Monday, April 22, 2019

'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे - स्पृहा जोशी

'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' हे वाक्य इतक्यांदा वाचून ऐकून खरंतर इतकं गुळगुळीत झालंय, पण या वर्णनामागचा माणूस इतका सदाबहार आहे, हवाहवासा आहे की त्याची जादू काही केल्या कमीच होत नाही. पु. ल. देशपांडे हे नाव आपल्या सगळ्यांसाठी आपल्या घरातलं आहे, मनातलं आहे. प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्यावर त्याचा हक्क आहे असं वाटतं. आणि 'पु.ल.' या एका शब्दाच्या उच्चाराने ओठांवर एक हलकं हसू येतच येत.                       
पुलंचं इतकं साहित्य आत्तापर्यंत वाचलंय, त्यांच्या ध्वनि-चित्रफिती ऐकल्यात, मनसोक्त हसलेय. पण 'पुलं'वरचं चरित्रात्मक पुस्तक कधी हाताला लागलं नव्हतं. ते सापडलं - मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं - 'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे - हे पुस्तक माझ्यासारख्या प्रत्येक पुलवेड्या माणसाला खूप आवडणार आहे. कारण वेगवेगळ्या अंगांनी यात 'पुलं' भेटतात. सुनीताबाई भेटतात. पुलंचा प्रचंड अभ्यास, कलाकार म्हणून त्यांनी पाहिलेलं समृद्ध अनुभवांचं विश्व, त्यांच्यातला विलक्षण प्रतिभेचा, असामान्य स्मरणशक्तीचा लेखक आणि हे सगळं करत असताना जीव जडावा असा खराखुरा, प्रेमळ, हसरा, निगर्वी, संवेदनशील माणूस. पानापानांतून आपल्याला हा थोर असूनही आपल्यातला वाटणारा माणूस भेटत राहतो. आणि कळतनकळत आपण भावुक होत राहतो. डोळे टिपत राहतो.

मंगलाताई नेहमी मस्तच लिहितात. त्यांची नर्मविनोदी खुसखुशीत शैली नेहमी प्रत्येक लिखाणात ताजीतवानी वाटत राहते. तसंच हे पुस्तक वाचतानाही होतं. मुख्य म्हणजे फक्त घटनांची जंत्री देऊन त्या थांबत नाहीत. त्या प्रत्येक बाबतीत लेखिका म्हणून त्यांचा स्वतःचा take सांगतात. पुलंवर केल्या गेलेल्या साहित्यिक आरोपांचं सप्रमाण खंडन करतात. आणि पुलंसोबतच त्यांच्या आयुष्यातलं सुनीताबाईंचं महत्त्वसुद्धा ठळकपणे अधोरेखित करतात. 'पुलं'बद्दल ज्यांना नव्याने समजून घ्यायचंय किंवा त्यांच्याबद्दलचे काही संदर्भ तपासायचेत तर ते सगळे या एकाच पुस्तकात नक्की सापडतील. आणि 'पुलं' हे ज्यांचे ज्यांचे 'प्रेयस' आहेत, त्या त्या सगळ्यांना तर ही वाचन सफर नक्की आवडणार आहे. या पुस्तकातल्या शेवटच्या पॅरेग्राफवर मी थबकले, आणि तो पुन्हा पुन्हा वाचला. -
'भय इथले संपत नाही..' ही कवी ग्रेस यांची कविता अनेकांना माहित आहे. त्या अर्थानं नसलं, तरी आज आपल्यालाही पुष्कळ प्रकारच्या भयानं ग्रासलं आहे. भाषेची तरलता, सुरांची निरागसता, माणसामाणसांमधला मनमोकळा संवाद, परस्परविश्वास हरवत चाललेले जाणवताहेत. अशा वेळी पुलंनी मागे ठेवलेले काही गहिरे सूर, काही उत्कट संवाद, चिमटीत अलवारपणे पकडलेले काही हळवे क्षण आणि दिलखुलास हास्याची अधूनमधून केलेली पखरण आठवावी आणि 'हे सरता संपत नाही.. चांदणे तुझ्या स्मरणाचे' असं म्हणून जमेल तेव्हा पुलंना ऐकत-बघत-वाचत राहावं, एवढंच आपल्याला शक्य आहे. आयुष्याच्या एरवीच्या रखरखाटात असं एखादं हक्काचं चांदणं आपल्या जवळ असावं, हेच केवढं तरी नाही का?"

१२ जून २००० रोजी पुलंचं निधन झालं. तेव्हा मी खूप लहान होते. पाचवीत होते. पुलंची अंत्ययात्रा टी.व्ही. वर दाखवत होते. माझी आई घळाघळा रडत होती. मला कळतच नव्हतं, की आपली अजिबात ओळख नसलेल्या एका म्हाताऱ्या माणसासाठी, ते गेले तर आई का रडतेय? मी आईला विचारलंसुद्धा... तर ती एवढंच म्हणू शकली, 'पुलं गेले आपले... तुला आता नाही कळणार बाळा!' कोणीतरी आपलं गेलं, हे आता आपल्याला कधीच पुन्हा बघायला मिळणार नाहीत... एवढंच मला त्या वेळेला कळलं. साधारण सातवीत असताना तिने मला 'व्यक्ती की वल्ली' दिलं. आणि त्या वेळेला ते वाचून आत कुठेतरी कळ जाणवली, की चितळे मास्तर, सखाराम गटणे ची गोष्ट रंगवून रंगवून सांगणारे 'आपले' आजोबा गेले आहेत.

पण एक बरं आहे, या आजोबांनी ४५ पुस्तकं लिहून ठेवलीयेत. बाकी इतर अनुवादित साहित्य, भाषणं वेगळीच ! त्यामुळे 'गोष्ट सांगा' म्हणून त्यांच्याकडे कधीही हट्ट केला, तरी नात्यागोत्याच्या नसलेल्या, कधीच न पाहिलेल्या मी आणि माझ्यासारख्या अगणित नातवंडां-पतवंडांना ते कधीही नाराज करत नाहीत. हे 'मैत्र' आमच्यासाठी लाखमोलाचं आहे.
- स्पृहा जोशी

2 प्रतिक्रिया:

Anonymous said...

पु. ल देशपांडे एक अविस्मरणीय व्यक्तीमत्व मध्यमवर्गीय समाजमनाचा आरसा !

Anonymous said...

पु. ल. देशपांडे एक अविस्मरणीय व्यक्त्तिमत्व मध्यमवर्गीय समाजमनाचा आरसा !