Wednesday, August 15, 2007

स्थानबध्द वुडहाऊस

मैत्र
स्थानबध्द वुडहाऊस

16 फेब्रुवारी 1975 . च्या सकाळच्या गाडीने पुण्याहून मुंबईला जायला निघालो होतो. वर्षानुवर्षे वुडहाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे . त्याची पुस्तके शिळी व्हायलाच तयार नाहीत . माझ्या प्रवासी बॅगेत इतर कोणतीही पुस्तके असली तरी वुडहाऊस हवाच . तसा घेतला . तेवढ्यात दाराच्या फटीतून ` सकाळ ` सरकला . पहिल्या पानावर वुडहाऊसच्या निधनाची बातमी . एका हातात कधीही न मरणारा वुडहाऊस आणि दुसऱ्या हाता याण्णवाव्या वर्षी वुडहाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा ` सकाळ . ' त्या क्षणी मला वुडहाऊसच्या एका उद्गाराची आठवण झाली . लेओनारा ' ही त्याची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर त्रेस्ष्ट वर्षांचा वुडहाऊस उद्गारला होता ,
"" आय थॉट शी वॉज्् इम्मॉर्टल . "" आपली लाडकी लेओनारा आणि तिचा मृत्यून ह्या दोन घटना , वुडहाऊच्या स्वप्नातही कधी एकत्र आल्या नव्हत्या . ` मला वाटलं होतं की ती अमर आहे ' ह्या एवढ्या उद्गारात जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या मनावर बसणाऱ्या पहिल्या निर्घृण घावाला एखाद्या शोक - सूत्रासारखी वाचा फुटली आहे .वुडहाऊच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर जगातल्या त्याच्या लक्षावधी वाचकांनीही हेच म्हटले असेल की , ` अरे , आम्हांला लाटलं होतं की तो अमर आहे .! 'वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर लिहिलेल्या त्याच्या कादंबरीतही वाचकाला खळाळून हसवायचे तेच सामर्थ्य होते . वुडहाऊसने लिहीत जायचे आणि वाचकांनी हसत हसत वाचायचे ही थोडीथोडकी नव्हे , सत्तरएक वर्षांची परंपरा होती . त्याच्या लिखानात लेखकाच्या वाढत्या वयाचा जरासाही संशय यावा असी ओळ नव्हती . कुठे थकवा नव्हता . सत्तरएक वर्षापूर्वी मांडलेला दंगा चालू होता . वुडहाऊस नसलेल्या जगातही आपल्याला रहावे लागणार आहे हा विचारच कुणाला शिवत नव्हता . पेल्हम ग्रेनव्हिल वुडहाऊस नावाचा 15 ऑक्टोबर 1881 रोजी जन्माला आलेला हा इंग्रज आपल्या लिखानाचा बाज यत्किंचितही न बदलता रोज आपल्या टेबलापाशी बसून कथा - कादंबऱ्या लिहित होता . पेल्हम ग्रेनव्हिल हे त्याचे नाव जरासे आडवळणीच होते . त्यामुळे त्याचे आडनावच अधिक लोकप्रिय झाले . ` बारशाच्या वेळी बाप्तिस्मा देणाऱ्या पाद््याचा हे असले नाव ठेवण्याबद्दल मी रडून - ओरडून निषेध करतोय हे कोणाच्याच लक्षात आले नाही ,ही त्या नावानर स्वतः वुडहाऊसचीच तक्रार आहे . जवळची माणसे त्याला ` प्लम ' म्हणत .


प्लमच्या कथा - कादंबऱ्यांतील वातावरणाचा बदलत्या समाजपरिस्थितीशी सुतराम संबंध नव्हता . त्याची त्याने दखलही घेतली नाही . आणि नवल असे की , त्याच्या वयाच्या नव्वद - ब्याण्णवाव्या वर्षी लिहिलेल्या पुस्तकाचा खपही दशलक्षांच्या हिशेबात होत होता . त्याच्या लिखाणात आधुनिक पाश्चात्य लोकप्रिय कादंबऱ्यांतून आढळणारी कामक्रीडांची वर्णने नव्हती , खून - दरोडे नव्हते , रक्त फुटेस्तोवरच्या मारामाऱ्या नव्हत्या . होते ते एक जुने इंग्लंड आणि काळाच्या ओघाबरोबर वाहून गेलेला त्या समाजातला एक स्तर . ते इंग्लंडही प्लमनने अनेक वर्षांपूर्वी सोडले होते . अमेरिकेत न्यूयॉर्कजवळ येऊन स्थायिक झाला होता . कुटुंबात तो आणि त्याच्याहून चार वर्षांनी लहान असलेली त्याची प्रेमळ , सुदक्ष सहचारिणी एथेल , काही कुत्री आणि मांजरे . लेखनावर लक्षावधी डॉलर्श मिळत गेल्यामुळे लॉग आयलंडवरच्या रेमसेनबर्ग नावाच्या टुमदार उपनगरात राहायला एक सुंदर बंगली . भोवताली काही एकर बाग . त्यात गर्द वनराई . वनराईतून पळणाऱ्या पायवाटा .


प्लमचे आयुष्य विलक्षण नियमित . सकाळी लवकर उठून बंगल्याच्या पोर्चमध्ये यायचा .बारा नमस्करांसारखा हातपाय ताणण्याचा एक व्यायाम बारा वेळ करायचा . वयाची नव्वद वर्षे उलटली तरी प्लमची ही व्यायामद्वादशी चुकली नाही . घरात जाग आलेली नसायची . मग स्वतःच आपला टोस्ट भाजून घ्यायचा . चहा तयार करायचा . ही न्याहारी शांतपणाने
चालायची . एखादी रहस्यकथा ( बहुधा आगाथा ख्रिस्तीची ) किंवा आवडत्या लेखकाचे पुस्तक वाचत वाचत न्याहारी संपली , इतर आन्हिके उरकली की स्वारी प्रभातफेरीला निघे . सोबत घरातली कुत्री हवीतच . कुत्री आणि मांजरे ही प्लमची परम स्नेहातली मंडळी . एकदा हा सकाळचा फेरफटका झाला , की नवाच्या सुमाराला अभ्यासिकेत शिरायचा . कथा - कादंबऱ्यांचे धागे जुळवायला सुरूवात . त्या निर्मितीतून असंख्य वाचकांना ह्या माणसाने खुदूखुदू ते खोःखो पर्यंत सर्व प्रकारांनी हसवले . नुसते हसवलेच नाही , तर ` पी . जी . वुडहाऊस ' हे व्यसन जडवले . कुणीतरी इंग्रंजीतून पुस्तके वाचणाऱ्यांची ` वुडहाऊस वाचणारे ' आणि `वुडहाऊस न वाचणारे ' अशी विभागणी केली होती . जेम्स अँगेट ह्या प्रसिध्द पण स्तुतीच्याबाबतीत महाकंजूष आणि प्रतिकूल टीकेच्या बाबतीत केवळ आसुरी असणाऱ्या टीकाकाराने `थोडाफार वुडहाऊस आवडणारे असे त्याचे वाचक ह्या जगात संभवतच नाहीत ' असे म्हटलेआहे . वुडहाऊस आवडतो याचा अर्थ तो अथपासून इतीपर्यंत आवडतो . हे आपल्या बालगंर्धवाच्या गाण्यासारखे आहे . ते संपूर्णच आवडायचे असते . ( सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांना वुडहाऊसआवडतो आणि त्याची सगळी पुस्तके त्यांच्या फळीवर आहेत हे मी जेव्हा वाचले त्या वेळी त्यांच्याविषयी मला वाटणारा कोशगत आदर उफाळून आला होता . ) ` व्यसन ' ह्यापलीकडे वुडहाऊसच्या बाबतीत दुसरा शब्द नाही . असल्या व्यसनांनी ज्यांना न बिघडता राहायचे असेल त्यांनी अवश्य तसे राहावे . अमुकच एका तत्त्वज्ञानात किंवा धर्मात मानवतेचे कल्याण आहे असा आग्रह धरण्यांनीही ह्या भानगडीत पडू नये .( ते पडत नसतातच !)त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गानेच एक न उघडणारे झापड बसवलेले असते . अहंकाराची दुर्गंधी आणि अकारण वेताग घेऊन ही माणसे जगत असतात . त्यांना सतत कोणीतरी खरा - खोटा ` शत्रू ' हवा असतो . असा ` शत्रू ' चा सार्वजनिक बागुलबुवा उभा करण्यात जे यशस्वी होतात तेच ` हुकूमशहा ' होत असतात . आणि ` विनोद ' तर मित्र जोडत असतो .म्हणूनच एकछत्री राजवटीत पहिली हत्या होते ती विनोदाची .वुडहाऊससारख्या माणसाला , नव्हे देवमाणसाला , सत्तीधीशांच्या ह्या वृत्तीचा फार मोठा ताप सोसावा लागला . त्याची अश्राप वृत्ती आणि निर्मळ विनोदबुध्दी हा त्याच्या आयुष्यात शाप ठरावा अशी परिस्थिती होऊन गेली . सुसंस्कृत जगाने लाजेने मान खाली घालावी अशीच ही घटना आहे एक संपूर्ण असत्य , माणसाला तापवलेल्या सळीने दिलेल्या डागासारखे कसे चिकटून राहते आणि राजकीय प्रचार ह्या नावाखाली चालणाऱ्या बौध्दिक व्यभिचाराचे अकारण बळी होऊन कसे जगावे लागते ह्याचे हे एक ह्दयभेदक उदाहरण आहे . पण त्याबरोबरच ह्या साऱ्या मानसिक छळातून , वरवर गमत्या वाटणारा वुडहाऊस आपल्या विनोदी लेखनाशी इमान ठेवून कसा राहिला त्याची हकीगत ह्या माणसापुढे आदराने नत - मस्तक व्हायला लावणारी आहे . पण हसवणाऱ्या माणसाला कोणी आदरणीय वगेरे मानत नसते .


कुठल्याही तत्त्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी वुडहाऊसने लिहिले नाही . जीवनाच्या सखोल तत्त्वज्ञानाची चिंता केली नाही . त्यानेच म्हटले आहे : "" माझ्यापुढे कुठलेही मार्गदर्शन करणारे नियम नाहीत . मी आपला जगत जातो . लिहित असलो म्हणजे उगीचच इकडेतिकडे पाहत बसायला आपल्याला सवड नसते . एकामागून एक पुस्तक लिहिणे हेच माझे
जीवन आहे . "" किती सहजतेने वुडहाऊस हे म्हणून गेला आहे .1902 साली वुडहाऊसने व्यवासायिक लेखनाच्या क्षेत्रात पहिली एट्रू घेतली . आणि 1940 साल उजाडायच्या आधी बारा नाटके , तीस विनोदी एकांकिका , शेकडो भावगीते ,
दोनशे सत्तावन्न कथा आणि बेचाळीस कादंबऱ्या लिहिल्या . ही काही नुसतीच लेखनकामाठी नव्हती . त्यांतली जवळजवळ प्रत्येक कृती यशाची नवी पायरी गाठत गेली होती .कडेखांद्यावरच्या बच्चाला खेळवावे तसे इग्रंजी भाषेला खेळवणाऱ्या वुडहाऊसने स्वतःचे एक विश्व निर्माण केले होते . त्याची भाषा आणि त्याची ती सृष्टी , इतकी त्यांचीस्वतःची आहे की त्याच्या साहित्याचे भाषांतर एखाद्या उत्तम कवितेच्या भाषांतरासारखे अशक्यच आहे . त्याची पात्रे एका विशिष्ट इंग्रजी कालखंडातील आहेत आणि त्या संस्कृतीत इतकी रूजलेली आणि वाढलेली आहेत की त्या जमिनीतून त्यांना अलग करणे चुकीचेच ठरावे . तरीही वुडहाऊच्या विनोदात विश्वात्मकता आहे . पृथ्वीच्या पाठीवरल्या इंग्रजी भाषा समजणाऱ्या संपूर्णपणे निराळ्या संस्कृतीत जगणाऱ्या लोकांना त्याच्या विनोदाने , अफलातून विनोदी उपमांनी , विनोदी प्रसंगांनी डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसवले .
त्याचा बर्टी वूस्टर आणि जीव्हज्् , आपल्या ` स्मिथ ' या नावाने स्पेलिंग कारण नसताना ` पी ' पासून सुरू करून पहिली ` पी ' अनुच्चारित आहे हे बजावणारा आणि सदेव उसने पेसे देण्याऱ्यांच्या शोधात असणारा तो स्मिथ , लॉर्ड एम्सवर्थ आणि त्याचा तो बौण्डिग्ज , कॅसल , युकरिज , मुलिनर , अंकल फ्रेड , गोल्फ कथांतला तो गोल्फमहर्षी ` वृध्द सदस्य ' , ऑण्ट आगाथा -सारख्या अनेक आत्या - मावश्या . . . . ही सारी मंडळी आणि त्यांचा हा निर्माता यांनी इंग्रजी साहित्यात हा गोंधळ मांडिला होता . गोधंळाला अंत नव्हता आणि मृत्यूनेच मालवीपर्यंत ह्या गोंधळ्याच्या हातची मशाल विझली नव्हती . एका समीक्षकाने त्याच्या ह्या निर्मितीपुढे हात टेकताना म्हटले आहे : "" वुडहाऊसची प्रतिभा थकायला तयार नाही . पण समीक्षक मात्र नवीन स्तुतिपर विशेषणे शोधून काढता काढता थकायला लागले आहेत .""


लेखन हा त्याच्या प्रेमाचा विषय होता . लेखन म्हणजे साक्षात टेबलाशी बसून हाताने केलेले लेखन . मजकूर सांगून लेखनिकाकडून लिहून घेणे त्याला जमले नाही . एकदा एथेलने त्याला टेपरेकॉर्डरसारखे यंत्रही आणून देऊन भार हलका करण्याचा प्रयत्न केला होता . वुडहाऊस म्हणतो : "" मी ` थँक्यू जीव्हज्् ' ह्या कादंबरीचा त्या यत्रांवर मजकूर सांगायला लागलो . आणि काही वेळाने तो मजकूर ऐकायला लागल्यावर तो माझा मलाच ऐकवेना . भलताच रटाळ
वाटायला लागला होता . आणि माझा आवाजदेखील एखाद्या पाद्रीबाबासारखा आहे याची मला तोपर्यंत कल्पनाही नव्हती . तो तसला आवाज किंवा ते यंत्र यांपेकी एक कोणीतरी माझी तंगडी खेचत होते . असो , दुसऱ्या दिवशी मी ते भिकार यंत्र विकून टाकले . "" समोर बुध्दिबळाचा पट मांडून आपण आपल्यापाशीच खेळत बसावे तसा त्याचा हा लेखनाचा कार्यक्रम असे . स्वतःच बिकट चाल करायची आणि त्यातून स्वतःच गमतीदार सोडवणूक करायची . ह्या लेखनाच्या छंदाबद्दल त्यानेच म्हटले आहे : "" लेखनाची एक मजास आहे . तुम्ही स्वभावतःच लेखक असलात तर तुम्ही पेशासाठी , कीर्तीसाठी किंवा फार कशाला ,छापून प्रसिध्द व्हावे म्हणून सुध्दा घासूनपुसून लख्ख करायची फार हौस आहे . एकदा कागदावर उतरून काढले , मग ते कितीही ओबडधोबड का असेना , काहीतरी आपल्या पोतडीत जमा झाले असे मला वाटते . ए . ए . मिल्न तर म्हणतो की पुस्तके प्रकाशितदेखील करू नये . ती लिहावीत . त्याची सुंदर अशी एक प्रत छापावी , लेखकाला वाचण्यासाठी . ""` स्वान्तःसुखाय ' म्हणजे तरी दुसरे काय आहे ? साहित्यनिर्मिती ही खरोखरीच क्रिडा असावी . त्या खेळाची मजा वाटायला हवी . वुडहाऊस हा साहित्यातला ` खेळाडू ' होता . त्याचे स्वतःचे मेदान होते . त्याची स्वतःची टीम होती . त्याच्या कथा - कादंबऱ्या म्हणजे ह्या साऱ्या भिंडूच्या जीवनातला खो - खो , आट्यापाट्या , लंगडी , धावाधावी , लपंडाव - नाना तऱ्हा ! आणि वुडहाऊस हा त्या खेळाची हकीगत सांगणारा विनोदी कॉमेंटेटर . ही त्याची दोस्त -मंडळी होती . इथे कोणी खलनायक नाहीत . कुणाच्या मनात पाप नाही . इथली हारजीत खोळातल्यासारखी . इथली फसवाफसवी पत्याच्या डावातल्या फसवाफसवीसारखी . इथले प्रेम , त्या प्रेमाच्या आड येणारी माणसे , त्यातून सूर मारून भोज्या गाठणारे नायक , त्यांना ` जेली 'सारखे थरथरायला लावणाऱ्या त्या आत्याबाई , संकटमुक्तीसाठी साक्षात विष्णूसारखा उभा असलेला तो जीव्हज् . . . हे एक विलक्षण मजेचे नाटक .नाटकच म्हणायला हवे , कारण त्याच्या पात्रांची घालमेल आणि धावपळ ही एखाद्या रंगमंचावर चालल्यासारखीच असते . कादंबरीतील पात्रेदेखील नाटकातल्या पात्रांसारखी सदेव हालती ठेवली पाहिजेत . असे वुडहाऊसचेच मत होते . त्याने त्या पात्रांना सुस्त होऊ दिले नाही .


एक एक प्रसंग म्हणजे एका घसरगुंडीवरून दुसऱ्या घसरगुंडीवर नेण्याचा कार्यक्रम . वुडहाऊस ह्या नाटकाचा निर्माता , सूत्रधार आणि प्रेक्षकही . आपला नायक नव्या घोटाळ्यात सापडला की सर्वात त्यालाच आधी आनंद व्हायचा . मग त्याच्यातला सूत्रधार खुषीत येऊन त्या नायकाच्या फजितीचे गंमतीदार शब्दांत वर्णन करायला टपलेला असायचा . अशी एखादी नेमकी उपमा निघायची की ती सुचल्यावर मला वाटते , वुडहाऊस स्वतःच गुदगुल्या झाल्यासारखा हसत असेल . पानापानातून अशा कितीतरी विनोद उपमा . उत्तम कवितेप्रमाणे अजिबात बदलता येणार नाही अशी अचूक शब्दयोजना . एक मात्र निश्चित की वुडहाऊस हा त्याच्या त्या इंग्रजीतून अनुभवायलला हवा . भाषांतरात त्याच्या शेलीतली लय पकडता येत नाही . तबल्याच्या तुकड्यात ` धा ' म्हणजे तिथे ` धा ' च हला , ` धिन् चालणार नाही . तसेच वुडहाऊसच्या विनोदाचे आहे . त्याचा तो जीव्हज्् हा ` बटलर ' आहे . आता ` बटलर ' ह्या शब्दाचा अर्थ जपानी ` गेशा ' किंवा फार कशाला ` भटजीबुवा ' किंवा ` पिठले ' ह्या शब्दांइतकाच अ - भाषांतरीय !इंग्रजी भाषेला हवे तसे खेळायला लावणाऱ्या वुडहासचे कौतुक पंडित - अंपडित सगळ्यांनाच होते . 1939 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वुडहासचला इंग्रजी साहित्याच्या सेवेबद्दल डी . लिट . ची सन्मानीय पदली दिली . त्यापूर्वी मार्क ट्रवेन ह्या विनोदी लेखकालाच काय ती सन्माननीय डॉक्टरेट देण्यात आली होती . आपल्याकडल्या विद्यापिठाने मात्र विनोदी लेखकाला असा गौरवपर डॉक्टरेट देणे ही सामान्यतः एखाद्या याज्ञवल्क्याश्रमाने कुणाला तरी उत्तम तंदुरी चिकन करतो म्हणून ` शाल आणि श्रीफळ ' देण्याइतकीच अशक्य कोटीतली गोष्ट आहे .


1939 साली इंग्लडंमध्ये वुडहाऊसच्या विनोदाचा एलढा मोठा गौरव झाला आणि वर्षे दोन वर्षे लोटली नाहीत तोच युध्दकाळातला राष्ट्रद्रोही म्हणून त्याचा निषेध सुरू झाला . ज्याच्या वाचकांत रूडयार्ड किप््लिंग , आगाथा ख्रिस्ती , जॉर्ज ऑरवेल , माल््कम मगरिज यांच्यासारखे इंग्रजी साहित्यातले श्रेष्ठलेखक होते , हिलेर बेलॉकसारख्या इंग्रजी लेखकाने ज्याचा ` सध्या हयात असलेल्या इंग्रज लेखकांतला निःसंशय सर्वोष्कृट लेखक ' असा बी . बी सी . वरून गौरव केला होता . त्याच वुडहाऊसची त्याच बी . बी . सी वरून , पंचमस्तंभी , देशद्रोही , लॉर्ड हॉहॉ अशी बदनामी सुरू झाली . विशएषतः त्या वेळचे ब्रिटिश प्रचारमंत्री डफ कूपर यांनी तर खाजगी वेर असल्यासारखा वुडहाऊसच्या चारित्र्यहननाचा प्रचार जारी ठेवला . पण बर्लिन रेडिओवरून ध्वनिक्षेपित झालेल्या ज्या भाषणांबद्दल त्याला राष्ट्रद्रोही ठरवण्यात आले होते ती भाषणे काय होती याची चौकशी करायची कुणालाच गरज पडली नव्हती . म्हणजे एकीकडून वुडहाऊस नाझी जर्मनांच्याबंदीखान्यात हाल भोगत होता आणि त्याच्या मायदेशात त्याच्याविरूध्द त्याच्या जर्मनधार्जिणेपणाबद्दल गरळ ओकले जात होते . हा अश्राप माणूस राष्ट्रद्रोह करीलच कसा ? - हा विचारदेखील त्याला दोषी ठरवण्यांच्या क्षणभरही मनात येऊ नये हे चारित्र्यहननाच्या निरर्गल प्रचाराचे यश म्हणायला हवे . पण अशा ह्या भयानक अवस्थेत वुडहाऊसने मात्र मनोधेर्याचा कुठलाही आव न आणता जे लोकविलक्षण मनोधेर्य प्रत्यक्षात आचरून दाखवले ते पाहिल्यावर हा वरपांगी गमत्या वाटणारा माणूस किती उंच आणि किती खोल होता याची साक्ष पटते . निरनिराळ्या तुरूंगांत आणि ` स्थानबध्दांच्या कॅम्पस ' मध्ये नेऊन कोंडलेल्या वुडहाऊसची विनोदबुध्दी त्याला क्षण - भरही सोडून गेली नाही . तो आपल्या स्थानबध्दतेतल्या अनुभवांची विनोदी डायरी चालू होती . भयानक थंडीत , साठीच्या घरात आलेल्या वुडहाऊसला फरशीवर झोपावे लागत होते . संडास साफ करायला भाग पाडले जात होते , आणि ` विनोदी लेखन ' ही एवढीच आपल्याला जमणीरी गोष्ट असे मानणारा प्लम वाचकांना हसवणारी पानांमागून पाने लिहून काढीत होता . आम्ही ` स्वधर्मा ' च्या लफ्फेबाज गोष्टी करतो ; वुडहाऊस पाळत होता . विनोदी लेखन हा दुसऱ्या स्वभावधर्म होता .


दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी वुडहाऊस फ्रानसमधल्या पारी प्लाजनजीक सुद्रतीरीवरच्या ल तुके नावाच्या छोट्याशा गावात राहत होता . 1940 च्या मे महिन्यात नाझी जर्मनांनी ल तुकेचा ताबा घेतला . त्या गावात चितके इंग्रज होते . त्यांना स्वतःच्याच घरात स्थानबध्द करून ठेवण्यात आले . आठवड्यातून एकदा जर्मन कमांडंटच्या ठाण्यावर जाऊन हजेरी द्यावी लागत असे . अशी परिस्थिती असूनही त्याच्याविरूध्द अपप्रचार करण्यांनी , वुडहाऊसला ठोकून दिला होता . नाझी सेनिक बळजबरीने लोकांच्या घरात शिरून त्यांच्या बाथरूमध्ये आंघोळी करीत , अन्न फस्त करीत , ह्या गोष्टींचा विपर्यास , नाझी सेनिकांना आपल्या बाथ - रूममध्ये स्नानाची सोच करून देऊन वुडहाऊस त्यांना पार्टीलाही बोलवीत असे , असाही केला जात होता . वुडहाऊस म्हणतो "" ह्या हरामखोरांना मी , आपली गलिच्छ शरीरे धुवायला माझ्या बाथरूममध्ये या असे अनमंत्रण देईन काय ? मी त्यांना दम देऊनदेखील पाहिले . कसला दम आणि कसले काय ! पुन्हा आले ते आणखी सेनिक जमवून घेऊन घुसले . "" फ्रेचांनी शरणागती लिहून दिली होती . बाहेरच्या जगातल्या बातम्या ऐकण्यावर बंदी . इंग्रजी वर्तमान - पत्रे येऊ देत नसत . फॅसिस्ट राजवटीत बातम्यांचा ब्लॅकआऊट हे एक प्रभावी तंत्र असते . आणि गोबेल्ससारख्या अपप्रचारांच्या उस्तादांचा उस्ताद असल्यावर त्याच्या प्रचारात काय सांगितले जात होते आणि काय लपवले जात होते याची कल्पनाही करणे अशक्य .


वुडहाऊसनित्याप्रमाणे त्या जर्मन कमांडरच्या कचेरीत वीस जुलेला हजेरी लावायला गेला . पण वातावरण निराळे वाटले . ल तुकेमधल्या परकीय रहिवाशांपेकी साऱ्या पुरूष - मंडळींना स्थानबध्द करण्याचा हुकूम आला होता . ` गरजेपुरत्या ज्या वस्तू असतील त्या बँगेत भरा आणि ताबडतोब ठाण्यावर हजर व्हा ' असा हुकूम होता . तिथून त्यांना नांच्याकॉन्सेन्ट्रेशन कॅम्पात नेण्यात येणार होते . वुडहाऊसच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे , "" स्थान - बध्दचेटा पूर्वानुभव नसल्यामुळे बॅगेत कायकाय भरता येते याची कल्पना नव्हती . त्यामुळे पाईप , तंबाखू , पेन्सिल , वह्या , बूट , दाढीचे सामान , थंडीसाठी म्हणून स्वेटर्स , टेनिसनच्या कवितांचा संग्रह , सम्रग शेक्सपिअरचा खंड आणि अर्धा पौंड चहाची पत्ती - एवढे सामान भरले . तेवढ्यात एथेलने त्या बॅगेत एक कोल्ड मटनचॉप आणि चॉकलेटचा एक लहानसा स्लॅब कोंबला . रत्तलभर लोणी , घ्या म्हणत होती . पण उन्हात लोणी वितळायला लागायची लहानशी भीती होती . तेव्हा तो बेत रद्द केला . "" एथेलचा निरोप घेऊन वुडहाऊसने घर सोडले . इथून त्याची वर्षभर चांगली परवड झाली . साठ वर्षेपुढल्या युध्दबंद्यांना केदेत ठेवायचे नाही ह्या नियमाप्रमाणे तो सुटला . ह्या स्थानबध्दतेतल्या अनुभवावर एका अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीने त्याला भाषणे द्यायला लावली . ते हे ` बर्लिन ब्रॉडकास्टस . 'जर्मनांनी लुच्चेगिरीने त्याचा दुरूपयोग केला . आणि इंग्रज आपली सारी विनोदबुध्दी गहाण टाकून भडकले . वास्तविक भडकायला हवे होते जर्मनांनी . पण युध्दकाळात बर्लिन रेडिओवरून वुडहाऊस बोललाच कसा ? बस ! हे एक कारण घेऊन तो काय बोलला हे ध्यानात न घेता त्याच्यावर
चिखलफेकीचा सरकारी प्रचार सुरू झाला . त्याला फॅसिस्टांचा बगलबच्चा ठरवण्यात आले . युध्द संपले . जर्मन हरले . सगळ्यांची डोकी जरा थंड झाली . आणि एकोणीसशे चौपन साली वुडहाऊसने ती भाषणे प्रसिध्द करायला आपला मित्र टाऊनएंड ह्याला परवानगी दिली . ह्या मित्राला वुडहाऊसने आयुष्यभर अतिशय मजेदार पत्रे लिहिली आहेत . टाऊनएंड हा स्वतः चांगला लेखक . त्याने ती सारी पत्रे जपून ठेवून प्रसिध्द केली . सीअन ओकेसी नावाच्या लेखकाने वुडहाऊसला इंग्रजी साहित्यातील ` परफॉर्मिंग फ्ली ' - म्हणजे ` खेळ करून दाखव - # णारी माशी ' - थोडक्यात म्हणजे ` तमासगीर ' म्हटले होते . ह्या पत्रसंग्रहाचे नाव तेच ठेवले आहे . आपण ` तमासगीर ' आहोत हे वुडहाऊसने स्वतःच मान्य केले आणि न जाणो जे दूषण म्हणून दिले असेल ते भूषण म्हणून वापरले . ह्या हसवणाऱ्या माणसाला दुसऱ्या कुठल्याही सन्मामाची अपेक्षा नव्हती . यथेच्छ चिखलफेक झाली होती . पण प्लमच्या कादंबऱ्या प्रसिध्द
होतच होत्या . बर्टी वूस्टर घोळ करीत होता . त्याचा तो प्रज्ञामूर्ती ( आणि स्थितप्रज्ञही ) जीव्हज् शांतपणे मालकांना त्यातून सोडवून तितक्याच शांतपणे नामानिराळा राहत होता . लोक वाचत होते . हसत होते .


युध्द संपून पाचसात वर्षे झाल्यानंतरही त्याच्या पुस्तकावर तोंडभर तारीफ असलेल्या समीक्षेत वुडहाऊसच्या विनोदाला तोड नाही अशी शिफारस होत होती . पण लगेच ` दुसऱ्या महायुध्दात नाझींनी त्याला पकडून अपर सायलेशियन तुरूंगातून ब्रिटिशांनी जर्मनांना शरण जावे म्हणून केलेल्या प्रचाराचे दुःस्वप्नासारखे दिवस आणि त्या दुःस्वप्नांसारख्याच आठवणी आता संपल्या आहेत ' हे शेपूट होतेच .`असत्यमेव जयते ' चे फार नमुनेदार उदाहरण आहे . प्लमने ही समीक्षा वाचली. त्यावरची त्याची प्रतिक्रिया त्याच्या विनोदीवृत्तीला साजेशीच आहे . "" बारा वर्षांपूर्वी मी जेव्हा साठ वर्षांचा चिमखडा होतो त्या वेळी ह्या उल्लेखाने जखम झाली असती . आता सत्तरी ओलांडल्यावर असल्या घावाच्या जखमा होत नाहीत . आता ह्या घड्याळाची टिकटिक केव्हा बंद पडेल ते सांगता येत नाही . अशा वेळी कशाचीही खंत बाळगणे येडपटपणाचे वाटते . ` माझ्याविषयी लोक वर्तमानपत्रातून काही का लिहिनात . जोपर्यंत माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक करीत नाहीत तोपर्यंत मला त्याचे काही वाटत नाही ' - असे कोणातरी म्हणाला होता . माझी अवस्था त्या माणसासारखी आहे . तात्पर्य , माझ्याविषयीचा हा गेरसमज लोकांच्या गप्पांच्या अड्ड्यांअड्ड्यांतून चालणार असेल तर ` बर्लिन ब्रॉडकास्ट्स ' प्रसिध्द झाले म्हणूनही काही बिघडणार ही . "" आणि गमतीची गोष्ट अशी , हे बर्लिन - ब्रॉडकास्ट म्हणजे ज्या जर्मानांनीप्लमला स्थान - बध्दतेते टाकले होते त्यांची यथास्थित टिंगल आहे . उपहास आणि उपरोधाचा ती भाषणे म्हणजे एक आदर्श आहे . जर्मनांना त्यातली खोचण्याइतकी विनोदबुध्दी नव्हती हे वुडहाऊसचे भाग्य . नाहीतर त्यांनी त्याला केव्हाच फासावर लटकावला असता . पण आश्चर्य वाटते ते इंग्रजांची विनोदबुध्दी नष्ट झाल्याचे . हिटरलने तेवढ्यापुरता तरी इंग्रजांवर विजय मिळवला होता , म्हणायला हवे . त्यांचा एक विनोदी लेखक शत्रूच्या मुलखात राहून शत्रूची यथेच्छ चेषटा करीत होता आणि केवळ शत्रूच्या रेडिओवरून ती भाषणे झाली ह्यावरून तो शत्रुपक्षाचा प्रचार ठरवण्यात आलसा होता . वुडहाऊसच्या ह्या इंग्रजी भाषणांचे भाषांतर करणे खरे म्हणजे अशक्य आहे . पण त्यातूनही , ह्या असल्या अवस्थेत त्याने टिकवून धरलेल्या विनोदबुध्दीचे दर्शन घडते ते अपूर्व आहे . त्या भाषणांची सुरूवातच किती मजेदार आहे . "" माझ्या ह्या छोटेखानी भाषणात श्रोत्यांना थोडाफार भोटमपणा दिसेल . काहीसा पाल्हाळही लावल्यासारखं वाटेल - पण ती बाब बर्टी वूस्टरच्या भाषेत सांगायची म्हणजे` ताबडतोब स्पष्टीकरण देता येण्यासारखी ' आहे . मी नुकताच जर्मनांच्या मुलकी तुंरूगा - # तल्या बंदिस्त कोठड्यांतला एकूणपन्नास आठवड्यांचा मुक्काम आटपून बाहेरच्या मोकळ्या जगात आलो आहे . त्यामुळं अजनही डोक्याचा तोल पूर्णपणाने सावरलेला नाही .ह्याच माझ्या डोक्याची कधीही तोल न जाऊ देण्याचा गुणाबद्दल सगळीकडे एकमुखाने तारीफ व्हायची . "" इथून पुढच्या पाच भाषणांत प्लमने तुंरूगवासातल्या हालअपेष्टांना विनोदाच्या रंगांतून रंगवून काढले आहे . जर्मन कमांडंटच्या ठाण्यापासून त्याचे घर तीन किलोमीटर दूर होते . बॅग गोळा करायला जर्मन अधिकाऱ्यांनी त्याला पाच मिनिटांचा अवधी देऊन लष्करी मोटारीतून घरापर्यंत नेले . वुडहाऊस म्हणतो , "" मोटारीतून नेल्यामुळं मला वाटलं जर्मन मंडळी तशी आपल्यावर खूष असतील . घरी पोचल्यावर थंड पाण्यानं झक्क शॉवरबाथ घ्यावा , पाईप पेटवून बॅगेत भरायच्या व्सतूंचं चिंतन वगेरे करावं असा विचार होता . पण माझ्याबरोबर आलेल्या जर्मन सेनिकाने ` लवकर आटपा ' असं गुरकावल्याबरोबर माझ्या उत्साहावर एकदम पाणी पडलं . त्याच्या मते पाच मिनिटं खूप झाली . असं होतं . शेवटी मिनिटांवर तह झाला . . . माझ्या भावी चरित्रकारांनी हे नमूद करावं . यापुढील काही दिवस स्थानबध्देत काढावे लागणार म्हटल्याक्षणी माझ्या मनात पहिला विचार आला , तो आता कंबर कसून एकदा समग्र शेक्सपिअर वाचून काढावा हा ! गेली चाळीस वर्षे मी समग्र शेक्सपिअर वाचायचा संकल्प सोडतो आहे . तीन वर्षांपूर्वी मी त्या उद्देशाने ऑक्सफोर्ड आवृत्तीदेखील विकत घेतली होती . पण हॅम्लेट आणि मॅक्बेथ पचवून हेन्री द एट्थ भाग एक , दोन व तीनमधलं पुरण पोटात भरणार इतक्यात आगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथेतल्या कशाकडे तरी लक्ष जायचं आणि ढेपाळायला व्हायचं . ही स्थानबध्दता काही वर्षासाठी होती की आठवड्यांसाठी याचा काहीच पत्त नव्हता . पण एकूण परिस्थिती मात्र ` समग्र शेक्सपिअर ' कडेच बोट दाथवत होती . म्हणून बॅगेत घुसला . "" ह्या गडबडीत वुडहाऊस एकच गोष्ट बॅगेतभरायला विसरला होता . त्याचा पासपोर्ट . बॅग भरून झाल्यावर प्लमला पुन्हा एकदा त्या जर्मन कमांडरपुढे उभे केले . ( ह्या कमांडरचा एक डोळा काच बसविलेला होता . त्या डोळ्याची वुडहाऊसला भारी भीती वाटायची , असे त्याने आपल्या डायरीत लिहिले आहे . ) तिथे भरपूर वेळ ताटकळल्यावर वुडहाऊसची यात्रा सुरू झाली . "" ह्या स्थानब्धतेतल्या प्रवासात एक मोठी उणीव असते . आपल्याला कुठे नेण्यात येतआहे , हे काहीच कळत नाही . म्हणजे आपण शेजारच्या गावात आलो की अर्धा युरोप पालथा घातला याचा थांगपत्ता लागत नाही . आम्हांला लील नावाच्या शहरातल्या लूस नावाच्या उपनगराकडं नेलं होतं . सत्तर मेलांचं अंतर . पण वाटेत स्थानबध्दांतले इतर ` संस्थापक सदस्य ' उचलायचे असल्यामुळं एवढं अंतर काटायला सात तास लागले . "" त्या बसमध्ये ल तुके गावातील जे इतर इंग्रज पकडून कोंबले होते ते सारे त्याच्या परिचयाचे होते . "" पुढं काय वाढून ठेवलं आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं . स्थानबध्दतेचा आमचा सगळ्यांचा हा अनुभव . पण प्रत्येक जण आपापलं डोकं चालवून अंदाज लढवीत होता .आमचा आल््जी म्हणजे मनुष्रूपी सूर्यकिरणच ! निराशेचा अंधकार वगेरे त्याला नामंजूर . आम्हां सगळ्यांची सोय उन्हाळ्याच्या सुटीत राहण्यासाठी बडे लोक एखाद्या उपवनात प्रासादतुल्य बंगले बांधतात , तसल्या बंगल्या - प्रासादांत होणार , असा त्याचा होरा होता . ` बंगला ? मी . ' ` बरोबर , बंगला . ' आल््जी ` म्हणजे पुढल्या पोर्चमध्ये पिवळ्या फुलांच्या वेलीबिली चढवलेल्या असतात तसल्या . . . ' ` वेलीचं नक्की नाही . असतीलही किंवा नसतीलही . पण प्रासादतुल्य बंगल्यात होणार हे नक्की . मग आपल्याला पॅरोलवर सोडतील . दिवसभर रानावनातून भटकून यायची परवानगी मिळेल . मला वाटतं , गळ टाकून मासे धरायलाही देतील . 'घटकाभर बसमधलं वातावरण प्रफुल्लित झालं . मासेमारीची फारशी हौस नसणारे म्हणाले , ` आम्ही आपले उन्हातून हिंडून येत जाऊ . ' काही वेळाने लक्षात आलं की आल््जीला स्थानबध्दतेतील ओ की ठो ठाऊक नव्हतं . बंगल्यातच ठेवायचं तर आमचे बंगले काय वार्ट होते ? उगीच आमच्या स्वतःच्या बंगल्यातून लोकांच्या बंगल्यात एकदम जथाबंद उचलून नेऊन मुक्कामाला ठेवायची काय गरज होती ? त्यानंतर मात्र आम्ही नक्कीच गारठत चाललो . आशावादाची जागा अस्वस्थतेंन घेतली आणि लीली गावाला वळण घेऊन बस उभी राहिली तेव्हा आमच्या उत्साहाच्या पाऱ्यानं शून्याखालचा नवा नीचांक गाठला होता . ती इमारत म्हणजे स्थानिक तुरूंग किंवा विभागीय कारागृह अशाखेरीज इतर कसलीही असणार नाही हे उघड होतं . एका फ्रेंच स्थानिक शिपायानं दरवाजे उघडले आणि आम्ही आत घरंगळलो . "" आता ह्या भाषणाता कसला देशद्रोह आला ? पण ब्रिटिश प्रचारमंत्र्यांना तो दिसला . बर्लिन रेडिओवरले दहादहा मिनिटांचे असे हे पाच टॉक््स . म्हणजे एकूण पन्नास मिनिटे . माणसाला स्थानबध्द करून त्याचे स्वातंत्र्य हिरावून घ्याल ; पण त्या हालांचीही थटटा करण्याची त्याची ताकद कशी हिरावून घेणार ? वुडहाऊसने तुरूंगवासाचे जे वर्णन केले आहे त्यातला उपरोध तर विलक्षण आहे . वुडहाऊस म्हणतो , "" ज्यांनी अजूनही तुरूंगवासाची पहिली शिक्षा भोगली नाही , त्यांना हितासाठी एक गोष्ट सांगायला हवी . मुख्य म्हणजे , असल्या संस्थेत प्रवेश मिळवणं अवघड नाही . एखाद्या मोठया हॉटेलात खोली राखून ठेवण्यासारखंच असतं . फरक एवढाच की दारातल्या स्वागतकक्षात फुलझाडं वगेरे नसतात . स्वत : ची बॅग स्वतःलाच उचलावी लागते -आणि नोकराला टिप देण्याची भानगड नाही .लहानपणापासून निष्पाप आयुष्य काढल्यामुळें , तुरूंगाची आतली बाजू फक्तसिनेमातच काय ती पाहिलेली . तेवढयात माझी नजर स्वागतकक्षात बसलेल्या एका अधिकाऱ्याच्या नजरेला भिडली आणि मला पश्चात्ताप झाला . आयुष्यात कधीतरी असा एखादा क्षण येतो , की ज्या वेळी एखाद्या अनोळखी माणसाच्या चेहऱ्याकडे आपली नजर वळते आणि आपल्याला वाटतं , ` वा - ! - दोस्त भेटला . ' हा क्षण त्यातला नव्हता . ` सेतानाचे बेट ' सारख्या सिनेमातला वाटावा असा तो इसम माझ्याकडे पाहून मिशीला पीळभरत होता . पण लेखकाची जात इतक्या आशा सोडत नसते . मनात उगीचच एक पुसट असा विचार डोकावत होता . आम्हांला पाहुचारासाठी बोलावणारा आमचा हा यजमान माझं नाव ऐकल्याबरोबर एकदम ` उई उई मॉसिये वोदहाऊस ! . . एंब्रेसाजे - मॉय -मेर्त्र ' - असं कोहातरी ओरडत उठून उभा राहील . रात्री झोपायला हवा तर माझा पलंग घ्या म्हणेल . वर , काय सांगू बेह , तुमचा मी भयंकर चाहता आहे . . . आमच्या पोरीसाठी स्वाक्षरी देता का ? . . असं काहीतरी म्हणेल . पण तसलं काही झालं नाही . त्यानं पुन्हा एकदा मिशी पिळली . एका भक्कम खतावणीत माझं नाव लिहिलं . ` विडहॉर्स ' . आणि ` गुन्हा ' ह्या सदरात ` इंग्लिश ' असं नोंदवलं . बाजूला हाजिर असलेल्या शिपुर्डयाना ` ह्याला कोठडीत नेऊन टाका ' असा हुकूम दिला . ती कोठडी मी , आल्जीज बारचा आल्जी ( बंगल्यात ठेवतील म्हणणारा . ) आणि आमच्या गावातला सालस आणि लोकप्रिय पियानो टयूनर विल्यम कार्मेल ह्या तिघांना मिळून तिघांना कोंबायचे . कोठडीचे क्षेत्रफळ बारा गुणिले आठ फूट . सिनेमातल्या कोठडयांना असतात तसले गजबीज नव्हते . एकच भक्कम लोखंडी दरवाजा . त्यात एक जेवणाची थाळी सरकवायला झडप . आणि बाहेरच्या पहारेकऱ्याला आतले रहिवाशी शाबूत आहेत की नाहीत ते पाहण्यासाठी त्या दाराला बाहेरून झाकण लावलेलं भोक . त्या कोठडीत फक्त एक खाट आणि तिच्यावर अंथरूण होतं . त्या भिंतीच्या वरच्या अंगाला एक खिडकी होती . दुसऱ्या भिंतीशी एक लहानसं टेबल. त्यालाच साखळीनं बांधलेली तीन - साडेतीन वीत उंचीची खुर्ची . कोपऱ्यात नळ होता . त्याच्याखाली बशीएवढे वॉश बेसिन . एक लाकडी शेल्फ आणि भिंतीत एक लाकडी खुंटी . एकूण सजावट कडकडीत मॉडर्न स्टाइलची . चुना फासलेल्या भिंतीवरची जी काही चित्रं होती . ती वेळोवेळी त्या कोठडीत नांदलेल्या फ्रेंच केद्यांनी काढली होती हे लक्षात यायचं . त्यांनी पेन्सिलीने ठसठशीतपणानं काढलेल्या चित्रांवरून त्या फ्रेंच केद्यांच्या चित्रकलेच्या बाबतीतल्या विचारधारेत कुठं उच्चभ्रूपण वगेरे नव्हता . चारी बाजूला ती ` तसली ' चित्रं असल्यामुळं ` पॅरिसमधील रंगीला रसूल ' सारख्या ग्रंथाच्या पानात आपण सापडलो आहो असा परिणाम व्हायचा . आम्हां तिघांत कार्मेल वयाने वडील . त्याला आम्ही खाट दिली . आणि आम्ही जमिनिवर पसरलो . दगडी फरशीवर शयन करायचा माझा पहिलाच प्रसंग . पण दिवसभराच्या मुर्दुमकीनं थकून गेल्यामुळं पापण्या मिटायला फार वेळ नाही लागला . झोप लागण्यापूर्वीचा माझा एकच विचार मला आठवतो : उतारवयात सभ्य माणसावर प्रसंग गुदरणं हे भयंकर आहे खरं . पण त्यातही लेकाची गंमत होती आणि आपल्या वाटयाला उद्या काय येणार याची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो . "" ह्या बंदिवासांतल्या जेवणाखाण्याच्या हालाचे वर्णनही वुडहाऊस मजेत करतो आणि असे ते मजेत केल्यामुळेच वुडहाऊस त्या स्थानबध्दतेत फार मजेत राहत होता असा अपप्रचार करायची संधी त्याच्या विरोधकांना लाभली होती . हे म्हणजे उपास घडलेल्या एखाद्याने ` तुरूंगात आम्ही थंडा फराळ केला ' म्हणावे आणि विरोधकांनी त्यांना तुरूंगात कुल्फीमलई फ्रीजमधले दहीवडे वगेरे देतात असा प्रचार करावा यासारखे झाले . बंदिवासात न्याहारी म्हणून तिघांना तीन पेले सूप आणि तीन लहान पाव मिळायचे . वुडहाऊस म्हणतो , "" सूप ठीक होतं . त्याच्याशी कसंतरी जमवता येत होतं . पहिला घुटका घेतल्यावर जी चव लागली ती खरोखरीच तशी होती की काय याचा अंदाज घ्यायला दुसरा घुटका घेईपर्यंत ते संपलं . पण सुरीशिवाय पाव कसा कापायचा ? तुकडयातुकडयांनी कुरतडावा म्हटलं तर माझ्या कोठडी - बंधूंचे दात त्यांच्या पोरवयातच निकामी झालेले . बरं , त्या टेबलावर पाव आदळावा म्टलं तर तेही शक्य नव्हतं - टेबलाच्या लाकडाच्या कपच्या उडायच्या . पण संकटातून वाट निघाल्याशिवाय राहत नाही . माझ्याकडे ` पाव - तोडयाची ' ( लाकूडतोडयासारखी ) सार्वजनिक जबाबदारी आली आणि मला वाटतं , मी ते कार्य समाधानकारक रीतीनं पार पाडलं . कसं का असेना , मी तो पदार्थ विभागू शकलो . त्याची ट्रिक अशी आहे : मानेचा काटकोन करायचा आणि वरच्या दंतपंक्तीवर हे टणक कार्य सोपवून द्यायचं . "" एकदा ते तसले अमृततुल्य सूप उकळणाऱ्या स्वेपाकीबुवांची आणि वुडहाऊसची त्या बंदिवासात गाठ पडली . वुडहाऊसने डायरीत लिहिलं आहे : "" आज स्वेपाकीबुवांची गाठ पडली . सूपाबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं . स्थानबध्दांनी ` सूप कमी पडतं ' अशा तक्रारी केल्यामुळं त्यांचा व्यावसायिक अहंकार दुखावला होता .` मला काय पाणी घालून सूप वाढवता आलं नसतं ? - पण ते माझ्या कलेशी व्यभिचार केल्यासारखं झालं असतं . ' स्वेपाकीबुवा . मीम्टलं , ` बरोबर आहे . आमच्या व्यवसायातही तेच आहे . कथा म्हणजे कथा . तिला फुगवून कादंबरी करा . - स्वादच जाईल . ' "" ह्या कोठडीतून स्थानबध्दांना ` मोकळी हवा , करमणूक आणि व्यायम ' याच्यासाठी सकाळी साडेआठ वाजता बाहेर काढीत आणि चारी बाजूंना उंच भिंती आणि आकाशाच्या दिशेला थोडेफार उघडे असणाऱ्या एका कोंडवाडयात नेऊन अर्धा तास उभे करीत . "" तो कोंडवाडा
कलकत्त्याचं ब्लॅक होल पाहिलेल्या आणि त्याचं अमाप कौतुक वाटणाऱ्या आर्किटेक्टने रचलेला असावा . "" इति "" वुडहाऊस . कोठडीत भोगाव्या लागणाऱ्या प्रत्येक हालाची त्याने अशी खिल्ली उडवली आहे . जर्मनांच्या ताब्यातल्या त्या फ्रेंच तुरूंगातल्या कोठडीतल्या घाणीचे वर्णन करताना वुडहाऊस म्हणतो , "" आमच्या 44 नंबरच्या कोठडीतली घाण कशी तगडया , रूंद खांद्याच्या होतकरू जवानासारखी होती . आम्हांला त्या घाणीचा लळा लागला - अभिमान वाटायला लागला .
इतर घाणीच्या तुलनेने तिची ताकद आणि दर्जा ह्या गुणांच्या श्रेष्ठतेविषयी इतर केद्यांबरोबर आम्ही पेजा घ्यायला लागलो आणि पहिला जर्मन ऑफिसर जेव्हा आम्चाय गाभाऱ्यात शिरला आणि त्या घाणीमुळं दाणकन मागं सरकला त्या वेळी तर आम्हांला आमचा वेयक्तिक सन्मान झाल्यासारखं वाटलं . "" त्या कोंडवाडयातील ती अर्ध्या तासाची मोकळी हवा वगेरे सोडली तर त्या कोठडीत ह्या तिघांना दिवसाचे उरलेले साडेतेवीस तास घालवावे लागत . त्याही अनुभवाची वुडहाऊस विनोदानेच वासलात लावतो : "" समग्र शेक्सपिअरमुळं माझं एक ठीक होतं . पण बारचालवणाऱ्या आल्जीच्या हाताशी कॉकटेल्स करायला दारू नव्हती आणि कार्मेलजवळ ट्यूनिंग करायला पियानो नव्हते . बाकी जवळपास पियानो नसणाऱ्या ट्यूनरची अवस्था वेद्यकिय सल्लावरून शाकाहारावर ठेवलेल्या वाघासारखीच म्हणायला हवी . काही दिवस त्या स्थानबध्दतेत काढल्यानंतर एक दिवशी कमांडर आला आणि म्हणाला की , ` तुमचे कागदपत्र तपासून झाल्यावर इथून हलवलं जाणार आहे तेव्हा तयार राहा . जे साठीच्या पुढले असतील त्यांची सुटका करून त्यांना घरी पाठवण्यात येणार होतं . बिल कार्मेल आणि त्यांच्या वयाच्या इतरांनी एका बाजूला रांग धरली . माझ्या वयाला पावणे एकुणसाठ वर्षे झाल्याच्या जोरावर मीही तिकडे सरकलो . पण मला ` पीछे हटो ' केलं पावणेएकुणसाठ वगेरे चांगलं आहे , पण जितकं चांगलं असायला हवं तितकं नाही , अशी मला समज देण्यात आली . "" दुसऱ्या दिवशी 11 वाजता सूप पाजून सगळ्या स्थानबध्दांना एक व्हॅनमध्ये कोंबले आणि एका रेल्वेस्टेशनात आणले . वुडहाऊस म्हणतो : "" एकूण तिथली धांदल आणि गडबड पाहिल्यावर गाडी साडेअकराला सुटणार असाच एखाद्याने अंदाज केला असता . पण तसं काही नव्हतं . आमचा हा कमांडर गडी भलताच सावध दिसला . मला वाटतं , कधीतरी त्याची गाडी चुकली असावी . आणि त्या घटनेचा त्याच्या मनावर खोल परिणाम होऊन त्याच्यात गंड निर्माण झाला असावा .


सकाळी11 - 40 ला त्यानं आम्हांला स्टेशनात पोचवलं आणि गाडी आठ वाजता हलली . आम्हांला पोचवणारा सार्जंट परतल्यावर त्याचा आणि त्या कमांडरसाहेबाचा जो काही संवाद झाला असेल त्याची कल्पना करता येईल .

` - काय ? गाडी नीट पकडता आली ना ? ' कमांडर
` होय साहेब . आठ तास वीस मिनिटांनी - ' सार्जंट
` बापरे ! थोडक्यात मिळाली . यापुढे इतक्या कटोकटी जाऊन चालणार नाही '
सकाळी नुसते पेलाभर सूप पाजून स्टेशनात त्या स्थानबध्दांना आठ - आठ तास रखडत ठेवणाऱ्या दुष्ट कमांडरची वुडहाऊस ह्या थाटात चेष्टा करतो . लूस तुरूंगातून पुन्हा या मंडळीची उचलबांगडी झाली . वुडहाऊस ह्या थाटात चेष्टा करतो . लूस तुरूंगातून पुन्हा या मंडळीची उचलबांगडी झाली . वुडहाऊस म्हणतो : "" त्या तुरूंगाचा निरोप घेताना माझ्या डोळ्यांत अश्रूबिश्रू काही आले नाही . पण वॉर्डरने आमच्या व्हॅनचा दरवाजा बंद करून ` हौ टु ' ने सुरू होणारी अमेरिकेत बरीच रंगारी लोकप्रिय पुस्तके आहेत . ` हो टु विन फ्रेंडस , ' ` हौ टु बी ए मिलिओनर ' - अशी झटपट रंगारी बनवणारी पुस्तके . वुडहाऊसने आपल्या भाषणांना ` पूर्वशिक्षण नसूनही फावल्या वेळात स्थानबध्द कसे व्हावे ? ' असे नाव दिले आहे . लूस तुरूंगानंतरचा ह्या चव्वेचाळीस स्थानबध्दांचा आगगाडीचा प्रवास चक्कगुरे न्यायच्या डब्यातून झाला . त्या चेंगराचेंगरीचे वर्णन करताना वुडहाऊस म्हणतो : "" लहान वयात विडया वगेरे ओढायची सवय लागल्यामुळं वाढ खुंटलेल्या घोडयांच्या शिंगरांतली जेमतेम आठ शिंगरे त्या डब्यात मावतील एवढया जागेत चाळीस माणसं कोंबली तर ती अवघडणारच . आम्ही पन्नास होतो रात्री जरा पाय ताणावा म्हटलं तर दुसऱ्या उतारूला लाथ बसायची . त्यालाही असंच काही वाटलं तर आपल्याला . डब्याच्या खालच्या फळ्यांना भोकं होती . त्यांतून बर्फासारखा गार वारा आमच्या तंगडयांशी रूंजी घालायच्या . वरच्या छतावरून येणारा तसलाच वारा आमच्या डोक्याशी खेळायचा . आम्ही सर्व जण चाळिशी - पन्नाशीपलिकडले होतो , पण कुणालाही न्युमोनिया झाला नाही . गुडघे धरणं नाही , पाठ धरणं काही नाही . मला वाटतं , स्थानबध्दांची काळजी घेणारा एक स्पेशल परमेश्वर असावा . "" शेवटी ही दिंडी बेल्जममधल्या लीज गावी आली आणि नाझी सेनिकांनी ह्या लोकांना एका डोंगरी गडावर पिदवत नेले आणि तिथल्या बराकीत बंद केले . "" तिथंल वातावरण उत्सावाची तयारी होण्यापूर्वी असतं तसं होतं . पार्टीत पाहुणेमंडळी वेळेच्या आधीच पोहोचल्यावर होईल त्या थाटाचं . सगळा गोंधळ . मुख्यतः जेवणाचा . एखाद्या विसरभोळ्या कवीवर ही व्यवस्था सोपवली असावी आणि स्थानबध्दांना जेवण लागतं ही गोष्ट तो विसरला असावा . ` खरंच ! ताटवाटया वगेरे लागतात नाही का ? का हो ? थेट उकलत्या हंडयात तोंड घालून सूप मटकावता येणं त्यांना जमण्यासारखं नसेल - नाही का ? ' असंही तो म्हणाला असेल . शेवटी आम्ही डोकी लढवून तो प्रश्न सोडवला . "" डोकी लढवून प्रश्न सोडवला म्हणजे काय केले ? त्या बराकीच्या मागल्या बाजूला जुन्या
डब्यांचा , बाटल्यांचा , किटल्यांचा आणि मोटारीच्या तेलाच्या डबडयांचा बेल्जियम सोल्जरांनी टाकून दिलेला ढिगारा साठला होता , तो उपसून ह्या स्थानबध्दांनी आपल्या पेल्यांची सोय केली . वुडहाऊसच्या वाटयाला "" मोटारीच्या तेलाचं रिकामं डबडं आलं होतं . त्यामुळे माझ्या सूपला इतरांना न लाभलेली एक चव आली होती . "" त्या बरकीत प्रचंड घाण होती . स्थानबध्दांनाच ती साफ करावी लागली . तिथले संडास ही तर खास गोष्ट होती . शिवाय , रोज तीनतीन वेळा यार्डात आठशे स्थानबध्दांची ` गिनती ' करायला तासतास त्यांना उभे करायचे . पाचा - पाचांच्या रांगा धरायला लावायचे . त्या धड कधी लागायच्या नाहीत . दरवेळी निराळी बेरीज व्हायची . कॉर्पोरेलसाहेब पुन्हा मोजायला लागायचे .
"" एकूण आम्हांला पाच वेळा मोजून काढावं लागे . स्थानबध्द सॅण्डी यूल , ह्या मोजणी - परेडच्या वेळी आम्ही पाचांच्या रांगेत सातव्या आणि आठव्या नंबराला उभे होतो तेव्हा म्हणाला , ` युध्द संपल्यावर , माझ्यापाशी जर भरपूर पेसे साठले तर मी एक जर्मन सोल्जर विकत घेऊन बागेत उभा करणार आहे आणि दिवसातून सहा वेळा त्याला मोजून काढणार आहे . '
थोडक्यात म्हणजे तासन््तास ही आठशेएक स्थानबध्द मंडळी उभी आणि कॉर्पोरेल , वॉर्डर सार्जंट आपले मोजताहेत . एकदा तर चक्क आठ लोक कमी भरले . मग धावाधाव . ( जर्मन सार्जंटने तेवढयात कुणीतरी रांग सोडली म्हणून जर्मन भाषेतून शिव्या दिल्या . फ्रेंच दुभाष्याने त्या शिव्यांचे फ्रेंचमधून भाषांतर केले . ) शेवटी सगळ्यांना पुन्हा बराकीत कोंबून
कोठडी बाय कोठडी मोजले , तरीही आठ कमी . सगळे लष्करी अधिकारी चिंतेत . शेवटी फ्रेंच दुभाष्याला आठवलें . तो म्हणाला , ` साहेब , हॉस्पिटलमधल्या स्थानबध्दांचं काय ? ' अधिकारीगण हॉस्पिटलात धावला . तिथल्या आडव्या झालेल्या स्थानबध्दांची संख्या आठ भरली . ताळेबंद जमला . "" एकदा स्थानबध्द म्हटला की माणसाचा फक्त ` क्रमांक ' होतो . वुडहाऊस हा एक असामान्य साहित्यिक होता . कुणाविषयी आकस न ठेवता , कुणालाही माणसांतून उठवण्याचा प्रयत्न न करता आपल्या निर्मळ विनोदाने त्याने लक्षावधी लोकांना आनंद दिला होता . पण स्थानबध्द
झाल्यावर त्याचाही नुसता केदी नंबर सातशे शहाण्णव झाला . जर्मन अधिकाऱ्याने त्याला लीजच्या बराकीत संडास साफ करण्याचे काम दिले . रेडिओ - वरच्या भाषणात त्याने हा अनुभव सांगतानादेखील कुणाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न
केला नाही . तीच विनोदी धाटणी : "" लीजच्या बराकी साफ करायला आम्हांला फार दिवस लागले . मला कुणाचा अपमान करायचा नाही ; पण एक सांगतो - तुम्ही जोपर्यंत बेल्जियम सेनिकांनी वापरलेला संडास साफ करण्यास हातभार लावला नाही , तोपर्यंत मी म्हणेन की तुम्ही काहीच पाहिलेलं नाही . काही वर्षांनंतर मला जर कुणी येऊन विचारलं की , ` का हो ? ह्या महायुध्दात तुम्ही काय केलतं ? ' तर मी सांगेन , ` लीजच्या बराकीतले संडास साफ केले . ' आणि मला प्रश्न विचारणारा माणूस चटकन ` वाटलंच मला . ' असं म्हणणं अशक्य नाही . कारण वारा अनुकूल असला तर अजूनही माझ्या दिशेने तो परिमळ दरवळतो . कुणीसं म्टलंय ना , तुम्ही काचेची फुलदाणी कितीही फोडलीत तरी तिला चिकटलेला गुलाबाचा वास कसा जाणार ? "" मला राहून राहून नवल वाटते की , वुडहाऊसच त्या बर्लिन ब्रॉडकास्टमध्ये जर्मनांची सतत टोपी उडवतोय हे कोणाच्याच लक्षात कसे आले नाही ? आपल्या आवडत्या लेखकाला शत्रूने
असे सक्तीने संडास साफ करायला लावले हे ऐकून चीड यायला हवी होती . पण झाले भलतेच . बी . बी . सी . वरून विल्यम कॉनर नावाच्या लेखकाने तर ` हिटलरची स्तुती करण्याच्या कबुलीवर वुडहाऊसने स्वतःची मुक्तता मिळवली ' इथपर्यंत गरळ ओकले . त्याच्या त्या टीकेत वुडहाऊस काय बोलला याविषयी अक्षरही नव्हते . त्यामुळे लोकांची समजूत , वुडहाऊस ` नाझी प्रचाराची भाषणं करतो आहे ' हीच झाली . बी . बी . च्या गव्हर्निग बॉडीनेदेखील हे असत्य आहे म्हणून असल्या खोटेपणाला स्थान द्यायचे नाही असे ठरवले . पण प्रचार # खात्याच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर सक्ती करून कॉनरचा वुडहाऊसविरोधी अपप्रचार चालू ठेवला . लीजवरून वुडहाऊस आणि इतर नेहमीचे यशस्वी सातशे नव्याण्णव स्थानबध्द ह्यांची उचलबांगडी ह्यू नावाच्या एका गडावर असलेल्या कॉन्सेन्ट्रेशन कँपमध्ये झाली . जीवघेणी थंडी . अंथरूण - पांघरूण नाही . वुडहाऊस म्हणतो : "" प्रेवशद्वारातून शिरल्यावर उजव्या बाजूला एक देखणा संडास होता . "" ह्या स्थानबध्द शिबिराच्या प्रमुख संचालकांना एकच माहिती होते : "" कुठलाही स्थानबध्द काहीही करीत असला की , त्याला ते कारयाची मानई करायची . "" पावाचा तुकडा , कॉफी असावी असा संशय उत्पन्न करणारे एक पेय आणि सुकवलेल्या भाज्या उकळून केलेले सूप . ह्या उपासमारिचे वर्णनही वुडहाऊस गंमतीतच करतो : "" ह्या अपुऱ्या आहाराला पूरक अन्न म्हणून आम्ही निरनिराळे प्रयोग सुरू केले . माझी आगपेटीतल्या काडया चघळण्यावर श्रध्दा जडली . पुढल्या दातांनी चावून चावून त्याचा लगदा झाला की त्या गिळायच्या . पोट भरत नव्हतं . पण भुकेला आधार म्हणून वाईट नव्हतं . कधीमधी कँटीन उघडलं तर आम्हांला अर्धा इंच रूंद , अर्धा इंच लांब आणि पाव इंच जाड चीज मिळायचं . ते खाण्याची कृती अशी : शेक्सपिअरचं सुनीत छापलेलं किंवा टेनिसच्या एखाद्या बऱ्यापेकी कवितेचं पान घ्यावं , त्यात ते गुंडाळावं . . चवीला आगपेटीतल्या चार काडया टाकाव्या . . . पदार्थ खायला चांगला लागतो . "" ह्यूच्या किल्ल्यातल्या मुक्कामात भोगाव्या लागणाऱ्या ह्या हालांबद्दल वुडहाऊस असा थटटेने बोलत होता . तिथून मग उत्तर सायलेशियातल्या टोस्ट नावाच्या गावी नेऊन तिथे त्यांना एका इमारतीत डांबले . तिथे पूर्वी वेडयांचे इस्पितळ होते . तीन दिवस आणि तीन रात्री एका जागी बसून आगगाडीचा प्रवास . त्या अवधीत अर्धे सॉसेज , अर्धा पाव आणि थोडे सूप ही मेजवाणी . पहारा , मागे , पुढे संगिनी घेतलेले नाझी सोल्जर्स उभे . अशा अवस्थेत ह्या पठठयाने चक्क एक विनोदी कादंबरी लिहिली . इथे वुडहाऊसचा मुक्काम बेचाळीस आठवडे होता . स्थानबध्द मंडळीत रोज एखादी आशादायक अफवा उठायची . ती कधीही खरी ठरत नसे . पण वुडहाऊस मात्र ` अँन अँपल ए डे कीप्स द डॉक्टर अवे ' ह्या चालीवर म्हणतो : "" ए रूमर ए डे कीप्स द डिप्रेशन अवे . "" रोजची नवी अफवा मनाचा थकवा दूर सारायची . स्थानबध्दांत प्रोफेसर होते , गायकवादक होते , भाषांपंडित होते , व्याख्याते होते . कधीकधी एकमेकांत मिसळायचे क्षण मिळायचे . आलिया भोगासी म्हणत सारे जगत होते . त्यांचे मनोधेर्य विलक्षण होते . वुडहाऊस म्हणतो : "" इतका आनंदी जमाव यापूर्वी मला कधी भेटला नव्हता . त्यांच्यावर माझं भावासरखं प्रेम जडलं होतं . "" स्थानबध्देत अनुभवलेल्या सगळ्या हालांचे वर्णन विनोदात गुंडाळून लोकांपर्यंत पोचवणाऱ्या वुडहाऊसच्या ह्या भाषणांचा शेवट मात्र ह््द्य आहे . शेवटपर्यंत त्याची कल्पना अशी की , भाषणे अमेरिकन कंपनीने अमेरिकेतल्या श्रोत्यांसाठी ध्वनिमुद्रित केली आहेत . त्याची इंग्लंडमध्ये अशी विपरीत प्रतिक्रिया होत आहे हे त्याच्या श्वप्नातही नव्हते . बंदिवासात रेडिओ कुठून ऐकणार ? ह्या भाषणांमुळे अमेरिकतेल्या आपल्या शेकडो वाचकांना आपण जिंवत आहोत आणि स्थानबध्दतेतल्या हालांना पुरून उरलो आहोत हे कळावे ही इच्छा . म्हणून इंग्रज नागरी स्थानबध्द क्रंमाक 796 ह्या भूमिकेतून तो शेवटी म्हणतो : "" मी स्थानबध्दतेत असताना अमेरिकतेल्या ज्या दयाळू लोकांनी मलापत्रं पाठवली त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो . अशा पत्रांचं , विशेषतः मला ज्या प्रकारची पत्रं आली तशा पत्रांचं स्थानबध्दाला वाटणारं मोल , ज्याला कधी तुरूंगवास घडला नाही त्याला कळणार नाही .""


महायुध् संपले . वुडहाऊसवर झालेल्या अन्याबद्दल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वादविवाद झाला . संपूर्ण चौकशी झाली . वुडहाऊस निर्दोषी होता हे ठरले . मरणापूर्वी वर्ष - दीड वर्षे आधी ब्रिटिश राणीने त्याला ` सर पेल्हॅम ' केले . पण बूंद से गयी वह हौद से नहीं आती . त्याला एकच समाधान होते : ज्या पिढीने आयुष्यात कधी हाडामासाचा बटलर किंवा लॉर्ड पाहिला नाही , विसाव्या शतकाच्या आरंभकाळातले इंग्लंड पाहिले नाही , ती नवी पिढीसुध्दा सत्तर वर्षांपूर्वीच्या त्याच्या वाचकांसारखी लक्षावधींच्या संख्येने त्याची पुस्तके वाचून मनमुराद हसत होती . त्र्याण्णव वर्षांचा वुडहाऊस . त्याची एकोणनव्वद वर्षांची बायको एथेल . तिच्याविषयी विल्यम टाऊनएडला लिहिलेल्या पत्रात वुडहाऊस म्हणतो : "" बायका काय वंडरफुल असतात नाही ? एथेलनं हे सारं कसलीही तक्रार न करता सहन केलं . किती विलक्षण , सुरेख होतं तिचं वागणं ! गेली तीस वर्षे आपल्या प्रेमातून आणि कौतुकातून ती मला स्फूर्ती देत आली . त्याचा ह्या काळात तिनं नवा उच्चांक गाठला . ""


संध्याकाळची वेळ . बंगलीच्या ओसरीवर हे वृध्द जोडपे शरी पीत बसले होते . ` न्यूयॉर्कर ' चा लेखक हर्बर्ट वॉरन विंड पाहुणा म्हणून आला होता . वृध्द एथेल आपला नवरा टी . व्ही . वर त्याला अजिबात न कळणारा अमेरिकन फूटबॉलचा खेळ पाहत बसतो म्हणून थटटा करीत होती . आयुष्यभर अमेरिकेत राहिलेला प्लम हा मनाने इंग्रजच राहिला . क्रिकेट
हाच त्याला कळणारा खेळ आणि गोल्फ . त्यातला तर तो उस्ताद होता . पण अमेरिकन फूटबॉल ? खेळता खेळता खेळाडू एकत्र येऊन गोल कोंडाळे काय करतात , रेटा देऊन बॉल काय पळवतात , त्यात वुडहाऊसला काही कळत नसे . मग वुडहाऊसला सांगायला लागला, "" अग मला अमेरिकन फूटबॉल कळतो असं नाही . पण मजा काय ती ठाऊक आहे तुला ? ते भिडू धावपळ सुरू करतात , आणि मध्येच एकत्र जमून कोंडाळं करून क्रिडाविषयक चर्चा करतात . "" थोडा वेळ स्तब्धता होते . बंगलीपुढच्या हिरवळीकडे आणि काठावरच्या उंच वृक्षांच्या रांगेकडे दोघेही शांतपणाने पाहतात . मग वुडहाऊस म्हणतो , "" किती छान दिसतात नाही हिरवळीवर उतरलेली ही संध्याकाळची उन्हं . . . "" जीवनाच्या संध्याकाळीही त्याच्या मनात तशीच हिरवळ होती . तशीच उन्हे होती . स्थानबध्दतेतही हाल आणि त्याहूनही त्याच्या लाडक्या इंग्लंडने त्याचा कोणताही अपराध नसताना केले त्याचे ह्दयशून्य चारित्र्यहनन त्या अंतर्मनातल्या हिरवळीचा हिरवेपणा आणि प्रकाश नष्ट करू शकले नव्हते . जर्मनीने इतके हाल करूनही "" प्लम , तुला जर्मन लोकांचा तिटकारा येत नाही का ? "" ह्या प्रश्नाला उत्तर देताना प्लम म्हणाला होता , "" गडयांनो , मी असा घाऊक तिटकारा कधी करीत नाही ."" त्या दिवशी आगगाडीत मी वुडहाऊसचे पुस्तक उघडले . पहिल्या परिच्छेदातच हसू फुटले ,पण हसता हसता डोळ्यांत पाणी आले ते केवळ हसण्यामुळे आले असे नाही वाटले !

------------------------------------

4 प्रतिक्रिया:

Anonymous said...

hi deepak very good work done... khup changale watale pu la che sahitya net var pahun... khup kautuk karavese watate tujya mehanati baddal... ajun kahi asha link astil tar plz mala fwd kar na prashantcpatil123@gmail.com var ... Prashant ...

prashant phalle said...

Simply Superb...पी जी वुडहाउस वाचावाच लागनार !

Unknown said...

Many times when I read PL or PGW, I find that there are striking similarities .. all of PLs stories portray a middle-class person who is born aroud the 2nd world war .. he was also an avid poetry reader and is well known for his comic writings that the other works e.g. Ek Shunya Mee, Shantiniketan etc.

Anonymous said...

pu la aani woodhouse...doghehi "atulya aani avarananiya"...