Friday, December 13, 2019

मी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट.. - दिग्विजयसिंह ठोंबरे

दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगरवरून एका वकील मित्रासोबत घरी येत होतो. वाटेत ट्रॅफिकमुळे त्यांची व माझी चुकामुक झाली. तेव्हा ते रहात असलेल्या बिल्डिंग जवळ येऊन मी त्यांस रूमवर पोहचला का अशी फोनवर विचारणा केली असता ते "हो" म्हणाले त्यावर "या खाली चहा घेऊ" असा प्रस्ताव मी त्यांच्यापुढे ठेवताच ते म्हणाले,

" तुम्हीच या वर मी कपडे काढली आहेत "
माझ्या चहाच्या प्रस्तावाविरोधात त्यांनी मांडलेला प्रतिप्रस्ताव ऐकून मला प्रचंड हसु आल. विनोद हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक असायला हवा. असा विनोद हेरण्याची कला अवगत होण्याचं श्रेय मी पुलं च साहित्य जे माझ्या वाचनात आल त्यास देतो. पुलं चा विनोद कळण्यासाठी एक पर्याप्तता गाठावी लागते तरच पु.ल. समजतात व ती पर्याप्तता आपण गाठली आहे असा गैरसमज मी माझ्या मनात बाळगत असताना आज सकाळी एक वर्तमानपत्र वाचत होतो. त्यात आज पुलं ची पुण्य तिथी आहे असे वाचनात आले. मग काय अश्या या विनोदाच्या बादशाहावर काहीतरी लिहिण्याचा मोह आवरण कठीण झालं. त्यातच एक कल्पना सुचली, आमच्याच सोसायटीमध्ये पुलं चा सहवास लाभलेले "कैलास जीवन" या नामांकित ब्रँडची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे श्री.राम कोल्हटकर काका राहतात त्यांच ऑफिसदेखील सोसायटीच्याच दुसऱ्या मजल्यावर आहे. त्यांचीच भेट घेऊन पुलंबद्दल त्यांलाच बोलत करूयात.....

ही सुचलेली कल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी कैलास जीवनच्या ऑफिसचाच भाग असलेले बंधुतुल्य प्रशांत भागवत यांस मी सदरची कल्पना सांगितली.

त्यांनी देखील माझा भेट घेण्याचा उद्देश रामकाकांस कळवून थोड्याच वेळात माझी व राम काकांची भेट घडवून आणली.

यापूर्वी झालं का जेवण? काय चाललय? या व अश्या प्रकारचे प्रश्न विचारण्यापलिकडे अनुभव नसलेला "मी" व माझ्यासमोर बसलेले पुलं चा सहवास लाभलेले "रामकाका" अशी आमच्यात चर्चा सुरू होण्यापूर्वी माझ्या मनावर दडपण आल्यासारखं वाटू लागलं. अश्यातच मी त्यांस प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

पु.ल. नी एवढं अफाट लिखाण केल ते कसं काय?

पु.ल. मनसोक्त गप्पा मारत असत त्यामुळे त्यांचे लिखानाकडे दुर्लक्ष होत असे ही गोष्ट ज्यावेळी सुनीताबाईंच्या लक्षात आली त्यावेळी सुनीताबाई पुलं च्या लिखाणाच्या वेळी कोणासही पुलं ना भेटू देत नसत.अगदीच जवळची व्यक्ती असल्यास सुनीताबाई स्वतः त्या व्यक्तीबरोबर गप्पा मारत असायच्या. सुनिताबाई यांनीच खरेतर पुलंला लिहीत केलं.लिखाणास प्रवृत्त केलं.

पहिला प्रश्न व त्यावर काकांनी दिलेल्या उत्तरातील सहजतेने माझ्या मनावरील दडपण अलगदपणे बाजूला झालं. माझ्यातील मुलाखतकार जागा झाल्याचा मला भास होताच मी पुढील प्रश्न विचारला.

पुलं चा एखादा अप्रकाशित किस्सा तुमच्या आठवणीतील कोणता आहे?

८ नोव्हेंबर ला पुलं चा वाढदिवस असतो.येणारा वाढदिवस हा पुलं ची पंच्याहत्तरी असणारा होता.त्यामुळे पुलं च्या घरी भरपूर गर्दी होणार होती.वयोमानामुळे पुलं ना सगळ्यांना भेटणे शक्य नव्हते.त्यावर एक युक्ती काढून पुलं नी मला विचारलं राम तू कुठं राहतो ?

चंद्रमा अपार्टमेंट, प्रभात रोड, गल्ली क्र. ८ असे मी उत्तर देताच पुलं म्हणाले वाढदिवसादिवशी मी तुझ्याकडे रहायला येतो व ही गोष्ट कुणालाही कळता कामानये. स्वतः पुलं आपल्या घरी रहायला येत असल्यामुळे मला देखील आनंद झाला. ठरल्याप्रमाणे पु.ल. व सुनीताबाई आमच्याघरी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ नोव्हेंबर ला राहण्यासाठी आले. दुसऱ्या दिवशी पु.ल. पहाटे ५.३० वाजता उठून आवरून बसले.त्यामुळे आम्ही देखील लवकर उठून आवरताच मी पुलंना विचारले नाष्ट्याला काय करायचे? त्यावर पुलं म्हणाले,

उपीट सोडून दुसरे काहीही करा.

पुलंच व उपीटाच जमत नसल्यामुळे आम्ही पोहे किंवा दुसरा पदार्थ (आता नक्की आठवत नाहीये) नाष्ट्याला केला. नाष्टा व त्या ओघात गप्पा सुरु झाल्या तेवढ्यात आमच्या घरातील फोन वाजला. तो मी उचलताच,

राम सुनीताला फोन दे...!

कोण बोलतंय

फोन दे

आहो माझ्याकडे नाही आल्या सुनीताबाई

अरे तू फोन दे त्यांला

कोण बोलत आहात आपण असे मी त्यांस विचारताच

विजया राजाध्यक्ष अस उत्तर पलीकडून आलं.

सुनीताबाई फोन शेजारीच उभ्या होत्या परंतु नाईलाजाने आम्हास फोन ठेवावा लागला त्यामागील कारण म्हणजे पु.ल. आमच्या घरी आहेत हे कोणासही कळून द्यायचे नव्हते.

पुढे असेच काही फोन आले परंतु मी त्यांस पु.ल. सध्या कुठं आहेत हे मला ठाऊक नसल्याचे कळवले.

दुपारी माझी पत्नी चित्राने मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आम्ही एकत्र जेवण केले व छान गप्पा मारत बसलो. त्या दिवशी रात्री मी व पु.ल. पुलंच्या घराबाहेर नेमकी काय स्थिती आहे हे पाहण्यास गेलो असता आम्हाला दरवाज्यात दोन बुके नजरेस पडले.

त्यातील एकावर लिहिल होत

"आपल्या भेटीसाठी येऊन गेलो,गुच्छ स्वीकारावा"

शरद_पवार.


तर दुसऱ्या बुकेवर लिहिल होत

"आपला आशीर्वाद घेण्यासाठी येऊन गेलो"

बाळ_ठाकरे.


एवढ्या मोठ्या व्यक्ति पुलंबद्दल बाळगत असलेला आदर काकांच्या तोंडून ऐकून पु.ल. हे एक असामान्य व्यक्तिमत्व होत याची प्रचिती मला येत होती.मी विचारलेल्या प्रश्नांची काका मनमोकळेपणाने देत असल्याने आमची चर्चा औपचारिकतेकडून कधी अनौपचारीकतेकडे वळाली हे माझ्या लक्षातच आले नाही. मी त्यांस विचारले

पुलंच्या लोकप्रियतेचा एखादा किस्सा सांगाल काय?

एकदा पुलंच्या घरी मी गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी पु.ल. खूप आठवणी सांगत होते. "चित्रमय स्वगत" हे पुस्तक त्यावेळी ते लिहीत होते.त्यामुळे पुलंकडे असलेले फोटो बघून त्याबद्दलच्या आठवणी सांगताना पु.ल. जुन्या आठवणींमध्ये रमून जात होते. साहित्यावर बरीच चर्चा झाली व गप्पांच्या ओघात कधी रात्रीचे ११ वाजले कळलेच नाही. तेव्हा आम्ही गप्पा आवरत्या घेत मी पुलंच्या घरातून बाहेर पडलो. सोसायटीच्या खाली येताच तिथे उभी असलेली ट्रॅक्स माझ्या नजरेस पडली. साधारण १५ ते २० लोक असावेत त्या ट्रॅक्स मध्ये. त्या लोकांनी मला विचारले अहो इथे पु.ल. देशपांडे कुठे राहतात? एवढ्या रात्री अनोळखी व्यक्तींस पु.ल. याच सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर राहतात हे कसं सांगायचं असा प्रश्न मला पडला त्यावर मी सुरुवातीला त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं परंतु त्या लोकांनी

अहो आम्ही लातूरवरून आलोय

फक्त पुलंला बघायच आहे

त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं आहे

कृपया आमची भेट घडवून देता का?

त्या लोकांची पुलंला भेटण्याची ओढ पाहून मी पुन्हा पुलं च्या घरी गेलो व सुनीताबाईंला सांगितले,खाली काही लोक उभी आहेत,लातूरवरून आली आहेत त्यांला पुलं ला भेटायचं आहे फक्त,खूपच विनवणी करीत आहेत.

खूप उशीर झाला होता तरीही पुलं वर प्रेम करणाऱ्या व्यक्तींला नाराज करायचे नाही म्हणून सुनीताबाईंनी एका अटीवर त्या लोकांला पुलं ला भेटण्याची परवानगी दिली ती म्हणजे,

"पुलं बरोबर कुणीही बोलत बसायचे नाही फक्त भेटायचे"

सुनीताबाईंच्या या अटीची त्या लोकांस मी कल्पना दिली. ती त्यांनी मान्य करताच मी त्यांस पुलं सोबत भेट घडवण्यासाठी घेऊन गेलो. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याच दिसत होतं.प्रत्येक व्यक्ती पुलंच्या पाया पडून त्यांला डोळ्यात भरभरून साठवत होती.त्यांची पुलं सोबत भेट घडवल्याचा मला देखील मनस्वी आनंद झाला.

पुलं च्या लोकप्रियतेचे अनेक किस्से आहेत परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मी पुढील प्रश्नाकडे वळलो.

पुलंच्या बाबतीत एखादा भावनिक प्रसंग तुम्हास आठवतो का?

हो, पुलं ला महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला होता त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर प्रमोद नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस बाळासाहेबांनी पुलं च्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारासंदर्भात बोलण्याच्या ओघात त्यांच्या शैलीमध्ये एक वक्तव्य केले होते.त्यावेळी खूप वादंग निर्माण झाला होता. बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी छापून आली होती. त्यामुळे पु.ल. व बाळासाहेब यांच्यात दुरावा निर्माण झाला असावा असे लोकांस वाटत होते. या घटनेच्या साधारण वर्षभरानंतर मी ज्यावेळी पुलं च्या घरी गेलो त्यावेळी तिथे राज ठाकरे व नाट्य निर्माते मोहन वाघ आले होते राज ठाकरे पुलं ना म्हणाले,

काकांला आपणास भेटायचे आहे त्यांला आपल्याकडे घेऊन येऊ काय?

त्यावर पु.ल. उत्तरादाखल म्हणाले,

अरे कोण बाळ ना, तो कधीही माझ्याकडे येऊ शकतो. अरे तो माझा विदयार्थी आहे ओरिएंटल हायस्कुल,

मुंबईचा.

काही दिवसांनी राज ठाकरेंनी भेट ठरवली. ठरल्यादिवशी बाळासाहेब पुलं च्या घरी ४.३० वाजता येणार होते ते येत असताना पोलिसांचा फौजफाटा तसेच कार्यकर्त्यांचा लवाजमा अस काही त्यांच्यासोबत असणार नव्हतं. बाळासाहेब व पुलं च्या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी मी पुलं ना विचारणा केली असता त्यांनी देखील दिलखुलासपणे त्यादिवशी उपस्थित राहण्यास मला परवानगी दिली.

आणि तो दिवस उजाडला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांस राज ठाकरे पुलं च्या घरी घेऊन आले पु.ल. वयोमानामुळे व्हील चेअरवर बसले होते.बाळासाहेबांनी पुलं ना पाहताच आपल्या गुरुचे आशीर्वाद घेतले त्यावेळी पुलं बाळासाहेबांला म्हणाले

बैस..


या घटनेचा मी स्वतः साक्षीदार होतो. हा भावनिक प्रसंग माझ्या लक्षात राहीला तो कायमचाच

साधारण तासभर त्यांच्या दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाली त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये रंगलेली चर्चा पाहून त्यांच्यात वितुष्ट कधी नव्हतेच याची खात्री पटत होती. बाळासाहेबांचं पुलं च्या घरी येण हे त्यांच्या मनाच्या मोठेपणाची प्रचिती देऊन गेलं.

जशी बाळासाहेब व पुलं यांच्यात चर्चा रंगली होती तशीच रामकाका व माझ्यात रंगलेली चर्चा वेळेची मर्यादा ओळखून मी उरकती घेतली.

रामकाकांनी भेट दिली तसेच विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली त्याबद्दल त्यांस धन्यवाद म्हणून मी ऑफिसमधून बाहेर पडलो.

दिग्विजयसिंह ठोंबरे

Wednesday, December 11, 2019

देवाची देणगी - (मनमोहन रो. रोगे)

‘महाराष्ट्र भूषण’ पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी उत्साहात नुकतेच साजरे केले. एखाद्या साहित्यिकाला समस्त मराठी भाषिकांचे इतके प्रेम ‘पुलं’शिवाय अन्य कुणाला लाभले नसेल म्हणूनच, तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे प्रथम मानकरी ‘पुलं’ ठरले होते.

एखाद्याच्या अंगात नाना कला असणे म्हणजे काय हे ‘पुलं’कडे पाहिल्यावर लक्षात येते. ‘पुलं’मध्ये काय नव्हते? ते लेखक होते, कवी होते. नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, पटकथाकार, संवादलेखक, संगीतकार, नकलाकार, एकपात्री कलाकार, वक्ते, अभिवाचक, पेटीवादक आणि प्राध्यापकही होते. अशा कित्येक क्षेत्रांत त्यांनी एकाचवेळी प्रभावी संचार केला. ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट म्हणजे सबकुछ ‘पुलं’ असे मानतात. ‘जोहार मायबाप’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेला चोखामेळा पाहिल्यावर त्यांच्यातील असीम अदाकारीची आपल्याला प्रचिती येते. एक माणूस एकाचवेळी इतकी सगळी कामे तीही प्रभावीपणे कशी करू शकतो हेच कळत नाही. बरे हे सगळे करत असताना ते समाजसेवेतही मागे नव्हते. दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’साठी तसेच डॉ. अनिल अवचट यांच्या ‘मुक्तांगण’साठी त्यांनी भरभरून मदत केली. शिवाय शाळा, वाचनालये, रुग्णालये अशा समाजोपयोगी कितीतरी संस्थांना त्यांनी नेहमीच मदत केली. अनेक कर्तृत्वान माणसे आपापल्या क्षेत्रात थोर असतात, पण इतर क्षेत्रात ती माणसे तितकी प्रवीण नसतात. एकाचवेळी अनेक क्षेत्रात प्रावीण्य असलेली आचार्य अत्रे यांच्यानंतरची व्यक्ती म्हणजे ‘पुलं’ होय. त्यांनी ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात ते अग्रगण्य ठरले. त्यांचे कोणतेही पुस्तक घ्या. एकदा वाचावयास सुरुवात केली की, ते वाचून पूर्ण केल्याशिवाय वाचक स्वस्थ बसत नाही. त्यांची अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा आणि वंगचित्रे वाचताना ‘पुलं’ वाचकांना त्यांच्यासोबत त्या-त्या ठिकाणी फिरवून आणतात. ‘पुलं’नी लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचताना त्या-त्या व्यक्ती ‘पुलं’ वाचकांसमोर मूर्तिमंत उभ्या करतात आणि त्याच व्यक्ती ‘पुलं’कडून ऐकणे म्हणजे एक पर्वणीच.

त्यांचे साहित्य जाणून घ्यायचे, तर एक जन्मही पुरा पडणार नाही. त्यांचे पत्रसंग्रह आणि भाषणेही प्रसिद्ध आहेत. त्यांचे विनोद हे निखळ होते, त्यात अश्लीलता शोधूनही सापडणार नाही. घरातील सर्व वयाच्या आणि नात्याच्या सदस्यांनी एकत्र बसून ऐकावे, ऐकतच राहावे अशी त्यांची भाषा निर्मळ आणि स्वच्छ आहे. लोकांना हसवण्यासाठी त्यांना अश्लील भाषा वा आक्षेपार्ह अंगविक्षेप करावे लागले नाहीत. विनोद सांगण्याचे त्यांचे टायमिंग, ठरावीक वाक्य बोलून झाल्यावर क्षणभर घेत असलेला पॉज, प्रसंगानुरूप आवाजातील बदल, आवाजाच्या नकला हे सगळेच अप्रतिम आहे. मागील काही पिढय़ा त्यांची व्यक्तिचित्रे वाचत, ऐकत मोठय़ा झाल्याच, पण आजच्या झटपट, नवनवीन ट्रेंड बदलणा-या युगातील तरुण पिढीही त्यांची व्यक्तिचित्रे, त्यांचे कथाकथन तितक्याच तन्मयतेने ऐकतात. असे यश किती लेखकांना, कलाकारांना लाभले वा लाभते? प्रासंगिक विनोद, शब्दांवरील कोटय़ा करण्यात ‘पुलं’चा हातखंडा होता, तसेच ते हजरजबाबी होते हे ‘पुलं’ वाचताना, ऐकताना नेहमीच लक्षात येते. उगीच का त्यांना ‘कोटय़धीश ‘पुलं’ म्हणतात! ‘पुलं’नी वाचक-रसिकांच्या मनात ध्रुवाप्रमाणे अढळ स्थान प्राप्त केले आहे.

त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ची कित्येकांनी पारायणे केलीत. त्या व्यक्ती आपल्या ओळखीच्या वाटू लागतात. नारायण, हरितात्या, अंतू बर्वा, नामू परीट, नाथा कामत, नंदा प्रधान, १०० टक्के पेस्तन काका, सखाराम गटणे, चितळे मास्तर, पानवाला वगैरे व्यक्ती आपल्याला कुठे ना कुठे भेटल्यात, आपण पाहिल्यात असे वाटू लागते. ‘पुलं’चे निरीक्षण आणि त्यानंतर त्याची मांडणी इतकी उत्कट असते की त्या-त्या व्यक्तीरेखेत वाचक गुंतून जातो. बरे त्या व्यक्ती परत परत वाचताना वा ऐकताना कंटाळा तर सोडाच उलट तितकाच आनंद प्रत्येकवेळी होतो. किंबहुना कॅसेट ऐकताना पुढचे सगळे प्रसंग, वाक्ये माहितीची असताना, पाठ असतानाही ती ऐकताच तितकेच हसू येते ही ताकद आहे ‘पुलं’च्या लेखणीची आणि सादरीकरणाची. या सा-या व्यक्तिरेखा मला खूपच आवडतात, भावतात. त्यात डावे-उजवे, कमी-अधिक करणे कठीणच, तरी एक व्यक्तिरेखा ऐकताना मात्र मला हसू येते तितकेच कारुण्य वाटते (तसे कारुण्य हरितात्या, नारायण, वगैरेतही आहे.) आणि ती व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटली पाहिजे होती, त्या व्यक्तीचा सहवास काही काळ तरी मिळायला हवा होता असे वाटते. ती अजरामर, साधी-सरळ, किंचित रागीट-खूप प्रेमळ, दणकट तितकीच सहृदयी, स्पष्टवक्ती व्यक्ती म्हणजे ‘रावसाहेब’ होय. ‘पुलं’नी प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी ‘म्हैस’ही अजरामर केली आहे, पण रावसाहेब लाजवाबच!
     
रावसाहेब बेळगावचे तरी मराठी अभिमानी, नाटक-संगीताची आवड असलेले. आपल्याला एकही वाद्य वाजवता येत नसल्याची खंत बाळगणारे, गर्भ श्रीमंतीत जन्म होऊनही श्रीमंतीचा माज नसलेले, मैत्रीसाठी काहीही करण्यास तयार असलेले, ज्या मित्राविरुद्ध कोर्टात केस त्यालाच आपल्या घरी पाहुणचार करणारे, चोरी करणा-या नोकराची परिस्थिती कळल्यावर त्याला शिक्षेऐवजी मदत करणारे, खाँ साहेबांच्या गायनाने तृप्त होऊन त्यांचे पाय चेपणारे, स्वत: थिएटरचे मालक असूनही हौशी कलाकारांच्या नाटकात कुणाच्या पायाला खिळा चुकून टोचू नये म्हणून स्वत: रंगमंचावर झाडू मारणारे रावसाहेबच! श्रीमंतीचं वारं अंगावरून गेलं की ब-याच लोकांच्या मनाला लकवा भरतो. माणसे अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड बनतात पण रावसाहेब त्याला अपवाद होते. ‘दूधभात’ चित्रपटाची कथा कै. राम गबाळे आणि ‘पुलं’ रावसाहेबांच्या बंगल्यात लिहीत होते तेव्हाची रावसाहेबांची घालमेल, भाबडेपणा, निष्पाप वृत्ती आणि निरागसता हे सगळे ‘पुलं’च्या शब्दात पुन्हा पुन्हा ऐकावे इतके सुंदर आहे. काही वर्षाच्या सहवासानंतर ‘पुलं’ बेळगाव सोडणार हे समजल्यावर अतिशय दु:खी होऊनही ते दु:ख दाबून ठेवून ‘पुलं’ निघाल्यावर त्यांना ‘कशाला आला होता र बेळगावात?’ असे आपल्या बेळगावी सुरात विचारून ऐकणा-याचे काळीज चिरणारे रावसाहेबच! रावसाहेब ऐकताना त्यांच्यातील एक-एक पैलू ‘पुलं’नी असा काही उलगडत नेला आहे की, आपण त्यात गुंतून जातो.

रावसाहेबांच्या मैफलीत येणा-या एकूण एक व्यक्ती आपल्या ओळखीच्या होतातच पण त्या मैफलीत आपण कधी हजेरी लावतो तेच कळत नाही. मैफलीतील प्रत्येकाची रावसाहेबांनी आपल्या कानडी ‘टच’मधून मराठीत उडवलेली टोपी ऐकताना हसू आवरता येत नाही. त्यांच्या संवादात मराठीला सणसणीत कानडीचा आघात आणि कानडीला इरसाल मराठीचा साज असे. दर तीन शब्दामागे एक कचकचीत शिवी ठरलेलीच. मग ते नाक्यावरच्या मोचीसोबत बोलत असो वा जिल्ह्याच्या कलेक्टरशी. इतकेच नव्हे तर रावसाहेबांची जिमी नावाचा कुत्रा होता त्यालाही रावसाहेबांच्या शिव्या समजत असत. नाटय़प्रयोगाला गेल्यावर त्यातील सुमार नट पूर्वीच्या गाजलेल्या नटांच्या भूमिका करताना असह्य झालेले आणि पुढे एका नाटय़गीताची चाल बदलताच संतप्त झालेले रावसाहेब त्या नटाला खडसावून विचारणारे रावसाहेब तसेच तबलजी त्यांच्या मनासारखे वाजवत नसल्याने त्याला ‘तबला वाजिवतो की मांडी खाजवतो रे?’ असे खडसावून विचारणारे रावसाहेब! प्रत्येक प्रसंगानुरूप ‘पुलं’नी रावसाहेबांमधील ही सच्चाई, खरेपणा असा काही रंगवला आहे की रावसाहेब संपूच नये, ऐकतच राहावे असे वाटते आणि म्हणून एकदा-दहा वेळा-शंभर वेळा ऐकूनही रावसाहेब पुन्हा-पुन्हा ऐकतो आपण. आवेग आवरणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते, ते रावसाहेबांना जमत नसे तरीही रावसाहेब सभ्य होते, शुद्ध होते.

रावसाहेबांना लेडीज सितारिस्टचे फार वेड होते. त्यांच्या गाडीच्या मागेही लेडीज सितारिस्टचे चित्र लावलेले होते. ‘पुलं’ना आयुष्यात हजारो-लाखो माणसे भेटली तरी त्यांना पहिल्या भेटीत खिशात टाकणारे रावसाहेबच याची कबुली प्रत्यक्ष ‘पुलं’नीच दिली आहे. ‘पुलं’ स्वत:बरोबरच रावसाहेबांना अजरामर करून गेले. आपले भाग्य थोर म्हणून ‘पुलं’च्या या मातीत आपण जन्म घेतला. शेवटी ‘पुलं’ म्हणतात ना तेच खरे, ‘देवाने आमचे लहानशे जीवन समृद्ध करायला दिलेल्या या देणग्या, न मागता दिल्या आणि न सांगता परत नेल्या!’

मनमोहन रो. रोगे
(मोबाईल – ९८६९१८०९५८)
प्रहार
१७ नोव्हेंबर २०१९

Monday, December 9, 2019

माझी आ‘पुल’की - मधुरा दातार

अष्टपैलू कलाकार आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या बहुरूपी पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल काही लिहिण्याइतकी मी फोठी नाही. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची अनेक रसिकांप्रमाणेच मीही एक चाहती आहे. एकदा संध्याकाळी कमला नेहरू उद्यानाजवळ मला पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई दिसले. त्यावेळी मी फक्त सात वर्षांची होते. आई-बाबांकडे हट्ट करत मी त्यांच्या पाठोपाठ गेले आणि त्यांना विचारलं, ‘तुम्ही पु. ल. देशपांडे ना? तुमचा निवडक पु.ल. हा कार्यक्रम मला फार आवडतो.’ तेव्हा काहीही ओळख नसताना त्यांनी आणि सुनीताबाईंनी मला आणि आई-बाबांना अगदी प्रेमानं त्यांच्या रूपालीमधल्या घरी नेलं.

मी दुसरीत होते. मला काहीच कळत नव्हतं. त्यांनी मात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, की आपण आपल्या आजी-आजोबांशीच बोलतो आहोत, असं मला वाटलं. अगदी साध्या, सरळ, घरगुती गप्पा झाल्या. मी मराठी माध्यमात शिकते हे कळल्यावर, ‘बरं झालं. नाहीतर इंग्लिश मीडियममध्ये शिकणारी आजची मुलं आज गोकुळाष्टमी आहे, हे सांगताना आज लॉर्ड क्रिश्नाचा बर्थ डे आहे, असं सांगतात,’ अशी खास पु.ल. शैलीतली प्रतिक्रियाही दिली.

माझ्या प्रगतीपुस्तकावर ‘शाब्बास मधुरा!’ ही त्यांनी दिलेली कौतुकाची थाप आणि माझ्या वाढदिवसाला खूप मोठ्ठी हो, असा माझ्या वयाएवढा ‘ठ’ काढून पत्रातून दिलेला आशीर्वाद, या फक्त आठवणीच राहिल्या आहेत.

 
त्यांच्या एका भेटीत माझ्या विनंती आणि आग्रहामुळे पु. ल. आजोबा आणि सुनीता आजींनी फोटो काढून घेण्यासाठीही संमती दिली. खरं म्हणजे सुनीता आजी कधी फोटो काढून घेत नसत. ‘आज तू मला माझे सगळे नियम तोडायला लाव,’ असं कौतुकानं म्हणत त्या फोटोसाठी तयार झाल्या.

मी दर वर्षी ८ नोव्हेंबरला त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या घरी जायचे. तेव्हा त्यांच्या घरात अनेक मोठ्या कलाकारांपासून सामान्यांपर्यंत साऱ्यांचीच गर्दी असायची. ते सर्वांशी आपुलकीनं बोलायचे. खरंतर आपुलकी या शब्दातच पु.ल. दडलेले आहेत. पुलंनी आपल्याला काय दिलं नाही? त्यांच्या प्रत्येक पैलूनं आपल्याला भरभरून आनंद दिला. आपल्या लिखाणातून त्यांनी मराठी मनाची अस्मिता जपली. अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ यांसारख्या अनेक पुस्तकांतून आणि ती फुलराणी, सुंदर मी होणार यांसारख्या नाटकांतून त्यांनी आपल्याला खूप काही दिलं आहे. ‘विधात्यानं तुमच्या प्रतिभेचा एक अवयव तुमच्या कानात बसवला आहे की काय,’ असं समीक्षक अरुण आठल्यांनी म्हटलं आहे. ती फुलराणी सारखं नाटक बघताना त्याची प्रचीती येते.

आजूबाजूच्या परिस्थितीचं, माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून, त्यातली विसंगती हेरून, त्यांनी ती अशा काही खास शैलीत सांगितली, की सारा महाराष्ट्र खळखळून हसला. त्या शैलीला विनोदाची झालर आणि त्या जातिवंत विनोदाला कारुण्याची किनार.

म्हणूनच त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या साहित्याची अपूर्वाई कणभरही कमी झालेली नाही. आज मी जेव्हा जेव्हा ‘हसले मनी चांदणे’, ‘कौसल्येचा राम बाई’, ही गाणी गाऊन

रसिकांची दाद मिळवते, तेव्हा पुलंची प्रकर्षानं आठवण होते. ‘गुण गाईन आवडी’ असं म्हणत मला प्रोत्साहन द्यायला आज ते नाहीत. आज १२ जून. पुलंना आपल्यातून जाऊन १७ वर्षं झाली; पण त्यांच्या नावामागे कैलासवासी हा शब्द लिहायला मन तयारच होत नाही. आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात नसती उठाठेव करणारी मंडळी पाहिली, की त्यांची खिल्ली उडवून हसत हसत डोळ्यांत अंजन घालायला पुलं हवे होते, असंच वाटतं.

मधुरा दातार
१२ जून २०१७
महाराष्ट्र टाईम्स

Thursday, December 5, 2019

साहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी - (डॉ रमा खटावकर)

भाईंचंच एक वाक्य आहे, 'पंढरीच्या पांडुरंगापेक्षा त्याला उराउरी भेटणारा वारकरीच मला जास्त भावतो.' भाईंच्या चाहत्यांबाबतही मला बऱ्याच वेळा हाच अनुभव येतो.

भाईंचे चाहते जगभर पसरले आहेत, त्यांच्या पुस्तकांची पारायणे होत असतात. त्यांच्या लेखनातील उतारेच्या उतारे तोंडपाठ असणारीही बरीच मंडळी आहेत. पण माझ्या पहाण्यातले काहीजण खरंच अवलिये आहेत. पुलप्रेम, म्हणजे किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतं, हे त्यांच्याकडे पाहून कळतं. अशाच एका पुलप्रेमी वारकऱ्याची भेट करून द्यायचा आज विचार आहे.

निमित्त झाले आमच्या भिलार भेटीचे. अशिया खंडातील पहिले ' पुस्तकांचे गाव' म्हणून प्रसिद्ध असलेले, पाचगणी महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य परिसरात वसलेले हे छोटंसं गाव. अमाप कुतूहल मनात घेऊन या गावात आम्ही भटकत आहोत. कादंबरी, ऐतिहासिक, बालवाङ्मय, अशी एकेक घरे पहात पहात एका घरासमोर पावले थबकतात. ' विनोदी ' अशी पाटी या घरावर आहे. घरमालक श्री. संतोष सावंत. घराच्या एका खोलीत विनोदाला वाहिलेली खोलीभरून पुस्तके वाचकांसाठी सज्ज आहेत, आणि या विषयाचे सम्राट आपले पुल, असं सांगणारी एक गोष्ट इथे नजरेत भरत आहे. त्याविषयीच मला बोलायचं आहे.

घराबाहेरच्या भिंती, कट्टे विनोदी लेखकांच्या .अर्कचित्रांनी (कॅरीकेचर्स) सजलेल्या आहेत. (अत्र्यांच्या लेखणीचा काटेरी दंडुका झालाय, मधु मंगेश कर्णिक माशाचा आधार घेऊन उभे आहेत, इ. इ.) असं सगळं पहात पहात आपण पुढे जातो भिंतीकडे लक्ष जाताच नजर खिळून रहाते. भिंत भरून आकाराचं भाईंचं एक सुरेख अर्कचित्र आपल्याकडे पाहून मिश्किल हसत असतं. त्यांचे ते सुप्रसिद्ध, पुढे आलेले दोन दात पुस्तकाच्या बांधणीने शिवलेले दिसतात. चष्मा आणि पुस्तकासकट चमकणारे डोळे, पुस्तकावरची फूल, देश, पान, डे, ही गंमत, आणि हे सगळं टवटवीत. गुलाबी कमळाच्या आकारात. हे सगळं गमतीजमतीने निरखत असताना नजर जाते, ती चित्राच्या उजवीकडे असलेल्या साक्षात् भाईंच्या लफ्फेदार सहीवर.

आश्चर्याने डोळे विस्फारतात. पुलंची सही? इथे? या भिंतीवर? चित्रावर ? कशी ?

आता चौकशी करणं आलंच. मग आपण सामोरे जातो, ते या घरातल्या गृहलक्ष्मीच्या प्रसन्न स्वागताला.

हसऱ्या चेहऱ्याने, उत्साहाने सौ. शिल्पा सावंत सगळी माहिती सांगत असतात. भाईंच्या या अर्कचित्राचे, आणि इथल्या सगळ्याच चित्रांचे चित्रकार श्री. विजयराज बोधनकर. मूळ कागदावरचे चित्रही त्यांच्याच हातचे आहे.

४ मे २०१७ रोजी भिलार गावाचे उद्घाटन जेव्हा औपचारिक रित्या ' पुस्तकांचे गाव ' म्हणून झाले, त्यापूर्वी तीन दिवस एक बस करून बरेच चित्रकार इथे आले. त्यावेळी श्री. बोधनकर यांनी हा विनोद विभाग सजवला. भिंत भरून असलेले हे पुलंचे कॅरीकेचर, त्याखाली असलेल्या लांबलचक सुबक लाल लाल पायऱ्या, हा सगळा परिसर हा भिलारचा सेल्फी पॉईंट बनलाय. येणारा प्रत्येक जण भाईंसोबत इथे सेल्फी घेतोच. (आम्हीही अर्थातच याला अपवाद ठरलो नाही.)

आणखी काही महिन्यांनी शिल्पाताईंकडे रहाण्याचा योग आला. अविस्मरणीय असे अगत्य, आपुलकी, रुचकर अल्पोपहार, नेमक्या वेळी मिळालेला वाफाळता चहा, या सगळ्या पाहुणचाराबरोबर एक गोष्ट मनाला भिडली. आमच्यासाठी त्यांनी दिवसभर आणि रात्रभर पुस्तकांची खोली उघडी ठेवली होती. कुणाच्याही देखरेखीशिवाय. हा विश्वास एक रसिकच दुसऱ्या पुस्तकप्रेमीबद्दल दाखवू शकतो.

शिल्पाताईंकडून चित्रकार, साहित्यिक श्री. विजयराज बोधनकर यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांचा संपर्कक्रमांक मिळाला. पुलंच्या चित्राबद्दल, आणि विशेषतः त्या सहीबद्दल खूप उत्सुकता मनात होती. त्यांना फोन लावल्यावर दिलखुलास अशी त्यांची एक मुलाखतच हाती आली.

भिलार आणि भाईंचे कॅरीकेचर हा विषय निघाल्यावर चित्रकार भरभरून बोलू लागले. प्रत्त्येक पुलप्रेमी आपल्या लाडक्या दैवताचा विषय निघाल्यावर असाच खुलून येतो.

चित्राला आणि सहीला तर इतिहास आहेच, पण त्याचे निर्माते कलाकार श्री. विजयराज बोधनकर यांचा इतिहासही रोचक आहे.

भरपूर समृद्धी असूनही यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घर सोडलं. घरात सात पिढ्यांची चित्रकारीची परंपरा, परंतू साचलेपणामुळे वाढ नाही, म्हणून हा साचलेपणा मोडून कलेची जोपासना करण्यासाठी मुंबईला आले. त्यानंतर जवळजवळ ३९ वर्षे वडिलांचा एकही पैसा न घेता प्रवास चालू आहे. यात शिक्षण, पदवी, विवाह, घर, सगळे आले.

पुस्तक विचार देऊ शकतं, पुस्तकांमुळे आयुष्याला दिशा मिळू शकते हा त्यांचा अनुभव आहे. सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे, या तळमळीतून साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील सुमारे ९० व्यक्तींची अर्कचित्रे त्यांच्या कुंचल्यातून साकारत गेली. यांची प्रदर्शने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरघोस प्रतिसादात होऊ लागली. कुठलाही मोबदला न घेता.

या अर्कचित्रांचे नंतर एक पुस्तकही निघाले.

full Imperial size ची ही कॅरीकेचर्स आहेत. (यात बा.भ.बोरकर ढगांवर बसलेले आहेत, व्यंकटेश माडगूळकरांच्या चेहऱ्याला हरणाची शिंगं आहेत, दुर्गाबाई भागवतांच्या पेनाला आग लागलीय, तर गदिमांच्या लेखणीला पालवी फुटलीय.) ज्यांचं जे व्यक्तीचित्र, तेच अर्कचित्रात उतरलंय.

भाईंच्या या अर्कचित्राबद्दल बोलताना ते म्हणतात,

" पुलं कसे आहेत, तर कमळासारखे, गुलाबासारखे. त्यांनी दु:ख कधी जास्त उगाळलं नाही. सगळ्यांना प्रसन्न करीत राहिले, आणि त्यांचा वाचक भुंगा होऊन या कमळाभोवती गुंजारव करीत राहिला."

(चित्रात पण हा भुंगा दिसतोय बरं का.)

" आजही पुलं म्हटलं, की सगळं टेन्शन जातं. हा गेल्या तीन पिढ्यांचा अनुभव आहे. अस्सल साहित्य जुनं होत नाही. ते कालातीत आहे."
       
मुंबईत आल्यावर, वयाच्या अंदाजे १९ वर्षाच्या आसपास, कामधाम नसलेल्या अवस्थेत निरुद्देश भटकताना असंच तिकिट काढून शिवाजी मंदिरला जाऊन बसले. तिथे एक पांढऱ्या केसांचे गृहस्थ, आणि त्यांच्याच वयाच्या एक बाई अतिशय रसाळ पद्धतीने कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करीत होत्या. न राहवून त्यांनी शेजाऱ्याला विचारले, की हे कोण ? शेजाऱ्याने रागावूनच पाहिले, आणि म्हटले,

" हे पु.ल.देशपांडे, आणि त्या त्यांच्या पत्नी सुनिताबाई."

हे भाईंचे झालेले पहिले दर्शन. यानंतर भाईंचे बोरकरांच्या कवितांचे सादरीकरण, एकपात्री प्रयोग,आणि असेच कार्यक्रम ते पहात गेलो. पुलंची पुस्तके एक एक करीत खरेदी करीत सुटलो, आणि ती वाचता वाचता आयुष्याची प्रचिती येत गेली." (हा त्यांचाच शब्द.)

यानंतरचा त्यांचा अनुभव ऐकण्यासारखा.

लग्नानंतर एकदा मलेरिया झाला. दुसरं काहीच करता येण्यासारखं नव्हतं, तेव्हा 'व्यक्ती आणि वल्ली', आणि 'बटाट्याची चाळ' ही दोनच पुस्तकं आलटून पालटून सतत वाचत राहिले. इतकं, की ते मेंदूत केमिकल लोचा म्हणतात, तसं झालं. नारायण, हरी तात्या, अंतू बर्वा, नामू परीट, ही माणसं प्रत्यक्षात दिसायला लागली. मग त्यांची अर्कचित्रे काढली. ती काढता काढता भाईंचीही बरीच चित्रे काढली. भिलारच्या भिंतीवरचं चित्रं त्यातलंच.

आता या चित्रावरच्या सहीचा किस्सा.

या चित्रांवर भाईंच्या सह्या घ्याव्यात, ही खूप इच्छा होती. तसा योग जुळूनही आला.

मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीमधे चित्रकार बोधनकर यांचा सत्कार होता, तिथे पुलं येणार होते. त्यावेळी बाळासाहेबांनी साहित्यिकांना बैल म्हटल्याने वातावरण गरम होते. ठाकरे- पु.ल. वाद रंगला होता. त्या सगळ्या गोंधळात कार्यक्रमाला पुलं आलेच नाहीत. सह्यांचा विषय बारगळला.

काही काळानंतर एका म्युझियममधे भाईंचे भाषण होते. त्यावेळी त्यांना माईक लावून द्यायचा, आणि तासभर त्यांच्याजवळ उभे रहायचे, असे काम बोधनकरांना मिळाले. त्यावेळी ती सगळी व्यक्तीचित्रे त्यांनी पुलंना दाखवली. त्यांनी चित्रांचे खूप कौतुकही केले. सह्या मागितल्यावर भाई सह्या करू लागले. पार्किन्सन्समुळे त्यावेळी त्यांच्या हातामध्ये कंप होता. (आपल्याला तो कंप सहीमधेही दिसतो.)

दोन चित्रांवर सह्या मिळाल्या, त्यात हे भाग्यवान चित्र होतं. थरथरत्या हाताने भाई तिसऱ्या चित्रावर सही करू लागले, त्यावेळी मात्र या त्यांच्या भक्ताने त्यांना थांबवलं. त्यांचा त्रास यांना पहावला नाही.

धन्य ते पु.ल.! हात थरथरत असूनही चाहत्याचे मन राखण्यासाठी कष्ट घेतले, आणि धन्य त्यांचा भक्त ! त्यांच्या सहीचा अनमोल ठेवा स्वत:च्या कलाकृतीवर मिळत असतानाही, केवळ त्यांचा त्रास पहावत नाही, म्हणून त्यांना थांबवले.

तर असा हा सहीचा इतिहास.

हेच अर्कचित्र पीएल् यांच्या सही सही सहीसकट भिलारच्या सावंतांच्या घरी, त्या भिंतीवर सेल्फी पॉईंट म्हणून विराजमान झाले आहे.

मुद्दाम सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे.

पुलंची सही असलेले जे चित्र भिंतीवर काढले आहे, त्यावर कलाकाराने स्वत:ची सही केलेली नाही. त्यांचे नावही कुठे नाही.

न केलेल्या या सहीतून खूप काही त्यांनी सांगीतले आहे.

बोधनकरांनी काढलेल्या, भाईंची सही न लाभलेल्या बाकीच्या चित्रांचाही एक गमतीदार किस्सा त्यांनी सांगीतला.

पुलंचे बंधू श्री. रमाकांत देशपांडे, यांच्याकडे ती चित्रे दाखवायला हे घेऊन गेले. प्रथम इतर काही चित्रे दाखवली, तेव्हा 'चहा कर गं' , अशी सूचना स्वयंपाकघराकडे गेली. नंतर जशी पुलंची, आणि वल्लींची चित्रे येऊ लागली, तशी "आता कांदेपोहेच कर." अशी ती सूचना बदलली.

तर असे पुलवेडाचे हे किस्से.

मराठी साहित्याची जर पंढरी असेल, तर इथल्या पांडुरंगाचा मान निर्विवादपणे पद्मश्री पु.ल. देशपांडे यांचाच आहे.

या पांडुरंगाच्या आणखी काही अचाट अफाट वारकऱ्यांचे किस्से परत कधीतरी.

डॉ रमा खटावकर.

Tuesday, December 3, 2019

पु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा

नमस्कार मंडळी. पु लंचं हे जन्मशताब्दी वर्ष. महाराष्ट्राचे लाडके दैवत पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त माझा ‘पु. लं. आणि दि टॉवर ऑफ बटाटा’ हा लेख 'सारस्वत चैतन्य'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. जर कां 'बटाट्याच्या चाळी' चा पुनर्विकास (Redevelopment ) झाला तर ..... हा लेख मी माझ्या वाचकांना सादर करत आहे.

पु लं च्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि ‘पुल’कित विनोदाचं लेण ल्यायलेली बटाट्याची चाळ म्हणजे मराठी मना मनाचा अमोल ठेवाच म्हणावा लागेल. पु लं च्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून पु लं आणि ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ चे रेखाटन करायचा प्रयत्न केला आहे. पु लं परत आले तर..

हल्लीचे दिवस चाळींचे पुनर्विकास करण्याचे दिवस आहेत. चाळीचे टॉवर संस्कृतीत होणारे संक्रमण बटाट्याच्या चाळीच्या पात्रांना धरून रेखाटन करण्याचा प्रयत्न केला आहे - ती ही पु.लं. ची माफी मागून - )



पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे - म्हणजे आपले पु लं - भाईंनी १८ वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावरून एक्झिट घेतली. परंतु त्यांच्या अमोघ साहित्याने मराठी मनामनावर अधिराज्य केले. असा मना मनावर राज्य करणारा अनभिषिक्त सम्राट एकमेवाव्दितीयच ! त्याच रसिकांचं प्रेम मनात घेऊन भाई २००० साली गेले खरे, परंतु त्यांच्या मनातून त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक काही जाईनात !

एकदा तरी त्या रसिकांची भेट घेऊन यावं, असं पु .लं. ना मनापासून वाटू लागलं. शेवटी, चित्रगुप्तांकडे एक दिवसाच्या ‘कॅज्युअल लीव्ह’ चा अर्ज दिला, तोही घाबरतच, आणि ती रजा मंजूर झालेली पाहताच, पु. लं. च्या आनंदाला पारावार उरला नाही..... कधी एकदा पृथ्वीवर जातो आणि समस्त रसिकांना भेटतो, असं त्यांना झालं..... त्यांना त्यांचं घर, चाहते, नाट्यप्रेमी मंडळी - सारे सारे आठवू लागले आणि …. आणि त्यांच्या लेखणीतून साकारलेली अजरामर बटाट्याची चाळ ..... ते बाबूकाका, त्रिलोकेकर, अण्णा पावशे - पु. लं. ना त्यांच्या मानस पुत्रांची, बटाट्याच्या चाळीची अनिवार्य ओढ वाटू लागली. झालं …. नक्की ठरलं, यावेळी फक्त बटाट्याच्या चाळीलाच भेट द्यायची, असं त्यांनी मनाशी ठरवलं.

बटाट्याच्या चाळीचे, पूर्वीचे ते दिवस आठवत, पु. लं. बटाट्याच्या चाळीच्या गल्लीत शिरले. इतक्या वर्षांत गिरगावात बरेच बदल झालेले, त्यांच्या संवेदनशील मनाने लागलीच टिपले. पण दूरवर नजर टाकली तरी, ती भली थोरली बटाट्याची चाळ काही दृष्टीस पडेना..... गेली कुठे ? रस्ता-गल्ली चुकलो तर नाही नां ? याची पु.लं. नी खातरजमा करून घेतली. पण छे, ‘बाप आहे मी, कधी विसरेन कां ?’ असंही त्यांच्या मनात क्षणभर येऊन गेलं.

पु.ल.ची भीती खरी होती. बटाट्याच्या चाळीच्या जागी, गगनचुंबी प्रकारात मोडणारी टोलेजंग इमारत उभी होती. त्या इमारतीचे मजले मोजायचा पुलंना मोह झाला ! मान दुखेल की काय, या विचारांनी त्यांनी तो विचार दूर सारला. उगीचच, त्यांना श्यामच्या डोक्यावरून खाली पडलेल्या टोपीची आठवण झाली ! तेवढयात, त्यांचे लक्ष इमारतीच्या पाटीवर गेले. ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ ! बटाटा नावापाशी ते काहीसे घुटमळले आणि गेट मधून आत जाऊ लागले. लागलीच वॉचमनने त्यांना हटकले, ‘किधर जाने का है ?’ असा प्रश्न भाईंना नवा होता. बटाट्याच्या चाळीत शिरायला काय, किंवा कुणाच्या घरात शिरायला काय - कधी कोणाच्या xxxची परवानगी घ्यावी लागत नसायची !

“इधर वो चाल … वो लंबाचौडा चाल था … वो किधर गया ?” पु.लं.नी तरी मनातली शंका विचारून घेतलीच.

तो उत्तर भाषिक वॉचमन बुचकळ्यात पडला. तरी, भाईंना समजावत म्हणाला, “नही, यहां कोई चालवा नही है. तुम का गलत फैमी हुई गवा, हम सात साल से इधर नौकरी कर रहा हूं “

भाईंचा चेहरा गोंधळला. आपण या चाळीचे जनक ....... चाळ जमीनदोस्त झाली की काय ?, या विचारानेही त्यांच्या पोटात कालवाकालव झाली. मग आपल्या मानसपुत्रांचं काय ? ते त्रिलोकेकर शेट, बाबूकाका, अण्णा पावशे ........ तरी भाईंना काही शांत बसवेना...... “इधर वो त्रिलोकेकर शेट रहते थे...... वो बाबूकाका ...... या तो वो अण्णा ....... अण्णा पावशे ?” भाईंनी एकेकांची नाव घ्यायला सुरुवात केली ...... वॉचमन तर काही ऐकायला तयार नव्हता. तो ही आपल्या भाषेत मोठमोठ्याने बडबडू लागला.

गेटवर काही बाचाबाची झालेली पाहून, तीन-चार पेन्शनर मंडळी तिथे जमा झाली. पैकी एकाने डोळ्यांवरचा चष्मा वर-खाली केला, गळ्यातल्या मफलरने नीट पुसला, पुन्हा पाहिले, “अरे ये तो साला भाई लगता है !”

बाकीची मंडळी ‘भाई’ ऐकताच पळायच्या तयारीत राहिले, तर ते “अरे भागतो कशाला रे ? तो बंदूक वाला भाई नाय..... आपला भाई..... चाल वाला भाई- पी. एल. रे - देशपांडे !”

तेव्हा कुठे त्यांचे पेन्शनर मित्र थांबले व डोळे बारीक करून ओळख पटते का ते पाहू लागले ..... भाईंना देखील आवाज ओळखीचा वाटू लागला...... त्रिलोकेकर शेट तर नव्हे नां ?, अशी शंका वाटू लागली. कारण त्यांनी रेखाटलेले त्यावेळचे त्रिलोकेकर शेट आणि आज त्यांच्या पुढ्यात उभे असलेले पात्र - यांत जमीन-अस्मानाचे अंतर होते - गळ्यात मफलर, नाकावर फॅशनेबल चश्मा, पायात ट्रॅक सूट, टी-शर्ट आणि स्पोर्ट शूज ! - असा जामानिमा होता. पण आवाज आणि बोलण्याची लकब मात्र चाळीतल्या त्रिलोकेकर शेटची होती !

“भाई, मी सोकाजी …. सोकाजी दादाजी त्रिलोकेकर - ओळखला नाय काय ?”, त्रिलोकेकर शेठनां पाहताच भाईंना प्रेमाचे भरते आले. वयोवृद्ध त्रिलोकेकर शेटनी भाईंचे पाय पकडले, त्यांना नमस्कार केला.

“अहो, असं काय करता त्रिलोकेकर शेठ ?,“ भाई काहीसे गहिवरले. “अरे, तुम्ही तर आमचा बाप !”, त्रिलोकेकर शेट.

भाईंचे डोळे विस्फारले…. “त्रिलोकेकर शेट, तुम्हाला जनक म्हणायचे आहे का ?”, भाईंनी त्यावेळीही त्रिलोकेकर शेटची चूक दुरुस्त केली.

त्रिलोकेकर शेट , “तेच नां ? बाप, फादर ..... तुमी म्हणते तो ..... जनक, एकच नां ?,” भाईंच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. त्रिलोकेकर शेटनी बरोबरच्या पेन्शनर्सची ओळख करून दिली, “अरे भाई, हे लोक बघ ..... जुना बटाट्याची चाळ वाला ..... हा बाबूकाका - अरे खरे रे … हिस्ट्री वाला .......”, धोतर-सदरा, हातात काठी घेतलेले बाबू काका कान देऊन ऐकू लागले, “आं ?”

“अरे बाबूकाका, साला ते कान मंदी घालायचा मशिन तू खिशा मंदी कशाला ठेवते ? कान मंदी घाल नां !” भाईंकडे वळून म्हणाले, “अरे, आता ओल्ड झाल्यावर बाबूकाकाला कान मंदी काय पण ऐकू येत नाही.”

बाबूकाकांनी शर्ट-पँटीचे सगळे खिसे थरथरत्या हातांनी चाचपडले आणि कानांत यंत्र घातले. भाई त्यांच्या या मानस पुत्राचं वार्धक्य जवळून निरखीत होते. त्रिलोकेकर त्यांच्या कानाशी कुजबुजले, “आपला भाई हाय रे …. बटाटा चाल वाला.....”

ओळख पटताच बाबूकाकांना कोण आनंद झाला. प्रेमाचं भरतं आलं, त्यांनी भाईंना चक्क मिठीच मारली ! इतकी कडकडून मिठी मारली की, बाबूकाकांना अफजलखानाने शिवाजी महाराजांना मारलेली मिठी आठवली असावी ! “भाई, ...... इतका आनंद झाला की.......”, त्यांना शब्द फुटेना. भाईंनी त्यांच्या प्रेमळ मिठीतून कशीबशी सुटका करून घेतली !

“भाई, मी अष्टेकर - कुशाभाऊ अष्टेकर”, कुशाभाऊंनी स्वत:ची ओळख स्वतःच करून दिली. भाई बारीक डोळे करून, त्यांना न्याहाळू लागले. कुशाभाऊंमध्ये फारसा फरक पडलेला भाईंना काही जाणवला नाही. केस पिकले असावेत, पण कलप इतका बेमालूम पणे लावला होता की, कुठूनही रुपेरी छटा दृष्टीस पडत नव्हती आणि शरीराचाही फापटपसारा नव्हता. नाट्यभैरव म्हणून चाळीत कुशाभाऊ प्रसिद्ध होते. म्हणजे, त्याकाळी ते ‘स्वयंघोषित’ नाट्यभैरव होते ! गंधर्व नाट्य कंपनीत ते होते आचारी, पण रुबाब मात्र मुख्य नटाचा होता ! त्यानुसार त्यांनी स्वतःची शरीरयष्टी तशी प्रयत्नपूर्वक राखली असावी. न जाणो, कधीकाळी, नाटकात भूमिका मिळाली तर .....

कुशाभाऊ जेष्ठ नागरिकांत मोडत असले तरी, आपलं शारीरिक तारुण्य त्यांनी जपलं होतं. त्यांच्या चालण्या-बोलण्यात काहीसा चपळपणा होता. “भाई, आशीर्वाद असावा,” असं नाटकातलं वाक्य फ़ेकावं, तसं म्हणत, भाईंना त्यांनी वाकून नमस्कार केला. भाईंनाही गहिवरून आलं !

“आणि भाई, हेनला ओळखलं का ?” पुढच्या पेन्शनर कडे वळत त्रिलोकेकर शेटनी विचारले.

भाई आपल्या स्मृतीला ताण देऊ लागले. चेहऱ्यावरचे ते पूर्वीचे हसू मात्र तसेच ठेवले. बरेचदा हसून वेळ मारुन नेता येते, हे भाईंना अनुभवांने माहीत होते. त्यांच्या मनात आले, मी जनक असलो तरी, जन्मलेलं बाळ आणि बाळसं घेतलेलं बाळ, यात फरक असणारच नां ? त्यावेळची ती मध्यमवयीन व्यक्तिरेखा आणि आणि आत्ताची ही वृद्धापकाळाने थरथरणारी व्यक्ती - यांचा ताळमेळ जुळवणे भाईंनाही नक्कीच भारी होतं ! शाळेतल्या कुठल्यातरी कठीण प्रश्नाचे उत्तर गुरुजींनी विचारल्यावर, उत्तर येत नसेल तर, विद्यार्थ्याचा जसा चेहरा होतो, तसा बाईंचा झाला होता !

“अरे भाई ...... हा तर साला पावशा रे !”, त्रिलोकेकर भाईंच्या मदतीला धावून आले. म्हणजे कोडयातही तेच टाकत होते नि उत्तरही तेच देत होते ! भाईंनी स्मृतीला ताण दिला...... अण्णा पावशे ..... म्युनिसिपालिटीच्या पाणी खात्यात नोकरी ...... ज्योतिषाची आवड ......

“हां हां ....... अण्णा पावशे !”, भाईंनी त्यांना ओळखले.

अण्णा पावशे भाईंनी रेखाटलेले मध्यमवयीन गृहस्थ होते, आणि आणि आत्ताचे हे अण्णा, तोंडाचं बोळकं झालेले, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा लावलेले, कृश झालेले - आणि त्यांचा तो कृश देह सतत थरथरत होता......

“भाई, बघ रे , या पावशाचा काय झाला...... साला पार्किन्सन झाला ...... ओल्ड एज लई बॅड रे ..... लई बॅड..... सारखा थरथरतो ....... थरथरतो ! हात पाय थरथरतो. आमी लोक तेला सांभाळतो. जुना नेबर नां चालवाला ?, “

भाई आपल्या मानसपुत्राची ही अवस्था विषण्णपणे पहात होते.

“भाई,” म्हणत अण्णा पावशांनी भाईंवर स्वतःला झोकून दिले. भाईंना त्यांचा अचानक आलेला भार सोसवेना, त्यांचा तोल जाऊ लागला ..... बाकीची मंडळी त्यांना सावरायचा प्रयत्न करू लागली. त्यांचीही ही ताकद यथातथाच होती. पण प्रसंगावधान राखून ‘द टॉवर ऑफ बटाटा’ चा वॉचमन पुढे आला आणि त्याने ‘टेकू’ दिला ! त्यामुळे भाई आणि अण्णा जमिनीवर लोटांगण घेण्यापासून वाचले !

अजून किती म्हातार्‍यांना आपल्याला ‘टेकू’ द्यावा लागेल या विचाराने बहुदा, “अरे, आप लोग वो बेंच पे बैठो नां ? “ वॉचमन सूचना केली आणि ती सगळ्यांना पटली.

“हां हां … यू आर राईट,” म्हणत त्रिलोकेकर भाईंकडे वळले आणि म्हणाले, “चला भाई, तिकडे बेंच हाय ..... तेच्यावर बसू...... “, सगळी चमू ‘द टॉवर ऑफ बटाटा’ च्या बाकड्यावर जाऊन विसावली आणि शिळोप्याच्या निवांत गप्पांना रंग चढला !

“अरे, आपली चाळ कुठे गेली ?,” भाईंच्या मनात दुःख खदखदत होतं.

“चाळ पाडली,” अण्णा पावशे थरथरते हात हवेत उडवून ताडकन बोलले.

“चाळ ही वास्तू इतिहास जमा झाली,” बाबूकाकांमधील इतिहासाचार्य मधूनच डोके वर काढत होता.

“सात वरस झाली ...... सेवेन इयर्स ..... “, त्रिलोकेकर उंच टॉवर कडे बघत बोलले .

“म्हणजे आपली बटाट्याची चाळ मालकाने - तिवारीने विकली,” कुशाभाऊंना मध्येच थांबवत बाबूकाका म्हणाले,

“त्या चाळीचा मूळ मालक धुळा नामा बटाटे - क्रॉफर्ड मार्केटचा टोपल्याचा व्यापारी,” प्रत्येक वेळी इतिहासाचे दाखले देण्याची बाबूकाकांची सवय आजमितीही कायम होती, हे भाईंनी हेरले.

“तर, नंतरचा मालक - तिवारीने ती एका बिल्डरला विकली आणि या चाळीचे रि-डेव्हलपमेंट झाले,” कुशाभाऊ वर्तमानात होते, “आणि आणि हा ‘टॉवर ऑफ बटाटा’ त्या जागेवर उभा राहिला नां !”

“ते चाल.....डिमॉलिश केला नां ..... तेव्हा काय दुःख झाला रे ...... मी आणि बाबलीबाय - माय वाईफ रडला रे रडला,” त्रिलोकेकरांचा आवाज कातरला.

भाईंच्याही पोटात गलबललं. त्यांच्या डोळ्यासमोरून चाळ जमीनदोस्त होतानांची काल्पनिक दृष्य चलचित्रपटासारखी सरकू लागली. ...... चाळ उभारतानां ....... चाळीची निर्मिती करतानां, भाईंच्या लेखणीने अमाप कर्तृत्व दाखवले होते ! विनोद- हशांनी त्यावर इमले चढवले होते !

“अरे भाई, आमचा होल लाइफ त्या खोलीमंदी गेला नां !” त्रिलोकेकर त्याच दुःखात होते.

“भाई, आमच्या पण पोटात कालवाकालव झाली ..... कोकणातून येऊन इथेच - चाळीत राहिलो नां - चुलत्याच्या बिऱ्हाडांत ! चाळीशी एक प्रकारची जवळीक होती !”, अण्णा पावशे सुद्धा जुन्या स्मृतींमध्ये गेले.

“हया टोलेजंग - उंच इमारतीत चाळीचे रूपांतर झाले,” कुशाभाऊ भाईंना सगळी माहिती देत होते, “प्रत्येकाला एकेक खोली आधी चाळीत होती. आता प्रत्येकाला ७५० स्क्वेअर फूटचा ब्लॉक मिळाला !”

“हो का ?” भाई चकित झाले. आपल्या बटाट्याच्या चाळीची भविष्यकाळात अशी काही उन्नती होईल, अशी त्यांना निर्मितीच्या वेळी कल्पनाही नव्हती !

“एका खोलीत सात-आठ माणसं गुण्यागोविंदाने राहायचो, त्यावेळी !” अण्णा पावशे जुन्या दिवसात रमले होते.

“आता प्रत्येक ब्लॉक मध्ये तीन किंवा चार माणसं !”, कुशाभाऊ.

“पाचवा माणूस आला की, गर्दी होते आत्ताच्या काळात !,” बाबूकाकांनी मनातली मळमळ ओकून टाकली.

तोवर कुशाभाऊंनी मोबाईल वरून बाजूच्या चहावाल्याला फोन केला. बघता बघता, लहान थर्मास व कागदी ग्लास घेऊन, चहावाला पोऱ्या आला. त्याने सगळ्यांना चहा दिला.

“भाई, चहा घ्या, बाजूच्या हॉटेल मधला आहे,” कुशाभाऊ.

“ असं कां ?”, भाईंना हे नवीनच होतं.

“तर काय भाई, इथे सगळं आता फोनवरून होतं - चहा, दूध, फळे, भाज्या, धान्य, हॉटेलचं खाणं ...... फोन करायचा, ऑन-लाइन पेमेंट करायचे, घरात सगळे हजर ! खिशात पैसा असायची गरज नाही !”

“पण साला..... अकाउंट मंदी पैसा पाहिजे ना !,” त्रिलोकेकर शेटनी मध्येच जोक मारला. सगळे त्यावर खळखळून हसले.

“या फ्लॅट मंदी लय सुविधा हाय …. मस्त हाय. पण चाल मंदली मजा नाय,” त्रिलोकेकर चाळीला मिस करत होते.

“आता घराघरात नळ, त्याला धो धो पाणी,” अण्णा पावशे.

“ त्यामुळे नळावरची भांडण थांबली नां !,” बाबूकाका.

“ आपला तो रामा गडी - त्याची सून येते इथे काम करायला ! ओळखता येणार नाही - शर्ट पॅन्ट घालते,” अण्णांनी बातमी पुरवली.

‘आणि ते……. आपले एचच मंगेशराव गायक आणि त्यांच्या त्या सौ. वरदा बाई ..... नृत्य ...... “, भाईंना एकेकाची आठवण येत होती

“हो हो, ते गातात नां ...... गाणं कसं सोडतील एचच. मंगेशराव ?,” कुशाभाऊ.

“फक्त दरवाजे- खिडक्या बंद करून गातात ! त्यांच्या गाण्याने आमची झोपमोड होते, अशी तक्रार त्यांच्या शेजाऱ्यांनी केली म्हणे,” बाबूकाका.

“असं कां ?,” भाई.

“आणि त्यांच्या त्या सौ. ...... कंबर दुखते म्हणून, पट्टा दिलाय डॉक्टरांनी ! तो घालून डान्स करतात. पूर्वी नृत्य करायच्या, आता पाश्चात्य संगीतावर तो रोंबा सोंबा का काय तो नाच करतात,” अण्णा पावशे.

“पण दरवाजे- खिडक्या बंद करून …. !,” बाबुकाका.

सगळे मनमुराद हसले.

“नाही म्हणजे, आम्हाला त्यांची कला पाहायला मिळते, गणेशा फेस्टिवल मध्ये - कार्यक्रमात !”, कुशाभाऊ.

“भाई, पूर्वीची चाळीतली मजा, एकमेकांमध्ये असलेले प्रेम - जिव्हाळा आता या टॉवर संस्कृतीत राहिलेला नाही, हे मात्र खरं ! गणेशोत्सव आता दि गणेशा फेस्टिवल झाला आहे !”, बाबूकाका.

“तेचा काय आहे भाई, आफ्टर रि-डेव्हलपमेंट आमी लोकांनला बिल्डरने फ्लॅट दिला. बाकीचा फ्लॅट विकला - ते मारवाडी- गुजराती लोक नी बाय केला,” त्रिलोकेकर.

“त्यांच्याकडे पैसा हाय नां, त्यामुळे त्यांची संख्या आता जास्त आहे. गणेशोत्सव होतो पण, पूर्वीसारखा नाही, “ अण्णा पावशे.

“मराठी सांस्कृतिक वातावरण लयाला गेलं !,” बाबूकाका.

“साला ..... मिक्स कल्चर आला इकडे !,” त्रिलोकेकर.

भाई सारं काही ऐकत होते.

“जरा काय झाला की, फोन करतात. समदी कामं साला फोनवरून करतात,” त्रिलोकेकर.

“माणसा-माणसांमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, प्रेम - ओलावा आटलाय. कोणाच्या घरी जायचं तरी इंटरकॉमवरून ‘ येऊ का ?’ विचारतात. अपॉइंटमेंट घेतल्यासारखे”, बाबूकाका.

“श्रीमंती आली, गाड्या आल्या, कॉम्प्युटर आले. पूर्वीची मुलं खाली मैदानात खेळायला यायची, आता एक तर, शाळेत डाबून ठेवतात, नंतर शिकवण्याना घालतात. उरला वेळ, तर ती मुलं कॉम्प्युटरवर खेळतात. पूर्वीसारखं व्हरांड्यात खेळणे राहीलेलं नाही, “ अण्णा पावशे.

“भाई, खूप बदल झाले हो, बटाट्याची चाळ ते द टॉवर ऑफ बटाटा - हे संक्रमण अनुभवणे आणि टॉवरची संस्कृती पेलणं , आम्हाला जड झालं - किंबहुना जड जातंय अजूनही ! ते पचनी पडत नाही आहे, “ बाबूकाका ताशेरे मारण्यापेक्षा खूपच भावनिक झाले होते

भाईंनाही हे संक्रमण पेलवणं जड जात होतं. वारंवार त्यांचा कंठ दाटून येत होता. त्यापेक्षा आपण ..... परत आपल्या स्थानी गेलेलं बरं, असं त्यांना वाटू लागलं.

त्यांनी त्यांच्या मानसपुत्रांकडे निरोप घेण्याची गोष्ट काढतातच, ते चौघेही गलबलले.

“भाई, बटाट्याच्या चाळीने आम्हाला काय काय दिलं, ते शब्दातीत आहे ..... आम्हाला - आमच्या व्यक्तिरेखांना आपण अजरामर करून ठेवलंय !,” कुशाभाऊंचा वाक्यांमधून नाटक डोकावत असलं तरी, अंतर्मनातील भावना त्यांना लपवता येत नव्हत्या.

बाकीच्यांना भावनावेगाने शब्द फुटत नव्हते. भाईंचा वियोग त्यांना सहन करणं कठीण जात होतं.

एकटे कुशाभाऊ काय ते भावना व्यक्त करत होते, “भाई, आपल्या बटाट्याच्या चाळीने मराठी मनामनावर अधिराज्य केले आहे आणि आजही अजूनही ते कायम आहे ! जोवर, मराठी भाषा आणि संस्कृती या पृथ्वीतलावर अस्तित्वात राहील, तोवर भाई आपल्या ‘बटाट्याच्या चाळी’च्या पाऊलखुणा अजरामर राहतील, यात तीळमात्र शंका नाही !

भाईंनी डबडबलेल्या अश्रूंनी ‘दि टॉवर ऑफ बटाटा’ चा निरोप घेतला...... जड पावलांनी ते परतीच्या प्रवासाला निघाले ....................

नेत्रा श्रीपाद वैद्य
a