असाच आमचा एक स्थळहीन मित्र झोपायला गोरेगावाला, स्नानाला अंधेरीला, कपडे बदलायला वांद्ऱ्याला आणि नोकरीला बोरीबंदरला, अश्या अवस्थेत दिवस काढतो आहे. रजेच्या दिवशी तर बिचाऱ्याला रस्त्यावर दिवस कंठाला लागतो. कारण झोपायला त्याला गोरेगावला एक तबेला मिळाला आहे. तबेला दिवसभर बंद असतो. सुटीच्या दिवशी टांग्याला अधिक स्वाऱ्या मिळत असल्यामुळे रात्री अकरा-अकरा वाजेपर्यंत टांग्याच्या गाद्यांची वाट पाहत त्याला बसावे लागते. त्यामुळे सुट्टी आली की रात्रपाळी आल्यासारखा चेहरा करून हिंडत राहणे याखेरीज तो काहीही करू शकत नाही. बरे, ज्या तबेल्यात तो झोपतो तिथे इतरही अनेक भाडे न देता राहणारे सोबती आहेतच. उंदिर आहेत. उंदरांना एकलेपणाची आग लागू नये म्हणून घूशीही येतात. टांग्यातल्या गादीखालचे ढेकूण रात्रभर आमच्या मित्राच्या शरिराचे पानीपत करीत असतात. शिवाय दिवसभर अश्वराजाच्या विरहाने व्याकूळ झालेल्या गोमाशा काही वेळ घोड्याशी तर काही वेळा आमच्या मित्राशी लडिवाळपणा करत असतात. परंतु ह्या सर्व परिस्थितीला जुन्या नाटकातल्या धीरोदत्त नायकाप्रमाणे आमचा रणझुंजार मित्र टक्कर देतो आहे. रोज अक्षरश: बारा निम्मे सहा गावचे तो पाणी पीत असल्यामुळे त्याच्या अंगात एक प्रकारचे ’योगसामर्थ्य’ आल्यासारखे झाले आहे. त्यातून तबेल्यात राहून राहून सोबत्याचा गुण नाही तर वाण लागला आहे. तो तबला मिळवण्यासाठीसुद्धा पागडी द्यावी लागली रोज घोड्याला खरारा करायच्या बोलीवर त्याला झोपायला जागा मिळाली. सुरुवातीला काही दिवस त्याने नविन जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला काही यश आले नाही, तूर्त घोड्याचे मन न दुखेल अश्या बेताने वागून आहे ती जागा टिकवून धरणे हेच त्याच्यापुढे एकमेव ध्येय आहे. सुदैव इतकेच की त्याची गाठ एका पशूशी आहे. मालकरुपी माणसाची मर्जी सांभाळण्याचे कार्य त्याच्यापुढे असते तर मात्र कठीण अवस्था होती.
अश्याच एका इसमाला चांगली नोकरी मिळाली. तडकाफडकी बिचाऱ्याचे लग्नही झाले. शिताच्या आणि सुताचा प्रश्न सुटला आणि छताचा प्रश्न उभा राहिला. कारण तो ज्या मालकाकडे राहत असे त्याला ’लग्न केल्यास ताबडतोड जागा सोडीन’ असे त्याने लिहून दिले होते. त्या मालकाचे लग्न एका संपादिकेशी झाले असल्यामुळे बायकोच्या हातचा स्वयंपाक आणि तिच्याच हातचे लेख या दुहेरी भडीमाराने तो अधिच जेरीला आला होता. फुंकणी आणि लेखणी ही एका हाती नांदणे शक्य नाही असे त्याचे ठाम मत होते. त्यामुळे कोणाचे लग्न म्हंटले की त्याला भयंकर संताप येत असे. दारात कोणी तुळशीचे लग्न लावलेलेसुद्धा त्याला खपत नसे.
अश्या परिस्थितीत आमच्या मित्राने लग्न केले. पहाटे दोनला वरात निघाली. घरमालकाने बेकायदा मिरवणूकी सारखी वरात आपल्या वाड्यासमोर अडवली. करारभंगामुळे मालक भाडेकरूला घरात घ्यायला तयार होईना. नाना तऱ्हेने लोकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्याची एकसष्टी करण्याचा सुद्धा विचार जाहीर केला. पण म्हतारा ऎकेना. शेवटी बॅंडवाल्यांना आणखी दोन तासांचे पैसे देऊन सदाशीव पेठेतून शुक्रवार पेठ, गंज पेठ पुन्हा उलट कसबा, नवा पुल करीत हिंडवीत आळंदीला पालखी सारखी पहाटे पाच वाजता संगमावर आणून वरात थांबली. बिचाऱ्या बॅंडवाल्यांनी ’संडे के संडे’ पासून ते प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ पर्यंत येतील तितकी गाणी वाजवली आणि त्या नवपरिणीत जोडप्याला संगमावर सोडून बाकीची वरात परतली.
बाकी संसाराची सुरूवात संगमावर व्हावी हाही योगायोग काही कमी अपूर्व नव्हता. आमच्या मित्राने आपल्या बायकोला ’तुझ्या माझ्या जिवनसरिता-आयुष्याचा प्रवाह- पहाटेचा शुक्र’ वगैरे सांगुन पहाटेपर्यंतचा वेळ काढला आणि तेथून दोघांची खरी वरात सुरू झाली. नवऱ्या मुलीला तर बिचारीला बाप घरात घेईना आणि नवऱ्याला जागा मिळेना अश्या अवस्थेत दिवस काढावे लागले. नुकतीच त्यांना जागा मिळाली. जागा म्हणजे जिथे पूर्वी मालक कोळश्य़ाच्या गोणी, कांदे, मधल्या काळात बाबागाडी वगैरे ठेवत असत असा पोटमाळा. या जागेसाठी प्रत्यक्ष पैशाच्या रूपाने पागडी घेणे जमले नाही. तेव्हा जागेच्या भाड्य़ाखेरीज माझ्या मित्रपत्नीला घरमालकाच्या घरचा स्वैपाक करणे, त्यांच्या वंशविस्ताराला वाढवणे-भरवीणे. मालकिणबाईच्या मोठेपणाच्या गोष्टी ऎकणे फावल्या वेळात त्यांच्या चोळ्या बेतणे आणि दर चोळी बेतताना "गेल्या खेपेपेक्षा थोड्य़ा अशक्तच झाल्यात बरं का शालिनीबाई" अस म्हणणे. शेजारच्या प्रमिलाबाईच्या फॅशनला नेहमी नावे ठेवून मालकिणबाईच्या साधेपणाचा गौरव करणे अश्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. परंतु तिच्याहून आमच्या मित्राची परिस्थिती फारच वाईट आहे. मालकांना तबला वाजवायचा नाद आहे आणि रात्री दोनदोन वाजेपर्यंत आमच्या मित्राला मोडक्या भात्याच्या पेटीतून ’कृष्ण मुरारी’ वाजवायला लावून मालक तबला कुटीत बसतात. सध्या दिवसा माझ्या मित्राच्या कानाजवळ कुणी हे गाणेच नव्हे तर नुसते कृष्ण किंवा मुरारी म्हटले तरी त्याला घेरी येते! अगदी ’जागा नको पण तबला अवर’ म्हणण्याची पाळी आली आहे. पण करतो काय बिचारा? आणि असले अनेक बिचारे आज जागेच्या अभावी काही करू शकत नाहीत.
साधुसंत म्हणतात ’ठेविले अनंते तैसेची रहावे’ परंतु अनंत कुठे ठेवायलाच तयार नाही तर त्याने कुठे रहावे? आणि मला वाटते की ह्या ’कुठे रहावे’ चे उत्तर प्रत्यक्ष अनंतालासुद्धा देता येणार नाही. जगातल्या सगळ्या जागा गेल्यात कुठे? ह्याचे उत्तर देणारा एकच पंथ आहे आणि तो म्हणजे न पेलणार्या पगड्या घालणार्या लोकांचा फरक एतकाच , ही पगडी देणार्याच्या डोक्यावर भार अस्तो, घेणारा मात्र परवापरवापर्यंत निर्धास्त असे. जागेसाठी लाच म्हणून द्यावा लागणाऱ्या पैशाला ’पगडी’ हे नाव ठेवणाऱ्या माणसाच डोके मात्र केवळ पगडी ठेवण्याच्याच लायकिचे नसावे. कारण सरकारी संकट आल्यावर तो पैसा इतक्या हातचलाखीने फिरवण्यात येतो की त्याला धुर्त माणसाच्या पगडी फिरवण्याचीच उपमा शोभेल. पगडीवाल्या म्हातार्याचे ही गोष्ट असल्यामुळे ती एखादी पडकी दंतकथा असण्याचाही संभव आहे. इतकेच कश्याला, पगडी घेतल्या कारणाने एका बाईला पकडल्याची बातमी जेव्हा वर्तमानपत्रात आली तेव्हा आमच्या दत्तकथा सांगणार्या आजीने "पगडी घालयची एवढी फॅशन बायकांत राहिली होती, ती सुद्धा आली" असे म्हणून नाक मुरडून मनातला राग हातातल्या वातीवर काढला होता. महागाईच्या आणि टचांईच्या तोंडओळखीच्या काळातल्या ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर पगडी -पागडी किंवा पग्री- ही चिज अबालवृद्धांच्या परिचयाची झाली आहे. अमतमक्याने जागेसाठी अमुकअमूक रुपये पगडी दिली असे म्हणण्यात येते. परंतु वास्तविक इतक्या हजाराची पगडी स्वताच्या डोक्यावर चढवल्यावर जागा मिळाली असे म्हणणे अधिक योग्य आहे. सरकारी नियंत्रणे कडक होण्यापुर्वी हा प्रकार अगदी उघड आणि मांडली होती. परंतु आता काय मोबदले द्यावे लागतिल काही सांगता येत नाही.
माझ्या एका दुर्दैवी मित्राला जागेच्या मोबदल्यात मालकाच्या तिरळ्या मुलीशी चक्क लग्न करावे लागले. जागेकडे पाहून तिच्या डोळ्याकडे ह्याने कानाडोळा केला, तरी जागेसाठी घालावी लागणारी नवरदेवाची पगडी त्याला बायकोच्या डोळ्याशी डोळा भिडवू देत नाही. तिच्याच बोबड्या प्लस तिरळ्या बहिणीशी लग्न करणार्यास दोन खोल्या, एक हॉल आणि स्वतंत्र बाथरुम अशी खुल्ली ऑफर आहे. कोणाला जागेच्या मोबदल्यात मालकाच्या मुलाला शिकवणे, संध्याकाळी फिरायला नेणे, रविवारी सिनेमा दाखवणे किंवा राणीच्या बागेला ’मालकिण बाई आणि तिची मुले’ दाखवणे अश्या भयानक गोष्टी कराव्या लागतात. माझ्या परिचयाच्या एका नास्तिक डॉक्टरला वाड्यच्या मालकाला रोज दुर्वा आणि बेल काढुन देऊन रात्री ’भक्तिविजय’ वाचून दाखवायच्या अटीवर दवाखाना खोलायची परवानगी मिळाली. शिवाय मालक आणि त्यांच्या प्रजेला औषध फुकट द्यावे लागते ते वेगळेच. मालकांना रोज इन्सुलिनचे इंजेक्शन देताना त्या डॉक्टरच्या मनात अनेक पाशवी विचार येतात. इतर वेळी दिवसभर कांतिच्या गोष्टी सांगणारा हा गृहस्थ सकाळी बिल्वपत्रे खुडायला बेलावर चढला की सर्कशीतल्या पिंपावर चढणाऱ्या हत्तीसारखा केविलवाणा दिसतो. परंतु त्याच्या निर्घुण मालकाला यत्किचिंतही दया येत नाही. कारण बेल काढायला डॉक्टर पाणी काढायला वकिल आणि केर काढायला वकिल आणि केर काढायला विदुषी असा थाटात सध्या मालक आपल्या मालकिच्या वाड्य़ात मोठ्या सुखाने नांदत आहेत. वरुन पुन्हा "आम्ही अर्धा दमडीसुद्धा पागडी घेतली नाही" म्हणायला तयार. ’लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ अशी म्हण जरा दुरुस्त करून ’घर पाहावे शोधुन’ असे म्हणण्याची पाळी आली आहे.
जागा शोधणाऱ्या मनुष्यस्वभावाचे काय विलक्षण नमुने पाहायला सापडतात. घरमालकाच्या उमेदवार भाडेकरूला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपुढे धर्मराजाला विचारण्यात आलेले यक्षप्रश्न आहीच नाही. सगळ्यात लोकप्रिय किंवा मालकप्रिय प्रश्न म्हणजे ’तुमचे लग्न झाले आहे का? गाफिल भाडेकरू आजूबाजूला न पाहता खर बोलून गेला की संपलच. वास्तविक वरवर पाहणाऱ्याला ह्या प्रश्नात अवघड असे काहीच वाटत नाही. ’तुमचे लग्न झाले आहे का?" ह्या प्रश्नाला दोन उत्तरे संभवतात, "झाले आहे" किंवा "झाले नाही." परंतु भावी भाडेकरू म्हणून तुम्ही एकदा घरमालकापुढे गेलात की इतक्या सरळपणे उत्तर देऊन भागत नाही. घरमालकाच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनावर हे उत्तर अवलंबून आहे. जात, उत्पन्न आणि लग्न अश्या क्रमाने हा प्रश्न आला की नक्की समजावे की धोका आहे. मालकाच्या तुमच्याकडे केवळ भाडेकरू म्हणून नव्हे तर ’स्थळ’ म्हणून पाहण्याचा विचार आहे. जागा मिळवण्यासाठी तुम्हाला स्थळ व्हावे लागेल. तेव्हा उत्तर देण्यापुर्वी "सावधान" बरे "लग्न झाले आहे" अशी बेधडक थाप ठोकली तर "बायको दाखव नाहीतर जावई हो" असा ठोक सवाल टाकायलाही घरमालक कमी करत नाही. त्यापेक्षा जगाच पसंत नाही म्हणून आपली शान राखणे चांगले. वाड्य़ाचा मालक नवख्या भाडेकरूला पहिल्याच भेटीत आपल्या मुलीसंबंधी असे काही बोलू लागला की समजावे की त्या सौभाग्यकांक्षिणीच्या कुंकुवाचा धनी होण्यापेक्षा फुटपाथवर पाथरी टाकणे बरे.काही ठिकाणी मालकांना लग्न झाले आहे का?" या प्रश्नाचे उत्तर अस्तिपक्षचे हवे असते. लग्न झालेला भाडेकरू हा वाड्याच्या सार्वजनिक सुरुक्षिततेच्या दॄष्टीने अत्यंत विश्वसनीय अशी एक लोकप्रिय अंधश्रद्धा आहे. त्यामुळे वेळा लग्न होऊन गेलेले असणे ही जागा मिळवण्याच्या दृष्टीने उत्तम शिफारस होऊ शकते. फक्त वंशवेल वाढलेली नसावी. अर्थात लग्न झालेले असणे आणि जागा मिळवणे ह्याचा हमखास सांधा जुळेलच असे नाही. पुष्कळ वेळा जागा नाही म्हणून लग्न नाही आणि म्हणून जागा नाही असल्याही शृंगापत्तीला तोंड द्यावे लागते.
याशीवाय तुम्ही शाकाहारी की स्वाहाकारी, रात्री साडेआठ नंतर दिवा पेटता कामा नये, सकाळी दहानंतर बाथरूम मिळेल इथपासून तो तुमच्या राजकीय मतापर्यंत वाटेल त्या प्रश्नाला उत्तर द्यावी लागतात. एका होतकरू भाडेकरूला तो पगडी देण्यास तयार असूनसुद्धा, सायन आणि निरयन पद्धतींतला फरक न सांगता आल्यामुळे जागेला मुकावे लागले. एका वाड्य़ाच्या मालकाने तर आपली ओसरी फक्त शांडिल्यगोपत्रोत्पन्नांनाच भाड्याने मिळेल अशी जाहिरात दिली होती. बाकी ज्याने ज्याने म्हणून हल्लीच्या काही वर्षात जाग भाड्य़ाने मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचा माणूसकी, सभ्यपणा, सचोटी, चांगुलपणा, प्रामाणिकपणा या इतिहासजमा गुणांवरचा विश्वास पुर्णपणे नष्ट झाला आहे. भाकरीचाकरीचे प्रश्न चुटकी सरसे सुटतात, पण जागेचा प्रश्न एकदा उभा राहिला की काजी केल्या तो बसायलाच तयार नसतो. माणसाची तो फिरवून टाकतो.
परवाची गोष्ट, आमच्या गावचे पोष्टमास्तर बदलून दुसऱ्या गावाला जाणार होते. तर जातांना, ते विलायतेला निघाल्यासारखा समारंभ घडवून आणला. पोष्टमास्तरांच्या गूणवर्णनाची इतकी भाषणे सुरू झाली की पोष्टमास्तरांना आपण पोष्टमास्तर आहोत की कोणी धर्मगूरु आहोत असा भ्रम झाला. एका गृहस्थाने तर बोलण्याचा भरात पोष्टमास्तरांची आमच्या गावाहून दुसऱ्या गावाला बदली केल्याची दाद यूनो परिषदेसमोर मांडावी असा ठराव सुद्धा आणला. एका कवीने "जातो की मम टपाल गुरूजी आजच परगावाला" अशी सुरूवात करून आपल्या हॄदयभेदक आवाजाने सभेला काकुळातीला आणले. तर गावच्या शाहिराने "भले बुद्धीचे मास्तर आता असे नाही येणार" अशी सुरुवात करून शेवटी "पोष्टवाल्याचा पोवाडा पोष्टवाल्यानेच एकावा." असा दोन तासाने समारोप केला. पोष्टमास्तरही लोकांच्या आपल्यावरही अपरिमीत प्रेमाने गहिवरले. सभा संपली मंडळी जड अंत:करणाने निघाली. मास्तर घरी येतात तोच ती सभा पुन्हा त्यांच्या दारात जमलेली दिसली. प्रत्येकाने हळूच मास्तरांच्या कानात सभेचा उद्देश सांगितला. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी दुसऱ्या गावी जाऊन आपल्या कामाचा चार्ज घेतला तेव्हा त्यांना डोक्याला बॅंडेज हाताला फॅक्चर चष्मा बेपत्ता आणि पायताण गहाळ अश्या अवस्थेत उभे रहावे लागले. मास्तरांनी आपली जागा नवीन येणाऱ्या पोष्टमास्तरला अगोदरच दिली होती हे गावकऱ्याक ठाऊक नसल्यामुळे त्यांनी हा मास्तरांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता आणि ही बातमी अत्यंत गुप्त ठेवण्यासाठी पोष्टमास्तरमजुकरांनी आपल्या पत्निला बदलीहुकुम मिळाल्या दिवशीच तिच्या माहेरी रवाना केली होती. बदललेल्या मास्तरांचा रिकामी जागा हाच सत्कारसमारंभामागे हेतू होता. तो ढासळलेल्या गावकऱ्यांनी चिडून मास्तरांचा पुन्हा सत्कार तर केलाच शिवाय गावातल्या पोष्टावर बहिष्कार घालून शेजारच्या गावातून कार्ड पाकिटे घेण्याचा निर्णय घेतला. ह्या पोष्टाचा धंदा बसावा म्हणून बाहेरगावच्या लोकांना इथल्या पत्त्यांवर सारख्या मनीऑर्डर पाठवायला लावून रक्कम संपवायचा ठराव त्याच बैठकीत केला. ही झाली साध्या बदलीची गोष्ट. ज्या वेळी आपली इहलोकातून परलोकात बदली होते ती घटना आजवर तरी दु:ख करण्यासाठी समजली जात होती. आज मात्र समर्थसुद्धा "मरे एक ज्याचा दुजा शोक वाहे" म्हणण्याऎवजी "मरे एक ज्याचा दुजा ब्लॉक पाहे"असेच म्हणाले असते.
(अपूर्ण)
खोगीरभरती
हे पुस्तक मिळवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.