Friday, June 8, 2007

काही सहित्यिक भोग क्रमांक एक

स्थळ - पुणे शहरातील एक बस-स्टॉप
पात्रे - ‘खडूस’ ह्या शब्दाखेरीज दुसरा कुठला शब्द सुचु नये असे सत्तरीतले एक गृहस्थ. 

मी त्यांच्या बाजूस जाऊन रांग लावतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही वेळ ते गॄहस्थ आम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. आम्ही समोरच्या करंडे टेलर्सचे मि. करांडे एका लठ्ठ गॄहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृष्य पाहण्याचा बहाणा करतो. इतक्यात कानावर आवाज :


बाजी गणेश जोशी. दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे?
मी. काही कल्पना नाही बुवा.
बा.ग.जो. पुण्यातच राहता ना? (त्यावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.)
मी. हो.
बा.ग.जो. किती वर्षे?
मी. बरीच.
बा.ग.जो. व्यवसाय?
मी. पुस्तकं वगैरे लिहितो.
बा.ग.जो. म्हणजे साहित्यिक! आणि तरी तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नाही.
मी. आपण कुठल्या गावचे?
बा.ग.जो. मी कशाला कुठल्या गावाहून येतोय. इथच जगलो इथंच मरणार.
मी. (कधी? हा प्रश्न गाळून) इथेच मरणार कशावरून. 
बा.ग.जो. दशभुजा गणपती ठौक नाही ते सरळ सांगा. माझ्या मरणाची कशाला काळजी करताय? मी मेल्यावर काही तुम्हाला खांद्याला बोलावणार नाही. 
मी. खांद्याची आमंत्रणं मृतांच्या सहीनं कधी जाऊ लागली? 
बा.ग.जो. हे पहा! तुम्ही साहित्यिक आसल्याने भाषाप्रभुत्त्व हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानू नका. मीही पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून साहित्यिक म्हणवणाऱ्या माणसाला दशभुजा गणपतीचे मंदिर ठाऊक नाही ती तुमची समाजाविषयीची आस्था. उद्या शनवारवाडा कुठे असतो विचाराल. परवा पर्वतीचा पत्ता पुसाल. 
मी. तुम्हाला तरी ठाऊक आहे का दशभुजा गणपती? 
बा.ग.जो. हो आहे मग. 
मी. मग कशाला विचारताय? 
बा.ग.जो. तुम्हाला माहित आहे का नाही हे पडताळायला. 
मी. पण माझा दशभुजा गणपतीशी काय संबंध? 
बा.ग.जो. सांगतो. ‘पुणे शहरातील ढासळती धर्मव्यवस्था’ ह्या विषयावर लेखनमाला लिहितोय मी. इथं सकाळी सात पसून उभा आहे. बेचाळीस लोकांत फक्त एक दशभुजा गणपती ठाऊक असणारा निघाला. ते पण त्याचे दुकान आहे मंदिरासमोर म्हणून. आत कधी दर्शनाला गेला नाही म्हणे. 
मी. म्हणजे दशभुजा गणपती पत्त्यापुरता. 
बा.ग.जो. अहो हीच तर आपली ट्रॅजेडी. देव फक्त पुत्त्यापुरता. एकदा आम्ही विचारलं ‘डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसूतिगृह ’ कुठे आहे? तर तो गृहस्थ म्हणाला, ‘सोमण मारुतिच्या देवळापुढे’. अरे काही सारासारविवेकबुद्धी? निदान प्रसूतिसाठी तरी मारुती वापरू नका. 
मी. खरं आहे. 
बा.ग.जो. साहित्यिक म्हणून देवळात जाणं तुम्ही आपलं कर्तव्य मानत नाही तर! 
मी. (देवावर भार घालून) मानतो तर! 
बा.ग.जो. मग जाता का? 
मी. दशभुजाला नाही जात. 
बा.ग.जो. आय एम नाट पर्टिक्युलर अबाऊट धिस गणपती ऍट ऑल. (रिटायर म्हातारा भडकला की पुण्याच्या इंग्रजीत फुटतो). एनी टेम्पल फॉर द्याट म्याटर. रोज जाता? 
मी. (देवा क्षमा कर. खोटं बोलू नये ह्या गांधीवचनाला मी शाळेत कंपासपेटीत लपवलेलं. ती कंपासपेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.) हो म्हणजे रोज म्हणायला हरकत नाही. 
बा.ग.जो. मला होय किंवा नाहीचा रकाना भरायचाय. 
मी. हो! (फर्गिव मी ओह लॉर्ड! पण तसं हे खोटं नाही हा. रोज रात्री गुडकुले विठूबाच्या देवळात काणे भटजी, दाजीबा टेलर, सोपानराव न्हावी सॉरी हेयरड्रेसर... म्याट्रिक केलेला न्हावी ना म्हणून... आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा शंभर प्वाईंट. मागल्या आषाढी कार्तिकीला गल्ला जास्त जमला नाही म्हणून जिंकाणारा काणे भटजी प्वाईंट वाढवा म्हणाला. आम्ही ऎकत नाही.) 
बा.ग.जो. सरळ हो सांगा ना. 
मी. हो. आता धर्मावर श्रद्धा नाही ठेवायची ती काय म्युनिसिपाल्टी, जिल्हाबोर्डवाले अन महाराष्ट्र महामंडळ परिवहनाच्या एस.टीं.वर ठेवायची? 
बा.ग.जो. वाक्याशेवटी प्रशन्चिन्ह नको. पूर्णविराम द्या हो. 
मी. (मुकाट्याने) हो. 
बा.ग.जो. आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे? 
मी. यथेच्छ आहे. धर्म नसता तर दसरा दिवाळी नारळी पौर्णिमा नसत्या, पुरणपोळी, लाडू नसते. इतकच काय सत्यनारायण नसता तर शेराला सव्वाशेर चाचपत तुपाचा शीरा खायला मिळाला नसता. 
बा.ग.जो. तो शीरा नसतो. प्रसाद असतो. 
मी. सत्यानारायणाला खारीक वाटता येणारा नाहीत. प्रसाद म्हणूनसुद्धा. माफ करा पण तुम्ही छुपे कम्युनिस्ट दिसता. (माझं आपलं काहितरीच) 
बा.ग.जो. मी कम्युनिस्ट! दशभुजा गणपती तुम्हाला ठाऊक नसताना मी कम्युनिस्ट! 
मी. असं तर मग सांगा झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगाल (२ कोटी देवात आज मी एक जन्मला) 
बा.ग.जो. झोपाळू नरसोबा! प्रथमच ऎकतोय! 
मी. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघालेत (माझाच डाव उलटून). उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल. 
बा.ग.जो. हे तुम्ही कुणाला सांगाताहात. 
मी. तुमच्या शिवाय दुसरं कोण आहे इकडे? सॉरी, दुसरं कुणी नाही. पूर्णविराम.
बा.ग.जो. आपला कहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठे राहता? 
मी. (इथे खरी कसोटी आहे. डीटेलवार पत्ते सांगण्यात आपल्यासारखा हातखंडा कुणाचा नाही) तुम्हाल झोपाळू नरसोबा ठाऊक नाही. रेडेकर तालीम टाऊक असेल... 
बा.ग.जो. ती कुठेशी आली? 
मी. रविवारात. घाणेकरांच्या कोळशाच्या वखारीला लागून.
बा.ग.जो. काढीन शोधून. घाणेकर तालीम. 
मी. घाणेकर तालीम नाही. वखार. त्यालालागून रेडेकर तालीम. रस्ते पाड्यावरनं खाली या सरळ (येथे हवा तसा अर्थ घ्यावा). त्यांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठे राहतात ते. बेंद्रांच्या वाड्यावरनं गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर खाणावळ. तिथे वडे चांगले मिळतात. एका वड्याचे ६ पैशे. त्यांना विचारा संपतराव लॉंंड्री. ५ पैशे एका विजारीचे. पुणं भरपूर महाग झालंय हो. 
बा.ग.जो. जरा सावकाश सांगा हो. मी लिहून घेतोय. आता कुठे कापडवाल्या बेंद्रांकडे आलोय. 
मी. कापडवाल्या बेंद्रे नाही. पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. ४ पैशे एक डझन. आमच्या सौ जास्त चांगले पापड बनवतात पण. बेंद्रांना विचारा माशेलकर खाणावळ व पुढे संपतराव लौंड्री. ते भोरफ्यांचा वाडा दाखवतील. 
बा.ग.जो. अहो अहो जरा सावकाश सांगा. माझं लिहून झालं नाहीये. 
मी. सावकाश कसं सांगू? बस आली म्हणजे. 
बा.ग.जो. ती कशी येणार? 
मी. म्हणजे? 
बा.ग.जो. हा स्टॉप क्यान्सल झालाय. 
मी. काय म्हणता. 
बा.ग.जो. हो मग. पंधरा दिवासांपासून हा वनवे झालाय. म्हशींना ही ह्या बाजूने प्रवेश बंद मग बस कशी येईल. 
मी. मग मघापसून का नाही सांगितलंत. 
बा.ग.जो. अरे व्वा! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे माहित नाहीत? कमाल आहे! नाव काय तुमचं? 
मी. (स्वतःचे नवे बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते. 
बा.ग.जो. आजच हे नाव ऐकतोय. 
मी. मी पण! (बा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध पडले हे मागे ना पहाता मी सटकतो. काही भोग दैवावर टाकून सुटतच नाही हो.)

- पु. ल. देशपांडे 
अघळपघळ 

3 प्रतिक्रिया:

Manoj. said...

AWESOME...!!!!!!

Anonymous said...

Wah..! अप्रतिम

Anonymous said...

अप्रतिम... खूपच छान