..जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. हे सोपे नाही. त्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्रांचा दुरावा सहन करावा लागेल. वयाने वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेवायचा असे होत असेल तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ओळखून त्याप्रमाणे निर्धाराने वागावे लागेल. वाढत्या वयाचा शहाणपणा वाढण्याशी नैसर्गिक संबंध असतोच असे नाही. लोक गतानुगतिक असतात. मतपरिवर्तनाला सहजपणे तयार नसतात. त्यामुळे मित्रांचासुद्धा दुरावा पत्करावा लागेल.
फुले मानायचे म्हणजे पूर्वजन्म आणि कर्मसिद्धांत ही दरिद्री जनतेने दारिद्र्याविरुद्ध बंड करून उठू नये, म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. देवळातला देव दीनांचा वाली आहे, या श्रद्धेने सर्वकाही आपोआप चांगले होईल, ही भावना टाकून द्यावी लागेल. `स्तियो वैश्यास्तथाशूद्रा:' अशा प्रकारच्या `जन्माने ब्राह्मण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' असल्या माणसामाणसात भेद करणार्या गीतेसारख्या ग्रंथाचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथही काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत, असेच मानून वाचावे लागतील.
शंभर वर्षापूर्वी ज्या वेळी थोर विचारवंत म्हणवणारी मंडळी आपल्या बायकांना घरात चूल फुंकवत बसवायची, ज्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नसे अशा काळात, जोतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीण म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिले. महादेव गोविंद रानड्यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळले तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचे उदाहरण नाही. तेव्हा जोतीबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री - पुरुषांचे समान हक्काने वागणे दिसायला हवे. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पापपुण्याचा संबंध नसून, त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला, एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल.
स्त्रीचे एक माणूस म्हणून जगणे आणि तिच्या कपाळी कुंकू असणे किंवा नसणे याचा परस्परसंबंध ठेवता येणार नाही. किंबहुना सर्व माणसांचा माणूस म्हणू विचार होईल, त्याच्यावर त्याला समजू लागण्यापूर्वीच हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असली कसलीही लेबले चिकटवण्यात येत कामा नये. अशा प्रकारचा बुद्धीनिष्ठ आचरणाचा हा वारसा आहे. कालचे धर्मग्रंथ कालच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे रचलेले असतात. ते आजच्या परिस्थितीला उपयुक्त नसतील तर ते रचणारे महापुरुष कोणीही असले तरी त्या ग्रंथांचा भक्तिभावाने स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. ती माणसे कितीही थोर असली तरी माणसेच होती. ईश्वराचे अवतार वगैरे नव्हती. तीही चुका करू शकत होती. त्या त्या काळातले त्यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांच्यात उणीवा होत्या हे ध्यानात ठेवायला हवे.
एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवीत राहिले की, या जन्मी हवी तेवढी पापे करावी. त्यातूनच मग कागदावर `लाख वेळा `श्रीराम जयराम' लिहा, म्हणजे सर्व आधीव्याधी नष्ट होतील', हे सांगणारे महापुरुष आणि ते ऐकणारे महाभाग निर्माण होतात. ज्या देशात दुधाच्या थेंबाथेंबासाठी हजारो अर्भके आसुसलेली आहेत, तेथे दगडी मूर्तीवर जेव्हा दुधाच्या कासंड्याच्या कासंड्या अभिषेकाच्या नावाने उपड्या केल्या जातात आणि हा प्रकार राज्यकर्त्यांपासून सगळे जण निमूटपणे पहातात, नव्हे असल्या गोष्टीचे कौतुकही करतात, त्या वेळी ज्योतिबा फुले हे नाव उच्चारण्याचादेखील अधिकार आपण गमावून बसलो आहोत, असे वाटते.
एकीकडे रस्ते, चौक, विद्यालये, विद्यापिठे, वाचनालये, मंडळे अशा ठिकाणी ज्योतिबांचा नामघोष आणि दुसरीकडे पंढरपूरला विठोबाची मंत्र्यांकडून भटजीबुवांच्या दिग्दर्शनाखाली साग्रसंगीत पूजा. त्यातले खरे कुठले समजायचे आणि नाटक कुठले समजायचे ? ज्या पूजेअर्चेविरुद्ध आणि भटजीबुवांच्या संस्कृत पोपटपंचीविरुद्ध फुले बंड करून उठले, त्यांच्या पुतळयांची उद्घाटने करणारे नेते सरकारी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी तसल्या भटजीच्या पुढे पूजेला बसलेले दिसतात. कुठल्यातरी दगडापुढे नारळ फोडतांना किंवा शेंदूर लावतांना घेतलेले मंत्र्यांचेच, नव्हे तर शिक्षणसंस्थांचे कुलगुरु आणि कुलपती यांची छायाचित्रे वर्तमानपत्रांत झळकत असतात. अशा वेळी एकच प्रश्न मनापुढे उभा रहातो - आपण कुणाला फसवत आहोत ? ज्योतिबांना ? स्वत:ला ? कि नामस्मरणातच सर्वकाही आले असे मानणार्या जनतेला ? ज्योतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल, तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल.
एकदा नामस्मरण सुरु झाले कि माणसाचा देव होतो आणि बुद्धीनिष्ठ चिकित्सेची हकालपट्टी होते. कृष्ण, राम यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले. महात्मा गांधीची देवपूजाच सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धीनिष्ठांचाही देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. फुल्यांचेही नुसतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हार्यात बसवले, कि आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू !
एकदा देव करून पूजा सुरु झाली, कि मुळ विचार दुर टाकता येतात. जसे स्वच्छता हा मु्ळ हेतू दूर राहून वर्षानुवर्षे न धुतलेल्या पितांबराला सोवळे मानले जाते तसेच हेही आहे. देव केला कि देवपूजेचा थाट मांडणारे देवांचे दलाल भूदेव होऊन हजर. आज फुल्यांचा जयजयकार करणारे धूर्त राजकारणीही असेच पवित्र होऊ पाहताना दिसतात.
- पु. ल. देशपांडे
( सामना, २५ नोव्हेंबर १९९० )
नोंद-- हा लेख टंकुन दिल्याबद्दल पु.ल.प्रेमी कविता गावरे ह्यांचे खुप आभार.