पु. ल. देशपांडे नामक असामीने बटाट्याच्या चाळीतील इरसाल व्यक्ती आणि वल्लींना हाताशी धरून, चाळीचा (गाळीव) इतिहासवजा बखर लिहिली अन् "बटाट्याची चाळ' उजेडात आली. चाळीत सतत होणाऱ्या सामुदायिक - "सांस्कृतिक' चळवळी, आंदोलनं, भ्रमणमंडळं, शिष्टमंडळं वगैरेंवर भरपूर प्रकाश पडला. तरी एक रुखरुख राहिलीच. चाळीचा, सार्वजनिक गणेशोत्सव! साऱ्या बखरींत या गणेशोत्सवावर एकत्रित असा प्रकाश पडत नाही. आहेत ते विखुरलेले कवडसे. त्यावरून केवळ संपूर्ण चित्राचा अंदाज बांधायचा. चाळीत पुन्हा एकदा फेरफटका मारून जमविलेल्या कवडशांचा हा कॅलिडोस्कोप- अर्थात कोलाज.
सवाशे वर्षांपूर्वी म्हणजे १८८० मध्ये कै. धुळा नामा बटाटे (क्रॉफर्ड मार्केटमधील टोपल्यांचे व्यापारी) यांनी भर गिरगावात, खेतवाडीतील वाघूळ गल्लीत, एक चाळ बांधली, ६० बिऱ्हाडांची. साथीच्या आणि लढाईच्या दिवसांत आजूबाजूच्या चाळी ओस पडल्या; मात्र ही चाळ तशीच राहिली. ढिम्म लागू दिला नाही इथल्या माणसांनी प्लेगला अन् जर्मन-जपान्यांना! या चाळीतील ढेकूणही मेला नाही, इतकी ही चाळ टणक. (खेतवाडी म्हणजे शेतवाडी, शेतं संपल्यावर भुते संपली अन् आपण इथे राहायला आलो- इति चाळ रहिवासी - उत्साहमूर्ती राघूनाना सोमण.) असो! तर अशीही चाळ प्रकाशात मात्र आली तब्बल ७५ वर्षांनंतर, १९५८ मध्ये. निमित्त अर्थातच पु. ल. देशपांडे नामक असामीने चार-पाच दिवाळ्या या चाळीत केलेला मुक्काम! त्यांनी या चाळीतील इरसाल व्यक्ती आणि वल्लींना हाताशी धरून, चाळीचा (गाळीव) इतिहासवजा बखर लिहिली अन् "बटाट्याची चाळ' उजेडात आली. चाळीत सतत होणाऱ्या सामुदायिक - "सांस्कृतिक' चळवळी, आंदोलनं, भ्रमणमंडळ, शिष्टमंडळं वगैरेंवर भरपूर प्रकाश पडला. इतकंच नव्हे, तर चाळकऱ्यांच्या व्यक्तिगत वासऱ्या अर्थात डायऱ्या, आत्मचरित्रांचे संकल्प, कन्येस लिहिलेली पत्रंदेखील सार्वजनिक झाली. तरी एक रुखरुख राहिलीच. चाळीचा, सार्वजनिक गणेशोत्सव! साऱ्या बखरींत या गणेशोत्सवावर एकत्रित असा प्रकाश पडत नाही. आहेत ते विखुरलेले कवडसे. त्यावरून केवळ संपूर्ण चित्राचा अंदाज बांधायचा. चाळीत पुन्हा एकदा फेरफटका मारून जमविलेल्या कवडशांचा हा कॅलिडोस्कोप- अर्थात कोलाज. खरं तर पु. लं.च्याच शब्दातील ही "गोळाबेरीज'! "चळवळीच्या सामर्थ्याला भगवंताचे अधिष्ठान हवे म्हणून बटाट्याच्या चाळीत मी गणेशोत्सव सुरू केला, असा ठसठशीत उल्लेख चाळीतील (एकमेव) आत्मचरित्रकार (आगामी) हणमंतराव दशपुत्रे यांनी या बखरींत केलेला आढळतो. आत्मचरित्रातील सर्वच खरं असतं, असं नसलं तरी वरील विधान कुणी नाकारीतही नाही, तोपर्यंत हेच सत्य मानायला हरकत नसावी! तर "सालाबादाप्रमाणे यंदाही' या पद्धतीचा हा गणेशोत्सव चाळींत अखंडितपणे साजरा होत राहिला. अर्थात, बाजूच्या तेजुमल काजूमल चाळीच्या २०० भाडेकरूंच्या धडाक्याने होणाऱ्या उत्सवापुढे, ६० बिऱ्हाडांच्या बटाट्याच्या चाळीचा गणेशोत्सव नेहमीच उपेक्षिला गेला; परंतु या गणपतीला ऐतिहासिक महत्त्व होते. हा गणपती पहिल्या महायुद्धात विकत घेतला, तेव्हापासून (जन्मतिथीच्या भू-घोळाशिवाय इतिहास कसा!) वर्षातून एकदा मधला चौक साफ करून तिथे बसविण्यात यायचा. विसर्जनाच्या रानटी रूढीपासून वाचलेला गणनायक, पुढे रंग उडाल्यामुळे "ऍनिमिक' दिसायचा. वयोमानाप्रमाणे मूळच्या एकदंतावर, दंतविहीन होण्याचा प्रसंग आला होता; परंतु त्या जागी एक खडू बसविल्यामुळे नवी कवळी लावलेल्या वृद्धाचा टुणटुणीतपणा त्याला प्राप्त झाला होता.
सदरहू गणपतीची ही "दंतकथा', हा तर इतर चाळकऱ्यांच्या थट्टेचा विषय होऊन राहिला होता! असो! "चाळीतला मधला चौक' यालादेखील एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होतं. चाळीला घाणीचं कधीच वावडं नव्हतं; पण कुठल्या खोलीतून कुठली घाण या चौकात पडावी यासंबंधीची चाळीची काही ठाम मतं होती. "अण्णा पावश्यांच्या घरातून निर्मात्याऐवजी, द्रोणांतून अंड्यांची टरफले पडायला लागली, तेव्हा चाळ शहारली होती!' "हा मधला चौक साफ करून, तेथे सामुदायिक सूर्यनमस्कार घालायची माझी कल्पना, कुणीच मान्य करीत नाही-' ही खंत व्यक्त झाली आहे ध्येयवादी बंडू सोमणच्या बासरींत; पण हा चौक साफ करून (वर्षातून फक्त एकदा) तिथे गणपती बसविला जायचा, त्याला सर्वांचाच हातभार लागायचा. एरवी सर्वगुणसंपन्न चाळीत एकमेकांचे जातिवाचक उल्लेख, तोतरा शेणवी, भटुरगी, परभटली मेली, कोळंबी खाऊ, सोनारडा.. वगैरे होत असले तरी गणपतीच्या १० दिवसांत सारे जातिभेद विसरले जात. कारण- प्रचंड गुणवत्तेचा साठा या ६० बिऱ्हाडांत ठासून भरला होता. या दारूगोळ्याला वात लावायची संधी गणेशोत्सवाशिवाय कधी मिळणार! ऐन गणपतीत दिवाळीची आतषबाजी... संगीतज्ज्ञ मंगेशराव हट्टंगडी ऊर्फ मंगेशराव, हे तर चाळीचे मूर्तिमंत संगीत. गणपतीच्या दिवसांत कितीही गर्दी झाली तरी मंगेशरावांच्या नुसत्या षड्ज-पंचमाने मंडपात सामसूम व्हायची! त्यांच्या पत्नी सौ. वरदाबाई हट्टंपडी (नृत्यचंद्रिका) यांना गणेशोत्सवात नाचायची विनंती केली, की नाचायला त्या एका पायावर तयार असत! "आपण नृत्यकला का सोडली' यावर "नृत्य साधे ना' हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं! तसेच महाविद्वान प्रा. नागूतात्या. खरं तर एका गणेशोत्सवात त्यांच्या व्याख्यानाचे वेळी, एकदा बोर्डावर चुकून "प्रा. नागूतात्या', असं लिहिल्याने प्राध्यापक ही उपाधीच त्यांना चिकटली होती. (एरवी जगातील सर्व प्राध्यापक गाढव आहेत, हे त्यांचेच मत!) नाट्यभैरव कुशाभाऊ अक्षीकर हे एकाच वेळी "नाट्यतज्ज्ञ' आणि "खाद्यपंडित' होते. कारण- एकेकाळी गंधर्व कंपनीत ते आचारी होते. गणेशोत्सवही त्यांना पंगत पर्वणीच! तेदेखील एकाच वेळी चाळीचे फडके अन् खांडेकर होते.
गणपतीपुढे होणारी त्यांची नाटकं हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय. कवयित्री प्रा. कल्पकता फूलझेले या काव्याप्रमाणे खेळातही (प्रेक्षक म्हणून) हुशार होत्या. त्यांना चित्रकलेचेही वेड होते. चाळीच्या गणेशोत्सवात त्यांच्या चित्रकलेचे नमुने (!) जागोजागी टांगले जात. चाळीतील विदुषी डॉ. सौ. कल्पकलाबाई कोरके धसवाडीतील गणपतीत "नागरी जीवनातील अपौरुषेय वाङ्मय'सारख्या गहन गंभीर विषयावर भाषण देत; तर बटाट्याच्या चाळीतील गणपती थोडाच अपवाद असणार? (बिच्चारा!) शिवाय चाळीचे इतिहासकार महापंडित बाबूकाका खरे, आहारशास्त्रज्ञ सोकाजी नानाजी त्रिलोकेकर, ग्रहगौरव अण्णापावशे, आध्यात्मिक स्फूर्तिकेंद्र दे. भ. बाबा बर्वे, उत्साहमूर्ती राघूनाना सोमण... किती नावं घ्यावीत? हे राघूनाना सोमण कन्येस लिहितात, "गणपती ही विद्येची देवता आहे. गणपतीस्रोत्रांत त्याला गणांनां त्वां गणपतीर्हवामहे, कविः कवीणाम् म्हटले आहे. गणांचा पती तो गणपती. कवी हादेखील गणमात्रांचा पती, म्हणजे गणपतीच नव्हे काय? गणपतीचे पुण्यातील महत्त्व पेशवे आणि बाळ गंगाधर टिळक या दोघांमुळे वाढले. भक्तांमुळे भगवंताला मोठेपण येते ते असे!' थोर (आगामी) चरित्रकार हणमंतराव दशपुत्रे; तर चाळीतील गणेशोत्सवातील कार्यक्रम "गाजण्या'वर प्रकाशझोत टाकतात... ""नंतरच्या आयुष्यात मी बटाट्याच्या चाळीतील गणेशोत्सवाच्या व्याख्यानांत, समोरच्या चाळकऱ्यांच्या आकसामुळे व खोडसाळपणामुळे भजी खाल्ली. केवळ "भजी मारा'च्या घोषणा झाल्या; प्रत्यक्ष स्टेजवर भजी आली नाहीत... तो प्रसंग मला आठवतो, "संस्कृती आणि जानवे' या विषयावर माझे भाषण होते. ते दिवस मोहनदास करमचंद गांधी या गुजराती पुढाऱ्याने चालविलेल्या सबगोलंकारी चळवळीचे होते; पण मी काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो! ब्रह्मतेजापुढे वाणी तेजाचा काय प्रभाव पडणार होता?'' प्रत्यक्ष गांधींची बरोबरी करणारे धडाडीचे वक्ते चाळीतच असल्यावर गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांतच दिवाळीचे भुईनळे फुटणार नाही तर काय! दहाव्या दिवशी विसर्जन; पण या सार्वजनिक गणपतीचे विसर्जन कधी झालेच नाही! "(पर्यावरण' हा शब्ददेखील तेव्हा जन्मला नसेल!) तरीदेखील गणपतीला निरोप देताना अंतर्मुख व्हावं तसं, बखरीशेवटी चाळीचा निरोप घेताना पु. लं. "चिंतनात' शिरतात.... ""पूर्वी बर्व्यांच्या घरी तेवढा गणपती बसायचा. पण समेळकाकांचे दाजी मखर करीत. एच्च. मंगेशराव बाप्पा आरत्या गात.
चौपाटीवर बर्व्यांचा गणपती विसर्जनाला जायचा; पण पाट डोक्यावर घेऊन स्वतः जनोबा रेग्यांचे काका चौपाटीच्या समुद्रात शिरायचे! लाटा अंगावर घेत ते पाण्यात शिरले, की पोरे भ्यायची. मोठी माणसं म्हणायची, "काका बेतानं', काका आपल्या कोकणी मराठीत म्हणायचे, ""रे, समुद्राची भीती कोकण्यांक कित्याक घालतंस? माशाक आणि मासे खाणाऱ्याक पाण्याचा भय नसतां!'' त्या वेळी चाळीतल्या पोरांना त्रिलोकेकरशेठ्येफादर (त्यांना चाळीत सर्व जण "फादर' म्हणत) मोफतमंदी (हा त्यांचाच शब्द) भेळ खायला देत. त्या उत्सवाला कमिटी नव्हती; अकाऊंट नव्हता, हिशेबाबद्दल शंका नव्हती!' ही सारी गोळाबेरीज केल्यावरदेखील चाळीच्या गणेशोत्सवाबद्दल अंदाज येतो इतकंच. समाधान काही होत नाही. चाळ तर केव्हाच जमीनदोस्त झाली असंल. चाळीची मालकी मेंढे पाटील (कोथिंबिरीचे होलसेल मर्चंट) यांच्याकडे गेली तरी ती कायम ओळखली गेली "बटाट्याची चाळ'! बटाट्यातील "ब' गळून जाऊ? आता कदाचित, "टाटा टॉवर्स' ही इमारत उभी राहिली असेल. सिमेंट-कॉंक्रीटच्या असंख्य कपाटात माणसांना बंद करून ठेवणारी! मूळचे चाळकरी केव्हाच बोरिवली-डोंबिवलीपलीकडे देशोधडीला लागले असतील. त्यांची पोरं- नातवंडंदेखील आता सीनिअर सिटिझन्सच्या रांगेत स्टेशन्सवर पास-तिकिटाला उभे राहत असतील! चाळ तर ५० वर्षांपूर्वीच शेवटचा घाव कोण घालणार, याची वाट पाहत कशीबशी उभी होती. कधी वाटतं, जमिनीसपाट झालेली "बटाट्याची चाळ' पुन्हा तीन मजल्यांनी उठून उभी राहील अन् म्हणेल, "पुलं, तेवढा गणेशोत्सव राहिला!'
- प्रभाकर बोकील
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Tuesday, September 10, 2013
Friday, September 6, 2013
शिक्षकांनीच घडवलं...
पु. ल. देशपांडे यांना त्यांच्या शिक्षकांनी घडवलं. राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेतच ते शिकले. स्वदेश आणि स्वदेशीवरचं प्रेम यासह अनेक गोष्टी ते या शाळेत शिकले. ते त्यांच्याकडूनच ऐकणं जास्त मनोरंजक होईल.
मी शाळेत होतो, तेव्हा वर्गात २५-२६ मुलं असायची. ही ५०-५५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ग इतका लहान असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक ओळखत असत. या मुलाच्या घरची परिस्थिती कशी आहे? तो कुठे राहतो? त्याचे मित्र कोण? वगैरे... शाळांना राष्ट्रीय शाळा म्हणत. सरकारी शाळांच्या मानाने इथे शिक्षकांना पगारही कमी मिळायचा. ध्येयवादी शिक्षक अशा राष्ट्रीय शाळांत येत असत. मुलांच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण व्हावं, चैन, पोषाखीपणा, ऐषआराम ही वृत्ती मुलांमध्ये नसावी, यासाठी शाळेमध्ये स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं जायचं. थोर देशभक्तांची चरित्रं सांगितली जायची. उत्तम व्याख्यानं व्हायची. मुलांचं शारीरिक- मानसिक बळ वाढावं, यासाठी निरनिराळे कार्यक्रम चालू असायचे. असल्या वातावरणात अमुक एकाच शिक्षकाने मला घडवलं किंवा परिणाम केला, असं म्हणणं बरोबर होणार नाही. तरीसुद्धा काही शिक्षक विशेष आठवतात.
माझ्या लहानपणी ज्यांनी मला साहित्य, संगीत, नाटक पाहून उत्तेजन दिलं, तू चांगला लेखक होशील, नाटकांत चांगलं काम करू शकशील, असा नुसता आशीर्वादच दिला नाही, तर आत्मविश्वासही निर्माण केला, अशा माझ्या शिक्षकांमध्ये तारकुंडे मास्तरांची मला खूप आठवण येते. तारकुंडे मास्तर आम्हाला फिजिक्स- केमिस्ट्री शिकवायचे. पण मैदानात आमच्याबरोबर क्रिकेट खेळत. स्नेहसंमेलनात नाटकं बसवत. मी १५ वर्षांचा होतो, तेव्हा 'बेबंदशाही'ची स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती मी तयार केली होती. तारकुंडे मास्तरनी माझं कौतुकच केलं नाही, तर त्यांनी स्वतः ते नाटक आम्हा विद्यार्थ्यांकडून बसवून घेतलं. मी त्या नाटकात संभाजीचं काम केलं होतं.नाटकातलं भाषण म्हणून झाल्यावर कडकडून टाळ्या पडणारा तो पहिला अनुभव मी त्या वेळेला घेतला आहे.
तारकुंडे मास्तरांना मुलांच्यावर कधी रागवावंच लागलं नाही. तसे ते चांगले उंचेपुरे होते. धिप्पाड म्हणावी, अशी देहयष्टी होती. पण बोलण्यात इतका जिव्हाळा होता की, फिजिक्ससारखा विषयही कवितेसारखा वाटायचा. तारकुंडेंच्या सारखेच आमचे फडके मास्तर. ते गणिताचे शिक्षक. पण उत्तम क्रीडापटू. गोरेपान, सडसडीत शरीर, खादीचा पायजमा, शर्ट, कोट अशा वेशातले. डोक्यावर टोपी न घालणारे माझ्या लहानपणी दोघेच शिक्षक होते. फडके आणि व्ही. डी. चितळे. वास्तविक मी गणितात खूप कच्चा. पण फडके मास्तर त्याबाबतीत मला कधीही न रागावता माझ्या पेटीवादनाचं कौतुक करायचे. माझं संगीताचं प्रेम या गणिताच्या फडके मास्तरांनी आणि ड्रॉइंग मास्तरांनी- कोंडकर मास्तरांनी- वाढीला लावलं. गणिताप्रमाणेच मला चित्रकलेतही अजिबात गती नसायची. एकदा या कोंडकर मास्तरांनी मला ड्रॉइंगच्या तासाला फ्री-हँड ड्रॉइंग काढायला सांगितलं. मी हताश होऊन समोरच्या कोऱ्या कागदाकडे बघत बसलो होतो. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक? ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'काय रे? तुझा कागद कोराच?' मी अगदी रडायच्या घाईला आलो होतो. मी रडू आवरत म्हणालो, 'मला चित्र काढायला येत नाही, सर!' 'अरे, तू चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस, तर येतच नाही हे कसं? रेघा तर ओढायला लाग. आलं तर आलं. नाही आलं तर नाही आलं. परवा पेटी काय छान वाजवलीस. ती काय आपोआप आली? अरे, आपल्या बोटात काय लपलेलं असतं, ते आपल्यालासुद्धा ठाऊक नसतं.' मी लगेच रेघोट्या ओढायला सुरुवात केली. कोंडकर मास्तरांचा नि माझा एक खासगी करार होता. मी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतले मार्क मिळवले, तर ते मला ड्रॉइंगमध्ये पास करणार होते... आणि गंमत अशी की, मीही त्यांना उगीच पास करायला लागू नये म्हणून प्रयत्नपूर्वक ड्रॉइंगकडे लक्ष द्यायला लागलो. माझी बोटेही साथ द्यायला लागली.
आणखी एका शिक्षकांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे व्ही. डी. चितळे मास्तरांची. पुढे फार मोठे साम्यवादी नेते म्हणून त्यांचं नाव झालं. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धा दूरदर्शनवरून पाहताना मला त्यांची खूप आठवण झाली. त्यांनी आम्हाला त्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या ध्यानचंद आणि इतर खेळाडूंचा खेळ दाखवला होता. ते आम्हाला इतिहास शिकवीत. पण स्वतः मात्र उत्तम खेळाडू होते. खूप देखणे होते. लालबुंद चेहरा. उत्तम आरोग्याचा आदर्श नमुना असावा, असे दिसायचे. सदैव हसतमुख. उत्कृष्ट वक्तृत्व. ते बोलायला लागले की, आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असू. माझी वक्तृत्वाची आवड चितळे मास्तरांनी जोपासली. त्यांनी मला दिलेला एक गुरूमंत्र आठवतो. ते म्हणाले होते, 'समोर गर्दी कितीही असो, त्यातल्या एकाशी बोलतोय, असं समजून बोलत जा. म्हणजे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तू त्याच्याशी बोलतोस असं वाटेल. फोटोतली सरस्वती कशी आपल्याकडेच पाहते असं वाटतं ना? तसं!' या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांनी घडून मी किती चांगला झालो, हे मला सांगता येणार नाही. पण त्यांच्याविषयी मात्र माझ्या मनात खूप मोठी कृतज्ञता आहे. त्यांची आठवण झाली की, मी पुन्हा शाळकरी वयाचा होतो.
पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स
५/९/२०१३

Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं,
पुलकित लेख
Subscribe to:
Posts (Atom)