Saturday, November 29, 2008

मुलायम आवाजाचा भीमसेन - पु.ल. देशपांडे

पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग...

पु.ल. : आतापर्यंत अनेक वेळा भेटलो आहोत आपण, परंतु तुम्हाला भेटल्यावर मला न चुकता कसली आठवण होत असेल, तर पहिल्यांदा तुमची माझी भेट झाली त्या क्षणाची; आणि प्रत्यक्ष झाली नाही, तर ती तुमच्या सुरांतून झाली. आणि मग तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. पस्तीस-छत्तीस वर्षं झाली असतील. एचएमव्ही स्टुडिओमध्ये मी गेलो होतो. तिथं तुमचं त्या वेळेला एक रेकॉडिर्ग चाललेलं होतं. मला आठवतं की, ते कानडी गाणं होतं.

ते ऐकल्याबरोबर मी त्या रेकॉडिर्ंग बूथमध्ये उभा राहिलो. तिथे जी. एन. जोशी होते. त्यांना म्हटलं, ''कोण आहे हा?'' ते म्हणाले, ''धारवाड, गदग वगैरे भागातून तरुण मुलगा आलेला आहे, आणि त्याचं नाव भीमसेन जोशी आहे.'' त्या वेळी तुमच्या आवाजातील मुलायमपणा आणि तुमचं भीमसेन हे नाव या दोन्ही गोष्टी मला विसंगत वाटल्या. तुम्ही हे गाणं अतिशय सुंदर गायलं होतं. तर त्या गाण्यानं आपल्या गप्पागोष्टींची सुरुवात करू या.

भीमसेन : (गातात)

पु.ल. : वा, वा, वा.... पस्तीस वर्षं झाली. तुम्हीही साठी ओलांडली आहे. मी तर केव्हाच ओलांडलेली आहे, पण तुम्ही साठी ओलांडूनसुद्धा पस्तीस वर्षांपूवीर्चं तुमच्या गळ्याचं तारुण्य तसंच आहे, आणि त्यामधली जी कोवळीक आहे ती या क्षणालासुद्धा तशीच राहिली आहे. ही काय जादू आहे मला कळत नाही. तुम्हाला गाण्याचा हा ध्यास खूप लहानपणी लागला, नाही का?

भीमसेन : हो. म्हणजे तसं आपल्याला माहीतच आहे, की आमच्याकडं जुन्या काळातील माणसं होती. घरात संध्याकाळी दिवे लागले की माझी आई गायची. देवदासाचं भजन वगैरे म्हणायची. ती इतकी गोड गायची की, त्यामुळेच सुरुवातीला मला गाण्याचा नाद लागला.

पु.ल. : बहुतेक गवयांची हीच कथा आहे. त्यांच्यावर गाण्याचे पहिले संस्कार झाले, ते त्यांच्या आईच्या गाण्याचे झाले. आणि ते जे संस्कार झाले त्याच्यामागे एक जिव्हाळासुद्धा होता. या दोन्हींमुळे ते गाणं अतिशय गोड वाटत होतं. अशा प्रकारचं गाणं ऐकत-ऐकत तुम्ही मोठे झालात...

पण मला सांगा, की आपल्याला आता गाण्याचा ध्यास घ्यायलाच पाहिजे किंवा गाणं शिकलंच पाहिजे. किंवा गवई व्हायलाच पाहिजे, असं तुम्हाला वाटावं अशी एखादी घटना घडली की आणखी काही झालं?

भीमसेन : घटना म्हणजे, तुम्हाला माहीत आहे की, खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली 'पिया बिन...' आमच्याकडं एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखं पेपरमध्ये वगैरे येत नव्हतं. शाळा सोडून मी तिथं जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकलं की, असं वाटायचं, अशा प्रकारचं गाणं मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला.

आमच्या वडिलांची एवढीच इच्छा होती, की आधी थोडं तरी शिक्षण घ्यावं, निदान ग्रॅज्युएट तरी व्हावं. पण मला काही धीर नव्हता. मी म्हटलं, हे काही जमत नाही. मी पळून गेलो.

पु.ल. : तुम्ही लहान होतात. काय वय होत तेव्हा?

भीमसेन : बारा-तेरा वर्षांचं.

पु.ल. : बारा-तेरा वर्षांचं? तुम्ही गेलात ते गदगहून निघालात आणि धारवाडला आलात?

भीमसेन : हो. धारवाडहून पुण्याला आलो. पुण्याहून मंुबईला गेलो.

पु.ल. : म्हणजे कुठं जायचं. ते माहीत नव्हतं.

भीमसेन : माहीत नव्हतं, पण ग्वाल्हेर वगैरे असं मनात होतं. तिथपर्यंत पोहोचलो.

पु.ल. : तुम्ही हाल काढत ग्वाल्हेरपर्यंत गेलात, ते मला माहीत आहे. गाडीचा प्रवास करत करत खिशातील पैसे संपले की गाडीत गाणं म्हणायचं. लोकांना वाटायचं, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असूनसुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे. आणि त्या काळी तुम्ही चतुराईनं रेल्वेला बरंचसं फसवून विदाऊट तिकीट ग्वाल्हेरपर्यंतचा प्रवास केलेला आहे.

भीमसेन : हो. दोन-तीनदा जेलमध्येसुद्धा जाऊन आलोय.

पु.ल. : तिथंसुद्धा तुम्ही, मला वाटतं, तो जो शिपाई होता, त्याला गाणं ऐकवल्यावर त्यानं तुम्हाला सोडलं.

भीमसेन : काय आहे, गाण्याचे शौकीन भेटले की, आपला पुढचा प्रवास सुखकर व्हायचा.

पु.ल. : तुम्हाला गुरू कुठं भेटले?

भीमसेन : तिथं मी असा हिंडत-हिंडत गेलो. मी पंजाबमध्ये जालंदरला पोहोचलो. तिथं 'आर्य संगीत विद्यालय' आहे. तिथे त्या काळातील भक्त मल्होत्रा नावाचे ध्रुपद गायक होते. ते प्रसिद्ध होते. त्यांच्याकडं मला एका मिल ओनरनं ठेवलं. म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. ते म्हणाले, ''काही हरकत नाही. तू गाणं शिकत जा.'' आणि मी तिथं शिकायला सुरुवात केली. शे-दीडशे ध्रुपदं शिकलो त्या वेळेला. तिथं 'हरी वल्लभका मेला' भरायचा. तिथं आपल्याकडचे सगळे गायक यायचे. वामनराव, नारायणराव व्यास, विनायकबुवा. कोणी आलं की मी आपला तंबोरा घेऊन आहेच मागं उमेदवारीला. विनायकबुवांनी तिथं विचारलं, ''इथं काय करतोयस तू?'' मी म्हटलं, ''गाणं शिकायला आलोय.'' ''वेड्या, तुला माहीत नाही? तुझ्या गावाजवळच एवढी मोठी व्यक्ती आहे, सवाईगंधर्व. त्यांच्याकडं जा तू.'' मग तिथून गाडी परत फिरली.

पु.ल. : म्हणजे 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' म्हणतात तसं. मग रामभाऊंनी सुरुवात कशी केली?

भीमसेन : ते परीक्षा बघत होते. कारण माझ्यासमोरच दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथं पाण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणं वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचं. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो. कारण पंजाबमध्ये ते सगळं होतं ना.

मी पहाटे चारला उठत होतो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचं. पन्नास-साठ घागरी पाणी आणायचं. मग तंबोरा घ्यायचा. मग त्यानं सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरीसुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंदामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.

पु.ल. : तुमच्या गाण्यामधलं जे वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की, तुमचा स्वर जो आहे ते आ-काराचं गाणं आहे. हा आ-कार तेजस्वी लावला पाहिजे हे तुम्हाला गुरुजींनी सांगितलं की...

भीमसेन : नाही. ते तो तसा लावत नव्हते. ते सांगायचे. माझ्यावरती जे गायक आहेत, त्यांचे हे परिणाम आहेत. हा स्पेशल म्हणजे माझ्यावर केशरबाईंचा प्रभाव आहे. आमच्या वेळेला माईक वगैरे काही नव्हतं. आमचे गुरू थिएटरमध्ये विदाऊट माइक ऐकलेले आहेत मी.

पु.ल. : मी रस्त्यावरूनसुद्धा ऐकलेले आहेत. हजार लोकं पुढं बसलेले आणि गुरुजी गाताहेत. तर हे जे सगळं तुम्ही रियाज करत करत केलंत, हे किती वर्षं चाललेलं होतं?

भीमसेन : जवळजवळ पाच-सात वर्षं मी रियाज केला. थोडंसं यायला लागल्यानंतर मी अठरा-अठरा तास रियाज करत होतो.

पु.ल. : रियाज करताना रागांचा रियाज कसा करायचात?

भीमसेन : एक राग घेऊन, त्यातलं जे आपल्याला येत नाही ते गायचं.

पु.ल. : मला तुम्ही सांगा की, तान वगैरे घेताना तुम्ही हे लिहून करता की नोटेशन घेऊन त्या नोटेशनच्या अंदाजानं तान घेता?

भीमसेन : नोटेशन्स असतात, पण ती मनात.

पु.ल. : ते मनातलं नोटेशन वेगळं.

भीमसेन : एक राग घेऊन, त्याची प्रॅक्टिस करायची. काही कलावंतांचा रियाज म्हणजे हाच असतो. हल्ली रियाज आणि बैठकीचं गाणं एकच झालंय.

पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?

भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.

पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.

भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.

पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?

भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?

पु.ल. : पुण्याला.

भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.

पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?

भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.

पु.ल. : तुमच्या असंख्य मैफली नाना तऱ्हेच्या श्रोत्यांसमोर झाल्या, पण भीमसेन, मला असं वाटत की, तुम्ही इकडले असे पहिले गवई होता की, ज्यांनी बंगालमध्ये श्रोता मिळवला.

भीमसेन : एकदम असं शास्त्र वगैरे त्यांना कळत नाही, पण ते जे कान आहेत, ते सुरेल गाणं ऐकणाऱ्यांचे आहेत, आणि कलावंताला ते देव मानतात.

पु.ल. : सुराला स्वभाव अथवा भावना नसतात. त्याला आर्तता असते. तुमच्या गाण्यात जी आर्तता आहे, ती जास्तीत जास्त प्रतीने तुमच्या गाण्यात आहे.

भीमसेन : आणि पहिल्यापासून माझा स्वभाव आहे, की मी कुठल्याही तऱ्हेचं गाणं कमी प्रतीचं मानत नाही. ठुमरी असो, गझल असो किंवा भजन असो, सूर पक्का पाहिजे.

( परचुरे प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या 'सुजनहो!' या पुस्तकातून साभार.)
मुळ स्त्रोत -- महाराष्ट्र टाईम्स
हि मुलाखत आपण इथे ऎकु शकता --> भिमसेन जोशी आणि पु.ल.

Thursday, November 20, 2008

सावरकर आणि समाजकारण

'सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती'

मित्रहो,
माझ्या आयुष्यातला हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नाही. त्यामुळे ह्या भाग्याचा मी पूर्वजन्माशी संबंध जुळवू इच्छित नाही. पण हा क्षण माझ्या आयुष्यात यावा ह्याला 'भाग्य' या पलिकडे मला काय म्हणावं ते सुचत नाही.

आपण आत्ताच सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख अंदमानतली कोठडी असा केला जातो, परंतु ज्या वेळेला एखाद्या कोठडीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येत असतं, त्यावेळी त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आता जिथे गेलो होतो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मुर्तीमंत तेज वावरत होत. 'तेजस्विनावधीत्मस्तु' असं आपण पुष्कळ वेळेला नुसतं म्हणतो आणि म्हटलेलं विसरुन जात असतो. पुन्हा रोज म्हणत असतो, परंतु ज्याची काया, वाचा, मन, अवघं व्यक्तिमत्व अंतबार्ह्य तेजस्वी होतं अशी अलिकडल्या काळातली भारतीय इतिहासातली व्यक्ती शोधायला गेली तर वीर सावरकरांची मुर्ती डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे अशा इर्षेने ते जगले. अधांराचे ते सगळ्यात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतंत्र्याचा असो. त्या अंधाराविरुद्ध त्यांची झुंज होती. जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असं तुकोबांनी म्हटलं आहे. हे एक अंतर्गत युद्ध चालु असतं. आणि युद्धाचा पहिला नियम असा आहे की मी जिंकणारच आहे अशा भावनेनेच युद्धात उतरावं लागतं. सावरकरांनीसुद्धा 'मारिता मारिता मरावे' ह्याचाच जयघोष केला होता. पराजित मनाने लढणारा माणूस कधीही युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या साहित्यातून ज्या जिवनविषयक तत्वज्ञानातून ते साहित्य निर्माण झाले होती. त्यातून जर सार काढायंचं असेल तर तर असंच म्हणावं लागेल की, केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा. म्हणूनच आधुनिक काळातल्या इहवादी महर्षींमध्ये सावरकरांच नाव आदराने घायला हवे. विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून. काळोख याचा अर्थ भय, आंधळेपण, सर्व क्षेत्रातलं आंधळेपण जावं ह्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला.

आजच्या दिवसाचा आपण सावरकरांच्या अत्मार्पणाचा दिवस म्हणतो. केवळ तिथीच्या हिशेबात, 'जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती' ह्या दृष्टीने हा दिवस आत्मार्पणाचा म्हणणे संयुक्तिक होईल. पण वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्यांच्या जीवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार' अश्या निष्ठेने ज्यांच्या जीवनातली वाटचाल क्रांतिपथावरुन चालत असते त्यांचा मृर्त्यु हा सांगाती असतो. आपण पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणुन जगत असतो. क्षणोक्षणी मरणाच्या धास्तीने जगत असतो. असल्या जगण्याला श्वासोच्छवास घेणे यापलिकडे फारसा अर्थ नसतो. परंतू ज्या वेळेला मनुष्य हा श्वासोच्छवास मी कशासाठी घेतो आहे याचा विचार करील त्यावेळी सार्थ जगण्याचा वाटा तो शोधायला लागेल आणि जिथे राजकिय धार्मिक किंवा आर्थिक दडपणामुळे आलेला गुदमरलेपणा, धूत:शरीरेण मृत:स जीवती अशी परिस्थिती त्याला आढळेल. जिथे जिथे म्हणून मोकळा श्वास घेता येत नाही तिथे उडी मारून तो श्वास मोकळेपणाने घेता येण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वत:चे प्राण पणाला लावेल त्याचवेळी ते जगणं खर्‍या अर्थाने पारमार्थिक होईल. आपण पारमार्थिक ह्याचा अर्थ गळ्यात माळा आणि कपाळी टिळा लावून जयजय राम कृष्ण हरी करित राहणं असा करतो पण जोवर माणुस आणि निसर्ग, माणुस आणि माणुस, माणुस आणि तो स्वत: ह्या द्वंद्वांना सामोरे जाऊन ती कोडी उलगडण्याच्या मागे लागत नाही तोवर ते जगणं केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या चौकोनातच पशुवत सीमित राहिल. ते पारमार्थिक होणार नाही आणि एकदा का ह्या जीवनाचं यशार्धत्व पटलं की मग चित्त भयशून्य होत. प्रथम ते मुक्त होतं मरणाच्या महामायतून. सावरकरांना मुर्त्युंजय म्हणायचं ते ह्या अर्थाने.

ह्या जेलमध्ये आजसुद्धा पहा. हे पर्यटनस्थान असूनही नुसत्या त्या जेलच्या विराट स्वरुपामुळे सारं कसं भयाण वाटतं.
आपण कल्पना करा १९११ साली वर्षापूर्वी यापुढली थोडी थोडकी नाही पन्नास वर्ष या ठिकाणी डांबलेल्या असस्थेत सजा भोगण्यासाठी ते शिरत होते. भोवताली दैत्यांसारखे पहारेकरी होते ब्रिटीश सत्ता टिकवण्यासाठी. स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्यालाही ठार मारणं, त्याचे अनन्वित हाल करणं हा त्यांचा खेळ होता. अशा ह्या नरकपुरीत प्रवेश करताना सावरकरांनी उद्गार काय काढावे? ते म्हणाले होते, 'मित्रांनो एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील. मी जिंकणारच ह्या आत्मविश्वासाने युद्धात पडायचं असतं.' ह्या तत्वज्ञानाच्या खरेपणाचं आणखी दुसरं उदाहरण आवश्यकच नाही. हा भाबडा विश्वास नव्हता. साम्राज्यशाहिच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते. लोंकांमध्ये गूलामगिरीविरुद्ध द्वेष उत्पन्न होत असलेले ते पाहत होते. त्या द्वेषाला सामर्थ्या़ची जोड हवी याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी प्रथम आपल्या देशबांधवांच्या मनाचे सामर्थ्य अपरंपार वाढवले पाहिजे याची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी देवधर्मापेक्षा 'राष्ट्र' ह्या कल्पनेला अग्रमान दिला. आमचे देव इंग्रजांच्या बंदीत नव्हते. त्याची षोडपचार पुजा चालू होती. धर्मातही राज्यकर्ता इंग्रज लुडबुड करीत नव्हता. पण इथला माणुस मात्र त्याला सदैव दुबळाच राहायला हवा होता. सावरकरांनी हिंदु हा शब्द्च राष्ट्राला समानार्थी करुन टाकला. मी हिंदुस्थानाचाच रहिवासी आहे. माझी पुण्यभू, मातृभू, धर्मभू हिंदुस्थान हीच आहे असे म्हणणारा तो हिंदू, अशी त्यांनी धर्माची इहवादी व्याख्या बनवली आणि त्या हिंदुला समर्थ करण्यासाठी त्यांनी इथल्या रहिवाश्यांना तुम्ही 'अमृताचे पुत्र' अहात. तुम्ही मरण स्विकारायचे आहे ती होतात्म्यातून तुम्हाला अमर करणारे- हा मंत्र सांगितला हिंदू-मुसलमान-खि्स्ती कुणाचाही देव दुबळ्याच्या मदतीला धावत नाही हे ते पक्के जाणुन होते. त्यांनी सतत जर कसला धिक्कार केला असेल तर तो दुबळेपणाचा. दैववादाचा, मनुष्य बुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट घासून मगच ती स्विकारतो. त्यावेळी त्याच्या आचारविचारांत एक निराळेच तेज दिसू लागते. तो जय-पराजयाची भाषा करीत नाही प्रयत्नात आपण कमी पडलो असे मानुन पराजयाच्या क्षणीही पुन्हा उठुन उभा राहतो. मर्ढेकरांनी म्हटलं आहे 'भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी.' एखाद्या दृश्याने किंवा कल्पनेने भावनाबंबाळ होणं ह्याला अर्थ नाही. उदाहरणार्थ हा सेल्युलर जेल पाहून मी लगेच भावनाविव्हळ होऊन ओक्साबोक्सी रडायला लागणं आणि थयथयाट करून मला किती दु:ख झालं आणि सावरकरांना भोगाव्या लागलेल्या भळाच्या आठवणींनी मी किती व्हिवळ झालो याचं प्रदर्शन माम्डणं म्हणजे माझी भावना शंभर टक्के खरी आहे असं नाही. एखाद्या गोष्टीच्या बाबतीतली उत्कट भावना तिला अश्रूंची वाट करून देण्याने सिद्ध होत नाही. उलट स्वत:ला आवर घालून जे कार्य हाती घ्याचं असतं. ते करण्याच्या हेतूने सामर्थ्य मिळायला लागणे हे महत्वाचं असतं.

आत्ताच श्री. हर्षे यांनी सांगितलं की सावरकरांच्या विषयीच्या माझ्या काही आठवणी असल्या तर त्या मी सांगाव्या. खरं सांगायचं तर त्यांच्याजवळ जाण्याची छाती आणि हिंमत मला नव्हती. सुर्याचं तेज दुरून घ्यावं, फार जवळ गेलो तर भस्मसात होण्याची भि्ती. त्यामुळे आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकातून. पण माझ्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला होता तो म्हणजे परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर त्यांचा मृत्यंजय समारंभ झाला त्यावेळी मी त्यांचे भाषण ऎकलं.

पारल्याला माझ्या लहानपणी सावरकरांची टिळक मंदिरात झालेली भाषणंही मी ऎकली आहेत. चांगल्या वक्तृत्वाच्या बाबतीत आपण 'गंगेसारखा ओघ' असं म्हणतो. त्या ओघाचा साक्षात्कार सावरकरांइतका शंभरटक्के मला कोणत्याही भाषणाने झाला नाही. विचार आणि उचार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे. मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक महत्वाचा घटक असतो. सामर्थ्याच्च्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राज्यकर्त्याच्या उदासीपणातून, अवलबित्यातून वाचवणं हा विवेक सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीमागे होता. वास्तविक एंग्रजीवर त्यांच चांगलंच प्रभुत्व होतं. मराठी भाषणाच्या ओघात एकादा मुळातला इंग्रजी उतारा स्मरणाने धडाधड म्हणत. कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रहण्यम मानले नाही. त्यांना आमान्य होतं ते दुबळेपणाच्या भावनेने विदेसी भाषेतल्या श्ब्दांची घूसखोरी चालू देणं. सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजून घेतली नाही. त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धीची चेष्टा केला. हे शब्द रूढच होणे शक्य नाही असे म्हणायला सूरुवात केली. पण ते सरकारी शब्दांच्या टाकसाळीत तयार केलेले नव्हते. एका प्रतिभावंत कवीची ती निर्मीती होती.

सरकारात मोले घातले रडाया (की खरडाया?) ह्या भावनेने भाषाशुद्धीचे पगारी कर्मचारी जेव्हा बसतात तेव्हा"ते इकडली इंग्रजी डिक्शनरी आणि कर त्याचा मराठी शब्दकोश' असा व्यवहार चालतो. सावरकरांना तो शब्द कोशात पडून राहणारा नको होता. तो कवितेसारखा लोंकाच्या तोंडी रूळायला हवा होता. त्यांनी रिपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला. वार्ता खेचून आणणारा. इथे इंग्रजी शब्दाच्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द असे होता, एक कविनिर्मीत प्रतिमा तयार झाली. प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक मराठी शब्द त्यांनी दिले आहेत. तीच गोष्ट चित्रपटसुर्ष्टीची, दिग्दर्शन, संकलन, ध्वनिमुद्रण, पटकथा हे सारे त्यांचे शब्द. मराठीला त्यांचं हे सत्व जागविण्यासाठी दिलेल मोठं देण आहे. शिवाय ते उत्तम वक्ते असल्यामुळे शब्द निर्मिती करताना त्यात उच्चारांचा सोपेपणाही त्यांनी सांभाळला. पुष्कळदा मला वाटतं की भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे 'माणसाचा देव आणि विश्वाचा देव.' दीन शब्दांत संस्कृती, ह्या सारखे निंबंध मोठ्याने वाचून घायला हवेत. वैचारिक संस्कार आणि भाषेचे उत्तम संस्कार ह्या दोन्ही दृष्टीनी हे वाचन उपयोगी ठरेल. सावरकरांच्या जीवनात तर ग्रीक नाट्य़ातल्या महान नायकांसारखं नाट्य होतं. आणि ते त्यांच्या वाणी-लेखणीतूनही ओसंडत होतं. ते स्वत: नाटककार, थोर कवी असल्याचा दुर्दवाने त्यांच्या केवळ राजकिय कर्तूत्वाकडेच पाहिल्यामुळे विसर पडतो. 'उत्कट भव्यतेज्याचे मिळमिळीत अवघेची टाकावे' हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला क्ववित आढळतो. त्यामुळे कवितेत देखील ते कल्पनेची हिमालयीन शिखरे गाठतात. प्रियकर प्रेयसीच्या मीलनाच्या प्रतिक्षा काळाबद्दल कविता लिहिताना ते म्हणतात-

'शतजन्म शोधताना शत आति व्यर्थ झाल्या !
शत सुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या !’


कालाचं किती विराट स्वरूप दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे पहा ! एका सुर्य मालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणताना आपण थकून जाऊ हा महाकवी शतसुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिमा घेऊन आलेल्या ह्या कोठडीत राहावं लागलं आणि ही भयाण कोठडी 'कमला सप्तर्षी, विरहाच्चवास असल्या प्रतिभेची उत्तुंग शिखर दाखवून देणाऱ्या काव्यांचं जन्मस्थळ ठरली.

ह्या कोठडीत त्यांनी जे हाल सहन केले त्याची कल्पना 'माझी जन्मठेप' वरुन येते. पण मला वाट्तं. त्यांनी खरोखरी जे शारीरिक आणि मानसिक हाल सहन केले असतील त्यातल्या एक दशांशाचं सुद्धा वर्णन त्यात लिहिलेलं नसेल. कारण हालाच वर्णन करताना त्यांना जराही संषय आला असावा की ह्या कथनामुळे लोकांच्या मनात करुणा उत्पन्न होणार आहे. तर त्या महापुरूषाला ते कदापीही रुचलं नसतं. म्हणून मला नेहमी वाटतं की इथे झालेले सगळे हाल त्यांनी लिहीलेच नाहीत. त्यांना हे पुस्तक वाचुन एखाद्या आजीबाईंनी 'आई आई गं काय हो हे हाल' म्हणायला नको होत, त्यांना असल्या हालावर मी मात करीत अशा विश्वासाने ह्या संकटात उडी टाकायला सिद्ध होणारा तरुण वाचक अभिप्रेत होता. स्वत:बद्दलची कणव निर्माण करण्याचा किंवा आपल्या त्यागाचे भांडवल करण्याचा तिटकारा होता. वार्ध्यक्याच्या काळात ते कुणालाही भेटायला उत्सुक नसत. 'त्याच कारण मला तरी असं वाटतं, की आपल्या आयुष्यातल्या थकलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी पहावे हे त्याना आवडणं शक्य नव्हतं. एखाद्या म्हाताऱ्या सिंहाला वाचा फूटली तर तो जसा म्हणेल. 'मला सर्कशीतला सिंह म्हणून काय पहाता. जंगलात हत्तींची गंडस्थंळ फोडीत होतो तेव्हा पहायचं होतंत-' त्याच वृत्तीने ते एक प्रकारच्या एकांतात राहिले त्या वाधंक्यात एकच व्याधी त्यांना आतून पोखरत होती. ती म्हणजे देश दुभंगल्याची अशा अवस्थेतच त्यांनी मृत्युला आपण सामोरे जाऊन भेटण्याचा निश्चय केला.

विज्ञाननिष्ठ सावरकरांचे त्यांना धर्माभिमानी संकुचित म्हणणाऱ्यांना त्यांच्या मृत्युच्या प्रसंगी एक हादरून टाकणारे दर्शन झाले. आपल्याकडे बहुतेक लोकांची बुद्धिनिष्ठा औद्वदेहीक संस्काराच्या प्रसंगी लुळी पडते. परंपरागत रुढींचे पालन केले नाही. तर मानगुटीला बसेल त्याला नरकवास घडेल अशी नाना प्रकारची भीती मनात असते. मरणाऱ्याचीही आपल्याला मंत्राग्नी मिळावा-भंडांग्नी नको अशी अखेरची इच्छा असते आणि मुख्यत भितीपोटी ह्या इच्छेला त्याचे उत्तराधिकारी मान देत असतात. आणि अशा ह्या परिस्थितीत सावरकर आपल्या अखेरच्या इच्छापत्रात आपलें शव विद्दुत दाहिनीत टाकून द्यावे अशी इच्छा व्यक्त करतात. हे शव आहे त्याला एक काष्ठ या पलिकडे अर्थ राहिलेला नाही असं मानणं हे आद्द शंकराचार्यासारखं झालं. आद्द शंकराचार्याची आई मरण पावली. ब्राह्मणांनी तिच्या अंत्यंसंस्कारावर बहीष्कार टाकला. मृतदेह एकट्या शंकराचार्यांना उचलून स्मशानात नेता येईना. त्यांनी हे काष्ठ आहे. असं म्हणुन त्या मृतदेहांचे तीन तुकडे केले आणि एकेक तुकडा नेऊन दहन केले. विज्ञानिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी पाळली. आज आम्ही पाहतो. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे लोक आपल्या इच्छापत्रात आपली रक्षा कुठल्या सोर्वात नेऊन टाकावी हे नमुद करतात. मरणानंतर उतरांवर संकुचित धार्मिक्तेचा आरोप करणाऱ्या नेंत्यांच्या रक्षा विसर्जनाचा तमाशा दहा दहा दिवस चाललेला असतो आणि सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.

यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत. अशा प्रकारच्या बावळटपणाला सावरकरांना तिटकरा असे. त्यांना दुबळा, वाकलेला, लाचार असा माणुस सहनच होत नसे. तेज:पुजतेने आकर्षण त्यांच्या साहित्यातून सदैव प्रकट झालेले दिसते. स्वातंत्र्याचं नातं देखील त्यांनी ’आत्मतेजीवाले’ प्रकटणाऱ्या रवीशी जुळवलेलं आहे, त्यांनी शेवटी मृत्युला अलिंगन दिले. ते देखील तेजाच्या एका ज्योतीने दुसऱ्या प्रचंड ज्योतीत मिळून जावे तरी. मृत्युला आपल्यावर झडप घालू न देता त्याच्या दरबारी ते धोरदात्त नायकासारखे चालत गेले. समिधेसारखं जीवन जगणाऱ्या सावरकरांची जीवनयद्वत स्वखुशीने आहुती पडली.

आपण आत्ताच ह्या बंदिगृहातल्या त्यांच्या एका गाभाऱ्यात जाउन आलो. निर्भयतेचा एक उपासक तिथे ठेवला गेला होता. नाना प्रकारचे हाल त्याला सहन करावे लागले. कोणासाठी त्यांनी ते सर्व सोसलं? तुमचा आमचा श्वासोच्छवास स्वतंत्र हिंदुस्थानातल्या हवेत मोकळेपणाने घेता यावा म्हणून. आज आपण इथे येतो. निर्भयपणाने हा भयाण कारागृहात हिंडतो. ती, सावरकरांची आणि राजबंदी म्हणून ज्या क्रांतिकारकांना इथे जन्मठेपेची सजा भोगावी लागली त्यांची पुण्याई आहे. त्या पुण्याईचे आज आपण स्मरण करतो म्हणुन आजच्या दिवसाला आपण सावरकरांची पुण्यतिथी म्हणतो. त्यांनी मिळवलं ते पुण्य जपजाप करुन नव्हे तर आयुष्याचं मौल देऊन निर्भयतेची साधना करुन आणि ती साधना कृतीत उतरवून अशा प्रसंगी त्या निर्भयतेचा थोडा तरी अंश आपल्यात उतरो ही आपली प्रार्थना असायला हवी.

प्रार्थनेचा उल्लेख आल्यावर मला स्त्रोत्राची आठवण आली. मी वाचलेल्या स्त्रोत्र-साहित्यात मला सगळ्यात आवडलेल स्त्रोत्र कुठलं असेल तर ते सावरकरांनी लिहिलेलं स्वतंत्रेच स्त्रोत्र. ’जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे.’ ह्या जयोस्तुतेच्या संदर्भात माझ्या मनाला स्पर्श करुन गेलेली एक घटना सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. अस्पृश्यता निवारणाविषयींच्या सावरकरांच्या तळमळीविषयी आणि सहभोजन, मंदिरप्रवेश इत्यादी कार्यक्रमांविषयी मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही. काही वर्षापूर्वी मी सांगलीजवळ म्हैसाळ म्हणून गांव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा प्रयोग केला आहे तो पहायला गेलो होतो. भारतातल्या उत्तम ग्रामिण प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रियांच्या अंगावर लज्जरक्षणापुरतीही वस्त्रं नसायची म्हणून त्यांना झोपडीबाहेर पडणं मुष्किल होतं. तिथे आम्ही गेलो त्या दलित वस्तीतली सर्व स्त्रीपुरूष मंडळी लग्नंसमारंभाला जावे तसा पोषाख करुन जमली होती. सहकारी शेतीने त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणलं होतं आणि ते केवळ आर्थिक परिवर्तनच नव्हतं हे लगेच माझ्या लक्षात आलं. त्या स्त्रियां समारंभात गाणं म्हणणारं होत्या. अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. - जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या. एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.

अशा या पुण्यशाली महापुरुषाला जिथे बंदिवास घडला ते हे क्षेत्र आता इहवादी सत्पुरुषाचं जिथे स्मरण करावं असं तिर्थक्षेत्र झालेलं आहे. ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तिर्थ असं मी मानतो. भयाने, स्वार्थाने, संकुचीत वृत्तीने मालिन झालेली आपली मन धुवायला आपण आता ठिकाणी येतो. बाळारावांनी आणि श्रि. हर्षे यांनी इथे सर्वांना एकत्र आणण्याचा योग आणला. त्यांच्या आयोजनामुळे इथे येण्याचे भाग्य मला लाभले, मी त्यांचा आभारी आहे.
वीर सावरकरांच्या स्मृतीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ह्या सभेची सांगता एकेकाळी ज्या गीताने आपले सारे राष्ट्र जागृत झाले होते त्या त्या गिताचे पडसाद ह्या बंदिक्षेत्रात उठवून आपण करुया. मुक्त मनाने वंदेमातरम गाऊ या धन्यवाद !

[२६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेल्युलर तुरूंगातील मैदानात केलेल्या पु.ल.देशपांडे यांच्या भाषणावरून.]

Thursday, November 6, 2008

आवाज... आवाज...

गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात दुनिया बरीच बदलली. पण मला जाणवतो तो बदल मात्र आवाजांच्या दुनियेचा. किती आवाज हरवले. किती नवे आले. तंग तुमानी घालून रस्त्यातून हिंडणाऱ्या पोरींची जशी डोळ्यांना सवय होते तशी नव्या आवाजांची पण होते. पण रस्त्यातून सिगरेट ओढीत जाणाऱ्या कुंकू लावलेल्या बाईचं दर्शन जसं अजूनही धक्का देउन जातं तसं भल्या पहाटे ’मुझे बुढ्ढा मिल गया’ चा विलाप कानी आला तरी धक्का बसतो. अर्थात माझी आवाजाची दुनिया संगीतापुरती मर्यादित नाही. हे आवाज. उघडेबंब आवाज. पहाटेशी कुणाचं नातं कोंबड्याच्या आरवण्याने जुळलेलं असेल.. कुणाचं जात्यावरच्या ओव्यांनी असेल.. कुणाचं देवळ्यातल्या सनईने असेल. ही नाती काव्यमय. आमचं अगदी गद्द नात पण म्हणून त्या नात्याची जवळीक कमी नव्हती. दाराची कडी वाजायची. आवाज यायचा "बाई दो ध" मग ते दुध भांड्यात ओतल्याचा आवाज. त्या आवाजाबरोबर झोपेचा निरोप घेतला जाई. मग स्टोव्हने सूर धरलेला असायचा. सकाळीच वाटर डिपारमेण मध्ये ड्युटीवर जाणाऱ्या बापू नाबराच्या चपलेची चटक फटक चटक फटक. एक तारखेच्या दिवशी मोटी चटक फटक करीत कामावर जाणारी ती पावलं महिनाखेरीस फसाक फसाक करीत घासत जायची. साऱ्या महिन्याच्या ओढगस्तीचा इतिहास त्या चपलांचा आवाह सांगत असे. तेवढ्यात वर्तमानपत्रवाल्या पोराची ललकारी. इकडे कुठेतरी मोरीत पाण्याच्या बादलीत नळाने धरलेल्या अभिषेकाचा सूर, त्या काळात नळाच्या नरड्यांना इतकी कोरड पडलेली नव्हती. ’बुडभुडभुडभुड फा~~श’... गोंद्याच्या बाबाचं स्नान सुरू. ’खिस खिस खिस फचपूरू’.... अंगाला साबण लावताहेत. ’शू~~ हुश्श फू~~ फ्फ्फ’... म्हणजे पंचाने अंग चोळायला सुरूवात. अणि ’क्ल ~ स्क~~’ म्हणजे "निऱ्या काढलेलं धोतर घेउन उभ्या रहा~" "ईट ज्याडारे क " ही आरोळी आली की सकाळचे आठ वाजले म्हणून घड्याळ लावून घ्यावे. एका भल्या मोठ्या टोपलीत काळं आणि पांढरंशुभ्र मीठ विकणारे. हे जाडाबारीक मीठवाले हल्ली काय विकतात कोण जाणे. "ईट ज्याडारे क" ह्या आणि असल्या आवाजांचा अर्थ कळायला मात्र कान तयार लागतात.

गाण्यातल्या दर्दी लोकांना जसं गवयानं पहिलं ’ट्यॅ ह्यॅ’ केलं की भीमपलास की भूप किंवा जो कोणता राग असेल तो कळतो त्याचप्रमाणे आवाजाच्या दुनियेतील आरोळ्यांचं आणि नाना तरहेच्या ध्वनीचं होतं. ते ध्वनी नव्हतेच. ती संपृर्ण ध्वनिचित्रंच होती. "येत्रिउरो~स." म्हणजे छत्री दुरुस्त हे कळायला जाणकारीच हवी. "लायचियल्हिहो" ही कल्हय वाल्याच्या आगमनावी नांदी होती. "आयरे प्पो ओ ~स" म्हणजे पायरी हापूस होता. हे सगळे ध्वनीचित्रकार गेले कुठे.. हापुसवाले आणि कल्हई वाले दिसतात. पण मग ते आपण आलो आहोत असं सांगणारी ती ललकारी का देत नाहीत. "पायरेप्पोहोस" ची आरोळी प्रथम कानी यायची ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या. चोवीस एप्रिलला जे काही बरे वाईट निकाल लागायचे ते लागले की चाळी ओस. मंडळी पोरांना घेऊन आपापल्या गावाला पळायची. कोकणवाल्य़ांना बोटीचा भोंगा केव्हा ऐकीन असं व्हायचं. घाटावरची माणसं अगिनगाडीची शिट्टी झाली की डोळ्यापुढे आपापल्या गावाकडं वळणारी वाट आणीत गाडीच्या गर्दीत बसायची आणि परवाच मी पाहिलं.. आगगाडीच्या शिट्टीचासुद्धा बदलला. हल्ली ती पूर्वीसारखी ’कू~ क’ करत नाही. ’भ्या.~’ असा बिभस्त आवाज काढते. विस एक म्हशी एकदम हंबरल्यासारखी हंबरते आणि "नेते रे चांडाळानो तुम्हाला ओढीत" असं म्हणते. ’भ्यां’ चा अर्थ तो आहे. ’कू~~क’ म्हणजे "अरे चला चला.. मज्जा येइल आता" असा होता.

आगगाडीत तर आवाजाच्या कसल्या एकेक तरहा. बोटीत फक्त इंजीनची धडधड आणि अधुन मधून पूर्वी ट्रामची घंटा असे तसली टण टण टण टण अशी खोल कुठे तरी वाजणारी घंटा. आगगाडी एक तर ठेक्यात जाते. लेझमीत जशी आधी संथपणाने तांग टुक ताकड तुं तुं तांग तुक्क ताकड तुम अशी धीमी लय सुरु होते तसंच इंजिनाचाही. इंजिन.. तबलजी जसा आधी उगीचच डग्याचे ढूं~म करुन तबल्यावर थाप मारतो तसा ’फा~~स.. फ्फू~~स" असा वाफेचा भलाथोरला निश्वास टाकतं. मग चाकापासून ते कूठे कुठे लोंबणाऱ्या साखळ्या.. पंखे .. हापटणारी दारं ह्या सगल्य़ा वाद्दांसकट लेझमीसारखा तो संथ ठेका सुरू होतो. आणि हळू हळू वाढत्या लयीचा गमतीचा रंग भरायला लागतो. मला वाटतं अनेक तबलजींना आगगाडीच्या ठेक्यांतून तुकडे सुचले असतील. आगगाडीसारखा तालिया नाही. गाडीच्या खिडकीशी बसावं आणि आवाज लावावा. हव्या त्या तालाचं गाणं घांव.. मस्त साथ चालू असते. लांबच्या पल्ल्यांना लय वाढल्यावर तर बघायलाच नको. पण आपण स्वत: न गातादेखील आगगाडीत खास स्वतःची मैफल चाललेली असते. विशेषत: फर्स्ट क्लासच्या वरच्या बर्थवर झोपावं पंख्याने सुर धरलेले असतात. त्यातून अक्षरक्ष: सतारीसारख्या गती चाललेल्या असतात. बरं हा फर्मायशी प्रोग्राम असतो हे पुष्कळांना ठाउक नसावं. पण खानदानी गाण्याची आपण पंख्याला फर्माइश करावी.." बेटा चलो भूपही सुनेंगे .." मनाशी भूप घोळवावा की पंख्यातून चक्क भूप सुरु होतो.’ ज्यांना भूप येतो त्यानी आपल्या जोखमीवर गाऊन पहावा’. डब्याखालची चाकं लगेच ठेका पकडतात. अर्थात पंख्याची एक सवय आहे. सांगणाराला गाण्याची जाणकारी आणि चिजाबीजांची याददास्त चांगली असली तरच ही मैफल ऎकायला मिळते. मात्र कऱ्या खानदानी कलावंताप्रमाणी पंख्याची मैफल ड्युटी बजावत असतो. त्याचा सुरू लागत नाही. गाडीत पंख्याच्या मैफली मी खूप ऐकल्या आहे. आणि मैफैलींचे इंटर्वलही सुरेख पडायचे. स्टेशन आलं की एकदम अनेक आवाजांची नुसती कारंजी उडायची. "च्याय ये रे म" "पानी डिग्रेट व्यॅ च्ये ~स" पासून ते "रम दो ~ध" पर्यंत वेदांचे जसे ठाराविक उच्चार आहेत तसे फेरीवाल्यांचेही आहेत. उद्या कोणी "च्यायेरेम" ऎवजी "गरम चहा~" असं स्वच्छ म्हणाला तर त्याला काढून टाकतील. खानदानी गाण्याला हे असले आवाज काढण्याचं शास्त्र जरा अधिक जवळ आहे. इथे बोलताना अडवणूक करणाऱ्या व्यंजनांना मुळी स्थानच नाही. आवाजची फेक म्हणजे नुसत्या स्वरांची फेक. तिथे "चहा गरम" किंवा "पान विडी सिग्रेट माचीस हे एवढं म्हणून आवाज फेकलाच जात नाही. ही दुनिया आवाजाची आहे. इथे अर्थ आहे तो आवाजाला. "च्यायरेम" म्हटलं की एकदम चहाच्या भरलेल्या किटलीतून ’चुळळळळ’ असा आवाज होत कप भरत आला हे दृश्य डोळ्यापुढे आलं पाहिजे.
----
गडबड - आवाज - आरडाओरडा हे मुळी साध्याभोळ्या मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण आहे. आतल्या गाठीची माणसं गप्प बसतात. मुंबईची ट्राम गेली त्यावेळी आपली जुनी मैत्रीण गेली म्हणून त्या वेळी त्या मोकळ्या अनाथ रुळाकडे पाहून तिच्या ठणठणाटाला संगीत मानणाऱ्या मुंबईकरांनी डोळ्यातून टिपू काढली होती. हे आवाज असे जातात आणि नव्या आवाजाच्या दुनियेत आम्ही परके होतो. मग ते जुने ध्वनिमित्र आठवत पडायचं.

मध्यरात्र उलटून जाते. बाहेरचं ध्वनिविश्व शांत झालेले असतं. आता फक्त ऐकू येतो एकच आवाज भिंतीवरच्या घड्याळाचा टिक टिक टिक टिक. कालपुरूषाचं ते कायमचं पुटपुटणं. त्याला प्रतिसाद देणारा आवाज सहसा येत नाही. पण मध्यरात्री इतर आवाज बंद झाल्यावर बिछान्यावर पडल्यापडल्या ती टिकटिक ऐकताना सहज छातीवर हात जातो. तिथल्या टिकटिकीचं भिंतीवरच्या त्या पुटपुटणाऱ्या काल पुरुषाशी त्या निवांत वेळी संभाषण चालू असतं. अजूनही त्याचा अर्थ लागत नाही. छे छे! आवाज हवा. आयुष्य म्हणजे आवाज. ते संपल की पुढं मग काय, शांतताच.

अपुर्ण (उरलंसुरलं)
- पु.ल. देशपांडे
मुळ स्त्रोत -- मायबोली

Thursday, October 16, 2008

मी पु. ल. दे.

मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ

कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण

गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे

‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ
‘ खो खो खो ’ चे एकशे साठ
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा - कुणी वंदा

कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच ?
हा लेकाचा शहाणा की खुळा ?
मग मी मारतो मलाच डोळा
(उरलंसुरलं)

Tuesday, October 7, 2008

भाईकाका - दिनेश ठाकूर

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांनी आपले भाचे दिनेश ठाकूर तथा दिनूवर 'गणगोत' या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकात एक नितांतसुंदर लेख लिहिला आहे. १९ मे १९६६ रोजी दिनूला हे पुस्तक भेट देताना त्यांनी लिहीलं होतं... त्यास स्मरुन अमेरिकास्थित दिनेश ठाकूर यांनी आपल्या भाईकाकांवर हा ह्र्दयस्पर्शी लेख... भाईकाका जाऊन आता आठ वर्षे होतील. पण त्यांच्या आठवणींची, नावाची नशा काही उतरत नाही. आजही भाईकाकांची पुस्तके वाचताना, टेप्स ऎकताना ते माझ्याशीच बोलताहेत, संवाद साधत आहेत, असे वाटत राहते. आणि कुठच्याही प्रसंगी त्या संदर्भातले भाईकाकांचे प्रसन्न व्हायला होते.... आठवणीत रंगून जायला होते. हिच स्थिती भाईकाकांचा सहवास लाभलेल्या अनेकांची आहे. नवल म्हणजे भाईकाका गेले तेव्हा आशुतोष आठ-साडेआठ वर्षाचाच होता, पण त्याचीही तीच स्थिती आहे. शाळेतून घरी आल्यावर किंवा शनिवार-रविवारी 'असा मी..', 'बटाट्याची चाळ' , 'वाऱ्यावरची वरात' , 'बोरकर कवितावाचन'ची कायम पारायणे चाललेली असतात. 

'गणगोत'च्या मला दिलेल्या प्रतीवर भाईकाकांनी लिहिले आहे... 'चि. दिनेशला - आशीर्वादपूर्वक भेट. या पुस्तकात मी तुझ्यावर एक लेख लिहीला आहे. तू मोठा झालास की माझ्यावर एक लेख लिही . - तुझा भाईकाका.' या गोष्टीची सतत आठवण व्हायची. पण कधी लिहावे म्हटले की, 'आतले न मना गवसे..मनातले न ये मुखी... मुखातुन बोलताना, भाषा त्यालाही पारखी, जाणिवेच्या व्यापाराला अशी उतरती कळा' हेच जाणवत राही. नेमक्या शब्दांत भावना व्यक्त करणे भाईकाकांसारख्या किंवा विंदा करंदीकरांसारख्या फार थोड्यांनाच जमते. म्हणून त्यांच्या पंच्याहत्तरिला गणिताच्या संशोधनाच्या एक पेपर व नंतर मी लिहिलेले गणितावरचे पुस्तक 'वनवेलींनी काय वाहणे याहून कल्पद्रुमा' या भावनेने त्यांना अर्पण करुन थांबलो होतो. माईआतेने लिहीले आहे. खूप मोठ्या मोठ्या लोंकानी छान आठवणी सांगितल्या आहेत. मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला अप्रतिम भाषण केले होते. जब्बार पटेल व मुक्ता राजाध्यक्ष यांनी केलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये व इतर अनेक उपलब्ध भाषणांत तर भाईकाका स्वत:च बोलले आहेत. तेव्हा मी आणखी काय लिहायचे? पण तु लिहिलेस तर माईआतेला बरे वाटेल, असा आग्रह झाला तेव्हा काही आठवणी लिहायला घेतल्या.
वरळीला 'आर्शीवाद'मध्ये भाईकाका, आम्ही व माझी-मामी एकाच मजल्यावर शेजारी-शेजारी राहायचो. (भाईकाका त्या घराला 'नणंदादिप' म्हणत.) नंतरही सांताक्रुझला 'मुक्तांगण', पुण्याला 'रुपाली' , 'मालती-माधव' ही माझीही घरंच होती. लहान-मोठी सुट्टी पडली रे पडली, की मी तिथे निघायचो, घरचे आणि शालूआते चिडवायची 'निघाला माहेराला' म्हणून ! 'रुपाली'त खूप वेळ जायचा- भाईकाकांच्या मोठ्या कॉटवर लोळत, गप्पा करीत व टेप्स किंवा रेडिओवर गाणी ऎकत. रात्री भाईकाका नॅशनल प्रोग्रॅम किंवा पाकिस्तान रेडिओवर कव्वाली, गझल ऎकायचे. भाईकाका खरे फुलायचे ते गप्पागोष्टी, गाण्यांच्या मैफलीत. पुण्याला अनेक दिवस-रात्री असे जायचे की, वसंतराव देशापांडे यांना गॅलरीतून हात केला की ते यायचे, नारळकारकाका यायचे. मग गप्पा, चेष्टामस्करी, कोट्या, गाणी आणि नकलांमध्ये रात्र सरायची. आनंदाला उधाण यायचे. भाईकाका आणि वसंतराव ऎकमेकांना खुलवत राहत आणि बैठकीत रंग चढत जाई. अशी कितीतरी वर्षे गेली. माझ्यासाठी खरोखरच ते मंतरलेले दिवस होते. ती झिंग पुढे अनेक दिवस टिकायची. अजूनही ती उतरायला तयार नाही. 'रुपाली'त अनेक लोकांचा राबता असे. कधी कुमारकाका येत. मन्सूर अण्णा राहायला आले की के.डी. दिक्षित, वसंतराव, नारळकाका हमखास असत. कालेलकरकाका, अ. भि. शहा, गोविंदराव तळवळकर, महादेव जोशी, तर्कतिर्थ लक्षमणशास्त्री जोशी, जब्बार पटेल, शांताबाई शेळके, राम पुजारी, राम गबाले, आप्पा जाधव अशा नाट्य, साहित्य, संगीत क्षेत्रातल्या व इतर मातब्बर मंडळींच्या सहभागाने मैफली रंगायच्या. कधी कधी नवोदित तरुण कलाकार हजेरी लावून जात. भाईकाकांचे एकूणच माणसांवर प्रेम होते. कुणात थोडा काही गुण असला, रसिकता असली, की त्यांच्या गप्पा चालू. जणू काही तो त्यांच्या लेखन, मनन, भाषणासाठीचा रियाज असे. त्यांची विलक्षण संदर्भसंपन्नता व हजरजबाबीपणा त्यांच्या भाषणांप्रमाणेच या गप्पांतही जाणवायचा. भाईकाकांच्या बाबासाहेब पुरंदऱ्यांशी सहज गप्पा चालू असताना माईआतेने भाष्य अगदी समर्पक होते... 'भाई, तुऊ शिवाजी असतास आणि अफझलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त भरपूर गप्पा रंगवून परत आला असतास.' एकदा आम्ही सासवडला पुरंदऱ्यांकडे राहायला गेलो व मग बाबासाहेबांबरोबर पुरंदर गड पाहायला गेलो. तेव्हा महारजांचा गड पाहायला जाण्याऎवजी पायथ्यालाच डेरे टाकून भाईकाकांनी ज्या काही गप्पा रंगवल्या, की सर्वजण गड विसरले. शेवटी बाबासाहेबांबरोबर गड बघायला मिळणार, या आशेने आलेला माझा चुलतभाऊ उमेश अस्वस्थ होऊन चुळबुळ करु लागला. तेव्हा भाईकाका त्याला म्हणाले, 'अरे, तू गडाला एक असा फेरफटका मारुन ये.' शेवटी बाबासाहेबांनाच दया येऊन त्यांनी उमेशला फिरवून आणले. भाईकाका व माईआतेबरोबर मला खूप फिरायला मिळाले. ५ वी- ६ वीच्या सुट्टीत आई-वडिलांबरोबर काश्मिरला न जाता मी भाईकाकांबरोबर बेळगाव, धारवाड, बंगलोर फिरलो. त्यावेळी भाईकाका संगीत नाटक ऍकॅडमीत होते. रोज म्युझीक, ड्रामा, डान्स फेस्टीव्हल्स चालत. बाकी वेळ कलाकारांबरोबर गप्पा. अजूनही त्यावेळची रघूरामय्यांची 'बाबुजी' ही हाक, त्यांची भाईकाकांवरची भक्ती व त्यांनी गायलेली बालगंधर्वाची गाणी डोक्यात आहेत. त्याच ट्रिपमध्ये मन्सुर अण्णांचा झालेला सत्कार, वसंतरावांचे गाणे, कविवर्य बेंद्रे यांची झालेली भेट, मन्सुर अण्णांच्या घरी कुठल्यातरी 'कानडा' प्रकावरुन झालेला गवयांचा जोरदार वाद... अशाही अनेक आठवणी ताज्या आहेत. 

 इचलकरंजीच्या साहीत्य संमेलनानंतर लवकरच वसंतराव आचरेकरांबरोबर आचऱ्याला रामनवमीला भाईकाकांचे शेपूट म्हणून मला चार दिवस जाता आले. ते दिवसही अविस्मरणीयच. कुमारकाका, चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते, बंडूभैया चौगुले, मुरलीधर आचरेकर, गोंविदराव, अशोक रानडे, रत्नाकर व्यास, कारेकर अशा सगळ्या मातब्बर मंडळींना एक मोठा गोठा साफ करुन उतरवले होते. दिव्सभर गप्पा, गाणी आणि नकला. गोविंदराव आणि भाईकाकांची पेटीची जुगलबंदी. कुमारकाकांचा संध्याकाळचा अप्रतिम पुरिया धनश्री, कल्याणमधली 'मुख तेरो कारो' (त्याच्यावरचे ते गोठ्यातले निरुपण आणि उजळणी), पुन्हा दुसऱ्याच दिवशी सकाळी रंगलेला शुद्ध सारगं, गौड सारंग, वसुंधराकाकींचे 'पतियान भेजो रामा,' अशोक रानडे यांचे रंगलेले गाणे, कुमारकाकांच्या देवळ्यातल्या गाण्याचे मुरलीधर आचरेकरांनी काढलेले अप्रतिम हुबेहुब चित्र आणि चिंचाळकर गुरुजींनी काढलेले दोन-तीन रेघोट्य़ांचे अप्रतिम, पण अमूर्त चित्र. शाकाहारी पंगतीत वसंतराव आचरेकरांनी भाईकाकांना व आम्हा काही मंडळीना गुपचुप पुरवलेले खास मासे... मला त्यावेळेपासून पडलेले- आचरेकरांनी ठेवलेल 'भाचे' हे नाव... एकदा भाईकाकांच्या गैरहजरीत त्यांच्या रसिकतेविषयी आणि गाण्याच्या मर्मज्ञानाविषयी कुमारकाका, गुरुजी आणि राहुलजी यांनी भाईकाकांचे कौतुक... अश्या असंख्य आठवणी मनावर कोरल्या गेल्या आहेत. गाडीतून खूप वेळा प्रवास व्हायचा. माईआते गाडी चालवायची. त्यावेळी कवितांची आवृत्ती होत असे. माईआतेला जास्त कविता पाठ आहेत, हे जाणवायचे. पण भाईकाकांना लागेल त्या वेळी, योग्य संदर्भात पटकन काही आठवायची सिध्दीच होती. सगळ्यांना अडले, तर भाईकाकांना हमखास आठवायचेच. भाईकाकांच्या साठीच्या वेळी कवी बोरकरांनी पहाटे गोव्याहून फोन केला होता. पण 'फोनवरुन दिलेला कसला रे आशिर्वाद?" म्हणत प्रत्यक्ष डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायला मुद्दाम प्रवास करून ते रात्री 'रुपाली' येऊन थडकले. शाल सावरत तरूण कवीच्या उत्साहाने आत्ताच नवीन कविता केल्यासारखे ते त्यांच्या कविता म्हणत, गात होते. त्याचवेळी मन्सुर अण्णा खास भाईकाकांसाठी गायलेली 'भैरव' अजून आठवतो! त्याच मुक्कामात एका संध्याकाळी ८-१० जणांच्या घरगुती मैफलीत ते गायलेही होते. भाईकाकांच्या पेटीच्या अप्रतिम साथीने ते गाणी खुलले होते.मुलतानीच्या 'लागी लागी' आणि भैरवीतल्या 'डारो ना डारो' मध्ये तर अण्णांनी असंख्य प्रकारच्या तानांच्या नुसता पाऊस पाडला होता. सर्व मंडळी घरी गेल्यावर भाईकाका आणि अण्णांची पुन्हा मैफल जमली आणि संपूर्ण वेगळ्या जागांच्या ताना ऎकायला मिळाल्या. भाईकाकांनी गाण्यावर अपार प्रेम केले. त्यांच्याबरोबर मैफलीत किंवा रेडिओ-टेपवर गाणं ऎकताना अक वेगळाच आनंद मिळे. त्यांच्या नुसत्या उपस्थितीनेच मैफली रंगत. माझ्या वडिलांच्या उत्साहाने आमच्या घरी गाण्याच्या घरगुती बैठकी होत आणि भाईकाकांमुळे त्यांना वेगळीच शान येई. भाईकाकांच्या उपस्थितईमुळे गवई, साथीदार आणि श्रोतेही खुलत. रसिकतेने व जाणाकारीने त्यांनी विविध प्रकारचे गाणे ऎकले होते व त्याबद्दलचे त्यांची यादगारही जबरदस्त होती. अगदी शेवटच्या दिवसांतली गोष्ट आहे. रामभाऊ किंवा सुधिरकाकांनी आणलेले भीमसेनकाकांच्या पुरिया धनाश्रीचे एक जुने रेकॉर्डिंग आम्ही ऎकत होतो. भाईकाकांना ते खूप आवडले. म्हणाले, 'हे वेगळेच - आणि भीमसेनने खूप ईर्ष्येने गायलेले गाणे आहे. अगदी रोशनाअरा बेगमच्या ढंगाचे.' नंतर कव्हर नोटसवर वाचले की, या गाण्याला रोशनारा बेगम हजर होत्या व मैफिलीनंतर त्यांनी भीमसेनकाकांचे खूप कौतुक केले होते. 

 'वरात' आणि 'चाळी' चे काही च प्रयोग मला पाहायला मिळाले, ते मी लहान असताना. पण भाईकाकांची दोन नाटके मला अगदी अथपासून इतिपर्यंत अनुभवायला मिळाली. 'वटवट' आणि 'फुलराणी'. माझा मुक्काम त्यांच्याकडे पुण्यालाच असल्यामुळे 'वटवट'च्या धमाल तालमी आणि 'बालगंधर्व'चे पहिले ८-१० प्रयोग मिळाले. 'फुलराणी' लिहून होत असतानाही मी 'रुपाली'तच होतो. भाईकाकांनी 'फुलराणी'चे आतल्या खोलीत घरगुती वाचन केले तेव्हा वसंतरावांना बोलवायलाही गेलो होतो. दगडोबाच्या भूमिकेवर भाईकाकांचे खूप प्रेम होते आणि ती स्वत: करावी, असेही सुरुवातीला त्यांच्या मनात होते. दादरला प्लाझाजवळच्या एक हॉलमध्ये सतीश दुभाषीम भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे यांना घेऊन तालमी चालत. भाईकाकांचा मुक्काम आमच्या घरीच 'गोकुळ'ला होता. रोज संध्याकाळी मला घेऊन ते तालमीला जात असत. नंतर असाच अवर्णनीय आनंद मिळाला तो एनसिपीएच्या पोग्रॅम्सच्या तालमित. तालमींच्या वेळी भाईकाकांच्या अंगात प्रचंड उत्साह भरे आणि त्यांच्या उपस्थितीमुळे कलाकारांच्या अंगातही एक वेगळाच उस्ताह निर्माण होई. त्यांच्या आवाजातच ओलावा आणि आर्द्रता होती. चटकन संवाद साधायची एक विलक्षण शक्ती होती. श्रोत्यांची नाडी त्यांना अचूक सापडलेले होती. असे खूप जाणवायचे की, मोठ्यामोठ्या नटांना, गायकांना भाईकाकांकडुन खूप शिकण्यासारखे होते. त्यात परत कधी 'शिकवण्याचा' आव नसे. आपण सर्व मिळुन जो प्रोगॅम करणार आहोत, तो उत्तम व्हावा, हिच केवळ वृत्ती. भाईकाकांची सर्वांबद्दलची स्नेहभावना व सलगी देणे विलक्षण असे. छॊट्या-मोठ्या कलाकारांपासून ते बॅकस्टेज आर्टिस्टपर्यंत सर्वानांच हा आपला कार्यक्रम आहे, या भावनेने तन्मयतेने काम करायचे. भाईकाकांची भाषणे तशी अनेक ऎकायला मिळाली. ती एक पर्वणीच असे. त्यांच्या हजरबाबीपणा, विनोद, भाषणाचा ओघ, त्यात येणारे असंख्य संदर्भ थक्क करुन टाकीत. एकदा मी आणि उमेश एका भाषणाला गेलो होतो. भाईकाकांच्या अगोदर झालेल्या भाषणातील (काही) मुद्दांवर त्यांची विनोदी टिप्पणी ऎकून, इतर भाषणे चालू असताना ते काहीतरी लिहीत होते तो कागद आम्हा बघायला मागितला. त्यावर फक्त गांधीजींचे व हत्तीचे चित्र काढलेले होते ! आणिबाणीच्या वेळची भाषणे असोत. कोणा कलाकाराचे कौतुक, सत्कार असो, की शोकसभा असो, त्यांच्या प्रत्येक भाषणाने आम्हाला अधिक श्रीमंत केले, अंतर्मुख केले असे जाणवे.

 
भाईकाका- माईआते माझ्या आवडींना विचारपुर्वक खतपाणी घालत होते. मला सायन्सची आवड म्हटल्यावर मणेरीकरांना विचारून Science ची पुस्तके, How & Why ची पुस्तके, English Classics ची सोपी Versions कायम आणत. परवाच जुनी पत्रे चाळत असताना ७५ साली मला पाठवलेल्या पत्रात Toynbee चा एक छान उतारा माझ्यासाठी मुद्दाम Type करुन पाठवलेला सापडला. मला चौथीची स्कॉलरशिप मिळाली तेव्हा त्यांनी बक्षीस म्हणून बाजाची पेटी आणली व प्रथम पुरुषोत्तम वालावलरांकडून व त्यांना इतक्या लांब जमेना (किंवा माझे ऎकवेना) म्हणून अभिषेकीबुवांच्या सल्ल्याने रामभाऊ फडकेसरांची शिकवणी लावून दिली. त्यानंतर परदेशात शिकायला जाताना मुद्दाम गोविंदरावांना सांगून त्यांनी नवी पेटी बनवून दिली होती. आता भाईकाकांची पेटी माझ्याकडे आहे. ही पेटी त्यांना भीमसेनकाकांनी खास बनवून दिली होती. (भाईकाकांनी 'तुज सम कोण सांग मज गुरुराया' असे कार्ड त्यांना पाठवून पेटी बनवून आणायची विनंती केली होती.) भाईकाका गेल्यावर माईआतेने ती मला घेऊन जायला सांगितली. त्यापुर्वीच पाच-सहा वर्षे भाईकाका 'तुला घेऊन जा, मला पार्किन्सनमुळे आता वाजवायला येत नाही.' असं सांगत होते. पण मी पुण्याला गेल्यावर मुद्दाम पेटी काढायचो. प्रथम वाजवताना त्यांना हात साथ देत नसत, पण थोड्या वेळाने रंगात आले की, पार्कीन्सन विसरून इतके अप्रतीम वाजवायचे! आणि आपल्याला अजुन पेटी जमतेय, हे कळल्यावर लहान मुलासारखे स्वत:वरच खूश व्हायचे. मग आशुतोषला एखादे गाणे शिकवायचे. जुन्या चाली आठवायचे. त्यामुळे ती पेटी तेव्हा न्यायचे मनातही आले नाही. तुसानला आमच्या घरात शिरल्या शिरल्या दारातच भाईकाकांचा पेटी वाजवतानाचा सुंदर फोटो आहे. त्यात त्यांचे हात व डोळीही विलक्षण बोलके आहेत. भाषण, गाणे, पेटी, लिखाण, गप्पा... काहीही असो. भाईकाका पटकन संवाद साधायचे. फडकेसरांकडून मी पेटीचे तंत्र शिकलो होतो. रेकॉर्डस लावून मी साथ करायचो. 

भाईकाका 'गोकुळ'ला एकदा राहायला आले असताना त्यांनी मला तोडी वाजवायला सांगितले. नंतर त्यांनी स्वत: पाच-सहा मिनीटे जो काही अप्रतीम तोडी वाजवायला सांगीतले. नंतर त्यांनी स्वत: पाच-सहा मिनीटे जो काही अप्रतीम तोडी वाजवला, की मला पेटीचा मंत्र मिळाला, असे वाटले (बोटात उतरला नाही. तरी.). पुण्याला कधी रेकॉर्डसबरोबर, तर कधी भाईकाका, मन्सूर अण्णा, वंसरराव यांच्या गप्पा-गाण्यांच्या घरगुती बैठकीत ते मला साथ करायला, वाजवायला सांगायचे व चुकतमाकत केलेल्या साथीचे कौतुकही करायचे. स्वत:ही वाजवून दाखवायचे. बालगंधर्वाच्या प्रभावाने आलेली लय-तालावरची सहजसुंदर हुकूमत त्यांच्या पेटीत होती. यांत्रिक सफाईपेक्षा जिवंतपणा, नवनिर्मीतीचा प्रयत्न, उत्स्फुर्तता याला नेहमीच महत्व दिले. त्यांची पेटीची साथ जिंवत आणि गाणं खुलवणारी होती. वसंतराव आणि मन्सुर अण्णा यांचे गाणे भाईकाकांच्या साथीने अधिक खुललेले मी अनेक वेळा अनुभवलेले होते.भाईकाका म्हणायचे, 'काही वादक साथीदाराची भूमिका न घेता 'साक्षीदार' म्हणून साथ करतात.' (एकदा कोणाची तरी फारच वाईट साथ चालू असताना भाईकाकांची कॉमेंट खास होती - 'तुझ्या पेटीचे दु:ख मला सांगू नको रे...') भाईकाका व माईआते यांचा माझ्यावरचा प्रभाव मी वेगळा काढूच शकत नाही. ही दोन व्यक्तिमत्वे जरी खूप वेगळी असली तरी त्यांचा विचार व त्यानुसार ठरलेली कृती शेवटी एकत्रच व्हायची. आजी-आजोबा किंवा पार्ल्याच्या आजी असतानाही ठाकूर आणि देशपांडे कुटूंबियाचे ते दोघेही (प्रत्यक्षात माईआतेच!) कुटुंबप्रमुख होते. माईआते आपला सल्ला ठामपणे, आग्रहीपणे मांडन तर्काने समजून द्यायला जाई (व भाईकाकांनी दिलेले 'उपदेशपांडे' नाव सार्थ करी.) , तर भाईकाका तीच गोष्ट इतक्या सौ.म्यपणे, सहज किंवा विनोदाने सांगत, की हेच योग्य, याला पर्यायच नाही. असेच सगळ्यांना वाटे. कधी वाद झालाच (जो ठाकूरांत नेहमी व उगाचच होई..), तर भाईकाकांच्या एखाद्याच वाक्याने वातावरण एकदम निर्मळ होऊन जाई. प्रतिपक्षाबरोबर वाद घालण्याऎवजी प्रतिपक्षाला स्वपक्षात सामील करण्याची किमया भाईकाकांच्या नैसर्गिक स्नेहभावनेत व आर्जवी स्वरात होती. गानुकाका तर घरचेच होते व दळवींनी म्हटल्याप्रमाणे 'मधू गानु' हे खरोखरीचे भाईकाकांचे 'हनु मानू' होते. पण त्यांचीही मधूनमधून होणारी चिडचिड भाईकाका मधे पडले की चटकन नाहीशी होई व तापलेले वातावरण निवळे. भाईकाकांच्या सहवासामुळे 'गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा' या नात्याने मलाही त्याच्या स्नेह्यांचे, चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. वंसतराव आचरेकरांनी मला 'भाचे' बनवून टाकले होते व ते तशीच हाक मारायचे. गानुकाकांबरोबर बाबुकाका, मंत्रीकाका, लालजी, श्रीकांत मोघे, मधु कदम या 'वरात' कंपुतही माझे लाड होत. मी परदेशी शिकायला गेलो तेव्हा भाईकाकांना काळजी वाटून त्यांनी तिकडच्या मित्रांना माझी काळजी घ्यायला कळवले. त्यांचे परदेशात इतके स्नेही होते, की परदेशातही मला अनेक घरे मिळाली. के.डी. दिक्षितांचे बंधू प्रभाकर दीक्षित, सावूर, म्हात्रे यांच्या कुटूंबातच नव्हे तर त्यांच्या मित्रमंडळींतही मला प्रेमाने शिरकाव मिळाला. भाईकाकांनी 'गप्प बसा' संस्कृताचा तिटकारा कायम बोलून दाखवला. ते खरेच होते. ते प्रश्नांना, उत्सुकतेला कायम प्रोत्साहन देत. एखाद शब्द, व्युत्पत्ती, कवितेची ओळ किंवा संदर्भ अडला की दोघेही अस्वस्थ होऊन त्याच्या मागे लागत व ती जिज्ञासा पुरी होईपर्यंत स्वस्थ होत नसत. मग Molesworth चा कोश निघे. कालेकरकाका, शांताबाई, श्री. पु. भागवत, लक्ष्मणशास्त्री, पाडगावकर, धोंड, बाबासाहेब, गोंविदराव अशांना फोन होत. संगितातला प्रश्न असल्यास त्याचा उलगडा करायला वसंतराव शेजारीच होते. प्रत्यक्षात विज्ञानशास्त्रात रस फारसा नसला तरी दोघांतही संशोधकांना योग्य अशी ही वृत्ती पुरेपुर होती. शास्त्रांबद्दल आणि संशोधकांबद्दल त्यांना आदर होता. म्हणूनच त्यांनी अशा कार्यांना देणग्याही दिल्या. 

'जोडोनिया धन उत्तम व्हेवारे, उदास विचारे वेच करी' हे ट्रस्ट्चे बोधवाक्य निवडणारी व आचरणारी माईआत्तेच होती. (भाईकाकांना 'उत्तम वेव्हारे' किंवा 'जोडोनिया धन' दोन्हीमध्ये गती नसली , तरी 'उदास विचारे वेच करी' ही वृत्ती पुरेपूर होती.) माईआते सर्व माहिती काढून. टॅक्सच्या दृष्टीने जास्तीत जास्त पैसे कसे, केव्हा देता येतील, याचा किस काढून सर्व कामे करी. सगळं झाल्यावर भाईकाकांचा त्याला पूर्ण उत्साहात पाठिंबा असे! सेवादल, समाजकलाणासाठी झटणऱ्या संस्था आणि व्यक्तींबद्दल त्यांना खूप आत्मियता होती. 'आहे मनोहर तरी' प्रसिद्ध झाले. एनसीपीएच्या गेस्ट हाउसच्या खोलीत श्री. पु., राज्याधक्ष दोघे व आम्ही दोघे अशा घरगुती वातावरणात प्रत मिळाली व रात्री उशीरापर्यंत जागून मी ती पुर्ण वाचून काढली. मी खूप प्रभावित झालो होतो ते वाचून. दुसऱ्या दिवशी एनसिपीएला गेलो तेव्हा भाईकाका म्हणाल, 'अरे कोणी दुखावले तर जाणार नाहीत ना?' अनेकांना भाईकाकांवरची ती तक्रार वाटली होती, टिका वाटली होती. पण माईआतेने भाईकाकांचे कलागुण किती कष्टाने आणि विचाराने जोपासले, हे आम्हाला माहिती असल्याने व भाईकाकांचे माईआतेवर विश्वासाने विसंबणे ठाऊक असल्याने तसे आम्हाला कधीच वाटले नाही. भाईकाकांची वृत्तीच अस्वादकाची... दाद देण्याचे होती. पण ते उगाचच बेजबाबदार दाद देत नसत. टिका, समीक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा व तोल सांभाळायचा आटापिटा करण्यापेक्षा ते चांगले ते टिपत. Disney, Chaplin, Woodhouse ही वेगवेगळ्या माध्यमांतून आनंद पसरवणारी त्यांची दैवते होती. तसेच टागोर. त्यांचा परिसस्पर्श खुपजणांच्या आयुष्यांना झाला. विवीध क्षेत्रांतील अशी अनेक उदाहरणे ऎकत आलो आहे. भाईकाका गेले तेव्हा भेटायला आलेले जयवंत कुळकर्णी सांगत होते, "मी तबला वाजवायचो. पण एका कार्यक्रमात आयत्या वेळी मला कोरसेमध्ये उभं केलं गेलं. अध्यक्ष पु.ल. होते. त्यांनी सर्वांतून फक्त मलाच बोलवून घेतले व म्हणाले, 'गाणे कर. तुझा आवाज वेगळा, खुप चान आहे.' आणि माझे आयुष्य पार बदलले. भाईकाकांची स्मरणशक्ती अचाट होती. २०-३० वर्षांनीही पूर्वी एखादे वेळीच भेटलेली माणसे ओळखून ते त्यांना चाट करायचे. भाईकाका पहिल्यांदा खूप खचल्यासारखे झाले ते वंसतराव गेल्यावर. इतक्या वर्षांची त्यांची दोस्ती! म्हणायचे की, अनेक संदर्भ असे आहेत की, मी ते इतर कोणाकडे बोलून कळणार नाहीत. ते खरेच होते. भाईकाकांनी एकदा वसंतरावांच्या हजेरीत 'राजकीय ध्वनिमुद्रिका'चे वाचन केले होते. तेव्हा त्या दोघांच्या बोलण्यातून लेकातले अनेक नवे संदर्भ व खुब्या मला कळाल्या होत्या. 'वसंता' हा त्यांच्या प्रेमाचा आणि कौतुकाचा विषय होता. वसंतरावही होतेच तसे जबरदस्त! कधी ते चारच सुरांत खंडमेर पद्धतीने अफाट विवीधता दाखवून चक्रावून टाकतील, तर कधी 'चंद्रिका ही जणू...' एकामागोमाग एक सहा, सात, सोळाच नव्हे, तर बारा, दहा मात्रांच्या तालात सटकन त्या-त्या तालाचे वजन पकडून असे चपखल म्हणून दाखवतील, तर कधी चटकन ग्राम बदलून रागांचे संबंध दाखवतील. त्यांच्या जादूगाराच्या पोतडीतून केव्हा काय निघेल, याचा नेम नसे. संगीतच नव्हे, तर कुठल्याही विषयावर उत्स्फूर्त निरुपण करुन त्यातील नाविन्य दाखवायचे त्यांचे सामर्थ्य होते. भाईकाका आणि वसंतराव दोघेही जरी Krewards are within youl वृत्तीचे होते. तरी वसंतरावांना गेल्यावर मला लिहिलेल्या पत्रात- भिमसेनकाकांचा मारवा ऎकतानाच कशी वसंतराव गेल्याची बातमी कळायचा योगायोग होता, ते सांगून भाईकाका म्हणतात, 'माझा अणि त्याचा तर गेल्या ४०-४२ वर्षाचा स्नेह. आम्ही दोघेही जोडीनेच वाढलो. त्याचं गाणं तर मोठं होतंच, पण नुसती भेट होनं हादेखील किती आनंददायक अनुभव असे, हे तुला ठाऊकच आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टी, त्याच्या नकला, नाना विषयातली माहिती... ती सांगण्याची खास पद्धत हे आठवताना हसू कोसळायचं. आता हसू येतं, पण त्यामागून लगेच अश्रूही उभे राहतात. मला तर खचल्यासारखंच वाटतं आहे. आता पुन्हा गाण्याची किंवा गप्पगोष्टींची तशी मैफल जमणार नाही. वसंता यापुढे 'आहेस काSS?' म्हणत त्या त्या दिवशीचा त्याचा जो गंमत करायचा मूड असेल त्यासकट उभा राहिलेला दिसणार नाही, हा विचार सहन होत नाही. आपल्या अंतरंगतलाच एक भाग गळून पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे कशातही लक्ष लागत नाही. क्षणोक्ष्णी त्याची आठवण येते. एखादा माणूस आपल्या अंतरंगात किती शिरला आहे, याची जाणीव त्याच्या हयातीत येत नसते...' वसंतरावांचा नातू राहुल गाऊ लागला तेव्हा त्यांच्या घरी भाईकाकांबरोबर ऎकायला गेलो होतो. भाईकाकांना खूप आनंद झाला होता. तेव्हा तो सर्व कुमारकाकांची गाणी गायचा. तसे त्याच्या आईने बोलून दाखवले तेव्हा भाईकाका म्हणाले, 'तो पुढे आपोआपच वसंताचे गाणे गाऊ लागेल बघ.' आणि तसेच झाले.

 
पार्किन्सनमुळे लिहिणे, भाषणे, लोकांत येणे-जाणे थांबले तेव्हा संगीत हाच त्यांचा मुख्य विरंगुळा राहिला होता. ते गप्पा एन्जॉय करीत. जोक्स, हजरजबाबीपना तसाच होता. आपण पुर्वीसारखे बोलणे, गाणे, प्रोजेक्ट करू शकत नाही, हे जाणवल्यावर ते जास्तच गप्प राहू लागले. मैफलीचा बादशहा असणारे भाईकाका गप्प गप्प राह्त तेव्हा सर्वांनाच हळहळ वाटे. एकदा असेच सुरेश गजेंद्रगडकर भेटायला आले होते. थोडा वेळ बसले. जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून निरोप घेताना ते अगदी रडवेलेच झाले. म्हणाले, 'भाई आणि बोलत नाहीत ! सहन होत नाही रे!' पण तरीही त्यांची माणसांच्या सहवासाची आवड तसीच राहिली होती. अगदी कोणीही भेटायला आले आहे सांगितले की दुसऱ्य क्षणी 'आलो' म्हणून उठून बसायचे व व्हिलचेअरमधून बाहेर यायचे. कधीच आळस, बेपर्वाई नसायची. 'मुक्तांगण', 'आशिर्वाद'. रुपाली' त असताना भाईकाका जेव्हा खूप लिहायचे तेव्हा त्यांच्या याच वृत्तीमुळे लिखाण कमी होई किंवा त्यात खंड पडे. म्हणून लोंकाना थोपवण्याचे काम माईआतेने स्वत:च्या शिरावर घेऊन वाईटपणा घेतला. 'महाराष्ट्र्भूषण' पुरस्कार स्विकारतान 'विझवून दीप सारे मी चाललो निजाया' असे त्यांनी म्हटले तेव्हा खूप वाईट वाटले. त्यांच्या बाबतीत याच कवितेचे पहिले कडवे मला सारखे जाणवत राही. 'स्वरशब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी, आजन्म गायिली मी त्यांची अखंड गाणी.' भाईकाकांनी करंदिकराच्या 'घेणाऱ्याने घेत जावे' मत्रांप्रमाणे अनेकांचे गुणविशेष टिपले, आत्मसात केले व लोंकापर्यंत पोहचवले आणि देणाऱ्याचे हात दोन्ही अर्थाने घेतले. कृतज्ञतेने, स्नेहाने दाद देतही घेतले व दात्याचेही हात घेतले. मिळवलेला पैसा उदास विचारे वेच करुन व त्याहीपेक्षा मिळवलेला आनंद शतपट करीत लोकांना.... पुढच्या पिढ्यांना वाटला. कुमारकाका गेले तेव्हा 'साधने'त वसंत बापट यांनी लिहीले होते की, त्यांचे गाणे आता यंत्रात राहिले, तत्रांत राहिले, पण आमचा मंत्र निघून गेला. त्यावेळी आणि भाईकाका गेले तेव्हा पुन्हा तशीच मन:स्थिती झाली होती. पण हे मांत्रिक इतके जबरदस्त होते की, आता कालांतराने ते नाहीत, याची रुख्रुख जरी सतत राहिली असली तरी त्यांच्या मंत्राचा प्रभाव तसाच जालीम- पुन:पुन्हा जाणवत राहतो. भाईकाकाक गेले तेव्हा एका वर्तमानपत्रात कार्टुन आले होते की, ढ्गांवर देवदूत आहेत व हशा ऎकून म्हणत आहेत, 'पु.ल. आले वाटतं!' देवावर कणभरही विश्वास नसला, तरी स्वप्नरंजन चालू राहते की, पुन्हा कधीतर ते मंतरलेले दिवस मिळतील. भाईकाका, कुमारकाक, वसंतराव, मन्सुर अण्णा हे भुलोकीचे गंधर्व मैफल रंगवून बसलेले असतील व आपणही त्यात कुठेती सामिल असू ! ऎकायला! 

छायाचित्रे सौजन्य - 'चित्रमय स्वगत' मौज प्रकाशन गृह. 
(लोकसत्ता)

Saturday, October 4, 2008

परफॉर्मर ’पुलं’ - सुधीर गाडगीळ

पु.ल. देशपांडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त खास लेख शब्दांच्या निवडीतलं नेमकेपण, सोप्पेपण, शब्द मांडणीतली अनौपचारिकता, भरजरी अलंकारिक शब्दांना दिलेला फाटा आणि 'नादा' मधला जिव्हाळा, या गोष्टी 'पुलं'ना ऐकताना आवर्जून जाणवत असत. भरड्या खादिच्या नेहरु शर्टाची बाही सरसावत 'तुम्हाला सांगतो' म्हण त्यांनी केलेलं भाषण असो, पॅंट-बुशकोटातल्या 'पुलं'चं, सिगारेटचा झुरका घेत कोचावर शेजारी बसलेल्याशी चाललेल्या गप्पा असोत किंवा 'एनसीपीए'त भावसंगीताचा प्रवास ते मांडत असताना, त्यांचं चाललेलं निवेदन असो, माझं लक्ष त्यांच्या शब्दमांडणीकडेच सतत असे. भाषण असो वा मुलाखत, त्यांच बोलणं गप्पा मारल्यासारखं असायचं, घरात बोलताना पुढचं वाक्य सहज सुचत जावं तसं. त्यातलं साधेपण मनाला भिडायचं.

'पु.ल.'च्या आवाजात , त्या नादात, तुमच्या -आमच्या विषयीचं प्रेम जाणवायचं, एखाद्याचं उत्स्फूर्त वाक्यानं स्टेजवर चैतन्य निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या बोलण्यात होती. अहमदनगरला 'आर्ट गॅलरी'चं उद्घाटन होतं. बासुदा आणि पुलं समारंभाचे पाहुणे होते. संयोजक-संचालक काही कारण नसताना 'पुलं'च्या वाटेला गेले. म्हणाले, 'आज या गॅलरीत चित्र प्रदर्शन आहे. पण बोलवलेल्या पाहुण्यांपैकी एकजण नाटकातला....'पुलं' आणि दुसरे सिनेमातले... बासुदा. दोघांनी हातात 'प्रश्न' कधी धरलेला नसेल. 'त्या संयोजकाचं हे आगाऊ वाक्य संपताक्षणी, पुलंनी फक्त प्रेक्षकांकडे बघत दाढी करत असल्याचा अभिनय करत भाबड्या स्वरात म्हटलं 'रोज हातात ब्रश धरतो की हो !' 

गंमत साधताना कधी अकारण कुणाचा अवमान नाही. उगाच आक्रस्ताळी विधानं नाहीत. चारजण भोवती असावेत. गप्पामारा, सगळ्यांचा वेळ आनंदात जावा, ही भवना सतत. वेळ कसा गेला हे कळलंच नाही, असं साऱ्यांना वाटावं, ही अतंरीची इच्छा, अर्थात खूप 'अतंरी' शिरण्याइअतपत माझ 'वय' नव्हते. सुरुवातीला दुरुन ऎकत गेलो. माध्यमात काम करायला लागल्यानंतर मात्र बऱ्याच वेळा 'गप्पा' मारण्याचा योग आला. दोन-चार वेळा 'प्रवास' ही घडला. या सर्वच संवादात किंवा त्यांची पुस्तक वाचताना किंवा त्यांना चाळ, वरात, वटवट, सादर करताना पाहताना, मला पुन: पुन्हा त्यांचा 'शब्द खेळ' मोहित करायचा. थोडं त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर जाणवलं की, उत्स्फूर्त शब्दफेकीमागेही शिस्तबद्ध आखणी आहे. 'तुम्हाला सांगतो' म्हणत, पाण्याचं भांडं तोंडाला लावतानाच, पाणी प्यायलानंतरचं वाक्य, हुकमी, हंशा-टाळीचं आहे, याची खात्री जशी पुलंना असे तसं आता दाद द्यायला सज्ज व्हावं, हे श्रोत्यांना समजुन येऊन, वाक्य येण्यापूर्वीच हास्याची लकेर श्रोतृवृदाच्या चेहऱ्यावर उमटे. डोळ्यावर चष्मा असुनही ,असूनही ते कधी साहित्य परिषदेतल्या अहवाल वाचनासारखं बोलले नाहीत. उलट त्या चष्म्याआडून रोखलेल्या खट्य़ाळ डोळ्यातून, आमच्याच अवतीभवती बघत, आमच्याच मनातल्यासारख्या इतरांच्या खोड्या शब्दातून काढत असत. 

एकदा वाटवे, ज्योत्स्नाताई, मालती पांडे, नावडीकर अशा साऱ्या गायकांचा आणि त्यांच्या भावगितांचा विषय निघाला, म्हणाले, "ती सगळीच गाणी विलक्षण होती. वाटव्यांच्या गणपतीतल्या मैफलीत, समोर सतरंजीवर बसलले श्रोते, वाटव्यांच्याबरोबर गाणी म्हणत. इतकी पाठ होती. मलाही आवडत. ते नावडिकरांच कुठलं...'रानात सांग कानात...' मस्त चाल. आवडायचं. एक शंका यायची मनात." 'काय? काय हो?' आमच्या उत्सुक नजरा आणि अधिरलेले कान. "मला वाटायचं, गाणं छान. पण एवढ्या मोठ्या रानात अगदी कानात कशाला सांगायला पाहिजे?" 'हे सुचण्यासाठी अंगभूत खट्याळपणाच हवा,' असं तेच एकदा सांगत होते. म्हणाले, मी, वसंता, (वसंतराव देशपांडे) शरद (तळवरकर) आम्ही एकत्र जमलो की वात्रपटपणाला उत असे. कदाचित या मुळातल्या वृत्तीमुळेच, भोवतीच्या विसंगतीवर बोट ठेवत, भंपकपणावर टिप्पणी करत, 'पुलं' आमच्या मनातलं बोलून जात. त्यांच्या निरीक्षण शक्तीला तर दादच द्यायला हवी. आपण पाह्यलेल्या, अनुभवलेल्या गोष्टीच ते भाषणात मांडत. पण ऐकताना आपल्या सगळ्यांनाच वाटे की, 'अरे हे आपल्या कसं लक्षात आलं नाही?" आणि म्हणूनच आपण सारे टाळ्यांच्या गजर करत असू. 

एक उदाहरण देतो. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराचा परिसर. पूर्वीच्या ओंकारेश्वर स्मशानभूमीपासून, जंगली महाराज रस्त्यावरच्या झाशीच्या राणीपर्यंत पसरलेला. याच आपल्याला माहीत असलेल्या परिसराबद्दल. गंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात 'पुलं' कसे बोलतात पाहा..."एखादी वास्तू कुठे उभी राहते याला फार महत्व आहे. गंमत बघा. इथं बाहेरच्या बाजूला पुरूषाच्या वेषातील स्त्री आहे. झाशीची राणी आतल्या बाजूला स्त्रीच्या वेषातला पुरूष आहे. बालगंधर्व. अर्धनारीनटेश्वराची दोन रुपं जिथं आहेत नटेश्वराचं मंदिर उभारलं जातय, ही आनंदाची बाब आहे. अलिकडे नटेश्वर आहे. पलीकडे ओंकारेश्वर आहे. मधून जीवनाची सरीता वाहतीय. तिच्यावर पूल आहे. माझी विनंती एवढीच आहे की पूल एकतर्फी असू द्या. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा असू द्या." आता अशा शब्दामांडणीला आपण भरभरून दाद दिल्याशिवाय राहू का. उत्स्फूर्त शब्दांचे फुटाणे ते क्षणोक्षणी फोडत. 

एकदा नगरच्या दौऱ्यात काळे आर्किटेक्टकडे आम्ही जेवायला बसलो होतो. जेवणात मासे पाहिल्यावर पु.ल. खूष झाले. पण माशाचा आग्रह होऊ लागताक्षणी म्हणाले की, रात्री 'मर्ढेकर' प्रोग्रम आहे. ढेकर' नाही. मॉरिशसच्या एअरपोर्टवरून आम्ही सारे भारतात परतीला निघालो होतो. एअरपोर्टवर कस्टम ड्यूटी फ्री शॉपमध्ये एक पैशाचं सुंदर पाकीट त्यांना दिसलं. किंमत ऎकल्यावर म्हणाले, 'पाकिटाला एवढे पैसे दिल्यावर पाकिटात काय ठेवू?" याच मॉरीशसच्या परिषदेत मी माणिक वर्मांना जेव्हा विचारलं की, माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना, तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं? तशी शेजारीच उभे असलेले 'पुलं' पटकन म्हणाले, 'अरे तिच्या वर्मावर का घाला घालतोस'? 

लिहीतानाही बोलण्याप्रमाणेच ते सहज असत. अकारण श्ब्दांची आतषबाजी नाही. लिहितानाही वृत्तीतला - मनातला 'परफॉर्मर' सतत जागा असे. नुसता त्यांचा 'आवाज -आवाज' लेख वाचला तरी वाचणाऱ्याला 'ऎकत' असल्याचा अनुभव यावा, अशी शब्दांची रचना. बर्वेला 'अंतू बर्वा' उच्चारून ते वाचकाला क्षणात कोकणात घेऊन जात. नारायणाच्या धावपळीतून अवघ मंगलकार्यच डोळ्यासमोर उभं करता करता, खरकट्या हातानं अर्धवट लाडू खाउन एकटाच पेंगुळलेला नारायण दाखवून पोटात खड्डा आणत हसवता हसवताही कारुण्याची झालर लिहीण्या-बोलण्यात सतत डोकावे त्यामुळे पुलं आणखीनच आपले वाटत. संभावीत प्रतीष्ठितांच्या भंपकपणाला आमच्याच शब्दातून टप्पू देत ते आमच्याच मनातला उद्वेग व्यक्त करत. उदा. 'मासा पाण्यात श्चास कसा घेतो हे जसं सांगता येत नाही, तसं सरकारी अधिकारी नेमका कुठे, कसा पैसा खातो ते सांगता येत नाही.' 

त्यांना रंगमचंचावर किंवा पडद्यावर पाहताना जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या पोशाखही तुमच्या आमच्यासारखा साधा असे. ढगाळ नेहरु शर्ट किंवा चौकडीचा बुशकोट. वरातीत पेटी वाजवायला बसले की रुमाल डोक्यावर बांधलेला. वाद्य अस्त्याव्यस्त पसरलेली, पेटीच्या सूरातून मात्र क्षणात गंधर्व काळात घेऊन जात. सामान्यांसारखा पोशाख, एखाद्या घटनेच्या अनुषंगानं सामान्यांच्या मनात उमटतील अशा उमटलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया, भंपक राजकरण्याच्या बाबतीत केलेली टोलेबाजी आणि हे सारं करताना मिष्किलपणा किंचितही न सोडलेला. त्यामुळे 'पुलं' मला तरी आर. के. लक्ष्मणानी चितारलेले लव्हेबल कॉमनमॅन्च वाटतात. हा कॉमनमॅन स्वत:च्या लेखणी-वाणीतून जमा केलेले कोटभर रुपये सामाजिक संस्थांना वाटून टाकतो. तेव्हा तर या मिष्किल परफॉर्मर बद्दलचा आदर अधिकच वाढतो. तमाशातला सोंगाड्या, खेडातलं भजनी मंडळ, रघुतमा रामा म्हणणारे किर्तनकार, ही सामान्यांशी संवाद साधणारी मंडळी पुलंच्या विशेष आवडीची होती. हे गप्पात कळल्यावर तर अधिकच बरं वाटतं. चाळीतले कुशाभाऊ सोकाजी नाना, एच. मंगेशराव काय, म्हैस' मधला सुबक ठेंगणीकडे बघणारा किंवा पंचनाम्याचा पोलीस काय, असंख्य नमुन्याची माणसं, 'पुलं' मधला परफॉर्मर जेव्हा नादातल्या वैविध्यासह, बसण्या-उठण्याच्या विशिष्ट पोश्वरसह सादर करतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या लिखाणातल्या सूक्ष्म निरीक्षणाला दाद द्यावी की आवाजाचे बहुविध पोत दाखविणाऱ्या बहुरुप्याला दाद द्यावी की रंगमंचावरच्या त्यांच्या लवचिकपणाला द्यावी हे समजेनासं होतं आणि मग त्या साऱ्या अनौपचारिकतेला नमस्कार करण्यापलीकडे काय उरतं?

साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट अशा ललिर कलांच्या सर्व क्षेत्रात मुक्त संचार केलेल्या आणि या प्रत्येक प्रांतात आपली नाममुद्रा उमटवलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाशी एक-दोन वेळा प्रवासात प्रदिर्घ गप्पा मारण्याचा योग आला. जुन्या डायऱ्यात त्या नोंदी सापडल्या. त्या इथे नोंदवतो. ७ डिसेंबर १९९२ डेक्कनक्वीनचा प्रथम श्रेणीचा दबा. दंगलीचं रोद्र रुप सुरु होण्याची कल्पना गाडीत बसताना आम्हा कुणालाच नव्हती. मी नेहमीच्या सवयीनं गाडीत चक्कर टाकायला निघालो तर पुढच्याच बोगीत पुलं. स्वेटर घालून बसलेले. त्या संध्याकाळच्या प्रवासात ते शहरांवर बोलले, बडोद्याच्या टांगेवाल्याची एक गंमत त्यांनी सांगितली... "अरे मी शहरांवर लिहिणार होतो. 'बारागावचं पाणी' असं नाव पण डोक्यात होतं. पण ते नाव आमच्या वसंत बापटानं घेतलं आणि माझं लिहीणं राहून गेलं, कलकता मला नेहमी खुणावतं. आकृष्ट करतं 'बस्ती' हा शब्द झोपडपट्टीला तिकडनंच आला. बेळगाव आवडतं. बडोद्याला टांगे छान असत. सजवलेल्या गाद्या असायच्या . मी आणि भीमसेन पूर्वी बरोबर फार भटकायचो. ते गाणार. मी अध्यक्ष. इतकं की लोकांना वाटायचं की मी त्यांच्या गाण्याच्या मानधनातून काही घेतो की काय? तर बडोद्याला टांग्यातून जाताना आम्ही परस्पर ताना घेत होतो. तुला सांगू? गतीबरोबर गायकाला गाणं सुचतंच. मध्येच वळणावर ताना थांबल्या. तशी टांगेवला म्हणाला की, 'साब पुरीया धनाश्री पुरा करो. अच्छा चल रहा था, क्य़ूं ठहरे?' आम्हा दचकलोच. संगीतज्ञानाही चटकन ओळखू न येणारा 'राग' त्या टांगेवाल्यानं ओळखला होता. कोण कशात हुशार असेल सांगता येत नाही. सुराला जात धर्म, पंथ, पत, धंदा याचं मोजमापच नाही. आम्ही त्या टांगेवाल्याला विचारलं, "तुला कसं माहीत?" तो उत्तरला, "आपने फ़ैय्यज खॉं साबकी मेहफील सुनी होगी, मैने तो रियाझ सुना है...." 

कौतुक, आदर, प्रेम या भावना पुलंविषयी व्यक्त करण्यासाठी मराठीतली स्रव विशेषणं आजवर उपलब्ध आहेत ती यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलीयेत. पुलंच्या पहिल्या पुण्यतीथीच्या वेळी(१२ जून २००१) दिलीप माजगावकरांनी मला शेक्सपियरचं एक वाक्य, त्यानं ते वेगळ्या संदर्भात वापरलेलं त्याची ओळ निवेदनासाठी दिली... ऍंड द एलिमेंटस सो मिक्सड एन हीम. दॅट नेचर माईट स्टॅंड अप ऍंड से टू द वर्ल्ड, दॅट धिज अ मॅन. 'पु.लं'बाबत असंच म्हणता येईल की.. संस्कृतीच्या सर्व घटकांच मिश्रण, ज्यांच्यात एकवटलेलं आहे, असे हे पुरुषोत्तम! या परफॉर्मर पुरुषोत्तमास एका छोट्या परफॉर्मरचा प्रणाम. 

सुधीर गाडगीळ 
(लोकसत्ता)

Friday, September 26, 2008

देणाऱ्या हातांचे पुल!

'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' अशा यथार्थ शब्दात गौरविलेल्या पु. ल. देशपांडे यांची १२ जून ला पुण्यतिथी असते. आता पुल आपल्यात नाहीत , ही जाणीव मन विषण्ण करणारी असली तरी पुलंचे स्मरण झाल्याबरोबर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांची एखादी तरी विशिष्ट आठवण चटकन जागी होते. कधी पुलंनी केलेली एखादी कोटी आठवते , कधी त्यांच्या नाटकातील वा चित्रपटातील एखादा खुसखुशीत संवाद आठवतो , तर कधी त्यांच्या एखाद्या लेखातील गमतीदार वाक्य आठवते. पुलंनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर आहेत. त्यांचा ' काकाजी ', त्यांचे ' चितळे मास्तर ', त्यांचा ' नारायण ' हे सगळे थोड्याफार प्रमाणात आपल्याला आजूबाजूच्या जगात वावरताना दिसतात. पुलंनी निर्माण केलेले वाक्प्रचार मराठी भाषेत रुढ झालेले आहेत. '' तुला शिकवीन चांगलाच धडा '' हे ' ती फुलराणी ' मधील स्वगतातील उद्गार कधी गमतीत तर कधी रागात अनेकदा उच्चारले जातात. आतातर ते चित्रपटाच्या नावानेही विभुषित झाले आहे. मराठी भाषेची विविध रूपे आणि ती भाषा बोलताना प्रांतपरत्वे होणारे बदल पुल जेवढ्या बारकाव्याने दाखवत तेवढे बदल कोणी क्वचितच दाखविले असतील. 

पु.ल. हे साहित्यसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट होते , याबद्दल वादच नाही. इतके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात आजवर झाले नाही. पुल लेखक होते , कवी होते , संगीत दिग्दर्शक होते , नट होते , वक्ते होते. ही सगळी यादी सांगण्यापेक्षा काय नव्हते ? असे विचारणे अधिक सोपे आहे. पण यापलीकडेही पुलंच व्यक्तिमत्त्व विशिष्ट ठळकपणे नजरेत भरण्यासारखा त्यांच्याकडे एक गुण होता. तो म्हणजे समाजसेवेची त्यांना असलेली जाणीव आणि दीनदुबळ्यांसाठी , गरजवंतांसाठी प्रसंगी स्वत: तोशीस सोसूनही त्यांनी उभारलेले समाजकार्य आणि त्या विषयातील त्यांची तळमळ. पुलंचा आशीर्वाद मिळणे , पुलंनी '' भले शाब्बास '' म्हणणे याला महाराष्ट्राच्या कालपरवापर्यंतच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. पुलंची शाबासकी मिळाली की कोणालाही आकाश ठेंगणे वाटे. पु.ल. जेथे जात तेथे माणसांची गर्दी त्यांच्या अवतीभोवती आपोआप जमा होई. त्यासाठी भाड्याने माणसे बोलवावी लागत नसत. पुलंच्या ठायी असलेली विविध स्वरूपाची गुणसंपदा हे देवाचे देणे आहे , ते प्रयत्न करून अंगी बाणविता येण्यासारखे नाही. 

समर्थांनी म्हटले आहे , '' रूप लावण्य अभ्यासिता न ये । सहज गुणासि न चले उपाये । काहीतरी धरावी सोये । आगंतुक गुणांची ।। '' समर्थांच्या काळात ब्युटीपार्लर नव्हते. त्यामुळे त्यांनी '' रूप लावण्य अभ्यासिता न ये । '' असे म्हटले असावे. आता रूप-लावण्यात ' नव्हत्याचे होते ' करणा - या कला अस्तित्वात आल्या आहेत. पण '' सहज गुणासि न चले उपाये '' हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून पुलंच्या लेखातील वा साहित्यातील गुण किंवा त्यांचा अभिनय अनुकरण करून साधणार नाही ; पण समाजहिताची कळकळ आणि तळमळ मात्र आपल्या अंगी बाणविता येऊ शकते. लेखनाच्या उत्पन्नातून भलेमोठे समाजकार्य निर्माण करण्याचा पुलंनी जो वस्तुपाठ आपल्यासमोर उभा केला , त्याचे अनुकरण यथानुशक्ती प्रत्येकाने केले तर ते पुलंची स्मृती चिरकाल ठेवण्यास साह्यभूत होईल , यात शंका नाही. 

महाराष्ट्र टाईम्स 
(१२ जून २००८)

Saturday, September 20, 2008

नटराजाचा लाडोबा - पंडीत दामले

चित्रपट व्यवसायाबद्दल सगळ्यांनाच कुतुहल असते. मी आणि माझा धाकटा भाऊ यशवंत, आणी ही गल्लीच्या न्यु एंजिनीयरींग कॉलेजात १९४८ मध्ये दाखल झालो. तेव्हा तर आम्हाला ’प्रभात’च्या वलयाची पार्श्र्वभूमी होती. सहाजीकच कॉलेजच्या वस्तीगृहात आमच्याविषयीचे औत्सुक्य होते. प्रत्यक्षात आम्ही लेंगा, शर्ट, कोट अशा वेशात गेलो आणि सर्वांमध्ये मिसळून गेलो. 

त्यावर्षी प्रसिध्द लेखक पु.ल. देशपांडे एम. ए. शिकण्यासाठी विलिग्टंन कॉलेजात येणार असल्याची बातमी समजली. त्यांच्या विषयी आमच्या मनात वेगळीच प्रतीमा होती. पण तिला छेद देत ढगळ सदरा-पायजमा, पायात चप्पल अशा थाटात पु.ल. दाखल झाले. तेव्हा ’पु.ल.’ पेक्षा दामले बरे असे म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. आमच्या अंगावर कोट तरी होते. प्रभात कंपीनीमुळे पु.ल. ची आणि आमची चांगली ओळख होती.आता तिचे मैत्रीत रुपांतर झाले. 

पु.ल ना विश्रामबागेत खरं तर शांतता मिळत होती. चाहत्यांच्या गराड्यात जखडले जात नव्हते. कोल्हापुरात १९३३ साली साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात आचार्य अत्रे, गिरीश, यशवंत, सोपान देव चौधरी, संजीवनी मराठे, मायदेव या कवींनी भाग घेतला होता. स्टुडीओत निम्मीत करुन त्याच्या काव्यरचनांचे त्यांच्या आवाजात चिकीरण करण्यात आले होते. त्यावेळी कवी गिरीश यांनी आपली सुप्रसीध्द कवीता "न्यारीचा टाकु त होईल...मैतरणी बिगी बिगी चल" सादर केली होती. कवि गिरीश यांच्या बंगला विश्रामबागेत होता. पु.ल. च्या बरोबर आम्ही सुध्दा गिरीशांकडे गप्पा मारायला जायचो. कवींचा पु.ल. वर फार जीव होता. पु.ल. मुळेच या थोर कवींचा सहवास आम्हाला लाभला. आम्ही अनेकदा संध्याकाळी सांगली-मिरजला फिरायाला जात असू. परतण्यास उशीर होऊन विश्रामबागला जाणारी शेवटची गाडी कधीकधी चुकायची. त्या उतररी पु.लं. ची मैफल असायची. पु.लं. च्या सहवासात आम्ही विश्रामबाग स्टेशनच्या प्लेटफॉर्म वर रात्र जागवत असू. त्यावेळी नकला, गाणी, विनोदी कथा, प्रसंग यांची रेलचेल होत असे. यातुन पु.ल. च्या विवीध कलापैलुंच बहुरुपी दर्शन आम्हाला घडे. किती भाग्यवान आम्ही! त्यावेळी यासर्व गोष्टीचा आनंद घेत वर्ष संपले. आम्ही पुण्याला परतलो. 

पुण्यात आल्यावर प्रभात स्टुडीओत पु.ल. च्या गाठीभेटी होत राहिल्या. खुप वर्षानंतर नुकताच सांगलीला गेलो होतो. विश्रामबागेत स्टेशनची भग्न अवस्था पाहून डोळ्यात पाणी उभे राहिले. लेखन, अभिनय, संगीत, वक्तृत्व वगैरे कितीतरी कला पु.ल. ना अवगत होत्या. भरुनभरुन मिळाल्या. नुर्त्यकला द्यावी अशी नटराजाची इच्छा असेल. पण एवढं ओझ त्यांच्यावर लादु नका, असा सला पर्वती देवींनी दिला असणार. तरी पु.ल. नी स्वतंत्र न नाचता, आपल्या चित्रपट गिताच्या तालावर अनेक चित्रपट तारे-तारकांना नाचवले. एवढ भरभरुन देऊन सुद्धा देव समाधानी नव्हता. सुनीतावहीनी ही शक्ती त्यांच्यामागे उभी केली. अर्धनारी नटेश्वराचे मनोहरी रुप साकार झाले. नटराजाचा लाडोबा त्यांच्याच आज्ञेवरुन कैलासाकडे रवाना झाला आहे. 

- पंडीत दामले

Wednesday, July 23, 2008

हे जग मी सुंदर करुन जाईन....

मित्रांनो,
 
'तो' मीच का 'तो मी नव्हेच' अशी शंका प्रेक्षकांनी कृपया घेऊ नये. तो 'मी'च पु. ल. देशपांडेच आहे. माझे मित्र श्री. वसंतराव कानेटकर यांनी माझी ओळख करुन देताना माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. अत्यंत निकटचे स्नेही असल्यामुळे अशी अतिशयोक्ती होणे स्वाभाविक आहे. मला भीती वाटू लागली होती की, आता हे मी त्यांना अगदी खाजगीत सांगितलेल्या गोष्टी अशा उघड्यावर बोलतात की काय? आणि त्यांनी तसे केले असते तर मी त्यांच्याच एखाद्या सुंदर नाटकाचा विषय घेऊन त्यावर बोलण्याचे ठरविले होते. वास्तविक "कानेटकरांचे सुंदर नाटक" असे म्हणण्यात द्विरूक्ती झाली आहे; कारण कानेटकरांचे प्रत्येकच नाटक सुंदर असते. परंतु कानेटकरांनी तेवढा संयम राखला आणि मला ती संधी दिली नाही.

आताच प्राचार्यांकडून मला असे सुचविण्यात आले की, मी काही मार्गदर्शनपर गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना उपदेश करावा. वास्तविक माझा असा उपदेश करण्यावर आणि तो उपदेश लोक ऐकत असतील या दोन्हींवर विश्वास नाही.प्रथम ह्या प्रसंगी ज्यांना बक्षिसे मिळाली आहेत आणि ज्यांनी त्यांना ती मिळू दिली अशा दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः स्वतःचे जीव धोक्यात घालून इतरांचा बचाव करण्यात श्री. तिजारे व श्री. शिंदे यांनी दाखविलेल्या सहजस्फ़ूर्त धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तुमच्या ह्या नाशिक शहराला एक विशेष परंपरा आहे. ती म्हणजे कधी तरी राम येथे पंचवटीत येऊन राहिला आणि सीतामाईने त्याचे पाय चुरले म्हणून नव्हे किंवा नाशिकच्या चिवड्यासाठीही नव्हे. परवाच मी कोणाला तरी सांगितले की मी नाशिकला जात आहे. त्यांनी "ऑं!" असा उद्गार काढला व अगदी चेहरा पाडला. मी म्हटले तसे काही नाही-- स्नेहसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी जात आहे. नाशिक शहराला सावरकर, कान्हेरे यांच्यासारख्या क्रांतिकारकांची परंपरा लाभली आहे आणि आजही जशी ह्या आठवणींची ज्योत माझ्या ह्रदयात तेवत आहे तशीच ही आठवण तुमच्याही ह्रदयात सतत तेवत राहील अशी माझी खात्री आहे. असले प्रसंग किरकोळ म्हणून नाउमेद व्हायचे कारण नसते. कल्पना करा की,सूर्य मावळताना त्याला चिंता पडली की,माझा उजेड संपल्यावर या सर्व जगाचे कसे होणार?--- सर्व सत्ताधारी व्यक्तींची हीच भीती असते की, माझ्यानंतर या खुर्चीचे काय होणार? सूर्य तरी याला अपवाद कसा? सर्व विद्युद्दीप पेटले होते, मशाली पेटल्या होत्या, अशा वेळी एक बारीकशी पणती---केवढी मिणमिणती ज्योत होती त्या पणतीची !---ती म्हणाली,"भगवन , मला होईल तेवढे मी आपले कार्य करीन. कदाचित आपल्याइतके सामर्थ्य नसेल माझ्या या प्रकाशात. परंतु म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही." स्वा. सावरकर, कान्हेरे यांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांच्या साहसाइतके तुमच्या तिजारे, शिंदेंचे साहस मोठे नसेल, पण त्यालाही महत्व आहेच. त्यांच्या कर्तव्यतत्पर साहसप्रवृत्तीला महत्त्व आहे.

मी असे ठरविले होते की, काही भाषण तयार करुन जाण्यापेक्षा येथे आल्यावरच तुमच्याशी काही हितगुज करावे. असे भाषण तयार करुन जाण्याचे माझ्यावर अनेकदा प्रसंग येतात आणि येथे तर ते नेहमीच येत असतील. आजचा विद्यार्थीवर्ग बदलला आहे, असा गहजब नेहमी कानांवर पडतो, पण मला तरी हा विद्यार्थीवर्ग बदलला आहे असे वाटत नाही. विद्यार्थ्यांचे बाह्यांग बदलले आहे, पॅंट्सची रूंदी कमी झाली आहे. तरुणींच्या पोषाखाबाबत मी जास्त तपशीलात शिरत नाही. गॅदरींगच्यावेळी एखादा विद्यार्थी बक्षीस घेत असताना 'वशिला' करुन ओरडणे...सर्व तेच आहे. मीही तुमच्यासारखा असताना असेच ओरडत होतो, आणि म्हणून मला वाटते, जे लोक असे म्हणतात की, विद्यार्थी बदलले आहेत ते लोक स्वतःची विद्यार्थीदशा पूर्णतया विसरलेले असतात. मला काही सांगायचंय ह्या कानेटकरांच्या नाटकाच्या नावाचा आधार घेउन मी असे सांगतो की, प्रत्येकाच्या कृतीत 'मला काही सांगायचंय' ही भावना असते. आणि ऐकू इच्छिणाऱ्या समोरील व्यक्तिमध्येही त्याचा अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा असते. बस पकडण्यासाठी काय माणसे धावत नाहीत ? परंतु त्या धावण्यामागे आणि आताच्या या 'रनिंग'च्या स्पर्धकांच्या धावण्यामागे काही निराळा दृष्टीकोण असतो. त्यामधून त्याला काही सांगायचे असते. त्याचप्रमाणे रांगोळीस्पर्धा. त्या स्पर्धकांना माहीत असते की, रांगोळी फार तर उद्यापर्यंत राहील आणि परवा हा दिवाणखाना झाडणारा नोकर ती रंगोळी, ती कलाकृती झाडून टाकणार आहे. आणि हे माहीत असूनही ते कलावंत पाच पाच, सहा सहा तास खपून ती रांगोळी काढीतच असतात.कारण त्या कलाकृतीतून त्यांना काहीतरी सांगायचे असते. परंतु ते सांगणेसुद्धा सुंदर व आकर्षक असावे लागते. उदारणार्थ, एखाद्या मुलीचे लग्न ठरले---मुलीचे येथे नाव मुद्दामच घेत नाही, नाहीतर उद्यापासून तिचा कॉलेजमध्ये छळ सुरु व्हायचा. म्हणूनच मी 'क्ष' असे म्हणतो. आणि क्ष वगैरे म्हटल्याने आपण विद्वान असल्याचा आनंद होतो---तर समजा, त्या मुलीचे लग्न ठरले, तर लागलीच तिची आई पहिल्या शेजारणीला सांगते,"अहो ऐकलं का ?" ती एकदम सांगत नाही, आमच्या मुलीचे लग्न ठरले म्हणून ! "अहो ऐकलं का ?" की त्यावर ती शेजारीण म्हणते,"का हो,काय झालं ?" ती आई मग सांगते ," बरं का ! आमच्या 'क्ष'चं लग्न ठरलं ! आणि अगदी अचानक , अकल्पितच ठरत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी चूक अत्यंत आनंदात साजरी होत असते आणि ह्या सर्व गोष्टी सारे जण रस घेऊन ऐकत असतात.

साहित्य-संगीत-कला या सर्वांच्या मुळाशी 'मला काही सांगायचयं' हीच भावना आहे. उक्तीने व कृतीने आपले म्हणणे सांगण्याची ऊर्मी तुम्हा-आम्हा सर्वांत आहे. सूर्योदय आपण कधी नव्हे तो चुकून एखाद्या वेळी पाहिला असला तरी सूर्योदयाचे चित्र आपण आनंदाने पाहतोच. म्हणजेच या सांगण्यामध्ये आनंद असावा. नाहीतर एखाद्या विद्यार्थ्याला "का रे झाला का बक्षीसमारंभ ? किती बक्षीसे वाटली ?" असे विचारल्यावर त्याने " वाटले पन्नाससाठ कप " असे उत्तर दिल्यास विचारणाऱ्याला पुढे हिंमतच व्हायची नाही. पण तेच जर "वा ! केवढी गर्दी झाली होती पु. लं. च्या भाषणाला ! काय त्यांची लोकप्रियता !" (मी पु. ल. नाव फ़क्त उदाहरणादाखल घेतले आहे व 'क्ष' जागी ते घेतले आहे.) असे सांगितल्यावर विचारणाही साहजिकच "ही आली होती का, ती आली होती का," असे विचारील आणि सांगणाराही अत्यंत आनंदाने सांगेल---कॉलेजमध्ये कधी न दिसणाऱ्या मुली आज दिसत होत्या...आणि त्या बोलण्याच्या आनंदात मग पु. ल. आपोआप केव्हाच मागे पडतील.

जीवनातील आपले अनुभवाचे संचित दुसऱ्यापुढे मांडावे, दुसऱ्याचे आपण पहावे, अशी जी आपली इच्छा असते तीतच माणसाचे माणूसपण आहे. परंतु जेव्हा एखादा पालक आपल्या मुलाला "मला तुझं काही ऐकायचं नाही, तुला काही सांगायचं नाही" असे म्हणतो आणि हे सांगणे व ऐकणे जेथे संपते तेथेच त्या माणसातला माणूसही स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो.परंतु माणसामाणसांचे हे प्रेम व सहानुभूती इतकी उत्कट असते की, माणसाला मरतानासुद्धा निर्जीव उशीचा आधार चालत नाही तर त्याला थरथरणाऱ्या मांडीचा आधार डोक्याखाली लागतो. पाकिस्तानमध्ये झालेल्या वादळाच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या वा घरकुले विस्कळित झालेल्यांबद्दल आपणाला सहानुभूतीच वाटते. त्या वेळी आपण त्यांच्याकडे पाकिस्तानी म्हणून न बघता एक माणूस या दृष्टीनेच पाहतो.

दुर्दॆवाने 'सहानुभूती' हा शब्द आजकाल दुःखद घटनांच्या वेळीच वापरला जातो. वास्तविक सहानुभूती म्हणजे सह + अनुभूती = दुसऱ्याचा अनुभव आपला मानून त्याच्या अनुभवविश्वात शिरणे, ही माणसाची महान शक्ती आहे. उदाहरणार्थ, कानेटकरंचे शिवाजीवरील नाटक ! आपणांला माहीत आसते की शिवाजीचे काम करणारा माणूस हा शिवाजी नाही, तर तो रंगमंचावर काम करणारा एक नट आहे आणि तो आपल्याशी बोलत आहे---खरा शिवाजी असता तर आपणांशी बोललाही नसता. कारण आपण नालायक बनलो आहोत---परंतु आपण हे नाटक पाहण्यासाठीसुद्धा पैसे खर्चून जातो आणि विकत काय घेतो तर शिवाजीची व्यथा ! आपल्याही नकळत आपला त्यातील पात्रांशी नाट्यगृहात एक मूक संवाद चाललेला असतो. असे एखादे यंत्र निघाले आणि त्यातून हा मूक संवाद टेप झाला तर तो आपणाला स्पष्टपणे ऐकू येईल. ह्यालाच सहानुभूती ---सह + अनुभूती---म्हणतात. ही शक्ती निसर्गाने फ़क्त मानवालाच दिली आहे आणि ही सहानुभूती जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हाच आपणांस आपण माणूस असल्याचा आनंद होतो आणि त्यातील प्रेक्षक हा त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तारांपैकी निगेटीव्ह तार बनलेला असतो. त्यातूनच आनंददान नि आनंदग्रहण अखंडतया सुरु असते.

म्हणून साहित्य, संगीत, कला या सर्वांच्या मूळाशी मला काही सांगायचयं हीच भावना असते आणि माणसाची स्वाभाविक भावना दुसऱ्याच्या अनुभवविश्वात रममाण होण्याची असल्यामुळे आपण ही ते अनुभवितो आणि त्यातील कलेचा आस्वाद घेतो. गडकऱ्यांचे 'एकच प्याला' बघायला गेल्यावर आपण आपोआप म्हणतो," काय सुंदर श्ब्दांत यांनी सिंधूचं दुःख वर्णन केलं आहे !" त्या कलेच्या आस्वादापासून आपणांस एक प्रकारचा आत्मिक आनंद प्राप्त होतो आणि एक मूक संवाद पुन्हा आपल्या ह्र्दयात सुरु होतो. परंतु उद्या जर तुमच्या शेजारी एखादा दारुड्या आपल्या बायकोला मारीत असेल आणि ती रडत असताना तुम्ही तिथे जाऊन "वा ! काय सुंदर देखावा आहे !" असे म्हणालात तर पुढचा फटका कोणाला बसेल हे तुम्ही जाणताच !

निराशावादी माणसालासुद्धा "मला मरावंसं वाटतं" असे दुसऱ्या कोणाला तरी सांगावेसे वाटते आणि तो आपल्या कवितेद्वारा आपले ते विचार बोलून दाखवतो. आपण जर त्याला म्हटले," मग आपण गेलात तरी चालेल " तर तो म्हणतो," पुढची कविता तर ऐका ! " खरे म्हणजे आजच्या कॉंग्रेसच्या राज्यात जीव देण्यासारख्या अनेक जागा मला दाखवता येतील.

संगीताच्या मैफलीच्या वेळी मला अनेकदा विचारले जाते, गाणे किती वाजता सुरु होणार आणि किती वाजता संपणार ? मी त्या गृहस्थाला नमस्कार करतो आणि सांगतो, कृपा करुन आपण येऊ नका. गाणे रात्री सुरु होईल आणि पहाटेपर्यंत केव्हातरी संपेल. संगीतातील सूर, लय, ताल यांचे ज्ञान माणसास हळूहळू येते. लहानपणी मुलाला खेळवताना त्यांच्या साऱ्यांच्या आया गाणे म्हणतात---"अडगुलं मडगुलं." पण मला वाटते, शेकडा ४ टक्के मुले बरोबर त्या त्यालावर हातपाय हलवतात. बाकीची मुले इतकी मठ्ठ असतात की त्यांच्या आया स्वतः नाचल्या तरी ती गप्पच असतात. ही मुले बहुतेक पुढे कुठेतरी तत्वज्ञानाचे प्राध्यापक होत असतील.

आजचा विद्यार्थी असंतुष्ट आहे असे आज सर्वत्र म्हटले जाते. पण मी विचारतो विद्यार्थ्यांनी काय संतुष्ट असायला पेन्शन घेतले आहे, की त्यांनी म्हणावे बायकोमुले सुखात आहेत ? विद्यार्थ्यांनी असंतुष्टच असायला हवे. पण तो असंतोष विघातक नको. त्यातून मशाली पेटल्या पाहिजेत. नाहीतर आपण कचराच पेटवाल. हा असंतोष पूर्वापार चालत आल आहे. तुकाराम काय संतुष्ट तरुण होता ? ज्ञानेश्वर असंतुष्ट होते म्हणूनच 'अमृतातेही पैजा जिंके' अशा भाषेत गीतेचे तत्त्वज्ञान मराठीत आणले. एकाच चिखलात कमळ आणि बेडूक दोन्ही असतात, पण बेडूक चिखलातच बुडालेला असतो आणि कमळ मात्र चिखलातूनही मान वर करुन उभे असते. आपण बेडूक होणार की कमळ होणार ते आपणच ठरवा.

आपण आज ह्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनासाठी मला बोलावले. वास्तविक आपण जे रोज येथे जमता तेव्हा का तुमच्यत स्नेह नसतो ? कधीकधी तर स्नेह जुळावासा वाटतो पण तो जुळत नाही. परंतु अशा स्नेहसंमेलनातून आपणांला काहीतरी सांगायचे असते. अशा वेळी वक्त्याचे भाषण पाडून ओरडा करणे हे विद्यार्थ्याचे साहस नाही. त्या वक्त्याचे त्यात काही जात नाही ! मुले मूर्ख आहेत असे म्हणून तो निघून जातो. परंतु वर्गातील १०० मुलांमध्ये ' मला हे समजलले नाही ' म्हणून उभे राहून प्राध्यापकाला ताडकन विचारणे हे साहस ! परंतु हे साहस कोणी करीत नाही. दोन हजारांतील फक्त पाचशे विद्यार्थीच खरे विद्या + अर्थी या नात्याने आलेले असतात. बाकीचे आई-वडिलांनी पाठविले म्हणून आलेले असतात. या बाबतीत पालकांचे अज्ञानही बघण्यासारखे असते. एखाद्या मुलाने जर म्हटले की " मी 'अर्ध' मागधी घेतो ; ते स्कोअरिंग आहे." तर पालक म्हणतात, "मग 'पूर्ण' मागधी का घेत नाहीस ? 'अर्ध'-मागधीच का घेतोस ?" आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये खरी ज्ञानलालसा कमी असते. पण पुढच्या वर्षी जर ती ज्ञानलालसा असलेली पाचशेच मुले ह्या कॉलेजमध्ये राहिली तर मी ह्या कॉलेजची भरभराट झाली असेच म्हणेन ! मग येथे एवढाल्या लायब्ररीज, लॅबोरेटरीज नसतील तरी ज्ञानलालसेच्या ईर्षेमुळे एखाद्या झाडाखाली फिजिक्सकेमिस्ट्री आणि मॅथ्ससारखे विषयही शिकता येतील.

मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या एका मुलीला विचारले,"तुम्हांला ज्ञानेश्वरांचं काय काय आहे ?" तर ती म्हणाली,"१० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे." मी पुढे विचारणार होतो की, "माझं किती साहित्य आहे ?" पण पहिल्या उत्तराने मला पुढील प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण ज्ञानेश्वरच दहा मार्कांचा तर मला १ लक्षांश तरी मार्क असेल की नाही कोणास ठाऊक ! आजकाल समग्र ज्ञान मिळविण्याची ईर्षा कमी झाली आहे. त्यांचा ज्ञान मिळविण्याचा 'स्पॅन' लिमिटेड झाला आहे. एका डिग्रीच्या बिनमहत्त्वाच्या कागदासाठी ही सर्व झटापट आहे. या बाबतीत एका पीएच.डी.च्या विद्यार्थिनीचा मला आलेला अनुभव आपणापुढे मांडतो. तिने पीएच.डी.साठी 'मराठी कादंबरी' हा विषय घेतला होता. मी तिला नंतर विचारले, आपणाला 'रणांगण'बद्दल काय माहिती आहे ? तिने विचारले,'रणांगण'? कारण तिच्या पीएच.डी.साठीच्या कादंबरीच्या स्पॅनच्या पलीकडील हा विषय होता. केवळ डिग्रीसाठी हा खटाटोप होता. ज्ञान मिळवण्याची आस बिलकूल नव्हती. तिच्या परीक्षकाने जर 'नाशिकमधील गाढवे व गाढवांचे प्रकार' या विषयावर प्रबंध लिहिण्यास सांगितला असता तर तोही तिने ह्या डिग्रीच्या कागदासाठी लिहिला असता---स्वतःचाही त्यात समावेश करुन ! आणि तो प्रबंध व ती बाई दोन्हीही बघण्यासारखे नव्हते हे आणखी एक नवल !

आज मला येथे सांगण्यात आले की पारितोषिके बरीच वाटायची आहेत, आपणांला त्रास नाही ना वाटणार ? परंतु मला यात कंटाळा नाही ! अहो त्यासाठीच तर मी येथे आलो आहे. आज येथे स्टेजवर येऊन मोकळेपणाने मुली संगीताची, खेळांची पारितोषिके घेऊन जात असताना मला आठवण होते ती आगरकर, फुले यांनी घेतलेल्या कष्टांची आणि झेललेल्या चिखलमातीची ! मग मला समोर त्या मुली दिसत नाहीत, पारितोषिके दिसत नाहीत, आणि एका निराळ्याच अनुभवविश्वात मी स्वत:ला हरवून बसतो.

माझ्याबद्दल अशी एक हकिगत सांगितली जाते की, माझे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. खरे म्हणजे गरिबीत वगैरे काही गेले नाही, पण आजच्याइतके ते चांगल्या स्थितीत गेले नाही एवढे मात्र निश्चित ! पण तेव्हाही आम्हांला आम्ही गरीब आहोत ह्याची आठवण व्हायला फुरसत नसायची. आज काय बालगंधर्वाचे गाणे आहे, पळा तिकडे ! उद्या काय सी.के.नायडूंची मॅच आहे, जा तिकडे. मग कधी ती झाडांवर चढून बघ, तर कधी दुसऱ्याच्या गच्चीवरुन ! (फुकट बघायला मिळते म्हणून.) आमच्या पाठीमागे इतकी व्यवधाने असत की आमच्या गरिबीचीसुद्धा आम्हांला आठवण होत नसे. ह्याबाबत टागोरांची एक कविता सांगतो.---एक माणूस असतो. त्याच्या गळ्यात एक लोखंडाची साखळी असते. ती सोन्याची करण्यासाठी त्याला परीस शोधायचा असतो. समुद्राच्या काठाने जाताना तो सारखा दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि खाली टाकून द्यायचा ! असे करता करता निराश होऊन खूप पुढे गेल्यावर त्याने सहज साखळीला हात लावून पाहिला तर ती केव्हाच सोन्याची झालेली होती ! त्याच्या हातातून परीस केव्हाच निसटून गेला होता. तुमच्याही प्रत्येकाच्या हातात परीस आहे. कोणाच्या हातात तो चित्रकलेच्या रुपात आहे,कोणाच्या हातात संगीताच्या रुपाने ! फक्त त्याकडे नीट बघावयास शिका. याबद्दल मला एक उर्दू शेर आठवतो---"बगीच्यात फुलांचे ताटवे फुलले आहेत, गुलाबाची फुले डुलत आहेत, पण त्यांकडे बघण्यासच कोणी नाही."

साहित्यकार, लेखक होण्याची इच्छा असणारे अनेक तरुण माझ्याकडे येतात आणि मला विचारतात,आम्ही काय वाचू ? कशाचा प्रथम अभ्यास करु ? मी त्यांना सांगतो, बाहेर पडल्यापासून नाक्यावरच्या जाहिरातीपासून तुम्ही बघत चला. मग ती जाहिरात अगदी 'दो या तीन बच्चे बस !' ही जाहिरात असली तरी चालेल. परंतु फक्त तेच बघू नका. जीवनाच्या महान अर्थाकडे बघण्यास शिका आणि कशावरही लिहा. मग ते झोपडपट्टीचे वर्णन असो अगर एखाद्या ताजमहालाचे ! यावरुन मला मर्ढेकरांच्या एका कवितेवरुन झालेल्या वादाची आठवण होते. विषय होता 'उंदीर' ! त्यावर टीकाकार म्हणाले, एवढ्याशा उंदरावर काय कविता काय करायची ? दुसरे विषय नव्हते ? परंतु काव्यविषय हा त्याच्या आकाराच्या लहानमोठेपणावर ठरत नाही.असे असते तर प्राण्यामधील सर्वात मोठा प्राणी हत्ती आणि निसर्गातील सर्वात उच्च हिमालय ह्यांशिवाय काव्याला विषयच उरले नसते. मग गुलाबाच्या एखाद्या फुलावर किंवा पाकळीवर काव्यच झाले नसते. कारण ते फूल आकाराने लहान होते ना !

लायब्ररीत अनेक ग्रंथ असतात, पण त्यांतील माझे पुस्तक पाहण्याचा मला अजिबात धीर होत नाही. कारण त्यावर अनेक शेरे ठिकठिकाणी मारलेले असतात ! भिकार विनोद ! यापुढे लेखन बंद करावे ! ---कित्येकदा वा ! वा ! फारच सुंदर ! असेही लिहिलेले असते आणि मलाही वाटते नेमके तेच पान उघडले जाईल याची खात्री नसते. व्यावहारिक समीक्षकांच्या टीकेचे काही वाटत नाही. कारण टीका लिहून लिहून त्यांचे कातडे अगदी जाड झालेले असते ! पण तो त्यांचा व्यवसायच असतो. त्याविषयी ते करणार तरी काय बिचारे ! पण ह्या अशा उत्स्फूर्त शेऱ्यांना मात्र एक सत्याची फार मोठी किनार असते. ज्यातून मला फार शिकायला मिळते.

जीवनाच्या तीन अवस्था आहेत. तारुण्य, संयम नि निवृत्ती. तुम्ही तरुण विद्यार्थी जर एखादी सुंदर तरुणी जात असताना आकाशाकडेच डोळे लावून बसलात तर तो तारुण्याचा अपमान आहे. पण हे जाणूनही आपणांकडे नंतरच्याही अवस्था आहेत हे तुम्ही विसरुन चालणार नाही. 'मौनं सर्वार्थसाधनम' अशी पूर्वीच्या गुरुंच्या प्रेरेणेत शक्ती होती. परंतु आज तसे नाही. असले विचारधन अवलोकनाने आपण समृद्ध करायला हवे. गुरुंनी समजावून सांगायला हवे व ऐकणाऱ्याने ते ऐकायला हवे. मौनं म्हणजेच गुरुपण असते तर शिष्यालाच गुरु केले असते.

मला नेहमी विचारण्यात येते, कलावंत जन्माला यावा लागतो का? कलावंत जन्माला यावा लागत नाही. पण जगाकडे आपण सूक्ष्मपणे उघड्या डोळ्यांनी बघावयास हवे ! जे पाहिले ते सुंदर, आकर्षक शब्दांत सांगता आले पाहिजे ! जनतेची नाडी ज्याने पाहिली त्याला आपला अनुभव सांगण्याची ओढ असते. तेथेच कलावंत असतो.

ज्या जगात मी आलो ते हे जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी जिद्द हवी. केवळ विद्यार्थ्याबद्दलच नव्हे तर आपल्या सर्वच समाजाबद्दल माझी ही तक्रार आहे की, आपण जीवनाकडे पाहतच नाही. तरुण असंतुष्ट म्हणून ओरड होते. मी म्हणतो तरुण असंतुष्ट नाहीत तो काय देश आहे ? तरुणांनी असंतुष्टच राहिले पाहिजे. पण ते या अर्थाने की त्यांनी जीवनाचे आव्हान स्वीकारायचे.-"प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा" असे केशवसुतांनी सांगितले आहे. त्यातील 'लेणी' हा शब्द फार सुंदर आहे. त्यांनी चित्रे रंगवा असे म्हटले नाही. तर, कलानिर्मिती ही त्याहून अवघड कामगिरी आहे. ही निर्मिती सहजासहजी होत नाही.त्यासाठी पत्थर फोडून त्याच्याशी झुंज द्यावी लागते. हे आव्हान तुम्ही स्वीकारा, तशी जिद्द बाळगा, एवढेच माझे आजच्या तरुण पिढीला सांगणे आहे.

- पु.ल. देशपांडे

Monday, July 21, 2008

आनंदवन मित्रमेळावा

प्रिय मित्र बाबा आणि आजच्या या मेळाव्याला आलेले मित्रहो ! 

'प्रिय मित्र बाबा' म्हटल्याबरोवर आपल्यापैकी काही लोकांना कदाचित धक्का बसला असेल। काही लोकांना थोडा उध्दटपणाही वाटला असेल. पण काय कोण जाणे मला अलिकडे आदरणीय वगैरे शब्दांची भीती वाटायला लागली आहे. ज्याला ज्याला म्हणून आदरणीय म्हटलं त्यांनी त्यांनी निराशेशिवाय पदरात काही टाकलं नसल्यामुळे बाबांनाही आदरणीय आणि पूज्य करुन टाकण्याची माझी तरी तयारी नाही. याचा अर्थ, माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी त्यांना आदरणीय म्हटलं ते अंतःकरणापासून म्ह्टलं नाही असं मात्र मी म्हणत नाही.

मित्रहो, आपल्या मेळाव्याचं नावच आहे 'मित्रमेळावा'--- त्यामुळे उपचार, कार्यक्रमाची शिस्त वगैरे गोष्टी, किंवा आलेल्या पाहुण्याचं यथोचित स्वागत या गोष्टी मित्रत्वाच्या भावनेने जेवढ्या साधता येतील तेवढ्याच पाहायच्या आहेत. बाबांच्या कार्याची दाद कोणी द्यावी? बाबांच्या कार्याची दाद द्यायलासुध्दा रवींद्रनाथांच्या इतका प्रतिभावंत आणि त्याबरोबरच कार्यवंत पाहिजे. रवींद्रनाथांनी नुसतचं शांतिनिकेतन फ़ुलवलेलं नाही. श्रीनिकेतन उभारलं. म्हणजे जिथे जमिनीची आराधना झाली आणि जमीनीची मशागत होऊन हिरवं धान्य ज्या वेळेला वर आलं तेव्हाच चित्र पुरं झालं. आपण अलिकडे बोलताना म्हणतो पीSSस, पीस. शांती ! देअर इज नो पीस विदाऊट प्रोस्पेरिटी - आणि प्रोस्पेरिटीसाठी श्री लागते. म्हणून ते श्रीनिकेतन आणि शांतिनिकेतन एकत्र आलं. आणि हे रवींद्रनाथांनी कशासाठी केलं? जेव्हा ही अशी जमिनीतून येणारी निर्मिती, माणसाच्या हातांनी घडविलेली निर्मिती आणि प्रतिभेतून घडलेली निर्मिती या एकत्र येतात त्याच वेळेला आनंद संभवतो म्हणून इतर वेळेला मजा! तेव्हा मजा आणि आनंद या दोन गोष्टींमधील फ़रक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण मजा खूपच करतो, पण त्या मजेला अर्थ नसतो. त्या मजेला आनंद जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तिथे निर्मितीचा निराळा साक्षात्कार घडावा लागतो. सौंदर्य हा शब्द आपण वाटेल तसा वापरत असतो. जाहिरातीत तर सगळंच सुंदर असतं. पण देखणं काय असतं? काय खरं तर सुंदर असतं? कवी बोरकरांनी म्हटलं आहे-- 'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे'. ज्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागलेले आहेत ते देखणे आहेत आणि इथे अशा हातांनी निर्मिती केलेली आहे की जेथे निर्मितीला आवश्यक असणारी वाटच नियतीने त्यांच्याकडून हिरावून घेतलेली आहे. 

ज्या वेळेला बोटं नसलेला माणूस त्या नसलेल्या बोटांनी बोटं असलेल्या लोकांना आपल्या निर्मितीने खुणावत असतो किंवा हिणवतही असतो त्या वेळी तिथे देखणेपण असं साक्षात प्रकट होतं आणि रुग्णालयाचं आनंदवन होतं. सामाजिक कार्य आमच्याकडे लोकांनी केली नाहीत असं मी तरी कशाला म्हणू? अतिशय सुंदर अशा प्रकारची कार्य केली. निरनिराळ्या प्रकारची कार्ये केली. त्या सगळ्यांच्याबद्दल आदर ठेवून मी असं म्हणेन की, विधायक कार्याला सौंदर्याची सतत जोड राहिल्याशिवाय त्यातून खरा आनंद निर्माण होत नसतो. हे कार्य बाबांनी केलं. त्या तोडीचं कार्य या भारताच्या भूमीत कुणीही केलेलं नाव्हतं. असलं जर केलेलं तर मी जरुर सांगेन की, चुकल माझं ! आणि ते चुकलं म्हणण्याचीसुध्दा मला धन्यता वाटेल. पण अशा प्रकारचं जे हे कार्य आहे ते कुणी केलं? एका महाकवीने केलं. कारण बाबांनी सांगितलं आहे, "अवर वर्क-" आणि एक लक्षात घ्या, इथे बाबा अवर वर्क म्हणतात, माय वर्क म्हणत नाहीत. "-अवर वर्क इज अ पोएम इन ऍक्शन." इथं जे कार्य प्रकटलेलं आहे ते कृतीतून प्रकटलेलं अनोखं काव्य आहे-इतर वेळी जे शब्दातुन प्रकट होत असतं ते कृतीतून प्रकटलेलं आहे. 
बाबा नेहमी म्हणत असतात की, 'प्रभूचे हजार हात'. मी वैयक्तिक मंदिरातला देव मानत नाही. माझं त्याचं काही भांडण नाही. त्यामूळे तो माझ्यावर रागवेल अशी मला भीती नाही. त्याला फ़ारसं रागवता येतं यावरही माझा विश्वास नाही. त्यामुळे त्या प्रभूबद्दल मला काही माहिती नाही. परंतु माझ्या दृष्टीने मी प्रभू त्यालाच म्हणेन की ज्याला 'प्रभू' मधला 'भू' जवळचा वाटतो. प्रकर्षाने जो 'भू' जवळ जातो तो प्रभू असंच मला वाटतं. हीच प्रभूची व्याख्या असायला पाहिजे असं मला वाटतं. त्या प्रभूचे हजार हात तुम्हाला-समोर पाहा-दिसतील. प्रत्येक झाडाची फ़ांदी हा असा स्वर्गाकडे निघालेला हात आहे-प्रकाशाकडे धावत सुटलेला हात आहे. त्याच्यापासून आपल्याला मंत्र घ्यायचे आहेत. तपोवनामध्ये ऋषीमुनी जाऊन बसत असत. झाडांच्यापाशी पुन्हा धावत असत. झाडांपाशी धावणाराचं कामच हे होतं की एका क्षणामध्ये जमिनीच्या आत आत जाण्याचं वेड आणि दुसर्‍या क्षणामध्ये आकाशाकडे जाण्याची ओढ. म्हणजे तो एखाद्या शेतकऱ्यासारखा जमीनीचा शोध घेत निघालेला आणि दुसऱ्या बाजुने एखाद्या प्रतिभावान कवीसारखा आकाशाकडे झेप घेत असलेला, असं ज्या वेळेला व्यक्तिमत्व दोन्ही बाजूला फ़ुललेलं असतं त्याच वेळेला त्या व्यक्तिमत्वाला व्यक्तिमत्व असे म्हणतात. अलिकडे व्यक्तिमत्त्व हा शब्द आपण कोणाच्याही बाबतीत वापरतो. शब्दांचा म्हणजे आपण नुसता धुमाकूळ चालवला आहे. एक अगदी चिल्लर माणूस-काही तरी सात आठ मासिकांतून गोष्टी छापून आलेल्या-"आमच्या व्यक्तिमत्वाला इ.इ." म्हणताना ऐकुन मी म्हटलं, अरे, हे उंदराने स्वतःला ऐरावत म्हणण्यासार्खे आहे. पण व्यक्तिमत्व केव्हा येतं? की ज्याच्या आचरणातून, उच्चारातून, कृतीतून आपल्याला पदोपदी जाणवत असतं की, ज्याचे पाय आत आत जमीनीचा शोध घेत घेतही चाललेले आहेत आणि क्षणाक्षणाला हजार रीतीने फ़ुलणाऱ्या झाडासारखे प्रकाशाचा शोधही चालू ठेवीत आहेत! जमीनीतले रस ओढून घेत, वारा, वादळ, पाऊस अंगावर घेत घेत फ़ुलणारं ते व्यक्तिमत्त्व.

मला तरी असं वाटतं की, भारतात ज्या व्यक्तिमत्त्वाचा पाच अक्षरात उल्लेख करता येईल ती म्हणजे बाबा आमटे ही अक्षरे! मी आनंदवनात आल्यावर मला जर सगळ्यात वृक्ष कोणता आवडत असेल तर बाबा नावाचा वृक्ष. हा मला सगळ्यामध्ये जास्त आवडतो. त्या वृक्षाकडून मला फ़लप्राप्ती होते. सुगंध मिळतो. त्या वृक्षाकडून मला सावली मिळते. असा काही मी ऊन्हाने फ़ार तळपत असतो, म्हणून सावलीचा शोध घेतो, असं नाही. परंतु आम्हाला खरी सावली म्हणजे काय हेच कळलेलं नसतं. इथे आल्यानंतर कळतं-अरेच्या, सावली म्हणजे अशी की, जी वरच्यावर प्रकाशाच्या किरणांशी खेळ खेळत बसलेल्या आपल्या पानांच्या रुपाने आणि खाली आपल्याला वर जरा मधून मधून बघत जा म्हणून सुध्दा सांगत बसलेली आहे अशी. नाही तर काय हो, आम्ही पटकन 'सावली' निर्माण करु शकतो. त्याला स्वतःचा बंगला म्हणतो. ही सावली नव्हे. ते बंगल्याचं असतं-'सावली'! तेव्हा ती सावली नव्हे! ही सावली अशी की जी क्षणाक्षणाला वर जात असते आणि क्षणाक्षणाला ती सावली आपल्याला प्रकाशाचा झोत कुठल्यादिशेने चालला आहे ह्याची जाणीव करुन देत असते. 

चार भिंतीच्या घरामध्ये बसलेल्या सावलीमध्ये ही जाणीवच नष्ट झालेली असते. ती फ़िरती सावली जिथे भेटते तिथे ती खरी सावली! ती इथे लाभते. मी अनेक वर्षे इथे येतो आहे. बाबांचा माझा परिचय झाल्याला आता पंधरा वर्षे होऊन गेलेली आहेत. दरवेळेला वाटतं की आता झालं! संपलं! अहो, कुठलं संपलं! पलिकडल्या डोंगराची शिखरं बाबा दाखवायला लागतात. एक शिखर गेल्यावर वाटतं, आली बरं का कांचनगंगा... कुठली येते? ती आणखी पुढे आहे...त्याच्यावर आणखी एक शिखर असतं. बाबांच्या बरोबर प्रवास करतांना-म्हणजे विचारविनिमयाचा प्रवास करतांना, त्यांचे विचार ऐकतांना-लक्षात येतं की, यांना शेकडो हिमशिखरं आपली सादच देत राहीली आहेत. ती संपायलाच तयार नाहीत.

अपूर्ण (आनंदवन मित्रमेळावा, फेब्रुवारी १९७९: पु.लं.नी केलेल्या भाषणातील काही भाग)