पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत, उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे. अमेरिकेची आर्थिक आघाडी- ठोका.
दिवसातून एकदा तरी "चक चक पूर्वीचे पुणं राहिलं नाही, पूर्वीचे पुणं राहिलं नाही" हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडं असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, आमच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, कचेरी, ओमकारेश्वर, पेनशनर मारुतीची टेकडी, मंडई आणि शिशुविहार, कुठेही ऐकायला मिळेल, "आमच्या वेळी ते तसं नव्हतं!"
मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. त्यात शुद्ध मराठी या नावाची एक पुणेरी बोली आहे. आता ह्या बोली मध्ये व्यासपीठावरची पुणेरी, घरातली पुणेरी, दुकानदाराची पुणेरी, ह्यातला फरक नीट समजावून घेतला पाहिजे. आता खासगी पुणेरी बोली भाषा आणि जाहीर बोली भाषा ह्यातल्या फरकाचा एक उदाहरण पहा. अशी कल्पना करा, की कोणीतरी एक प्राध्यापक भांबुर्डेकर हे प्राध्यापक येरकुंडकराबद्दल स्वतःच्या घरी बोलतायत:
"बोंबला! या यारकुंडवारशास्त्र्याचा सत्कार! च्यायला, येरकुंडकारचा सत्कार म्हणजे कमाल झाली. वास्तविक जोड्याने मारायला हवा याला. ऋग्वेदाचे भाषांतर म्हणे! कमाल आहे! अहो ऋग्वेदाचा बट्ट्याबोळ! आणि ह्यांना च्यायला सरकारी अनुदानं, पन्नास-पन्नास हजार रुपये!"
पुणेरी मराठीतून संताप व्यक्त करायला दुसर्याला मिळालेले पैसे, हा एक भाषिक वैशिष्ठ्याचा नमुना मानावा लागेल.
"ओढा! ओढा लेको पैसे! करा चैन! खा! रोज शिकरण खा! मटार उसळ खा!". अगदी चैनीची परमावादी. पुणेरी मराठीत इकडेच संपते- शिकरण, मटार उसळ वगेरे. "आहो! आहो चक्क वीस-वीस रुपये मिळवले" हे वाक्य वीस वीस लाख मिळवले ह्या ऐटीत उच्चारावे.
"आणि ह्यांचा म्हणे सत्कार करा! ह्यांना श्रीफळे द्या!" पुणेरी मराठीत नारळाला 'श्रीफळ' म्हणतात, आणि चादरीला 'महावस्त्र'
आता ह्याच खासगी पुणेरी बोलीचे जाहीर बोली भाषेतील रुपांतर पहा. हाच प्राध्यापक, ह्याच गुरुवर्य यार्कुंडकरांचा सत्कार.
"गुरुवर्य यार्कुंडकरांचा सत्कार, म्हणजे साक्षात विद्द्वात्तेच्या सूर्याचा सत्कार! मित्रहो, आजचा दिवस, पुणे महानगराच्या सांस्कॄतिक इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. हे माझे गुरु...म्हणजे मी त्यांना गुरूच मानत आलो आहे, ते मला शिष्य मानतात का नाही, हे मला ठाऊक नाही." इथे हशा. सार्वजनिक पुणेरी मराठी मध्ये, व्यासपीठावरच्या वक्त्यांनी तिसर्या वाक्यात जर हशा मिळवला नाही, तर तो फाउल धरतात. तेव्हा होतकरू पुणेकरांनी जाहीर पुणेरी बोलीचा अभ्यास करताना हे नीट लक्षात ठेवायला पाहिजे.
"आता, एका परीने तसा मी त्यांच्या शिष्यच आहे- कारण, ते मुन्सिपलाटीच्या शाळेत शिक्षक असताना, मी पहिल्या इयत्तेत त्यांचा विद्यार्थी होतो." म्हणजे, येरकुंडकर प्रोफेसर, हा एकेकाळी मुन्सिपालटी शाळामास्तर होता, हे जाता जाता ध्वनित करून जायचं.
"त्यांचे तीर्थरूप, सरदार पंचापात्रीकारांच्या वाड्यातील आहार विभागात सेवक होते." म्हणजे तिकडे वाड्यावर स्वयंपाकी होते, हे सांगून मोकळे व्हायचे.
"असो! अत्यंत दारिद्र्यात बालपण घालवल्यानंतर आता अरण्येश्वर कॉलनीतल्या आपल्या प्रशस्त बंगल्यात राहताना प्राध्यापक येरकुंडकरांना किती धन्यता वाटत असेल!" म्हणजे विद्वत्तेच्या नावावर पैसा कसा ओढला बघा! हे आलं त्याच्यामध्ये.
"प्राध्यापक येरकुंडकर, आणि आपले शिक्षण मंत्री, एकाच शाळेत शिकत असल्यापासूनचे स्नेही आहेत."- म्हणजे वशिला कसा लागला!
सार्वजनिक पुणेकर व्हायचे असेल, तर जाहीर पुणेरी मराठीचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागेल.
आता दैनंदिन व्यावहारिक पुणेरी शुद्ध मराठी बोलीला मात्र अनेक पैलू आहेत. त्यामुळे रोजच्या व्यवहारात देखील ही बोली वापरताना, वाक्यरचनेकडे नीट लक्ष द्यायला हवे. आता हेच बघा ना, टेलीफोन रिसीवर उचलल्यानंतर, "हेलो, हेलो", असे म्हणावे, हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे ना? पण पुणेरी शुद्ध मराठीत, "हेलो" याच्या ऐवजी, दुपारच्या झोपेतून जागे केल्यावर आवाजाला जो एक नैसर्गिक तुसडेपणा येत असतो, तो आणून, "हेलो" म्हणण्याच्या ऐवजी "कोणे?" असे वस्कन ओरडायचे. म्हणजे टेलीफोन करण्याप्रमाणे ऐकण्यालादेखील पैसे पडले असते, तर माणूस जसा वैतागला असता, तसे वैतागायचे. मग तिकडून विचारतो कोणीतरी, " आहो, जरा प्लीज गोखल्यांना बोलावता का?" असं विचारलं रे विचारलं की पुण्याबाहेरचे तुम्ही आहात, हे पुणेरी पोर देखील ओळखेल. त्याच्या ऐवजी, "गोखल्यांना बोलवा" असा इथून हुकुम सोडायचा. मग पलीकडून आवाज येतो, "अहो इथे दहा गोखले आहेत! त्यातला कुठला हवाय?"
"तो कितवा तो मला काय ठाऊक! LIC मध्ये झोपा काढायला जातो त्याला बोलवा!!"
मग इकडून आवाज ऐकू येतो, " अरे गणू! इथे तुझ्यासाठी फोनवर कोणीतरी पेटलाय रे!" "च्यायला, ह्या गण्याचे दिवसाला शंभर फोन." हे सुद्धा आपल्याला ऐकू येते.
पुणेकर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान. तो शिवछत्रपती किंवा लोकमान्य टिळकांचाच असला पाहिजे, असं मुळीच नाहीये. म्हणजे आपल्या अळीचा गणपती विसर्जनाच्या दिवशी रांगेत कितवा जावा, इथ्पासून पुणेरी गावरान शेंग ह्या पर्यंत कुठल्याही गोष्टीचा असला तरी चालेल. पण जाज्ज्वल्य अभिमान हवा. मतभेद व्यक्त करायला या जाज्ज्वल्य अभिमानाची फार मदत होते. म्हणजे टिळक पुण्यातीथीच्या दिवशी आगरकरांविषयी चा जाज्ज्वल्य अभिमान, क्रिकेट च्या टेस्ट च्या वेळी देशी खेळांविषयीचा जाज्ज्वल्य अभिमान- अशी त्या त्या अभिमानाची नीट वाटणी करता येते आपल्याला. आपला मतभेद केवळ खासगी मध्ये व्यक्त करून पुण्याचे संपूर्ण नागरिकत्त्व मिळत नाही. अधून मधून वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये एक पत्र पाठवावे लागते. त्यासाठी पत्रलेखनाची स्वातंत्र्य शैली कमवायची, हे अत्त्यंत आवश्यक आहे.
पुणेकर होण्यासाठी सायकल चालवणं, ही क्रिया एक खास कला म्हणूनच शिकायला हवी. सायकलवर बसता येणं, म्हणजे पुण्यात सायकल चालवता येणं, हे नाही. "चालवणे" इथे हत्त्यार चालवणे, किंवा चळवळ चालवणे, अशा अर्थाने वापरलं पाहिजे. सायकलचा मुख्य उपयोग, वाहन म्हणून न करता वाहत्या रस्त्यात मध्यभागी कोंडाळे करून गप्पा मारताना ’टेकायची सोय’ म्हणून करायला हवी. यातूनच पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचे शिक्षण मिळते! त्याचप्रमाणे, पाहुणे नामक गनीम येतात, त्यांना वाड्यामध्ये सहजासहजी एकदम प्रवेश मिळू नये, यासाठी मुख्य प्रवेशद्वारात सायकलींची बॅरीकेड रचता यायला हवी. त्या ढिगार्यातून नेमकी आपलीच सायकल बाहेर काढता येयला हवी. सायकल, हे एकट्याने बसून जायचे वाहन आहे, हे विसरायला हवे. किमान तिघांच्या संख्येनी, रस्त्याच्या मधून गप्पा मारत मारत जाता आले पाहिजे. नजर समोर न ठेवता, फुटपथावरील चालत्या-बोलत्या आणि इतर प्रेक्षणीय स्थळांच्या तिथे येणे जाणे चालू असतं तिथे ( --> ) असं पाहिजे. सायकल ला घंटी,दिवा, ब्रेक हे वगैरे असणं, हे म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे.
अशा रितीने पुणेकर होण्यातल्या प्रथम, द्वितीय, वगैरे परीक्षा उत्तीर्ण होत होत सार्वजनिक पुणेकर होण्याची पहिली परीक्षा म्हणजे कुठल्यातरी सौस्थेंच्या कार्यकारी मंडळामध्ये तिथे शिरायची धडपड सुरु ठेवायची. उगीचच काहीतरी, "श्रीमंत दुसरे बाजीराव साहेब ह्यांचे शुद्धलेखन" किंवा "बाजरीवरील कीड" असल्या फालतू व्याख्यानांना जाऊन सुद्धा हजेरी लावायची,आणि व्याख्यानानंतर, त्या व्याख्यात्याला भेटून "... या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायचीये" , असे चारचौघात म्हणून टाकावे . हा हा म्हणता आपण खासगी पुणेकरातून सार्वजनिक पुणेकर होऊन जाल!
आता पुण्यात राहून दुकान वगैरे चालवायची इच्छा असेल, तर पुणेरी मराठी बोलीचा फारच अभ्यास वाढवायला लागेल. तरच किमान शब्दात गिर्हाईकाचा कमाल अपमान करता येईल. ती भाषा आली पाहिजे. कारण पुण्यात दुकान चालवणे, हे सायकल चालवणे, ह्या अर्थी चालवणे आहे. दुकानदारांनी गिर्हाईकावर सत्ता चालवायची असते. दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते. पुढे ते सिंध्या-बिन्ध्याला विकावे. जागेच्या पगडीत उरलेल्या आयुष्याची सोय होते, आणि आपण , "महाराष्ट्र व्यापारात मागे का?" या विषयावर भाषण द्यायला मोकळे!
थोडक्यात म्हणजे पुणेकर व्हायचं असेल, तर म्हातारपणाच्या सत्त्काराच्या दिशेने वाटचाल करायचा धोरण सांभाळावे लागते.
- पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)