Sunday, February 10, 2008

बाबा आमटे एक विज्ञानयोगी

 "कुर्यात सदा मंगलम--" मी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातला तो एक अद्भुत अनुभव होता. बाबा आमट्यांच्या आनंदवनात महारोगातुन मुक्त झालेली आठ जोडपी उभी होती. एका मुहूर्तावर आठ लग्ने लागत होती आणि अचानकपणे मंगलाष्टके म्हणणाऱ्या भटजीची भूमिका माझ्याकडे आली होती! जरीकाठी धोतराचा लांबच लांब अंतरपाट धरला होता. हातात वरमाला घेऊन आठ रोगमुक्त वधू उभ्या होत्या आणि समोर आठ रोगमुक्त वर होते. सुदंर मांडव सजला होता, पण गर्दी खूप दाटली होती. त्यामुळे शेकडो माणसे उघड्यावर आकाशाच्या छताखाली बसली. आनंदवनातल्या गायींच्या खिल्लाराने मुहूर्त गोरज आहे हे गोठ्यात परतताना उडवलेल्या धुळीतून सिद्ध केले होते. "आली लग्नघडी वधूवरशिरी टाका सुमंत्राक्षता-" मंगलाक्षतांचा वर्षाव झाला. एकेकाळी केवळ क्षतांनी भरलेल्या शरीरावर आज साताठशे लोकांच्या समुदायाने शरीरावर आज साताआठशे लोकांच्या समुदायाने मंगलाक्षतांची वृष्टी केली. अंतरपाट दुर झाला. आठ लग्ने एकदम लागली. त्या आनंदवनात मंगलाष्टके म्हणताना मनात आनंदाचे आऊर दाटले होते, ते क्रांतीच्या अशाच एका सुदर्शानाने! 

बाबा आमटे या माणसाने एक अलौकिक प्रयोग सुरू केला. नुसता मानवतावादाचे शांतिपाठ गाणाऱ्या प्रवचनकाराचा नव्हे. आमच्या देशात जिवंतपणे जगणारे कमी आणि जीवनाचे भाष्यकार रगड. बाबा आमटे तसले योगी नव्हते. वऱ्हाडातल्या गोरजे गावच्या सधन इजारदार घराण्यात छपन्न वर्षांपूर्वी जन्माला आलेला हा मुरलीधर आमटे. चांदीच्या चमच्याने उष्टावण झालेला. शेकडो एकर उत्पन्नाच्या जोडीला वडिलांना मानाची सरकारी नोकरी. बाबांच्या आईने तर लहानपणी त्यांना बोंडल्यातून दुधाऎवजी धाडसच पाजलेले दिसते. या माणसाला भीतीचा स्पर्शच नाही. 

नुकती पन्नाशी उलटलेल्या या माणसाने आयुष्यात नरभक्षक वाघांपासून ते नरराक्षक गुंडांपर्यंत कुणाकुणाशी कसा-कसा मुकाबला केला, याचा वृत्तांत 'टारझन'च्या कथेपेक्षाही अधिक रोमांचकारी आहे. मोठ्यामोठ्या संस्थानिकांकडेच असणारी रेसर गाडी स्वत: बाळगून कराचीच्या मोटार रेसमध्ये भाग घेणारा हा तरूण सर्वसंगपरित्याग करून डोक्यावर घाणीची पाटी घेऊन हिंडला आहे. हॉलीवूडच्या नटनटींना त्यांच्या चित्रपटांवीषयी परिक्षणे लिहून पाठवली आहेत. आजदेखील बाबा आमट्यांच्या चंद्रमौळी घरात भिंतीवर पुढारी लटकलेले नाहीत. सुरेख तसवीर आहे ती नॉर्मा शिअररची. ही असामान्य नटी व तिचा अभिनय हा आजही बाबांच्या गप्पांचा आवडता विषय आहे. ज्या हातांनी त्यांनी शिकार केली, त्याच हातांनी त्यांनी माहारोग्यांच्या जखमा धुतल्या आहेत. विनोबांच्या `गिताई' चे गठ्ठे डोक्यावरून वाहून विकले आहेत आणि धनाढ्य, धंदेवाईक बुक-डेपोवाल्यांना अधिक कमिशन आणि दारोदार नेऊन `गिताई' पोचविणाऱ्या अर्धपोटी बाबाला आणि ताईला फडतूस कमिशन देणारे सर्वोदयी गणित न समजल्यामुळे जे मिळाले तेही फेकून दिले आहे. 

अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादी व्रतांचे त्यांनी खडतर पालनही केले आहे. त्यामुळे असल्या व्रतांच्या मर्यादा ते ओळखून आहेत आणि वनवासी भिल्लांना रानडुक्कर मारून स्वत: भाजून देऊन खाऊ घातला आहे. हा माणूस आहे की वेताळ असे वाटावे, असल्या धाडसाने भरलेले हे आयुष्य या गर्भश्रीमंत तरूणाचे पुर्वायुष्य आणि आजची त्याची आनदं वननिर्मीती यांच्यामागे एकच प्रवृत्ती होती. ती म्हणजे मनाला पटले ते प्रमाण पणाला लावून करण्याची! पेटायचे ते कापरासारखे सर्वांगाने पेटायचे. नुसता फुटबॉल खेळायचा म्हटले तरी जीवनमरणाचा लढा आहे. अशा ईर्ष्येने खेळणारा हा खेळाडू आणि म्हणूनच त्याचे कार्य पहायला कुणी आले काय, न आले काय, बाबांची धूंदी उतरत नाही. 

(पु.ल. देशपांडे यांच्या `गुण गाईन आवडी' या पुस्तकातून साभार)

5 प्रतिक्रिया:

Anagha said...

Hats off to Baba Aamate!

Unknown said...

simply gr8.....
ek atishay asamanya wyaktimatva... atryanchya bhashet....gelya 10 hazar warshat asa manus zhaala nahi ani pudchya 10 hazar warshat asa manus honar naahi...

ani he baba amtyaana agadi tantotant zulta...

supriya

ATUL SIR said...

Baba Amtey he Gandhi wadi Hotey...

Baba Great ch ahet..(HOTEY)

Jar Gandhi Waad / GIRI madhey avhadi takad ahey ki tey BABA Sarkha Manus Ghadwoo shaktey tar Ankhi kiti shillak ahey ya Bhartala Tyachay Nasibi... Manahntam Vyakti..

Garaj Ahey Ti Baba kinwa Gandhi nustey wachnyachi nahi jivnat Utrawnachya Himmatichi... JI KATHIN AHEY!

Ga

Savangadi (सवंगडी) said...

हा लेख सर्वांसाठी प्रसिद्ध केल्या बद्दल आभार!!

Unknown said...

Babanche Vichar Aani satatya Kamaliche Hote...tyancha vicharanchi Den mhanun aamhala aaj Dr.Prakash Baba Aamte yansarkhe thor vyaktimatva milale...