Thursday, January 28, 2021

रफ स्केचेस् – सुनीताबाई

कव्हर झालं. ब्राऊन पेपरवर पांढऱ्या रंगाने वारकऱ्याच्या कपाळावरचा टिळा बोटाने ओढला होता आणि खाली काळ्या बुक्क्य़ाचा ठिपका.

१९७८- ८०च्या आगची मागची गोष्ट असेल. पुण्यात होतो. चिक्कार काम असे. एकदा मधुकाका कुलकर्णी म्हणाले, ‘‘अरे, पुलंचं नवं पुस्तक करतो आहे ‘तुका म्हणे आता’ नावाचं. कव्हर कर की!’’ 

मी म्हटलं, ‘‘करतो. त्यात काय?’’

पुलं नेहमी भेटत. गप्पाटप्पा चालत. तोवर पुलंच्याभोवती बरीच प्रभावळ विणली गेलेली होती; पण मला तेव्हा कशाचा म्हणता कशाचा पत्ता नसे. त्यांचं लेखन सोडलं तर त्यांच्याबद्दल बाकी फार काही माहिती नव्हतं. बरंच होतं ते म्हणजे.

कव्हर झालं. ब्राऊन पेपरवर पांढऱ्या रंगाने वारकऱ्याच्या कपाळावरचा टिळा बोटाने ओढला होता आणि खाली काळ्या बुक्क्य़ाचा ठिपका.

मधुकाका खूश! मला म्हणाले, ‘‘मी पुलंना फोन करून ठेवतो. तूच जाऊन त्यांना एकदा दाखवून ये!’’

मी म्हटलं, ‘‘जातो!’’

आणि गेलो एका सकाळी. जोशी हॉस्पिटलच्या शेजारची ती ‘रूपाली’.. दार बंद वगैरे!

बेल वाजवली. दारात बाई. मला म्हणाल्या, ‘‘कोण तुम्ही?’’

मी म्हटलं, ‘‘सुभाष अवचट.’’

‘‘म्हणजे कोण?’’

माझ्या डोक्यात खटकी पडलीच. तरी म्हटलं, ‘‘चित्रकार!’’

बाईंनी विचारलं, ‘‘काय काम आहे?’’

मी सरळ म्हणालो, ‘‘माझं काहीही काम नाही. मधुकाका कुलकर्णीनी भेट सांगितलं, म्हणून आलो होतो. आता चाललो.’’

तेवढय़ात घरातून हालचाल झाली. ते पुलं होते. म्हणाले, ‘‘अगं, येऊ दे, येऊ दे त्याला.. ये रे, ये तू!!’’

स्वत: पुढे येत पुलं मला हाताला धरून बैठकीच्या खोलीत घेऊन गेले. मऊ, ऊबदार घर. सकाळचा सुंदर प्रकाश. पुलंना कव्हर दाखवलं. फार खूश झाले. मला म्हणाले, ‘‘मस्त रे!!!’’

बाई तिथेच बसलेल्या.

म्हणाल्या, ‘‘बघू काय केलंय ते!!’’

माझं आर्टवर्क बघतानाची त्यांची ती धारदार नजर मला आवडली नाही. वरून प्रश्न.. ‘‘काय आहे हे? असंच का केलंय? यातून काय सांगायचंय?’’

मला या असल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला अजिबात आवडत नाहीत. त्यातून डोक्यात खटकी पडलेलीच होती.

मी काहीही बोललो नाही. विषय बदलत म्हणालो, ‘‘अहो बाई, एवढी मस्त सकाळ आहे. जरा चहा टाका की आमच्यासाठी!!’’

एक तर या बाई कोण, त्या माझ्या आर्टवर्कबद्दल का बोलतायत असे प्रश्न मला पडलेले. पुलंनी सावरून घेतलं. ‘चहा हवाच आता..’ म्हणाले.

बाई नाइलाज असल्यासारख्या उठून चहा टाकायला आत गेल्या.

मी सहज पुलंना विचारलं, ‘‘कोण हो या?’’

ते म्हणाले, ‘‘अरे, ही सुनीता. माझी बायको. ओळखलं नाहीस का?’’

बापरे! मी झटका बसल्यासारखा गप्पच बसलो!

काहीच सुचेना. तेवढय़ात सुनीताबाई चहा घेऊन आल्या. माझ्यासमोर कप धरत म्हणाल्या, ‘‘घे चहा!!’’

घशातून गरम जाळ खाली उतरल्यावर मग मला जीभ उचकटायला थोडा धीर आला. पुलं होतेच, त्यांनी वातावरणातला ताण अलगद काढला. मग बाईही खुलल्या. गप्पा झाल्या.

ही अशी सलामी. ती झडली त्या पहिल्या दिवशी आपल्याला एक ताठ कण्याची मैत्रीण मिळणार आहे, हे मला माहिती नव्हतं.

हळूहळू भेटी व्हायला लागल्या. सूर जुळले. सुनीताबाईंच्या नजरेतल्या करारी पाण्याला स्नेहाची मऊ धार असे.. ती दिसायला लागली.

त्याचदरम्यान काही काळासाठी भांडारकर रोडवरच्या एका बंगल्यात मी माझा स्टुडिओ थाटला होता. दगडी, गारेगार भिंतींचा देखणा बंगला. भोवती झाडी आणि मस्त शांतता. बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये माझा स्टुडिओ. तिथे मी काम करीत बसलेला असे. समोरच्याच गल्लीत माझं घर होतं. माझी बायको सुमित्रा. दोन छोटी मुलं.

पलीकडे तात्या माडगूळकर. आणि आम्ही दोघेही पुलंच्या फिरायला जायच्या रस्त्यावरच अगदी.

फार श्रीमंत दिवस होते ते. संध्याकाळ उतरली की पुलं चक्कर मारायला जाताना दिसत. खरं तर त्यांचा स्वभाव बैठा. त्यांना अशा चालण्या-बिलण्यापेक्षा मस्त बैठक जमवून गप्पा-गाणी करायला जास्त आवडत. त्यामुळे स्टुडिओत मी दिसलो की चालणं सोडून ते सरळ आत येत. मला म्हणत, ‘‘काय चित्रकार? काय चाललंय?’’

ते बसतात, तोवर अनेकदा तात्या माडगूळकर डोक्यावर टोपी चढवून आणि हातात त्यांची ती लाडकी काठी घेऊन रमतगमत बंगल्याच्या फाटकातून आत शिरत! की झालंच मग! सगळा कल्ला नुसता!!! माझ्या रंगांच्या उघडय़ा टय़ुबांना झाकणं लागलीच लगेच!! ज्या काय गप्पा रंगत.. तोड नाही!

क्वचित कधीतरी वि. म. दांडेकरांना फिरता फिरता आतल्या माहोलाचा सुगावा लागे. मग ते फाटकातून जोराने हाक देत, ‘‘हं.. काय रे?’’

की मी बाहेर जाऊन त्यांना आत घेऊन येई!! मज्जा!!

संध्याकाळ उतरणीला लागली की तात्यांना मूड आलेला असे. ते डोळे मिचकावत म्हणत, ‘‘मग काय अवचट, काही वाईट विचारबिचार येतायत की नाही मनात?’’

आम्ही तयारच असायचो मैफिलीला! दांडेकरांकडे अनेकदा विमानतळावरून डय़ुटी-फ्रीमधून आणलेली महागडी स्कॉच असे. ते म्हणत, ‘‘थांबा, मी आलोच!’’

पुलंचा पाय असा सुट्टा नसे. ते म्हणत, ‘‘बसलो असतो रे आज.. पण सुनीताला कोण सांगणार?’’

मी लगेच उडी मारून म्हणायचो, ‘‘थांबा, मी करतो फोन. माझं ऐकतात त्या!’’

नुस्तं ‘हॅलो’ म्हटलं की सुनीताबाई वेळ-काळ बरोब्बर ओळखत. म्हणत, ‘‘चित्रकारा, काही सांगू नकोस तू. भाई आत्ता तुझ्याकडे आहे आणि त्याला यायला उशीर होईल, शिवाय तो जेवायला नसेल; हेच ना? माहित्ये मला ते!’’

पण हे इथेच संपत नसे.

घरी माझी बायको सुमित्रा एकटी आहे, ही इतकी माणसं आयत्यावेळी जेवायला नेऊन मी तिला त्रास देणार आहे; याबद्दल आधी माझी यथास्थित खरडपट्टी निघे. मग म्हणत, ‘‘बरं, किती जण आहात जेवायला? सुमित्राला सांग, काळजी करू नकोस. मी दोन-तीन पदार्थ आणते करून!’’

आमची जमवाजमव होऊन आम्ही समोरच्या गल्लीतल्या माझ्या घरी पोचतो म्हणेतो गरमागरम जेवणाचे डबे बास्केटमध्ये घालून सुनीताबाई हजर!!

माझा मुलगा धृव तेव्हा अगदी लहान होता. आम्ही त्याला ‘बन्या’ म्हणू. ख्यालीखुशाली होऊन आम्ही गच्चीवर बैठक जमवायला निघालो की आमच्या पायापायात करत बन्याही आमच्या मागोमाग येई. ग्लास मांडणं, खाण्याचे पदार्थ वर आणणं या सगळ्यात मदतीला बन्या पुढे! मग जी मैफल रंगे.. काय विचारता!!!

मद्यपान नाममात्रच. खरी मजा गप्पांची. पुलं म्हणत, ‘‘पेटी हवी होती रे सुभाष! आणतोस का घरून?’’

मी म्हणायचो, ‘‘मुळीच नाही! इथे गाणी नकोत तुमची!! गप्पा कशा होणार मग आपल्या? आपल्या गप्पा हाच पूरिया धनश्री आहे असं समजा!’’

पुलंशी मी हे असं भांडण काढलं की सुनीताबाई नुसत्या हसत बसत. त्या गप्पा, तो सहवास, त्या रंगलेल्या रात्री.. मोठी श्रीमंती आहे ती माझी!

जेवायची तयारी झाली की कधी तात्यांच्या, कधी दांडेकरांच्या, सुनीताबाईंच्या मांडीवर बसलेला बन्या खाली जाऊन त्याची एक हॅट होती ती घेऊन येई. प्रत्येकासमोर धरून म्हणे, ‘टिप प्लीज..’ पुलंच्या खिशात कधी एक नाणंही नसे. ते त्यांचा रिकामा खिसा उलटा करून बन्याला दाखवत. मग सुनीताबाई आपल्या कमरेची चंची काढून बन्याला टिप देत आणि त्याच्या गालावर हात फिरवून दुरूनच मुका घेत.

गप्पांच्या मैफिलीनंतर रात्री उशिरा जेवणं आवरली की स्वयंपाकघर आवरून, उरलंपुरलं भांडय़ांत काढून ठेवून, खरकटी भांडी घासूनपुसून जागच्या जागी गेली, की मगच सुनीताबाई कमरेच्या चंचीतली गाडीची किल्ली काढून पुलंना घेऊन घरी जायला निघायच्या. सुमित्राला अगदी कसंनुसं होऊन जाई. पण बाईंच्या कामाच्या झपाटय़ापुढे आम्ही कुणीच काही बोलू शकायचो नाही.

हळूहळू आम्ही एकमेकांच्या स्वभावांना रुळलो आणि कुठे नाटक-सिनेमाला जायचं असेल तर सुनीताबाई फोन करून विचारू लागल्या,

‘‘काय चित्रकार, येणार का?’’

मी तयारच असायचो. एकदा असेच लक्ष्मीनारायण थिएटरमध्ये ‘झोर्बा द ग्रीक’ हा अफलातून सिनेमा पाहायला गेलो होतो. त्यांची ती फियाट चालवायला सुनीताबाई स्टिअरिंगवर. वाटेत कुणीतरी अचानक मधे आलं तर बाईंनी करकचून ब्रेक दाबले.

म्हटलं, ‘‘काय हो हे?’’

तर म्हणाल्या, ‘‘अरे, महाराष्ट्रातली दोन मोठी माणसं तुम्ही! माझ्या गाडीत तुम्हाला काही झालं, तर लोक फाडून खाणार नाहीत का मला?’’

दिसणं, बोलणं सगळं कसं अगदी शिस्तीत. रेखीव आणि नेटकं. ही एक लवलवती ताठ रेघच आपल्याभोवती वावरते आहे असं मला वाटे. मी अनेकदा उगीचच त्यांच्याकडे नुसताच पाहत बसलेलो आहे.

गप्पा व्हायला लागल्या तसे एकमेकांच्या जिव्हाळ्याचे विषयही उमजू लागले. जी. ए. कुलकर्णी गेले तेव्हाची गोष्ट. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते गोविंदराव तळवलकर. जीएंच्या बातमीच्या मागोमाग गोविंदरावांचा फोन आला. मला म्हणाले, ‘‘जीए गेल्याचं आत्ताच कळतं आहे, तर तू त्यांच्यावर एक लेख लिही महाराष्ट्र टाइम्ससाठी!’’

गोविंदरावांना कोण नाही म्हणणार?

मी म्हटलं, ‘‘लिहितो की.. त्यात काय?’’

लिहायला बसलो, लिहीत गेलो. पण नंतर मात्र फाटली. म्हटलं, एवढा मोठा साहित्यिक! आपण उगीच काही चावटपणा तर नाही ना केलाय?

मला एकदम विंदा आठवले. ते मला म्हणत, ‘‘अवचटा खवचटा, फार भरवसा धरू नये रे आपल्या अकलेचा!’’

आता आली का पंचाईत!

मी सरळ सुनीताबाईंना फोन लावला. म्हटलं, असं असं आहे.. ‘‘मी आत्ताच्या आत्ता तुमच्याकडे येतो. मी लिहिलंय ते काय लायकीचं आहे ते मला सांगा!’’

मला म्हणाल्या, ‘‘ये! तुझ्यासाठी चहा टाकतेच आहे मी!’’

गेलो. पुलं आणि सुनीताबाई दोघेही घरी होते. म्हटलं, ‘‘ऐका!’’

सरळ वाचत गेलो. लेख संपला तरी दोघे होते तस्से बसून. काही प्रतिक्रिया नाही. म्हटलं, मेलो! आता चंपी!

काही वेळाने पाहतो तर सुनीताबाईंच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. जवळ येऊन माझ्या हातावर हात ठेवत मऊ आवाजात मला म्हणाल्या, ‘‘अरे नालायका, तू काय तोडीचं लिहिलंयस माहिती तरी आहे का तुला?’’

जीएंवरचा माझा तो दीर्घ लेख त्या दोघांना इतका आवडला, की सुनीताबाईंनी तात्काळ ठरवून टाकलं : आता या लेखाचं पुस्तकच होणार. त्यात चित्रं जाणार. फोटो जाणार. हा लेख वर्तमानपत्रात छापून येणारच नाही.

मी घाबरून म्हणालो, ‘‘अहो, पण गोविंदराव?’’

सुनीताबाईंनी काही न बोलता गोविंदरावांचा नंबर फिरवला. ‘सुभाषचा लेख तुम्हाला मिळणार नाही,’ असं स्पष्ट सांगितलं. मागोमाग श्रीपुंना फोन केला आणि जीएंवर सुभाषचं पुस्तक मौज करणार आहे असं स्वत:च जाहीर करून टाकलं.

मी नुस्ता पाहत बसलो होतो मख्खासारखा!

पुढे सुनीताबाईंनी माझं ते दिव्य अक्षरातलं हस्तलिखित आपल्या ताब्यात घेतलं आणि माझ्या पुस्तकाचं बाळंतपण एकहाती निभावलं.

अशा! प्रेम करतील तर तेही असं करारी!!

एकदा मला दुपारीच फोन आला. मला म्हणाल्या, ‘‘अरे चित्रकारा, आज संध्याकाळी मी बालगंधर्वमध्ये बोरकरांच्या कविता वाचणार आहे. येतोस का माझ्याबरोबर!’’

मी उडी मारून म्हणालो, ‘‘म्हणजे काय? येईन की!’’

ठरल्या वेळी सुनीताबाई गाडी घेऊन मला न्यायला आल्या. आम्ही दोघेच गेलो. बालगंधर्व खचाखच भरलेलं. त्या भल्या प्रशस्त स्टेजवर काही म्हणता काही प्रॉपर्टी नाही. चौकोनी ठोकळ्यांची एक काळी बैठक आणि समोर एक माईक. एवढंच!! ना लाइट्सची जादू, ना संगीत, ना ड्रेपरी.. काही म्हणजे काहीच नाही. आणि समोर ही गर्दी! पहिल्या रांगेत बसून मी आपला काळजीत.. कसं होणार या बाईंचं? त्यात कविता अशा जाहीरपणे वाचतात ते मला कधी आवडायचं नाही. कविता ही खाजगी गोष्ट.. ती एकटय़ाने एकटय़ापुरती वाचायची असते असं मला वाटे. अजूनही वाटतं. त्यामुळे मी कधी कवितावाचनाच्या वाटेला गेलोच नव्हतो.. आणि बालगंधर्वमध्ये तर लोकांचा समुद्र उसळलेला.

पडदा बाजूला झाला- तर समोर गोऱ्या, लखलखत्या, तेजस्वी सुनीताबाई! काळ्या पडद्यासमोर एक शुभ्र ताठ रेघ. माईकसमोर बसलेली. उगीच मान वेळावणं नाही, गळेपडू प्रास्ताविक नाही. थेट कविताच. बोरकरांच्या. एकामागून एक. जादू उलगडत जावी तशा. ते अनपेक्षित लाघव मला पेलवेना. मी खुर्चीत थिजून गेलो. त्या संध्याकाळी अख्खं बालगंधर्व बोरकर नावाच्या लाटेवर उसळून ओसंडून जात राहिलं.. एका साध्या माईकच्या समोर बसलेल्या त्या शुभ्र, ताठ रेघेने हा उसळता दर्या एकटीने उभा केला होता!!!

कार्यक्रम संपवून परत निघालो. गाडीत मी गप्प. दातखीळच बसल्यासारखी झालेली. हे आपण काय पाहिलं, ऐकलं, अनुभवलं; माझं मलाच उलगडत नव्हतं. सुनीताबाईंनी विचारलं, ‘‘काय? कसं वाटलं तुला? जमलं का रे आज?’’

मी म्हटलं, ‘‘बाई, तुम्ही काहीतरी अद्भुत उभं केलं होतंत आज. मला काही सुचत नाहीये कसं सांगू तुम्हाला ते. मी तुम्हाला एक पत्र लिहून कळवीन!’’

म्हणाल्या, ‘‘चालेल चालेल! पण नक्की लिही बरं का! टांग नको देऊस!’’

मी म्हटलं, ‘‘नक्की लिहितो!’’

भेटी होत राहिल्या. स्नेह जडला होताच; तो अधिक घट्ट झाला. सुनीताबाईंशी भांडण काढायची भीती अशी कधी नव्हतीच. पण वादविवाद झाले की मजा यायला लागली.

हळूहळू मी कामात अधिक बुडत गेलो. प्रवास वाढले. त्यांच्यामागेही अनेक व्यवधानं होती. शिवाय नवनवी व्यवधानं लावून घेण्याची असोशीही होती.

एव्हाना महाराष्ट्रदेशी आणि परदेशीही पुलं आणि सुनीताबाई हे एक मिथक तयार झालं होतं. गोतावळा, गोष्टी, कथा, दंतकथा सगळ्याला पूरच येत गेला. मी त्यापासून लांब होतो.

त्यातच केव्हातरी सुनीताबाईंनी एक पुस्तक लिहून मराठी वाङ्मयाच्या चिमुकल्या वर्तुळात बॉम्ब फोडला. ‘आहे मनोहर तरी’! मी वाचलं आणि बाजूला ठेवलं. माझा अपेक्षाभंग झाला होता. म्हटलं, मुद्दाम कशाला सांगायला जा?

पण सुनीताबाईंचा कधीतरी फोन आलाच. त्यांना माझ्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. मी म्हटलं, ‘‘असं फोनवर नाही, पुण्यात भेटायला येतो. माझ्यासाठी चहा टाका तुम्ही. मग सांगतो.’’

गेलो.

विषय त्यांनीच काढला. कसं वाटलं सांग म्हणाल्या. समोर पुलं बसलेले. आता आली का पंचाईत!

पण म्हटलं, असतील! खरं बोलायला आपलं काय जातं?

सुनीताबाईंना म्हटलं, ‘‘ते तुमचं कौतुक वगैरे होतंय ते सगळं ठीक आहे हो.. पण रात्री उशिरा मैफल रंगात आलेली असताना कुमार गंधर्वाना साधा चहा हवा होता, तर तुम्ही नाही म्हणजे नाही दिलात, हे काही मला आवडलेलं नाही!’’

त्या उसळून म्हणाल्या, ‘‘अरे, पण कुमारला रात्री दुधातून औषध द्यायचं होतं; म्हणून नाही दिला मी चहा! लिहिलंय की त्यात!’’

‘‘तेच- कशाला लिहिलंय म्हणतो मी!’’ मी मागे हटायला तयार नव्हतो. पुलंचं अख्खं आयुष्य ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीची एवढी प्रदीर्घ कहाणी आहे, ती तुमच्यादेखत घडली. तुमच्या काळातली आकाशाएवढय़ा उंचीची अनेक माणसं तुमच्या आयुष्यात, घरात राहून, वावरून गेली. अनेक प्रसंगांना, गप्पांना, महत्त्वाच्या वादविवादांना तुम्ही साक्षी होतात. हे सगळं नोंदवणारी, टिपू शकणारी, त्याचं महत्त्व माहिती असणारी प्रखर बुद्धिमत्ता तुमच्यापाशी होती; तर तुम्ही त्यातलं काहीही न लिहिता पुलंनी कपाटात ठेवलेल्या शर्टाच्या घडय़ा मोडून त्यांची इस्त्री कशी विस्कटली, हे इतकं सामान्य काहीतरी कसं काय लिहिता तुमच्या पुस्तकात? याला काही अर्थ तरी आहे का?’’

मी सुटलो होतो.

मला मध्ये मध्ये अडवत त्या म्हणत, ‘‘अरे, मला काही डॉक्युमेंटेशन नव्हतंच मुळी करायचं. मी वेगळ्या दृष्टीने लिहिलं आहे हे!’’

त्या खुलासे देत राहिल्या, मी त्यांच्याशी भांडत राहिलो.

‘‘तुमच्या इतक्या श्रीमंत आयुष्यातल्या इतक्या महत्त्वाच्या माणसांबद्दल, घटना-प्रसंगांबद्दल न लिहिता तुम्ही हा असला कचरा का भरलाय पुस्तकात? मराठी माणसांच्या पुढल्या पिढीला कशी कळणार ही श्रीमंती? तुमच्याशिवाय कोण सांगणार आम्हाला? का नाही सांगितलं तुम्ही? का नाही लिहिलं?’’

शेवटी आम्ही दोघंही थकलो आणि विषय संपला. पुलं मंद हसत आमची ही कुस्ती शांतपणे बघत बसलेले होते.

सुनीताबाईंनी माझ्यासाठी चहा टाकला.

मग मध्ये काही र्वष गेली.

मग तर पुलंही गेले.

सुनीताबाई एकटय़ा पडल्या. त्यांच्यात शिगोशिग भरलेली तेजस्वी, चमचमती जादू मग मंदावतच गेली.

असाच केव्हातरी त्यांना भेटायला गेलो होतो पुण्यात. घर बदललेलं. सुनीताबाईही पूर्वीच्या नव्हत्याच उरलेल्या.

मला तिथे त्यांच्यासमोर बसवेना.

मी सहज म्हटलं, ‘‘आज चहा नको मला!’’

तर त्या खोल हसून म्हणाल्या, ‘‘अरे चित्रकारा, मी कुठून देणार आता तुला चहा? मला नाही जमत रे पूर्वीसारखा! चहासुद्धा नाही जमत आता!!’’

त्यांच्या जवळ जाऊन मी एक हलकी मिठी मारली आणि निघालो.

डोळे भरून आले होते. सुनीताबाईंच्या नजरेतली अजूनही अखंड तेवणारी मऊ धार लखलखताना दिसली, ती शेवटची!

मग त्या गेल्याच.

त्यांना कबूल केलेली एक गोष्ट मी शेवटपर्यंत केली नाही. बालगंधर्वमधली त्यांची कवितावाचनाची मैफल मला किती आवडली, हे त्यांना कळवणारं पत्र लिहिणार होतो मी. नाही लिहिलं.

आज सांगतो..

सुनीताबाई, त्या संध्याकाळी तुम्ही जे जादूचं जग उभं केलं होतंत, ते माझ्या मनातून आजतागायत विझलेलं नाही...

-सुभाष अवचट
लोकरंग
लोकसत्ता
24 Jan 2012