Wednesday, November 16, 2011

चष्मेवाला - विजय तेंडुलकर

भाईंचे अष्टपैलुत्व उलगडून दाखविणारे लिहिलेले लेख पुलंच्या जन्मदिनी परचुरे प्रकाशन मंदिरतर्फे ‘तुझिया जातीचा। मिळो आम्हां कोणी।।’ या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. या पुस्तकाचे प्रकाशन ८ नोव्हेंबर रोजी कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात विजय तेंडुलकर यांनी उभे केलेले पुलंचे अनवट व्यक्तिमत्त्व..

बिर्ला मातुश्री सभागार. ओकीबोकी, रीत्या खुच्र्याच्या हारींनी रेखलेली, धूसर काळोखानं भरलेली, भयाण स्तब्धतेनं व्यापलेली केवढी तरी पोकळी. केवढी तरी लांब, केवढी तरी रुंद. जणू राक्षसाच्या घरचा पेटारा आणि स्वप्नातल्या सात दालनांपलीकडे शिळा होऊन बसलेल्या राजकन्येसारखी ती अगदी टोकाला प्रकाशाच्या एकाच झोतानं उजळलेली पांढरीफेक साध्वी बिर्ला मातुश्री- पुतळ्याच्या निश्चलपणे चष्म्यातून दिवस-रात्र टवकारून पाहणारी. रीत्या रंगमंचावरून एकटेपणी सहज पाहावी, तो उरात कसनुशी धडकी भरविणारी. पोटात खड्डा पाडणारी. काळजाचा एखादा ठोका चुकविणारी.
- आणि मंद उकाडा.. एखाद्या उन्हात वाळवलेल्या आणि मग निववलेल्या पांघरुणात लपेटून बसावं, तसा आतून चुटपुटता बेचैन करणारा, पाठीच्या पन्हळीत घामाची ओली लव मधूनच उठवणारा. पंखे बंद. एअरकण्डिशनला सुट्टी. हे आड दिवसाचं, आड वेळेचं थिएटर. लग्नाविना मांडव किंवा रंग धुऊन बसलेली वारांगना. तितकंच ओकंबोकं, भयाण, असह्य़, निस्त्राण. सारं अस्तित्व धुपून गेल्यासारखं. थकलेलं, मरगळलेलं, जडशीळ होऊन ओठंगलेलं, जीवन्मृत. उजेडाच्या आणि काळोखाच्या सीमा पार हरवून बसलेलं.

रंगमंचावर त्यामानानं बरी परिस्थिती दिसते आहे. पडदा दुभंगलेला आहे. दोन-चार प्रकाशझोत वेगवेगळ्या बाजूंनी येऊन लोळले आहेत. मागल्या बाजूला एका नृत्यनाटिकेचा ‘डेकोरेटिव्ह’ पडदा. रंगमंचावर एक ठसठशीत बाई दुसऱ्या एका फिक्या माणसाला काहीतरी समजावून सांगत आहे. त्या माणसाची दाढीच तेवढी लक्षात राहते. पलीकडे काही खुच्र्या, एक टेबल. आणि एक हाडकुळा स्काऊटमास्तर शिट्टी बोटांभोवती घुमवीत रेंगाळतो आहे. तीन बाया- यातली एक उंच- हातात कार्डबोर्डच्या ढाली घेऊन फिरताहेत, येताहेत आणि पुन्हा जाताहेत. डोक्याला पावसाळी थाबडी टोपी ‘फिट्ट’ केलेला, उंच, काटकिळा एकजण येतो आणि विचारतो, ‘‘भाई, हे ठीक आहे ना?’’

भाई नावाचा तो कुणीतरी- जाडा चष्मेवाला- ‘फर्स्ट क्लास’ म्हणतो आणि हा रंगमंच, हे थिएटर हे सर्व काही आपल्यासाठीच घडवलं असल्यासारखा इतस्तत: फिरत राहतो- आत्मविश्वासानं. सुखानं. अगदी रुची घेत घेत. कधी त्या ठसठशीत बाईच्या वाटाघाटीत भाग घेतो, तर कधी स्काऊटमास्तरशी कुजबुजतो आणि केव्हा नुसताच गुणगुणतो; स्वत:शीच, स्वत:साठीच. तेवढी क्षणमात्र-सारी नि:स्तब्धता त्या सुरावटीच्या फुलपाखरांनी अंतर्बाह्य़ मोहरून जाते. मुक्त, उत्स्फूर्त, बांधेसूद, प्रसन्न अशी सुरावट. कुणीतरी कुणाला तरी हाक मारतं. कुणीतरी प्रेक्षागृहातून कोल्हापुरी वहाणा वाजवीत जातं. कुठंतरी ठोक् ठोक् सुरू होते, आणि त्यातच कुणालातरी ढोलकीवर हलकी सम घेण्याची लहर येते..
तो जाडा चष्मेवाला आत्मविश्वास आता, एकीकडे त्या समेवर मान मुरडून नुकत्याच येऊन उभ्या राहिलेल्या कुणालातरी सांगतो, ‘‘शहाण्या माणसानं नाटक करू नये, चर्चा करावी.’’

तो उभा राहिलेला हसतो. वाटाघाटी करणारी ठसठशीत बाई उभी राहून समोरच्या ‘दाढी’ला रंगमंचावर कसल्यातरी जागा दाखवू लागते. दोन गडी रंगवलेली एक खोटी भिंत घेऊन रंगमंच ओलांडून जातात. एक चष्मेवाली कोपऱ्यातल्या बाकावर बसून काहीतरी आठवू लागते आणि पगडी घातलेला एक जाडा आपल्याच पगडीच्या शानीत येतो आणि इकडेतिकडे घुटमळत राहतो. रंगमंचावरून प्रेक्षागृहात आता एक झारदार मर्दानी लकेर सफाईनं उतरते आणि डाव्या अंगानं मागे निघून जाते. ‘‘हा लाला देसाई..’’- जाडा चष्मेवाला आत्मविश्वास.. नवख्या माणसाला सांगतो, ‘‘काय गळा आहे!’’

प्रकाशझोत विझतात. बदलतात. वाढतात. कमी होतात. चर्चा होते- ठसठशीत बाई आणि चष्मेवाला आत्मविश्वास. एक-दोघे सल्ला देतात; एक-दोघे नुसतेच पाहतात, ऐकतात. बाकडय़ावरची विसरभोळी बाई आठवून आठवून कसल्यातरी नोंदी करते आणि उंच बाई पुन्हा एकदा निमित्त सापडल्यासारखी तरातरा येऊन जाते. एक टक्कलवाला गोरा गृहस्थ टपोऱ्या शुभ्र फुलांचा मोठा बांधीव गुच्छ आतून बाहेर आणि बाहेरून पलीकडे आत नेतो. मागे एक खुर्ची खाड्दिशी आपटते. त्यानिमित्तानं लक्ष पुन्हा मागे जातं आणि भास होतो, की हे सारं- रंगमंचावर आणि खालचं मिळून- एक स्वप्ननाटक आहे किंवा भासचित्र किंवा तसलं काहीही! पण हे खरं नव्हे.

पण मग तो चष्मेवाला आत्मविश्वास एकदम पृच्छा करतो- ‘‘रेडी एव्हरीबडी? सुनीता, वुई स्टार्ट नाव् अं!’’
क्षणभर जड शांतता. मग ‘‘ओ येस्..’’ ठसठशीत बाई ऊर्फ सुनीता.
‘‘कर्टन!’’ तो ओरडतो.

पडदा दोन्ही बाजूंनी येऊन एकसंध होतो. स्वप्ननाटक तात्पुरतं भंगतं. रंगमंच झाकला जातो. अंतरंग झाकलं जातं. आणि जणू एक लांब-रुंद दगडी चेहरा समोर उरतो. काहीही न सांगणारा. त्यासाठीच तो असतो- दर्शनी पडदा. काहीही न सांगण्याकरता. अपेक्षा निर्माण करण्याकरता. उत्सुकता ताणण्याकरता.

हजारो भुंग्यांनी गजबजल्यासारखं थिएटर. माणसांनी फुललेलं, रंगांनी खुललेलं. वेगवेगळ्या सुगंधांनी दरवळलेलं. धूसर प्रकाशाची धुंदी चढलेलं. पडद्यामागच्या वाद्यमेळानं भारलेलं. आणि प्रकाश आणखी धूसर होतो. अखेर नाममात्रच त्याचे कवडसे दूरदूरवर राहतात आणि दर्शनी पडद्यामागून शब्दांच्या गोंडस लकेरी बाहेर ओसंडू लागतात..
‘‘या या या या, मंडळी, या.. या, मंडळी, या.. या, या..’’

भाऊसाहेब, काकासाहेब, दादासाहेब, अण्णासाहेब, अक्कासाहेब, बाईसाहेब.. साऱ्यांचं भरभरून स्वागत. छोटय़ा बाळूचाही विसर नाही. पुरुषी आवाजाच्या जोडीला स्त्रीचा घरगुती, रेखीव शब्द.
- आणि निघतात सनईचे सूर.. ‘वराती’चा ‘मूड’ निर्माण करणारे.

पडदा दुभंगतो. आता प्रकाशाच्या नेमक्या फेकीनं उजळून निघालेली रंगमंचाची झगमगती चौकट समोर आकारते. मागे साधा निळा ‘कव्हर’चा पडदा.

‘वाऱ्यावरची वरात’चं पालुपद आळवणारा संच आपलं काम करून विंगेत जातो आणि दुडक्या चालीनं एक स्थूल देह लोटल्यासारखा रंगमंचाच्या मध्यभागी येऊन कसाबसा थांबतो. तोच तो- चष्मेवाला आत्मविश्वास. ‘‘सुनीता, वुई स्टार्ट नाव् अं!’’ म्हणणारा. ‘कर्टन’ची सूचना देणारा. मनानं रंगमंचाची रुची घेत, सुरांच्या चोरटय़ा लकेरी उडवीत त्या दिवशी इतस्तत: वावरणारा. ‘शहाण्या माणसानं चर्चा करावी, नाटकं करू नयेत..’ त्याचे शब्द.. नाटकंच करावीत, ज्यांच्यापाशी तेवढी धमक असते ते नाटकंच करतात, चर्चा करीत नाहीत, असं बजावणारे..
त्याच्या पहिल्याच पावलाला प्रेक्षागृहात हास्य खळबळू लागतं आणि पहिल्या वाक्याला त्याचा मोठा स्फोट होतो- ‘‘आता इथून गेलं ना, ते घोडं आमचंच!’’
बराच वेळ साथ जमवून आणि नोमतोम करून गवयानं अखेर पहिल्या समेवर आदळावं, तसा सारा कार्यक्रम इथं गच्चदिशी समेवर आदळतो आणि हुशारला प्रेक्षक सावरून बसतो. रंगमंचावरून चष्म्याच्या भिंगांवाटे भुवया किंचित आक्रसून पाहणाऱ्या शोधक नजरेला हवं ते सापडतं आणि दुणावल्या आत्मविश्वासानं, घरगुती सहजतेनं आणि अंगच्या जिद्दीनं पुढली वाक्यांची फेक चालू होते. हशांच्या पावत्या घेऊ लागते. आपण निर्माण केलेल्या वल्लींना सामोरी होऊन आपल्यावरचे आपलेच विनोद रंगमंचावरची ही चतुर आणि कसबी वल्ली अंगावर घेऊ लागते. उठणाऱ्या हशांनी प्रफुल्लित होऊ लागते. मनाजोगत्या न उठणाऱ्या हशांची कारणं तिरकस नजरेनं प्रेक्षकांत शोधू लागते. वाद्य मनाजोगतं बोलावं म्हणून बजवय्याचा अट्टहास, तसा समोरच्या प्रेक्षकांबद्दल जणू या चष्मेवाल्याचा अट्टहास. समोरचा प्रेक्षक मनाजोगता ‘बोलू’ लागेपर्यंत आपल्या विनोदाच्या तारा पिळण्याची त्याची खटपट. परंतु ती करताना मुद्रेवर तोच आरंभीचा लटका बावळटपणा, शब्दांच्या फेकीत तीच मुलायम सहजता. आवाजात मार्दव, जिवणीवर चोरटं स्मित आणि चष्म्याआडच्या डोळ्यांत मात्र शोधक अस्वस्थता.

होता होता तपकिरीचा किंचित साहित्यिक एजंट अंतर्धान पावतो. एका व्याख्यान समारंभाची आठवण जागी केली जाते आणि पाठोपाठ त्या व्याख्यानाशीच आपण पोहोचतो. ‘कव्हर’चा निळा पडदा बाजूला झाला आहे. एखाद्या आडगावच्या व्याख्यान समारंभाचा मालमसाला समोर मांडला आहे. पाच-सात बाप्ये, तीन-चार बाया, मागे एका काल्पनिक संस्थेचा ‘बॅनर’ आणि टेबलामागच्या ‘महत्त्वा’च्या खुर्चीत स्वत: सर्वाचा लाडका चष्मेवाला. आता कार्यक्रम चांगलाच ‘तापला’ आहे. रंगमंचावरच्या त्या दृश्यावर- त्यातही त्या टेबलामागच्या खुर्चीवर शेकडो नजरा खिळल्या आहेत; दुसरं-तिसरं काही नाही, मुबलक हसू मागणाऱ्या. जिवण्या विलगल्या आहेत, माना उंचावल्या आहेत, हात घट्ट जुळले आहेत, श्वास जडावले आहेत. पोटात कुठंतरी हसण्याची निकड दुखते आहे आणि स्वागतपर पद्यवाल्या बावळट बायांच्या हातांतल्या कार्डबोर्डच्या ढालींवरची ‘सुस्वागतम्’ या अक्षरांची बायांप्रमाणे उलटापालट होऊन प्रत्यक्षात ‘सासुगंमत’ किंवा या प्रकारचं काही समोर दिसू लागताच प्रेक्षकांची पोटं पुन्हा फसफसू लागतात आणि हास्याचे टोलेजंग मजले उठू लागतात. चष्मेवाला मागे खुर्चीत बसून ही आपली ‘कर्तृक’ संतुष्ट नजरेनं पाहत असतो. आता प्रेक्षक त्याच्या मनासारखे ‘बोलू’ लागलेले असतात. वाक्या-वाक्याला हशा उसळत असतो. एका हशातून दुसरा हशा निघतो. हास्याचे नुसते कल्लोळ प्रेक्षागारात उठत-फुटत असतात. आणि मधून मधून यात वाक्य लोपून केवळ त्यावरचा हशाच- खरं म्हणजे स्फुंदून स्फुंदून उठत राहतो.

हा ‘व्याख्यान समारंभ’ जरा लांबतोच; परंतु प्रेक्षकाला त्याची दखल नसते, भान नसतं. दखल असते- घडय़ाळांना आणि चष्मेवाल्याला. त्याच्या मनात काटछाटीचे विचार सुरूदेखील झालेले असतात. आक्रसल्या भुवयांखालची नजर पुढय़ातल्या पाठमोऱ्या ‘समारंभा’वर यादृष्टीने फिरूदेखील लागलेली असते. त्यातल्या ‘जागा’ हेरू लागलेली असते. पुढल्या अभंग, पोवाडा आणि लावणी गायनात तो साथीदारांसह घुसतो, तो बहुधा हाच विचार मनात घोळवीत. तो गातो, लचकतो, मुरडतो आणि मग शेवटी चक्क वारकरी बनतो. मागे-पुढे उडू, नाचू लागतो. वारकऱ्यासारखा रंगतो, रंगवतो. ‘ब्रह्मानंदी’ पोहोचलेला वाटतो. ‘वरातीमागलं घोडं’ शोधीत लोटत, लडबडत रंगमंचावर आलेली त्याची ती पावलं इथे हलकीफुल होऊन ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात नुसती नृत्य करू लागलेली दिसतात. स्थूल काया पिसासारखी हलकी झालेली असते. रोमरोमांत लय भरलेली असते आणि प्रेक्षागारातदेखील ती फिरू लागलेली असते.. साक्षात् इंद्रायणीचा काठ थिएटरात क्षणभर अवतरतो.. विठूचा गजरदेखील कानी येत राहतो.. मघाचचा चटोर चष्मेवाला तो हाच की काय, असा साक्षात् प्रश्न कुणाला पडावा.. परंतु हा तोच!.. हा ‘बटाटय़ाच्या चाळी’तलाच; पण ‘चिंतन’शील चष्मेवाला, ‘तुका म्हणे’, ‘भाग्यवान’, ‘तुझे आहे तुजपाशी’मधला भावुक, अंतर्मुख चष्मेवाला.. ‘जोहार मायबाप’ चित्रपटात चोखामेळा बनून अक्षरश: भक्ती जागलेला चष्मेवाला.. हा ‘कृष्णाकाठचे कुंडल’मधला परंपरेचं ऋण साक्षात रक्तात वागवणारा चष्मेवाला.. सुरांत रंगणारा, लयीत विरघळणारा कलावंत.. आणि तरीही मघाचाच, किंचित्काल- आधीचाच चटोर, चावट, मिश्किल, वर वर बावळट, पण अगदी हिशेबी चष्मेवाला.. दोन्ही एकच.. हीच तर किमया.. यासाठीच तर विठूचा गजर!..
संपलं. गजर ‘विंगे’त निघून जातो आणि रंगमंचावर पाहता पाहता वारकऱ्याचा विनोदी लेखक होतो- चष्मा सावरत खेडवळ जीवनाच्या या रम्य काल्पनिक चित्राच्या पाश्र्वभूमीवर आजच्या खेडय़ाचं विदारक चित्र रंगमंचावर बोलावतो आणि त्यात स्वत:ची कुचंबणा आणि किंचित विटंबनाही हौसेनं करून घेतो. विदारकता हास्याच्या कल्लोळात बुडाल्यासारखी वाटते, बोध बालिश मनोरंजनात हरवतो की काय, असं होतं; पण तेच अभिप्रेत असतं. पदवीनं प्रोफेसर असला आणि व्यवसायानंही काही काळ प्रोफेसर म्हणून जगला असला तरी हा चष्मेवाला रंगमंचाचं ‘व्यासपीठ’ करू इच्छित नाही. किंबहुना व्यासपीठाचा रंगमंच करणं त्याला अधिक पसंत. सूर, लय, नाटय़, हास्य हेच त्याचं क्षेत्र. विशेषत: हास्य. ‘विठू’च्या गजराच्या लयीनं क्षणमात्र भरलेलं, भारलेलं थिएटर पाहता पाहता हास्याच्या उकळ्यांनी उतू जाऊ लागतं आणि हा अमृताहून गोड भासणारा नाद श्रुतींत भरभरून घेत चष्मेवाला पुढल्या इरसाल ‘साक्षी’च्या ‘वन मॅन शो’ची मानसिक तयारी करू लागतो. त्यासाठी ‘फुरफुरू’ लागतो. सारं काही हिशेबाबरहुकूम चाललेलं असतं; थोडं जास्तच.. अपेक्षेपेक्षा अधिक.. क्वचित अनपेक्षित जागांवर हास्याचे भुसनळे फुटतात.. अपेक्षित जागा येण्याआतच प्रेक्षागृह हास्यानं तुडुंब भरून जातं.. आणि अपेक्षित जागा मूळ अपेक्षा तोटकी ठरवतात.. उठलेला हास्यकल्लोळ एकेकदा थांबत नाही, थांबतच नाही. थांबणारदेखील नाही- कधीच थांबणार नाही- असं क्षणभर वाटतं.. थिएटर कोसळणार असं वाटतं.. वाद्यातून बोल काढणाऱ्या वादकाला वाद्य आपसूक बोलू लागलेलं दिसावं, म्हणजे त्याच्या काळजात क्षणमात्र जे लकलकेल, मनात क्षणभर जे सरकून जाईल, ते अशावेळी कदाचित या चष्मेवाल्याच्या संवेदनक्षम, कुशाग्र मनात क्षणभरच, पण- दाटत असेल का? सूत्रधाराचा, कर्त्यांचा आत्मविश्वास आणि हिशेब अशा क्षणी पुरता लोपत असेल आणि कर्तुमकर्तुम् आदिशक्तीपुढं युगानुयुगे लीन होत आलेला नगण्य, क्षुद्र, असहाय, मूढ मानव- तेवढाच कदाचित एक क्षणभर उरत असेल..

पण नस्त्या कल्पना नकोत! तो पाहा, चष्मेवाला एखादं नर्मविनोदी वाक्य टाकून हास्याची पावती वसूल करण्याकरता चष्म्याच्या भिंगांतून किलकिल्या डोळ्यांनी पाहत अडून राहतो आणि ती मिळाल्यावरच पुढं जातो आहे.. हास्याची लाट ओसरत असल्याचं जाणवताच केवळ एखाद्या हालचालीनं किंवा आविर्भावानंदेखील मुक्त, खळाळतं हास्य निर्माण करतो आहे.. प्रेक्षक ‘बोलणं’ ही त्याची या क्षणी एकमेव आवड आहे. त्याच्या मनमोकळ्या, अगदी पाशवी हास्याचा नाद ऐकणं ही त्याच्या कानांची भूक आहे. त्या हास्याच्या वादळी समुद्रात मजेनं पाय चुळबुळवीत किनाऱ्यावर बसून तृप्त होणं हा त्याचा आनंद आहे.. ही जिद्द आहे.. धुंदी आहे.. आणि हे सारं त्याला साध्य आहे.. अगदी हात जोडून सेवेला उभं आहे.. हुकमेहुकूम.. क्षणमात्र होईल ही लाट त्याच्यावर स्वार.. किंवा तसा भास होईल.. पण एरवी तोच लाटेचा स्वामी आहे. तोच याक्षणी त्या रंगमंचाचा आणि शेकडो धडाडती काळिजं सामावणाऱ्या या प्रेक्षागृहाचा स्वामी आहे.. तोच त्या प्रकाशाचा आणि अंधाराचा स्वामी आहे..

मध्यांतर. विद्युद्दीप उजळतात आणि ‘बाहेर सगळी व्यवस्था आहे.. जे लागेल ते- तितकं विकत घेऊन खा, अनमान करू नका,’ म्हणून सांगणारा तो आर्जवी, गोंडस आवाज त्याच्या धन्यामागोमाग अंतर्धान पावतो. समोर पुन्हा तो एकसंध दर्शनी पडदा.. नव्यानं अपेक्षा चाळवणारा, उत्कंठा ताणणारा.. मख्ख! कुणीतरी कुणालातरी म्हणतं, ‘‘करमणूक म्हणून ठीक आहे..’’

- आणि कुणी आणखी कुणाला बजावतं- ‘‘ग्रेट!’’
चष्मेवाला. घर- बिछायतीवर लोळलेला. चिंतनमग्न. जवळ सवयीनं पेन, कागद. टीपॉयवर सकाळची वर्तमानपत्रं. यांतल्या एक-दोनांत तरी ‘वराती’ची समीक्षणं. एखादी सनसनाटी बातमी छापावी, तशी गरमागरम. फोन सारखा वाजतो आहे. लोक तिकिटं किंवा कंत्राटं मागतात किंवा अभिनंदन करतात. हे सारंच कंत्राट सुनीता नामे ठसठशीत बाईकडे सुपूर्द. अगदी तहहयात.
पोस्टमन पत्रं आणून टाकतात. सगळी अभिनंदनाची, स्तुतीची, कौतुकाची. व्याख्यानांची निमंत्रणं, प्रस्तावनेची गळ, लेखासाठी विनंत्या, कथाकथनासाठी विचारणा, ग्रंथप्रकाशनाची मागणी, इत्यादी लफडी त्यांत बहुधा असतातच. परंतु-
‘‘आमच्या आयुष्यात तुम्ही खरेच आनंदाची हिरवळ निर्माण केलीत..’’
‘‘तुमच्या वरातीनंतर आता दोन महिने सगळे करमणुकीचे कार्यक्रम रद्द..’’
‘‘तुमचा कालचा कार्यक्रम भलताच हास्यास्पद वाटला.. इतका मी कधीच हसलो नव्हतो..’’
‘‘ही वाईची दुर्गी कोण?..’’
हे नमुने तूर्त फार..

भेटायला मित्रमंडळी येतात आणि कालच्या कार्यक्रमाच्या घोळघोळून आठवणी काढतात.. आठवणीनंही गुदगुल्या झाल्यागत हसत राहतात.. त्याआधीच्या कार्यक्रमाशी तुलना करतात..

फोटोग्राफर अल्बम घेऊन येतो. कार्यक्रमाचे फोटो. गदगदून हसणारे यशवंतराव, टाळी देणारे बाबूराव, अक्षरश: घोडय़ासारखा खिदळणारा कोणीतरी आणखी ‘राव’, डोळ्यांत पाणी जमेस्तोवर हसून दमलेल्या आयाबाया, जागच्या जागी उशा घेणारी पोरंटोरं, न हसवल्यानं डोळे मिटून हसत बसलेला संपादक, एरवी भारदस्त, गंभीर, विचारमग्न, चिंताग्रस्त, लांब दिसतील असे कित्येक हसरे, खुलले चेहरे, या साऱ्या गदारोळात न हसण्याचा तोंड दाबून प्रयत्न करणारा कोठल्यातरी बँकेचा काळा चष्मेवाला मॅनेजिंग डायरेक्टर.. आणि उरलेला सगळा आपला चष्मेवाला.. रंगमंचावर, रंगमंचामागे, कोणातरी बरोबर, एकटा, डोक्यावर फडकं गुंडाळलेला, पोटाला अ‍ॅप्रेन बांधलेला. पेटी वाजवताना, गरबा खेळताना, उडय़ा मारताना, थुंकताना, मेंदीनं हात माखलेल्या सौ.च्या तोंडाशी फोनचा घसरता रिसीव्हर धरताना, रामागडय़ाशी चार सुख-दु:खाच्या गोष्टी करताना, लावणी म्हणताना, अभंग नाचताना..

बिछायतीवरचा चष्मेवाला हे सारे फोटो किलकिल्या डोळ्यांनी आणि आक्रसल्या भुवयांनी न्याहाळतो. पाय जरा जास्त ताणतो. ‘डब्बल’ जिवणी थोडी हलवतो. मग खूश होऊन बोटांनी पोटावर ठेका धरीत एक सुरावट सिगारेटच्या धुरासारखी सोडून देतो आणि हाकारतो, ‘‘सुनीताबाई, आणखी दोन कप चहा टाका.’’
कुशीदेखील वळण्याची तसदी तो घेत नाही. तूर्त वळण्याची आवश्यकता नसते.

(पूर्वप्रसिद्धी : पु. ल. ७५)
(या ग्रंथाचे मूल्य ३०० रु. असून वाचकांना तो २५० रु. या सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिल्या आवृत्तीच्या प्रत्येक प्रतीमागे २५ रु. भाईंच्या स्मरणार्थ बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ संस्थेला देण्यात येणार आहेत.


विजय तेंडुलकर
लोकसत्ता
६-नोव्हेंबर-२०११

Friday, November 11, 2011

एक आणि एकमेव - शांता शेळके

८ नोव्हेंबरला पुलंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 'परचुरे प्रकाशन' तर्फे 'तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात विविध मान्यवरांचे पुलंविषयीचे लेख संकलित करण्यात आलेत. त्यापैकीच पुलंच्या साहित्यिक-सांस्कृतिक व्यक्तिमत्वाचे लोभस पैलू व्यक्त करणारे हे काही लेख...
- शांता ज. शेळके

पु.ल. देशपांडे यांच्या लेखनातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे आणि त्यांतून प्रकट होणा-या त्यांच्या साहित्यगुणांचे वर्णन अनेकांनी अनेक प्रकारे केले आहे. त्या वर्णनांनाही पुरुन उरेल इतकी चतुरसता, समृद्धता त्यांच्या विविध आणि विपुल वाङ्मयीन आविष्कारांत आहे. तथापि, हे सारे गुणविशेष ध्यानात घेऊनही पु.लं.चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मला जाणवते, ते म्हणजे त्यांच्या लेखनातून सतत व्यक्त होणारी मध्यमवर्गीय संस्कृती. गेल्या अनेक पिढ्या मराठी माणसाने आपली म्हणून जी संस्कृती, जीवनसरणी अनुभवली आहे, जपली आणि जोपासली आहे; तिचा इतका सर्वांगीण, संपूर्ण आणि खोलवर वेध घेणारा पुलंसारखा अन्य कोणताही लेखक गेल्या अर्धशतकात मराठी साहित्यामध्ये होऊन गेलेला दाखवता येणार नाही. एक लेखक आणि एक माणूस या नात्याने पुलंनी जी अपरंपार लोकप्रियता संपादन केली, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या साहित्यातून सतत प्रकट होत राहिलेली ही मराठी मध्यमवगीर्य संस्कृती. बहुसंख्य मराठी माणूस ही या संस्कृतीचीच निमिर्ती आहे. म्हणून तिचा सातत्याने आविष्कार करणारे पु.ल. मराठी वाचकांना इतके भावले, आवडले. नुसते आवडले इतकेच नव्हे; हा लेखक त्यांना अगदी आपला, आपल्या घरातला, आपल्याच रक्तामासाचा असा वाटला. पुलंशी त्यांचे अभिन्न, उत्कट असे नाते जडले. ही आपुलकी, ही जवळीक गेल्या अर्धशतकात अन्य कोणत्याही लेखकाच्या वाट्याला आलेली नाही.

पुलंच्या साहित्यात वारंवार येणा-या या मध्यमवर्गीय संस्कृतीमुळे ते वाचकांच्या सर्व थरांत जाऊन पोहोचले, त्यांना अतिशय लोकप्रियता लाभली ही गोष्ट खरीच आहे; पण त्यामुळेच त्यांच्या साहित्यावर वेळोवेळी काही आक्षेपही घेतले गेले. एका मुलाखतीत पुलंनी या आक्षेपाला आपल्या परीने उत्तर दिले आहे. ते म्हणतात, 'मी मध्यमवगीर्यांवरच सगळं साहित्य लिहिलं, असा आक्षेप मध्ये कुणीतरी माझ्यावर घेतला. पण मी मध्यमवर्गीयांवर लिहिलं याचं कारण मीच मुळात मध्यमवर्गीय आहे, हे आहे. उद्या कुणी म्हणालं, तुम्ही सगळं मराठीतच लिहिलं आहे. तर त्याला काय उत्तर देणार? मला मराठीत लिहिता येतं म्हणून मी मराठीत लिहिलंय एवढंच!' पुलंनी आपल्या आक्षेपकांना दिलेले हे उत्तर अर्थपूर्ण आहे. पुलंच्या लेखनावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे, ते भूतकाळात अधिक रमतात. इंग्रजीत ज्याला nostalgia म्हणतात ती स्मरणरंजनाची वृत्ती हा त्यांच्या वाङ्मयीन आणि व्यक्तिगत स्वभावाचा एक ठळक विशेष आहे. या दोन्ही आक्षेपांचा थोड्या बारकाईने विचार केला पाहिजे; आणि त्यासाठी पु.लं.चे बालपण ज्या काळात गेले तो काळ, ती परिस्थिती प्रथम ध्यानात घेतली पाहिजे.

त्या स्वातंत्र्यपूर्व काळात कुटुंब हा मराठी समाजाचा केंदबिंदू होता. बहुतेक मराठी माणसे कुटुंबाच्या आश्रयाने राहत. एकूण जीवनालाच कुटुंबसंस्थेची भरभक्कम बैठक होती. पु.लं.चे संस्कारक्षम वय, त्यांचे बालपण या काळात गेले. कुटुंबजीवनाचे, त्याप्रमाणेच मध्यमवर्गीय संस्कृतीचे खोल ठसे त्यांच्या मनावर उमटले. त्यांनी सिद्ध केलेली नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यपरंपरा ही पु.लं.ची आधारभूत प्रेरणा होती. ती त्यांच्या साहित्यातच नव्हे, तर व्यक्तिगत जीवनातही वारंवार प्रकट होत राहिली. त्या काळातील वाङ्मयीन दैवते, तेव्हाचे राजकीय पुढारी, स्वातंत्र्याकांक्षेने भारलेले तेव्हाचे वातावरण; कोणत्याही संवेदनाक्षम उमलत्या मनाला आतून हेलावून टाकील, उत्तेजित आणि प्रस्फुरित करील असे ते सारे होते. पु.ल. जेव्हा मागच्या या काळाकडे वळून बघत, तेव्हा ते भारावून जात. हे मंत्रभारलेपण त्यांना कधी सोडून गेले नाही. त्यांच्या साहित्यावर वारंवार आढळून येणारी स्मरणरंजनाची वृत्ती ही पु.लं.ना त्या काळाने दिलेली देणगी आहे.

हे सारे खरे असले, तरी पु.ल. भूतकाळाचे केवळ भाबडे, भाविक भक्त नव्हेत. मध्यमवर्गीय संस्कृतीचा गुणगौरव करणा-या पु.लं.ना तिच्यातले दोषही दिसत होते. खुपत होते. मध्यमवगीर्यांची संकुचित मनोवृत्ती, जातीय अभिमानामुळे त्यांच्या ठायी निर्माण होणारे क्षुद अहंकार, आर्थिक कनिष्ठ जीवन वाट्याला आल्यामुळे श्रीमंतांविषयीचा खोलवर रुजलेला असूयायुक्त हेवा, पूर्वजांची थोरवी सांगून आपले दैन्य झाकण्याची धडपड या दोषांची पु.लं.ना चांगली जाण होती. तिने त्यांच्या विनोदी लेखनाला विषयांचा भरपूर पुरवठा केला. मध्यमवर्गीयांचे गुणदोषमुक्त प्रत्ययवादी चित्रण प्रथम चिं. वि. जोशी यांच्या चिमणरावाने केले. तेच चित्रण पुढे पु.लं.च्या विविध प्रकारच्या लेखांनी, व्यक्तिचित्रांनी अधिक मामिर्कपणे, अधिक जाणकारीने केलेले आढळेल. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीने या मध्यमवर्गाच्या स्थैर्याला गदगदा हलवले, त्याची स्थिती अनुकंपनीय करून सोडली. या सर्व बदलांबरोबर मिळतेजुळते घेणे त्याला फार अवघड गेले. या वावटळीत सापडलेल्या आणि त्यामुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे जे चित्र पु.लं.नी 'असा मी असामी' या पुस्तकात रंगवले आहे, त्याला तोड नाही. ते चित्रण विनोदी आहे तसेच कारुण्यपूर्णही आहे. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्यांच्या वाट्याला जी ससेहोलपट आली, तिचे अतिशयोक्तीपूर्ण तरीही वास्तव वर्णन वाचताना जुना काळ अनुभवलेल्या कोणत्याही वाचकाला त्यात अंतरीची खूण पटल्याशिवाय राहणार नाही. हसता-हसता त्याचे मन गलबलून आल्याविना राहाणार नाही.

नंतर देश स्वतंत्र झाला, पण त्याबरोबर सामान्य माणसासमोर काही वेगळ्या समस्या उभ्या राहिल्या. पूर्वीच्या अनेक सुंदर मूल्यांची पडझड होताना त्याने पाहिली. पैसा या गोष्टीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आणि त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांना बाजारूपणाची कळा आली. कला, साहित्य, राजकारण सारे पैशाच्या संदर्भात मोजले आणि विकले जाऊ लागले. सिद्धीपेक्षा प्रसिद्धीला अधिक मोल आले.

साहित्य, संगीत, नाट्य या पु.लं.च्या आवडत्या कलाक्षेत्रांतही अनेक प्रकारच्या भंपकपणाचा सुळसुळाट झाला होता. नवकाव्य, नवकथा, नवसंगीत, नवनाट्य यांच्या नावावर अनेकदा खोटे, कृत्रिम, तकलुपी असे बरेच काही निर्माण होत होते आणि भाबडे रसिक त्यावर लुब्ध झाले होते. या बदलांत जे अस्सल, कसदार, समर्थ होते, ते त्या-त्या कलाक्षेत्राला वेगळे, सुंदर परिमाण देऊन गेले. पु.लं.मधल्या मर्मज्ञ रसिकाला त्याची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. पण नवतेचा केवळ आव आणणा-या अनेक ढोंगासोंगांचा फुगा फोडण्याचे कार्यही त्यांच्या भेदक विडंबनांनी तितक्याच उत्कटतेने केले. 'सहानुभाव संप्रदाय', 'शांभवी : एक घेणे', 'आठवणी, साहित्यिक आणि प्रामाणिक', 'एक सौंदर्यवाचक विधान', 'प्रा. अश्व. विश्व. शब्दे' यांसारखे पु.लं.चे अनेक लेख वाचकांना या संदर्भात आठवल्याखेरीज राहणार नाहीत. साहित्याच्या क्षेत्रात माजलेल्या प्रयोगशीलतेच्या नावावर भलभलत्या गोष्टी रूढ करू पाहणा-या कृतक साहित्यसेवकांचा सारा पोकळपणा अशा प्रकारच्या लेखांमधून पु.लं.नी उघडकीला आणला. 'सुरंगा सासवडकर'सारख्या लेखातून त्यांनी सांगीतिक नवसमीक्षेची बेहद्द थट्टा केली आहे, तर 'असा मी असामी'तला नानू सरंजामे किंवा 'बटाट्याच्या चाळी'तला नवलेखक यांच्याद्वारा नवसाहित्यातील कृत्रिम प्रवृत्तींचे अतिशयोक्तीपूर्ण पण प्रभावी चित्र त्यांनी रंगवले आहे.

पु.लं.च्या या प्रकारच्या लेखनामुळे ते केवळ जुन्याचे अभिमानी, भूतकालीन स्मरणरंजनात रमणारे आहेत; असा ग्रह होतो; पण ते काही विशिष्ट अर्थानेच खरे आहे. गेल्या पन्नास वर्षांत साहित्यात, नाट्यात, संगीतादी कलांत जे नवीन सत्य, चैतन्य आणि सार्मथ्य निर्माण झाले, त्यांचे कौतुक पु.लं.नी अत्यंत स्वागतशील वृत्तीने केले आहे. नाट्यक्षेत्रातले नवे प्रयोग त्यांनी कुतूहलाने न्याहाळले. दलित आणि ग्रामीण यांसारख्या वाङ्मयातील नवप्रवाहांची ताकद त्यांनी ओळखली. मर्ढेकर, विंदा करंदीकर, आरती प्रभू, नारायण सुर्वे यांच्या कवितांनी मराठी काव्याचे साचलेपण कसे मुक्त केले आहे, त्यात नवे खळाळ कसे आणले आहेत हे पु.लं.च्या रसिकतेला नेमके उमगले. रंगभूमीवरील प्रयोगशील नाटककाराच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवूनच ते थांबले नाहीत, तर स्वत:ही 'राजा इडिपस', 'माय फेअर लेडी' किंवा 'थ्री पेनी ऑपेरा' अशा समर्थ नाट्यकृतींना त्यांनी मराठी रंगभूमीवर मराठी भाषा-पेहरावासह आवर्जून आणले!

पु.लं.चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आवर्जून सांगायला हवे. आज साठी-सत्तरीच्या घरात असलेल्या आणि साहित्यक्षेत्रात प्रस्थापित झालेल्या अनेक थोर कलावंतांनी जुन्याकडे निक्षून पाठ फिरवली आहे की काय, अशी शंका येते. आजचे साहित्य कालच्या साहित्यातूनच विकास पावले आहे या गोष्टींचा त्यांना सोईस्करपणे विसर पडलेला दिसतो. काही साहित्यिक तर आधुनिकतेच्या हव्यासाने इतके पछाडलेले आहेत की; जुन्या कलावंतांचे, जुन्या कलाकृतींचे उल्लेखही ते कटाक्षाने टाळतात. असे केले नाही, तर आपण पारंपरिक ठरू अशी भीती त्यांना वाटत असावी असे दिसते. पु.लं.ना हे असे काही करण्याची कधीही आवश्यकता भासलेली नाही. कृतज्ञता हा पु.लं.च्या स्वभावाचा एक अत्यंत सुंदर असा विशेष आहे. नव्याचा पुरस्कार व स्वीकार करताना जुन्याचा नामनिदेर्शही करू नये इतका सावध धूर्तपणा त्यांनी कधी बाळगलेला नाही. यामुळेच मराठी साहित्यातील जुन्या आणि नव्या अशा सा-याच सुंदर आविष्कारांचे एक सलग व संपूर्ण चित्र त्यांचे लेखन वाचताना आपल्या प्रत्ययास येते.

श्री. ना. पेंडसे यांच्या नव्या कादंबरीची थोरवी जाणून घेताना हरिभाऊंचे अस्तित्व नाकारण्याची गरज त्यांना वाटत नाही. मर्ढेकरांच्या आणि आरती प्रभूंच्या कवितेतील निरूपम नावीन्य सहजपणे ओळखणारे पु.ल. रविकिरण मंडळातील यशवंत, गिरीश किंवा माधव ज्यूलियन यांच्या स्मरणात राहिलेल्या कवितापंक्ती तितक्याच प्रेमादराने दाखवतात.


पु. ल. देशपांडे हे असे अनेक वाचनांतून, स्मरणांतून, दर्शनांतून, इतकेच नव्हे; तर अगदी साध्या-साध्या लहानशा गोष्टींमधूनही मराठी मनाला सतत भावत राहिले, प्रिय होऊन बसले. अभिनय, विनोद, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, संगीत, नाट्य, वक्तृत्व अशा अनेक पैलूंमधून त्यांनी मराठी माणसाशी संवाद साधला. त्याबरोबर आपल्या असाधारण दातृत्वाने अनेकांच्या जीवनात त्यांनी सुख, सौंदर्य, प्रकाश आणला. मी जेव्हा पु.लं.चा विचार करते, तेव्हा एक फार जुनी आठवण मनात जागी होते. अनेक वर्षांपूर्वी एक इंग्रजी कादंबरी मी वाचली होती. तिचे नाव मला आठवत नाही. त्या कादंबरीत एका छोट्या मुलीचे चित्र रंगवलेले आहे. ही छोटी सकाळी अंथरुणात उठून बसते. खिडकीतून बाहेर दिसणारा सूर्यप्रकाश, उन्हात हसणारी बाग बघते. तिचे हृदय एकदम आनंदाने भरून येते आणि आपले दोन्ही हात पसरून ती आपल्या बाळबोलीतून एकदम आवेगाने उद्गारते, I love all the world!

पु.ल. हा मला त्या छोट्या मुलीचाच एक प्रौढ पण हृदयात सतत लोभस बालभाव बाळगणारा सुंदर आविष्कार वाटतो.

६ नोव्हेंबर २०११
महाराष्ट्र टाईम्स

Wednesday, November 9, 2011

‘पुलं’च्या प्रस्तावना - विवेक आचार्य

पुलंचे साहित्य म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण. त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे विविध प्रकार हाताळले. त्यात त्यांच्या प्रस्तावना म्हणजे एक आगळेवेगळे साहित्य दालनच. त्यावर एक झोत.

सुदैवाने मराठी साहित्यामध्ये प्रस्तावनेला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. अनेक मान्यवरांनी विविध विषयांवरील पुस्तकांना प्रस्तावना लिहून साहित्याचे हे वैशिष्ट्यपूर्ण दालन समृद्ध केले आहे. आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे ही दोन अष्टपैलू व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्रात झाली. दोघांनी आपली स्वत:ची साहित्यनिर्मिती केलीच. शिवाय अत्यंत रसिकपणे दुसर्‍या लेखकांच्या वाङ्मयीन कलाकृतींचे कौतुक केले. मराठी भाषेतील अनेक पुस्तकांना या दोघा रसिकराजांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत. मराठी भाषेच्या अभ्यासकाला या प्रस्तावनांचे परिशीलन केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.

पु. ल. स्वत: रसिक वाचक होते, मराठी भाषेतील अनेक साहित्यकृती पुलंच्या रसाळ प्रस्तावनेने सजलेल्या आहेत. पुल विनोदाने म्हणत की, पुढेमागे माझी ओळख लेखक म्हणून करून न देता सुप्रसिद्ध प्रस्तावना लेखक म्हणून केली जाईल इतक्या प्रस्तावना मी लिहिल्या आहेत.कुठल्याही साहित्यकृतीमध्ये प्रस्तावनाकाराचे नेमके कार्य काय हे समजावण्यासाठी पुल मोठे चपखल उदाहरण देतात. ते म्हणतात, लग्नमंडपातील मुलीचा मामा ज्याप्रमाणे मुलीला बोहल्यावर नेतो व नंतर तो दुरूनच तिचा संसार बघतो त्याचप्रमाणे प्रस्तावना लिहून झाल्यानंतर प्रस्तावना लेखक अलिप्तपणे पुस्तकाचे यशापयश अनुभवतो.

पुलंनी स्वत:च्या अपूर्वाई, गणगोत इ. पुस्तकांना छोटेखानी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. अपूर्वाईला पुलंनी मोठी खुमासदार प्रस्तावना जोडलेली आहे. मुकुंदराव किर्लोस्करांच्या पत्राला मान देऊन त्यांनी किर्लोस्करमध्ये आपल्या युरोपवारीचे वर्णन केले व अपूर्वाई जन्मली. पुलंनी त्यांच्या त्या ‘अनामिक’ मित्राचे ऐकून प्रवासवर्णन लिहिले नसते तर प्रवासवर्णनाच्या एका नवीन बाजापासून मराठी साहित्य वंचित झाले असते. स्वत: पुलंनीही प्रवासवर्णन व आत्मचरित्र न लिहिण्याचा संकल्प केला होता. अपूर्वाईच्या निमित्ताने त्यांनी एक संकल्प मोडला; परंतु आत्मचरित्र न लिहिण्याचा संकल्प भाई मोडू शकले नाहीत. मराठी सारस्वत एका रसिकराजाच्या आत्मवृत्ताला मुकले हेच खरे.

‘गणगोत’ या गाजलेल्या पुस्तकात आपल्या सुहृदांची अत्यंत भावपूर्ण ललित चित्रे पुलंनी रेखाटली आहेत. ही चित्रे साकारताना आपली मन:स्थिती कशी होती, आपली भूमिका काय होती याचे मार्मिक विश्‍लेषण त्यांनी प्रस्तावनेत केले आहे. ‘‘या पुस्तकातून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे दर्शन मला घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो त्यांचा आणि माझा जो सहवास घडला त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादवेळी.’’ पुस्तकातील व्यक्तिरेखांप्रमाणे पुलंचे हे प्रास्ताविकही हृदयंगम आहे.

शेक्सपिअरच्या साहित्याबद्दल ‘रंगविश्‍वातील रसयात्रा’ या प्रा. के. रं. शिरवाडकरांच्या पुस्तकाला पुलंची रसिली प्रस्तावना लाभलेली आहे. हिंदुस्थानवरील ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या फायद्यातोट्यांविषयी नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. पुल म्हणतात, ‘‘इंग्रजांना शंभर खून माफ करावेत अशी एकच गोष्ट त्यांनी आणली ती म्हणजे शेक्सपिअरची नाटके. इंग्रजी साम्राज्यावर न मावळणारा सूर्य शेवटी मावळलाच; परंतु शेक्सपिअरचे साहित्यसाम्राज्य अबाधित आहे. लेखक शेक्सपिअर, कलाकार शेक्सपिअरचे वर्णन करताना पुलंची लेखणी बहरली आहे.’’

‘विश्रब्ध शारदा’ हा मराठी पुस्तक प्रकाशनातला एक अभिनव प्रयोग होता. प्रसिद्ध व्यक्तींच्या अप्रकाशित पत्रांचा हा त्रिखंडात्मक संग्रह. शारदाच्या दुसर्‍या खंडात नाट्य आणि संगीत कलांशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह आहे. अर्थातच या संग्रहाला पुलंची रसिली प्रस्तावना आहे. रंगभूमी आणि संगीत कलेच्या क्षेत्रातील चढउतार टिपत असतानाच पुलंनी या क्षेत्रांच्या आर्थिक स्थितीचाही मार्मिक ऊहापोह केलेला आहे.

पुलंनी असंख्य प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तावनांचा विचार आपण केला (अधिक प्रस्तावनांसाठी जिज्ञासूंनी ‘दाद’ हे पुस्तक वाचावे). पु. ल. देशपांडेंच्या या प्रस्तावनांतून त्यांचे कलासक्त मन सतत प्रतीत होत राहाते. ओघवती, प्रवाही भाषा, एखाद्या हृदयस्पर्शी वाक्यावर सम गाठण्याचे त्यांचे हुकमी कसब, नर्म विनोदाचा शिडकावा करत असतानाच एखादा मौलिक विचार सांगण्याची लकब, मानवी स्वभावाचे सूक्ष्म अवलोकन, त्यांची बहुश्रुतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसर्‍या लेखकांचे, कलावंतांचे मनमोकळेपणाने कौतुक करणारी त्यांची सहृदयता या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या प्रस्तावनांत पडले आहे. पुलंच्या प्रस्तावना वैचारिक धनाने समृद्ध आहेत. पुलंच्या प्रस्तावना हे मराठी सारस्वताचे एक कोरीव लेणेच आहे!

विवेक आचार्य
सामना
१२ जून २०११

Monday, November 7, 2011

भाई....महाराष्ट्राचे!

१२ जून २०००....लंडनवरून पप्पांचा फोन होता.

"लाल्या, पुलं गेले?"

"हो", मी म्हणालो.

"अरेरे... अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही", पप्पा जड आवाजात म्हणाले.

"हो", मी.

"एक काम कर. आजचे सगळे मराठी पेपर घेऊन ठेव...मला भारतात आल्यावर सगळेच्या सगळे पाहिजेत."

पप्पांच्या सांगण्यानुसार मी बायकोला तिच्या ऑफिसात फोन केला. तिला येताना रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवरुन सगळे मराठी पेपर विकत घ्यायला सांगीतले. मुळची गुजराती असणार्‍या माझ्या बायकोला पुलं जास्त ठाऊक नसल्यामुळे ती जास्त काही बोलली नाही. संध्याकाळी अंधेरी स्टेशनला ती बुकस्टॉलला गेली.

"सगळे मराठी पेपर द्या", तिने तिथल्या माणसाला सांगितले.

डोळ्यांत पाणी आणून तो म्हणाला, "ताई, आपले पुलं गेले हो!"

हा वरचा प्रसंग माझी कल्पनाशक्ती नसून अगदी जे घडलं तेच आहे. माझ्या बायकोने कधीच कुणा पेपर विक्रेत्याला अश्या प्रकारे एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या निधनावर व्यथीत झालेले बघीतले नव्हते. घरी आल्यावर तिने मला झाला प्रकार सांगितला. तिला प्रश्न पडला होता कि एखादी व्यक्ती रस्त्यावरच्या सामान्य माणसाला इतकं प्रभावीत कशी करु शकेल? अंधेरी स्टेशनच्या पेपरबॉय पासून ते थेट लंडन मधल्या तीच्या सासर्‍यांना त्याच भावनेत गुंतवणार्‍या या माणसाबद्दल - पु.ल.देशपांडेंबद्दल तिला उत्सुकता लागली होती. त्या रात्री मी तीला पुलंची ओळख करून दिली....त्यांच्या पुस्तकातून!

त्या रात्री पुलं आम्हाला पुन्हा भेटले... नाथा कामत बनून, नंदा प्रधान बनून, नारायण बनून, सखाराम गटणे बनून, चितळे मास्तर बनून...आणि विशेष म्हणजे, त्यांच्या निधनाने डोळे ओले होते, तरीही त्यांचे शब्द ओठांवर हसू आणत होते....

कधी कधी वाटतं, महाराष्ट्राला पु.लं यांनी बहाल केलेली सर्वात मोठी देणगी कोणती? साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट...सगळं काही त्यांना सिद्ध झालं होतं! पण खरं सांगू? पुलंनी आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे संस्कार! पुलंनी महाराष्ट्राला संस्कार दिले! एक प्रगल्भ विचारधारा दिली. शास्त्रीय संगीतात त्यांचा एवढा हातखंडा असून देखील, त्यांनी सामान्य माणसाला अवलोकन होईल अश्या प्रकारे संगीतावर प्रेम करायला शिकवलं.

"रविवारची सकाळ" बघताना, कामत मामा, कडवेकर आणि देसाई मास्तरांच्या मजेशीर शैलीत संगीताची एक अविस्मरणीय अशी मैफल दिली. अगदी सहजपणे! साठीच्या चाळीत श्रमजीवी मध्यमवर्गीय लोकांच्या गप्पा ऐकवत "उगीच का कांता"च्या एक-एक सुंदर जागा दाखवल्या! हसता हसता अचानक एखादी हरकत काळीज छेडून जाते....एखाद्या तानेवर "वा वा" म्हणता म्हणताच पोटात गुदगुल्या करत एखादा संवाद हास्य घेउन येतो!

"असा मी..." मधल्या जोश्यांच्या बेंबट्या बनून चाळीतून "ब्लॉक" मध्ये येणार्‍या सामान्य माणसाची कसरत बघून खरंच कुठेतरी आमच्या पिढीला आपलेच वडिल आठवतात हे खरं! मुंबईसारख्या शहरात १९६० च्या दशकात चाळीत राहणार्‍या प्रत्येक सामान्य मराठी माणसाची ती कथा होती. आजकालच्या मॉल संस्कृतीत वाढणार्‍या पिढीला बहुदा ही भावना कळणार नाही....पण तरीही पुलंचं साहित्य हे ह्याही पिढीला हसणं शिकवेल यात कसलीही शंका नाही.
पुलं आयुष्य भरभरून जगले...आणि त्यांनी सर्वांना भरभरून दिले...आपल्या संगीतातून, लिखाणातून, नाट्यातून.... अख्ख्या जगण्यातूनच! १२ जून २००० साली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली...पण त्यांचं "जगणं" अजून चालूच आहे....पु.लं एक चैतन्य होते....आहेत!

मी आधी म्हणालो तसं....पु.लं नावाचं हे चैतन्य, हा जगण्याचा झरा.... हा अव्याहत चालूच राहणार... नाथा कामत मधून, नंदा प्रधान मधून, चितळे मास्तरांमधून, सखाराम गटणे मधून, नारायण मधून, नामू परीट मधून, पानवाल्यामधून....ही एक कधीही न संपणारी अशी वरात आहे....जमीनीवरची...महाराष्ट्राच्या!

पु.लं....आपले भाई... हे नेहमी आपल्यामध्येच राहणार....संस्कार बनून!

- माधव आजगांवकर
facebook.com/madhav.ajgaonkar