Thursday, December 31, 2020

एक कलाकर एक संध्याकाळ - पु. ल. देशपांडे (चतुरंग प्रतिष्ठान)

"चतुरंग प्रतिष्ठान" या नामांकित संस्थेने पुलंच्या मुलाखतीचे दोन वेळा कार्यक्रम केले. "एक कलाकर एक संध्याकाळ"च्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्यावेळी रवींद्र नाट्यमंदिर येथे जानेवारी १९८७ मधे रंगलेल्या मुलाखतीतला हा काही भाग. हे रेकॉर्डिंग बरेच जुने आहे त्यामुळे थोडे लक्षपूर्वक ऐकावे लागते. ही मुलाखत "चतुरंग प्रतिष्ठान"चे आणि श्री आशुतोष ठाकूर ह्यांचे आभार मानून, चतुरंगचे श्री. निमकर यांच्या परवानगीने रसिकांसाठी उपलब्ध करत आहोत.



अश्या पुलंच्या अनेक अप्रतिम व्हिडियोज साठी आपल्या युट्युब चॅनल सबस्क्राईब करा. - > https://www.youtube.com/channel/UCpUM2b3QjXXWgmgt-Dqa-dQ


Tuesday, December 29, 2020

हिशेबी माणूस

अरसिकाला कविस्य निवेदन करण्याचा प्रसंग माझ्या कपाळी लिहू नकोस असं कोण्या संस्कृत कवीनें परमेश्र्वराला त्रिवार बजावून ठेवले आहे. पण प्रत्येक गोष्ट जेथल्या तेथें ठेवण्याचे वेड असलेल्या माणसाकडून आपल्या व्यवस्थितपणाची निवेदने ऐकण्यापेक्षा ते काम किती तरी सुसह्य म्हणावे लागेल.

फार दिवसांपूर्वीची आठवण आहे. एका मित्राबरोबर त्याच्या एका वृद्ध नातलगांच्या घरी गेलो होतो. माझं काहीच काम नव्हतं. माझ्या मित्राला कांही निरोप वगैरे सांगायचा होता. दारांत शिरतांनाच फाटकावर बोर्ड होता – ‘आत येणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ मनांत विचार आला आत येणाऱ्याने जर विसरूं नये तर बाहेर जाणाऱ्याने विसरले तर चालेल काय? मी न विसरता बागेचे फाटक लावून घेतले. आतल्या बाजूने बोर्ड होता ‘बाहेर जाणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ ‘मनुष्यस्वभावाचा काय सूक्ष्म अभ्यास आहे.’ मी मनात म्हणालो, दाराशी आलो. वर्दी देण्याच्या घंटीखालीच एक चिठ्ठी चिकटविलेली होती. ‘घंटी एकदाच वाजवावी.’ माझ्या मित्राने घंटी एकदाच वाजविली. काही वेळाने दार उघडले गेले आणि एका नोकराने दार उघडले. मी ‘पायपुसण्यावर येथे प्रथम उजवा व नंतर डावा पाय पुसावा’ अशी कुठे पाटी आहे की काय हे पहात पाय पुसले. वास्तविक पाय पुसून जायची मला मुळीच सवय नाही; परंतु मला कुठेही टापटीपीचा वास आला की मी आपला त्या घरांत शिरतांना पायपुसण्याला पाय पुसून टाकतो.

त्या बंगल्यांत शिरतांनाच ह्या बेहद्द व्यवस्थितपणाचा मला चांगला अंदाज आला होता. कारण बागेतल्या प्रत्येक कोपऱ्यांत ‘फुलांना हात लावूं नये’ ही पाटी होती. मालकांच्या नांवाची पितळी पाटी चकचकीत पुसली होती आणि ‘आहेत नाहीत’ पैकी ‘आहेत’ हे ठळक दिसत होते. त्या अक्षरांवरचे ढांपण अर्धवट सरकलेल्या अवस्थेत नव्हते. फाटकापासून बंगल्यांत शिरेपर्यंत तीन ठिकाणी ‘येथे घाण करू नये’च्या पाट्या होत्या. त्यानंतर मी त्या दिवाणखान्यांत शिरतां शिरतां आणखी कांही अंदाज केले. उदाहरणार्थ, दिवाणखान्यातल्या पुस्तकांच्या कपाटावर ‘ही पुस्तके वाचावयास मागू नये’ ही पाटी आहे की नाही हे पाहिले. ती होती. दाराखिडक्यांना डांस शिरूं नयेत म्हणून जाळ्या मारलेल्या होत्या. भिंतीवरच्या फोटोवर ते केव्हां व कुठे काढले गेले ह्यांच्या तारखा होत्या. आणि वर्तमानपत्रावर मालकाचे नांव लिहून ठिकठिकाणी तांबड्या पेन्सिलीने खुणा केल्या होत्या. वास्तविक ह्या गोष्टींचा मला अंदाज असता तर मी त्या दिशेला फिरकलोही नसतो. पण बाहेर मित्र भेटला, त्याला चहा प्यायला चलण्याचा आग्रह केला आणि त्याने जरा ह्या म्हाताऱ्याला एक निरोप सांगून लगेच सटकू असे म्हटले म्हणून त्याच्या बरोबर त्या नीटनेटक्या बंगल्यांत शिरलो – मालक येईपर्यंत त्याच्या चेहऱ्याचा अंदाज करीत बसलो.

बहुधा असली माणसें काटकोळी असतात- गाल खप्पड हे हवेतच. त्याशिवाय स्वभावाच्या खडुसपणाला धार येत नाही. कपाळ हे आठ्यांसाठी घडवलेले इंद्रिय आहे हा तसल्या मंडळींचा ठाम विश्र्वास असतो. हसणे ही क्रिया ह्या जगात का घडावी याची तिथं विवंचना असते. बहुधा जुना शर्ट त्याची कॉलर कापून आणि लांब हाताचे अर्धे हात करून घरांत घालण्यासाठी म्हणून वापरण्याची प्रवृत्ती असते. वयपरत्वे ह्यांत फरक पडतो, परंतु साठीच्या पुढला प्रकार असला आणि विधुरावस्था असली तर पायांत खडावा घालण्याची विशेष प्रवृत्ति असते. मी अशा प्रकारच्या ह्या मनुष्यविशेषाची कुंडली मनाशी मांडीत असतां दारांत काही तरी खुडबुडले आणि एक साठीच्या घरांतले वृद्ध गृहस्थ आंत आले, माझ्या मित्राने तोंडांतून तीनचार शब्द सांडण्याचा एक दुबळा प्रयत्न केला. ‘कुणीही यायला माझी हरकत नाही. पण आधी कळवलेले असावे, मी एकच कप चहा करायला सांगितला आहे-’

‘छे छे... आपण चहाची तकलीफ कशाला घेता? नाही तरी मी चहा घेत नाही’ मी उगीचच प्रकरण सांवरून घेतले.
‘प्रश्न तुमच्या चहाचा नाही. ह्याने माझी चार वाजताची अपॉइंटमेण्ट घेतली होती. तसा तो पांच मिनिटे उशीरा आला आणि बरोबर मला न सांगता तुम्हाला घेऊन आला.’

‘आपलं काय बोलणं व्हायचं असेल तर ते होऊं दे. मी बाहेर जातो.’


‘प्रश्न तुमच्या बाहेर जाण्याचा नाही आहे.’

प्रश्न मी चहा पिण्याचाही नव्हता – बाहेर जाण्याचाही नव्हता – कसलाच नव्हता. प्रश्न होता एकच-म्हणजे आपण अत्यन्त हिशेबी आहो-व्यवस्थित आहो, त्या हिशेबीपणापुढे, व्यवस्थितपणापुढे जगांतल्या कुठल्याही गोष्टीची मला पर्वा नाही हे ठसवण्याचा. पुढली पंधरा वीस मिनिटें ही माझ्या आयुष्यांतली एकाद्याचा गळा दाबून तिथल्या तिथे मुडदा पाडून टाकण्याची अनिवार इच्छा दाबून टाकण्याच्या प्रयत्नांची शिकस्त करण्यांत गेली. तो म्हातारा ‘माझं असं आहे’ ‘मी म्हणजे असा’ ‘मीं एकदां असं म्हटलं कीं असं झालंच पाहिजे’ ‘मी-मी-मी-मी’ करीत नुसता छळत होता. ‘मला गैरहिशेबी कारभार अजिबात आवडत नाही.’ ‘तुम्ही मला विचारा कीं एकोणीसशें तेवीस साली मी अकरा वाजतां काय करीत होतो, मी दोन मिनिटाच्या आंत सांगू शकतो...’ तिथे ह्या माणसाची पाठ मला कशी सडकवता येईल याचा विचार होता माझ्या मनांत. मी तो एका केविलवाण्या स्मिताखाली दडपून गप्प बसलो.
‘गप्प बसूं नका... विचारा...’ तो कडाडला. ‘हो हो,’ मी आपलं काही तरी बोलायचं म्हणून बोललो.
‘हो हो नकोय मला. मला प्रश्न हवाय.’

मी नाइलाजाने त्याला प्रश्न विचारला. म्हातारा एकदम एका कपाटापाशी गेला. त्यांतून त्याने एक डायरी काढली. टेबलावर ओला स्पंज होता. त्याने डायरीची पानें उलटली आणि वाचून दाखवले- ‘हं... अकरा जून एकोणीसशे तेवीस. आदल्या दिवशी म्हणजे दहा तारखेला विट्याहून अष्ट्याला बदली झाल्याचा हुकूम आला होता. सबरजिस्ट्रार होतो आम्ही तेव्हां... अकरा वाजतां बैलगाडीवाल्यापाशी विट्याहून अष्ट्याला सामान नेण्याचे दर ठरवीत होतो. काय?’

मी मनांत म्हणत होतो त्या बैलगाडीला ह्यालाच जोडण्याची परमेश्र्वराने योजना केली असती तर काय बिघडले असतें!

बऱ्याच लोकांची हिशेबीपणाची, म्हणजे पैशाचा हिशेबीपणा, अशी कल्पना असते. पैशाचा हिशेबीपणा हा हिशेबी स्वभावांतला एक अत्यंत गौण तपशील आहे. चिक्कू स्वभावाच्या माणसाची चेष्टा तरी करता येते. ही माणसे आपला हिशेबीपणा लपवण्याची पराकाष्ठा करतात. आमचा एक रुपये-आणे-पै न्याहाळीत बसणारा मित्र आम्हांला आज कित्येक वर्षे हॉटेलांत नेऊन मनसोक्त खायला घालणार आहे. आम्ही जवळ जवळ रोज त्याची ह्या विषयावरून चेष्टा करतो. पण तो ज्या दिवशी आम्हांला ही पार्टी देईल त्याच दिवशी आमचा आनंद नष्ट होणार आहे. आम्हांला त्याचा चिक्कूपणा उघड करण्यांत जो आनंद आहे तो त्याला पैसे खर्च करायला लावण्यांत नाही. आमचा चिक्कू मित्र पैशांत हिशेबी पण गाण्याच्या बैठकीला गेला तर पहाटे सहापर्यंत हलणार नाही. रात्री अपरात्री भटकायला हजर. त्याच्या बंगल्यांत फाटकच नाही.

हिशेबी म्हणून ज्याला मी म्हणतो तो हा नमुना नव्हे. या हिशेबी लोकांचा खाक्याच निराळा. पुस्तक विकत घेतल्यावर त्याला कव्हर घालून, विकत घेतल्याची तारीख लिहून ‘पुस्तके मागूं नयेत’च्या कपाटांत ठेवणारी ही माणसं. आपल्या वाण्याची, दूधवाल्याची, घरवाल्याची बिलं बरोबर एक तारखेला पोहोचतात या अहंकारात असणारी ही माणसं. सकाळी पांच वाजतां उठून रात्री नवाच्या ठोक्याला झोपणारी ही माणसं आणि ज्यांच्या बोलण्यांत सदैव पोवाडेवाल्यांच्या ‘जी जी र जी जी’ सारखी ‘मी मी रे मी मी’ ची झील धरलेली असते. असली ही हिशेबी माणसं- जे घड्याळाचे गुलाम आहे – ज्यांच्या जेवणाशी भुकेचा संबंध नसतो आणि पिण्याशी तहानेचा संबंध नसतो- जे सकाळी दहा ही जेवणाची वेळ समजतात आणि कुठल्याशा आहारशास्त्राच्या चोपड्यांच्या आधाराने जे नाकांतून पाणी पितात – ज्यांच्या बगीच्यातल्या फुलांनी कुटुंबांतल्या लेकीसुनांच्या वेण्या सजत नाहीत – जे गुलाबाचा गुलकंद करतात, दारींचा मोगरा माळ्याला विकतात, ते हे महाभाग. नियमितपणा म्हणजे सर्व काही असे समजतात आणि प्रत्येक गोष्टीची आपल्या डायरीत नोंद करतात. त्यांनी लाथेने बिछाना उलगडून त्याच्यावर अंग टाकण्याची मजा अनुभवली नाही. पहांटे फिरायला जाऊन उषेची स्वप्नं न्याहाळली नाहीत – जे नदीच्या घाटावर पोहायला गेले परंतु पाण्यात घागर बुडवून कसल्यातरी गोड विचारांत भरल्या घागरीचा भार विसरलेल्या जलवाहिनीच्या दर्शनाने क्षणभर घाटावर रेंगाळले नाहीत ते हे लोक. कारण त्यांनी ‘आठ ते आठ पंधरा – नदीवर स्नान’ हा फक्त हिशेब मांडलेला आहे. ही माणसं नियमितपणाने सर्व काही करतात. गाण्याला जातात. बहुधा संध्याकाळी गाणं असलं तर – आणि घरी आल्यावर वहीत मांडून ठेवतात - आज भीमपलास, पूरिया आणि यमन ऐकला. गवयाचे नांव अमुक अमुक. गायनाचे स्थळ अमुक अमुक. झोपण्यापूर्वी तीस मिनिटे वाचनही करतात. आणि साहित्याच्या आनंदात डुंबण्याऐवजी वहीत लिहितात, ‘आजचे वाचन पाने पन्नास’.

असली माणसें आपल्या पत्नीशी प्रेमालाप कसा करीत असतील हे जाणून घेण्याची मला उगीचच उत्कंठा आहे. बहुधा ते बायकोला सांगत असतील, ‘आजची वांग्याची भाजी तू सहा जूनला केलेल्या भाजीहून अर्धा चमचा मिठाने आळणी झाली होती. कोशिंबीर चांगली होती; त्यात दह्याचे प्रमाण उत्तम होते. आज संध्याकाळी तुम्ही नेसलं होतं ते नऊ एप्रिलला घेतलेलं पातळ तुम्हांला आता नेसला आहात त्या पातळाहून अधिक बरं दिसतं’ जाऊ दे. हा संवाद लांबवण्यांत अर्थ नाही. कारण रसिकतेची कमाल मर्यादा गाठणे एकवेळ शक्य आहे परंतु हिशेबीपणाचा ताळा लावणे अत्यंत अवघड! असल्या माणसांना मी भयंकर भितो. माझी सगळी शक्ती इथं जणू काय नष्ट होते – कधी वाटतं ह्या माणसांचा सणसणीत अपमान करावा पण जमत नाही. कदाचित् परमेश्वराने हा नमुना करतांना काय हिशेब करून ही मनुष्यरूपधारी यंत्रे घडवली ह्याच्या विचारानेच मी हतबुद्ध होत असेन. असल्या लोकांच्यावर कसला तरी सूड काढायचा विचार येतो.

त्या मित्राबरोबर ज्याच्याकडे गेलो होतो त्या म्हाताऱ्याला मी तसा सोडला नाही. त्याने तर माझा फारच अपमान केला होता. माझे नांव विचारण्यापूर्वी मी किती वाजतां उठतो? हा अत्यंत खाजगी प्रश्न विचारला होता. माझ्या बुशकोटांतून डोकावलेली सिगारेटची डबी पाहून ‘धूम्रपान आणि कॅन्सर’ ह्या विषयावर कुठल्या तरी मासिकांत आलेली दोन पानं माझ्याकडून वाचून घेतली होती. आणि दाढी करण्याचे एक पाते मला किती दाढ्यांपर्यंत टिकते हा प्रश्न करून त्याचं उत्तर न देता आल्याबद्दल माझीच खरडपट्टी काढली होती. त्याच्यावर सूड़ म्हणून मी जातांना त्याच्या बागेतला नळ सोडला. त्याची ‘आहेत’ ची पाटी ‘नाहीत’ केली आणि बाहेरचे फाटक उघडे टाकून रस्त्यावरची दोन बेवारशी गुरे ‘हैक हैक’ करून त्याच्या बागेत सोडली. ह्यापेक्षा मी त्याच्यावर अधिक सूड काय घेऊ शकणार होतो? तेवढ्यावरच मी खूष होतो. परंतु दोन दिवसाच्या आंतच माझ्या नांवावर एक पत्र आले. त्यांत माझ्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून आपल्या फाटकाचा दरवाजा मला कायमचा बंद असल्याचे कळवले होते. मात्र त्या खाजगी पत्राच्या वरच्या कोपऱ्यांत ‘जावक क्रमांक दोनशे बत्तीस’ हे लिहायला तो हिशेबी थेरडा विसरला नव्हता.

लेखक – श्री. पु. ल. देशपांडे
(आकाशवाणी, पुणे केंद्राच्या सहकार्याने)
(अंक – वसंत - १९६०)