Friday, July 5, 2024

तुमने हमको हसना सिखाया.. - (निमिष वा.पाटगांवकर)

".....इंग्लडला जायला कोणती इंजेक्शने घ्यावी लागतात ह्या प्रश्नाला फक्त दमा, रक्तक्षय आणि बाळंतरोग याखेरीज बहुतेक सगळ्या रोगांची नावे मला सांगितली गेली.. ज्याला जे सुचेल ते तो सुचवत होता. पिवळ्या तापावर फारच दुमत होते. पिवळा ताप फक्त अमेरिकेला जायला अडवतो हे त्यांचे म्हणणे".. "अपूर्वाई"तल्या या प्रसंगाला मी नुकताच जेव्हा सामोरा गेलो तेव्हा लक्षात आले कि पु.ल. आपल्या आयुष्यात किती भरून राहिले आहेत.

वेस्ट इंडिजला विश्वचषकासाठी जायच्या तयारीचा भाग म्हणून मला पिवळ्या तापाची लस टोचून घ्यायची होती. आपण वेस्ट इंडिज म्हणतो पण हे वेगवेगळे देश आहेत आणि बरीच छाननी केल्यावर कळले फक्त गयानाला जायला किंबहुना तिथून परत येताना हा पिवळा ताप टोचून घेतलेला आवश्यक आहे. हि लस कुठे मिळते कळल्यावर विमानतळाजवळच एक आरोग्य सुविधा केंद्र आहे तिथे हि लस आठवड्यात फक्त दोनदाच मिळते हे कळले. असेही कळले कि एकदा लसीची बाटली उघडली कि दहा लोकांना ती दिली जाते नाहीतर ती वाया जाते तेव्हा तिथे दहा लोकं असतील का? हा माझ्यापुढे वेगळाच प्रश्न होता. पुन्हा अपूर्वाईचाच प्रसंग बघितला तर या गडबडीत पासपोर्ट मात्र मी न विसरता नेला पण फक्त अर्धा बुशशर्ट घालायचा विसरलो आणि मला तिथे सलमान खान व्हावे लागले इतकाच काय तो आमच्या दोघांच्या लसीकरणातला फरक. मला दहा माणसांची चिंता होती पण इथेही सुमारे शंभर माणसांची बारी लागली होती. दहा दहाचे जथ्थे ते आत सोडत होते. काही लोकं खरंच गोंदवून घेतल्याच्या खुशीत होते. त्या भाऊगर्दीत बहुतेक सगळे आफ्रिकेला जाणारेच होते. माझ्यासारखा दक्षिण अमेरिकेच्या वाटेला जाणारा कुणी भेटला नाही.

खरंच पु.ल. नावाचं गारुड आज पुलंना जाऊन चोवीस वर्षे झाली तरी काही कमी होत नाही. जिकडेतिकडे पुलंनी पेरलेली माणसे दिसत असतात. आजकाल लग्न हे एखाद्या इव्हेंटसारखे असते तरी त्यातही कुणीतरी नारायण पटकन दिसतो. माझे शिक्षक आता फार कमी राहिले आहेत पण काहींची आठवण आली कि चितळे मास्तरांची आठवण येते. यू सी..यू सी ...करत गोंडा घोळणारा मधू मलुष्टे आता एसटीमध्ये न दिसता कधी कधी विमानात एअरहोस्टेसवर इम्प्रेशन मारताना दिसतो. आमची पिढी पन्नाशीची झाली तरी आमच्या वेळच्या इंदू वेलणकर कुठे राहायच्या नाही तर आता कुठे राहतात हे आमच्यातल्या अनेक नंदा प्रधानांना आजही माहित असते. कधीकधी त्यांचे खविस बापही भेटतात. आमच्यातल्या काहींचे केस आता काळ्या रंगाशी फारकत घ्यायला झालेत तरी मनाने नाथा कामतचे उसासे टाकत असतो. हे झाले काही वल्लींचे नमुने तर "आमची व्हिक्टोरिया अशी नाही हं" हा श्वानमालकांचा नमुना जसाच्या तसा बघायला मिळतो.

अत्यंत सोप्या भाषेत, आपल्याला दिसते तेच पण वेगळ्या शैलीत मांडून आपल्याला पुनर्प्रत्ययाचा सुखद धक्का देणारे पु.लंचे लिखाण म्हणूनच कालबाह्य होत नाही. मुंबईतल्या चाळी आता नामशेष व्हायला लागल्या आहेत पण जरी तिथे चाळी जाऊन टॉवर उभे राहिले तरी कुणीतरी एच. मंगेशराव असतील, लोकांना ब्रह्मज्ञान पाजणारे बाबा बर्वे असतील, चापशी असेल आणि टॉवरच्या कुठच्यातरी दोन मजल्यावर असलेले सरोज गुप्ते आणि मधू चौबळ आता पत्रे नाही तर चॅट करून आपले मन उलगडून दाखवत असतील. मला वाटते आजूबाजूचे जग झपाट्याने बदलले तरी माणसाचा मूळ स्वभाव तसाच असतो. पु.लंनी तो अचूकतेने टिपला म्हणून आजही ते वाचताना आपल्या चेहऱ्यावर हास्याची किनार उठते आणि त्याहून महत्वाचे म्हणजे हे सर्व सात्विक जग बघून आपण त्या नॉस्टॅलजियामध्ये हरवून जातो.

पु.ल. गेले तेव्हा मी अमेरिकेत होतो. त्यांची तब्येत खालावत चालल्याचा बातम्या रोज वाचून काळजात चर्रर्र होत होते. जे अटळ आहे ते समोर दिसत होते. माझ्या वाढदिवसाला (११ जूनला) हे व्हायला नको म्हणून मी स्वार्थीपणाने देवाकडे एक दिवस मागून घेतला. देवानेही तो मान्य केला असावा. १२ जूनचा ऑनलाईन पेपर उघडायची हिम्मतच नव्हती. मला आठवतंय त्या डेक्कनवरच्या प्रयाग हॉस्पिटलच्या समोरच्या गर्दीत एक माणूस हातात फलक घेऊन उभा असेलेला फोटो आजही मी विसरलो नाही. त्या फलकावर लिहिले होते ..."तुमने हमको हसना सिखाया...." आजकाल दुर्मिळ होत चाललेली हि गोष्ट भरभरून दिलेल्या पुलंचे "एहसान" व्यक्त करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतात.
- निमिष वा. पाटगांवकर

1 प्रतिक्रिया:

Anonymous said...

तुमचा लेख वाचला खूप आवडला आयुष्या च्या या वळणावर एका क्षणात बरीच पान पालटून भूतकाळात एक short चक्कर मारून रिफ्रेश झाल्या सारखे वाटले