Monday, July 5, 2021

पु. ल. न विसरता येणारे - संदेश शेटे

पु.ल. सोबतची (पुस्तकरूपी) ओळख झाली ते शाळेत असताना त्यांचा ‘उपास’ हा धडा शिकताना आणि वाटलं होतं सगळे धडे असेच का नसतात? आज पण जेव्हा कोणी डाएट बद्दल बोलतं तेंव्हा मला ‘उपास’ आठवतो. पुलं हे खूप कोणी तरी मोठे लेखक आहेत आणि त्यांच लिखाण किती महान असेल हे माझ्या सारख्या छोट्या बुद्धी असलेल्याला तेंव्हा समजलं नव्हतं.

पुढे जेव्हा थोडी वाचायची समज आल्यावर आणि त्यांची पुस्तके वाचायला सुरुवात केल्यावर कळलं अरे ह्यांची पुस्तके खूप आधीच वाचायला हवी होती. खर तर पु.ल. आपल्यातून जाऊन खूप वर्षे झाली पण त्यांची पुस्तके वाचताना , कथानक ऐकताना असं वाटतं अरे ते तर अजून अवतीभवतीच आहेत. मी पुलंच सगळं लिखाण वाचलं आहे असं नाही पण त्यांच जे काही लिखाण वाचलंय त्याला तोड नाही.पु. ल. नी जे काही लिखाण केलं ते आज सुद्धा मनाला भावतं.

पु.ल.च व्यक्ती आणि वल्ली जेंव्हा वाचलं होतं तेंव्हा आणि आज सुद्धा जेंव्हा कधी वाचतो त्या नंतर त्यातील वल्ली चा शोध कोठे ना कोठे घेऊ लागतो. जेंव्हा केंव्हा आमचा कोकण दौरा होतो तेंव्हा त्या कोकणातील नारळ आणि सुपारी च्या बागा पाहतो तेंव्हा मी ‘अंतू बर्वा’ ला आजूबाजूस शोधू लागतो. कधी त्या ठिकाणच्या छोट्या चहा च्या टपरी वर तर कधी बस स्टँड वर. जेंव्हा एखाद्या लग्न समारंभात जातो आणि निवांत बसलेला असतो तेंव्हा कोठे ‘नारायण’ नावाने कोणी हाक ऐकू येते का हे पाहत असतो. जेंव्हा कोणी नातं नसलेला पण आपुलकी असेलला कोणी ज्येष्ठ एखादी मुलगी लग्न होऊन निघताना डोळे पुसतो तेंव्हा मी त्या व्यक्तीत ‘चितळे मास्तर’ बघतो, कधी कोठे खूप अशी तळवे झिजलेली चप्पल बघतो तेंव्हा वाटत अरे ईथे चितळे मास्तर आले असतील काय असा अंदाज लावतो. कधी तरी सदाशिव पेठेत फिरत असताना ‘गटणे’ हे आडनाव कानावर पडतं तेंव्हा वाटत त्यांना जाऊन विचारावं सखाराम तुमचा कोण लागतो? रेल्वेतून जेंव्हा ही प्रवास होतो तेंव्हा वाटत आपल्या शेजारी पण ‘ पेस्तन काका’ यायला पाहिजेत म्हणजे काय धमाल येईल ना. तेंव्हा माझी नजर एखाद्या पारशी कुटुंबाला शोधत असते. कधी तरी आमचा परीट सुद्धा आमचे कपडे हरवून ठेवतो तेंव्हा मला नकळत ‘ नामू परीट’ आठवतो. मी त्याला म्हणतो तुझा नामू झाला वाटतं पण त्या बिचाऱ्याला त्यातलं काहीही कळत नाही. फिरत असताना एके ठिकाणी दोन व्यक्ती बोलताना दिसतात तेंव्हा त्यातील एकाच्या अंगावर बरेच सोन्याचे दागिने, हातात अंगठ्या दिसतात व तोंडात थोडी गुंडगिरी ची भाषा आणि दुसरी व्यक्ती एकदम साधारण असते तेंव्हा वाटत अरे हा ‘बबडू’ तर नसेल ना.
‌ जेंव्हा बस किंवा आता ट्रॅव्हल्स ने प्रवास करत असताना अचानक जर गाडी बंद पडली आणि गोंधळाचा आवाज आला तर वाटतं अरे गाडी खाली ‘म्हैस’ तर नसेल ना आली. कधी तरी नाटक पाहण्याचा योग येतो आणि तिसऱ्या घंटे नंतर जेंव्हा पडदा वर जाऊ लागतो तेंव्हा मला ‘शंकऱ्या’ ने विचारलेला प्रश्न आठवतो, आणि मी शेजारी पाजारी शंकऱ्या ला शोधू लागतो. जेंव्हा कोणी स्वतःच्या नवीन बांधत असेलेल्या घराबद्दल बोलायला लागतं तेंव्हा मला मी आणि माझा शत्रूपक्ष मधील कुलकर्णी पात्र आठवतं आणि हसायला येतं. कधी तरी कामा निमित्त पोस्टात जाणं होतं तेंव्हा मी पुलंनी वर्णन केलेल्या पोस्टाशी काही मिळतं जुळतं आहे का असं बघत असतो तेंव्हा जाणवतं अरे इथे तर अजून पण तिच स्थिती आहे.

‌ माझ्या मामाच्या घरासमोर अजून पण काही चाळी आहेत, आणि ती चाळ त्या चाळीतील घरे ,लोकं पाहिली की मी आपसुकच अरे ही तर ती ‘ बटाट्याची चाळ’ नाही ना असं स्वतःला विचारतो. कधी तरी एखाद्या अमृततुल्य ला चहा घेत असताना अचानक कानावर ‘ पुर्वीच पुणं राहीलं नाही हो आता’ असं जेंव्हा ऐकू येत तेंव्हा पुणेकर होण्यासाठी लागणाऱ्या अटींचा मी विचार करायला लागतो.

‌ पु. ल. तुम्ही कधी कोणी एके काळी केलेलं लिखाण आज सुध्दा तंतोतंत नजरेस दिसतं, पुलं तुम्ही नक्की च देवलोकी पुन्हा एकदा बटाट्याची चाळ तयार केली असणार आणि देवलोकी हास्याचे फवारे उडत असणार.

- संदेश शेटे 

मूळ स्रोत - https://sandeshshete.wordpress.com

1 प्रतिक्रिया:

Unknown said...

Very well written . Simple language used to express . Khup sundar . Asech lihit raha