Wednesday, March 30, 2022

पु.ल. आणि भीमराव पांचाळे

४ मार्च १९८९ ला चंद्रपूरला पहिलं दलित साहित्य संमेलन झालं. संमेलनाचे उद्घाटक होते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. ते या संमेलनाचं सर्वात मोठं आकर्षण होतं. उद्घाटनपर केलेल्या वैचारिक तरीही अत्यंत रसाळ अशा भाषणाने त्यांनी या संमेलनाला एका उंचीवर नेऊन बसवलं.

या संमेलनात पुलंनी एक कार्यक्रम खूप आग्रहाने करायला लावला. तो म्हणजे गझलनवाज भीमराव पांचाळेंची गजलमैफल. भीमराव तेव्हा गझलनवाज बनले नव्हते. त्यांना मुंबईत येऊन अवघी सहाच वर्षं झाली होती. संघर्ष सुरू होता. पण पुलंचा हट्टच होता. भीमराव चंद्रपूरच्या संमलनात पाहिजेच. कुणाला साक्षच काढायची असेल तर संमेलनाचे एक मुख्य आयोजक असलेले ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर आहेत. ते या सा-या घटनाक्रमाचे साक्षीदार आहेत.

संमेलनात भीमरावाची मैफल नेहमीप्रमाणेच रंगली. त्याला पुलं संपूर्ण वेळ आवर्जून उपस्थित राहिले. इतकंच नव्हे तर या मैफिलीचं प्रास्ताविक निवेदन त्यांनी स्वतःहून केलं. त्यात त्यांनी भीमराव, मराठी गजल यांचं खूप कौतूक केलं. तुम्ही विदर्भातले आहात, भीमराव विदर्भातले आहेत. पण भीमरावांची खरी कदर विदर्भाने नाही, तर आम्ही मुंबईकरांनी केली, असं त्यांनी वैदर्भीयांना आपल्या खुशखुशीत शैलीत सांगितलं. भीमरावांच्या गाण्यात शब्द आणि सूर एकमेकांना आलिंगन देऊन लयीत चालतात. असं भरभरून कौतूक करत त्यांनी भीमरावांना असंच गात राहा, असे आशीर्वाद दिले. सोबतचा फोटो त्याच कार्यक्रमातला. नागपूर आकाशवाणीकडे या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे.

पुलंची आणि भीमरावांचा ऋणानुबंध खूप जुना. पहिली भेट अकोल्यातली. पुलं अकोल्याला आले की त्यांचा किशोरदादा मोरेंकडे यायचे. किशोरदादा हे भीमरावांचे पालक. त्यामुळे त्याकाळातल्या अनेक मान्यवरांबरोबरच पुलंचाही सहवास भीमरावांना लाभला. एकदा बाबा आमटेंकडे आनंदवनात गेलेले असताना परतीच्या प्रवास पुलं अकोल्याला आले होते. त्यांच्यासोबत डॉ. अनिल अवचट होते. नारायण कुलकर्णी कवठेकर, मांडवगणे अशी अकोल्यातली साहित्यिक मंडळीही होती. किशोरदादांनी प्रत्येक जाणकारासमोर भीमरावांना जाणीवपूर्वक गायला सांगत. तेव्हा भीमरावांचं वय विशीच्या आसपास होतं. त्यांनी त्यांचं एक नवं कम्पोझिशन गाऊन दाखवलं. ती अर्थातच गजल होती. भीमूला पहिल्याच फटक्यात पुलंसारख्या दैवताकडून शाबासकीची थाप मिळाली.

१९८३ साली भीमराव विदर्भातून मुंबईत स्टेट बँकेत बदली घेऊन आले. नरिमन पॉइंटच्या हेड ऑफिसमधे पोस्टिंग होतं. तिथून अवघ्या दोन मिनिटांवर पुलंचं एनसीपीएचं ऑफिस होतं. पुलं तेव्हा एनसीपीएचे अध्यक्ष होते. तिथेच त्यांचं बि-हाडही होतं. पंधरा दिवस ते इथे राहत आणि पंधरा दिवस पुण्याला. तिथे पुलंसोबत काम करणा-या वृंदावन दंडवतेंच्या ओळखीनं भीमराव पुलंना भेटले. ८७ साल होतं ते. निमित्त होतं मुंबई आकाशवाणीने आपल्या हिरकमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भीमरावांच्या मैफिलीचं निमंत्रण.

आकाशवाणीच्या मैफिलीला येणं पुलंना शक्य नव्हतं. पण त्याची सव्याज भरपाई त्यांनी एका क्षणात केली. त्यांनी भीमरावांना एक एनसीपीएच्या नावे एक पत्र द्यायला सांगितलं. मला माझी कला सादर करण्यास संधी द्यावं, असं पत्र त्यांनी तिथेच लिहून घेतलं आणि दंडवतेंकडे ठेवायला दिलं. अकोल्याला भीमरावांकडून ऐकलेलं गाणं पुलंच्या लक्षात होतंच. पण दूरदर्शनवरच्या मैफिलीही ऐकलेल्या होत्या. पेपरांत छापून येत होतंच. पुलंनी भीमरावांच्या गाण्याला आणि मराठी गजलला एनसीपीएसारखं जगात नावाजलं जाणारं व्यासपीठ मिळवून दिलं.

२९ जून १९८८ ला ही मैफल झाली. एनसीपीएत ब्लॅक बॉक्स नावाचं एक छोटं सभागृह आहे. त्याची रचनाच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की मंचावर टाचणी जर पडली तरी माईकशिवाय शेवटच्या खुर्चीपर्यंत ती नीट ऐकू जाते. मुंबईतच्या उच्चभ्रू वर्तुळातल्या जाणकार आणि दर्दी लोकांसाठी तिथे निवडक मैफिली आयोजिल्या जातात. भीमरावांच्या सूरांनी एनसीपीए जिंकलं. अनेक मान्यवरांनी वृत्तपत्रातून भीमरावांचं कौतूक केलं. आजही एनसीपीएच्या लायब्ररीत कुणीही जाऊन या मैफिलीचं रेकॉर्डिंग ऐकू शकतं.

पहिल्याच भेटीपासून पुलंनी भीमरावांसाठी दोघांमधलं सगळं अंतर संपवून टाकलं होतं. त्यांना पुलंच्या ऑफिसात मुक्तद्वार होतं. दुपारी बँकेत लंचअवर झाला की भीमराव पळालेच एनसीपीएला. तिथे दंडवते, वामन केंद्रे, अशोक रानडे अशी मंडळी सोबत असायची. तासन्सान गप्पा चालायच्या. आणीबाणीपासून लोकगीतांपर्यंत अनेक विषयांवर या चर्चा सुरू असायच्या. त्यातून भीमराव कळत नकळत घडत होते. पुलंच्या परिवारातल्या अनेकांशी परिचय होत होता. पुलं अनेकदा भीमरावांना ऑफिसात फोन करत. ऑफिसमधल्यांनाही त्याचं अप्रुप होतं. आणि ऑफिसात काही महत्त्वाचं काम आलं आणि भीमराव ऑफिसात नसतील, तर ऑफिसातून पुलंच्या ऑफिसात फोन जायचा. सगळ्यांना माहीत होतं भीमराव एनसीपीएतच गेले असणार.

पुलं भीमरावांना आग्रहाने चंद्रपूरच्या दलित साहित्य संमेलनात घेऊन गेले. पण त्यामधे आलेली एक अडचणही त्यांनी दूर केली. संमेलनाच्या तारखा त्यांनी आकाशवाणी पोर्ट ब्लेअर केंद्राला आधीच दिल्या होत्या. त्यामुळे अंदमानात जाण्याची त्याकाळी दुर्मीळ असणारी संधी सोडावी लागणार होती. पुलंनी संमेलनात नाव सूचवल्यामुळे भीमरावांनी आकाशवाणीला नकार कळवण्याची तयारीही केली होती. पण पुलं दोन्ही कार्यक्रम व्हावेत म्हणून आग्रही होती. त्यांनी आकाशवाणीचे स्टेशन डायरेक्टर असणा-या मधुकर गायकवाडांची भेट घेतली आणि पोर्ट ब्लेअरचा कार्यक्रम पुढे ढकलायला लावला. भीमरावांच्या आग्रहावरून पुलं एनसीपीएच्या वतीनं वैदर्भीय लोकगीतांचा एक कार्यक्रम आयोजित करणार होते. पण विदर्भातले कलावंत आणि अभ्यासकांचा उत्साह मावळल्यामुळे दस्तावेजाच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम होऊ शकला नाही.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य हा दोघांच्या कॉमन आवडीचा विषय. त्याविषयी भीमराव एक प्रसंग सांगतात, ‘माझी भीड तोपर्यंत बरीच चेपली होती. एक दिवस मी पुलंसारख्या साहित्यातल्या मेरुमणीलाच पुस्तकं सजेस्ट करण्याची हिंमत केली. माझी भूमिका प्रामाणिक होती की आपल्याला आवडलेल्या विनोदाबद्दल त्यांच्याशी बोलावं. एक श्रीलाल शुक्लंचं रागदरबारी. मी रागदरबारीचं नाव काढताच त्यांनी कानाला हातच लावला. त्यातल्या विनोदाचा व्यापक पट आणि अफाट दर्जा याविषयी त्यांनी भरभरून सांगितलं. दुसरं होतं, इटालियन लेखक गुयानी गुरेत्शी. मी म्हटलं, मला त्याचा नावाचा उच्चारही नाही माहीत, पण मला याचा विनोद खूपच भावलाय. पुलंनी लगेच म्हटलं ‘ द हाऊस दॅट निनो बिल्ट’वालाच ना? तू काय वाचलंयस त्याचं. मी गेली अनेक वर्षं शोधतोय. पण फक्त एकच पुस्तक मिळालंय. त्यानंतर माझ्या चेह-यावर आनंद पसरला. कारण अकोल्यावर मुंबईत आल्यावर मी जवळपास दोन वर्षं मुंबईचे सगळे फूटपाथ पालथे घालत गुरेत्शीची सगळी पुस्तकं शोधून काढली होती. मला देशील का रे वाचायला, भाई अगदी काकुळतीला येऊन बोलले. पंधरा दिवसात परत देईन. आणि मी पुस्तक दिल्यावर पंधरा दिवसात एका लिफाफ्यात नीट पॅक करून त्यांनी ती पुस्तकं परत दिलीही. सोबत पुलंनी एक आपलं एक पुस्तक सही करून दिलं, ‘पुलं एक साठवण’. ते असं पुस्तक असं कुणाला सहसा देत नसत. ती साठवण मी जिवाच्या पार जपून ठेवलीय. मी माझ्या गीतालाही त्याला हात लावायला देत नाही.’ इति भीमराव.

गीता म्हणजे भीमरावांच्या पत्नी. लग्नानंतर त्या पुलं आणि भीमरावांच्या गप्पांच्या मैफिलीत जोडल्या गेल्या. त्याही मूळ पुलंसारख्याच सारस्वत. त्यांनी जातीची बंधनं न भीमरावांशी लग्न केलं याचं याचा त्यांना खूप आनंद होता. सारस्वतांच्या स्वयंपाकाविषयी ते त्यांच्याशी नेहमी बोलत. तू चांगला गातोस, यापेक्षाही तुझी बायको गोव्याची आहे, याचा मला जास्त आनंद आहे, असं ते भीमरावांना गमतीनं सांगायचेही.

भीमरावांची गझलेची पहिली कॅसेट ‘एक जखम सुगंधी’ खूप गाजली. तिचं प्रकाशन पुलंच्याच हस्ते झालंय. यातली मराठी गझल एकूण मराठी गाण्यांना नवं वळण देणारी होतीच. रसिकांना ती आजही भुरळ घालतेय. ती इतकी गाजली कारण त्याचा सरस दर्जा होताच. पण पुलंचा लाभलेला परिसस्पर्शही याला कारणीभूत होता. पुलंनी आपली पुण्याई आणि लोकप्रियता भीमरावजींच्या नव्या प्रयोगाच्या पाठिशी उभी केली. पुलंच्याच या परिसस्पर्शामुळेच माध्यमांमधे आणि अभिजनांच्या वर्तुळात भीमरावांचा प्रवेश तुलनेने सोपा झाला. नाहीतर विदर्भाच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या, कोणतीही शहरी सांस्कृतिकतेची पार्श्वभूमी नसलेल्या आणि छोट्या चणीच्या भीमरावांना मुंबईतल्या अभिजन वर्तुळाने स्वीकारणं सोपं नव्हतं.

भीमराव हे असं एकमेव उदाहऱण नाही. पुलंनी आजवर अनेक कलावंतांच्या पाठीवर असाच कौतुकाचा हात फिरवला आणि त्या कलावंतांचं सोनं केलं. त्यांनीच दादू इंदुरीकरांना शोधून ‘गाढवाचं लग्न’ महाराष्ट्रासमोर आणलं. मच्छिंद्र कांबळीचं ‘वस्त्रहरण’ मान टाकणारच होतं. पण पुलंची शाबासकी पेपरांत छापून आली आणि त्याने इतिहास घडवला. मराठी मातीतलं अस्सल बानवकशी जे काही गवसलं, त्याला पुलंनी आपल्या लोकप्रियतेची मदत घेऊन कोंदण मिळवून दिलं. महाराष्ट्रभर जे काही नवे प्रयोग होत होते, त्याच्या पाठिशी ते कायम उभे राहिले.

पुलंनी एका प्रगल्भ सामाजिक जाणिवेतून हे सातत्याने केलं. कितीही गुणवत्ता असली तरी सांस्कृतिक स्पर्धेत उतरणं सर्वसामान्य घरांमधून आलेल्या कलावंतांसाठी मुश्किल असतं. धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात जिथे होते, तिथे पोहचण्यासाठीच त्यांना मैलोनमैल धावून यावं लागतं. अशावेळेस कुणीतरी पाठिशी ठामपणे उभं राहावं लागतं. पुलंनी गावागावातल्या धडपडणा-या प्रतिभांना कायम आधार दिला. चंद्रपूरच्या दलित संमेलनातल्या उद्घाटनाच्या भाषणात तर त्यांनी याविषयीचं आपलं जीवन तत्त्वज्ञानच मांडलंय. पण पुलंचा हा चेहरा क्वचितच समोर आणला गेला. भीमरावांसारख्या कलावंतांच्या पाठिशी उभे राहणारे पुलं आज आपल्याला ठावूकच नाहीत. पुलं म्हणजे विनोद, नॉस्टॅल्जिया, पुणं आणि पार्ले एवढंच मर्यादित ठेवण्यात आलं. तेच सा-यांच्या सोयीचं होतं. पण पुलंनी पेरलेलं आज बहराला आलंय. म्हणूच आज भीमरावांची साठी समाधानात आणि मोठ्या सन्मानाने साजरी होतेय. त्याचा पुलंना ते असतील तिथे खूप आनंद होत असेल.

सचिन परब,
क्रिएटिव पत्रकार,
मुंबई

Tuesday, March 29, 2022

महाराष्ट्राला तू हसविले - (राजेश जाधव)

पु.ल. गेल्यानंतर श्री राजेश जाधव यांनी ही कविता लिहुन सुनिताबाईंना दाखवली. सुनिताबाईंना ती अत्यंत आवडली त्याची पावती म्हणुन कवितेवर त्यांनी त्यांची स्वाक्षरी दिली.



माझे लेखनकलेतील प्रयोग - पु ल देशपांडे

जगात माणसावर अनेक करुण प्रसंग कोसळतात. विरहाचे प्रसंग, निधनाचे, द्रव्यनाशाचे, बेकारीचे, प्रेमभंगाचे करुण प्रसंगांची यादी हवी तितकी लांबविता येईल. परंतु मी काय विनोद केला हे समजावून सांगणे, हा सर्वात मोठा करुण प्रसंग आहे, असे मला वाटते. तसला प्रसंग आज मी ओढवून घेतला आहे. विनोदी लिखाणात मी काय काय प्रयोग केले, विनोदाच्या कोणकोणत्या तऱ्हा मी वापरल्या, हे माझ्याच लिखाणाकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगणे, सुरुवातीला मला वाटले होते तितके सोपे काम नाही, असे या विषयावर विचार करताना वाटू लागले आहे.

माझे लेखनकलेतील प्रयोग हे शब्द उच्चारताना मला गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगाची आठवण होते. स्वतःच्या जीवनाकडे इदं न मम अशा अलिप्तपणे पहायची गांधीजींसारखी ज्याची वस्तुनिष्ठ भूमिका घेण्याची साधना झाली आहे, त्यानेच आपल्या अंतःकरणाच्या प्रयोगशाळेत दुसऱ्याला डोकावण्य़ाची परवानगी द्यावी. नाही तर क्षणोक्षणी आपली आपण करी स्तुति अशांचा जो वर्ग समर्थांनी सांगितला आहे, त्यात तर आपण शिरत नाही ना, ही भीती सदैव अस्वस्थ करीत राहते. फाजील विनयाच्याही भूमिकेत ढोंग दडून बसलेले आणि स्वतःशी फाजील कठोर होण्याच्याही प्रकारात सूक्ष्म अहंकारपूजा चाललेली चाणाक्ष रसिकाला दिसू शकते. अशा परिस्थितीत माझ्या विनोदी लिखाणावर काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें म्हणून सुटका करून घेणे हा सर्वांत उत्तम मार्ग.

परंतु केवळ एवढ्याच एका कारणासाठी मी माझ्या विनोदी लिखाणासंबंधी त्याचे जे काही चुकून-माकून प्रयोग होऊन गेले असतील त्यासंबंधी बोलायला असमर्थ आहे असे नव्हे. तर ज्या मनाच्या अवस्थेत मी विनोदी लिखाण लिहिले अगर लिहितो ती अवस्था खरोखरीच आपण नवीन प्रयोग करायला बसलो आहोत याची जाणीव ठेवून लिहिणाऱ्या लेखकांची आहे का? मला वाटते, माझी भूमिका तशी नाही. आपण विनोदात नवीन प्रयोग करू या, असा संकल्प सोडून मी कधीही लिहायला बसलो आहे असे मला वाटत नाही. कारण विनोद हा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. हा एक माझा स्वभावाचा दोष आहे. मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि ती माझा छळ करू लागते. सुंदर दिवाणखान्यात उत्कृष्ट कोच, तिपाया, फुलदाण्या, पितळी कुंड्यांतले बालतमाल ह्यांच्या राजस मेळाव्यात गौतम बुद्धांचा पुतळा पाहिला की सामान्यतः कोणालाही त्या सौदर्यात भर पडल्याचा भास व्हावा. मला अशाच सुंदर दिवाणखान्याचा त्याग करून गेलेला सिद्धार्थ दिसतो. आणि त्या घराच्या मालकांची गंमत वाटते. तारतम्य सुटलेले दिसते, अनौचित्य दिसते आणि विनोदाचा कली नलाच्या न भिजलेल्या पावलांतून शिरलेल्या कलीसारखा माझ्या डोक्यात शिरतो. माझ्याच का विनोदबुद्धी असलेल्या कोणाच्याही डोक्यात शिरतो. त्यामुळे माझ्याआधीच्या विनोदी लेखकांनी केले नाही ते मी केले काय, असा प्रश्न मी स्वतःला विचारू लागलो की मला निश्र्चित उत्तर सापडत नाही. कोल्हटकर, गडकरी, अत्रे, चिंतामणराव जोशी, शामराव ओक, आणि अत्यंत नम्रतेने त्यांच्यामध्ये अंग चोरून बसलेला मी! ह्या ज्येष्ठ लेखकांनी हाताळला नाही असा विनोदाचा कुठला भाग मी उचलला, या प्रश्र्नाचे उत्तर कुठलाही नाही हे मला द्यावे लागेल.

आधुनिक लघुकथा अगर नवकविता यांचे तसे नाही. कथासूत्र नसलेली कथा हा मराठीतला नवा प्रयोग आहे. अगर अंतरमनाच्या भूलभुलैयामध्ये वाट चुकायला लावणारी नवकविता हा काव्यातला नवा प्रयोग आहे. शेंगेत प्रोफेसर कोंबणारा गंगाधर गाडगीळांच्या मनाचा चाळा यापूर्वी मराठी लघुकथेत नव्हता. संध्याकाळचा चेहरा त्यांनी पहिला आणि लोकांना दाखवला. मर्ढेकरांनी जीवनाचा कोटा उलटा करून पाहिला आणि आतली अस्तराची शिलाई दाखवली. रसिकांनी हे प्रयोग चांगले म्हणावे अगर त्याला नाके मुरडावी. परंतु मराठी भाषेच्या ह्या उपासकांनी साधनेचा नवा योग स्वीकारून त्यात नवे प्रयोग केले यांत शंका नाही. मराठीच्या संसारात त्यामुळे इतर काही आले न आले, तरी वैचित्र्य आले हे खास, साहित्याच्या मंदिरातील विनोदाच्या पोटमाळ्यावर माझ्या प्रतिमेचे जे उंदीर खडखडले ते फारसा काही निराळा पराक्रम करू शकले, असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. त्यामुळे मी फार तर माझ्या विनोदाची वैशिष्ट्ये सांगू शकेन.

गद्य विडंबन हे माझ्या लिखाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असावे. काव्याच्या क्षेत्रात अत्र्यांच्या झेंडूच्या फुलांनी अलौकिक आघाडी गाठली. गद्य विडंबनांत मी तितका उंच पोहोचलो किंवा नाही कोण जाणे! परंतु मर्मभेद हे जे विडंबनाचे कार्य ते मात्र मी निश्र्चित केले. माझ्या खोगीरभरती आणि नसती उठाठेव ह्या दोन्ही संग्रहात जास्तीत जास्त संख्या असल्या गद्य विडंबनांची आहे. असल्या लेखांचा आढावा घ्यायला लागलो म्हणजे साहित्यक्षेत्रातल्या काही प्रवृत्तीची मी सगळ्यात जास्त विडंबने केली आहे, असे मला दिसते. विद्वत्तेचा जाड भिंगांचा चष्मा नाकावर ठेवून जीवनाकडे पुस्तकांच्या आडून पाहणारी मंडळी मला सतत विषय पुरवीत आली आहेत. विद्वत्ता ही चेष्टा करण्यासारखी गोष्ट नाही, परंतु विद्वत्तेचे प्रदर्शन दिसले की माझी लेखणी माझा हात धरून कागदावरून मला ओढीत नेते. आणखी एक रस आणखी एकच प्याला अगर एका विद्वत्तापूर्ण ग्रंथावरील अभिप्राय सहानुभाव संप्रदाय हे लेख असल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करणाऱ्या शैलीची विडंबने आहेत.

खेड्यांतून कुस्त्या ज्यांनी पाहिल्या असतील त्यांना आठवत असेल की, पहिलवानांच्या कुस्त्या आटोपल्या की, गल्लीतली पोरे उगीच दंड थोपटून त्या आखाड्यात माकडउड्या मारायला लागतात. साहित्यातदेखील गहनगंभीर विषयावर महामल्लांची युद्धे चालू असताना काही काडीपैलवान आपल्या चष्म्याच्या काड्या सावरीत लेखण्या उडवू लागतात! स्वतःच्या एखाद्या वाक्याचे ठिगळ जोडून दुसऱ्या विद्वानांच्या उताऱ्यांच्या गोधड्या मुद्रणयंत्रावरून वाळत टाकलेल्या दिसल्या की त्यांचा कोट ओढायची सुरसुरी मला अनावर होते. त्यांचा तो गांभीर्याचा आव पाहिला म्हणजे, प्राथमिक शाळेतला पहिली-दुसरीतला पोरगा औरंगजेबाच्या वेषात स्वतःच्या उंचीइतकी दाढी लावून आपल्याच वयाच्या संभाजीला छत्लपती संभाजी लाजे, आम्ही तुम्हांला गिलफदाल कलीत आहोत असे म्हणत, नसलेली छाती फुगवण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतो. त्याची आठवण होते. आणि मग साहित्य आणि साहित्यातले रुसवे-फुगवे, केळवणे आणि मानपानांची मौज वाटू लागते. जातीला जात वैरी म्हणा हवे असले तर, परंतु साहित्यिकांमधील असल्या प्रवृत्तींचे विडंबन हे मी माझ्या लेखणीतले ठळक वैशिष्ट्य समजतो.

अर्थात इथे एका गोष्टीचा खुलासा करणे आवश्यक आहे. पुष्कळदा एखाद्या लेखांतून काही व्यक्तींचे तोंडवळे दिसतात. आणि हे विडंबन अमक्या एका लेखकाचे आहे असे म्हणण्यात येते. आणि वा! अमक्या अमक्याची छान खोड मोडलीतअसे सर्टिफिकेट देत काही मंडळी येतात. हा माझ्यावर अन्याय आहे, असे पुष्कळदा मला वाटते. मी आता म्हणालो त्याप्रमाणे विडंबन हे प्रवृत्तीचे आहे, व्यक्तीचे नव्हे. किंबहुना विद्वत्तेचे प्रदर्शन हे कुणी एकच साहित्यिक करतो असे नाही, अनेक करतात. फक्त चित्रकार ज्याप्रमाणे एखादे मॉडेल पुढे ठेवून चित्र काढतो त्याप्रमाणे आधाराला एखाद्या लेखकाची शैली घेऊन विडंबन करणे हे शक्य आहे. परंतु माझ्या लेखात तयार झालेली व्यक्ती ही अनेक व्यक्तींच्या विविध छटा घेऊन निर्माण झालेली तिसरीच व्यक्ती असते. किंबहुना ज्या ठिकाणी माझ्या लेखानंतर हे अमक्यालाच उद्देशून मी लिहिले आहे असे बऱ्याच वाचकांना वाटल्याचे मला कळते त्या ठिकाणी माझ्या विडंबनाचा व्यक्तींच्या पलीकडे जाण्याचा माझा हेतू फसला, असे वाटून मला वाईटही वाटते. कारण शैलीच्या, शब्दयोजनेच्या अगर तंत्राच्या दृष्टीने मी प्रयोग केले आहेत की नाही, हे माझे मलाच अजून नीटसे उमगले नसले तरी कोणत्याही व्यक्तीला नामोहरम करण्याचा हेतू मनात बाळगून मी विनोदी लिखाण केले आहे असे मला मनापासून वाटत नाही.

टीकाकार माझ्या विनोदाला बुद्धिनिष्ठ विनोद म्हणतात. साहित्य आणि साहित्यिक याभोवतीच माझा विनोद घोटाळत राहतो. त्यामुळे माझ्या वाचकांचे वर्तुळ फार मर्यादित होते, असाही एक आरोप माझ्या लिखाणावर केला जातो. धुंडिराज, कामण्णा, पांडुतात्या, चिमणराव, दाजी ह्यांच्यासारखी विनोदी व्यक्तिरेखा मी मराठीच्या कुटुंबात आणून सोडली नाही, असेही म्हणण्यांत येते, ते काही अंशी खरेही आहे. परंतु अशी व्यक्ती जरी आणली नाही तरी अशा व्यक्तींचा समूह मात्र मी बटाट्याची चाळ बांधून आणला. ह्या चाळीत माझी जीव रमतो. ही सर्व मंडळी मला आवडतात. सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच्च. मंगेशराव, म्हळसाकांत पोबुर्पेकर, नागूतात्या आढ्ये वगैरे मंडळी ह्या चाळीत राहतात, धडपडतात, रुसतात, रागावतात, पुन्हा एकत्र होतात. दोन खोल्यांच्या बिऱ्हाडांत राहणारी ही जनता अमर आहे.

बटाट्याची चाळ मला अनेक विषय पुरवीत आली आहे. मात्र तेथील जीवनातील विसंगती दाखवताना त्यांवरचे माझे प्रेम अजिबात कमी झाले नाही. त्यांची वागण्याची पद्धत त्यांनी बदलली असे मला वाटत नाही. आणि मीच काय परंतु ख्रिस्तापासून गांधीपर्यंत कोणीही सांगून ते ती बदलतील असे मला वाटत नाही. कारण त्यांच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानाशी ती मंडळी रममाण झाली आहेत. तिथले सारे हर्षखेद त्यांना मंजूर आहेत. दोन खोल्यांच्या बिऱ्हाडात त्यांना कसलाच अडथळा वाटत नाही. ही परिस्थिती योग्य आहे की अयोग्य, हे ठरविण्याचे काम माझे नाही. किंबहुना जीवनात चांगले आणि वाईट ह्याचे पॅकबंद कप्पे करता येतील. असे मला वाटत नाही. बटाट्याची चाळ आजवर जशी चालत आली तशीच पुढे चालणार, असे मला वाटते. वरपांगी बदल होती पण पिंड कायम! अर्थात ह्या चाळीवरील लेखांत देखील विडंबनकर्त्याचा माझा पिंड दिसून येतो.

विडंबनाला कुण्या विद्वान टीकाकाराने बिनभांडवली धंदा म्हटले आहे. मला ते पटत नाही. जीवनाची चांगली ओळख असल्याखेरीज विडंबन करता येत नाही. शब्दांच्या बुरख्याआड दडलेले पांडित्य शोधायला डोळ्यांत सामर्थ्य लागते. व्यक्तिगत द्वेषाच्या भावनेच्या पलीकडे जावे लागते आणि जीवनातल्या साऱ्या धडपडींवर, साऱ्याच मानवी व्यापारांवर खूप प्रेम असावे लागते. मनात करुणेचा झरा वहावा लागतो, तरच विनोदी लिखाण संभवते. अन्यायाची चीड आली की विनोदाला उपरोध उपहासाची धार येते; परंतु त्यांतून अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या अज्ञानाची कींव नष्ट झाली की विनोदाला निंदेचे स्वरूप येते. मी जर कुठले प्रयोग सतत चालू ठेवला तर हा निंदेचा भाग टाळण्याचा. निंदेतून क्षणिक करमणूक होते, परंतु ;माणूस म्हणून लेखकाची किंमत घसरते आणि ती घसरली की कुठल्याही साहित्यप्रकाराला आणि साहित्यातल्या प्रयोगाला किंमतच उरत नाही. विनोद लिखाणात हा मी एक नवा प्रयोग म्हणत नाही. परंतु कोल्हटकरा-गडकऱ्यांनी विनोदात अनिष्ट प्रवृत्तींचे उपरोध-उपहासाने जे पितळ उघडे केले आणि व्यक्तिनिरपेक्ष असा जो विनोद रूढ केला, तीच परंपरा नव्या काळातल्या तसल्या प्रवृत्तींच्या बाबतीत चालू ठेवण्याचा प्रयोग हीच विनोदी लेखक म्हणून माझी धडपड आहे.

उदाहरणार्थ, कुठल्याही एका विशिष्ट पत्रकाराची चेष्टा करावी या उद्देशाने न लिहिता मजकुरापेक्षा मथळ्यांनाच महत्त्व देणाऱ्या वर्तमानपत्री लिखाणावर मी पत्रकार नावाच एक लेख लिहिला होता. त्यांत वर्तमानपत्री शैलीचे विडंबन करणे हा मुख्य हेतू आहे. उदाहरणार्थ, निळू ह्या बालपत्रकाराने स्वतःच्या मुंजीचे काढलेले निमंत्रण पहाः

वर मथळा ब्रह्मचर्य व्रताची कडकडीत प्रतिज्ञा

येथील सुप्रसिद्ध गृहस्थ (ह्यापेक्षा आमच्या तीर्थरूपांबद्दल आम्हाला काहीच लिहिता येण्यासारखे नव्हते) श्री वासुदेवराव धुंडिराज गायधनी यांचे ख्यातनाम व बालपत्रकार चिरंजीव लंबोदर उर्फ निळू यांनी रविवार दिनांक अमुक अमुक रोज सकाळी आठ वाजता आलग्न ब्रह्मचर्यव्रताची कडकडीत प्रतिज्ञा करायचे ठरविले आहे. सदरहू समारंभात पुण्यामुंबईचे बाल व प्रौढ ब्रह्मचारी जमणार आहेत असे कळते. तरी आपण आपल्या लेकीसुनांसह सदर अपूर्व समारंभास उपस्थित राहावे आणि असल्या कठोर व्रतपालनप्रसंगी बटूस धीर द्यावा.

पत्रिकेवर मारुतीरायाचा एक तीन इंची ब्लॉक टाकायलाही मी कमी केले नाही. कंपॉझिटरने मात्र आपल्या पूर्वजांच्या परंपरेला अनुसरून निष्काळजीपणाने मारुतीच्या ब्लॉकखाली माझे नाव छापले होते. इत्यादी. ह्यात वतर्मानपत्री मथळ्यांचेही विडंबन होते.

वर्गयुद्ध नावाच्या शाळेच्या हस्तलिखित दैनिकाचे काही मथळे पाहाः ;शेवटची परीक्षा हुकली जोशी सर, तुम्ही कुठे जाल? हेडमास्तरांच्या खोलीत रावण ड्रॉइंग मास्तर बाळंतीण झाले परवचाचे पाश तोडा, इत्यादी मथळ्यांची विडंबने काही प्रसिद्ध मथळ्यांवरून सुचली, हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.

वर्तमानपत्राप्रमाणे काव्याच्या प्रांतातही नवकाव्याचा गाभा समजून न घेता अनेक येरू; नवकवितेशी दंगा करू लागले आणि आपापली काव्ये प्रसिद्ध करू लागले, तेव्हा मला त्याचे व्यवच्छेदक लक्षण हा लेख सुचला आणि चमत्कारिक असे नवसंकेत म्हणजेच नवकाव्य असे समजणाऱ्या बुटइष्टाकिण्या घालून साहेब बनू पाहाणाऱ्या माजी रावबहादुरांसारख्या कविमंडळींना जरा सबुराने घ्या असे सांगायची पाळी आली आहे असे मला वाटते, आणि

गटारांतल्या निळ्या पुराण्या,
जोड जानवी वरती काखा,
तबकडींतल्या मेल्या गाण्या,
शब्द फुटतसे फुटक्या शंखा

अशांसारख्या विडंबनाच्या ओळी मी लिहिल्या.

सामान्यतः विनोदी उपमा देताना ज्या वातावरणातील लेख असेल त्याच ;लायनीतल्या उपमा मी दिल्या आहेत. अंगुस्तान विद्यापीठ या लेखात शिंपी कॉलेजचे प्रिन्सिपॉल ठिगणे भाषण करताना त्यांच्या जीभेवर त्या दिवशी प्रत्यक्ष फाफचे मशीनच नाचत होते किंवा ठिगळ्यांच्या उत्साहाला नव्याने तेल दिलेल्या मशीनसारखा जोर चढला अगर एका शिंप्याने एकजुटीचे महत्त्व सांगताना आपण एकमेकांना असे चिकटून राहू की जसे कपड्याला अस्तर अशी काही उदाहरणे देता येतील.

अर्थात केवळ गद्य विडंबनेच मी लिहिली नाहीत. संगीत चिवडामणी अण्णा वडगावकर, बोलट लखू रिसवूड, प्रा. विश्र्व अश्र्वशब्दे अशी काही विनोदी व्यक्तिचित्रेही लिहिली. इथे देखील अनेक सारख्या चेहऱ्यांच्या मंडळीतून एक नवा चेहरा मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त एक व्यक्ती डोळ्यांपुढे ठेवून यांत्रिक फोटो काढता येईल. स्वतंत्र जिवंत चित्र काढता येणार नाही. आणि ललितसाहित्य हे हुबेहूब चित्र काढणाऱ्या फोटोग्राफीसारखे नाही. केवळ प्रतिकृती म्हणजे साहित्य नव्हे. ती कृती आहे, प्रतिकृती नाही. आणि विनोदी लिखाणही त्याला अपवाद नाही.

माझ्या विनोदी लेखनाची कथा ही अशी आहे. त्यातल्या प्रयोगांचा पत्ता मला नीट लागलेला नाही. वास्तविक हे कार्य माझे आहे, असे मला वाटत नाही. स्वैपाक्याने पदार्थ करावे. आरोग्यशास्त्राशी त्याला काय कर्तव्य आहे? साहित्यात देखील चिजा बनविणारी मंडळी आम्ही. रस पंडितांनी जाणावा. गद्य विडंबनाच्या आणि अन्य विनोदी चिजा बनवणारा एक लहानसा कारागीर म्हणून एवढी मात्र खबरदारी मी घेतो की, हातात धरलेल्यांची गुळगुळीत व्हावी, मात्र जखम अजिबात होऊ नये.

- पु.ल. देशपांडे
लोकसत्ता


Monday, March 28, 2022

आयुष्य घडविणारा विनोद - (अथर्व रविंद्र द्रविड)

"मे महिन्याच्या अखेरचे दिवस होते रत्नागिरीहून पहाटे 5 वाजता निघणाऱ्या एसटीतली ही कथा आहे" हे वाक्य त्या वाक्यातील कथा आणि ती कथा सांगणारा माणूस कोण हे जर तुम्हाला माहिती नसेल तर महाराष्ट्रात जन्म घेऊन तुम्ही मोठा गुन्हा केलात असं मला म्हणावं लागेल. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे या युगपुरुषाच्या जन्माला आज 100 वर्षे पूर्ण झाली. विनोद म्हणजे नक्की काय वेडीवाकडी थोबाड करून किंवा अंगविक्षेप करून विनोद होत नाही तर विनोद निर्माण होतो तो शब्दांच्या ताकदिने.ह्याच शब्दांच्या ताकदीने हजारोंच्या जनसमुदायाला हसवण्याची ताकद असलेला माणूस म्हणजे पुल. आयुष्यात प्रत्यक्ष त्यांचा विनोदांची मजा घेण्याची संधी मिळाली नाही पण केवळ कॅसेट्स व सीडी च्या माध्यमातून देखील पुलंनी आयुष्यावर पाडलेल्या प्रभावाने मी खरंच आजन्म उपकृत झालोय.

कोणताही प्रवास हा पुलंच्या कॅसेट्स शिवाय पूर्ण होतंच नाही.आपल्या प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वतःचा एक बंगला किंवा मोठ्या इमारतीत फ्लॅट असावा पण मला विचाराल तर मी देवाला हेच सांगेन की पुढचा जन्म दिलास तर तो बटाट्याच्या चाळीत दे.बटाट्याची चाळ च्या माध्यमातून पुलंनी साक्षात एक कल्पना सृष्टीचं आपल्यापुढे उभी केली. साडेतीन तास एक माणूस जवळपास 50 एक पात्र आपल्यापुढे घेऊन येतो यातूनच त्यांचा अभिनय कौशल्याची ओळख पटून जाते.

बऱ्याचदा स्वतःबद्दल 4 ओळी देखील आपल्याला सांगता येणार नाहीत पण या माणसाने धोंडोपंत भिकाजी जोशी (बेमट्या)ह्या काल्पनिक माणसाचे संपूर्ण आत्मचरित्रच "असा मी असामी" या पुस्तकातून मांडले आहे. असा मी असामी मधील विनोद कधीही आठवले तरी तेवढेच हसू नेहमी येते . सर्वप्रथम हे पुस्तक वाचल्यावर एका लग्नात नवरी मुलगी खरोखरच "समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता आणि बेमटे रावांच नाव घेते माझा नंबर पहिला" असा काही उखाणा घेते की काय असे वाटु लागले

आपल्या लेखनातून पुलंनी आयुष्यातील प्रत्येक पैलूंचे दर्शन घडविले व विनोदाची ताकद काय ह्याचा परिचय करून दिला. 21 तास घडयाळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना 3 तास स्वप्न बघण्याची संधी त्यांच्या नाटकांतून त्यांनी दिली.

आयुष्यात जर कधी एकटे पडलात तर व्यक्ती आणि वल्ली वाचा कारण माणस सोडून जातील पण हरी तात्या,नाथा कामत, अंतू बर्वा,सखाराम गटणे, बबडू ही पुलंची पात्रं कधीही सोडून जाणार नाहीत व आयुष्यात खूप काही शिकवून जातील.

असो अश्या ह्या महामानवाबद्दल मी एवढे बोलणे म्हणजे काजव्याने सूर्याचे वर्णन केल्यासारखे आहे( सखाराम गटणे मधील वाक्य उलटे करून वापरले).

आजच्या काळात बंदूक व पैशाच्या जीवावर अनेक लोक भाई होतात... पण शब्दांच्या ताकदीवर झालेले *भाई* एकच ते म्हणजे *पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे*

- अथर्व रविंद्र द्रविड

Friday, March 25, 2022

काही साहित्यिक भोग क्रमांक तीन

स्थळ: आमचे घर.
वेळ: रात्रीचे दोन
टेलिफोनची घंटा वाजते. आम्ही दचकून उठतो. छातीवरील प्रा. कादंबिनी किरमिजे यांचा लेख असलेले--सॉरी, छातीवरील 'प्रायोगिक रंगभूमीवरील नवीन समस्या' हा कादंबिनी किरमिजे यांचा लेख असलेले मासिक खाली पडते. निद्रानाशावर त्यांचे लेख हा एक अक्सीर इलाज आहे.

टेलिफोन : ट्रिंग... ट्रिंग...
मी : हलो
टेलिफोन : मी दैनिक 'जनजागरण' मधून बोलतोय.
मी : बोला.
जनजागरण : आपली प्रतिक्रिया हवी आहे.
मी : कोण गेलं हो?
जनजागरण : गेलं नाही कुणी
मी : मग कसली प्रतिक्रिया ? ( एके काळी कुणी आटोपले की 'क्रिया' करण्यात माणसे गुंतायची. आता 'प्रतिक्रिया'ही करावी लागते.
जनजागरण : कापूस एकाधिकार योजनेसंबंधी जे सरकारचे धोरण आहे त्यासंबंधी तुमची एक साहित्यिक म्हणून प्रतिक्रिया हवी.
मी : (अद्यापीही मी त्या लेखरूपी झोपेच्या गोळीच्या अमलाखाली आहे की काय अशी शंका येऊन) कापूस एकाधिकार योजना ?
जनजागरण : यस !
मी: कुणाला फोन करायचा होता आपल्याला ?
जनजागरण : आपल्यालाच ! एक साहित्यिक म्हणून प्रतिक्रिया हवी आहे.
मी : पण कापूसखरेदीतलं मला काय कळतंय ?
जनजागरण : साहित्यिक असून ह्या ज्वलंत प्रश्नाकडे आपलं लक्ष नाही?
मी : कापूस एक ज्वलंत वस्तू आहे एवढं मला ठाऊक आहे.
जनजागरण : विनोद न कराल तर बरं होईल.
मी : कुणाचं? आज कापसावर प्रतिक्रिया विचारलीत, उद्या कोळशावर विचाराल.
जनजागरण : पण एक साहित्यिक म्हणून तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत.
मी : अहो, त्या पुऱ्या करायला आम्ही कागदावर प्रयत्न करतो-कापसावर नव्हे.
जनजागरण : पुन्हा तुम्ही विनोदात शिरताय.. 'जनजागरणा'ला ह्याचा गंभीरपणाने विचार करावा लागेल.
मी : प्लीज .. असं काही करू नका. रातपाळीच्या वेळी गंभीर विचार करायला लागलात तर झोप येईल. काही नोकरीचा विचार करा.
जनजागरण : (दाबात) म्हणजे कापूस एकाधिकार योजनेबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही तर--
मी : अशी प्लीज दमदाटी वगैरे नका करू. तुम्ही सांगा ना तुमची प्रतिक्रिया काय ते.
जनजागरण : आम्हाला जनतेच्या प्रतिक्रिया हव्यात--
मी : तुम्ही जनता नाही वाटतं?
जनजागरण : आम्ही ह्या क्षणी पत्रकाराच्या भूमिकेत आहोत.
मी : आम्हीही यावेळी झोपेतून जागं केलेल्या माणसाच्या भूमिकेत आहोत--थांबा थांबा . ही घ्या प्रतिक्रिया.. कापूस एकाधिकार योजना हे शब्द कानी पडल्याबरोबर मला खडबडून जाग आली. मी म्हणालो, हे काय चाललंय? एवढं पुरे ना?
जनजागरण : जस्ट ए मिनिट.. हो.. सोळा शब्द आहेत. बरोबर बसताहेत..थँक्यू.

(काही साहित्यिक भोग - अघळपघळ )
लेखक - पु. ल. देशपांडे 

Tuesday, March 22, 2022

वंग-चित्रे

मंडईत ज्या ज्या भाज्या सस्त्या लावल्या असतील त्या आणाव्यात. अमुक एक भाजीचे तमुक भाजीशी गोत्र जमते की नाही याचा विचार करू नये. उदा. सुरण, कार्ली, फरसबी, रताळी, लाल भोपळा, कच्ची केळी, बटाटे, पालक, अळू, वालपापडी, वांगी, पडवळ वगैरे. बाजारातून आणल्यावर त्या धुण्याच्या किंवा त्यांच्या साली, शिरा वगैरे काढण्याच्या लफड्यात पडू नये. त्या भाज्या मनाला येतील त्या आकाराच्या चिराव्यात. शेवग्याच्या शेंगा पातेल्यात अखंड बसणार नाहीत हे ध्यानात घेऊन (बरं का भगिनींनो) जराशा तोकड्या कराव्यात.

अळू, सुरण वगैरे गळ्याशी खाजतात. परंतू खाणार्‍याच्या गळ्याची आपण कधी चिंता करू नये. हे सारे चिरून पाण्यात उकळत ठेवावे. मग त्यात मीठ, मिरची, गूळ, धने बांधून आणलेल्या पुडीचा दोरा, जमल्यास कागद, चार नवर्‍या रंगतील इतकी हळद आणि पातेल्याच्या (आणि खाणार्‍याच्या) गळ्याशी येईल इतके सरसूचे तेल घालावे. आणि सगळ्याचा शिजून लगदा होईपर्यंत हे सारे शिजवावे. हे शिजायला टाकले असताना हवे तर सिनेमाचा मार्निंग शो पाहून यावे. गावातून चक्कर मारून यावे किंवा उरलेले सरसूचे तेल अंगाला लावून उन्हात बसावे. 

प्रत्येक भाजीला शिजायला निरनिराळा वेळ लागत असल्यामुळे हुं का चूं न करता सार्‍या भाज्या राजकीय कटासारख्या गुप्तपणे शिजत राहतात. आणि कालांतराने कम्युनिस्ट राजवटीसारखे प्रत्येक भाजीचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट होऊन बटाटे, सुरण यांचेच काय पण ढवळताना स्वयंपाक्याच्या कडोसरीची अधेली आत पडली तरी तिचेही पार पिठले होऊन जाते. सरसू वगैरे बेरकी भाज्या तरीही स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करतात. तुरीसारखी कणखर डाळ मुगासारखी अपमान गिळून उगी राहात नाही. टणकच राहते. ते फारसे मनावर घेऊ नये. हा पदार्थ देखील खानावळीचे मेंबर भरपूर खातात. त्याअर्थी तो रुचकर असावा.

- वंग- चित्रे
पु. ल. देशपांडे

Monday, March 14, 2022

ललित आत्मपरिचय कसे लिहावे (एक मार्गदर्शन)

...पूर्वी ' मी व माझे लेखन ' हा लेख साठीच्या आसपास येताना लिहीत. हल्ली ' अ आ इ ई ' एवढे लिहिल्यावरसुद्धा लिहिता येतो. आता उदाहरणार्थ : किशोर कोरे याने ' ग म भ न ' ही निर्मिती केल्यानंतर लिहिलेला आत्मपरिचय पाहा. किशोर कोरे हा अगदी नवसाहित्यिक आहे. कारण गेल्या महिन्यापासूनच तो लिहायला लागला.

" आमचा बाप ग्रेट आहे. आणि आईसुद्धा. आमच्या बापाचं आईवर प्रेम नसावं. कारण बापाला प्रेम काय ते कळतं म्हणून मला शाळेत पोचवायला येतो आणि आमच्या वर्गातल्या बाईशी बोलत बसतो. बाप सिगारेट ओढतो म्हणून आई त्याला बोलते. बापाने सिगारेट ओढली तर माझ्या आजाचं काय जातं ? मला आजे दोन आहेत. एक आईचा बाप आणि एक बापाचा बाप. हेही ग्रेटच.

मी ग म भ न र स पर्यंत लिहिलं. बाईला त आणि ळ येत नसावा. पुढं जातच नाही. 'स'शीच येऊन थांबली आहे. आमची बाई दॅट इज निमाताई. तिला काहीच येत नाही. तिला मोटरचा उच्चार 'कार'असा आहे हे ठाऊक नाही. बालगीतं म्हणजे वैताग. म्हणून वर्गातली बाकीची भुक्कड गर्दी 'शाणी माजी भावली' म्हणताना फक्त मी तेवढा 'बोल राधा बोल' म्हणत असतो.

मी कधी शाळेत जाईन असं मला वाटलं नव्हतं. बाप उचलून घेऊन गेला. शाळा हा साला ताप आहे. आपण शिकणार नाही. कारण शिकण्यासारखं काहीच नाही. होतं ते शिकलो. आता फारतर शिकलेल्या अक्षरांना टोप्या घालायच्या, नाहीतर काने, मात्रा ओढायचे. म्हणजे वैताग. बालगीतासारखा. खरं तर ग ला म कां नाही म्हणत ? सगळी भाषा बदलली पाहिजे. ' मंमं ' म्हणजे जेवण हे कळत असताना जेवण हे कशाला शिकायचं ? भू भू म्हणजे कुत्रा हे कुत्र्यालासुध्दा कळतं मग कु कशाला नि त्रा कशाला शिकायचा ? पण ' जो जो ' म्हणजे झोप तेव्हा ' ज ' शिकला पाहिजे आणि ' कुक् कुक् ' म्हणजे आगगाडी तेव्हा 'कु' शिकलाच पाहिजे. म्हणजे वैताग.
एकंदर सगळा वैताग आहे हे आजवरच्या आयुष्यातल्या अनुभवावरुन सांगतो.

तिस-या वाढदिवसाला बाप काय देतो पाहीन, नाहीतर चक्क बापाला डॅडी न म्हणता बाप म्हणेन. हे बाप लोक आम्हाला जन्माला घालण्यापूर्वी विचारीत कां नाहीत ? आमच्या बापाचं नाव मोरेश्वर म्हणून मी त्याला नामानिराळा ठेवतो आणि माझं नाव फक्त किशोर कोरे एवढंच सांगतो. एक पाव्हणा म्हणाला, ' अरे तुझ्या बापाचं नाव सांग.' मी म्हटलं, ' हा इथे बाप आहे त्यालाच त्याचं नाव विचारा. ' पाव्हणा आडवा. एका कॅडबरीत काय काय म्हणून सांगायचं ? पाव्हण्याच्या बायकोने माझी पापी घेतली. तिला मी माझं नाव 'किशोरकुमार' असं सांगितलं. ती म्हणाली, 'सगळं नाव काय ?' मी म्हटलं, 'दिलीपकुमारचं सगळं नाव विचारुन या.' पाव्हणी करपली. आपण नाही कोणाला भीत. माझी महत्वाकांक्षा गांजा ओढणं ही आहे. "

माझी कादंबरी लिहून होईपर्यंत मी कादंबरीकार होईन असं मला वाटलंच नव्हतं. कारण साहित्याची भंकस आपल्याला पटत नाही. आमच्या फेवरीट हातभट्टीच्या अड्ड्यावर पंडा भोरकरनं बेट घेतली. " लिहून दाखव कादंबरी. " आपण दिली. आठव्या दिवशी तीन बाटल्या शाई आणि पाच रिमं कागद चिताडून काढले शब्दाच्या मुडद्यांनी. झाली कादंबरी. बगलेत मारून अड्ड्याकडे जात होतो. कामू नाक्यावर झाडम्या भेटला. स्कूटरमागं यल्लम्माला घेऊन. त्याला वाटलं , काखेत जिन्नस आहे. मी म्हटलं ' झाडम्या येड्या ही कादंबरी " .झाडम्या म्हणाला " मारो गोली ." आणि स्कूटरला किक मारून यल्लीसकट पसार. मी म्हटलं याची केस केली पाहिजे. आमच्या गॅंगमधला जेम्स बॉण्ड आहे मी. टॅक्सीला दमडा नाही खिशात. म्हणून पॅन्ट विकणार होतो तर नाक्यावरच्या जरीपुराणेवाल्याकडे कवितासंग्रहाचे गठ्ठे विकायला प्रकाशक आला होता. त्याला म्हटलं खाकेत कादंबरी आहे. केवढ्याला घेतोस ? तो म्हणाला केवढ्याला देतोस ? मी म्हटलं घेशील तेवढ्याला. आधी टॅक्सीला पैसे दे. तेवढ्यात रद्दीवाल्याने कवितासंग्रह तागडीत तोलले आणि त्याला बावीस रूपये दिले. आपण खेचले आणि कादंबरी प्रकाशकाला देऊन बगल मोकळी केली. बावीस रूपये ! आपकमाईचे. बापकमाईचे तर दरमहा शंभर रुपये टिकवतो. बाप आपल्याला टरकून. पुढल्या महिन्यात बी.ए. परीक्षेला बसण्याबद्दल बोनस देणार आहे.लेकाचा बाप. तोवर बावीस रूपये ही सही. माझी कादंबरी बगलेत घालून प्रकाशक गेला. मी सरळ टॅक्सी गाठली आणि झाडम्याचा नाद सोडून सीधा गेलो आपल्या गॅंगच्या अड्ड्यावर. तिथे पंडा भोरकर आणि चिमण्या मल्हारी मार्तंड बसले होते चणे खात. बावीस रूपये आपकमाई. पंडा म्हणाला "ही काय भंकस . " चिमण्या म्हणाला "बूटपालिस केलंस काय ?" मी म्हणालो " आवाज बंद. जान निकालेगा. कादंबरीचा अॅडव्हान्स . बावीस रूपये. " पंडा म्हणाला "साली माझी आयडिया घेऊन कादंबरी लिहितोस " मी म्हटलं " तू व्हिक्टर बाॅटलनेकची नाही घेत ? " पंडाची जबान तुटली. चिमण्या म्हणाला "छोडो यार " मग मी छोडलं." पण आधी बीट मारलीस त्याचा पैशे मोज. मेरा पैशे मोज. " पंडा म्हणाला " कसली बीट " मी म्हटलं " कतरू नकोस प्यारे - कादंबरी लिहून दाखवायची बीट ! जबान बदलतोस ? दिला शब्द खरा कर " पंडा म्हणाला " शब्द खरा करायचा म्हणून कोणी सांगितलं ?" पंडाही ग्रेट. मग सहा रूपयांचा नंबरी जिन्नस आणला कालिन्याहून. आणि भेंडी बाजारात उस्मान कादरकडे मुर्गी चावली. दोन रुपये उरले. मी म्हटलं " यार लोक येवढे आपल्याला ठेवा. बापाचा मंथली हप्ता यायला अजून दोन दिवस आहेत" पंडा म्हणाला " जहन्नममे जाव " मग मी जहन्नममध्ये गेलो. इकडे प्रकाशकाने कादंबरी छापखान्यात नेली. प्रकाशक ग्रेट. कादंबरीला प्राइझ मिळवून दाखवलं.‌लोकही ग्रेट. त्यांनी विकत घेऊन वाचली. दुसरी लिहिली. तीही प्रकाशक बगलेत मारून गेला. तिलाही प्राइज. गॅन्गमधील यार लोक म्हणतात प्रकाशकाचा बगलबच्चा. मी म्हटलं " पहिल्या प्राइझमध्ये शर्ट घेतले दुस-यात बनियन तिसरं मिळालं तर प्यांटी घेणार ! आपल्याला साहित्य बिहित्य पसंत नाही. आपण औलिया." तेवढ्यात आपलं लग्न झालं. बाप म्हणाला दहा हजार हुंडा मिळतोय. मी म्हटलं बापाला " " फिकीर मत करो बेटा शादी करेगा. तुम्हारे लिये बॅन्क में नौकरी करेगा ! " आपण मॅनेजरला नाही भीत. मग शादी केली. हल्ली बॅंकेत नोकरी करतो. पंडा भोरकर गॅन्गशी बेमान निघाला. आमचा लीडर असून म्युन्सिपाल्टीत खर्डेघाशी करतो. आणि रस्त्यात भेटला तर तोंड चुकवतो. माझ्या कादंब-या खपतात म्हणून खार खातो. आपली आवड : बेकारातील बेकार सिनेमा आणि चरस , गांजा आणि अफू मिसळून हातभट्टी. नावडते लेखक : व्यास आणि वाल्मिकी. आवडते लोक : आपल्याला ग्रेट म्हणणारे.


किशोर कोरे (आगामी आत्मचरित्रातून)
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
संग्रह - अघळपघळ (१९९८)
(ललित , दिवाळी १९६५)

Thursday, March 10, 2022

एक पु.ल. फॅण्टसी ताऱ्यांवरची वरात - प्रभाकर बोकील

‘फॅन्टसी’ हा प्रकार पु.लं.नी तसा फार कमी हाताळला. जशी ‘गुळाचा गणपती’तील काही गाणी. विद्याधर पुंडलिक यांनी एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला होता, ‘‘शुद्ध फॅन्टसीवर आधारित विनोद मराठीतून का येत नाही?’’ पु.ल. म्हणाले होते, ‘‘मला वाटतं फॅन्टसीला लागणारं जादूचं वातावरण आपल्याकडे नाही. फॅन्टसीचं जग हे जादूच्या नगरीसारखं असतं. अशी फॅन्टसी आपल्या संस्कृतीत कमी आहे. आपल्याकडे तशी भुतंखेतं आहेत, पण त्यात भीती तसंच चेष्टेचं एलिमेंट जास्त.. एक कृष्ण सोडला तर, देवाचीसुद्धा भीती घालण्याकडे आपला कल जास्त असतो. आपल्याकडे मुलांचा खास सांताक्लॉजही नाही.. आपल्याकडे फॅन्टसीचा पहिला स्पर्श बालकवींच्या ‘फुलराणी’ या कवितेत आला!’’

‘ती फुलराणी’ पु.लं.नी थेट रंगमंचावर केली!

खरं तर रंगमंच-चित्रपट-दूरदर्शन या तीनही माध्यमांतून पु.लं.नी मुक्तसंचार केला, पण त्यांचं नाव जोडलं गेलं ते ‘एकपात्री’शी! ‘एकपात्री’ या शब्दापेक्षा ‘बहुरूपी’ हा शब्द त्यांना जवळचा वाटायचा. त्यांच्या एकपात्रीतदेखील ‘मूकनाटय़’ (माईम) हा प्रकार हाताळला ‘बटाटय़ाच्या चाळीत.’ व्हिक्टोरियात बसलेल्या माणसांचे गचके, ती थांबल्यावर होणाऱ्या अ‍ॅक्शनला भरपूर टाळय़ा पडत. पण माईमसाठी नृत्यशास्त्रासारखं थोडं तरी शिक्षण आवश्यक आहे, असं त्यांना वाटायचं. कोणत्याही व्यक्तीचं व्यंग शोधणं हा मूळ स्वभाव असल्यामुळे, त्यांना अजून एका गोष्टीची चुटपुट होती, व्यंगचित्र न आल्याची. ते म्हणत, ‘ड्रॉईंग मास्तरांनी माझ्या चित्रकलेशी जुळवून घेतलं असतं तर..’ तर तोही प्रकार त्यांनी हाताळला असता. कदाचित मग शब्दांवर अतोनात प्रेम करणाऱ्या पुलंना व्यंग दाखविण्यासाठी शब्दांचीदेखील गरज पडली नसती!

चार्ली चॅप्लिनच्या ‘ट्रम्प’ला देखील बोलपटापूर्वी ‘मूकपटांत’ अभिनयासाठी कधी शब्दांची गरज पडली नाही. पडद्यावर दिसणारे शब्द ही केवळ कथेची गरज असायची. चॅप्लिन तर पु.लं.चं दैवत.. ‘चॅप्लिन हा मला नेहमीच एकमेवाद्वितीय वाटत आला आहे. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर माझ्या डोळय़ांत पाणी आलं. मी चटकन हात जोडून लांबूनच नमस्कार केला.. नंतर हसू आलं, पण त्याला इलाज नाही.’ पु.लं.च्या घरात देवाची तस्वीर नसेलही, पण ‘संगीत-साहित्य-संस्कृती’त रमलेल्या या बहुरूप्याच्या दिवाणखान्यात तीन गोष्टी होत्या. शांतिनिकेतन येथील शर्वरी रॉयचौधुरींनी घडविलेला, बडे गुलाम अली खाँसाहेबांचा अर्धपुतळा ‘बस्ट’, रवींद्रनाथांचं सुंदर रेखाचित्र अन् चार्ली चॅप्लिनचं भिडणारं छायाचित्र! याच रॉयचौधुरींनी पु.लं.चा पाल्र्यातील ‘बस्ट’ घडविताना पु.लं.चा चष्माच उडवला होता.. कारण ‘चष्म्यामुळे डोळय़ांतील भाव हरवतात!’ आपल्याला तोपर्यंत पु.लं.चा चष्मा हा चेहऱ्याचाच एक भाग वाटायचा. चष्म्याआडूनचं मिस्कील हास्य हीच तर खरी गंमत. चष्म्यामुळे त्या मिस्कीलपणाला फ्रेम मिळायची. चष्मा काय, दाढी काय, अशा गोष्टींच्या आख्यायिकाच होतात. ‘एकदा चष्मा न लावलेले पु.ल. अन् दाढी उडवलेले पाडगांवकर पार्ले स्टेशनच्या ब्रिजवर समोरासमोर आले अन् एकमेकांकडे विचित्रपणे पाहात निघून गेले.. घरी गेल्यावर एकमेकांना फोन करून सांगितले, ‘‘डिट्टो तुझ्यासारखा प्राणी पाहिला फक्त चष्मा/दाढी नव्हता/नव्हती.’’

अशा आख्यायिकादेखील ‘फॅन्टसी’च!

वर्षभरापूर्वीच्या एका घटनेतून अशीच एक फॅन्टसी निर्माण (!) झाली.
पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या पु.लं.च्या घरी चोरी झाली, ही घटना खरी. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी-दूरदर्शनवाल्यांनी अशी कव्हर केली की, ‘पु.ल. कालबा झाले’ म्हणणारे पु.लं.चे वारकरी हबकलेच. खाडकन भानावर आले. खरं तर एरवीदेखील लेखकाच्या घरी-त्यातून मराठी लेखकाच्या घरी चोरी होण्याएवढं ऐश्वर्य तर स्वप्नवत्च! अगदी ‘पु.ल. देशपांडे’ झाले म्हणून काय झालं? तेसुद्धा ‘भाई’ ‘शब्दांच्या पलीकडल्या’ जगात गेले असताना.. पण ‘घडू नये ते घडले.’ त्यात ‘सुरांवरी हा जीव तरंगे’ पासून पु.लं.ची सुटका नाहीच. शिवाय ‘माझे जीवन गाणे’ असणाऱ्या पु.लं.ना सुनीताबाई जॉईन झाल्यावर ‘कधी वाऱ्यांतून कधी ताऱ्यांतून’ ‘निघाली वाऱ्यावरची वरात’ असा ‘पलीकडच्या’ जगातला प्रवास नव्याने सुरू झाला. ‘कोटय़ाधीश पु.ल’वरून कदाचित घबाड मिळण्याच्या उद्देशानं चोरानं फ्लटचं दार फोडलं..
 
..अन् ‘हे कुणी फोडिले दार’ असं ‘ही कुणी छेडिली तार’च्या लकेरीवर गुणगुणत, सुरांवरून तरंगत, शब्दांच्या पलीकडल्या जगातून पु.लं.नी रंगमंचावर एन्ट्री घेतली! त्यांच्याच घरात त्या ‘पाहुण्याला’ पाहून प्रश्नच पडला, ‘या घराचा मालक कोण? तरीही नेहमीच्या स्वभावानुसार हसून नमस्कार करीत त्यांनी पाहुण्याचं स्वागत केलं.

चोर-बीर असाल तर तुमचे कष्ट वाया गेलेयत्. इथं आता काय मिळणार तुम्हाला? चोरी-बीरी होण्याचा मलादेखील पूर्वानुभव नाही.. हां, आता आमच्या बटाटय़ाच्या चाळीत फुटकळ चोऱ्या भरपूर व्हायच्या. त्याहीपेक्षा हृदय चोरीच्या घटनाच जास्त.

‘‘या मालक, आज असं अचानक अपरात्री येणं केलंत, तेही दार फोडून.. साहजिकच आहे म्हणा, सांगून सवरून मीडियाला बरोबर घेऊन यायला तुम्ही कुणी मंत्री वा कार्यकर्ते नव्हेत.. ते दिवसाढवळय़ा दरोडे घालतात! अरे हो, पण तुम्ही उभे का, बसा ना.!’’
‘‘हो, हो, ब..ब.. बसतो. तुम्ही पण ब..ब.. बसा की..’’ चोराची ब..ब.. बोबडी वळली. काय माणूस (!) आहे हा. स्वत: मालक असून मलाच मालक म्हणतोय.. पण घर तर नेहमी बंद असायचं. असला भन्नाट अनुभव प्रथमच आल्याने, खट्टय़ाक्कन् चाकू उघडून मानेशी धरणं, पिस्तूल डोक्याशी धरणं वगैरे सराईतपणा तो विसरला अन् अवघडत धडपडत खुर्चीवर बसला. बसताना समोरच्या टीपॉयवरनं एक डबी खाली पडली..

‘‘हं. बोला आता. कसं काय येणं केलं? चोर-बीर असाल तर तुमचे कष्ट वाया गेलेयत्. इथं आता काय मिळणार तुम्हाला? चोरी-बीरी होण्याचा मलादेखील पूर्वानुभव नाही.. हां, आता आमच्या बटाटय़ाच्या चाळीत फुटकळ चोऱ्या भरपूर व्हायच्या. त्याहीपेक्षा हृदयचोरीच्या घटनाच जास्त. त्यावर लिहिलंयदेखील भरपूर. शिवाय आमच्या शब्दांच्या दुनियेतदेखील वाङ्मयचौर्य भरपूर. पण रोजचंच झाल्यावर त्यावर किती लिहिणार? बरं काही चहा-पाणी.. अगं सुनीता..!’’

पु.लं.नी ‘उपदेशपांडय़ां’ना हाक मारली, तेव्हा त्यांना त्यांनीच केलेलं विडंबन आठवलं, ‘‘प्रिये २२ चहा.. रात्रीचा समर सरुनी येत उष:काल हा २२’’

‘‘भाई, या वेळेस चहाबिहा मिळणार नाही हां. एक तर रात्र अजून सरायची आहे. दुसरं ते अपॉइंटमेंट न घेता आले आहेत.’’ बॅकस्टेजवरून नुसताच आवाज.

चोराची आता पुरी तंतरली. जिथं कुणीच राहात नव्हतं, तिथं एक सोडून दोघं? ही काय भुताटकी आहे? माणूस तर ‘जंटलमन’ दिसतोय (!) चोराला चहाची ऑफर!
 
‘‘राहू द्या हो भाईसाहेब. तसादेखील ‘आपण’ चहा सकाळी बाराला उठल्यावर घेतो. रात्री बारानंतर मात्र..’’
‘‘ठीक आहे.. आला अंदाज. पण त्याचा इथं काही उपयोग नाही. चहा राहिला, पण एरवी इथं दुसरं काय मिळणार तुम्हाला. मी फार छोटा माणूस आहे. आमच्याकडे पूर्वी गडकरी, कोल्हटकर, देवल, खाडिलकर, अत्रे वगैरे बरीच श्रीमंत मंडळी होऊन गेली. अत्र्यांनी तर पाढेदेखील ‘बे एके बे’ न म्हणता ‘दोन हजार एके दोन हजार’ म्हटले! ते खरे मोठे मासे. आम्ही छोटे मासे. त्यांच्याकडे शब्दभांडार भरपूर.. चांगली कमाई झाली असती तिकडे तुमची!’’
‘‘म्हणजे जसे तुम्ही कोटय़ाधीश, तसे ते डबल-टीबल कोटय़ाधीश?’’

अन् प्रथमच ‘कोटय़ाधीश’ असण्याचा पु.लं.चा भ्रम दूर झाला. तरी विद्याधर पुंडलिकांना म्हटलं होतं मुलाखतीत, ‘‘कोटीचा सोस असू नये, तो फार वाईट.’’ हा विचार करताना त्यांना पुन्हा पुंडलिकांवरचीच कोटी आठवली, ‘पुंडलिकाला म्हणावं त्याने फेकलेल्या विटेवर मी उभा नाही! घ्या.. जित्याची खोड मेलो तरी जात नाही, हे पुंडलिकांना ‘वर’ भेटल्यावर सांगितलं पाहिजे, असा विचार करत पु.ल. स्वत:शीच हसले.

‘‘काय भाईसाहेब, आपल्याला मोजता येत नाही म्हणून हसताय होय?!’’
‘‘छे, छे, कोटीनंतर आम्हीदेखील ‘कोटी’चं करतो आणि मोजता येत नसलं तरी कमावताय ना भरपूर? माझ्याकडे नुसते शब्दच भरपूर. त्यावर प्रकाशक श्रीमंत झाले. ‘उरलं सुरलं’, देखील ‘पुरचुंडी’ ‘गाठोडं’ बांधून नेलं, त्यांची पुस्तकं काढली. प्रेक्षक आणि प्रकाशक हेच आमचे मायबाप. तुम्हाला पण नाराज नाही करणार. काही शिल्लक असेल माळय़ावर, कानाकोपऱ्यांत वळचणीला, तर काढून ठेवीन मी तुमच्यासाठी. काढा मग पुस्तकं ‘किडूकमिडूक’ ‘बाकी शिल्लक.’ पुन्हा असेच येऊन डल्ला मारा. मी चुकूनदेखील फिरकणार नाही. सुनीतादेखील हल्ली माझ्याबरोबरच असते.. शब्दांचे पैसे होतील!’’

‘‘भाई, उगाच कमिट करू नकोस काही, नंतर सगळं मलाच निस्तरावं लागतं..’’
चोराची हवा पुन्हा टाईट. कुठली अवदसा आठवली इथं येण्याची..
‘‘शब्दांचे पैसे? काय राव ‘खिल्ली’ उडवताय गरिबाची!’’

कुठलंही दार फोडून आत शिरायला याला किल्ली लागत नाही, पण ‘खिल्ली माहीत आहे. वा! आधी भेटला असता तर दोन-चार भेटींत ‘वल्ली’त जमा झाला असता, नामू परटासारखा!’’
‘‘होतात, होतात. शब्दांचेदेखील पैसे होतात. कुणी पुस्तकं लिहून, कुणी स्टेजवर-पडद्यावर बोलून कमवतात. कुणी खोटा शब्द देऊन वा शब्द फिरवून पैसे कमवतात.. या समोरच्या भिंतीवरच्या तसबिरीतल्या माणसाला ओळखत असाल कदाचित.’’

अन् प्रथमच ‘कोटय़ाधीश’ असण्याचा पु.लं.चा भ्रम दूर झाला. तरी विद्याधर पुंडलिकांना म्हटलं होतं मुलाखतीत, ‘‘कोटीचा सोस असू नये, तो फार वाईट.’

‘‘लहानपणी पिक्चरमध्ये पाहिलंय याला.. मॅड कॉमेडी करायचा.. कुणी तरी चार्ली..’’
 
‘‘चार्ली चॅप्लिन. ओरिजिनल मॅड. त्यानं शब्दावाचून जगाला मॅड केलं. त्याच्याकडे तुम्ही जायला हवं होतं.’’
‘‘इथं पुण्यात राहतो का?’’

‘‘पुण्याचं तेवढं पुण्य नाही हो! पुणं सोडा, त्यानं साऱ्या जगाला हसवलं-रडवलं, कमावलं-गमावलं, आमच्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस!’’

‘‘हात्तिच्या, म्हणजे तो पण तुमच्यासारखाच.. काय मिळणार त्याच्याकडे?’’

‘‘त्याच्या डोक्यावरची ती हॅट अन् केन स्टिक दिसतेय? भरपूर होत्या त्याच्याकडे अशा. दोन-चार हाती लागल्या असत्या तर आयुष्यभराची ददात मिटली असती. परदेशात भरपूर किंमत असते, प्रसिद्ध व्यक्तींनी वापरलेल्या अशा गोष्टींना.’’
 
‘‘परदेशातलं सोडा भाईसाहेब, आपल्याकडे तसं नसतं ना.’’

‘‘खरंच आहे. मागे महात्मा गांधींचा चष्मा चोरीला गेला, आता जगाला त्याची किंमत कळेल..’’ असं म्हणत पु.लं.नी त्या चोराच्या पायाशी पडलेल्या डबीकडे पाहिलं. चोराची टय़ूब पेटली. शब्दांचे पैसे, चार्ली चॅप्लिनच्या हॅट- केन स्टिकचे पैसे, गांधीजींच्या चष्म्याची किंमत.. मान लिया भाईसाहेबांना. एकदम ‘जंटलमन.’ त्यानेदेखील पायाशी पडलेल्या डबीकडे वाकून पाहिलं.. पुन्हा समोर पाहिलं, तेव्हा तिथं कुणीच नव्हतं! जंटलमन गायब! चोराची घबराट झालीच, त्याही परिस्थितीत खाली पडलेली डबी उचलून दुसऱ्या क्षणी तो दरवाजातून बाहेर पडला. सुसाट रस्त्याला लागला. अजून धडधडणं संपलं नव्हतं.. ही कसली भुताटकी?.. जे घडलं ते खरं की भास? भास कसा असेल? त्यानं खिसा चाचपून पाहिला. ‘सेफ’ ठिकाणी आडोशाला थांबला. खिशातनं डबी बाहेर काढली. ती चष्म्याची केस होती. केसवर सुवर्णाक्षरांत नाव, ‘पु.ल. देशपांडे!’ आतमध्ये काळसर तपकिरी फ्रेमचा चष्मा! तो मनोमन खूश झाला. ‘चार्ली’सारखं ‘पु. ल. देशपांडे’ हे नावदेखील ओळखीचं होतं. कुणी तरी ‘कोटय़ाधीश’ म्हणालं, अन सगळा गोंधळ झाला. तरी ‘या चष्म्याचीदेखील किंमत येईलच,’ या विचाराने चोराच्या ‘हसले मनी चांदणे’

.. रंगमंचावरून ‘एक्झिट’ घेत सुरांवरून तरंगत शब्दांच्या पलीकडच्या जगात जाताना पु.लं.नी सुनीताबाईंना विचारलं,
 
‘‘काय गं सुनीता, तू तिथं कशी काय वेळेवर एन्ट्री घेतलीस रंगमंचावर? बरं झालं वेळेवर पोहोचलीस..’’
‘‘अन् काय रे भाई, मी चहा कुठनं देणार होते, तुझ्या आगंतुक पाहुण्याला? नेहमीप्रमाणे गोंधळ घालशील तो निस्तरावा लागेल मला, म्हणून हजर झाले. तुझ्या सगळय़ा ‘खोडीं’ची मला ‘गेल्या’ जन्मापासून सवय आहे. तुझी कोटय़ा करायची जित्याची खोडदेखील अजून गेली नाही, तिथं माझा सुंभ जळला तरी ‘पीळ’ कसा जाईल..!’’
‘‘आहे मनोहर.. म्हणुनी जमते झकास!’’ पु.लं.नी दाद दिली.

अन् ‘कधी वाऱ्यांतून कधी ताऱ्यांतून’ अशी सुनीताबाई आणि पु.लं.ची पुन्हा
 
‘निघाली ताऱ्यांवरची वरात..
निघाली ताऱ्यांवरची वरात!’


प्रभाकर बोकील
लोकसत्ता
१३ जून २०१४

Wednesday, March 2, 2022

पु.ल. हे सांस्कृतिक जीवनाचे नेते - कुसुमाग्रज

आपल्या प्रतिभेने साहित्यविश्व प्रकाशित करणारे लेखक थोडेच असतात; पण ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आणि व्यक्तित्व साहित्याच्या सीमा ओलांडून समाजाच्या सांस्कृतिक खजिन्यात जमा झालेले असते, असे लेखक त्याहून थोडे असतात. असे लेखक केवळ वाङ्मयीन व्यवहाराचे नाही, तर समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेतृत्व करीत असतात. ग्रंथालयाच्या कपाटांतून बाहेर पडणारे त्यांचे साहित्य केवळ वाचकांपर्यंतच नव्हे, तर समाजातील अ-वाचकांपर्यंतही संस्काररूपाने पोहोचलेले असते.

पु.ल.देशपांडे हे अश्या लेखकांपैकी आहेत, ते कोठल्याही वाङ्मयीन पंथाचे वा उपपंथाचे नाहीत, ते सर्व समाजाचे झालेले आहेत. समाजाच्या केवळ आदराचेच नव्हे, तर हार्दिक प्रेमाचेही धनी आहेत. अक्षरांशी थोडा-फार, प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध असलेला असा एकही मराठी माणूस नसेल, की पु.ल.देशपांडे हे नाव उच्चारताच, ज्याच्या मनामध्ये निर्मळ आनंदाची लहर उमटणार नाही. पुलंचे अस्तित्व ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक सुखदायी घटना आहे. या बहुरूपी आणि बहुस्तरीय अस्तित्वाचा मूलाधार अर्थात विनोद हा आहे. माणसाचे जगणे इतके गुंतागुंतीचे आणि बहुधा इतके तणावपूर्ण असते की; स्वच्छ, सुंदर विनोदाचा अनुभव त्याला केतकीच्या बनातून येणाऱ्या वाऱ्यासारखा आल्हाददायक आणि संजीवक वाटतो.

अशा निर्मळ, आल्हाददायक विनोदाचा अनुभव मराठी वाचकांना त्यांनी दिला आहे. पुन्हा हा विनोद नेहमी मनुष्यगणी राहिलेला आहे. कधी राक्षसगणी झालेला नाही. मनुष्यगणी विनोद हसवणारा, पण संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांची राखण करणारा; तर इतर राक्षसगणी विनोद हा द्वेषाची दुर्गंधी असलेला आणि सत्प्रवृत्तीवर वा कार्यावर ओरखडे काढणारा असतो. पुलंनी ही लक्ष्मणरेषा सतत सांभाळली आहे. विनोदप्रमाणेच नाट्य, चित्रपट, अभिनय, काव्यवाचन अशा अनेक लोकाभिमुख कलाप्रांतांतही त्यांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. खरे तर या सर्वांमुळे 'एक ज्येष्ठ साहित्यिक' एवढीच मर्यादित प्रतिमा त्यांना लाभली असती, पण तसे घडलेले नाही.

प्रारंभी म्हटल्याप्रमाणेच त्यांच्या लोकमानसातील प्रतिभेला केवळ वाङ्मयीन नव्हे, तर एक खूप अधिक असे सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. मूलभूत जीवनमूल्यांवर त्यांची अविचल आणि अभेद्य निष्ठा आहे. त्यांच्या लेखनातून, भाषणातून आणि कलाकृतींतून या श्रद्धांचा प्रकाश समाजाला सतत लाभला आहे. म्हणून पु.ल. केवळ थोर वाङ्मयकार नाहीत, तर समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेतेही आहेत. या नेतृत्वाचा हा अमृतोत्सव. माझ्या बरोबर सर्व नाशिककरांचीही शुभेच्छा!

शत शरदांचे सुभग चांदणे, उजळो वाटेवर।
लाभो संसारातिल सारे, सुखदायी सुंदर।।


- कुसुमाग्रज