पु.ल.… कधीतरी तुमच्याशी खूप बोलायचं आहे. नाटक, सिनेमा सोडून चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलू या. तुम्ही सगळ्यांना हसवलंत. तुम्हाला कुणीतरी हसवायला नको का? म्हणून तरी भेटू या कधीतरी…
मध्यंतरी एका व्यक्तीची आणि माझी भेट झाली. गप्पांच्या ओघात बोलता-बोलता तो म्हणाला, ‘पुलंचं लिखाण आता आऊटडेटेड वाटायला लागलंय नाही’? खरकन् माझा चेहरा उतरला. कानशीलं गरम झाली. तो पुढे काय म्हणतोय मला ऐकू येईनासं झालं. काहीतरी चमत्कार व्हावा ही धरणी दुभंगावी आणि या इसमाला धरणीमातेने आपल्या पोटात घ्यावं, असं मला वाटायला लागलं. त्याला म्हणावसं वाटलं. मित्रा जागीच तुझ्या अंगावर रॉकेल टाकून तुला जाळून टाकायला हवं. सरणावर जाळायची पद्धतही आता आऊटडेटेड झाली आहे. ही नवीन पद्धत तुला कशी वाटतीये सांग. पण पुलंचं एक वाक्य आठवलं. ‘काही लोकांची वागण्याची तऱ्हाच अशी असते की ज्यांच्या हातात मद्याचा पेला देखील खुलतो, पण काही लोकं दूध देखील ताडी पिल्यासारखं पितात’. थोड्याच वेळात माझा संताप शांत झाला. मी विचार केला की असं कुणाच्याही विचारस्वातंत्र्यावर घाला घालणारे आपण कोण. ही लोकशाही आहे. इथे विचारस्वातंत्र्य एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखं काम करतं. दुनियाभर कुठंही लाळ गाळत हिंडायचं, कुणालाही चावायचं, वेळ बघायची नाही काळ बघायचा नाही, कुणावरही कधीही भुंकायचं. असा विचार मनात आला आणि असं एखादं कुत्रं रस्त्यात दिसल्यावर सर्वसाधारण माणूस जशी प्रतिक्रिया देईल तीच मी दिली. आणि मी अजिबात चकार शब्दही न बोलता तिथून निघून गेलो. माझ्या डोक्यात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. इतकी की डोक्याचा म्हणजे लोकलचा डबा झाला होता. त्या बेधुंद अवस्थेत मी कधी बोरीवली स्टेशन गाठलं ते कळलंच नाही. लोकलमध्ये बसलो. नशिबाने खिडकीजवळची जागा मिळाली. लोकल सुरू झाली. बिल्डिंगा, रूळ मागे पडायला लागले आणि परत एकदा त्याच विचारांनी माझ्या डोक्यात उसळी मारली.
मी आश्चर्यचकीत झालो होतो. का मला वाईट वाटत होतं, का परत परत मला चीडच येत होती… या सर्व मिश्र कोलाहलातून मी मार्ग काढत होतो. असं कुठलं लिखाण या माणसाच्या वाचनात आलं असेल की याला पु. ल. देशपांड्यांसारख्या प्रतिभावंत झऱ्याचं खळाळणारं निर्मळ पाणी डबकं वाटायला लागलंय. मुळात कुठलीही संजीवनी आऊटडेटेड कशी होईल? ही संजीवनी ज्यांना-ज्यांना मिळाली त्या माझ्यासारख्या कितीतरी लोकांचं जीवन समृद्ध झालं आहे. अशा लोकांची संख्या जवळजवळ असंख्यच आहे. पुलंनी माझ्यासारख्या अनेकांच्या दुःखी मनाला आनंदाचे, समाधानाचे पंख लावून हास्याच्या आकाशात उंचच्या उंच भराऱ्या मारायला लावल्या आहेत. एकटेपणाला सोबत असायची ती त्यांच्या एखाद्या पुस्तकाची किंवा कथाकथनाच्या सीडीची. माझ्या गाडीत नेहमी पुलंच्या कथाकथनाची सीडी असते. त्यामुळे सहा तासांचा प्रवास सहा मिनिटांतच संपल्यासारखा वाटतो. पुलं हे नाटककार, लेखक, नट, दिग्दर्शक, संगीतकार तर होतेच, पण त्यांच्यात एक खट्याळ आणि बघितल्या बघितल्या सगळ्यांना आवडणारं गुटगुटीत बाळ असावं असं मला नेहमी वाटतं (अशी बाळं कॅलेंडरवर असतात). काही दिवसांपूर्वी ‘बटाट्याची चाळ’ ह्या त्यांच्या एकपात्री प्रयोगाची जुनी चित्रफीत माझ्या बघण्यात आली. त्यातली सर्व पात्रं आपलीशी वाटत होती. पुलंच्या ह्या ‘बटाट्याच्या चाळी’त आपल्याला राहायला मिळालं तर! आणि ह्या सर्व पात्रांशी आपली ओळख झाली तर काय मज्जा येईल! अण्णा पावशे, एच. मंगेशराव, राघुनाना, काशीनाथ नाडकर्णी, सोकाजीनाना त्रिलोकेकर, नाट्यभैरव कुशाभाऊ वगैरे मंडळींबरोबर गट्टी जमली तर! आहाहा! आपण तर एका पायावर टू बिएचके फ्लॅट बिनशर्त सोडायला तयार आहे. ही सगळी पात्रं पु.ल. एकटेच रंगमंचावर रंगवतात. पण यातला प्रत्येकजण स्वतंत्रपणे जिवंत होऊन आपल्याला भेटतो. याचं कारण लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता या पुलंमधल्या तिघांनी स्वतःशी प्रामाणिक राहून सूक्ष्मपणे केलेलं निरीक्षण असावं. मी पुलंच्या खूप नंतरच्या पिढीतला. पण आजही त्या गमती मला ताज्यातवान्या करतात. माझ्यातल्या नट, लेखक आणि दिग्दर्शकामध्ये एक नवीन उमेद, चैतन्य निर्माण करतात. ही गोष्ट फक्त ‘बटाट्याच्या चाळी’चीच नाही तर त्यांच्या प्रत्येक कथेतलं एखादं पात्र मी असावं असं मला वाटतं. त्यांच्या ‘म्हैस’ नावाच्या कथेत, मला पण त्या एसटीने प्रवास करावासा वाटतो. रावसाहेबांच्या अड्ड्यात मलाही सामील व्हावसं वाटतं. मलाही हरितात्यांच्या तोंडून शिवाजीमहाराजांच्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. पुलंबरोबर बिगरी ते मॅट्रिकपर्यंत त्यांच्याबरोबर त्यांच्या वर्गात जाऊन बसावसं वाटतं. मलाही दामले मास्तरांची एखादी छडी खावीशी वाटते. केशर मडगावकर ज्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट आहे, मलाही त्या ऑफिसमध्ये काम करावसं वाटतं. ही सगळी पात्रं जवळचे मित्र वाटायचं कारण म्हणजे पुलंमध्ये ती पात्र निर्माण करण्याचं असलेलं दैवी कसब. एवढं छान सुचतंच कसं? प्रत्येक गोष्टींकडे अजब दृष्टिकोनातून बघण्याचं हे एकमेवाद्वितीय सामर्थ्य आणि दृष्टी त्यांच्यामध्ये आली कुठून? त्यांनी काय केलं. कसं केलं? कुणी घडवलं असेल हे पु. ल. देशपांडे नावाचं अजब विश्व? ज्या विश्वात तुम्ही गेलात, तर कधी तुमची समाधी लागेल सांगता येत नाही. असली समाधी भंग करणं मेनकेलाही जरा जडच जाईल.
लोकल जोगेश्वरी स्टेशनवरून जात होती. मला आठवलं पुलंचं बालपणही जोगेश्वरीतल्या ‘सरस्वतीबाग’ नावाच्या त्यांच्या आजोबांनीच स्थापन केलेल्या वसाहतीत गेलं. कसे असतील लहानपणी पुलं. मला नेहमी वाटतं, खोड्या काढून पळून जाणारी मुलं असतात ना तसे ते असावेत. खोड्या म्हणजे कुणाला टपली मारून किंवा कुणाची फजिती करून नव्हे, तर गुदगुल्या करून. हाच गुदगुल्या करण्याचा गुण त्यांच्या लेखनातही आला आहे. आणि याच गुदगुल्यांनी त्यांनी अनेक हास्यांच्या बागाच नाही, तर मोठमोठी घनदाट जंगलंही फुलवली आहेत.
मला त्यांचा कधीही सहवास लाभला नाही. त्यांच्या कहाण्या ऐकून कल्पनेनेचं मनाचं समाधान करून घ्यावं लागलं. अर्थात कडाक्याच्या थंडीत उबदार दुलईची कल्पना करण्यासारखंच हे समाधान आहे. मी नेहमी कल्पना करतो. कसे असतील ‘ती फुलराणी’च्या रिहर्सलचे दिवस. ज्याचं लेखन आणि दिग्दर्शन पुलंनी केलं. भक्ती बर्वे, सतीश दुभाषी, पु.ल. यांच्यामध्ये काय चर्चा घडत असतील. मध्यंतरी भक्ती बर्वेंचं एक पुस्तक वाचनात आलं. त्यांनी फुलराणीच्या अनुभवाबद्दल लिहिलं आहे. त्या म्हणतात- ‘तालमीमध्येच ‘ती फुलराणी’ दिवसागणिक बहरत होती. तमाम मराठी रसिकांनी प्रयोगात अक्षरशः डोक्यावर घेतलेला ‘तुला शिकविन चांगलाच धडा’चा प्रसंग पुलंच्या लेखनाच्या ताकदीची साक्ष पटवणारा होता. परंतु तालमीतच पु.ल. मला म्हणाले. ह्या प्रसंगाला वन्स मोअर मिळतो की नाही बघ. मी अचंबित झालो. एखाद्या गाण्याला किंवा वाद्य वादनाला अशी दाद मिळणं स्वाभाविक आहे. पण नाटकातल्या काव्यमय स्वगताला अशी दाद मिळणं शक्यच नाही. पण अखेर पुलंचा. आपल्या शब्दांवरचा विश्वासच सार्थ ठरला. वन्स मोअर आला आणि एकदा नाही, अनेकदा.’ अर्थात भक्ती बर्वेंसारख्या कसलेल्या अभिनेत्रीचाही त्यात वाटा आहेच. पण दिग्दर्शक म्हणून आपल्या कलाकारांबद्दल वाटणारा हा अढळ विश्वास, हे दिग्दर्शक म्हणून त्यांचं कौशल्यही आहेच. पुढे त्या म्हणतात- ‘पुलंच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सर्वात मोठी संधी मला मिळाली. तालमीच्या ठिकाणी पुलंचं असणं, वागणं, बोलणं, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची नाट्यतंत्रावरची हुकूमत, त्यांच्या प्रगल्भ जाणिवा आणि त्यांच्याच लेखणीतून उतरलेली भूमिका समजून घेणं, हा सगळाच माझ्या आगळ्या-वेगळ्या आनंदाचा जतन करून ठेवावासा वाटणारा ठेवा होता. कविता कशी आविष्कृत करायची, शब्दांचं महत्त्व आणि आशयाची अभिव्यक्ती म्हणजे काय, हे मला पुलंच्या मार्गदर्शनामुळे चांगलंच ठाऊक झालं. मूळ हे नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉचं ‘पिग्मॅलीयन’ हे आहे. पण पुलंनी मराठीत ते साकारताना त्याचं रूपडं पालटून टाकलं. मराठी भाषेची सौंदर्यस्थळं, रांगडेपण, कोमलता, म्हणी आणि वाक्प्रचार असा सगळ्यांचा हे नाटक प्रत्यय देतं.’
पुलंनी निर्माण केलेली कुठलीही कलाकृती अनुभवताना. परिपूर्ण भोजनाचा आस्वाद घेतल्याचं समाधान मिळतं. सर्वात चविष्ट पदार्थ विनोद असतो. थोडसं वास्तवाचं तिखट असतं. कुणाचंतरी आंबट व्यक्तिचित्रण असतं. कुठल्यातरी प्रसंगाचा गोडवा असतो. एकूण अनुभव भयंकर समाधानकारक आणि परिपूर्ण असतो. ते सर्वोत्तम संगीतकारही होते. स्वर्गीय आनंद देणारी पेटी ते वाजवायचे. ते, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी हे सगळे रात्र-रात्र गाण्याच्या मैफिली जमवत. बापरे! काय असेल तो स्वर्गीय अनुभव. अंगावर सरसरून काटाच आला. ज्या ज्या लोकांनी माझं नाटक आवर्जून पाहायला हवं होतं असं मला वाटतं, त्यात पु.ल. हे अग्रगण्य आहेत. मग मी स्वतःच पुलंना माझ्या कल्पनेत माझ्यासमोर उभं करतो आणि त्यांच्याशी बोलतो. त्यांना प्रयोगाला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण देतो- ‘बरं का पु.ल. पुढच्या आठवड्यात पार्ल्यात शो आहे, माझ्या नाटकाचा. तुम्ही यायला हवं. ते म्हणतात. अरे बाबा माझे गुडघे दुखतात हल्ली. शक्य होईल असं वाटत नाही. मग मी म्हणतो. एवढंच ना. तुम्ही कशाला काळजी करता. मी आहे ना. मी स्वतः गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला येईन. मराठी कलाकार असलो, तरी माझ्याकडे आज कार आहे. माझ्या खांद्याचा आधार घेऊन तुम्ही चाला. पण तुम्ही यायलाच हवं. प्रयोगानंतर पाठीवर तुमच्या शाबासकीची थाप मला पाहिजे आहे. तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता असे पायच नाही राहिले ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं. तेवढ्यासाठी तरी तुम्ही यायलाच हवं. आणखी एक, कधीतरी तुमच्याशी खूप बोलायचं आहे. नाटक, सिनेमा सोडून चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलू या. तुम्ही सगळ्यांना हासवलंत. तुम्हाला कुणीतरी हासवायला नको का? म्हणून तरी भेटू या कधीतरी.’ पण अचानक सत्य परिस्थितीची जाणीव होते आणि रावसाहेबांसारखं म्हणावसं वाटतं. हे देवसुद्धा हरामखोरच की हो. ज्याला नको त्याच्यात नेऊन घालतंय बघा आलो असतो काही वर्षं मी आधी जन्माला तर काय बिघडलं असतं.
दादर स्टेशन आलं. मी लोकलमधून खाली उतरलो. घराच्या दिशेने चालू लागलो. वाटेत एका दिग्दर्शकाचा फोन आला. ‘अरे पुलंवर एक सिनेमा बनवतोय. तू पुलंचं काम करावं अशी इच्छा आहे.’ स्थळ, काळ, वेळ मी कशाचीही पर्वा न करता मोठ्याने ओरडलो- ‘काय?’
निखिल रत्नपारखी
महाराष्ट्र टाईम्स
१९ एप्रील २०१५