साहित्य, संगीत, नाटक इ. कला क्षेत्रांत रमत असताना, पुलंना आपल्या संस्कृतीची, जुन्याची ओढ होती, परंतु सनातनी गोष्टींची चीड होती. समाजाला उपकारक असे शोध, त्यामागची शास्त्रज्ञांची धडपड याचे त्यांना कौतुक वाटे. वैज्ञानिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था, प्रयोशाळा, पुण्यातील 'आयुका' सारख्या संस्थांना सुद्धा 'पु. ल. देशपांडे फाऊंडेशन' तर्फे देणग्या दिल्या होत्या. पुलंचा एक कमी परिचित पैलू म्हणजे, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, व विशेषत: मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, याबद्दल त्यांना खूप आस्था होती.
'मराठी विज्ञान परिषदेने' १९७१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'अस्मिता महाराष्ट्राची' या ग्रंथाला पुलंची प्रस्तावना होती! त्या प्रस्तावनेतील काही भाग....
... मी जीवनातील कोडी बुद्धीने आणि अभ्यासाने जाणून घेईन, ही जिद्द आणि मला ती जाणता येईल हा आत्मविश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. माणसाला अज्ञात अशा असंख्य गोष्टी आहेत. परंतु त्या अज्ञाताचा भेद करुन ते मी ज्ञात करुन घेईन, ह्मा धडाडीने निसर्गाचे विराट स्वरुप जाणून घेणे हे वैज्ञानिकांचे कार्य आहे. आणि ते वैयक्तिक साक्षात्काराच्या समाधानात न राहता, त्या ज्ञानाभोवती कसलीही गूढ वलये किंवा बुवाबाजी न करता, ते ज्ञानसोपान स्वच्छपणे ग्रंथातून दाखवणारे हे जगाचे खरे उपकर्ते आहेत. वैयक्तिक मोक्षाकडून सामाजिक मोक्षाकडे नेणारे विज्ञान हे जपतप-अनुष्ठानापेक्षा अधिक तारक आहे. विठ्ठलाला अठ्ठावीस युगात हटवता न आलेला पंढरपुरातला कॉलरा विज्ञानाने हटवला... नव्या मोटारीपुढे नारळ फोडून तिची गुलाल लावून पूजा करणारे मोटार नावाची एक नवीन देवता निर्माण करतात. ते मनाने वैज्ञानिक झालेले नसतात. खंडाळ्याच्या घाटात एक शिंगरोबाचे देऊळ आहे. त्याला दहा पैसे ठेवून प्रवास निर्विघ्न कर असे म्हणणाऱ्यांना दहा पैशाच्या जकातीवर देव खूष होतो, हा देवाचा अपमान आहे असे वाटत नाही. त्या शिंगरोबाला दहा हजार रुपये दिले तरी पेट्रोलशिवाय मोटार चालणार नाही.. वैज्ञानिकांनी आता विज्ञान परिषद स्थापन केली आहे. खरे सांगायचे तर विज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी ह्मा पोरांपुढे साक्षात अडाणी आहे... चंद्रावरच्या स्वारीचे माझे शिक्षण माझ्या कुटुंबातील बालगोपालांनी केले आहे. आणि हे सारे ज्ञान त्यांनी मराठी पुस्तकांतून आणि लेखांतून मिळवले आहे. मराठी परिभाषेला हसणारे लोक मराठी भाषेला मिळणाऱ्या ह्मा नव्या शक्तीकडे पाहतच नाहीत...
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Thursday, August 9, 2007
वैज्ञानिक पु.ल.
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं,
पुलकित लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 प्रतिक्रिया:
Deepya .......... excellent re ...!!!
Baki PuLa haa ek samasta marathi manacha jivhalyacha vishay .... atishay surekha paddhatine mandalelya vicharancha sohala ... atishay manohari ...!!!
Very Amazing 🤩
The Great personality "Pu.La.Deshpande"
Post a Comment