Wednesday, June 12, 2013

पु. ल. एक आठवण, किती सारी साठवण! - आरती नाफडे

बारा जून. पु.लं.चा स्मृतिदिन. ज्या व्यक्तिरेखा काळाच्या पडद्याआड कधीच जाऊ शकत नाहीत त्या अमर आहेत. पु.लं.च्या स्मृती त्यांच्या बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्त्वाने अमर आहेत. त्यांच्या स्मृतींचे अनेक पदर उलगडताना मुलांच्या पाठ्यपुस्तकातील एक धडा स्मरणात राहिला. धड्याचे नाव होते ‘बिनकाट्याचा गुलाब.’ लेखक गंगाधर पानतावणे. दोन महान युगपुरुष पु. ल. देशपांडे व बाबा आमटे यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाणारे अनेक धागेदोरे यांची सुंदर वीण म्हणजे ‘बिनकाट्याचा गुलाब.’ गंगाधर पानतावणे यांच्या पाठाच्या आधारे आठवण लिहिण्याचा प्रयत्न.
पु. ल. देशपांडे हे नुकतेच बंगालचा प्रवास करून आले होते. शिशिर ऋतूच्या एका रम्य सायंकाळी लेखक गंगाधर पानतावणे, सुनीताताई व पु. ल. पुण्याच्या घरी ‘रूपाली’त बैठकीत गप्पा मारीत बसले होते. गप्पांमध्ये रवींद्रनाथांचा विषय ताजा होता. त्या गप्पांत रवींद्रनाथांचे संगीत, त्यांचे नाटक व शिक्षणदृष्टी तसेच बंगाली भाषेचे वैभव असे विषय रंगत चालले होते.

तेवढ्यात गंगाधर पानतवणे यांचे लक्ष बैठकीतील कुंडीकडे गेले. या कुंडीत बिनकाट्याचा गुलाब होता. त्याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता होती. बिनकाट्याच्या गुलाबाची जन्मकथा सांगताना पु. ल. लेखकांना सांगतात-

एकदा सुनीताताई व पु. ल. आनंदवनात मुक्कामाला असताना बाबा आमट्यांबरोबर आनंदवनाचा फेरफटका मारताना अंध मुलांना भेटायला त्यांच्या कक्षात गेले. बाबा आमट्यांच्या आनंदवनातील आंधळ्या मुलांनी गुलाबाची वर्णनं ऐकली होती. पण, गुलाब कसा होता हे त्यांना माहीत नव्हते. एका आंधळ्या मुलाने गुलाबाच्या झाडाला स्पर्श केला, तेव्हा गुलाबाचे काटे बोचून त्याच्या हातातून रक्त आले. ते बघून बाबांचे मन द्रवले व त्यांनी मुलांसाठी बिनकाट्याचा गुलाब शोधायचे ठरवले. ही गोष्ट जेव्हा पु. लं.ना कळली तेव्हा त्यांचे पण मन मुलांसाठी करुणेने भरून गेले व आनंदवनातील आंधळ्या मुलांसाठी बिनकाट्याचा गुलाब घ्यायचा म्हणून त्यांनी खूप शोध घेतला. शेवटी तो त्यांना कलकत्त्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये मिळाला. बिनकाट्याच्या गुलाबाची जन्मकथा पु.लं.नी लेखकाला सांगितली. बैठकीतील बिनकाट्याच्या गुलाबाची कुंडी अशी उकल करून लेखकांना कळली.

जीवनावर व जगावर जीव तोडून प्रेम करणारे पु. ल. मुलांना गुलाबाचे काटे बोचू नयेत व प्रेमाने गुलाबाच्या झाडाला गोंजारता यावे, त्या झाडाशी मुलांना मैत्री करता यावी, गुलाबाचे सौंदर्य व कोमलता हाताच्या स्पर्शाने कळावी म्हणून पु.लं.नी बिनकाट्याचा गुलाब शोधला व मुलांसाठी ती कुंडी ते आनंदवनात पाठवणार होते. बिनकाट्याच्या गुलाबाच्या संशोधनापासून तर कुंडी बैठकीत स्थानापन्न होईपर्यंतचा इतिहास सांगताना पु.लं.ची मुद्रा तृप्त व फुललेली होती.

दोन महान व्यक्तिमत्त्वांचा हा मिलाप किती सुखावह. बाबा आमटे यांचा जगावेगळा सेवेचा ध्यास, जीवनाला नवा आयाम, आशय देण्याचा बाबांनी वसा घेतला होता.

तर पु. ल. एक खळखळतं व्यक्तिमत्त्व. सदैव जीवनाच्या प्रेमात अडकलेले, समाजमन नात्यानं बांधण्याचा ध्यास घेतलेले. बाबांच्या सेवेच्या वृक्षाला प्रेमाचा ओलावा देणारे पु. ल. म्हणतात, दुसर्‍याचं अस्तित्व मान्य करणं यात संस्कृतीची सुरुवात आहे. आंधळ्या मुलांना गुलाबावर डोळस प्रेम करता यावं हे बाबांंचं स्वप्न होतं. यासाठी प्रथम त्या मुलाचं अस्तित्व मान्य करून वेदनेशी असणारे माणुसकीचे नाते पु. लं.नी मुलांसाठी जपले.
पु.लं.नी माणसांवर प्रेम व माया केली. लोकांच्या मनाचा वेध घेणं व त्यांच्या मनात आतपर्यंत डोकावणं ही पु.लं.ची शक्ती आहे म्हणूनच मानवी जीवनातली दु:खं बघून व्यथित होणारे बाबा आमटे व काट्याच्या वेदना सहन करणारा मुलगा यांच्या अंतरंगांचा वेध पु.लं.ना सहज घेता आला. काट्याने मुलाला दिलेली वेदना जीवनावर असीम प्रेम करणार्‍यांनाच घायाळ करू शकते. त्यांच्यातील या समान दुव्यामुळे मैत्री फुलत गेली. सुनीताताई व पु. ल. आनंदवनात येऊन राहात व तेथील कार्याचे जवळून अवलोकन करीत. आनंदवनातील कुष्ठरोग्यांची सेवा पाहून ते भारावत. चांगल्या कार्यासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे, हे त्यांच्या जीवनाचं ब्रिद होतं. गुणग्राहकता हा त्यांचा मूळ पिंड. जिथं उज्ज्वल भविष्याच्या पायवाटा पोहोचतात त्या वाटेचा मागोवा घेत पु.ल. आनंदवनात नेहमीच येत असत व तेथील सुखदु:खात सामील होत.

बिनकाट्याच्या गुलाबाची गोष्ट लहान पण आशय महान. गोष्ट वाचूनही बारा वर्षे होऊन गेली, पण ती आता पुन्हा स्मरली. यालाच परीसस्पर्श म्हणतात. ती गोष्ट पुन्हा उजळून निघते. पु.लं.च्या सर्व साहित्यांच्या बाबतीत हेच सूत्र लागू पडते. जे वारंवार आठवते ते स्मरण व जे स्मृतीला चालना देते तो स्मृतिदिन. पु.लं.ना विनम्र अभिवादन व आदरांजली.

- आरती नाफडे
नागपुर
तरुण भारत, १२ जुन २०१३

अमरत्व काय फक्त देवालाच आहे काय?

लहानपणी सुट्टीत सायकल शिकणे आणि
वाचनालय लावणे ह्या  दोन गोष्टी
घरोघरी अनिर्वाय होत्या.
 
नुकतेच आम्ही गुलबकावली  आणि ठकसेन ह्यांच्या
राज्यातून  टोम सायर आणि रॉबिन्सन क्रुसो
ह्यांचे वाचन संपवले होते…
आता हा थोडा मोठा झाला असे समजून
आईने “असा मी असामी ” हे पुस्तक वाचायला दिले…
 
तिथून ह्या माणसाने जे “गारुड” घातले
ते अजून सुटलेले नाही…
 
“असा मी ..” नंतर “चाळीत” गेलो..
तिथून “व्यक्ती आणि वल्लींना” घेवून
“खोगीर भरती” केली…
तर “गण-गोतांनी” आमची “खिल्ली” उडवली…
 
सहज म्हणून “पूर्वरंग” घेतले ते “जावे त्यांच्या देशात” असे म्हणून “पश्चिम रंग” करून आलो….
“तुझे आहे तुजपाशी” असे म्हणत असतांनाच “सुंदर मी होणार” कधी ओठावर आले ते समजलेच नाही..
 
“पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे” ह्या लेखकाने उत्तमोत्तम साहित्य देतांना विनोदाची लक्ष्मण-रेषा कधीही ओलांडली नाही.
विनोद करीत असतांना ते थोडे-फार चावट विनोद करत असत पण ते कधीही अश्लील पणाकडे झुकले नाहीत…
आपली पुस्तके एका कुटुंबात वाचली जाणार आहेत आणि ती दिवाणखान्यात ठेवली जाणार आहेत ह्याची त्यांना पूर्ण जाणीव असावी..
त्यांचे लेख कधी कधी विचार करायला भाग पाडत होते पण कधीही दुखी: करत न्हवते.
 
मध्येच कधीतरी दिवाळीत “वाऱ्यावरची वरात” हे नाटक दाखवले…
आणि हा माणूस कलाकार पण होता हे समजले…
कथाकथन म्हणजे नक्की काय आणि ते कसे करायचे ह्याचे ज्ञान फार कमी लोकांना असते..पु.ल., व.पु, द.मा आणि शं.ना. हे त्यापैकीच..
पण मुकुटमणी म्हणजे पु.ल.
 
“चाळ” असो की “असामी” केवळ एकट्याच्या जीवावर हा कार्यक्रम खेचणे हे खायचे काम नाही…
स्वत: एक उत्तम कवी असल्याने ”कविता वाचनाचा” कार्यक्रम  पण ते उत्तम करीत असत…
 
आज कदाचित आमची ही शेवटचे पिढी की जी मराठीची गोडी अनुभवते असे वाटत असतांनाच परवा माझा मुलगा एक पुस्तक वाचत असतांना जोरात हसायला लागला…
सहज म्हणून पुस्तक बघितले तर…”असामी असा मी”….
जो पर्यंत ह्या जगात हे पुस्तक आहे तो पर्यंत मराठीला मरण नाही…
 
अमरत्व काय फक्त देवालाच आहे काय?
 
 
मुळ स्त्रोत - http://full2dhamaal.wordpress.com/ 

Tuesday, June 11, 2013

एका लेखकाने.. - उत्पल वी.बी.

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. इअरप्लग लावून फोनवर गाणी ऐकत होतो. ब्राउझ करताना एकदम पुलंचा 'पानवाला' दिसला. फोनमध्ये पुलंच्या काही फाईल्स आहेत. म्हैस, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्लीतील व्यक्तिचित्रे, मी आणि माझा शत्रूपक्ष आणि इतरही काही. एके काळी हजारो वेळा ऐकलेल्या. अचानक वाटलं, पानवाला ऐकू. फाईल प्ले केली. खूप दिवसांनी, खरं तर अनेक वर्षांनी पुलंना पुन्हा ऐकलं. काही ओळींनंतर मी हसतो आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग आपण हसतो आहोत याचं मला बरं वाटू लागलं.

साहित्य असं घनगंभीर नाव असलेल्या प्रकाराचं महत्त्व काय? त्याचं श्रेष्ठत्व कसं ओळखायचं? चांगलं साहित्य हे आपल्याला जीवनदर्शन घडवणारं असतं, तो त्याच्या श्रेष्ठतेचा एक निकष आहे असं म्हटलं जातं. उत्तम लेखन आपली खोलवर चौकशी करतं. (शब्दप्रयोगाची प्रेरणा पु.ल.देशपांडे. मुगदळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे.…'माझे खाद्यजीवन', हसवणूक.) चांगलं लेखन प्रामाणिक असतं. अभिनिवेशरहित असतं. अंतर्मुख करणारं असतं. मग आपण हसतो तेव्हा काय होत असतं? आपण कशामुळे हसतो? तिथेही काही दर्शन घडत असतं का? की आपण अंतर्मुख होतो तेव्हाच फक्त दर्शन घडत असतं?

पु.ल.देशपांडे हे माझ्यासाठी एक प्रकरण होतं. 'होतं' असं चटकन लिहिलं गेलं कारण आज आता गाडीने ते स्टेशन सोडलं आहे. त्याचा मला त्रास वगैरे होत नाही. कारण वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमचं विचारविश्व वेगवेगळे आकार घेत असतं. किंबहुना तसे आकार घेतले जाणं आणि त्यानुरूप तुमच्या वाचनात बदल होणं ही एक आश्वासक गोष्ट आहे. वाचन आपल्या आवडत्या टूथपेस्टसारखं नसावंच. अनेक वर्षं एकच ब्रँड! पण पुलंच्या बाबतीत मुक्काम लांबला हे मान्य करावं लागेल. पुलप्रभाव अनेक वर्षं टिकून होता. पुलं ज्यांना पाठ असतात अशा काहींपैकी मी एक. आणि पुलंनी दर्जेदार विनोदाचा आणि सभ्यतेचा जो संस्कार केला तो माझ्यावरही झाला. पुलंच्या प्रतिभेचं आणि हेवा वाटावा अशा निरीक्षणशक्तीचं, सकस विनोदाचं गारूड नंतर मग नेमाडे, रंगनाथ पठारे, श्याम मनोहर, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, नारायण सुर्वे, अरुण काळे अशा अनेक मंडळींचा परिचय झाल्यावर विरत गेलं हे खरं आहे. पण पुलंनी जे चैतन्य दिलं ते विलक्षण होतं. मी 'कोसला' प्रथम वाचली ती पुलंचा कोसलावरचा लेख वाचून! पुढे मग 'कोसला' ने जे झपाटलं ते झपाटलंच. ते भूत अजूनही मानगुटीवरून उतरायला तयार नाही. पण त्याचबरोबर उपमेला, दाखले देताना पुलंची पात्रं वा त्यांनी लिहिलेलं काही हमखास धावून येतं आणि ती भुते अजून अदृश्य रूपात मानगुटीवर वावरत आहेत याची खात्री पटते.

पुलंना जाऊन तेरा वर्षं झाली. मी तेव्हा तेवीस वर्षांचा होतो. पुलं सगळीकडे हजेरी लावून होते. कट्ट्यावरच्या गप्पात, घरातल्या गप्पात, लिहिण्यावर प्रभाव टाकण्यात - सगळीकडे. व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक, बटाट्याची चाळ, खिल्ली, एक शून्य मी हे माझ्या मते पुलंचे मास्टरपीसेस! पांडुरंग सांगवीकरने आम्हांला हात धरून फर्ग्युसनमध्ये आणि पुण्यातल्या रस्त्यांवरून फिरायला नेईपर्यंत आणि त्याची थोर बडबड ऐकवेपर्यंत आम्ही पुलं दाखवतील ते वाचत होतो. त्यांनी 'हे वाचा' म्हटलं की वाचत होतो. त्यांचा अचाट आणि निर्विष विनोद मेमरीमध्ये सतत स्टोअर होत होता. मला वाटतं की ऐंशी-नव्वदच्या दशकातली माझ्यासारखी मुलं ही बहुधा 'भाबड्या मध्यमवर्गीय पिढी'तील शेवटची मुलं. गूगल, फेसबुक आणि स्मार्टफोनच्या जगात आज मीही सहज वावरत असलो तरी 'चितळे मास्तरांच्या चपला' म्हटलं की मी गहिवरतो. तसा गहिवर आजच्या अठरा-वीस वर्षाच्या मुलाला येतो की नाही मला माहीत नाही. ते तपासावं लागेल. पुलं हे आमच्या या भाबड्या पिढीचे प्रमुख. (विलास सारंग म्हणतात, 'महात्मा फुले, वि.रा.शिंदे, डॉ. आंबेडकर यांच्या लेखनाने मराठी लेखक-वाचकांना जाणीव करून दिली की मराठी सांस्कृतिक विश्व एकसंध नाही. तरीही या घरगुती खेळकरपणाच्या शैलीला धुरीणवर्ग अगदी गळ्याशी येईपर्यंत चिकटून राहिला. हे १९६०-७० सालापर्यंत दिसून येतं. पु.ल.देशपांडे हे धुरीणवर्गाच्या या आवडत्या लेखनशैलीचे व विचारशैलीचे अखेरचे निरूपणकार.… त्यांच्या लेखनात फार वाचनीयता आहे. हे काचेच्या घरातलं चित्र आहे असं आपल्या मनाला सतत जाणवत राहिलं तरी वाचण्याच्या आनंदाला आपण स्वखुशीने मान्यता देतो.' - वाङ्ग्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव, पृ. ४९) त्यांची सृजनशक्ती अफाट होती. आणि तिला सामाजिक जाणिवेचं, मूल्यभावाचं दणकट अस्तर होतं. कृतज्ञ असणे, भारावून जाणे, कौतुक करणे, 'चांगलं तेच' बघणे, कलेच्या बाबतीत काही घट्ट निकष असणे, माणसं दुखावली की आपण वाईट वाटून घेत अस्वस्थ राहणे या गुणांना आज वेगवेगळी परिमाणे येऊन चिकटली आहेत. जागतिकीकरणानंतर, आर्थिक-सामाजिक आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे  मानवी स्वभाव, नाती आणि महत्त्वाचं म्हणजे मानवी मूल्ये हे सगळंच 'सततच्या संक्रमणा'त असल्यासारखं दिसतं आहे. माणूस कधी नव्हे इतका 'बोलता' (आणि कमी 'ऐकता') झाला आहे. भाबडेपणा हा दुर्गुण वाटावा अशीही परिस्थिती अधेमधे निर्माण होताना दिसते. तेव्हा एकूण गलबल्यात आज पुलंची पात्रे आणि त्यांचं तत्वज्ञान कसं,किती टिकतं ही उत्सुकता आहे. स्वतः पुलं मात्र त्याबाबतीत उदासीन होते. त्यांनी म्हटलंय, 'माझं लिहिणं म्हणजे नदीच्या वाहत्या पाण्यात कागदी होड्या सोडण्यासारखं आहे. त्यातल्या ज्या टिकतील त्या टिकतील, बुडतील त्या बुडतील.' साहित्याबाबत सतत आदळआपट करणारे समीक्षक, लेखक आणि साहित्याकडे तटस्थपणे बघण्याची क्षमता असलेले साहित्यिक पुलं हा फरक बघताना मौज वाटते.

एक मात्र अगदी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. भाबड्या पिढीवरील पुलप्रभावामुळे लघुनियतकालिकांची चळवळ, साहित्यातील इतर प्रवाह काहीसे दुर्लक्षित राहिले. नेमाडेंनी तर 'आपल्याकडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे भयंकर प्रकरण आहे ना….'असा उल्लेख कुठेतरी केल्याचं स्मरतं. त्याचा राग यायचं खरंच काही कारण नाही. पुलंची मोहिनी इतकी जबरदस्त होती की अनेक चांगले लेखक मराठी वाचकांच्या नजरेतून सुटले किंवा उशीराने लक्षात आले हे खरं आहे. पुलंची लोकप्रियता नक्की कशामुळे होती? मार्मिक, सर्वसामान्य (म्हणजे शहरी, निमशहरी मराठी मध्यमवर्गीय) माणसाला जवळचं वाटणारं, बुद्धिमान निरीक्षण आणि बेतोड विनोदाची डूब असलेलं, सात्विक विचार असलेलं, विद्वत्तेचा आव अजिबात न आणणारं, जुन्यात रमणारं, मूल्यांची पीछेहाट होताना बघून तळमळणारं - एका सामान्य स्थानावरून भोवतालचा गोंगाट टिपणारं पुलंचं लेखन बहुतेकांना आवडत होतं. माझ्यासारखा अत्यंत टिपिकल मध्यमवर्गीय घरातला मुलगाही त्याला अपवाद नव्हता. पुलंची दृष्टी अतिशय स्वच्छ वाटायची. आणि अर्थातच त्यांचा विनोद आणि उत्तम भंकस करायची ताकद त्यांच्या लिखाणाकडे आकर्षित करायची! विसंगतीवर, न आवडलेल्या गोष्टींवर ते त्यांच्या खास शैलीत फटके मारायचे पण हा लेखक आतून नितळ आहे असं वाटायचं. (मी मुद्दाम लेखक असं म्हणतोय कारण माणूस म्हणून पुलंबद्दल मला वाचून/ऐकूनच माहिती होती. आणि आहे. शिवाय आवडत्या लेखकावर 'लेखक' म्हणूनच बोलावं, कारण आपण त्यातल्या त्यात अचूकपणे तितकंच करू शकतो.)
  
पुलंकडे विनोदाचं जबरदस्त हत्यार असल्याने आणि त्याचा मोठा प्रभाव वाचकांवर पडत असल्याने कदाचित त्यांच्या लिखाणावर प्रतिक्रिया देताना, त्याची समीक्षा करताना साहित्यातले जाणकार, विशेषतः लघुनियतकालिकात सक्रिय असणारी मंडळी अधिक तीक्ष्णपणाने बोलत असावीत असं वाटतं. नवकवी, नवचित्रकार यांची पुलंनी बरेचदा चेष्टा केली आहे. पण त्यांचा रोख व्यक्तीकडे नसायचा. 'नवकविते'कडे किंवा 'नवचित्रा'कडे असायचा. ते 'ओल्ड स्कूल'चे होते. इंटेन्स होते. सिनिक नव्हते. प्रतीकात्मकता, दुर्बोध मांडणी याचा धसका घेणारे होते. पण म्हणून ते कलाकृतीचा समाचार घ्यायचे. कलाकाराचा नाही. 'थिएटर ऑफ द अ‍ॅब्सर्ड' या प्रवाहातील एक प्रमुख नाटककार युजीन आयनेस्को याच्या 'द चेअर्स' या नाटकाचं 'खुर्च्या : भाड्याने आणलेल्या' हे विडंबन किंवा बेकेटच्या 'वेटिंग फॉर गोदो'चं 'गोदूची वाट' हे विडंबन अफाट आहे. मूळ नाटके मी पाहिलेली किंवा वाचलेली नाहीत हे इथे आवर्जून नोंदवतो. कदाचित पाहिली तर ती आवडतीलही, पण पुलंच्या टीकात्मक विडंबनाने जी मजा आली तिला तोड नाही. आता 'मजा आली' म्हटल्याने कदाचित काही भुवया उंचावतील, पण मला इथे सांगावसं वाटतं की विडंबन हा एक स्वतंत्र प्रकार म्हणूनही बघता येतोच की. आपल्याला आपणच आखलेल्या रस्त्यावरील खाचखळगे दाखवणारा. त्यात 'मजा येते' म्हणजे त्यातील रचनाकौशल्यामुळे, टिप्पणीमुळे आनंद मिळतो. ताण हलका होतो. गंभीर नाटक, अस्तित्ववादी चिंता वाहणारे नाटक वा कादंबरी वाचतानाच एकीकडे पुलंचं पात्र रोजच्या जगण्याशी झटापट करताना दिसतं तेव्हा ताण हलका होत असतो. हसू फुटत असतं. शेवटी माणूस आणि त्याचं हे विश्व गुंतागुंतीचं आहेच. त्यात वैविध्य आहेच. विचारांच्या, विचार प्रकटनाच्या विविध दिशा आहेत. आणि म्हणूनच जसे नेमाडे आहेत, कमल देसाई आहेत, जीए आहेत तसेच पुलंही आहेत!

पुलं ज्या काळाचं प्रॉडक्ट होते त्या काळाच्या चौकटीत पाहिलं तर काही गोष्टी उलगडू लागतात. पुलंची स्त्रीचळवळीबद्दलची धारणा आणि त्यांनी केलेलं काही स्त्रियांचं 'अतिविशाल' चित्रण हा एक चर्चेचा विषय असतो. पुलं पुरोगामी विचारांचे होते. विज्ञानाचा आग्रह धरणारे होते. जुन्यात रमणारे पण पुढे पाहणारे होते. त्यांनी कर्तृत्ववान स्त्रीला सलामही केला आहे. हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर, बेगम अख्तर, ज्योत्स्ना भोळे, लता मंगेशकर, इरावती कर्वे यांची त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे बोलकी आहेत. अर्थात या सहापैकी पाच गायिका होत्या आणि संगीत हे पुलंचं पहिलं प्रेम होतं हे सर्वश्रुत आहे. शिवाय व्यक्ती आणि वल्लीसारख्या काल्पनिक व्यक्तीचित्रांमध्ये एकही स्त्री व्यक्तिरेखा नाही हेही नोंदवायला हरकत नाही. पण तरीही त्यांच्या स्वच्छ दृष्टीत स्त्रीकडे बघताना काही भेसळ व्हायची असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये (मग ती तिरकस असली तरी) कमालीची सहजता होती, उत्स्फूर्तता होती. मात्र त्यांची वक्र विनोदी नजर 'सोशल वर्कची घाई' असलेल्या काही स्त्रियांवर पडली हे खरं आहे. (एक होती ठम्माबाई, तिला सोशल वर्कची घाई - पुलंची एक विनोदी कविता. वीणा, दिवाळी १९९२ मध्ये प्रकाशित. 'उरलंसुरलं' या संग्रहात समाविष्ट. याच संग्रहात त्यांचं 'पृथ्वी गोल आहे' हे 'स्त्रीमुक्तीवाल्या' स्त्रियांवर टिप्पणी करणारं एक 'नेटक'ही वाचता येईल. हे 'अभिरुची'च्या जून १९४६ च्या अंकात प्रकाशित झालं होतं.) सुस्थितीतील श्रीमंत स्त्रिया आणि त्यांची समाजसेवा हा त्यांचा विशेष आवडता विषय होता असं दिसतं. हे एका बाजूला मान्य केलं तरी दुसरीकडे स्त्री चळवळ आणि पुलंची प्रतिक्रिया याकडे पाहताना मला असं वाटतं की त्यांच्या आधुनिक तरी लग्न, कुटुंब यांना भक्कम, निःसंशय होकार देणाऱ्या मनाला काही गोष्टी पेलल्या नाहीत. त्यांना कदाचित स्त्री चळवळीची दिशा कोणती हा प्रश्न पडला असावा. कदाचित थोडं असुरक्षितही वाटत असेल का? कारण स्त्रीने टाकलेलं एखादं पाऊल आजही शंभरदा निरखून पाहिलं जातं तर त्या काळाच्या चौकटीत विचार करताना पुलंची प्रतिक्रिया समजून घेता येऊ शकेल. दुसरं म्हणजे त्यांनी विनोदाचं आवरण सतत जवळ बाळगल्याने त्यांचं लेखन कधी 'जहरी' झालं नाही. त्यांनी स्त्री चळवळीचा अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा होता असं नक्कीच म्हणावसं वाटतं, पण (पुलंमुळेच बहुधा) विनोदाचं अंगही विकसित झाल्याने जातिवंत विनोदी लेखकाच्या 'सुरसुरी'चा संबंध मी तात्विक वादाशी जोडण्याचं टाळतोच जरा! राजकीय व्यंग्यचित्र जसं व्यंग्यचित्र म्हणूनच आपण बघतो तसंच विनोदी लेखनाकडेही बघावं. अखेर 'अतिशयोक्ती' हे विनोदाचं वैशिष्ट्य असतंच.

'आहे मनोहर तरी' मधून सुनीताबाई भेटतात तसेच पुलंही भेटतातच. एक सातत्याने व्यक्त होणारा प्रतिभावान आणि दुसरी क्वचित व्यक्त होणारी प्रतिभावान. संवेदनशील लेखक, प्रतिभावंत असे पुलं एकीकडे नवरा म्हणून असंवेदनशील होते याचं चित्र 'आहे मनोहर तरी'मध्ये दिसतं, पण ही असंवेदना 'दुष्ट जाणिवे'तली नसून लहान मुलातली आहे असं सुनीताबाईदेखील सांगतात. मला वाटतं की मराठीमध्ये लेखकांच्या बायकांनी लिहिलेली आत्मकथने हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. पण त्याबाबतीत 'निर्वाळा' देणं ही अवघड गोष्ट आहे कारण अखेरीस जे आहे ते 'त्या दोघां'मधलं आहे. (शिवाय असंतोषाचं मूळ व्यवस्थेतही असतं. 'नवरा' हा प्रॉब्लेम आहे कारण मुळात 'लग्न' हा प्रॉब्लेम आहे!). अर्थात लेखकाच्या लिहित्या बाजूसारखीच ही दुखरी बाजूही समोर येणं आणि त्याबद्दल चर्चा होणं आवश्यक होतं आणि ते काम या आत्मकथनांनी केलं. ('आहे मनोहर तरी' मध्ये एक तक्रारीचा सूर आहे. त्यामुळे मला ते तितकंसं आवडलं नाही असं मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं. तिचं म्हणणं होतं की प्रतिभावान माणसांना सांभाळून घ्यावं लागतंच. ते जे देतात ते अधिक मोलाचं असतं. मला तिचं हे म्हणणं पटलं नव्हतं. कारण सुनीताबाई लिहितात त्याप्रमाणे प्रतिभावंताला निर्मितीच्या क्षणी समजून घेणं, सांभाळणं हे योग्यच आहे. पण इतर वेळी तो सामान्य माणसासारखाच नसतो का?)

आज पुलंचे उतारे फेसबुकवर फिरत असतात. त्यांची पुस्तके आजही पुस्तक प्रदर्शनात/पुस्तकांच्या दुकानात दर्शनी शेल्फ पटकावून असतात. पुलं आवडणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे आणि त्यांच्या लेखनाची कठोर समीक्षा करणारेही आहेत. पुलंचा विनोद न आवडणारेही काहीजण दिसतात. त्यांचं लेखन रंजक आहे पण सखोल नाही असेही मत दिसते. पुलंनी मध्यमवर्गीय भीरूतेचं उदात्तीकरण केलं असा सूर दिसतो. पुलं टिकले का? टिकणार का? यावर मतप्रदर्शन होत असते. ('भालचंद्र नेमाडे' हा विषय जितका चर्चिला जातो तितकी चर्चा पुलंची होत नाही हे मात्र खरं!). मला स्वतःला (अस्मादिक तिशीत आहेत. तरुण आहेत की नाहीत हे ठरवायचं असेल तर फेसबुक प्रोफाईलला एकदा अवश्य भेट द्यावी!) पुलंकडे, ज्या लेखकाने एका टप्प्यावर माझं मानस घडवलं, आज बघताना काय वाटतं? मी खरं तर काहीसा ब्लँक होतो. खूप सवयीच्या माणसाविषयी कुणी आपल्याला आपलं मत विचारलं की आपण जसे ब्लँक होतो तसा ब्लँक!

 - उत्पल वी.बी.
मुळ स्त्रोत -- http://mindwithoutmeasure.blogspot.in/2013/06/blog-post.html
'मिळून साऱ्याजणी', जून २०१३