Saturday, April 30, 2011

गांधी टोपी - खिल्ली

राष्ट्रीय चळवळीत भाग घेतलेल्या एका वृद्ध स्नेह्यांना मी विचारले, “ गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत मोठे परिवर्तन कशात झाले असे आपल्याला वाटते ?"

"गांधी टोपीत !" ते म्हणाले.

"ते कसे काय ?"

"पूर्वी गांधी टोपी घालायला इंग्रज सरकारची भीती वाटत होती. हल्ली आपल्याच जनतेची वाटते."

"असं का म्हणता ?"

तूच पाहा गांधी टोपी, पायघोळ धोतर, खादीचा झब्बा आणि जाकीट घालून हातात एक कातडी अटॅची घेतलेल्या माणसाविषयी तुझे प्रथम दर्शनी मत काय होते ?" मी बोललो नाही. मला जुनी हकीगत आठवली.

मिठाच्या सत्याग्रहाचे दिवस होते. लॅमिंग्टन रोडवर पोलिस स्टेशनपाशी सत्याग्रहींचा जथा आला होता. लोक निर्भयपणे पोलिसांच्या गाडीतून घुसून स्वतःला अटक करून घेत होते. त्या गर्दीत एक तरुण स्त्री होती. तिने आपल्या अंगावरचे दागिने उतरवले. शेजारच्या एका माणसाच्या हाती दिले. त्याला आपले नाव सांगितले, पत्ता सांगितला आणि म्हणाली,

"माझ्या घरी हे दागिने नेऊन द्या आणि सांगा ‘म्हणावे, मी सत्याग्रहात गेले."

तो गृहस्थ म्हणाला,"बाई, तुमची माझी ओळखदेख नाही. तुमचे हे दागिने मी तुमच्या घरी पोहोचवीन असा तुम्हाला विश्वास का वाटतो ?” तुमच्या अंगावर खादी आहे. आणि डोक्यावर गांधी टोपी आहे म्हणून."

इतक्या आपुलकीने आणि विश्वासाने भारतीय माणसांना जोडणाऱ्या गांधी टोपीची आज जी स्थिती झाली आहे ती आमच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या स्वातंत्र्यातल्या वाटचालीची कमाई समजावी का ! आता त्या गांधी टोपीवर पांढऱ्याला अधिक चकचकित पांढरे करणारे टिनोपाल बिनोपालसारखे द्रवण आले आहे. त्या चकचकाटाला आणि कडक इस्त्रीलाच प्रगती मानून आत्म- संतोषात राह्यचे असेल तर ती गोष्ट निराळी ! माझ्या स्वराज्याच्या कल्पनेत होता तो गांधी टोपीचा प्रवास या दिशेने होणारा नव्हता.

- पु.ल. देशपांडे 
एका गांधी टोपीचा प्रवास
खिल्ली