Thursday, December 18, 2014

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान - अनिल अवचट

"एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन."
- पु. ल. देशपांडे

एके दिवशी दुपारी एक तरूण मुलगा बेळगावहून आला. म्हणाला, "मी ड्रगपासून गेले चार दिवस दूर आहे. पण उद्या माझा इंटरव्ह्यू आहे. ही नोकरी लागली तर माझं सगळेच प्रश्न मिटतील..."

मी म्हणालो, "बरोबर आहे. पण यात मी काय करू शकतो?"

तो म्हणाला, "मला ड्रगची एक पुडी पाहिजे. ती मी खिशात ठेवीन. ओढणार नाही. पण ती नुस्ती खिशात असली तरी मला आधार वाटेल. तेवढी पुडी मला मिळवून द्या."

मी थक्क झालो. आजवर धीर येण्यासाठी खिशात अंगाऱ्याच्या पुड्या ठेवतात, हे ऐकले होते. म्हणालो, "मी आणि तुला पुडी मिळवून देऊ? आम्ही तुला यातनं बाहेर पडायला मदत करू. पण हे काय?"

"मला इथले ड्रग विकणारे माहीत नाहीत. बेळगावचे माहीत आहेत. म्हणून तुमच्याकडे आलो. तुम्ही लेखात लिहिलेत, तुमच्या पोलिसांच्या ओळखी आहेत. त्यांनी पकडलेल्या मालातली एखादी पुडी काढून द्यायला सांगा की... "

मी मनातनं संतापलो, पण संयमाने म्हणालो, "तुला ड्रगमधनं बाहेर पडायचं असलं तर ये. नसलं तर चालू लाग!"


तो गयावया करून गेला अखेर. मी आणि सुनंदा सुन्न होऊन बसलो. पाच-दहा मिनिटांत एक गोरे, साठीचे, टक्कल पडलेले गृहस्थ दारात उभे. त्यांना आत बसवले. म्हणाले, "मी अमुक अमुक. (ते तिथल्या प्रसिध्द श्रीमंतांपैकी एक.) मघाशी आलेला माझा मुलगा. त्याला खरोखरीच एक पुडी मिळवून द्या. एक बाप म्हणून हात जोडून विनंती करतो."



आमचा हा धक्क्यावर धक्के खायचा दिवस होता. सुनंदाने त्यांना ड्रग सोडताना जो त्रास होतो तो कमी करण्याची औषधे लिहून दिली आणि त्यांना निरोप दिला. पुढे मुक्तांगण सुरू झाल्यावर तो मुलगा पेशंट म्हणून आला. ‘तेव्हा’ त्याचा इंटरव्ह्यू वगैरे काही नव्हता. त्याला पुडी मिळत नव्हती, त्रास सुरू झालेला, म्हणून तो आला होता. नंतर त्या कुटुंबाशी काही वेळा संबंध आला. श्रीमंती अफाट होती. पण त्या घरात संस्कृतीच नव्हती. घरात एकमेकांकडे संवाद नव्हता. प्रत्येकाची दिशा भलतीकडेच. या निमित्ताने एक असं घर आतून पाहायला मिळालं. काय नव्हतं तिथं? बंगला, वस्तू, गाड्या... पण काय होतं तिथं? शिकलोय त्यांच्याकडून, की नुसत्या पैशात सुख-समाधान नसतं. ते व्यक्त होतं आपापसातल्या हृदय नात्यांमध्ये, आपलं मागे ठेवून इतरांसाठी करण्यामध्ये. घराघरांतल्या सर्वांसाठी अखंड झिजणाऱ्या कित्येक आया आठवल्या. त्यातनं ती समाधानी घरं उभी राहिलेली. हे जागोजाग दिसतंय, तरी लोक पैशामागे धावताहेत, प्रॉपर्टीसाठी एकमेकांवर खटले भरून आयुष्यभर लढताहेत... काय म्हणावे याला?

नंतर कधी तरी सुनीताबाईंचा फोन आला. नंतर पु.ल. ही बोलले. ते या लेखांनी खूप अस्वस्थ झाले होते. ‘भेटायला या दोघं’ असं म्हणाले. मग काय, आम्ही लगेच गेलोच त्यांच्या घरी. ते जवळच राहत. आमच्या दोघांचे त्यांच्याकडे बरेच जाणेयेणे असायचे. हक्काने काही बाहेरची कामेही सांगायचे. आम्ही त्यांची मुलेच जशी. मला दरवर्षी एकदा खास कामाला बोलावत. त्यांच्या ट्रस्टमधून ते काही छोट्या उपक्रमांना मदत करत. मी कुठून जाऊन आलो की त्या त्या वेळी एखाद्या कामाविषयी, ते करणाऱ्या माणसांविषयी सांगायचो. ते लक्षात ठेवून मला अधिक माहिती विचारून त्यांच्या गरजांची चर्चा करायचे. मग मी त्या व्यक्तींना बोलावून घ्यायचो. असे बऱ्याचदा.

या वेळी त्यांनी बोलावले आणि म्हटले, "या मुलांसाठी काही तरी करा तुम्ही. आत्ता एक लाख द्यायचे ठरवलेय, पण आम्ही पैशाला कमी पडू देणार नाही." हे दोघे तोपर्यंत चालू असलेल्या, स्थिरावलेल्या कामांना मदत करीत आलेले. इथे कामाचा पत्ताही नव्हता. तरी एक लाख? बाप रे, केवढी मोठी रक्कम! काय करू यात? प्रचारासाठी पुस्तिका काढता येतील. हजारो हँडबिले छापू. किंवा एखादा फोटोंचा स्लाइड शो करता येईल. अधिक पैसे जमवून अर्ध्या तासाची डॉक्युमेंटरी? तेवढ्यात सुनंदा म्हणाली, "या लोकांसाठी आपण व्यसनमुक्ती केंद्र काढू." मी थक्क झालो. एवढा मोठा घाट घालायचा? बाप रे! पण पु.ल., सुनीताबाईंनी ती कल्पना उचलून धरली. परत येताना मी सुनंदाला म्हटलं, "अगं, असं का म्हणालीस तू? आपल्याला झेपणार आहे का हे?"

"झेपेल की."

"पण असं एकही केंद्र आपण पाहिलेलं नाही. त्या शास्त्रामधलं कसलं ट्रेनिंग घेतलेलं नाही..."
तशी सुनंदा सायकियाट्रिस्ट असल्याने मेंटल हॉस्पिटलमध्ये चरस-गांजामुळे वेडे झालेले किंवा दारूमुळे अल्कोहोलिक सायकोसिसचे पेशंट तिने पाहिलेले होते. पण ते काही झाले तरी मेंटल पेशंट होते. इथं तसं नव्हतं. ते बाकीच्या दृष्टीने नॉर्मल होते. त्यांना कसं हाताळायचं?

त्यावर सुनंदा जे म्हणाली त्यानं मला तिचं वेगळंच दर्शन झालं. ती म्हणाली, "त्यात काय? निदान या पेशंटला ठेवायला जागा तर होईल! आणि नंतर शिकू आपण पेशंटकडनंच." तिच्यात ज्ञानाचा, डिग्रीचा कसलाही अहंकार नव्हता. ‘आय नो एव्हरीथिंग’ ही बहुतेक उच्चशिक्षितांची वृत्ती तिच्यात औषधालाही नव्हती. कुणाकडनं शिकायचं, तर पेशंटकडनं? त्या दारूड्या, गर्दुल्ल्यांकडनं?

पण सुनंदा खरेच त्यांच्याकडून शिकत गेली. ती विचारायची पेशंटला, की तुझ्यासाठी काय झालं तर तू बरा होशील. नेहमी पेशंटकडून ती विचार करायला सुरुवात करायची. त्यामुळे पेशंट तिच्याशी जोडलेच जायचे. आणि हे पेशंटकडून शिकणं आमचं आजतागायत चालू आहे. हजारो पेशंट पाहिलेत तरी. अशी ही सुनंदा!

केंद्र काढायची कल्पना पुलं-सुनीताबाईंनी लगेच उचलून धरली. सुनंदा त्या वेळी मेटंलमध्ये सीनियर सायकियाट्रिस्ट होती. तिचे अधीक्षक डॉ. इक्बाल हजच्या यात्रेसाठी सहा महिन्यांच्या रजेवर गेले होते. तेव्हा त्यांचा चार्ज सुनंदाकडे असायचा. (सुनंदाला अधीक्षक होण्याबद्दल अनेकदा विचारले होते; पण तिला क्लिनिकल कामाची आवड असल्याने तिने नकार दिला होता.) अलीकडच्या काळात दोन मोठ्या इमारती ‘मेंटल’च्या आवारात बांधल्या गेल्या होत्या. एकीमध्ये सर्व ऑफिसेस हलली, पण दुसरी तशीच काही वर्षे रिकामी पडून होती. तळमजल्यावर काही पेशंट होते. ते पण सुनंदाने दुसरीकडे हलवले आणि या कामासाठी या इमारतीची सरकारकडे मागणी केली. सरकारने मेंटल हॉस्पिटलच्या आवारात मेंटल हॉस्पिटलतर्फे हे केंद्र चालवावे, अशी त्या प्रयत्‍नांची दिशा होती. सरकार त्या वेळी आर्थिक अडचणीत असावे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी झीरो बजेट मांडलेले होते. म्हणजे नेहमीचा खर्च चालू राहणार; पण नव्या योजना, उपक्रम यावर जशी बंदीच. कुठेही काहीही प्रयत्‍न करायचा, तर मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा परवलीचा शब्द होता, झीरो बजेट. म्हणजे पुढे रस्ता बंद. अशा परिस्थितीत सरकारकडनं नकार अपेक्षित होता. पण पु. लं.चं नाव, सुनंदाच्या डॉ. संभाजी देशमुख या सहकाऱ्याने मुंबईला जाऊन केलेले निकराचे प्रयत्‍न यामुळे त्या खडकाला हळूहळू चिरा पडू लागल्या. संभाजी हा अत्यंत सरळमार्गी, सालस, शांत डॉक्टर. बाकी सगळे पांगले तरी हा तिच्या मागे ठाम उभा होता. आता तोही जगात नाही. मग सरकारने असा तडजोडीचा मसुदा पाठवला, की जागा वापरा, पण नोकरवर्ग तुमचा. त्यांचा पगारही तुम्ही करायचा. त्यांनी नंतरही सरकारी नोकरीवर हक्क सांगता कामा नये. वगैरे वगैरे.

परत प्रश्न आला : पु.लं.ची देणगी स्वीकारायला आमची संस्था कुठेय? ते कोणाला पैसे देणार? आणि तिथे पैसे खर्च कोण करणार? पु.लं.चे ‘पु ल देशपांडे प्रतिष्ठान’ होते. पण त्यांचे काम म्हणजे योग्य त्या संस्थेला मदत करायची आणि नामानिराळे व्हायचे. देणगी देताना ते खूप कसोशीने माहिती घेत, पण नंतर त्यांची अजिबात ढवळाढवळ नसे. ही त्यांनी घालून ठेवलेली मर्यादा योग्यच होती. हा एक चांगला, हितचिंतकाचा रोल होता. पण आमच्या बाबतीत ते जरा जास्तच गुंतले होते. सुनीताबाई म्हणाल्या, "तुम्ही संस्था स्थापन करण्याची प्रोसेस सुरू करा. तोपर्यंत तुम्ही नेमाल त्या माणसांचे पगार, इतर व्यवहार आमच्या ट्रस्टतर्फे करू."

हे ऐकून मी चकितच झालो. त्यांच्या संस्थेच्या मार्फत? किती कटकट होईल त्यांच्या डोक्याला! पण त्यांनी पत्करले. पुढे मुक्तांगणचा सेवकवर्ग वाढत गेला. त्यांचे पगाराचे चेक पु.ल. फाउंडेशनमार्फत दिले जायचे. ती नावे, त्या रकमा लिहून सुनीताबाई तयार ठेवायच्या. मग त्या दोघांच्या सह्या व्हायच्या. दर महिन्याला हा सोपस्कार.

सुनंदाने ती बिल्डींग साफ करून घेतली. मी अ‍ॅल्युमिनियमची जाड, पिवळ्या रंगाची मुक्तांगणाची अक्षरे करून घेतली. संडास, ड्रेनेज लाइन्स... सगळेच साफ करून घ्यावे लागले. सुनंदाला मेंटलमधला कर्मचारीवर्ग फार मानत असे. इलेक्ट्रिशियनने सडलेले वायरिंग काढून नवे बसवले. काही कर्मचारी आले आणि त्यांनी जमेल तिथे, जमेल तसा सरकारी रंग लावून टाकला. फरशा इतक्या काळ्या झाल्या होत्या, की त्यांनी अ‍ॅसिड टाकून धुतल्या तेव्हा त्यांचा मूळ रंग हळूहळू दिसू लागला. तिच्या आवडत्या नर्सेस तिने इकडे घेतल्या. त्यांनी औषधांची खोली सजवली, तपासणीची खोली तयार केली. सुनंदाच्या ऑफिसवर हॉस्पिटलच्या पेंटरने पाटी करून लावली. हे सगळे कर्मचारी इतर डॉक्टरांच्या, अधिकाऱ्यांच्या मते ‘नाठाळ’ होते, पण सुनंदाच्या हाताखाली कसे ते धावून धावून काम करीत.

सुनंदाला मेंटलमधल्या गेल्या पंधरा वर्षांचा अनुभव होता. जसा पेशंटबाबतचा क्लिनिकल अनुभव होता, तसाच तिला ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’चाही अनुभव होता. तिने पेशंट आल्या आल्या नोंदवतात त्या रजिस्टरपासून ते केसपेपरपर्यंत, औषधांचे स्टॉक रजिस्टर, रोज किती गोळ्या कुणाकुणाला दिल्या याची हिशोब वही, मेंटलमधून किती कॉट-गाद्या-चादरी-फर्निचर आणले त्याचे डेड स्टॉक रजिस्टर... अशी बहुविध तयारी केली. सरकारी यंत्रणेला आपण किती गलथान समजत असलो, तरी प्रत्येक गोळीचा, प्रत्येक उशीच्या अभ्याचाही हिशोब ठेवणारी ती एक अजब यंत्रणा आहे, हे या निमित्ताने समजले. त्यात गैरव्यवहार करणारे असोत, हलगर्जीपणा करणारे असोत; पण त्या सिस्टीमच्या मला दाद द्यावीच लागली.

पु.लं.च्याकडे त्या काळात जवळपास रोज बैठका होत. या केंद्राला नाव काय द्यायचे? सुनीताबाईंची सूचना होती, की ‘तुमच्या मनात दुसरे काही नाव नसले, तर आम्ही ज्या उपक्रमांना देणगी दिली तिथे मुक्तांगण हे नाव सुचवतो. भाईंच ते आवडतं नाव आहे.’ आम्ही लगेच ते उचलून धरले. मग पु. ल. म्हणाले, "मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ असं नाव दिलं तर?" वा: वा: म्हणून ते नाव नक्की झाले.

सर्व तयारी झाल्यावर उद्‍घाटनाचा दिवस ठरवला. २९ ऑगस्ट १९८६. डॉ. ह. वि. सरदेसाईंच्या हस्ते उद्‍घाटन करायचे ठरवले. पु.लं.च्या नावामुळे, फोनवर सगळेजण होकारच देत. बाबा आमटे त्या दिवशी पुण्यात होते. ते तर आपण होऊन या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला आले. असा पाहुणा प्रयत्‍न करूनही मिळाला नसता, तो आम्हाला आपोआप मिळाला!

या सगळ्या गडबडीत मी मात्र आतून जरा हादरलोच होतो. माझी मूलभूत शंका अशी, की आपल्या या केंद्रात कोण येणार? त्यांनी, म्हणजे अशा व्यसनी माणसांनी आपल्याकडे का यावे? एक तर अशी किती माणसे व्यसने सोडायला तयार होतील? आनंदकडे असा उपक्रम पाहिला होता. पण तो मुंबईच्या के.ई.एम.सारख्या मोठ्या, जुन्या हॉस्पिटलच्या भाग होता. त्यातही त्यांना सायकियाट्री वॉर्डमधली जेमतेम साताठ बेड्‍स दिलेली. मुंबईत माहिती घेताना बऱ्याचजणांकडून कळले, की जे. जे. हॉस्पिटलने असे केंद्र सुरु केले आहे. ठाणे मेंटलमध्येही अशा केंद्राचे उद्‍घाटन सुनील दत्त यांच्या हस्ते झाले. पण ही दोन्ही केंद्रे बंद पडली. जे. जे. मध्ये दारू सोडण्यासाठी दाखल झालेल्या पेशंटना तिथले वॉर्डबॉईजच दारू पुरवायचे. कुठल्या मार्गाने? तर शहाळ्यात दारू भरून आणून द्यायचे आणि पेशंट डॉक्टरसमोर स्ट्रॉने दारू पीत असत! ठाण्यालासुध्दा असले घोटाळे झाले. जे ऐकत होतो त्यावरून निष्कर्ष एकच होता, या क्षेत्रातल्या संस्थांच्या मृत्युदर फार म्हणजे फारच मोठा आहे. थोडक्यात, जगलेलं पोर समोर कोणी दिसतच नव्हतं. बंद पडण्याचं उघड कारण म्हणजे पेशंट अ‍ॅडमिट असताना त्यांना दारू किंवा ड्रग्ज मिळणे हे. जी केंद्रे बंद पडली ती सरकारी हॉस्पिटलमध्ये होती. तिथल्या स्टाफविषयी कोण गॅरंटी घेणार? त्यांच्यातच व्यसन इतके बोकाळलेले, की दारूच्या बदल्यात कुठलेही काम करायला बरेचजण तयार.

मग इथे तरी काय होतं? मेंटलचा स्टाफ कही वेगळा नव्हता. तो याच भ्रष्ट समाजाचा भाग होता. मग कसं चालणार, कसं टिकणार हे केंद्र? आपल्या यंत्रणेला एक माणूस जरी अप्रामाणिक असेल तर सगळा प्रोग्रॅम कोसळतोच. इथे ‘ऑल ऑर नन लॉ’असतो. इथे एक तर संस्था चांगली चालेल, नाही तर पूर्ण बंद पडेल. मधली अवस्था नाही. सुनंदाने घाट घातलाय खरा, पण ती यतून कशी वाट काढणार? मी तिचा निष्ठावंत सहायक. जरी केंद्राची सुरूवात व्हायला माझे लिखाण कारणीभूत झालेले असले, तरी हे केंद्र म्हणजे पूर्णपणे तिचेच अपत्य होते. तोपर्यंत मी अनेक प्रश्नांवर लिहिले होते, पण त्या प्रश्नांसाठी कुठल्या कामात मी कधी स्वत:ला गुंतवून घेतले नाही. यावर काहीजण टीकाही करीत. मी त्यांना सांगायचो, तो माझा स्वभाव नाही. पण इथे माझ्या लिखाणानंतर सुनंदामुळे मी या कामातही गुंतत गेलो. यापूर्वी मी युक्रांदमध्ये होतो. बाबा आढावांबरोबर महात्मा फुले प्रतिष्ठानमध्ये होतो. पण तिथे इतर अनेक जण होते, त्यातला मी एक होतो. तिथेही मी फार गुंतायचो नाही. आंदोलनात इतरांबरोबर भाग घ्यायचो. तुरंगावासही पत्करायचो. पण लोक म्हणायचे तसे एका जागी जेठा मारून बसून काम केले नव्हते. आणि इथे तर सुनंदामुळे ते सगळे करणे भागच होते. पण तेवढ्यातही माझा असा हिशोब होत, की सुरवातीला माझी मदत लागेल, पुढे मला त्यातून बाहेर पडता येईल. त्याकाळात आमच्या कुठल्याशा वाढदिवसाला मी सिंहगडावर सुनंदाला एक ‘प्रेझेंट’ दिले. म्हणालो, "चल, तुझ्या या कामाला माझी दोन वर्षे देतो. या काळात मी माझे असे काही काम करणार नाही. तुला सर्व कामांना उपलब्ध राहीन." ती दोन वर्षे कधीच संपली. त्यानंतर तेवीस वर्षे लोटलीत. मला अजून त्यातून बाहेर पडता आले नाही.

कार्यक्रमाच्या दिवशी ‘सकाळ’मध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला. ‘मुक्तांगण’च्या इमारतीच्या फोटोसह. त्यात असे असे केंद्र सुरू होणार आहे, वगैरे काही लिहिले असावे. त्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाची माहितीही दिली असावी. माझ्या मते शहरापासून इतक्या लांब या सभेला कितीसे लोक जमतील? पण तिथेही धक्काच. आमच्या मेंटलचा ‘रिक्रिएशन हॉल’ भरूनच गेला. बाबा आमटे स्टेजकडे तोंड करून एका खाटेवर पहुडले होते. सस्मित नजरेने कार्यक्रम पाहत, ऐकत होते. आनंदचे सुरेख सभा नियोजन आठवते. सभेत कोण काय बोलले ते आठवत नाही, पण सुनंदा अतिशय नेटकी आणि छान बोलली, ती कधी सभांमध्ये भाषण करीत नसे. तसा तो भाग माझावर सोपवलेला असे. पुढे मुक्तांगणची वाढ झाल्यावर तिने स्टेजवर जाणे सोडलेच. आमच्या संस्थेच्या वाढदिवस कार्यक्रमात, किंवा २६ जूनच्या आंतरराष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमात ती मलाच स्टेजवर बसायला भाग पाडायची, आणि मला ती वरून समोर प्रेक्षकांमध्ये-म्हणजे आमचे पेशंट, त्यांच्या बायकांमध्ये बसलेली दिसतात. त्या पहिल्या कार्यक्रमात मात्र ती छान बोलली. बहुधा खादीचा गुरुशर्ट, सलवार आणि वर जाकीट घातलेलं असावं. पण नक्की आठवत नाही. या स्मृतीची गंमत बघा... त्याआधीचे, नंतरचे प्रसंग मला जसेच्या तसे आठवतात, पण टेपचा तेवढाच भाग खराब व्हावा? नंतर दुसऱ्या दिवशी पु.लं.चे मित्र नंदा नारळकर यांनी पुलंना म्हटलेलं लख्ख आठवतंय, की ‘काय ती मुलगी छान बोलली! केवढा आत्मविश्वास होता तिच्या बोलण्यात.’

पु.ल.- सुनीताबाईंनी तेव्हा आमच्यावर धरलेली छत्री नंतर ही बराच काळ तशीच धरून ठेवलेली होती. या छत्रीचे वैशिष्ट्य असे की, त्यातून मायेच्या, प्रेमाच्या धारा थेट आमच्यावर पडत असत. नंतर सरकारने हे केंद्र ‘टेक-ओव्हर’ करावे, पण त्याला यश येत नव्हते. कारण सरकारचे ‘झीरो बजेट’. (त्यात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असावेत. पु.लं.ना ते ओळखत होते की नाही याची शंका.) दर महिन्याला दहा-पंधराजणांच्या पगाराचे चेक्स सुनीताबाई सुनंदाने दिलेल्या यादीप्रमाणे लिहून तयार ठेवत. मग पु.ल. त्यावर सह्या करीत बसत. त्यांना हा त्रास द्यावा लागतो याचे वाईट वाटे; पण करणार काय? अखेरीस त्यांनी दिलेली एक लाखाची देणगी संपत आली. आम्ही चिंताग्रस्त झालो. पण पु.लं.नी सांगितले, "जिवात जीव असेतोवर हे केंद्र मी बंद पडू देणार नाही. तुम्ही निर्धास्तपणे काम करा." काय या शब्दांनी आधार वाटला असेल आमच्या सगळ्या टीमला! तरीही मी प्रयत्न करत राहिलो. आणि केंद्र सरकारची आम्हाला ग्रँट मिळाली. ती आनंदाची बातमी सांगायला पु.लं.कडे गेलो. तोवर त्यांनी आणखी सुमारे अडीच लाख रुपये दिलेले होते. तरीही ते म्हणाले, "मला आता जाता जाता मुक्तांगणसाठी काही तरी द्यायचेय. काय देऊ?" सुनंदाने सांगितले, "मुलांना मोकळ्या वेळेत वाचनाची आवड लावायचीय." पु.ल. म्हणाले, "लायब्ररीची कपाटं मी देतो." शेजारी बसलेल्या नंदा नारळकरांनी पुस्तक खरेदीसाठी पाच हजार रुपये दिले. कपाटाचं बिल पस्तीस हजार रुपये झालं, ते पु.ल.-सुनीताबाईंनी दिलं. तरीही ऋणानुबंध राहिलेच.

२९ ऑगस्टच्या वर्धापनदिनाला ते आवर्जून यायचे. पेशंट मित्रांचे, कुटुंबीयांचे अनुभव ऐकताना ते गलबलून जायचे. एका पेशंटची मुलगी बोलताना तर त्यांचे डोळे डबडबले होते. परत येताना गाडीत म्हणत होते, "त्या पोरांनी काय पाप केलंय रे, त्यांना असं लहानपण मिळावं?" एका पेशंटचे सासरे सभेत उठून म्हणाले, "पु.ल स्वत: पद्मश्री आहेत. त्यांनी आमच्या मॅडमना पद्मश्री मिळवून द्यावी." त्यावर पु.ल. म्हणाले, "हजारो माणसांनी तिला आई मानलंय. आईपेक्षा जगात कोणती पदवी मोठी आहे?" असे काही क्षण...

पुस्तक - ’मुक्‍तांगणची गोष्ट’
लेखक - अनिल अवचट
मुळ स्त्रोत - www.pldeshpande.com/social_worker_muktangan.aspx

Wednesday, December 17, 2014

मला भावलेले 'पु.ल.'

मी साधारण ५-६ वी मध्ये असेन, तेव्हा माझ्या हातात एक निबंध-लेखनाचं (इयत्ता १० वी च्या मुलांचं ) पुस्तक आलं.सहज वाचताना मला त्यात एक 'माझा आवडता लेखक' असा निबंध सापडला. त्यात एक ओळ होती 'विनोदाला कारुण्याची झालर असणारा लेखक' ,ती ओळ होती उभ्या महाराष्ट्राच्या हृदय-सिंहासनावर राज्य करणारे विनोदसम्राट,साहित्यिक,गीत-संगीतकार,नाटककार,नट … विशेषणं कमी पडतील असे 'पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे' यांच्याविषयी. तेव्हा मला त्याचा फारसा अर्थ कळला नव्हता ,पण ती ओळ मात्र माझ्या चांगलीच लक्षात राहिली.

त्या नंतर काही वर्षांनी हळुहळू जेंव्हा पु.लंनी लिहिलेली 'व्यक्ती आणि वल्ली', 'गणगोत' यांसारखी पुस्तकं वाचली, 'असा मी असामी' वाचलं , तेंव्हा ती ओळ मला पुन्हा आठवली आणि त्याचा अर्थ उलगडू लागला. खरतर मी पु.लं .च सगळ्या प्रकारचं साहित्य वाचलेलं नाही . (ही खरतर माझी घोडचूक आहे) पण जे काही वाचलं त्यावर मनापासून प्रेम केलं. मला नेहमी खंत वाटते की मला कळत्या वयात पु.लं. ना बघता-ऐकता आलं नाही.मला त्यांच्या भाषणांच्या आणि व्यक्तिचित्रांच्या ध्वनिफिती ऐकताना, पुस्तक वाचताना नेहमी असं वाटतं की अरे या माणसाची निरीक्षण शक्ती आणि कल्पना शक्ती किती जबरदस्त असली पाहिजे, कारण समाजात दिसणारे नमुने (त्यात मीही आलोच) आणि त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन त्यांनी उभी केलेली पात्रं (आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला गोवून) ही इतकी अप्रतिम आणि जिवंत वाटतात की सारखं आपल्याला वाटतं राहतं की आपणही त्या लोकांना पु.लं. सोबत भेटलोय की काय!!!

रत्नागिरीतला कडवट वाणीचा पण आतून प्रेमळ असणारा 'अंतू बर्वा', तोंडावर शिव्या देणारे पण मित्रांसाठी काय वाट्टेल ते करायला तयार असणारे, संगीत-नाटकाच्या उद्धारासाठी खपणारे दिलदार 'रावसाहेब', शिवाजी महाराज-रामदास स्वामी ही मंडळी आपल्या पंक्तीला जेवत असल्याच्या थाटात त्यांच्या, गोष्टी सांगणारे 'हरितात्या', कधीही पुस्तकानुरूप (नुसतं पुस्तकी) न शिकवता विद्यार्थ्यांच्या तळमळीने- आपुलकीने शिकवणारे 'चितळे मास्तर ', लग्न समारंभात स्वयं-सेवाकासारखी धावाधाव करणारा अष्टपैलू 'नारायण', पुस्तकांशी वेड्यासारखा एकनिष्ठ झालेला 'सखाराम गटणे', रेल्वे प्रवासात जगण्यातली गम्मत सांगून जाणारे 'पेस्तन काका '(१०० % ), एकसुद्धा पुस्तक न वाचता बिनधास्त त्यावर परीक्षणं लिहिणारा टीकाकार 'लखू रिसबूड', संस्थाही स्थापन होण्याआधी त्यांचं सेक्रेटरी पद हाती घेणारा' बापू काणे'. . .

ही सगळी मंडळी एक बढकर एक विनोदी पण त्यात नुसता विनोद नसतो, कारण पु.लं च्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही मनुष्याला फक्त एकच बाजू कधीच नसते, त्याची एक दुसरी आपल्याला माहित नसलेली दुखरी बाजूही असतेच असते आणि हीच ती पु.लं. च्या विनोदाला लाभलेली 'कारुण्याची झालर'. जी आपल्या मनाचा ठाव घेते. पु.लंं. ना नुसताच हशा-धमाल करायची नसते , त्यांना प्रत्येक वेळी त्यातून काही तरी सांगायचं असतं. या सगळ्या पात्रांमध्ये असलेला एक दुखरा कोपरा , त्या द्वारे ते आपल्या काळजाला हात घालतात आणि अचानक पोट धरून हसत असताना आपले डोळे पाणावतात …या पेक्षा सामार्थ्याशाली दुसरं काही असूच शकत नाही !! हेच खरं यश आहे.

त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेला अजून एक अविष्कार म्हणजे 'बटाट्याची चाळ' आणि वाऱ्यावरची वरात'. शिवाय 'असा मी असामी', 'काही नवे ग्रहयोग', 'मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर', 'मी आणि माझा शत्रू पक्ष' ,'माझे पौष्टिक जीवन',ते चौकोनी कुटुंब', म्हैस,पानवाला, बिगरी ते मॅट्रीक, यांसारखे चौफेर हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे लेख आणि मग त्यांचंच खुमासदार पद्धतीने केलेलं वाचन या मधून पु.ल. त्यांच्या सगळ्या पात्रांशी पूर्णपणे एकरूप होऊन जातात पण त्याचवेळी त्यांनी त्यात केलेली त्या त्या काळातील दाखल्यांची गुंफण हे केवळ अद्वितीय आहे.

त्यांनी जवळ जवळ ५०-६० वर्षांपूर्वी लिहिलेली हि व्यक्तिचित्र आजही तितकीच ताजी आणि हवीहवीशी वाटतात की माझ्यासारख्या कॉम्पुटर-स्मार्टफोन च्या जमान्यातल्या एका तरुण मुलाचा mobile पु.लं.च्या audio clips नी अभिमानाने भरावा इतकं कालातीत लिखाण त्यांनी केलय. 'अपूर्वाई' आणि 'पूर्वरंग' ही प्रवास वर्णनात्मक पुस्तकं कोणालाही आपल्या बुकशेल्फ वर असावीत अशी आहेत.शिवय त्यांनी कित्येक नाटकं लिहिली आहेत. त्या पैकी 'ती फुलराणी' हे नाटक मी पाहिलंय. अविनाश नारकर आणि अमृता सुभाष यांचा अप्रतिम अभिनय त्यात आहे .

खरतर मी पु.लं. बद्दल लिहिणं म्हणजे 'काजव्याने सुर्याविषयी बोलण्यासारखं आहे '(अर्थात सखाराम गटणेचे हे शब्द मला म्हणावेसे वाटले तर त्यात नवल नाही ). पण पु.लं. विषयी वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी इतकं तरी लिहिण्याचं धाडस मी केलं. आज पु.लं आपल्यात नाहीत पण त्यांनी अजरामर केलेली ही सगळी पात्रं आपली नेहमीच सोबत करतील आणि सतत त्यांची आठवण करून देतील यात तिळमात्रही शंका नाही.

असो या महाकाय-चतुरस्त्र माणसाविषयी कितीही लिहिलं तरी कमीच!! त्यामुळे आता थांबलेलंच बरं आणि त्यांनी लिहून ठेवलेलं वाचायला वाचायला प्रारंभ करणं हे अधिक उत्तम.

- ओंकार करंदीकर
मुळ स्त्रोत -- http://mantaranga.blogspot.in/2014/04/blog-post_29.html

Tuesday, December 16, 2014

पु.ल. तुम्ही स्वतःला कोण समजता?

सर्वाधिक आवडते लेखक किंवा लाडके व्यक्तीमत्व किंवा अनेकांचे दैवत! नांव आठवले की त्या नावाने लिहिले गेलेले सर्व काही क्षणात आठवते आणि माणूस असेल तेथे खुदकन किंवा फस्सकन हासतो. त्या हासण्याचे समर्थन देता येत नसल्यामुळे बावरून इकडेतिकडे पाहतो. हे अनुभव महाराष्ट्राने गेले काही दशके वारंवार घेतले. विनोदाला साहित्यात ठाम स्थान देणे ही बाब जवळपास अशक्यकोटीतील, पण ती क्षुल्लक वाटावी असे प्रभुत्व. शब्दाशब्दातून ज्ञान, वाचन, अनुभव, निरिक्षणशक्ती, मिश्कीलपणा आणि अनेकदा होणारा गलबलवणारा शेवट यांचे मिश्रण सातत्याने दिसून येते. रूढ असा साहित्यप्रकार हाताळण्याचा आव न आणता व्यक्तीचित्रण, प्रवासवर्णन, सौम्य व मिश्कील टीका यामार्गे नवीन 'ट्रेंड' सेट करणे. कर्मठ समीक्षकी वर्चस्वाला हास्याच्या धबधब्यात वाहून नेणे. जवळपास सहा ते दहा दशकांपूर्वीची मराठी संस्कृती चितारणे आणि त्या चित्रदर्शी लेखनातून विनोदाच्या परिभाषा अधिक व्यापक आणि अधिक 'सभ्य' व 'सुसंस्कृत' करत पुढच्या काही पिढ्यांना विनोदी लेखनाची ओढ लावणे.

पु.ल. अतिशय गंभीर लेखन करायचे हे मत वरकरणी हास्यास्पद वाटू शकेल. पण लयीपासून जाणीवपूर्वक फारकत घेत अगम्यतेचा पोषाख धारण करणारी कविता डोक्यावर घेतली जात होती तेव्हा या माणसाने केवळ एका व्यक्तीमध्ये किती पैलू असतात हे दाखवत ताज्यातवान्या अभिरुचीची एक नवीन पिढी निर्माण केली. दैनंदिन जीवनात सामान्य माणसे किती असामान्य भावविश्वात जगत असतात हे प्रभावीरीत्या रेखाटणे ही कला देणगी या स्वरूपातच देवाकडून मिळाली तर मिळेल. घोकमपट्टीतून जमणारी ती बाब नव्हे. ब्रिलिअन्स, जिनियस, टॅलेन्ट हे शब्द अशा लेखकांसाठी सढळपणे वापरले जात नाहीत. हे दुर्दैव बदलण्याची क्षमता त्यांच्यात होती.

पु.ल अ‍ॅट अ ग्लान्स या स्वरुपाच्या या आढाव्यात गुणविशेष नोंदवणे हा उद्धटपणा ठरेल, पण भरभरून बोलावेसे वाटत आहे. औदार्याच्या भावनेने बोलू द्यावेत.
.................................

१. चेहर्‍या व मुखवट्यातील अंतर -
माणूस प्रत्यक्षात जे असतो आणि स्वतःला जे समजतो त्यात असलेले अंतर हा पुलंच्या लेखनाचा मोठ्या अंशाने आधार होता. व्यक्ती वल्ली यात ते ठळकपणे दिसते तसे चाळीतही दिसते. हे अंतर पुलंनी मिश्कीलपणे पाहिले. एखादा साधा महानगरपालिकेचा कर्मचारी भारताची कुंडली मांडतो ही सामान्य माणसाला बोचरी टीका करण्यास पात्र असलेली बाब वाटली असती. पण पुलंनी त्या अंतराकडे गंमतीने पाहायला शिकवले. त्या व्यक्तीच्या अभिमानाची (किंवा दुराभिमानाची) सौम्य खिल्ली उडवत त्या व्यक्तीच्या सामान्यत्वाला मात्र उदंड गौरवले. त्या व्यक्तीच्या सामान्यत्वाच्या उल्लेखाने वाचकांना रडवले. विनोद म्हणजे असभ्यता, टवाळी व टीका हे समीकरण येथेच मोठ्या प्रमाणावर बदलले गेले. अशी उदाहरणे तर कित्येक आहेत, पण बाबा बर्वे यांची वासरी हे सहज आठवणारे आणि प्रभावी उदाहरण. माणूस स्वतःला जे समजतो व प्रत्यक्षात जे असतो त्यातील अंतरावर पुलंचे किमान अर्धे लेखन तरी विसंबून असावे असे वाटते. बराचसा विनोदही त्यावरच झालेला दिसतो. गुंड व तुरुंगात गेलेला मित्र आज 'प्याकार्ड' गाडीतून हिंडतो आणि तो घरातून गेल्यानंतर आई पुन्हा पावसात भिजलेल्या साखरेवरून आपल्याला बोलते येथे सत्याचरण कितपत शक्य आहे असा सवाल प्रत्यक्षात न विचारता वाचकावर सोपवले जाते. स्टनिंग!

२. निर्विवाद 'अवादग्रस्त' लेखन -
ज्या उल्लेखांमुळे आज वाद आणि मारामार्‍या होऊ शकतात त्यापैकीच्या विषयांबाबत पुलंनी अशा काही कौशल्याने लेखन केले की वादाची भीती तर सोडाच पण निखळ हसू यावे. शिवाजी महाराज्, संभाजी महाराज, गांधीजी, विनोबा, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, टिळक, आगरकर यातले कोणीही त्यांच्या लेखणीतून सुटले नाही. पण त्या उल्लेखांचे निखळ हसूच का आले तर त्यातही पुन्हा सामान्य माणसाला 'या सर्व मोठ्या नावांच्या पूजनाने मला काय मिळणार' असे वाटते हेच प्रकर्षाने नोंदवले गेले. तात्यांनी इतिहासाच्या गोष्टी सांगताना ते सगळे एकाच वाड्यात राहात असावेत असे म्हणणे हे खुबीने लहान मुलाचे मत म्हणून नोंदवले आहे. पण खरेच ही सर्व महान नांवे एकाच वाड्यात राहतात ज्या वाड्याला अंधश्रद्धेची जमीन आणि जातीयतेचे छत आहे.

३. पितळ उघडे पाडणे -
मोठमोठ्या प्रस्थापित साहित्यिकांचे व समीक्षकांचे पुलंनी पितळ उघडे पाडले. शब्दबंबाळ मते मांडणार्‍यांना त्याच भाषेत उत्तरे दिल्यावर ते कसे नामोहरम होतात व मुळात त्यांचा आवेश कसा 'दोलायमान' असतो हे स्पष्ट केले. हे सर्व पूर्णपणे काल्पनिक नाहीच. उलट 'विनोदी लेखक तुच्छ समजला जातो' ही कळकळ त्यांनी हासवत हासवत व्यक्त केली.

४. बेजोड निरिक्षण -
काही आवाज, काही खाद्यपदार्थ, काही सुगंध / गंध यावर पुलंनी जे लिहिले आहे ते पटत नाही असा मराठी माणूस नसेल. आपल्या नकळत आपल्या मनावर या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. लहानपणी वर्गात सर्वांच्या डब्यातील पोळ्यांचा वास, कोणाच्यातरी गजर्‍याचा वास असा एकत्रीत वास असायचा हे सगळ्यांनी अनुभवलेले असते. म्हैस मध्ये कोकणातून निघालेल्या डब्यात एकत्रीत झालेले वास कोणकोणते हे वाचताना पटते. गोवेकरी नुसत्या एका प्रकारच्या माश्याची सव्वीस व्हर्जन्स सांगेल असे म्हणताना वाचकाला भूक लावण्याच कौशल्य दिसते. (आम्हाला तो मासा कोणता हे आठवत नाही म्हणून आम्ही दरिद्री).

५. विनोदाचे वेगळे प्रकार -
टीका, चॅप्लीन प्रकारचे विनोद, चित्रपटात वेडेवाकडे आविर्भाव करण्यातून विनोद निर्मीती, कंबरेखालचा विनोद, राजा गोसावी टाईपचे क्षणभंगुर विनोद यापेक्षा विनोदाचे वेगळे प्रकार त्यांनी दिले. प्रामुख्याने शाब्दिक कोट्यांमध्ये असलेली सरसता दुर्मीळ! अर्थात, त्यांनी ती सरसतेची पातळी दाखवल्यावर आज त्याच पातळीच्या कोट्या करणारे अनेक वीर गाजतात हेही पुलंचेच यश. व्यक्तीचित्रणामध्ये त्यांनी निरिक्षणातून चित्रदर्शीत्व या प्रकारचा विनोद निर्माण केला. म्हैस ही कथा याचे उत्तम उदाहरण. भिंत पिवळी आहे असे मी म्हणतो यावर तुझे काय मत आहे असे विचारल्यावर 'असे तू म्हणू नयेस' असे लिहून एक 'टायमिंग परफेक्ट' वाला विनोदही मोठ्या प्रमाणावर केला आहे. मास्तरांपेक्षा सापळाच जरा मांसल होता अशा प्रकारचे अतिशयोक्तीयुक्त विनोदही त्यात आहेत. नाथाचे लग्न झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी तो रस्त्यावरच्या एका मुलीबाबत सुस्कारे सोडत बोलतो हा करुण विनोद वाटतो. मात्र या सर्वाहून अधिक त्यांनी काय केले असेल तर स्वतःवर विनोद! हे कोणीच केले नव्हते चॅप्लीनशिवाय (आणि काही प्रमाणात राज कपूर). याची असंख्य उदाहरणे त्यांच्या लेखनात मिळतात. माणूस स्वतःला त्रयस्थपणे पाहू शकतो तेव्हा तो इतरांना स्वतःसारखा वाटतो हे तत्व पुलंनी सप्रमाण सिद्ध केलेले दिसते.

६. संस्कृती -
ब्रिटिश असताना आणि गेल्यावर अशा काहीश्या काळातील हे लेखन आहे. उत्तम निरिक्षणशक्तीमुळे पुलंच्या लेखनात समकालीन संस्कृती खच्चून भरलेली आढळते. पण त्याहीपेक्षा ती प्रभावीपणे लिहिली गेलेली दिसते. किंबहुना संस्कृती हा त्यांच्या लेखनाचा एक आधार असावा इतपत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजाला आलेला एक वैचारीक थकवा व रिकामेपणा आढळतो.

७. रोमिओगिरी -
या पातळीचे काहीच लिहिले नाही त्यांनी. मात्र स्त्रीचे ते रूप वारंवार त्यांच्या लेखनात येत राहिले. चाळीतल्या मुली, रस्त्यावरची चालती बोलती प्रेक्षणीय स्थळे, पोंबुर्पेकराच्या वासरीतील एका दिवशीची फक्त 'हाय' (खाल्लेली की उद्गारलेली हे नोंदवलेले नाही) यातून पुलं 'तसे' रोमॅन्टिक होते हे म्हणता येईल. कदाचित लग्नापूर्वीची प्रेयसी असावी. असे लोक लेखनातून दु:खाला वाट देतात. ते लेखन पटकन भिडतेही.

८. वकूब -
त्यांचे अफाट वाचन, ज्ञान आणि चपखल उल्लेख इतके वारंवार आढळतात की एखाद्या महान समीक्षकापेक्षा फक्त पुलं वाचले की बास असे वाटू लागते. मुळात ते स्वतः अष्टपैलू असल्यामुळेही हे होणारच.

..............................

याहीपेक्षा कितीतरी अधिक असे गुणविशेष असतील जे एखाद्याला जाणवतील तर दुसर्‍याला नाही. पण विषय असा की आज पुलंचे विनोद वाचून हसू येते का? आज ती संस्कृती वाचण्यात रस असलेली पिढी आहे का? या गोष्टीचा संबंध संस्कृती बदलण्याशी अथवा इंग्रजी मिडियमशी लागणे येथे अभिप्रेत नसून पुलंच्या लेखनाची अमरता वा कालबाह्यता याबाबतच्या चर्चेशी लागावा असे वाटते.

साधारण वीस वर्षांपूर्वीपर्यंत पुलंचे लेखन वाचून खो खो हासणारे आम्ही.. आज रात्री झोप पटकन यावी म्हणून 'उरलंसुरलं' किंवा 'गोळाबेरीज' वाचायला हातात घेतो यामागे आमच्या मनात कोरडेपणा उरला हेही कारण असेल. पण असे वाटते की एका मोठ्या, एका महान लेखकाला कालबाह्य करू शकेल इतका प्रचंड वेगवान बदल गेल्या दोन दशकात झाला. संस्कृतीची उलथापालथ झाली. वाडे इमारतीत रुपांतरीत झाले. चाळीत राहणारे आता उपनगरांमध्ये स्थलांतरीत होऊन आपल्या नातवांना मांडीवर खेळवू लागले. नुसत्या नजरेने प्रेम बसायचे तिथे आता फेसबूक आणि सेलफोनवर प्रेमाचे सर्व अध्याय एकाच आठवड्यात उरकू लागले. पोरींना बापाची भीती राहिली नाही आणि पोरांना पोरींची. आता परीट कपडे लंपास करत नाहीत आणि शिंपी राजकारणावर बोलत नाहीत. रत्नांग्रीतल्या सार्‍या म्हशी गाभण असण्याचा चहाच्या रंगाशी काय संबंध हे समजणारी मुले आता नाहीत. ते विचारणारी मुले तर नाहीतच. तो भिंगार्डे की कोण तो विचारायचा तसेच आता रडत रडत विचारावेसे वाटते..

"पु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता?"
..................................................

गंभीर समीक्षक
२५ एप्रिल २०१२
मुळ स्त्रोत --> http://www.maayboli.com/node/34513

Friday, December 12, 2014

एका खेळियाची किमया - निशिकांत जोशी

मराठी भाषेत आधुनिक काळात दोन अष्टपैलू कलावंताना जवळून पाहण्याचे भाग्य लाभले्ल्या पिढीला निश्चितच आपण एका समृद्ध काळात जगलो याचा आनंद वाटेल. १९५० ते २००० हा काळ अनेक क्षेत्रात मोठ्या माणसांच्या कर्तृत्वानं झळाळणारा! त्यात चित्रपटांमध्ये बिमल रॉय, सत्यजित रे, गुरुदत्त, गिरिश कर्नाड आणि श्याम बेनेगल, चित्रकलेमध्ये गायतोंडे, जेमिनी रॉय, रामकिंकर, सुधीर पटवर्धन, हुसेन आणि भूपेन कक्कर, मोहन सामंत, संगीतात अमीरखाँ, पं कुमार गंधर्व, रवी शंकर, अलि अकबर खाँ, धोंडुताई कुलकर्णी, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरसिया, अल्लारखाँ आणि त्यांचे चिरंजीव झाकीर हुसेन लता मंगेशकर आणि आशा भोसले, क्रिकेटमध्ये सुनिल गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर अशी कितीतरी नावे पुढे येतात. या सार्‍या कलावंतानी निर्माण केलेल्या महान कलाविश्वाचा अनुभव आणि आस्वाद कसा घ्यावा याची दृष्टी लाभलेले काही रसिक होऊन गेले. त्यांच्या विशाल रसिकत्वाची छाया आपल्याला लाभली आणि त्यांची कलादेखील आपण पाहिली आणि स्तिमित झालो. त्या रसिकांमध्ये गणना होते ती आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपडे यांची! या दोन रसिकाग्रणीनी महाराष्ट्राची अभिरुची घडविली. त्यानी अभिजात साहित्य, कला आणि आधुनिक समाज यांचा संगम साधला.आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे याना आपण केवळ विनोदी लेखक म्हणून पाहतो. पण तो त्यांच्या असंख्य गुणांपैकी केवळ एक गुण झाला. त्या दोघानी साहित्य, चित्रपट, नाटक या कलांच्या प्रांतात विलक्षण समृद्ध कामगिरी केली.

पु. ल. देशपांडे यांचे निधन झाले १२ जून २००० रोजी. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रसिकाना त्यांची आठवण आली आणि त्यांच्या अनेक कलाकृती आठवल्या खर्‍या. पण असेही एक पु.ल. होते की जे सामाजिक समस्यांचं सखोल चिंतन करीत असत. आणि त्याबाबत मार्मिक विचार मांडत असत. एक शून्य मी या आपल्या पुस्तकातील एका लेखात त्यानी मांडलेले विचार सार्‍या समाजाला प्रेरणा देणारे आहेत . त्यानी म्हटले आहे की, एकतर धर्म, ईश्वर, पूजापाठ, यात मला कधी रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य पाहून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडला नाही. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म वगैरे थोतांडांवर माझा विश्वास नाही.देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यानी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला तिळमात्र शंका राहिलेली नाही. आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते, तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. या लेखकाची मनोधारणा ही बुद्धीवादी होती. त्यांच्या साहित्याद्वारे त्यानी मानवी जीवनातील जे जे उत्तम उदात्त उन्नत त्याचा आग्रह धरला. तर सदैव सामाजिक समतेच्या बाजूने राहिले. त्यानी सदोदित व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याचा आग्रह धरला. त्यानी मानवतावाद आणि शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीचे काम सर्वात महत्वाचे मानले. त्यानी आपल्या लेखनाद्वारे ज्या मूलभूत अशा जीवनदृष्टीचा आग्रह धरला त्यात त्यानी केवळ मनोरंजन केले नाही. त्यानी एक समृद्ध जीवनदृष्टी दिली. जीवनाचा, सौदर्याचा आस्वाद कसा घ्यायचा याची दृष्टी दिली. जीवनात खळखळून वाहणारा आनंदाचा निर्झर असे त्यांचे साहित्य आहे. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य हे मध्यमवर्गीय जाणिवांचे कुंपण असलेले आहे अशी टीका त्याचे काही समकालीन आणि नंतरचे समीक्षक करीत आले आहेत. पण त्यानी जे विविधांगी जीवनदर्शन घडविले आणि त्यातून जी जीवनदृष्टी व्यक्त केली तशी अन्य कोणाकडे क्वचितच दिसते.

विदूषक हा एक अत्यंत गंभीरपणे जीवनाकडे पाहणारा कलावंत तत्वज्ञ मानला जातो. तो अत्यंत सखोल चिंतन आपल्या विनोदी मुखवट्याच्या आडून सांगत असतो. पु.ल.देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या बाबतीत तर सर्वार्थाने खरे आहे. त्यानी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांची विनोदाचा परंपरा पुढे चालविताना अभिजात विनोद निर्माण केला आहे. पु. ल. देशपांडे याना केवळ मध्यम वर्गिय जीवनाच्या वर्तुळात बसविणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यानी रवींद्र साहित्य, संगीतापासून कुमार गंधर्वाच्या सूफी संगीतापर्यंत, निर्गुणी भजनापर्यंत, त्यांच्या संगितातील प्रयोगांपर्यंत सारे कलाजीवन समरसून अनुभवले. बालगंधर्वांच्या काळातील संगीत नाटकांचा अत्यंत समृद्ध असा काळ अनुभवला. गुरुदेव रवीद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये राहून त्यानी तेथील कलासाधना आणि शिक्षणाचा अनुभव घेतला. त्यानी बाबा आमटे यानी घनदाट जंगलात कुष्ठ रोग्याना नेऊन त्याच्या पुनर्वसनाचे काम करताना कुष्ठ रोग्यांच्या श्रमातून फुलविलेल्या आनंदवनाच्या प्रतिसृष्टीमध्ये तर रमले. तेथे त्याना मानवतावादाचा प्रकाश दिसला. ते दलितांची वेदना व्यक्त करणार्‍या साहित्याशी एकरूप झाले आणि तो विद्रोह ज्या विषमतेच्या विरोधात होता त्या विषमतेच्याविरोधात चाललेल्या लढ्यामध्ये ते सहभागी झाले.

त्यानी मराठीवर खूप प्रेम केले आणि त्या भाषेतील सर्व बोलीभाषा त्यानी आपल्या मानल्या. संगीत नाटके भरात होती तो मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ जो होता त्याचे सर्व नजाकतीसह दर्शन घडविताना त्यानी मराठी रंगभूमीचे सांस्कृतिक संचित जोपासले. पु. ल. याना एक खेळिया मानले जाते. कारण ते एक श्रेष्ठ परफॉर्मर होते. त्यांच्या लेखनात शिल्प, चित्र,संगीत, अभिजात साहित्य, तत्वज्ञान,नाटक, अशा सार्‍या क्षेत्रांविषयी सृजनशील चिंतन खेळकरपणे मांडले आहे. त्यानी गुळाचा गणपती या चित्रपटात पटकथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय आदि सबकुछ पु. ल असा कार्यक्रम केला. दूधभात, नवरा बायको, देवबाप्पा आदि चित्रपटांमध्ये त्यानी भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयाचा अत्यंत प्रसन्न आविष्कार वार्‍यावरची वरात, असा मी असामी, वावटळ अशा कार्यक्रमांमधून सादर झाला. चित्रपटांमध्ये तो अभिनय रसिकाना भुरळ घालत होता. त्यानी केलेले व्यक्ति आणि वल्ली, गणगोत असे व्यक्तिचित्रणात्मक लेखन हे त्या प्रकारच्या लेखनात अजरामर झाले. पु.ल. देशपांडे यांची सहृदय जीवनदृष्टी त्यातून व्यक्त झाली आहे. त्यांच्या साहित्यात दुसर्‍या महायुद्धानंतर महाराष्ट्रात झपाटयाने उ्दयाला आलेल्या मध्यमवर्गाच्या सार्‍या संवेदना आहेत आणि त्या वर्गाचे कमालीचे जिवंत चित्रण आहे.पण त्यापुरतेच पु.ल. मर्यादित नाहीत. त्यानी जीवनाच्या सर्व क्षेत्राना स्पर्श करणारे लिहिले तरी किंवा त्यात सहभागी तरी झाले. आणीबाणीच्या विरोधात त्यानी ठाम भूमिका घेतली पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या चौकटीत ते अडकले नाहीत. त्यानी आपल्या लेखनातून एक मूल्यविवेक मात्र जागा केला. तो मूल्य विवेक आहे मानवतावादाचा, समतेचा, सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्याचा. आविष्कार स्वातंत्र्याचा आणि अभिजात सौदर्यदृष्टी जोपासण्याचा. त्यांचे एकूणच जगण्यावर विलक्षण प्रेम होते. जीवन हे सौदर्याचं दर्शन घेण्यासाठी आहे, सौदर्याचा उत्सव पाहण्यासाठी आहे ही त्यांची धारणा होती. त्यानी जे सौदर्य अनुभवले त्याचे दर्शन त्यानी सार्‍या वाचकाना घडविले. निखळ आनंद दिला. जीवनातील आनंदाचा आस्वाद कसा घ्यावा हे त्यानी दाखविले.

रविवार १५ जून २०१४
निशिकांत जोशी
दैनिक सागर

Thursday, December 4, 2014

पु.ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट - गंगाराम गवाणकर

                      
साठ प्रयोग होईपर्यंत वस्त्रहरण नाटक सुमारे ऐंशी हजाराच्या तोट्यात होते. या नाटकाचा एक प्रयोग पुण्यात करून नाटक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. टिळक स्मारक मंदिरात रात्री वस्त्रहरणचा प्रयोग होता. ह्या नाट्यगॄहात येणा-या प्रेक्षकांना गुदगुदल्या केल्या तरी हसायला येणार नाही, असा प्रेक्षकवर्ग तिथे असताना त्यांना आपल्या नाटकातून हसवणं हे आमच्यासाठी आव्हानच होतं. त्यात पु. ल. देशपांडे यांनी नाटकाची बारा तिकीटं घेतली होती. पहिल्याच रांगेत पु. ल. होते. ज्या माणसाने आयुष्य नाटकात घालवलं अशा माणसाला हसवणं म्हणजे कठीणच होतं, त्यामुळे पोटात गोळाच आला होता. त्यावेळी मच्छिंद्र कांबळीला मी म्हटलं "आज आपली खरी कसोटी आहे, आज जर आपण जिंकलो ना तर ठीक आहे." पण नाटक सुरू झाल्यानंतर सहाव्या मिनिटाला पुलं हसायला लागले. त्यांना हसताना बघून माझ्या मनात आशा निर्माण झाली. पुण्यातील प्रेक्षकांना मालवणी कळणार नाही म्हणून जमेल तेवढा प्रयोग मराठीतच केला होता.

प्रयोग संपल्यानंतर प्रचंड खूष झालेले पु. ल. रंगपटात आले आणि म्हणाले "गवाणकरांनू हसल्यानंतर जा जा दुखाचा हा ना ता सगळा दुखूक लागला". त्यांनी सार्‍या कलावंतांचे तोंड भरून कौतुक केले. पण जाता जाता ते म्हणाले, "गवाणकर तुमचा ह्या नाटक मराठीत पाहताना माका मालवणी कोंबडी गरम मसाल्याशिवाय खाल्ल्यासारखी वाटला. एकदा संपूर्ण नाटक माका मालवणीत बगूचा आसा तुम्ही पुन्हा प्रयोग कराल ना तर मालवणी पंच टाका, महाराष्ट्रात कुठेही प्रयोग असला तरीही मी येईन." हे सांगता सांगता त्यांनी यात अटही घातली, ‘हा प्रयोग कितवाही असू दे, त्या प्रयोगाचं अध्यक्षस्थान मी करणार आणि हा प्रयोग शिवाजी मंदिर येथे करायचा." २६ जानेवारी १९८१ रोजी पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली या नाटकाचा १७५वा प्रयोग झाला. (पुलंनी त्या प्रयोगाच्या वेळी केलेले तुफान अध्यक्षीय भाषण खालील चित्रफितीत ऐकता येईल.)
काही दिवसांनी पुलं यांचं पत्रसुद्धा आलं आणि त्यातली शेवटची ओळ अशी होती की, "हे नाटक बघण्यापेक्षा मला या नाटकात छोटीशी भूमिका मिळाली असती तर मी स्वत:ला भाग्यवान समजलो असतो." एखाद्या थोर साहित्यिकाने दिलेली ही थाप आमच्यासाठी खूप मोठी होती. नाटकाची जाहिरात करताना त्यांनी पत्रात जे काही लिहिलं होतं त्यातली एक-एक ओळ त्यात टाकली आणि त्यानंतर प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुल्ल चा बोर्ड लागायला लागला. वस्त्रहरण नाटक पु. लं. चं पत्र टप्प्याटप्प्याने जाहीर झाल्यानंतर चालायला लागलं ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. पुलं यांनी माझ्या नाटकाचं कौतुक केलं आहे, हे लोकांना कळलं तेव्हा लोकांनी त्यांना पत्रं पाठवली आणि त्यांना विचारलं ‘या नाटकात एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे?’ यावर पुलं यांनी उत्तर दिलं, ‘परमेश्वर काहींना वास घेण्यासाठी नाक देतं नाही तर मुरडण्यासाठीच नाक देतो.’ त्यांनी माझ्या नाटकाचं कौतुकच केलं नाही तर पाठिंबाही दिला. एका थोर साहित्यिकाच्या शाबासकीमुळे ‘वस्त्रहरण’ या नाटकाला मोठय़ा संख्येने प्रेक्षक येऊ लागले. प्रेक्षकांची संख्या कित्येक पटीने वाढली आणि तिकीटं ब्लॅकने जाऊ लागली. नंतर या नाटकाने मागे वळून पाहिलं नाही. पुलं यांनी लिहिलेलं ते पत्र मी माझ्या ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकात जसंच त्या तसं छापलंय.
                                       
पुलं यांच्या त्या पत्रामुळेच माझं नाटक चाललं. पुलंनी पाठीवर थाप दिली आणि तेव्हापासून नाटकाची जी घोडदौड सुरू झाली जी आजतागायत सुरू आहे. म्हणूनच पु. ल. माझ्यासाठी आणि 'वस्त्रहरण'साठी टर्नींग पॉइंट ठरले.

- गंगाराम गवाणकर

Tuesday, December 2, 2014

I Cannot Love it enough -- Pu.La. Deshpande

........So far I have had a pleasant journey in literature because I have never written under any kind of compulsion. I have avoided literary seminars where they discuss the new trends in the modern short story or poetry, or where they read papers on the role of the modern writer in a changing society. 1 do not like being a writer through all the twenty-four hours of the day. It is only when I sit down to write that I am a writer ; when I am on the stage I am an actor; and when 1 stand in a long bus queue in Bombay I am a passenger cursing the bus company along with the rest of the queues. That is why the really shrewd organizers of seminars do not invite me to participate in them and read a paper. For one thing, they consider me much too flippant for such scholarly meets. I avoid them because I really do not know the modern trends in literature Indian or foreign. So instead of losing myself in the labyrinths of scholarship, I prefer spending an evening in the theatre, or in the company of musicians, or at a favorite pan-shop where I feel young. I have never travelled with a view to writing a travelogue. I did not even make notes. I don't have a writer's scrapbook either. Writing for me has been a joy, and not a task to be fulfilled.

There is any amount of discussion going on today about the freedom of a writer. I like to compare a creative writer with a piece of ice dipped in water. Just as ice is made of water, and just as a major part of it remains inside the water and little of it above it, a writer is created out of the people he lives with and he remains with the people, though as an artist he is a little above them. As ice owes its existence to water, the writer owes his to the people with whom he lives, but he has to lift himself a little above them to have a good look at them. That is the minimum freedom he should have. Unless the head is held high, I do not see any possibility of a fearless mind—which according to me is a primary necessity for all creative activity in art; and a writer who has his roots in the people with whom he lives and whom he loves, will never misuse this freedom. What he writes must come from within and not from without. It is only in this atmosphere that a writer can be true to his convictions. By democracy I understand only one thing: the freedom to live by my convictions and ‘let others live by theirs, I have no faith in mere formalistic patterns, and such dehumanized, obscure creation and fashionable frustration. As Jean Paul Sartre has said, the function of the writer is to call a spade a spade. If words are sick, it is up to us to cure them. I distrust the incommunicable; it is the source of all violence.

I therefore ignore the note of derision in my critic's writing when he dismisses me as a popular writer. No—I rather feel proud that my readers understand me. I want them to understand me. I write for them. Writing is a constant search for someone who will understand you, who will laugh with you, or shed a tear with you. I have never had a fight with my readers, or with people with whom I have lived and want to live in future. My fight is against all that is ugly, all that Gives rise to a feeling of frustration in life. I have fought against hypocrisy, against the intellectual phrase-mongering, against the ideology of 'who-cares-for-the-people'; and a different weapon came to me when I chose to fight. I did not chose the weapon. That perhaps is a gift which God gives to all poor people: a sense of humor. I laugh: I laugh first at myself, and in return my readers and spectators also laugh at me first, and suddenly they realize that they have laughed at themselves, which I believe is good for social health. That is all the reward from my writings. Like Napoleon, who said to Josephine, 'I love you but I want to love you a hundred times more', I should also like to say about literature that I love literature but I would like to love it a hundred times more. I am not an angry young man; I am a hungry young man. I want to read Kannada poems, Bediji's Urdu novels, Kartarsingh's Punjabi novel, Tamil novels, Bengali plays, Telugu songs—I want to love literature in a hundred different ways. My only worry is that I cannot love it enough.

Thank you.

नवी दिल्ली येथे साहित्य अकादमीचे ’व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकास मिळालेले पारितोषिक स्विकारताना केलेल भाषणं.
२० फेब्रुवारी १९६६.
(अपुर्ण)

Friday, November 28, 2014

बारा जूनचे लग्न - सर्वोत्तम ठाकूर

माझी मोठी बहीण माईनं, म्हणजे त्या वेळची सुनीता ठाकूर हिनं, स्वत:चं लग्न स्वत:च ठरवलं. आज यात काही विशेष वाटणार नाही. पण १९९४५-४६ च्या त्या स्वातंत्र्यपूर्व काळात ही बंडखोरी मानली जाई. मात्र, माईची ती बंडखोरी नव्हती. कारण बंड कोणाच्या तरी कडव्या विरोधात असतं. माईचे पुरोगामी विचार आम्हाला पटोत वा न पटोत, ती जे पाऊल टाकेल ते विचारानेच टाकेल, आततायीपणा करणार नाही, ही घरच्या सर्वांची भावना असल्यामुळे नापसंतीची शक्यता होती, पण कडव्या विरोधाचा प्रश्नच नव्हता.

आपल्या लग्नाला घरची पसंती आहे, ही बातमी माईने मुंबईला जाऊन भाईंना सांगितली. त्या वेळी रत्नागिरीत एकही टेलिफोन नव्हता. आणि असता, तरी मुंबईला भाईंच्या घरी फोन कुठला असायला? रत्नागिरीला आमच्या घरी नोंदणी पद्धतीने लग्न करायचं ठरलं. नोंदणी पद्धतीने करायच्या या लग्नात अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळायचा, असं भाई आणि माई या दोघांचंही मत असल्यामुळे त्या वेळी प्रचलित असलेल्या बर्‍याच गोष्टी केल्याच नाहीत. आपल्या लाडक्या मुलीकरिता अप्पा हवा तेवढा खर्च करायला तयार होते; पण वधू-वरांनाच तो नको होता. म्हणून घरोघर जाऊन प्रतिष्ठितांना आमंत्रणं दिली नाहीत की लग्नपत्रिका छापल्या नाहीत. पण या आमंत्रणपत्रिका न छापण्याचा मात्र एक निश्चित फायदा झाला. कारण शेवटी ठरलेल्या दिवशी लग्न झालंच नाही. तेरा जून ही लग्नाची तारीख ठरली होती.

मला वाटतं तो गुरुवार होता. मुहूर्त पाहावयाचा नसल्यामुळे अप्पांच्या कोर्टातील कामाच्या दृष्टीने तो सोयीस्कर दिवस असावा. नुकताच कॉलेजात गेलेला मी, त्या वेळी विद्यार्थी परिषद की कसला तरी जिल्हा कार्यवाह होतो आणि एका बैठकीकरिता मालवण-वेंगुर्ला भागात जाणं मला आवश्यक होतं. आता तीन तासांत होणार्‍या त्या प्रवासाला तेव्हा एक दिवस लागत असे. माईचं लग्न तेरा जूनला आहे, म्हणून बारा जूनला परत यायचं ठरवून मी दोन दिवसांकरिता गेलो आणि ठरल्याप्रमाणे बारा जूनला संध्याकाळी रत्नागिरीला परतलो.

उद्याच्या लग्नाच्या वेळी काय काय मदत लागेल याचा विचार करत घरी आलो, तर माझे मेहुणे पु. ल. देशपांडे गप्पा मारत बसले होते.

लग्न दुपारीच होऊन गेलं होतं. लग्न झाल्याचा आनंद होता, पण प्रत्यक्ष लग्न चुकल्याचं थोडं वाईट वाटलं. मग समजलं, की दुपारी कोर्टाचं काम लवकर संपलं, तेव्हा आप्पांनी त्यांच्या साक्षीदार म्हणून येणार्‍या दोन मित्रांना उद्या येण्याची आठवण करून दिली. पाहुण्यांची आप्पांनी भाईशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांना समजलं, की या तिघांपैकी एक लग्ननोंदणी करायला आलेले रजिस्ट्रार आहेत आणि दुसरे दोघे लग्नाला साक्षीदार म्हणून सही करायला आलेले आप्पांचे वकील मित्र आहेत. आपलं लग्न उद्या नसून आजच, आताच आहे, याची भाईंना तेव्हा जाणीव झाली. माईलासुद्धा.

शेवटी नवरी मुलगी पांढर्‍या खादीच्या साडी-पोलक्यात, नवरा मुलगा पायजमा-शर्टमध्ये आणि घरातच असल्यामुळे चपला वगैरे पादत्राणं न घालता अनवाणीच, असे दोघे मेड फॉर इच अदर पोशाखात लग्नाला उभे राहिले होते, म्हणजेच सह्या करायला रजिस्ट्रारसमोर बसले होते.

तेरा जूनच्या ऐवजी बारा जून 1946लाच सुनीता ठाकूर व पु. ल. देशपांडे यांचं लग्न झालं. भाईंना मी प्रथम भेटलो, आमची गट्टी जमली ती त्यांचं लग्न झालं त्याच दिवशी संध्याकाळी. त्यांचा मेहुणा म्हणूनच.

लग्नात आप्पांनी भाईंना एक अंगठी दिली. आप्पांवरच्या प्रेमाने भाईंनी ती आनंदाने स्वीकारली. ‘एवढा चांगला तुझ्या मनासारखा नवरा मिळाला, तेव्हा त्यांच्याकरिता तरी आता त्या कपाळावर कुंकू लाव’ आईच्या तिच्या नेहमीच्या पद्धतीने माईला फर्मावलं अणि माई परत कुंकू लावू लागली.

माई कुठलाच दागिना घालत नसे, पण आईने तिच्याकरिता एक मंगळसूत्र केलं होतं. त्या नोंदणी पद्धतीच्या लग्नात, सुनीता ठाकूर आता कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून सुनीता देशपांडे झाली.

आईने मंगळसूत्र दिल्याचं पाहिल्यावर भाईंना तेव्हाच आठवण झाली, की त्यांनी तो विषय जाणूनबुजून काढला नव्हता, माहीत नाही, पण ते म्हणाले, त्यांच्या आईने पण सुनीताला (माईला भाई नेहमीच सुनीता म्हणत) एक मंगळसूत्र दिलं आहे अणि मुंबईहून आणलेल्या त्यांच्या सामानातून त्यांच्या आईने सुनेला दिलेलं मंगळसूत्र काढून आणून त्यांनी माईला दिलं.

एक अंगठी, दोन मंगळसूत्रं आणि तीन साड्यांच्या साक्षीने असं हे लग्न पार पडलं. आधी ठरवलेल्या दिवसाच्या एक दिवस आधी. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे खास लग्नाचा असा झालेला सर्व खर्च वधूपक्षानेच केला. वधूपक्षाने न म्हणता वधूने स्वत:च केला म्हणणं अधिक बरोबर होईल. वधू-वर, रजिस्ट्रार आणि दोन साक्षीदारांची सही करावयाचा तो सरकारी कागद - ‘‘नोंदणी पद्धतीने लग्न झाले’’ याच्या पुराव्याचा कागद माईने स्वत: आठ आणे म्हणजे अर्धा रुपया देऊन विकत आणला होता. या आठ आणे खर्चात लग्न पार पडलं होतं. माईने - वधूने - स्वत: केलेल्या खर्चात.

लग्नानंतर दोन-तीन दिवस भाई रत्नागिरीला राहिले. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 13 जूनला आप्पांनी मित्रमंडळींना चहाला बोलावलं आणि जावयांची ओळख करून दिली. हा चहाचा कार्यक्रम आमच्या रत्नागिरीच्या घरात (सदानंद निवास) हॉलमध्ये दुपारी झाला. त्याला वकील, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक वगैरे आप्पांचे वीस-पंचवीस मित्र आले होते. लग्न झाल्यानंतर कार्यक्रम ठरवला की तेरा तारखेला लग्न होणार होतं म्हणून त्याप्रमाणे आधीच ठरवला होता, हे मात्र मला माहीत नाही. जावई गातात आणि त्यांच्या दोन ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्यात, हे आता सर्वांना माहीत झालं. रत्नागिरीसारख्या छोट्या गावात ही एक अभिमानाने सांगण्याची गोष्ट होती. दुसर्‍या दिवशी रात्री आमच्या घरातल्या त्याच हॉलमध्ये भाईंचं गाणं झालं. मग सकाळच्या बसने भाई-माई हे देशपांडे कुटुंब रत्नागिरीहून मुंबईला गेलं. आमच्या घरी त्या वेळी एक ग्रामोफोन होता. ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीम खान, के. एल. सैगल यांच्या गाण्यांच्या दहा-बारा रेकॉडर्स होत्या. हा ग्रामोफोन आणि त्या रेकॉडस भाईंना मुंबईला जाताना आम्ही दिल्या होत्या. लग्नाचा तो आहेर असावा. भाईंनी खूप आवडीने तो स्वीकारला होता. आठ आण्यांच्या खर्चात पार पडलेल्या त्या लग्नात एक अंगठी, दोन मंगळसूत्रं, तीन साड्यांत ही एक विलायती चीज वाढली होती. 12 जून 2000 रोजी भाईंचं निधन झालं. लग्नानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी.

(‘ग्रंथाली’च्या 13 जून रोजी 2014 रोजी प्रकाशित झालेल्या सर्वोत्तम ठाकूर लिखित ‘रत्नागिरी ते आइनस्टाइन’ या पुस्तकातून साभार.)

-- सर्वोत्तम ठाकूर
८ जून २०१४
दिव्य मराठी

Wednesday, November 19, 2014

बबडू

पाऊस भुरभुरत होता. हातातली पिशवी, धोतर, क्षणोक्षणी चिखलाशी चपक चपक करून हितगुज करणाऱ्या चपला आणि वरच्या दांडीजवळच्या तारेच्या घोड्यातून दर तीन मिनिटाला फटक करून मिटणारी छत्री सावरीत मी वाट काढीत होतो. अंगावरून जाणाऱ्या मोटारी धोतरावर चपलेने काढलेल्या चिखलाच्या नक्षीवर स्प्रे-पेंटिंग करीत होत्या. घर तब्बल तीन फर्लांगांवर राहिले होते. तीन मिनिटे झाली असावी, कारण तारेच्या घोड्यातून निसटून छत्री पुन्हा एकदा ‘जैसे थे’ झाली आणि संकटांनी सोबत घेऊन यावे ह्या नियमाला अनुसरून त्या वळणावर एक भली मोठी मोटारगाडीही आली. मोटारवाल्याने डोके बाहेर काढले. त्याने गाडी थांबवली दार उघडून तो बाहेरच आला. माझ्याकडे रोखून पाहू लागला. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर एक स्मिताची रेषा उमटली. ओठावरच्या कोरलेल्या मिशीची एक बाजू वर गेली. त्याने डोळ्याचा काळा चष्मा काढला आणि त्याचे ते तरतरीत डोळे पाहिल्याबरोबर एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

"बबडू!"

"हॅस्साला--" माझ्या खांद्यावर जोरात हात ठेवीत बबडू म्हणाला. "मला वाटलं की स्कालर लोक आठवण विसरून गेले."

"वा! विसरायला काय झालं--" झोपेत जाबडल्यासारखे मी बोललो.

"पण मला मात्र साला जरा टायम लागला हां तुझी वळक पटायला. पण तू म्हणालास ‘जाऊ दे, जाऊ दे--’ तेव्हा वाटलं की आवाजाची ष्टाइल माह्यतीची आहे. म्हटलं, बगू स्कालर लोकांना वळक लागते की नाय."

"म्हणजे बबडूच हा!" मी धुंडिराजासारखे हळूच स्वगत म्हणून टाकले.

"गाडी झकास आहे रे! कुणाची?"

"आपलीच." त्या गाडीकडे ऐटीत पाहत बबडू म्हणाला.

"म्हणजे तुझी स्वत:ची?"

"हा! दोन हायत. एक जुनं माडेल आहे--फार्टीएट्‌ची फोर्ड आहे! डबडा; पण साली लकी गाडी आहे! ठेवून दिली तशीच. ही प्याकाड आहे."

"वा! पॅकार्ड म्हणजे काय प्रश्नच नाही."

मला फक्त उच्चारच बरोबर येत होता. बबडू तसा वर्गात अतिशय लोकप्रिय! वर्गातल्या शेवटल्या बाकावर बसून गाढ झोपायचा. मास्तरही त्याच्या वाट्याला फारसे जात नसत!

बबडूच्या केसांची बट शाळेत येत होती तशीच होती. दात मात्र घाणेरडे दिसत होते. त्यांतला एक सोन्याने मढविलेलाही होता.

"चल बस ना--" गाडीचा दरवाजा उघडत बबडू म्हणाला.

"अरे नको! कशाला? इथेच तर जायचं आहे."

"अरे ठाऊक आहे मला. तुझं घर सालं विसरलो नाय मी. तुझ्या आईनं एकदा बेसनलाडू दिला होता--मदर आहे का रे तुझी?"

"आहे!"

पाच वर्षांच्या तुरूंगवासात त्याची भाषा बदलली असावी.

"ये." मी बबडूचे सागत केले.

"आई, ओळखलंस का याला?"

"पाह्यलासारखा वाटतो--"

"अग, हा बबडू-- माझ्या वर्गात होता तो." हे म्हटल्यावर आईला इतके दचकायचे कारण नव्हते. आईचे दचकणे बबडूच्या लक्षात आले नसावे. आईने हातकड्यांची खूण करून तुरूंगात गेला होता तोच ना हा, असे विचारले. मी चटकन "हो" म्हटले.

----------

माझ्या पुस्तकांनी भरलेल्या कपाटाकडे एक अत्यंत आदरयुक्त नजर फेकून बबडू बोलायला लागला. "तुला माह्यत हाय--सालं आपलं न्‌ बुकांचं कधी जमलंच नाय! घोसाळकर मास्तर आहे का डाइड झाला रे?"

"गेल्या वर्षी वारले!"

"च्‌! साला फस्क्लास मास्तर होता. इंग्लिश काय फायन्‌ बोलायचा. साला एक अक्षर कळत नव्हतं मला, पण साला मी आपला ऐकत बसायचा. बस, इंग्लिश त्याच्यासारखा बोलणारा नाय पाह्यला. इंग्लंडमधे असता साला तर डोक्यावर घेऊन नाचले असते."

घोसाळकर मास्तरांच्या मरणाने त्यांच्या शिष्यांपैकी एकही माणूस इतका हळहळला नसेल. मास्तर चांगले होते, अतिशय सात्विक आणि प्रेमळ होते. पण इतके हळहळण्यासारखे होते असे मला वाटले नाही.

"तुझ्या मनाला घोसाळकर मास्तर मेल्याचं फारच लागलेलं दिसतयं--"

"काय सांगू तुला--" आणि बबडूचे डोळे चटकन पाण्याने भरले. कोणी असे रडाबिडायला लागले की माझे अवसानच जाते.

"पाच वर्षे तुरुंगात राह्यलो. साले डाकू लोक होते त्यांना पण भेटायला त्यांचे भाऊबंद यायचे, पण साला पाच वर्षात--त्यातली चार महिने चांगल्या वागणुकीबद्दल कमी झाली माझी शिक्षा; पण चार वर्षे आणि चार महिने..."

"म्हणजे चार वर्षे आठ महिने.." मी शाळेतदेखील त्याला अशीच उत्तरे सांगत असे.

"तुरूंगात काढले, पण बस्‌ एक माणूस भेटायला आला नाय! ना बाप, ना दोस्त, ना कोण! कोण आल असेल भेटायला? साला मी तर एकदम चकरभेंड होऊन गेलो. वार्डरनी बाहेर नेलं-तर घोसाळकर मास्तर! मी म्हटलं, ‘मास्तर तुम्ही?’"

"पण घोसाळकर मास्तर तुला भेटायला आले?"

"अरे, ती पण एक ष्टोरी आहे. साली फिल्ममधे पण असली ष्टोरी नाय मिळत."

"पण त्यानंतर इतक्या वर्षात इतका पैसा कसा मिळवलास?"

"बस बाबांची कृपा आहे!" डोळ्याला आंगठी लावली.

जाताना त्याने वाकून आईच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला.

"औक्षवंत हो. अशीच चांगली घरं बांध. आम्हांला चांगली जागा दे त्यात. हे घर आता अपुरं पडतं आम्हांला. सुना आल्या, नातवंडं आली..." बबडूच्या नमस्काराला आईने तोंड भरून आशीर्वाद दिला.

बबडूने मोटारीत बसता बसता सिगारेटकेस उघडली. आतून सिगारेट काढून मला दिली.

"अरे नको!"

"अरे, संडासात जाऊन ओढ! आईसाह्यबांचा मान ठेवतोस, चांगलं आहे." एक सिगरेट स्वत: पेटवली आणि गाडी पुढे चालवली.

मी त्याच्या पाठमोऱ्या गाडीकडे पाहत उभा राहिलो. हातातली सिगारेट चटकन खिशात दडपली. टेबलावर शंभराच्या नोटा तशाच पडल्या होत्या. ‘एक हितचिंतक’ ह्या नावाने घोसाळकर गुरूजींच्या पवित्र स्मरणार्थ त्या मला राजवाडे मास्तरांना पोहोचवायच्या होत्या.

सुन्न होऊन मी बाहेर पाहिले. पाऊस पळाला होता. घरात पुन्हा उकाडा सुरू झाला होता. आतून आईचा आवाज आला, "साखर भिजली की रे सगळी ! पाकच करून घालते कशात तरी."

(अपूर्ण) 
- व्यक्ती आणि वल्ली

Friday, November 14, 2014

चिरंजीव


काही माणसं "गेली" असं म्हणवत नाही. मुळात ती गेली आहेत ह्यावरच विश्वास बसत नाही. कारण ती रोज आपल्या बरोबर असतात. ती कुठल्या क्षणी कुठल्या कारणासाठी आपल्या आसपास प्रकट होतील सांगता येत नाही. भाई, तुम्ही "जाऊन" १४ वर्ष झाली असं म्हणायला अजूनही जीभ रेटत नाही ... यापुढेही रेटणार नाही. जोवर तुमच्या चाहत्यांच्या संग्रहात - व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, गणगोत, पूर्वरंग, अपूर्वाई आणि अशी अजून ढीगभर पुस्तकं किंवा निदान यातलं एक पुस्तक जरी असेल तोवर तुमचं चिरंजीवीत्व अबाधित आहे.


खरं सांगायचं तर दु:ख एकाच गोष्टिचं आहे, समोरा समोर तुम्हांला कधी ऐकायला, बघायला, भेटायला नाही मिळालं. २००० साली तुम्ही "गेलात" असं लोकं जे म्हणतात .... तर ... त्यावेळी नुकतेच पुलं वाचायला लागलो होतो. म्याट्रिक मध्ये आम्हांला तुमचा "अंतु बर्वा" होता, अर्थात शालेय पुस्तकातील जागा, त्या वयातली मुलांची विनोद समजण्याची कुवत हे सगळं बघुन परीक्षेच्या हिशोबाने ५-७ मार्कांपुरता ठेवुन बरीच काटछाट करुन तो आम्हांला दिला होता. तिथुन पुलं वाचायला सुरुवात झाली होती. मी आजही तुम्ही लिहिलेलं एक आणि एक अक्षर वाचलंय, साने गुरुजी आणि तुम्ही माझे आदर्श आहात वगैरे गटणे स्टाइलने काही बोलणार नाहीये, कारण ते तसंच आहे. मी अजून पोरवय, वंगचित्रे, जावे त्यांच्या देशा, गांधीजी वगैरे पुस्तकं अजिबात वाचली नाहीयेत. मला तुम्ही अनुवादित केलेलं "एका कोळियाने" आवडलं नव्हतं( .... किंवा मी ते वाचलं तेव्हा समजुन घेण्याचं माझं वय नव्हतं अस देखिल म्हणता येईल.). आणि हे तुम्हांला मी हक्काने सांगु शकतो.


लोकं तुम्हांना "विनोदी" लेखक म्हणून ओळखतात हा तुमच्यावर लादलेला आरोप आहे. तुम्ही लिहिलेली रवींद्रनाथ : तीन व्याख्याने, किंवा रेडिओवरती तुम्ही केलेली भाषणे जी पुढे पुस्तकांच्या रुपाने २ भागात प्रसिद्ध झाली ती वाचून केवळ विनोदि लेखक म्हणणे हा सरळ सरळ आरोप होईल. "हसवणूक"च्या मुखपृष्ठावरचा त्या लालचुटूक नाकाच्या विदूषकाचा तुम्ही धरलेला मुखवटा लोकांनी तुमच्या चेहर्‍यावर फिक्स करुन टाकला. पण विनोद हे तुमचे केवळ माध्यम होते. खर्‍या अथवा काल्पनिक व्यक्तीचित्रांतील विनोदामागची विसंगतीने भरलेली ठसठसती जखम फार नाजूकपणे उघडी केलीत. कधी कधी तर व्यक्तिचित्रणातले चटका लावून जाणारे शेवटचे वाक्य लिहिण्याकरता आधीचं अख्खं व्यक्तीचित्रण लिहीलत असं वाटून जातं. तशीच वेगवेगळ्या प्रसंगात अनेक व्यासपिठांवरुन तुम्ही केलेली भाषणे ऐकून तुम्हांला किती लहान लहान बाबतीत समाजाचं सजग भान आहे हे समजतं. तुमच्या विनोदाने कधी कोणाच्या मनावरती ओरखाडा काढला नाही. मात्र आणिबाणीच्या काळात त्याच विनोदाला धारदारपणा आणायला तुम्ही बिचकला नाहीत. माझ्या सारख्या लाखो टवाळांना खर्‍या अर्थाने विनोद आवडायला लावलेत. त्यांनाही "कोट्याधिश" बनवलंत.


हे सगळं लिहीण्याचा प्रपंच इतक्यासाठीच की माझ्यात जे काही थोडंफार शहाणपण, सामाजिक भान आहे, "माणूस" म्हणून समोरच्याला समजुन घ्यायची इच्छा आहे त्यात माझ्या आजी-आजोबा, आई-वडील, अत्यंत जवळचे नातेवाईक यांच्या शिवाय तुमचाही वाटा आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचतय यावरही माझा विश्वास आहे. कारण तुम्ही कुठल्याही क्षणी आसपास प्रकट होऊ शकता हे मला माहीत आहे, अगदी कधीही .... आत्ता यशोधनला पुण्यात फोन लावला तर "हॅलो" ऐवजी दुपारची झोपमोड झाल्याने आवाजाला जो नैसर्गिक तुसडेपणा येतो त्याच तुसड्या आवाजात "काय आहे???" विचारेल तेव्हा ..... किंवा यमी पेक्षा सहापट गोरा असलेला माझा मित्र भेटल्यावर ...... ट्रेकला गेल्यावर चिखल - मातीत उठबस करुन आमची चड्डी शंकर्‍याच्या चड्डीहुनही अधिक मळखाऊ होईल तेव्हा ..... कुणी नव्याने बांधायला घेतलेले घर दाखवायला नेईल तेव्हा ....... किंवा अगदी पानवाल्याच्या गादिसमोर उभे असू तेव्हा देखिल तुम्ही आसपासच असाल. कारण आधीच म्हणालो तसे तुम्ही "चिरंजीव" आहात.

- सौरभ वैशंपायन

Thursday, September 18, 2014

नाटकवाले पु.ल. - सुभाष इनामदार

नोव्हेबरात पुण्यात सुरू होत असतो पुलोत्सव. साहित्य, नाट्य, चित्र, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आशा विविध अंगानी फुलणारे आणि तमाम मराठी मंडळींचे लाडके म्हणजे. पु. ल. देशपांडे.
अनेकविध कलांचा हा बादशहा. वाणीत ओजस्विता. तर लेखणीत विनोदाचा नटखट बाज. थोडे मागे वळून पाहिले तर नाटकाने पुलंना नाव, किर्ती दिली. त्यांच्या नाटकावरील प्रेमाच्या अनेक गोष्टी रसिकांच्या आठवणीच्या कप्प्यात घर करुन आहेत. अनेकांनी पुलंच्या नाटकाविषयी, नाट्यक्षेत्रातल्या त्यांच्या कर्तृत्वाविषयी नोंद करून ठेवली आहे. या निमित्ताने ती पोत़डी तुमच्यासारख्या जाणकांरांसमोर खुली करण्याचा हा प्रयत्न आहे.
--------------------------------------------------------
नाटकात मी लेखक,दिग्दर्शक, नट अशा निरनिराळ्या सोंगात वावरलो. मला सगळ्यात अधिक आनंद मिळत गेला तो नाटकांच्या तालमीत. पहिला प्रयोग हे प्रवासातला शेवटचा मुक्काम गाठण्यासारखं असते. पण मजा असते ती प्रवासातल्या त्या मुक्कामापर्यंतच्या वाटचालीत. एखाद्या मित्राचं रहस्य उलगडावं तशी वाक्य उलगडत जात असतात.

एखादे कॉम्पोझिशन जरा इकडून तिकडे फिरविले की.. त्या चित्रात निराळाच रंग भरत असतो. एखाद्या वाक्याचा चढ-उतार, एखादा पॉज, एंट्रीच्या वेळची एखादी हालचाल, एखाद्या नटाचा किंवा नटीचा अकल्पितपणे साधलेला अभिनयातला बारकावा- तालमीत एखाद्या पात्राच्या अभिनयाचा उठाव येण्यासाठी सुचलेला बिझनेस, इतकेच नव्हे, तर अनपेक्षितपणाने उदभवणा-या अडचणा, त्या सा-या उत्सुक क्षणांतून पहिल्या प्रयोगाच्या दिशेला हे तालमीचं जहाज प्रवास करीत असते. ह्या तालमीत ज्याला मजा घेता आला नाही त्याला नाटकात रमण्यात रस नसून नुसते मिरवण्याची आवड आहे हे ओळखावे आणि इतकी सगळी धडपड करूनही पहिल्या प्रयोगाच्या वेळी आपल्या स्वप्नातही नसलेल्या ठिकाणी दाद मिळून जाते किंवा अपेक्षित प्रतिक्रियेच्या क्षणी प्रेक्षागार ठप्प होउन बसते तो अनुभव निराळाच.

कलेत विचार हवा. पण केवळ तार्कीक विचारातून कलेचे घुमारे फुटत नाहीत. हा प्रपंच तकार्तीत असतो. इथे बे दुणे चार करण्यात हाशील नसून बे दुणे पाच किंवा तीन करण्याची किमया साधण्यातच गंमत आहे. सोळा मात्रांचा हिशेब दाखवीत ही साधणे ही कारागीरी झाली. पण ऐकणा-याच्या डोक्यातून मात्रांचा हिशेब घालवून अकल्पित भेटलेल्या प्रियसी सारखी समेची भेट घडवून आणण्याला संगीतात श्रेष्ठ मोल असतं. कुणीसं म्हटलय ते खरं आहे... एक होता राजा आणि एक होती राणी.- इथे नाटक सुरू होत नाही. तर एक होता राजा आणि एक होती राणी पण...त्या `पण` पासून नाटक सुरू होतं. सारं आयुष्य हा पण जो काही नाना प्रकारचे खेळ मांडतो त्यातलं रहस्य शोधताना कसं निघून गेले ते कळत नाही. म्हणूनच तर प्रत्येक नाटकाच्या तालमी सुरू झाल्या की नवे सुरवातीचे दिवस सुरु होतात.
- पु.ल.

-------------------------------------------------------------
पीएल म्हणजे नुसता विनोद व हशा नाही. या विनोदाच्या पलिकडे एक सश्रध्द, न्यायान्यायाच्या प्रश्नात तीव्रतेनं गुंतलेलं समंजस आणि प्रागतिक असं मन आहे. असे अस्वस्थ झालेले पुलही मी पाहिलेले आहेत. अत्याचार, अन्याय, जुलूम, जबरदस्ती इत्यादि गोष्टींनी ते अशांत होतात. त्याचप्रमाणे बाबा आमट्यांसारख्या नवसंतांच्या कार्यदर्शनानं ते पूर्णतः जिंकले जातात आणि आपल्या सर्व शक्ति पणाला लावून अशा कामासाठी प्रत्यक्ष राबतातही. अतिशय डोळसपणानं त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या देणग्या त्यांच्या वृत्तीच्या निर्देशक आहेत. मला पीएलचं वैशीष्ट्य हे वाटतें की, जगभर संचार करुनही त्यांचं मराठीपण कधी हरवले नाही किंवा विविध व्यवसायात वावरुनही त्यांच्या अंतरंगातील माणुसकीची भावना कधी विस्कळीत झाली नाही.
- वि वि शिरवाडकर

-----------------------------------------------------------
पुलंचे बहुतांश लेखन पाहण्यासारखे आहे. एकेका अतिरेकी प्रवृत्तीवर विनोद करण्यामागे सुध्दा पुलंमधला नाटककार किंवा बहुरुपी प्रभावी ठरतो. त्यांच्या लेखनातसुध्दा एकेका प्रवृत्तिदर्शक व्यक्तिच्या नकला होत आहेत किंवा अतिरेकी प्रवृत्तीची चेष्टा चालू आहे असा अनेकदा भास होतो. या दृष्टीने पुलंची शैली पाहण्यासारखी आहे. लेख लिहिताना आपण रंगमंचावर आहोत आणि सभोवार प्रेक्षक असून आपले लेख ` ऐकत` आहेत असा खुद्द पुलंचाही समज असतो की काय असे वाटू लागते. पुलंनी मलाच मागे एका मुलाखतीत सांगितलेले आहे की, `साहित्य हे खरे मुळात उच्चारीच ( स्पोकन) आहे. लिखित किंवा पुस्तक ही एक सोय आहे. वाक्य हे अर्थानुसार उच्चारावे लागते. ते उच्चारताच एगदी निकटवर्ती असा अर्थ प्रतीत झाला पाहिजे. खरे तर ही भूमिका नटाची आहे.` पु.ल हे नट-साहित्यिक आहेत. नट, नाटककार आहेत. काहीही लिहिताना नट ते कसे उच्चारील याकडे त्यांचे लक्ष असते.
पुलंना निसर्गतःच उच्चारांची, ध्वनीची एक वेगळी जाण आहे. ती तेवढ्या प्रमाणात आज कुणाला आहे असे वाटत नाही. ते कितीतरी वेगळ्या आवाजात बोलू शकतात.ती एक मोठी देणगी आहे. विविध त-हांनी ते नकला करू शकतात. परंतु या देणगीचा मराठी रंगभूमीला फार मोठा फायदा झाला नाही.
-जयवंत दळवी.

------------------------------------------------------------
पु.ल. देशपांड्यांच्या रंगभूमिवरील कामगिरीकडे पाहिले की असे वाटते की, पु. ल. म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक बेट आहे. ते आशा अर्थाने की नाट्य-साहित्याच्या प्रांतात त्यांनी खास असे कोणी शिष्य निर्माण केले नाहीत. आचार्य अत्र्यांप्रमाणे त्यांना ही नाट्यलेखन व दिग्दर्शन यांच्याखेरीज महत्वाची व्यवधाने होतीच. परदेशी रंगभूमीचा अनुभव त्यांनी अत्र्यांपेक्षा जास्त जाणकारीने घेतला आणि नाट्यरचनेच्या बाबतीत अत्र्यांप्रमाणे संकेतप्रिय राहून समाजमनावर मात्र प्रचंड मोहिनी घातली. पु.लं.चे श्रेष्ठत्व हेच की, पुढे त्यांना मराठी रंगभूमीची अवघी कलात्मक अस्मिताच ढवळून काढली, तिचे सव्वा शतक जणू एकसमयावच्छेदेकरून प्रेक्षकांपुढे उभे केले आणि किमान आणखी एक शतक पुरेल इतके चैतन्य तिला दिले.
-ज्ञानेश्वर नाडकर्णी

------------------------------------------------------------
`गृहदाह` या नाटकाच्या निमित्ताने आम्ही एकत्र येण्याचा योग आला. तो काळ माझ्या जीवनातला सोनेरी काळ! कारण पी. एल. माझ्या अगदी जवळ आला होता तो याच काळात. त्या काळात तो कोणी मोठा होता असं नव्हे. पण या माणसात काही तरी जादू आहे खास असं मला राहूनराहून वाटायचं. त्याचा सहवास एखाद्या गुलाबाच्या सुगंधासारखा-सदैव हवाहवासा वाटायचा.
पी. एल. एतका बुध्दिमान, रसिला, प्रेमळ आणखी पुष्कळ काही असूनदेखील माल तो आवडतो तो एक माणूस म्हणून. १९५०- मध्ये `तुझे आहे तुजपाशी` या नाटकामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. यावेळी त्याच्यातला दिग्दर्शक मला दिसला. . नाटकामुळे पी.एल.नं लोकप्रियतेचे शिखर गाठलं तर या नाटकात मला डॉ. सतीशची भूमिका देउन त्यानं मला लोकप्रियतेच्या टेकडीवर आणून ठेवलं. पी.एल. नं अशा रितीने कितीतरी कलावंताना त्यांचा हात धरून प्रसिध्दीच्या झोतात आणले आहे.
-अनंत वर्तक

-----------------------------------------------------------------
अशा अनेकविध कलावंतांच्या आठवणीच्या पोतडीत पुल दडले आहेत. अखेरपर्यंत हसवितानाही गंभीर करणारा विनोद पुलंनी महाराष्ट्राला, मराठी भाषेला दिला. त्यांच्या कोट्यांवर महाराष्ट्रातला एक वर्ग जीवापाड प्रेम करतो. त्यांच्या नाटकांचे आजही प्रयोग होत आहेत. त्यांच्या वाचनांचे, कथांचे. एकपात्री प्रयोगांची आजही मागणी आहे. असा कलावंत हा नशीबाने मराठी भाषकांना लाभला. त्या पुं.लंच्या स्मृतीना वंदन करून त्यांची सहजता, अभिनय आणि हजरजबाबी लेखनशैली आजरामर राहो, हिच इच्छा.

सुभाष इनामदार, पुणे
Subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob_ 9552596276

Tuesday, June 24, 2014

विनोदाने पुलकित करणारे पु.ल. देशपांडे - आरती नाफडे

पु. ल. देशपांडे २००० सालात १२ जून रोजी आपण सर्वांचा निरोप घेऊन गेले. पण तमाम महाराष्ट्रातील जनता ‘निरोप आमचा कसला घेता’ जेथे विनोद तेथे पु. ल. असे म्हणत पु. ल. ची स्मृती कायम जागृत ठेवली.

पु. ल. म्हणजे विविध गुणांची खाणच. त्या खाणीतून आपण विनोदाचं गाठोड बाहेर काढलं व उघडलं तर त्यांच्या विनोदातील वैशिष्ट्ये त्यांच्या विनोदात विपुलतेने आढळतात. पु. ल. सबकुछ असं आपण नेहमी म्हणतो व वाचतो, तर हे सबकुछ कसं अवगत होत गेलं याचा मागोवा घेताना पु. ल. सांगतात, चार्ली चॅप्लीन आणि वॉल्ट डिस्ने यांना शांततेसाठी असणारं नोबेलचं पारितोषिक द्यायला पाहिजे होतं. त्यांनी जगाला जो आनंद दिला तितका आनंद दुसरं कोणीही देऊ शकलं नाही. पु. ल. च्या मनात दडलेला महापुरुष चार्ली चॅप्लीन.

आजूबाजूची माणसं, परिस्थिती माणसावर एक संस्कार करून त्याला घडवत असतात, असं सांगताना पु. ल. म्हणतात, पार्ल्याला घराच्या ओसरीवर गाण्याचा अड्डा नेहमीच जमत असे. गाण्याचे कार्यक्रम नेहमी होत असत. पण परीक्षा आली की त्यावर बंधनपण येत असे. परंतु परीक्षा दरवर्षी येते म्हणून काय गाणं चुकवायचं का म्हणणारे वडील पु. ल. ना मिळाले आणि म्हणून गाण्याचा कार्यक्रम असला की गाण्याला ‘जातो’ अनाऊंस करायचं.
पु. ल. नी एकदा नाटक बघायला गेले असताना सिगरेट ओढली. वडील पण त्याच नाटकाला आले होते. घरी आल्यावर वडिलांना विचारलं नाटक कसं झालं? वडील म्हणाले, ‘चांगलंच झालं शिवाय तुला सिगारेटचा ठसका नाही लागला.’ अशा मोकळ्या वातावरणात विनोद फुलत गेला. पु. ल. नी लेखक व्हावं असं आजोबांना वाटे. आजोबा साहित्यप्रेमी, तर वडील गाण्याचे शौकीन. पु. ल. चे मामा स्टोरी टेलर. ते गोष्टी रंगवून सांगत असत. गाण्याची, नाटकाची व साहित्याची आवड असणारे सगे सोयरे, साध्या वातावरणातील मध्यमवर्गीय कौटुंबिक परिसर ही पु. ल. च्या जीवनातील मोठीच देणगी होय. पु. ल. म्हणतात, विनोदाचं जीवनात नेमकं स्थान कोणतं? 

विनोदाने काय दिले- या प्रश्‍नाचं उत्तर देताना त्यांच्या शब्दात, ‘विनोदानं प्रमाणाची जाणीव दिली, आयुष्यात पहिलं काय आणि दुसरं काय हे शिकवलं.

विनोद हा परमेश्‍वराची देणगी असते. तो कळण्याकरिता विशिष्ट मानसिकता लागते. पु.ल. च्या जवळ सहज विनोद आहे. तसेच उत्स्फूर्त विनोद हा पु. ल. च्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा विशेष होता. हजरजबाबीपणा व विनोदाची अशी खास शैली पु. ल. जवळ होती व म्हणूनच खाजगी गप्पांची महफील गाजविताना त्यांच्या कोट्या, विनोद भान विसरून श्रोते मंडळींना त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटत असे. फटाफट हशा हा मैफिलीची रंगत वाढविण्यात नेहमी अग्रेसर राहत असे. कारण पु. ल. चे विनोद वा कोट्या गुदगुदल्या करून निर्मळ आनंद देणार्‍या असत. घरातील चार पिढ्या एकत्र बसून विनोदाचा आनंद लुटू शकतात.
त्यांच्या जबरदस्त निरीक्षणशक्तीमुळे पु. ल. सहज विनोदाचे माध्यमातून लोकांमध्ये सुसाट वार्‍यासारखे पसरत. स्वत:वर कोटी व विनोद पु. ल. करीत. स्वत:चा व सुनीताबाईंचाही अपवाद करीत नसत. सुनीताबाई पु. ल. ना सारखा औषधाचा व खाण्यापिण्याचा सल्ला देत तेव्हा पु. ल. त्यांना जाहीरपणे ‘उपदेश पांडे’ म्हणायचे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकदा पु. ल. ना म्हणतात, तुमच्या घरी काय तुम्ही अन् सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार. पु. ल. नी गंभीर चेहरा करीत म्हटले, बायको तुमच्यावर तलवारीचे सारखे वार करते व तुम्ही ढाल धरून ते चुकवीत आहात असे चित्र असते. पु. ल. म्हणतात, आमच्या घरी नुसता हास्यकल्लोळ नसतो तर सर्व कल्लोळ असतात. अगदी संशयकल्लोळ सुद्धा.
विनोद हा पु. ल. च्या लेखनाचा स्थायीभाव. निखळ विनोद निर्मिती करून पु. ल. नी प्रेक्षकांचे मनात अढळ व मराठी भाषेत सम्राटपद मिळवलं आहे. 
पु. ल. च्या विनोदी साहित्य क्षेत्रातील त्यांचे स्थान म्हणजे देदीप्यमान चमकणारा तारा आहे. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, गणगोत, व्यक्ती आणि वल्ली अशी कितीतरी पुस्तकं विनोदाबरोबरच माणसं समजून घेण्याची मालिकाच आहे. जीवनाचा आनंद भरभरून लुटायचा असेल तर पु. ल. म्हणतात, एक बाजाची पेटी आणि ओंजळभर फुलं कायम घ्यावीत म्हणजे सूर आणि सुगंध यांनी जीवन सुंदर होते. अशा सुंदर जीवनात आयुष्यभर सर्वांना आनंद देत हसवीत हसवीत ते निघून गेले. पण असं तरी का म्हणायचे. कारण त्यांच्या विनोदी साहित्य रूपाने ते आपल्यात आहेतच. कवी कुसुमाग्रज म्हणत, पु. लं. चे साहित्य म्हणजे एक ‘पुलबाग’ आहे. कवी मंगेश पाडगावकरांनी पु. लं. च्या अमृत महोत्सव प्रसंगी लिहिले ते असे.

‘पु. ल. स्पर्श होताच दु:खे पळाली
नवा दूर, आनंदयात्रा मिळाली
निराशेतूनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली’

पु. ल. स्वत:बद्दल म्हणत की, ब्रह्मदेवानं त्यांना ‘हसवण्याचा गुण’ एवढेच भांडवल देऊन इहलोकी पाठवलं, जीवनातले चांगले पाहून ते आनंदले, तो आनंद त्यांनी भरभरून वाटला.
त्यांच्या साहित्यरूपी आनंदयात्रेत सामील होणं, त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेऊन आनंद लुटणं हे त्यांच्या स्मृतिदिनाचे दिवशी खरे स्मरण होय.

आरती नाफडे 
तरुण भारत
१३ जून २०१४

Thursday, June 12, 2014

अजि म्या पु.ल. पाहिले

महाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात, ठाण मांडून बसतात आणि मग जे काही ठरवलं असेल ते तडीस नेल्याखेरीज मन स्वस्थ बसू देत नाही. ते वयच तसं असतं, मग मी तरी त्याला अपवाद कसा असणार? त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की "कसं?"
वार्षिक परिक्षा संपल्यावर एकदा 'गणगोत' हे पुस्तक वाचत बसलो असता अचानक मनात विचार आला.....महाविद्यालयालयीन किंवा ग्राम्य भाषेत सांगायचं तर 'डोक्यात किडा वळवळला'...की आपण यांना भेटायला हवं, नव्हे भेटायचंच.
पुस्तक वाचून संपवलं आणि मेजावर ठेवणार तोच माझ्या हातातून सटकलं. खाली पडू नये म्हणुन पटकन दोन बोटात धरलं तेव्हा उचलताना पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाचे हक्क वगैरे लिहीलेल्या पानावर पु.लं.चा पुण्यातला पत्ता दिसला आणि माझी ट्युब पेटली. सुट्टीत पुण्याला मामाकडे जाणार होतोच. म्हटलं तेव्हा सरळ त्यांच्या घरी जावं. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात त्यांची घरं असल्याने ते नक्की कुठे असतील हे कसं समजणार ही सुद्धा समस्या होतीच. शिवाय फोन करून भेट ठरवायला मी काही पत्रकार नव्हतो किंवा कुठला कार्यक्रम ठरवायला जाणार नव्हतो. पण माझ्या नशीबात त्यांचं दर्शन घडणं लिहिलं होतं बहुतेक. कारण दुसर्‍याच दिवशी एका वर्तमानपत्रात ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचं वाचनात आलं आणि ठरवलं की ह्या पुण्याला मामाकडे जाईन तेव्हा आगाऊपणा करून सरळ त्यांच्या घरीच जायचं.
मग ४ जून १९९६ च्या गुरुवारी दुपारी साधारण चार-साडेचारच्या सुमारास मी आणि माझा मामेभाऊ सुजय असे पु.ल. रहात असलेल्या रूपाली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या सदनिकेसमोर उभे राहिलो. आम्ही भलतं धाडस केलं होतं खरं, पण पु.लं.ना आमच्यासारख्या आगाऊमहर्षींकडून त्रास होऊ नये म्हणून सदैव सजग असणार्‍या सुनीताबाई आम्हाला आत तरी घेतील की नाही अशी भीती होती. "शेवटी आलोच आहोत तर बेल तर वाजवूया, फार फार तर काय होईल, आत घेणार नाहीत, भेटणार नाहीत, एवढंच ना" अशी स्वत:चीच समजूत काढून आम्ही धीर केला आणि बेल वाजवली". दार उघडलं गेलं आणि........
..........."अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. समोर साक्षात पु.ल.! स्मित
मी भीत भीत म्हणालो, "आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला, तुमची स्वाक्षरी घेण्यासाठी आलो आहोत, आम्ही येऊ का?". मी मनात हुश्श केलं.
"आत या," पु.ल. म्हणाले. आम्हाला हायसं वाटलं. आम्ही दोघांनी त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवायचा असं ठरवलं होतं. खरं सांगतो, त्यांनी त्याक्षणी "चालते व्हा" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.
थोडं विषयांतर होतंय, पण एक उदाहरण देऊन कारण सांगतो. इथे मला लौकीकदृष्ट्या नुकसान झालं तरी त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याच्याशी संबंधीत एक किस्सा आठवला.
गॅरी सोबर्स यांनी इंग्लंड मधल्या एका काऊंटी सामन्यात माल्कम नॅश नामक गोलंदाजाला एका षटकात, म्हणजेच सहा चेंडूंवर, सहा षटकार मारले. पु.लं.नीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' तसा तो राणीच्या देशातही असावा, कारण नॅशने आपली गोलंदाजी धुतली गेली म्हणून रडत न बसता त्याला ते सहा षटकार कसे मारले गेले ह्याचं रसभरीत वर्णन करणारे कार्यक्रम (टॉक शो) सादर करून त्याच्या आख्ख्या क्रिकेट कारकिर्दीत कमावले नसतील इतके पैसे कमावले.
तद्वत "आम्हाला हाकलले, पण कुणी? प्रत्यक्ष पु.लं.नी" असा मित्रमंडळींमध्ये, खाजगी का होईना, कार्यक्रम त्यांना 'वीट' येईल इतक्या वेळा सादर केला असता फिदीफिदी
आम्हाला आत यायला सांगून पु.ल. सोफ्यावर बसले. त्यांच घर अगदी त्यांच्यासारखंच साधं आणि नीटनेटकं. समोर भिंतीवर चार्ली चॅपलीनचं एक पोस्टर. आम्ही आपापल्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. मी माझ्या हातातल्या कॅमेर्‍याकडे बोट दाखवून त्यांना "आमच्याबरोबर तुमचा एक फोटो काढू का?" अशी विनंती केली. पण त्यांनी "नका रे, आजारी माणसाचा कसला फोटो काढायचा" असं म्हणून नकार दिला. मी थोडा खजील झालो, कारण त्यांचे गुढगे दुखत होते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होतं. त्यांनी असं म्हणताच सुजयच्या चेहर्‍यावर एक नाराजीची सुक्ष्म लकेर उमटलेली मला दिसली. "ठीक आहे, माफ करा. स्वाक्षरी बद्दल धन्यवाद" असं कॄतज्ञतेने म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो. सुनीताबाईंकडे पाणी मागितलं व पिऊन लगेच निघालो.
माझ्यासाठी "आता मी मरायला मोकळा" असं वाटण्याचा तो क्षण होता.
"काय हे, फोटो का नाही काढून दिला, पु.ल. आहेत ना ते", आम्ही इमारती बाहेर आल्यावर सुजयची चिडचिड बाहेर पडली. लहान मूल रुसल्यावर कसं दिसेल तसे हुबेहुब भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. "अरे सुजय", मी म्हणालो, "तू एक लक्षात घे, ते पु.ल. असले तरी भारतीय रेल्वे किंवा एस.टी. सारखी 'जनतेची संपत्ती' नाहीत. त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची नाही का? आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल?" आता सुजयची नाराजी थोडी कमी झालेली दिसली.
"आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की!"
"प्रसाद?" सुजय बुचकळ्यात पडला. "अरे आपल्याकडे ह्या साहित्यातल्या देवाचा स्वाक्षरीच्या रूपाने प्रसाद आहेच की". असं म्हणताच सुजयची खळी खुलली.
मी पु.लं.ना प्रत्यक्ष भेटलो हे ऐकल्यावर द्राक्ष आंबट लागलेली एक कोल्हीण...आपलं...माझी एक मैत्रीण म्हणाली, "हँ, त्यात काय पु.ल. आपल्या पुस्तकातून सगळ्यांनाच भेटत असतात". खरय की - लेखक आणि कवी त्यांच्या पुस्तकातून, खेळाडू मैदानात किंवा टी.व्ही. वरील थेट प्रक्षेपणातून आणि कलाकार त्यांच्या कलेतून सगळ्यांनाच भेटत असतात. पण यांपैकी आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.
pula04061996_01.JPG
मुंबईला परतताच वर्तमानपत्रातला पु.लं.चा एक फोटो त्या कागदावर चिकटवून तो स्वाक्षरीचा कागद फ्रेम करून घेतला. वरच्या चित्रात दिसणारी ती फ्रेम पुण्यातील माझ्या घरात त्या जादूई क्षणांची आजही आठवण करून देते आहे.
मी ज्या दिवशी पु.लं.ना भेटलो तो दिवस ४ जून आणि त्यांची पुण्यतिथी १२ जून हे दोन्ही दिवस जवळ आले आहेत असं लक्षात आलं आणि ह्या आठवणी सहज शब्दबद्ध झाल्या. तुम्हाला कुणाला पु.ल. भेटले असल्यास तुम्हीही तुमच्या आठवणी सांगा.
मंदार जोशी
मुळ स्त्रोत -- > http://www.maayboli.com/node/16070

Tuesday, April 29, 2014

खरंच.. शिवी कधी देऊ नये? - डॉ. तारा भवाळकर

खूप आदर्श म्हणून नावाजलेल्या एका ग्रामीण भागातील शाळेच्या भेटीतील प्रसंग! सुप्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे शाळेत आले होते. व्हरांड्यात एक-दोन बेसीन्स होती. साबण, हात पुसण्यासाठी छोटे टॉवेल्स.. अशी छान सोय होती. बहुधा मधल्या सुट्टीत डबे खाण्याआधी व नंतर हात धुण्यासाठी ही सोय असावी, असे पु. लं.ना वाटले. मुख्याध्यापकांचा हा साक्षेपीपणा पाहून पु. ल. खूश झाले आणि त्यांनी तसे मुख्याध्यापकांना बोलून दाखविले. त्यावर तत्परतेने मुख्याध्यापकांनी खुलासा केला- ''नाही. तसंच केवळ नाही. म्हणजे ते आहेच, पण माझा मुख्य हेतू वेगळा आहे.'' ''कोणता?'' -''काय आहे.. ही सगळी बहुतेक ग्रामीण भागातील त्यातही कामगारांची मुले-मुली आहेत. मधल्या सुट्टीत मैदानावर खेळताना खूप धुडगूस घालतात -भांडतात.. तेही स्वाभाविकच आहे म्हणा.. पण पुष्कळदा फार वाईट वाईट अपशब्द ('शिव्या' उच्चारणे मुख्याध्यापकांना अवघड वाटले असावे) उच्चारतात. मुलांना नीट वळण लावण्यासाठी ही सोय आहे''.

''पण ही बेसीन, साबण आणि अपशब्द यांचा काय संबंध?'' पु.लं.नी आपली शंका बोलून दाखवली.
''माझं मुलांकडे मधल्या सुट्टीतही बारीक लक्ष असतं. कोणी अपशब्द उच्चारला की, मी त्या मुलाला जवळ बोलावतो, शांतपणे विचारतो, ''तू आता काय म्हणालास?'' तो मुलगा ओशाळतो.. ''नाही सर, तुमच्यासमोर कसं म्हणू ते..?'' ''का?''- ''वाईट आहे तो शब्द''- ''मग तुझ्या इतक्या छान तोंडातून वाईट शब्द उच्चारलास, आता तोंडही वाईट झाले ना!'' ''हो सर!''- मुलगा कबूल करतो. 
मग मी त्याला सांगतो.
''तर मग त्या बेसीनवर जा. साबणाने नीट तोंड धू. चूळ भर आणि स्वच्छ हो.''

मुलगा मुकाट्याने सरांची आज्ञा पाळतो. पु.लं.नी हे सगळे शांतपणाने ऐकून घेतले. पण बहुधा त्यांच्या प्रवृत्तीनुसार ते मनातल्या मनात मिस्कीलपणे हसत असावेत. (हा माझा अंदाज). पण प्रकटमध्ये ते घाईगर्दीने म्हणाले,
''अहो नको सर. असे त्यांचे तोंड बंद करू नका. तुम्ही त्यांची तोंडे बंद केलीत, तर ती मुले हातात धोंडे घेतील''- सरांचा चेहरा प्रश्नार्थक! पुढे खुलासा- ''काय आहे सर, मनातल्या असंतोषाला वाट करून देणे, ही माणसाची गरज आहे आणि त्यासाठी शब्द हा त्यातल्या त्यात निरुपद्रवी पर्याय आहे. बोलले की मन मोकळे होते. मनात असंतोषाची खदखद राहत नाही आणि सगळीच माणसे एकमेकांशी अशीच काहीशी वागतात, बोलतात, मोकळी होतात आणि पुन्हा एकमेकांशी सामान्य व्यवहार करतात. शिव्या या मानसिक स्वास्थ्यासाठी एक प्रकारचे 'सेफ्टी व्हॉल्व' असतात. ही मुलेसुद्धा थोडा वेळ भांडतात, शिव्या देतात आणि थोड्या वेळाने सगळे एकत्र येऊन डबे खातात. शाळा सुटली की पुन्हा गळ्यात गळे घालून घराकडे जातात.''

पु.लं.चे नाव आणि त्यांचा दबदबा, शिवाय सरांची अभिजात नम्रता असल्याने त्यांनी फार प्रतिवाद केला नाही. तरी म्हणाले, ''पण मग मुलांना वळण कसे लावायचे?''- ''काय आहे सर, मुलांची भांडणे खेळाबरोबरच संपून कशी जातील, ती पुढे हिंसक वळण घेणार नाहीत, एवढे आपण पाहावे, असे मला वाटते.'' 
वारणेच्या साखर कारखान्याच्या परिसरातील या शाळेला मी भेट दिली, त्या वेळी शाळा फिरून दाखविताना मुख्याध्यापकांनी ही पु.लं.च्या भेटीची हकीकत सांगितली होती.

वारणा परिसर-उद्योगाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे मोठे कल्पक आणि गुणग्राहक होते. कारखान्याबरोबरच परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी विविध उपक्रम सुरू केले आणि त्यासाठी शोधून शोधून गुणी माणसे आणून एकेक उपसंस्था त्यांच्यावर सोपवली होती. प्रस्तुत मुख्याध्यापकांना एका नामवंत शाळेतली त्यांची कीर्ती पाहून येथे आणले होते. व्हिक्टोरियन शिस्तीतले हे मुख्याध्यापक श्री. महाबळेश्‍वरवाला (बहुधा पारशी असावेत). मी गेले तेव्हा तात्यासाहेबच प्रथम भेटले होते. तेव्हाचा हा प्रसंग.

माणसाने शब्द जपून वापरावेत. कोणी दुखावले जाऊ नये, अशी सभ्यतेची र्मयादा सर्वसाधारणपणे असते. म्हणून मागच्या टिपणात 'शब्द वापरा जपून..' कशासाठी? ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्यक्ष जीवन पूर्ण आदर्श नसते. मग त्या जीवनातून उमटणारी भाषा तरी पूर्ण गोड-गोजिरी कशी असेल आणि सतत कोणत्याही गोडाचा कंटाळा येतोच. म्हणून मधूनच झणझणीत चटणीसारखी एखादी शिवीही आपोआप येत असावी तोंडात! फक्त तिची र्मयादा वेळेवर ओळखणे महत्त्वाचे! 'शिवी' हे 'शिव'चे स्त्रीलिंगी रूप! शुद्ध करते मनाला ते! असे गमतीने म्हटले जाते. पु.लं.ना तेच अभिप्रेत असावे.

डॉ. तारा भवाळकर
लोकमत
६/२/२०१४

Wednesday, February 12, 2014

नामस्मरणाचा रोग

..जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. हे सोपे नाही. त्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्रांचा दुरावा सहन करावा लागेल. वयाने वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेवायचा असे होत असेल तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ओळखून त्याप्रमाणे निर्धाराने वागावे लागेल. वाढत्या वयाचा शहाणपणा वाढण्याशी नैसर्गिक संबंध असतोच असे नाही. लोक गतानुगतिक असतात. मतपरिवर्तनाला सहजपणे तयार नसतात. त्यामुळे मित्रांचासुद्धा दुरावा पत्करावा लागेल.

फुले मानायचे म्हणजे पूर्वजन्म आणि कर्मसिद्धांत ही दरिद्री जनतेने दारिद्र्याविरुद्ध बंड करून उठू नये, म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. देवळातला देव दीनांचा वाली आहे, या श्रद्धेने सर्वकाही आपोआप चांगले होईल, ही भावना टाकून द्यावी लागेल. `स्तियो वैश्यास्तथाशूद्रा:' अशा प्रकारच्या `जन्माने ब्राह्मण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' असल्या माणसामाणसात भेद करणार्‍या गीतेसारख्या ग्रंथाचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथही काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत, असेच मानून वाचावे लागतील.

शंभर वर्षापूर्वी ज्या वेळी थोर विचारवंत म्हणवणारी मंडळी आपल्या बायकांना घरात चूल फुंकवत बसवायची, ज्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नसे अशा काळात, जोतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीण म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिले. महादेव गोविंद रानड्यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळले तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचे उदाहरण नाही. तेव्हा जोतीबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री - पुरुषांचे समान हक्काने वागणे दिसायला हवे. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पापपुण्याचा संबंध नसून, त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला, एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल.

स्त्रीचे एक माणूस म्हणून जगणे आणि तिच्या कपाळी कुंकू असणे किंवा नसणे याचा परस्परसंबंध ठेवता येणार नाही. किंबहुना सर्व माणसांचा माणूस म्हणू विचार होईल, त्याच्यावर त्याला समजू लागण्यापूर्वीच हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असली कसलीही लेबले चिकटवण्यात येत कामा नये. अशा प्रकारचा बुद्धीनिष्ठ आचरणाचा हा वारसा आहे. कालचे धर्मग्रंथ कालच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे रचलेले असतात. ते आजच्या परिस्थितीला उपयुक्त नसतील तर ते रचणारे महापुरुष कोणीही असले तरी त्या ग्रंथांचा भक्तिभावाने स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. ती माणसे कितीही थोर असली तरी माणसेच होती. ईश्वराचे अवतार वगैरे नव्हती. तीही चुका करू शकत होती. त्या त्या काळातले त्यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांच्यात उणीवा होत्या हे ध्यानात ठेवायला हवे.

एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवीत राहिले की, या जन्मी हवी तेवढी पापे करावी. त्यातूनच मग कागदावर `लाख वेळा `श्रीराम जयराम' लिहा, म्हणजे सर्व आधीव्याधी नष्ट होतील', हे सांगणारे महापुरुष आणि ते ऐकणारे महाभाग निर्माण होतात. ज्या देशात दुधाच्या थेंबाथेंबासाठी हजारो अर्भके आसुसलेली आहेत, तेथे दगडी मूर्तीवर जेव्हा दुधाच्या कासंड्याच्या कासंड्या अभिषेकाच्या नावाने उपड्या केल्या जातात आणि हा प्रकार राज्यकर्त्यांपासून सगळे जण निमूटपणे पहातात, नव्हे असल्या गोष्टीचे कौतुकही करतात, त्या वेळी ज्योतिबा फुले हे नाव उच्चारण्याचादेखील अधिकार आपण गमावून बसलो आहोत, असे वाटते.

एकीकडे रस्ते, चौक, विद्यालये, विद्यापिठे, वाचनालये, मंडळे अशा ठिकाणी ज्योतिबांचा नामघोष आणि दुसरीकडे पंढरपूरला विठोबाची मंत्र्यांकडून भटजीबुवांच्या दिग्दर्शनाखाली साग्रसंगीत पूजा. त्यातले खरे कुठले समजायचे आणि नाटक कुठले समजायचे ? ज्या पूजेअर्चेविरुद्ध आणि भटजीबुवांच्या संस्कृत पोपटपंचीविरुद्ध फुले बंड करून उठले, त्यांच्या पुतळयांची उद्घाटने करणारे नेते सरकारी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी तसल्या भटजीच्या पुढे पूजेला बसलेले दिसतात. कुठल्यातरी दगडापुढे नारळ फोडतांना किंवा शेंदूर लावतांना घेतलेले मंत्र्यांचेच, नव्हे तर शिक्षणसंस्थांचे कुलगुरु आणि कुलपती यांची छायाचित्रे वर्तमानपत्रांत झळकत असतात. अशा वेळी एकच प्रश्‍न मनापुढे उभा रहातो - आपण कुणाला फसवत आहोत ? ज्योतिबांना ? स्वत:ला ? कि नामस्मरणातच सर्वकाही आले असे मानणार्‍या जनतेला ? ज्योतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल, तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल.

एकदा नामस्मरण सुरु झाले कि माणसाचा देव होतो आणि बुद्धीनिष्ठ चिकित्सेची हकालपट्टी होते. कृष्ण, राम यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले. महात्मा गांधीची देवपूजाच सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धीनिष्ठांचाही देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. फुल्यांचेही नुसतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हार्‍यात बसवले, कि आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू !

एकदा देव करून पूजा सुरु झाली, कि मुळ विचार दुर टाकता येतात. जसे स्वच्छता हा मु्ळ हेतू दूर राहून वर्षानुवर्षे न धुतलेल्या पितांबराला सोवळे मानले जाते तसेच हेही आहे. देव केला कि देवपूजेचा थाट मांडणारे देवांचे दलाल भूदेव होऊन हजर. आज फुल्यांचा जयजयकार करणारे धूर्त राजकारणीही असेच पवित्र होऊ पाहताना दिसतात.

- पु. ल. देशपांडे
( सामना, २५ नोव्हेंबर १९९० )
नोंद-- हा लेख टंकुन दिल्याबद्दल पु.ल.प्रेमी कविता गावरे ह्यांचे खुप आभार.