उल्लेख आहेत.

 पुलंच्या विनोदास कधी चावटपणा चाटून जातो, तर कधी ते वाचकांना वात्रट वाटतात. प्रसंगी त्या विनोदास कारुण्याची किनार असते. समाजातील विषमता, विसंगती त्यांच्या लेखनातून डोकावते. उपरोधाने लिहिलेले मान्यवरांवरील लेख त्यांना त्यांना कळले तर पुल त्यांना मानधन द्यायला तयार असायचे. गरिबीची आणि गरिबाची पुलंनी कधी खिल्ली उडविली नाही, पण अंधश्रद्धा आणि ढोंगीपणावर त्यांनी विनोदाचे आसूड उगारले. उगाच मोठेपणा मिरविणार्‍या उच्चभ्रू समाजातल्या बायांना आणि श्रीमंतीची ऐट दाखविणार्‍या स्त्रियांना त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीने बोचकारले आहे. ज्ञानेश्‍वरीचा उपयोग ती डोक्यावर घेऊन सरळ चालण्याच्या व्यायामप्रकारात मोडतो म्हणणार्‍या बाया किंवा अध्यात्मावरील भाषणे हे फॅशन शोचे एक माध्यम मानणार्‍या बाया पुलंना भेटल्या. ‘तुझे आहे तुजपाशी’ मधल्या अतिविशाल महिलांचं मंडळ आचार्यांना असल्याच संदर्भात भेटायला येतं. आचार्यांचा क्रोध आणि विशाल महिलांचे निर्विकार पण व्यवहारी बोलणे यांचा संवाद रंजक वाटतो.
 पुलंचे विडंबनकाव्य अत्र्यांच्या ‘झेंडूची फुले’ वर मात करते. मनाच्या श्‍लोकांची पुलंनी केलेली मनमानी मौजेची आहे. मुंबईकर जेव्हा ट्राम व बसने जायचे त्यावेळी बटाट्याच्या चाळीतले द्वारकानाथ गुप्ते म्हणतात, ‘मना सज्जना ट्राम पंथेची जावे

| तरी वाचतो एक आणा स्वभावे॥ बशीला कशाला उगा दोन आणे| उशिरा सदाचे हफीसांत जाणे॥ पुलंच्या कविताही मिस्कील. त्यात अगम्य दुर्बोध असे काहीच नसे. वाचताना खुदकन हसू यावे अशा वात्रटिका त्यांनी लिहिल्यात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ मध्ये ते लिहितात-‘गाळणे घेऊन गाळतो घाम चाळणे घेऊन चालतो दाम. चालीबाहेर दुकान माझे | विकतो तेथे हसणे ताजे| खुदकन् हसूचे पैसे आठ | खो खो खो चे पैसे साठ| हसविण्याचा करतो धंदा| कुणी निंदा कुणी वंदा॥

पुलंच्या विनोदावर खळाळून हसणारा मराठी वाचक श्रोता किंवा प्रेक्षक हा बहुशृत असला की, त्याला त्यांच्या विनोदाचे मर्म कळायचे. संदर्भ माहीत असलेत की विनोदाची खुमारी वाढते. दुसर्‍या बाजीरावाबद्दल गाळीव इतिहासात पुल लिहितात, दुसरे बाजीराव हे दानशूर होते. कुठल्याही कलावंतास ते १०० रुपये देत त्यावरून त्यांना दोन शून्य बाजीराव म्हणत. एक शून्य बाजीराव हे त्या काळात गाजलेले नाटक. त्याचा संदर्भ घेऊन ही शाब्दिक कोटी पुलंनी केली.

 पुल हे दानशूर लक्षाधीश होते, पण शाब्दिक कोट्यधीश होते. त्यांच्या कोट्या पराकोटीच्या असत. मर्ढेकरांचं काव्यवाचन करायला सुनीताबाई व पुल सातार्‍याला गेलेत. यजमानांनी खूप खाण्याचा आग्रह केला तेव्हा पुल म्हणाले, ‘अहो श्रोत्यांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत ढेकर नव्हेत.’ जुन्या काळातल्या अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांचा संमेलनात परिचय करून देताना पुल म्हणाले, ‘याचे एक आडनाव सोडले तर बाकीचे यांचे सारे खरेच आहे.’ सौ. सुनीताबाई पुलंना सारखा औषधाचा व खाण्यापिण्याचा सल्ला देत तेव्हा पुल त्यांना जाहीरपणे ‘उपदेश पांडे’ म्हणायचे.

 पुल देशपांडे यांच्या विनोदी लेखनाने मराठी साहित्यात विनोदाचा व हास्याचा प्रचंड धबधबा आणि दबदबाही निर्माण केला आहे. त्यातले केवळ तुषारही आपल्या अंगावर उडालेत तरी आनंद होतो. जे त्या धबधब्याखाली ओलचिंब होतात किंवा झाले ते धन्य होत.
 सर्व प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे माणसाला हसता येते. पुलंनी याबद्दल ब्रह्मदेवाचे आभार मानले आहेत. पुलंनी माणसाला हसायला शिकविले यासाठीच पुलंनी एवढ्या लेखन प्रपंचाचा अट्टहास केला. आपल्या अवतीभवती एवढे सौंदर्य असते, आनंद देणारी निसर्गाची किमयागारे असतात, पण आपण इतके करंटे की आपणास त्यांची ओळख नसते. पुलंनी अवतीभवतीचा सारा आनंद माणसास दाखवून ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ हे खरे करून दाखविले. पुलंची विनोदबुद्धी शाब्दिक कोट्या करविते. प्रसंगोपात घडलेल्या विनोदाचं दर्शन घडविते. व्यक्तीमधल्या स्वभावविशेषाने घडणारे विनोदाचे साक्षात्कार दाखविते. अवतीभवतीच्या सार्‍या घटनांचे आपणही साक्षीदार असतो, पण त्यातल्या विसंगती नजरेला आणून देतात ते पुल. त्यातून आनंद घ्यायला शिकवितात ते पुल. ते म्हणतात, दुसर्‍याला हसू नका दुसर्‍याला सोबत घेऊन हसा. सर्वांनी एकत्रपणे हसण्यासाठीच विनोदाची निर्मिती असते.

 पुलंचे विनोद निर्मळ असत. त्यात अश्‍लीलता नसायची. कधी त्याला सेन्सॉरची कात्री लावावी लागत नसे. शाळकरी मुलांनाही समजेल असे पुलंचे साधे लेखन असायचे. अशा मराठी जगतास सार्‍या चिंतांसह, सार्‍या अडचणींसह हसायला शिकविणारा हा पुरुषोत्तम मराठी सारस्वताचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलवतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

-- डॉ. शरद सालफळे
 ६/१२/२०१२ , तरुण भारत

7 प्रतिक्रिया:

Knowledge_Therapy said...

Very nicely written blog.
I felt very happy to read this kind of stuff after a very long period.

thank u for posting it.

Unknown said...

लेख आवडला, मात्र लिहिताना बरीच घाई झाल्यासारखे वाटले. वाक्यरचना काही ठिकाणी व्याकरणदृष्ट्या काहीशी विसंगत वाटली. साधा कुठला लेख असता तर विशेष दखल घेतलीही नसती मात्र पुलंवरचा लेख म्हणल्यावर ह्या सर्व गोष्टी लगेच खटकतात.

पुलंच्या सगळ्या साहित्यिक मुशाफिरीला एकाच लेखात सलाम करायचा प्रयत्न जरा तोकडा पडला असे वाटते. त्या ऐवजी शांतपणाने एका पेक्षा अधिक
लेख क्रमवार लिहून अधिक रोचक परिणाम साधला असता असे वाटते.

असो. माझे हे वैयक्तिक मत झाले.

Gargi said...

वाचून छान वाटलं खूप.. :)

kalpesh patil said...
This comment has been removed by the author.
kalpesh patil said...
This comment has been removed by the author.
kalpesh patil said...

वा !एवढच म्हणेन.

Anonymous said...

वा!