Wednesday, December 29, 2021

लोकशाही : एक सखोल चिंतन

..... ’लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेले लोकांचे आणि लोकांच्यासाठी असलेले - म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी नसून लोकांसाठी असलेले सरकार - लिंकन (थोडा फेरफार करून. अधिक माहितीसाठी काही वाचण्याची गरज नाही)

इसापनीतीत एक गोष्ट आहे. बेडकांना एकदा वाटते, आपल्याला राजा हवा. वास्तविक त्यांना राजाची आवश्यकता का भासवी, कोण जाणे. भासली खरी. शेवटी देवाने ओंडका फेकला. बेडकांनी आठ दिवसात त्याच्यावर नाचायला सूरुवात केली - तेंव्हा देवाने अधिक कडक राजा हवा म्हणून बगळा पाठवला. पूर्वीचे चैनी राजे प्रजेच्या खर्चात विहार करीत, ते सोडून ह्या बाहेरुन शूभ्र दिसण्या-या राजाने, प्रजेचा चक्क आहारच करायला सूरुवात केली. बेडकांनी हाही राजा परतवला आणि आपल्यातून राजा निवडायचे ठरविले. तो अजूनपर्यंत निवडला गेला की नाही ते कळत नाही. आरडाओरडा मात्र चालोतो. दर पावसाळ्यात त्यांच्या सभा होतात. गळ्याचे गोळे फूगवून वृद्धदुर्दर भाषणे करतात. वर्षभर पून्हा काही ऎकू येत नाही. बहूधा मंडूकशाही सुरू झाली असावी वर्षातून एकदा निवडणूका देखील होत असाव्यात.
-----------------------------------------------------------

समजा अगदी एखादा नवा वझीर नेमायचा आहे. प्रोसिजर सरळ! गावात दवंडी पिटवायची. बरे, ही दवंडी पिटवताना देखील नुसते, ' नवा वझीर नेमायचा आहे हो ss.. गरजुंनी उदईक माध्यान्ही दिवाणेखासमध्ये हाजीर व्हावे होss..' अशी साधी दोन वाक्ये. दाखले, शिफारसी, वयाची अट, शिक्षण, पदवी वगैरे काही काही नको. उमेदवार-वझीर दरबारात येतात. मग सर्वांना मिळून सुलतान एखादे कोडे घाली. ' चाॅंद आसमानातच का राहतो? ' अशासारखा एखादा प्रश्न विचारला जाई. सारा दरबार आणि उमेदवार-वझीर बुचकळ्यात पडत. सगळीकडे सन्नाटा! मी मी म्हणणारे बुजुर्ग दाढीचे केस मोजू लागत. अशा वेळी एखाद्या उमेदवार-वझीराच्या घोड्याला खरारा करणारा मोतद्दार पुढे सरसावून तीन वेळा कुर्निसात करून विचारी,
' जहाँपन्हाॅं, आपल्या सवालाचा जवाब देण्याची गुस्ताखी मी करू का? '

' जवाब गलत निघाला तर जबान छाटली जाईल. '

' बेशक जहाँपन्हाॅं '

' दे जवाब, चाॅंद आसमानातच का राहतो? '

' हुजुर सलतनत बडी असो वा छोटी, जातीचा सुलतान नेहमी तख्तावरच बसणार. '

' बेशक.. पण मतलब? '

' मतलब हाच हूजुर, चाॅंद आसमान सोडून धरतीवर आला तर त्याला बसायला एकच तख्त आहे पण त्याच्यावर तर हुजुर तश्रीफ ठेवून राहिले आहेत. '

' मतलब? ' सुलतान प्रश्न विचारण्यात हुशार असला तरी उत्तर समजण्यात असेलच असे नाही.

' मालिक, आपण धरतीवर असताना चाॅंदच काय पण सूरज जरी आला तरी त्याला बसायला जागा कुठे आहे? म्हणून तो बिचारा आसमानातच राहतो. '

' शाबास! तुला दहा हजार अश्रफिया इनाम! काय नाव तुझे? '

' माझं नाव म्हमद्या! '

' तू रोजगार कोणता करतोस? '

' मी नवाब हारजंग तलवारजंग बहाद्दरांचा मोतद्दार आहे सरकार. '

' तुझा मालिक कुठे आहे? '

' बंदा हाजीर आहे खुदावंत ' नवाबसाहेब पुढे येऊन म्हणत.

' तू इथे कशासाठी हाजिर आहेस? '

' वझीर होण्यासाठी, हाजिर सो वजीर सरकार '

' खामोष! असला अफलातून दिमाग असलेल्या फनकार जवानाला घोड्याला खरारा करायला ठेवणारा बुद्धु कहीं का. बोल तुझा गुनाह कबुल? '

' कबुल खुदावंत '

' जलदी कबुल झालास म्हणून वाचलास. नवाब हारजंग आजपासून तुझं नाव
म्हमद्या ठेवलं आहे आणि म्हमद्या तुला नवाब हारजंग तलवारजंग बहाद्दरांचा किताब आणि जहागिरी देण्यात येऊन सलतनितीची वझीरी देण्यात आली आहे. दरबार बरखास्त! '

- पु.ल. देशपांडे
लोकशाही : एक सखोल चिंतन
खिल्ली

Friday, December 24, 2021

परम संतोष जाहला

इतिहासाची पानें चाळतांना पुलंचे एक भन्नाट पत्र हाती लागले. ५ ॲागस्ट १९७८ रोजी 'भारतीय आयुर्विमा महामंडळ' या संस्थेने सोलापूर शहरात आपली दुसरी शाखा सुरू केली. महामंडळाचे एक अधिकारी श्री. विश्वास दांडेकर यांनी एक नाविन्यपूर्ण जाहिरात तयार केली. महामंडळाची अशा स्वरूपाची ही पहिलीच जाहिरात होती. त्या वेळचे आयुर्विमा महामंडळाचे प्रचार आणि प्रसार प्रमुख श्री. शरच्चंद्र मेघश्याम शिरोडकर हे होते. त्यांना ही जाहिरातीची कल्पना आवडली. श्री. शिरोडकर यांनी जाहिरातीतील मजकूर सेतूमाधवराव पगडी यांच्याकडे पाठवून तो दुरूस्त करून आणला होता.

प्रसिद्ध होणारी जाहिरात श्री. श मे शिरोडकरांनी महाराष्ट्रातील चाळीस नामवंत लेखकांना पाठवून त्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. एकोणचाळीस लेखकांनी पत्राची साधी पोच पाठवण्याचेसुद्धा सौजन्य दाखवले नाही. फक्त पु. ल. देशपांडे यांनी जाहिरातीच्या भाषेतच श्री, शिरोडकरांना उत्तर पाठविले होते. जाहिरातीचा मजकूर आणि पु. ल. देशपांडे यांचे उत्तर मूळ स्वरूप असे :

जाहिरातीचा मजकूर

सकल गुणालंकारमंडित राजमान्य राजेश्री श्रीयुत विमेदार स्वामी यांचे हुजूरास विनंती अर्ज ऐसाजे. स्वामींचे उदार आश्रयेंकरून सोलापूर शहरीं आमचा भला उत्कर्ष जाहला असोन सांप्रत काळीं सुभे साताऱ्यामधील बिनीचा सन्मान शहर सोलापूर शाखेस लाभला हें स्वामीस विदित आहेच. इकडील काम फते होतें तें स्वामींचे आशीर्वादेंकरून. आमची हिंमत व नेट वाढावयास कारण तरी स्वामींचे पाठबळच. यास प्रमाण म्हणाल तर आपले शहरीं दुसरी शाखा मल्लिकार्जून बिल्डिंग, ४४२, पश्चिम मंगळवार पेठ ये स्थळी स्थापन होणार हा मनसुबा पक्का जाहला आहे. मुहूर्त १५ आगस्त १९७८ इसवी रोजी दुपारचा ३|| वाजतांचा धरलेला असोन समारंभासाठीं शिवछत्रपती रंगभवनाजवळील, फ्री मॕसन हॉल हा ठिकाणा मुक्रर केला आहे. आजवर सेवकाचें कवतिक जाहलें तें स्वामींचा वरदहस्त मस्तकीं असलेमुळेंच. याउप्परही स्वामींनीं कृपालोभ पुढे चालविला तरच सेवकाची कार्यवृद्धि होत जाईल ये विषयीं तिळमात्र शंका नसे.आमचें अगत्य असों द्यावें. इति लेखन सीमा।

लाइफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ॲाफ इंडिया

भाईंची प्रतिक्रिया

१ रुपाली, ७७७,
शिवाजीनगर पुणे ४ 
गोकुळाष्टमी. ख्रिस्तमास अगस्त, 
सव्वीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर इसवी.

।।श्री मृत्यूंजयाविमाभवानी प्रसन्न।।

सकलगुणांलकारमंडित मानवयोगक्षेमचिंतानिवारणकार्यरत विमाप्रवर्तक राजमान्य राजेश्री श. मे. शिरोडकर यांचे चरणी माजी विमाधारक आणि सांप्रत विमाधारण कालातीत सेवक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याचे विनम्र प्रणिपात. निमंत्रण पावोन समाधान जाहले. धन्यवादाप्रित्यर्थ चार उत्तरे लिहिण्याचा प्रेत्न करीत आहे. मर्यादातिक्रमाची प्रारंभी क्षमा मागतो. विमेदारांच्या उदार आश्रये करोन आपणांस लाभलेल्या सन्मानाचे वृत्त वाचोन परम संतोष जाहला.
भारतदेशाचे भूतपूर्व केंद्रीय अर्थमंत्री विद्वद्वर आणि परमश्रद्धेय माननीय सकलगुणांलकारमंडित राजमान्य राजेश्री चिन्तामण द्वारकानाथ देशमुख महोदयांच्या कर्तृत्वेकरोन इये देशी भारतीय विमा निगमाची प्रतिस्थापना जाहली. त्या उपरान्त प्रस्तुत निगमाने प्राणपणाने चालविलेल्या विमाधारकाच्या प्राणोत्क्रमणोत्तर योगक्षेमाची धुरा वाहण्याचे कार्य नाना प्रकारचे मनसुबे रचोन विस्तारिले आहे हे लोकविश्रुत त्याची थोरवी केवळ वर्णनातीत. त्या कार्यसिद्धीचे कवतिक करण्याचा अधिकार प्रस्तुत पत्रलेखकाचा नसोन संबंधित क्षेत्रस्थ मातबरांचा आहे. सेवकाची मर्यादा सेवक जाणतो.

मात्र,

विमाधारके नित्य हप्ते भरावे
देहे त्यागिता द्रव्यरुपे उरावे

हे विमासूत्र जनसामान्याने उत्तरोत्तर अधिकाधिक मात्रेत मनीमानसी बाळगोन स्वकुटुंबियांचे आणि स्वार्थ साधो जाता परमार्थी भावनेने विमानिगम कर्मचाऱ्यांचे वर्तमान व भविष्य विषयक भयाचे निवारण करण्याविषयी सदैव तत्पर राहावे ही शुभकामना व्यक्त करण्याची सेवक इजाजत मागत आहे. उण्याअधिकाची क्षमा असावी. आमचे अगत्य असो द्यावे ही प्रार्थना लेखनसीमा।।

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

--
श्री. निलेश साठे

Wednesday, December 22, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - ५

मं. वि. राजाध्यक्षांची कन्या मुक्ता एम.ए.ला. इंग्रजी हा विषय घेऊन पहिल्या वर्गात पास झाली. तिचं अभिनंदन करताना पुलंनी आपलं इंग्रजी फार गचाळ आहे असं सुचवीत अशा इंग्रजीची सुंदर नक्कल केली आहे.

My Dear Mukta

I was foning you for the last half hour to congratulate you on my behalf and on be/2 of my better/2 also, but no connexion yaar. So I said maro goli to this telephone and write letter. Fuss class in M. A. is no joke yaar. I never got it. To tell you privately, all bundle professors yaar, except your Bhai who is responsible for my great English... Offcourse I cannot write high English like you... High English has been a big stone in my way. Big stone means 'dhond'. Not capital 'D'. Capital 'D'-wallah Dhond* is your neighbour. Give my regards to him. For further details about dhond- not capital- kindly refer to your Bhai...

* राजाध्यक्ष यांच्या 'साहित्य सहवासा'त राहणारे प्राध्यापक म. वा. धोंड.


सोनल पवार 
संदर्भ: अमृतसिद्धी

पुलंची मजेशीर पत्रे - ४

श्री गणेशशास्त्री जोशी यांनी अमेरिकेचं वर्णन करणारं एक पत्र पुलंना संस्कृतमध्ये लिहून पाठवलं होतं. त्याला पुलंचं उत्तर घ्या संस्कृत तर संस्कृत. 'इरेस पडलो जर बच्चमजी !' पण ह्या पत्रातलं संस्कृत तसं ठाकठीक आहे हे लक्षात ठेवायला हवं. (शास्त्रीबुवांनीच पुढं याची प्रशस्ती केली.) त्यातला काही भाग.

पुण्यपत्तनम् ४
एप्रिल ६, १९७४

स्वस्ति श्रीगणेशशर्मा जोशीमहोदयेषु गीर्वाणभाषापण्डितवरेषु, अतिविनम्रतया पादाभिवन्दनं कृत्वा संस्कृतभाषायामेव पत्रोत्तरलेखनचेष्टां करिष्यामि । जानाम्येतन्महाधाष्टम् । आङ्ग्लभाषाधारेणाभवन्मम संस्कृतभाषाध्ययनम् । यत्र 'रम्भोरु'- 'द बनाना ट्री-थाइड् वन्' भूता लुट् टु वॅलो वा । गीर्वाणभाषादेवता ममेदृक्शारूकं चेष्टितं दृष्ट्वा मां ममैवं पुरातनेन पादत्राणेन ताडयिष्यति ।...

'आपले सुंदर पत्र मी पुनःपुन्हा वाचले, मित्रांनाही वाचून दाखवलें' असं गणेशशास्त्रींना सांगून विनयानं पुल पुढं लिहितात :

किन्तु मम पत्रोत्तरपठनमीदृशं भवता कथमपि न करणीयं, देवभाषाभिमानधारकाः पण्डिताः शम्बूकं स्मृत्वा मम शिरश्छेदं कर्तुमुद्युक्ता भविष्यन्ति ।...

आशीर्वचनाकांक्षी,
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपाण्डे


सोनल पवार 
संदर्भ :अमृतसिद्धी

Friday, December 17, 2021

वस्त्रहरण नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला केलेले अध्यक्षीय भाषण

मछिंद्र कांबळी आणि गंगाराम गवाणकर यांचं लोकनाट्याचा बाज असलेलं धमाल विनोदी मालवणी नाटक म्हणजेच 'वस्त्रहरण'. पुण्यात रात्री प्रयोग होता. प्रयोग सुरू व्हायला फार थोडा वेळ बाकी असल्यावर कळालं की पहिल्या रांगेत पु.ल. देशपांडे, सुनिताताई, वसंतराव देशपांडे अशी दिग्गज मंडळी बसली होती. सर्वांना दडपण आलं होतं. प्रयोग उत्तरोत्तर रंगत होता. नाटक संपल्यावर पु.ल. देशपांडेंनी विंगेत येऊन गवाणकरांचं खूप कौतुक केलं. आणि चार दिवसांनी १९ ऑगस्ट रोजी पु.ल. देशपांडे यांनी गवाणकरांना पत्र पाठवलं. हे पत्र वस्त्रहरण च्या संपूर्ण टीमसाठी एक कलाटणी देणारं पत्र होतं. या पत्रातील दोन ओळी नाटकाच्या जाहिरातीत छापून आल्या. पु. ल. देशपांडे यांची मछिंद्र कांबळी ह्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली आणि त्यांच्या कौतुकाचे बोल नाटकास लाभले. नाटक धो धो धावले. 



ह्या नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला श्री. पु.ल. देशपांडे ह्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. 


Thursday, December 16, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - ३

५ ऑगस्ट १९७८ रोजी 'भारतीय जीवन विमा निगम'च्या सोलापूरच्या नव्या शाखेचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटन समारंभाची जाहिरात ऐतिहासिक मराठी भाषेत आणि खलित्याच्या रूपात केलेली होती.

सकल गुणालंकारमंडित राजमान्य राजेश्री श्रीयुत विमेदार स्वामी यांचे हुजुरास विनंती अर्ज ऐसाजे.

स्वामींचे उदार आश्रयेंकरून सोलापूर शहरी आमचा भला उत्कर्ष जाहला असोन सांप्रत काळी सुभे साताऱ्यामधील बिनीचा सन्मान शहर सोलापूर शाखेस लाभला हे स्वामीस विदीत आहेच...

अशा सुरवातीची आणि वळणाची ही जाहिरात संस्थेचे जनसंपर्काधिकारी श्री. रा. म. शिरोडकर यांनी पुलंना पाठवली. ह्या जाहिरातीची नोंद घेणारं आणि कोपरखळ्या देणारं पत्र 'अगस्त सव्वीस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ख्रिस्तमास' या दिवशी पुलंनी पाठवलं. त्यातला काही भाग असा :

श्री मृत्युंजया विमाभवानी प्रसन्न

सकलगुणालंकारमंडित मानवयोगक्षेमचिंतानिवारक विमाप्रवर्तक राजमान्य राजेश्री रा.म. शिरोडकर यांचे चरणी माजी विमाधारक आणि सांप्रत विमाधारणकालातीत सेवक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे विनम्र प्रणिपात... भारतदेशाचे भूतपूर्व अर्थमंत्री विद्वद्वर आणि परमश्रद्धेय माननीय सकलगुणालंकारमंडित श्रीयुत चिन्तामण द्वारकानाथ देशमुख महोदयांच्या कर्तृत्वेकरोन स्वदेशी भारतीय विमा निगमाची प्राणप्रतिष्ठा जाहली त्या उपरान्त प्रस्तुत निगमाने अकल्पित रीतीने कुटुंबप्रमुखाचे प्राणोत्क्रमण जाहल्यावर ओढवणाऱ्या संकटातून अवलंबितांना आधार देण्याचे आणि विशेषेकरोन निगमाच्या कारभाराची धुरा वाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगक्षेमाचा भार वाहण्याचे जे कार्य चालवले आहे ते लोकविश्रुतच आहे. त्या जनसेवेचे कवतिक करण्याचा अधिकार प्रस्तुत पत्रलेखकाचा नसोन संबंधित क्षेत्रस्थ मातबरांचा आहे. सेवकाची मर्यादा सेवक जाणतो.

याच पत्रात 'मरोनी विमा पालिसीने तरावे' किंवा, 'विमाधारकें नित्य हप्ते भरावे,' 'देहे त्यागिता द्रव्यरूपे उरावे' - अशी 'आधुनिक संतवचनं 'ही दिलेली आहेत.

सोनल पवार 
संदर्भ : अमृतसिद्धी

Tuesday, December 14, 2021

सर्दी

सर्दी हा एक मोठा चमत्कारिक रोग आहे. वास्तविक रोग म्हणवून घेण्याच्या लायकीचाही हा रोग नाही. ‘रोग’ ह्या शब्दालाही काही दर्जा आहे. दमा, क्षय वगैरे भारदस्त मंडळींनाच ही उपाधी लागू पडते. रक्तदाब हा मला वाटते एक नुसता विकार आहे. मधुमेह हा विकार आणि रोग ह्यांच्या सीमारेषेवर घुटमळणारा चाळीशी उलटलेला गृहस्थ आहे. पण सर्दी ही नुसतीच एक पीडा आहे. पूर्वी नथ-पाटली वगैरे ‘दागिन्यां’च्या सदरांत मोजत नसत, बाई म्हटली की नथ-पाटली आपोआप यायची, ठुशी, लमाणी हे दागिने! त्या दागिन्यांचे कौतुक व्हायचे-चौकशी व्हायची. एखाद्या बाईच्या हातांत पाटली आली तर मुद्दाम होऊन तिने आपला हात पुढे नाचविल्याशिवाय तिथे कुणाचे लक्षच जात नसे.

सर्दीचे असेच आहे. हा रोग, रोग ह्या सदरांत येत नसल्यामुळे त्याचे कौतुक अगर चौकशी होत नाही. आपल्याला सर्दी झाल्याबद्दल सहानुभूती मिळत नाही. वास्तविक खऱ्या सहानुभूतीची आवश्यकता असते ती असल्या चिल्लर वाटणाऱ्या पीडांच्या बाबतीत! मान धरलेला इसम (आपोआप! दुसऱ्या कुणी नव्हे) हे इंद्रिय-गोचर सृष्टींतले माझ्या मते सर्वात करुण दृश्य! जेव्हा मान आखडते किंवा धरते तेव्हा माणसाच्या खऱ्या नाड्या आखडतात. तो खुळ्यासारखाच दिसायला लागतो. त्याचे एकूण व्यक्तिमत्वच कांहीच्या कांही होऊन जाते. परंतु ह्या प्रकरणांत सगळ्यांत दुःख असते ते सहानुभूतीच्या अभावाचे! कुणाला आस्थेने आपली मान धरल्याचे सांगावे आणि परिणामी त्याच्याकडून एखादी क्षूद्र कोटी किंवा ‘कोयता ओढा’, ‘पायाळू माणसाची लाथ खा’ असला कांही तरी आचरट इलाज ऐकायला मिळतो.

सर्दीचं असंच आहे. सर्दी का होते हेही कळत नाही आणि कां बरी होते हेही कळत नाही. औषधांनी ती बरी होत नाही हे मात्र निश्चित!

मान धरलेला माणूस आणि सर्दी झालेला माणूस ह्यांच्या दर्शनात मात्र खूप अंतर आहे! मान धरली की चेहऱ्यावर एकाएकी दैन्य येते. चेहरा कितीही उग्र असो, मिशांचे चढलेले आंकडे असोत, एकदां मान धरली की सारी जरब, सारा रुबाब, कडवेपणा कुठल्या कुठे पळून जातात आणि खर्चाशिवाय खटला काढून टाकल्यावर दिसणाऱ्या वादीसारखा माणूस गरीब दिसायला लागतो. सर्दीचे तसे नाही. सर्दीमुळे माणसाच्या चेहऱ्यावर एक व्यक्तिमत्व येते! गोरी माणसे सर्दी झाल्यावर अधिकच रुबाबदार दिसतात आणि गोऱ्यापान तरुणींना तर सर्दीमुळे निराळीच कांती येते! गर्भकांतीचे कौतुक सर्वांनीच केले आहे. परंतु शिंकेने हैराण झालेल्या युवतीच्या सौंदर्याची सर फक्त रुसव्यापोटी निघालेल्या रडण्यांतल्या सौंदर्यालाच आली तर येईल.

माणसाप्रमाणेच सर्दीला बाल्य-यौवन-वार्धक्य वगैरे असते. म्हणजे पहिल्या दिवशींची सर्दी अवखळ असते. फटाफट शिंकाच काय येतात, घसाच काय खवखवायला लागतो. ही बाळसर्दी आपल्याला एका जागी बसूं देत नाही. एकाएकी तहान लागते, तपकीर ओढावीशी वाटूं लागते, कडकडीत दुधांत हळद घालून प्यावेसे वाटूं लागते. परंतु हळूहळू तिच्यांतही एक प्रौढत्व येते आणि मग ती गंभीर होते आणि आपल्यालाही गंभीर करते. आपली छाती वाजूं लागते. छातीत नुसत्याच खर्जाचे तंबोरे ठेवल्यासारखे वाटायला लागते. डोके काठोकाठ भरलेल्या माठासारखे जड होते. किंवा खांद्यावर एरवी डोक्याचे वजन कधी भासत नाही ते भासूं लागते आणि नकळत आपल्या चेहऱ्यावर एखाद्या तत्त्वज्ञाची गंभीर कळा येते. एखाद्या विद्वान अध्यक्षाला व्यासपीठाकडे नेताना तालुक्याच्या गावांतल्या बालोत्तेजक किंवा तरुणोद्धार मंडळाच्या चिटणीसाचा चेहरा जसा एकदम गंभीर होतो किंवा सुपरवायझर वर्गात शिरले की शाळामास्तराच्या चेहऱ्यावर जसे अगतिकता आणि गांभीर्य यांचे चमत्कारिक मिश्रण लागते तसे कांहींसे आपण दिसायला लागतो. हे गांभीर्य सत्वगुणी नसते, त्याची मुळे तमोगुणांत शिरलेली असतात. हे गांभीर्य आपल्या चेहऱ्यावर लादलेले असते. अवघडलेल्या मानेच्या माणसाची मान ताठ असून जशी ताठ नसते तद्वत् सर्दी भरल्यामुळे चेहऱ्यावर आलेले गांभीर्य ‘इमिटेशन’ गांभीर्य असते. असल्या माणसाकडे पाहिले की आपली दर्शनी फसवणूक होते. परंतु तो बोलायला लागला की त्याच्या आवाजावरुन त्या गांभीर्याच्या झिरमिळ्यांचा जर खोटा आहे हे आपल्याला लगेच उमगते. बाकी ही देखील एक मौजच आहे. दातांची नवी कवळी बसवलेला म्हातारा काय विलक्षण तुकतुकीत दिसतो! विशेषतः दंतवैद्याच्या नजरचुकीने चेहऱ्याचा ठसाच बदलून टाकणारी कवळी बसवली जावी म्हणजे तर चेहऱ्याच्या मुळच्या सुरकुतलेल्या रेषांना पार इस्त्री होऊन गाल चांगले ताणून गेलेले असतात. पण हे सारे तोंड उघडेपर्यंत! एकदां असल्या इसमाने तोंड उघडले की ह्या साऱ्या तुकतुकीचे कारण चटकन उघडे पडते. सर्दीचे गांभीर्य असल्याचे जातीचे!

पण सर्दीची तिसरी अवस्था मात्र आस्वादाचे व्रत शिकवण्यासाठी जन्माला येते. ह्या अवस्थेत घ्राणेंद्रियांचा संप सुरू होतो. पोळी खाल्ली काय किंवा तीन पैशाचे कार्ड खाल्ले काय कांही फरक कळत नाही. वासांच्या दुनियेतले हर्ष खेद मावळतात. पोपईची आणि आंब्याची फोड ह्यांतला फरक नष्ट होतो. अशा एका अवस्थेंत मी वसईच्या कोळीवाड्यावरुन सकाळी फिरुन आलो. किनाऱ्याला भराभर वजन बसवलेले मचवे लागत होते. त्यातून टोपल्या भरभरून तऱ्हेतऱ्हेची मासळी किनाऱ्यावर येऊन पडत होती. सुकायला टाकलेल्या बोंबलांचे आणि ‘सुकटा’च्या रांगांनी बांबूंचे ते मांडव बहरले होते. परंतु माझ्या डोळ्यापर्यंतच ते पोहोचत होते. नाकाल वर्दी नव्हती. चांगला तासभर मी तिथून हिंडत होतो पण एकदांही हातरुमाल नाकाशी गेला नाही. किनाऱ्यावर पसरलेल्या असंख्य जातींच्या माशांच्या रंगांशी, आकारांशी आणि ताजेपणाशी स्पर्धा करणाऱ्या मत्स्यगंधा तेथे होत्या. पण माझ्या हिशेबी त्या मत्स्यगंधा नव्हत्या, नुसत्याच कोळणी होत्या.

गंधसृष्टीने माझ्यापुढे लोखंडी पडदा टाकला होता. रामनवमीला रामाच्या देवळांत जाऊन नुसतेच कीर्तन ऐकू यावे आणि सुंठवडा मिळू नये अशी माझी अवस्था होती. माशांचे मासेपण माझ्या लेखी (नाकी?) तरी हरपले होते. मांदेली खाल्ली काय-पापलेट खाल्ले काय किंवा सुरणाच्या फोडी तळून खाल्ल्या काय, मला सर्व सारखेच होते. मला एकदम एक निराळाच साक्षात्कार झाला. सर्वत्र समभावाने पहाणाऱ्या संतांची परिस्थिती काय करुण होत असेल याची जाणीव मला त्यावेळी प्रथम झाली. तळलेले पापलेट आणि तळलेला सुरण दोन्ही मला सारखे? मला माझी कीव आली. जीवनांतला सारा आनंद विषमभावांत आहे हे त्यावेळी मला कळलं! ओढ्याचे जिवंत खळाळणें आणि सोडावॉटरच्या बाटलीचे फसफसणे ह्या मूलतः किती निराळ्या गोष्टी आहेत हे मला तिथे उमजले.

नाद, रंग, रस आणि गंध ह्यांनी आपल्यावर काय अपार उपकार केले आहेत याची पहिली जाणिव माझ्या संपावर गेलेल्या नाकाने दिली. चौपाटीवरची भेळ चौपाटीवरच कां चांगली लागते ह्या मागले गूढ मला उकलले. तिथे लाटांचा नाजुक आवाज असतो, मावळत्या सूर्याचे रंग असतात, ओलसर वाळूचा स्पर्श असतो, अंगावरुन जाणाऱ्या अनोळखी रेशमी साडीची सळसळ असते आणि त्याशिवाय मग भेळ असते! म्हणून ती भेळ चांगली! युरेका! हे सारं निरनिराळेपण आपल्याला दिसतं, आपल्या कानावरुन जातं, आपल्या नाकाशी ओठाशी घोटाळतं म्हणून ह्या साऱ्या धडपडीला अर्थ येतो, छे छे! मखमालीची लव वठतां कामा नये—डोळ्यांत आंसू हवेत ओठावर हांसूं हवे—आणि ह्या साऱ्यांच्या वृंदवादनांत झपूर्झाही हवा!

मला एकाएकी वासाची ओढ लागली. खरपूस बाजरीच्या भाकरीचा वास, दुपारच्या झोपेतून उठलेल्या बालकाच्या अंगाचा वास, नव्या पुस्तकाचा वास, हळदीचे पान टाकून कढवल्या जाणाऱ्या लोण्याचा वास, घरांतले हळदीकुंकू आटोपल्यावर दिवाणखान्यांत रेंगाळणारा वास, गुऱ्हाळांतला वास, गोठ्यांतला वास, गाभाऱ्यांतला वास,.... माझ्या प्रत्येक श्वासाने नवा वास घेतला आहे. वास नष्ट होणे सारखेंच!

साधे साधे वास आपल्याला कुठल्याकुठे घेऊन जातात. अजूनही नव्या पुस्तकाचा वास मला माझ्या मराठी शाळेत घेऊन जातो. पुष्कळदां पूर्वी येत होता तसला वास येत नाही नव्या पुस्तकाला आणि आपल्याला फसल्यासारखे वाटते! बदलत्या साहित्याने पुस्तकांचे वासही बदललेले दिसताहेत! बाकी शब्दांनाच जर वास असता किंवा घाण असती तर साहित्याचे मूल्यमापन फार सोपे झाले असते. पण जिव्हाळ्याच्या शब्दांना वास असतो. नाही असे नाही. स्पर्श देखील असतो. अजूनही कोणी उभ्याउभ्या जरी मला “चिरंजीव हो” असा आशीर्वाद दिला तरी मला पाठीवरून हात फिरवल्यासारखा वाटतो. पण खराखुराच जर का वास असता शब्दांना तर भलतीच आफत झाली असती. कागदी शब्दांना कागदी फुलांसारखा वासच आला नसता आणि फुलराणीसारखी कविता उघडल्याबरोबर घमघमाट सुटला असतां. बाकी डोक्यांत भलतीच सर्दी शिरलेली नसली तर अजूनही तो वास येतो. ज्ञानेशाची ओवी कानावर पडली किंवा पंतांची आर्या खणखणली की उदबत्तीचा सुगंध ठेवून गेल्याशिवाय रहात नाही. अशा वेळी विचार येतो की ह्या नव-कविता कसला सुगंध ठेवून जातात? पण सुगंधाचा ठेवा हा कांही विचार करुन सांपडत नसतो. सुगंधाची खरी गंमत-खरा लुत्फ तो नकळत भेटतो तेंव्हा! कल्पनाही नसते आणि आपल्याला वास येतो. वास घेण्यापेक्षा वास येण्यांत आनंद आहे. पूर्वीच्या काळी बायका ठेवणीच्या लुगड्यांत वाळा घालून ठेवीत आणि मग सणासुदीला त्यांनी ट्रंक उघडली की अनपेक्षितपणे तो वाळ्याचा वास दरवळायचा. काव्याचा वास देखील असाच दरवळला पाहिजे! अलीकडे कित्येक वर्षांत असा वास ठेवून जाणारी कविताच वाचली नाही. ह्या नवकवितांनाच वास नाही की माझ्या नाकांत सर्दी भरली आहे देव जाणे! कदाचित् नव्या सुगंधाचा मला साक्षात्कार नसेल. मला देवळांतल्या गाभाऱ्यांतल्या मशालीच्या जळक्या कपड्याचा वास आवडतो पण मशीन पुसायच्या कापडाच्या चोथ्याचा वास माझ्यावर कांही संस्कार उठवून जात नाही. नवी गंधसृष्टी समजायला मला वाटते ह्या वासांची नाकाला सवय हवी! माझे नाक आतां जुने होत चालले, त्याला ओढ आहे ताज्या शेणाने सारवून हिरव्या झालेल्या जमीनीच्या वासाची! सिमेंटच्या वासांतून ते बिचारे फुलत नाही. आम्ही शहरची वस्ती सोडून एका बाळबोध गावांत राह्यला गेलो होतो. टुमदार गांव होते. सुसंस्कृत होते, कलाप्रिय होते, पण आम्हाला घर मिळाले ते शेणाच्या जमिनीचे! माझ्या पत्नीने पहिल्या दिवशी घर सारवले आणि शेणाने भरलेल्या हातांनी ती भिंतीला टेकून आपली कर्तबगारी पहात उभी राहिली होती. त्या ताज्या गोमयाच्या गंधाची त्या दर्शनाला साथ मिळाली होती. आणि म्हणून माझ्या नाकांत सारवलेल्या जमिनीच्या वासाला एक मनोहर आकार आहे! तो गंध नाही. गंधाची कन्या आहे. अजूनही मला तो वास आला की त्या वासाची सौभाग्यवती मूर्ती माझ्यापुढे रहाते! पुराणांत कुणी योजनगंधा होती म्हणतात. कित्येक योजने दूर असली तरी म्हणे तिचा वास येत असे. रेल्वेने जातांना देहूरोड गेले की पुणे दरवळायला लागते. ह्या नुसत्या वासांच्या आठवणींनी मी हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत तरी खूप भटकून येतो!

आज मात्र माझी पंचाईत झाली आहे. मी तऱ्हा तऱ्हा करुन पाहिल्या, पण माझे नाक ऐकायलाच तयार नाही. मी सकाळी उठलो आणि ब्रशवर पेस्ट ओतली. दांत घांसले, वास नाही. चहा प्यालो, पत्ता नाही. सिगरेट ओढली, जळकी काटकी ओढल्याचा भास झाला. जेवलो, भाजी, आमटी, भात आणि ताज्या माशाचे तळलेले तुकडे. कांही फरक नाही. पान खाल्ले. ते आंब्याचे किंवा केळीचे असते तरी चालले असते. सुपारी आणि कातरलेले लाकूड मला आज सारखेच! सर्वत्र समभाव, संतांची दृष्टी नसली तरी संतांची जीभ मला लाभली होती. आस्वादाने अन्न भक्षण करणाऱ्या, जाणिजे यज्ञकर्म म्हणून पोटातल्या वैश्वानराला आहुती टाकणाऱ्या संतांची रसहीन रसना! मला ती रसना नको आहे. सर्दीचा आणि संतांचा संसर्ग एकूण माणसांना उपयोगाचाच नाही. सर्दीचे गांभीर्यही नको, स्वादहीनता नको आणि संतांची तर समदृष्टी नकोच नको, त्यांना साऱ्याची चवच सारखी लागते एवढेच नव्हे तर सारे सारखेच दिसतात आणि सारे स्वर देखील सारखेच वाटतात म्हणे! अरे अरे अरे! माझ्या नाकांत जरी या क्षणी वास नसला, डोक्यांत जरी कांठोकांठ भरलेली सर्दी असली तरी अंतःकरणांत मात्र एकाएकी ह्या संतांविषयी विलक्षण कळवळा दाटला आहे! मात्र एक बारीक प्रश्न डोके वर काढतो आहे! संतांना आपल्याबद्दल कळवळा वाटतो म्हणतात तो कशासाठी मग?

लेखक - पु. ल. देशपांडे
नवाकाळ दिवाळी अंक
१९५८

Monday, December 13, 2021

मोरोपंत - मराठी वाड़्गमयाचा गाळीव इतिहास

पंतांची दिनचर्या काय होती याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.परंतू पहाटे साडेचार वाजता उठून प्रातःकर्मे झाल्यावर ते उद्योगाला लागत असावेत.दुपारच्या भोजना पर्यंत शब्द नीट धरून अक्षरे सोडवून घ्यावयाचे अणि मग 'वदविला साच्या' जोडीला 'पदविलासाचा', 'वायसाराती' च्या जोडीला 'काय सारा ती', 'पद रमला' आणि 'पदर मला', ' न नाथ सा मान्य' आणि 'अनाथ सामान्य' अशा जुड्या बांधून ठेऊन द्यायचे.अशा चारपांचशे जुड्या झाल्या की त्यांचे साॅर्टिंग करून एकशेआठ रामायणापैकी कुठल्या रामायणात कुठली बसते हे पाहावयाचे. ('वाहतो ही आर्यांची जुडी' असे एक नाटकही ते लिहिणार होते."वस्तूंत जसें हाटक काव्यीं नाटक..." अशी जुडी जमली होती.पुढे इतरां छंदी जाण्यापेक्षा त्यांना आर्याच बरी असे वाटले असावे.) दुपारच्या भोजनानंतर तासभर विश्रांती घेत.

विश्रांतीच्या वेळी करमणुकीसाठी ओव्या,भुजंगप्रयात,वसंततिलका वैगेरे छंदात आख्याने वैगेरे पडल्या पडल्या लिहून काढीत. विश्रांती झाली की पुन्हा सकाळच्या यमकांच्या जुड्या उलगडून आर्या पु-या करीत. संध्याकाळी पुराण सांगून झाले की जरा फिरून येत. तिथेही करमणूक म्हणून श्लोक वैगेरे रचित. पुढेपुढे दुकानदारांशी वैगेरेसुद्धा ते आर्येतच बोलत. क्वचित प्रसंगी दुस-याने उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ समजण्यात घोटाळा होई. भाजीवालीला टोपलीत काय आहे हे विचारल्यावर ती "भोपळा" म्हणाली आणि पंतांना वाटले, "भो पळा" असे ती फणका-याने म्हणाली,म्हणून पळू लागले.शेवटी घरी आल्यावर भोपळ्याची फोड चुकली हे त्यांच्या ध्यानी आले.एकशेआठ रामायणे,अनेक महाभारते,भागवताचा दशमस्कंध शिवाय शंभरसव्वाशे फुटकळ आख्याने,इतके रचावयाला गेला बाजार शब्दांच्या सहस्त्र कोटी जुड्या बांधाव्या लागल्यामुळे त्यांच्या कानी शब्द आला की त्याचे यमक उभे राही. "कसे काय पंत "? म्हटले की "बरे आहे" म्हणण्याऐवेजी संत,खंत,दंत,हंत असे काहीतरी सुरू व्हावयाचे.मग पोरीबाळी "पंतकाका, आम्हाला गाणे, आम्हाला गाणे" करून मागे लागत. त्यांच्यासाठी येताजाता,झोपाळ्यावर वगैरे म्हणावयाला गाणी करून देत. झोपण्यापूर्वी एक हजारबाराशे आर्या करून झोपत.

आजही बारामतीस, त्यांच्या लक्षावधी आर्यांपैकी एकीचाही कोणाला फारसा पत्ता नसला तरी त्यांचे राहते घर दाखवितात.मात्र "बारामती कशाबद्दल प्रसिद्ध आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर "सहकारी साखर कारखान्यांबद्दल" असे लिहिले तरच मार्क मिळतात, हे लक्षात ठेवावे.

Wednesday, December 8, 2021

ज्ञानोबा तुकोबांनी उजळविलेले हे मनाचे कोपरे - पु.ल.

पुलंचा एक किस्सा आहे. ते एकदा म्हणाले होते की "ज्ञानेश्वर, तुकारामांचा मला खूप राग येतो. त्यांनी ओव्या, अभंगातून आमच्यावर खूप संस्कार केले, अंधारलेले मनाचे कोपरे उजळून टाकले. त्यामुळे गरीब असहाय्य कुणी दिसले की मन अस्वस्थ होते."

त्यांनी एक प्रसंग सांगितला "सत्तर, ऐंशीच्या दशकात ताजसारख्या फाईव्ह स्टार हॉटेलात फक्त श्रीमंताचीच मिरासदारी होती. तेथून जाताना लांबूनच हेच ते ताज हॉटेल असं आपण सोबतच्या माणसाला सांगायचो. मात्र एकदा एक श्रीमंत मित्रामुळे ताजमध्ये जायचा योग्य आला. वेगवेगळ्या डिशमधील पाच पन्नास पदार्थ पाहून अचंबा वाटला. मोठमोठ्या भांड्यात चिकन रस्सा, मटण मसाला, तळेलेले फिश, तंदुरी चिकन, रायते, वेगवेगळे बेकरी आयटम, चारपाच प्रकारचे आइस्क्रीम तेसुद्धा अनलिमिटेड, आपल्या हातांनीच हवे ते घ्यायचे ते ही हवे तितके सोबतीला हॉट ड्रिंक्स. त्या दिवशी कळलं स्वर्गसुख म्हणजे काय. चांगला चापून जेवलो. शॅम्पेनही डोक्यात उतरली होती. सुगंधी बडीशेप तोंडात टाकत टुथपिकने दात कोरत श्रीमंत दोस्ताबरोबर खाली उतरून रस्त्यावर आलो न आलो तोच भिकाऱ्यांची चार पाच पोरं "सायेब शेट पैसे द्या ना.." म्हणत वाडगी घेऊन आमच्यापुढे येऊन उभी राहिली. "ऐ चल भागे कुत्ते कहीं के!" मित्राने त्यांना फटकारले. ती गयावया करणारी पोर पाहून माझी झिंग मात्र जागीच जिरली. पापलेट पोटात कलमलू लागला. श्रीमंतांवर असल्या केविलवाण्या दृश्याचा परिणाम होत नाही, आपल्याला होतो. कारण ज्ञानोबा तुकोबांनी उजळविलेले हे मनाचे कोपरे."

- ज्ञानेश्वर सोनार
(मार्मिक साप्ताहिक)

Tuesday, December 7, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - २

घटप्रभेचे कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूटचे डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडून पुण्याला परत आल्यावर पुलंनी त्यांना ऐतिहासिक बखरीच्या भाषेत पत्र लिहिलं त्याची नुसती भाषाच नव्हे, तर लेखनाची धाटणीही हुबेहूब ऐतिहासिक वळणाची आहे.

भीषग्वर्य राजमान्य राजेश्री विजयराव कुळकरणी यासी मुक्काम पुणे येथोन पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याचा शिरसाष्टांग नमस्कार विनंती ऐसाजे लग्न जुळवणेची मोहीम फत्ते करोन स्वाऱ्या पुनश्च कर्णाटक देशी मजल दरमजल करीत कूच करत्या जाहल्या हे स्वदस्तुरच्या आज तारीख अठ्ठावीस मे ख्रिस्ती शक १९७९ रोजी हाती आलेल्या खलित्यावरोन कळले. परमसंतोष जाहला. आपण काज हाती घ्यावे व ते फत्ते होवो नये ऐसे होणे नाही. हातास सदैव येशच येश मग ते विवाह जुळविणेचे असो अथवा कुक्कुटाधिष्ठित पाककौशल्याचे असो. विवाह जुळवणेचे काज अति साहसाचे येविषयी संदेह नाही. हे तो साक्षात कुळजुळवणी तेथे कुळकरणी चातुर्यच हवे.... बहुत काय लिहिणे. आमचे अगत्य असो द्यावे. लेखनसीमा

- सोनल पवार 
संदर्भ: अमृतसिद्धी

Friday, December 3, 2021

पुलंची मजेशीर पत्रे - १

मुंबईचे ना कुलकर्णी यांनी मराठीच्या सांप्रतच्या रहासाबद्दल १२ डिसेंबर १९९० ला पुलंना लिहितात.

"आपल्यासारख्या ग्रेट पर्सनला असे फ्लिपंट पत्र लिहिल्याबद्दल सॉरी. पण इंग्लिश व हिंदी लँग्वेजेसच्या जॉईंट अँटँकमुळे मराठी लँग्वेजची जी बँड कंडिशन झाली आहे त्याबद्दलची माझी स्ट्रॉग फीलिंग्ज एक्सप्रेस करण्यासाठी मला बेटर मेथड स्ट्राइक झाली नाही क्षमस्व.

ही स्ट्रॉग फिलींग्ज कशाबद्दल ? तर,या दिवसा दूरदर्शनीय मराठीय कार्यक्रमांमध्ये तथा मराठीय समाचार पत्रांमध्ये तिलक, सावरकर, आदी फडतूस इसमांनी दिल्या असलेल्या मराठीय संग्यांचा प्रयोग कमी होत जाऊन राहिला आहे. तथा त्यांच्या बदल्यामध्ये हिंदी संग्यांचा प्रयोग बड्या पैमान्यावर सुरू होऊन राहिला आहे. "

या पत्राला लगेचच १८-१२-९० रोजी उत्तर लिहिताना पुलंनी एकच धमाल केली आहे :

"एकवीसमी सदीत मराठीचा माहौल अजिबच राहून राहणार आहे. भाषा ही सोसायटीच्या बिहेवियरवर डिपेंड करते. रहनसहनमध्ये फर्क पडला की, भाषेतही फर्क पडतो. मुंबईसारख्या भेलपुडी संस्कृतीत, तर राष्ट्रभाषा हिंदी (सियावर रामचंद्रकी जय) गुजराती, बिगर मर्हेटी श्रीमंतीपुढे संकोचून कोन्यात उभी राहिलेली मराठी तर सगळ्या भाषा घुलमिलाकर एक नवीच मर्हेटी तयार होणार आहे... पहिले माणूस टू माणूस भाषा कानावर यायची आता पेपरवाल्याचे मराठी, रेडिओवाल्यांचे मराठी, दुर्दर्शनवाल्यांचं मराठी अशी भाषिक घुसखोरी सुरू झाली आहे . त्याला एकच उपाय म्हणजे इतर भाषांचं बिनधास्त मराठीकरण करणं. हमारी आयडिया समझा क्या ? सुज्ञको अधिक सांगणेची गरजच नही."

ह्या पत्राच्या खाली 'भवदीय पु.ल. देशपांडे' अशी सही केलेली आहे आणि सहीखाली कंसात लिहिलं आहे, “आमच्या नावातच मराठी देश आणि हिंदी पांडे आहे हेही ध्यानी यावे.”

- सोनल पवार
संदर्भ- अमृतसिद्धी

Thursday, December 2, 2021

‘पुल’कित संध्याकाळ - योगेश कोर्डे

पुलंच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रात आणि परदेशातल्या महाराष्ट्र मंडळात विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. पुण्यात लहानपणी ते जिथे राहायचे त्या जुन्या वाड्यात एका छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्याचे ठरले.पु.लं चा हा सत्कार समारंभ ‘व्यक्ती आणि वल्ली प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित केला गेला होता. यातले सदस्य दुसरे तिसरे कुणी नसून पु.लं च्याच ‘व्यक्ती आणि वल्ली’.

 या वाड्यात हा समारंभ आयोजित करण्याचे दुसरे कारण म्हणजे हरितात्यांना ते सोयीस्कर होणार होते. जुन्या आठवणी पुराव्यानी शाबीत करायला ते उत्सुक होतेच. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना सेक्रेटरी म्हणून बापू काणेची निवड बिनविरोध करण्यात आली कारण तो सेक्रेटरी म्हणूनच जन्माला आला होता. मदतीला होता तो नारायण. पु. लं चा सत्कार म्हणजे घरचं कार्यं आणि स्वयंसेवकगिरी तर त्याच्या रक्तात भिनलेली. समारंभासाठी काय काय लागणार हे नारायणास ठाऊक असल्याने बापू त्यास पुण्यातल्या गल्ली बोळांत पिटाळणार होता. चितळे मास्तर आणि अण्णा वडगावकर यांना खास निमंत्रण होते. सखाराम गटणे मध्ये पुरेसा आत्मविश्वास कोंबून त्याला भाषणाला उभे करायचे ठरले. तांदळातून खडे निवडावे तसे त्याने थोर साहित्यिकांच्या पुस्तकांतली वाक्ये टिपून घेण्यास सुरुवात केली. बुद्धीजीवी लखू रिसबूड ला बापू नी पेपरात कार्यक्रमाची जाहिरात छापण्यास सांगितले. ती कुठल्या मथळ्याखाली आणि कशी छापायची या विचारात लखू गर्क झाला. या वेळी मात्र त्याने कुरबुर केली नाही. पु.लं च्या सत्काराची जाहिरात छापायची म्हटल्यावर लखूला प्रथमच MA झाल्याचं सार्थक वाटलं. कार्यक्रमानंतरचं परीक्षण तोच लिहिणार होता आणि तेही कुठल्याही पगाराची अपेक्षा न ठेवता. ‘तो’ ला कार्यक्रमाची माहिती कळविण्याची गरज भासली नाही कारण ‘तो’ हा सर्वत्र असतोच. ‘तो’ जसा कुठेही उगवतो तसा इथेही उगवलाच. खरं सांगायचे झाल्यास ‘तो’ काहीच काम करणार नव्ह्ता फक्त चारचौघात बडबड करणार होता.

भय्या नागपूरकर मात्र कार्यक्रमाला कुठली शेरवानी घालायची आणि कुठले सुरवार नी चढाव वगैरे चढवायचे या विचारात गुंग झाला. पु.लं समोर फिल्मी गीत गावे की गझल हे त्याचे अजून निश्चित नव्हते. निमंत्रण पत्रिकांवर डिझाईन कोणते असावे हे ठरवण्याची जबाबदारी चौकोनी कुटुंबाची. पत्रिका सुबक, सुरेख, आकर्षक, सुव्यवस्थित आणि गुळगुळीत कशा करता येतील यावर माधवराव आणि मालतीबाई यांच्यात न भांडता विचारविनिमय झाला. बटाट्याच्या चाळीतल्या मंडळीना निमंत्रण द्यायला परोपकारी गंपू ला पाठविण्यात आले. सगळ्यांची विचारपूस करण्याची त्याला भारी हौस असल्याकारणाने गंपू ला तिकडे धाडण्यात आले होते. शेवटी एकदाचा कार्यक्रमाचा दिवस उजाडला…

पहाटेच्या यष्टीने अंतू बर्वा पुण्यात अवतरला. येताना ‘म्हस’ आडवी आल्याने त्याला यायला थोडा उशीर झाला होता.वाड्यात येताच अंतू ने बापूस हटकले... ”काणेंचा बापू ना तू?” “हो” ”झटक्यात ओळखले मी ! अरे तुझ्याशिवाय कां कुणी सेक्रेटरी होणारेय” बोलण्यात शक्य तितके अनुस्वार जाणून बुजून न वापरता अंतू बर्वा म्हणाला, “कशी काय कामं?”

“होत आहेत”, हातातला कार्यक्रमाच्या बजेटचा कागद डोळ्याखालून नाचवत बापू उत्तरला. इतक्यात लखू ला उद्देशून अंतूशेट ओरडले “पेपरातून जाहिरातीच्या अक्षता वाटल्याचे समजले हो SSSS ,पगार वाढवून क्षुद्र शब्दकोडी रचण्यापेक्षा हे उत्तम.”

”अंतूशेट, सखोल व्यासंग आणि परिश्रमाला अर्थ नसल्याने शब्दकोड्या सारख्या शुल्लक प्रकारांना साहित्यिक दर्जा देण्याचे काम करावे लागते.” नेहमीप्रमाणे लखू म्हणाला. एवढ्यात तिसर्याला बघून अंतू आत कुठेतरी अंतर्धान पावला. कार्यक्रमाची वेळ होत आली होती. नारायणावर चौफेर हल्ले होत होते. ज्याप्रमाणे त्याच्या अंगात आतापर्यंत लग्न चढायचे तसे आता सत्कार समारंभ चढला होता. खुर्च्या व्यवस्थित मांडल्या आहेत का; गालिचे नीट अंथरले आहेत का; हार फुले मागवली ती आली आहेत का; ही सगळी कामं तो निस्वार्थ पणे करीत होता.

हरितात्या कोपर्यात कुठेतरी गजा खोत आणि चार दोन मंडळींना घेऊन इतिहास जमा आले होते. ”अरे पुराव्यानी शाबीत करीन… असे महाराज सिंहासनावर बसलेले… गागाभट म्हणतायेत मंत्र...आणि हा असा राज्याभिषेक होतोय…मंगल वाद्ये वाजविली जातायेत..तोफांच्या आवाजांनी सह्याद्रीचे कडे निनादून सोडले जातायेत..आणि तुला सांगतो गजा, जिजाऊ माउलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते… अरे पुरावा आहे.” काही वेळात आपल्या भल्या मोठ्या प्याकार्ड गाडीतून बबडू आला.एकंदरीत कार्यक्रमाची लगबग बघून म्हणाला – ”ह्या स्साला…कारेक्रमाचा मस्त जामानिमा केलाय हां…अरे आमच्या स्कालर चा वाढदिवस आज…आख्खा पुण्यात रोषणाई झाली पाहिजे..बेसनलाडू चा बेत आहे कां ? …साला घोसाळकर मास्तर जगला असता तर जख्खड म्हातारा झाला असता आज …डाइड झाला साला…” उगाच घोसाळकर मास्तर आठवून बबडू इकडे तिकडे वाड्यात फिरू लागला .

सखाराम गटणे ने भाषण मुखोद्गत केले होते. Drawing आणि ड्रील सोडून चितळे मास्तरांना सगळे विषय येत असल्यामुळे त्यांनी सखाराम ची उजळणी घेतली. अण्णा वडगावकर यांनी सुद्धा ‘माय गुड फेलो’ असे म्हणून गटण्याचे कौतुक केले. अपेक्षेला छेद न देता स्वच्छ धोतर नेसलेले माधवराव आणि नऊवारीतल्या मालतीबाई मुलांसमवेत आल्या. लोकांची गर्दी व्हायला सुरुवात होत होती. संध्याकाळ होत आली होती. तेवढ्यात पावणे सहा फुट उंच,निळ्या डोळ्यांचा,कुरळ्या केसांचा रुबाबदार नंदा प्रधान आला.तो येताच उपस्थित असलेल्या समस्त तरुणींच्या नजरा त्यावर खिळल्या. नाथा कामात त्या अगोदरच आला होता आणि एकशे ऐंशी कोनात मान फिरवून त्या तरुणींवर याने आपल्या नजरा स्थिर केल्या. एकीला बघून ‘सुषमा नेने’ असे काहीसे तो पुटपुटल्याचा नंदा प्रधानला भास झाला. पेस्तन काका खास taxi करून मुंबईहून पुण्याला आले होते आणि सगळ्या व्यक्ती वल्लींना भेटून ते म्हणाले,”भावसाहेब, कार्यक्रम हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणार हाय.”

दोन वस्तादांपैकी तबलजी टिल्या वस्तादशी भय्या नागपूरकराने गट्टी जमवली व शेवटी गझल गायचे असे ठरवून आतल्या एका खोलीत रियाझ सुरु केला. गजा खोतानी त्याला स्वतःची कधीही न वाजवलेली नवी पेटी दिली. गज्याच्या आयुष्यात खूप दिवसांनी मजेचा दिवस येणार होता. ‘तो’ कसा आहे हे सर्व व्यक्ती वल्ल्लींना माहित होते त्यामुळे ‘तो’ ने त्यांना टाळून मुंबईहून आलेल्या बटाट्याच्या चाळीतल्या मंडळींशी हितगुज करायला प्रारंभ केला. एच्च. मंगेशराव यांना गाठून त्याने ‘हंसध्वनी’ या रागाबद्दल चर्चा सुरु केली. थोड्या अवधीतच ‘तो’ ने आपण एक नंबरचे बोगस माणूस आहोत हे पटवून देण्यात यश मिळवले. पु.लं न घ्यायला बबडू आपल्या लांबलचक मोटारीतून गेला.

पु.ल आणि सुनीताबाई आले. त्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.वाडा पुरता सजला होता. कार्यक्रमाची एवढी सुंदर तयारी बघून दोघेही भारावून गेले. औपचारीकता कधीच नाहीशी झाली होती. सगळ्या मंडळींची पु.ल व सुनिताबाईंनी आस्थेने चौकशी केली. पहिल्यांदा गटणे ने इतक्या लोकांसमोर दणदणीत भाषण ठोकले. त्याने सुरुवातच मुळी जोरदार केली ”मराठी सारस्वतात आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सोनेरी झळाळी प्राप्त करून देणारे, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आज इथे उपस्थित आहे …..” त्याच्या जीवनातला साहित्याचा बोळा केव्हाच दूर झाला होता पण त्याचे भाषण मात्र साहित्याप्रचुर आणि व्यासंगपूर्ण झाले. भय्या नागपूरकरने बेगम अख्तर यांची ”ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया…जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया...” ही गझल गायली. पुलं ना ती गझल फार आवडली.

सत्काराला उत्तर देताना पु.ल एवढेच म्हणले — ”अरे तुमच्या सारखी मंडळी माझ्या आयुष्यात आली आणि हे आयुष्य सर्वार्थाने मखमली झालं. जगात जिवंत माणसांपलीकडे बघण्यासारखं काही नाही.तुम्ही मला दिलेली ही प्रेमाची खुर्ची तुम्हीच घट्ट धरून ठेवलीये. ह्या प्रेमाच्या ऋणातून मला मुक्तता नकोय…अजिबात नकोय”. अंतू बर्वा आपले ओले मिचमिचे डोळे सद्र्याने पुसत होता. त्याचे ते खपाटीला गेलेले पोट पु.लं च्या नजरेतून पुन्हा एकदा सुटले नाही.

नंदा प्रधान म्हणाला –” भाई, तुम्ही आमच्या साठी एक कधीही न संपणारा अमृतकुंभ आहात. अहो तुम्ही नसता तर आम्हाला कुणी विचारले तरी असते का? चांगल्या वाईट गुणांचं संचित घेऊन, कपाळावर आठ्या मिरवत उद्याची चिंता वहात सदैव रस्त्याने खाली मान घालून चालणारी सामान्य माणसं आम्ही !! तुम्ही ती घराघरात पोहचवली…अजरामर केली. लोकं आमच्यामध्ये स्वतःचा शोध घेऊ लागली..’वैभव...वैभव’ म्हणतात ते याहून का वेगळं असतं !!” बोलट असो वा नामू परीट...सगळ्यांचे डोळे पाणावले होते. आपुलकीची व अव्याहत प्रेमाची ही शिदोरी घेऊन पु.ल आणि सुनिताबाई निघाले. काही वेळातच सगळी मंडळी एकमेकांचा निरोप घेऊन पांगू लागली ती पुन्हा भेटू या शपथेवरच !! संध्याकाळ ओसरून रात्र झाली होती. वाड्यात एका कोचावर नारायण निपचित पडला होता आणि एका खोलीत बापू काणे खर्चाचा हिशोब तपासात होता. बाकी सर्वत्र सामसूम होती.

योगेश कोर्डे
मूळ स्त्रोत --> http://yogesh-korde.blogspot.in/2013/02/blog-post_9527.html


Friday, November 26, 2021

मी सिगारेट सोडतो

‘‘मी सिगारेट सोडली - मी सिगारेट सोडली - कायमची सोडली - यापुढे सिगारेट वर्ज्य - प्राण गेला तरी सिगारेट नाही ओढणार - माझा निश्चय कायम - त्रिवार कायम.’’ - वास्तविक हे मी कुणालाही सांगत नाही - माझे मलाच सांगतो आहे. हा आजचा प्रसंग नाही -‌ हे अनेकवेळा मी माझे मलाच सांगितले आहे. सिगारेट सोडण्याविषयी मी माझ्या धुरकट मनाला आजपर्यंत जो उपदेश केला आहे तो जर श्लोकबद्ध केला असता तर मनाच्या श्लोकासारखे माझे धुराचे श्लोक घरोघर म्हटले गेले असते. पण चार चरणांचा श्लोक तयार करणे हे माझ्या आवाक्यापलीकडले काम आहे. म्हणून बहुधा हा उपदेश मी गद्यातच करतो - मना, ह्या धुराच्या भोवऱ्यात फसू नकोस. रोज अडीच-तीन रुपयांची राख करणे हे बरे नव्हे. हे सज्जन मना - हा मोह आवर. बाकी मनातल्या मनात देखील माझ्या स्वत:च्या मनाला ‘मना सज्जना’ म्हणताना मला लाजल्यासारखे होते. ह्या माझ्या अचपळ मनाची-माझी बालपणापासूनची ओळख आहे-तरी देखील त्या माझ्या मनाला माझा मीच गोंजारीत असतो. वास्तविक हे स्वत:च्या गळ्यात हात घालून आपणच आपल्याला आलिंगन देण्यापैकी आहे.

बाकी सिगारेट सोडण्याचा किंवा अशाच प्रकारच्या सन्मार्गाने जाण्याचा उपदेश करणारा हा कोण आपल्या अंत:करणात दडून बसलेला असतो हे काही कळत नाही. पुष्कळदा वाटते की ‘आत्मा आत्मा’ म्हणून ज्याला म्हणतात तो हा प्राणी असावा. पण मन देखील अंत:करणातच असावे. मला वाटते ‘मन’ हे आत्म्याकडे पोटभाडेकरू म्हणून रहात असेल आणि एखाद्या प्रेमळ घरमालकाने गच्चीवरच्या एका खोलीत भाड्याने रहाणाऱ्या आणि वेळीअवेळी भटकणाऱ्या कॉलेजविद्यार्थ्याला नीट वागण्यासंबंधी उपदेश करावा त्याप्रमाणे हा ‘आत्माराम’पंत त्या ‘मन्याला’ उपदेश करीत असावा. पूर्वी काही नाटकांतून आत्मारामपंत, विवेकराव, क्रोधाजीबुवा, मनाजीराव वगैरे पात्रे असत. त्यांची अशावेळी आठवण येते. ‘मन’ हे नेहमी उनाड. ते नाही नाही त्या ठिकाणी जडते. कुठे कुणाच्या केसांच्या महिरपीतच गुंतेल - तर कुठे एखाद्या नाजूक जिवणीजवळ उगीचच फेरी घालून येईल - बरे ही जडायची ठिकाणे काय मोठी - काव्यमय - सुंदर - मोहक असायला हवीत असे थोडेच आहे. नाक्यावरच्या हॉटेलात संध्याकाळी - पहिली कांद्याची भजी चुरचुरायला लागली की मन धावले तिथे. चौपाटीवरच्या वाऱ्याबरोबर येणाऱ्या भेळवाल्याच्या ठेल्याची खबर नाकाशी आली की विवेकराव - क्रोधाजीराव - आत्मारामपंत वगैरे मंडळींना न जुमानता धावले तिथे - छे - ‘मन ओढाळ ओढाळ’ म्हटले आहे ते काय खोटे नाही. मला वाटते मनाचा ओढाळपणा सिगारेट, विडी, हुक्का, चिलीम वगैरे ओढण्यात जितका शाबीत होतो तितका इतरत्र कुठेही होत नसेल.

बाकी ज्या कुण्या मराठी माणसाने धूम्रपानाला ‘ओढणे’ हे क्रियापद लावले त्याची धन्य आहे. इतर भाषांत विडी पितात - आपण ‘ओढतो.’ इंग्रजीत तर सरळ ‘धूर सोडणे’ अशाच अर्थाचे क्रियापद वापरले जाते. याचे मुख्य कारण सिगारेट किंवा बिडीत काय ‘ओढतात’ हे पुष्कळांना कळलेले नसते. ‘काय, ‘फू फू फू फू’ करण्यात सुख वाटते कोण जाणे - हा आणि अशा चालीचा फुंफाट कुठल्या दिशेने येतो हे काय सांगायला हवे. बरे बायकाच नव्हे तर चांगले पुरुष म्हणवणारे लोक देखील ह्या ‘ओढण्या’ला विरोध करतात. पुरुषांच्या ओठाशी लडिवाळ खेळ करणाऱ्या आणि बोटाशी खेळणाऱ्या कुठल्याही वस्तूचा बायकांनी हेवा करावा हे मी समजू शकतो-पण पुरुषांनी? हॅ. अर्थात ह्याचे मुख्य कारण एकच. सिगारेट ओढणाऱ्याच्या ओठी असते ते पोटी नसते हे येरागबाळांना कसे कळावे. सिगारेट पिण्याला माझा विरोध आहे. कोरडी - धगधगती वस्तू प्यायची कशी? - बरे फू फू फू फू करायला सिगारेट ही काय फुंकणी आहे. 'विड्या फुंकतात' म्हणणाऱ्या लोकांना फुंकण्याचा अर्थ कळत नाही. काही लोक तर चक्क 'धूर काय ओढीत बसता?' म्हणतात. ह्या बाळबुद्धीला काय म्हणावे-सिगारेट ओढणारा माणूस हा धूर सोडणारा असतो - ओढणारा नव्हे. एका जिज्ञासू माणसाने मला 'तुम्ही सिगारेटीत नेमके काय ओढता?' असा सवाल केला होता. हा खरा अर्जुनाचा प्रश्न. त्याला उत्तर मात्र एकच-ओढून पहा.

बाकी सिगारेट ओढून पहा हे सांगणे जितके सोपे तितकेच सोडून पहा हे सांगणे बिकट आहे. कधी कधी मनाजीरावावर आत्मारामपंताचा विजय होतो आणि सिगारेट सोडण्याची आपत्ती ओढवते. काही दिवस आत्म्याचे राज्य सुरू होते -‌सिगारेट सोडायचा निश्चय झाला रे झाला की आत्म्याचा अंमल चढायला लागतो. अध्यात्माची पहिली प्रतिक्रिया म्हणजे वैराग्य. सिगारेट सोडण्याचा निश्चय करून तास - अर्धा तास होईपर्यंत ती वैराग्याची कळा चेहऱ्यावर दिसायला लागते - समोर चहाचा कप असतो. वास्तविक रोजचा क्रम एक घुटका चहाचा आणि सोबत झुरका सिगारेटचा असा असतो. आता चहा 'एकला पडलो रे' म्हणत ओठांतून पोटात जातो. पुष्कळ वेळा मला आतला आवाजच नव्हे तर आतले अनेक आवाज ऐकू येतात. पोटातली पचन विभागातली यकृत-प्लीहा-पित्ताशय-अन्ननलिका वगैरे स्त्री-पुरुष कारकूनमंडळी - त्या एकट्याएकट्याने येणाऱ्या घुटक्याला ‘काय आज एकटेच?’ असा प्रश्न विचारू लागलेले आतल्या आत उमगते. सिगारेट सुटली की - पोटात चहाला एकलेपणाची आग लागली आहे हे ताबडतोब समजते आणि सिगारेटबरोबर चहादेखील सोडायचा निश्चय व्हायला लागतो. चहा-सिगारेट आणि पान ही त्रिगुणात्मक विभूती आहे. जरा खोलवर विचार केला तर अत्रिने दिलेल्या तीन शिरांच्या दत्तगुरूप्रमाणे पत्रीने दिलेले हे त्रिविध दर्शन आहे. चहाचीही मूळ पत्री-तंबाखूचीही पत्री आणि पान म्हणजे तर साक्षात पत्री.

ह्या तिघांचा सोडा पण एकेकाचा त्याग करणे म्हणजे आपत्तीच म्हणायला पाहिजे. पण तरीदेखील आत्यंतिक रतीनंतर उपरती यावी त्याप्रमाणे सिगारेट ओढण्याप्रमाणे सोडण्याची लहर येते. आत्म्याचे प्राबल्य म्हणा किंवा त्याहूनही जबरदस्त असे पत्नीचे वर्चस्व म्हणा आपण सिगारेट सोडतो. इथे मी आपण हा शब्द ‘माझिया जातीच्या’ मंडळींना उद्देशून वापरला आहे. तात्पर्य - एखादा दिवस असा उजाडतो की त्या दिवशी भल्या पहाटेच आत्मा मनाला गाफील अवस्थेत गाठतो. मला ‘आत्मा’ हा इसम नेहमी गोरापान-थोडेसे दोंद सुटलेला-उघडा-आखूड धोतर नेसलेला-रूपेरी शेंडी तुळतुळीत डोक्यावर चमकते आहे-भरघोस मिशा आहेत-जानवे स्वच्छ आहे-आणि गाईचे धारोष्ण दूध पिऊन भेटायला आला आहे-असे वाटते. त्याच्याबरोबर विवेकराव असतात. हे गृहस्थ एखाद्या ग्रामसुधार कमिटीच्या चिटणीसासारखे पांढरे स्वच्छ कपडे घातलेले-बुटुकले-रोज दाढी करणारे-काळसर असले तरी नीटनेटके असे असतात. ही थोर माणसे शिरली की माझ्या गटातले मोह, क्रोध, लोभ वगैरे लोक निरनिराळी निमित्ते काढून पळतात. हा लाभ मात्र वारंवार पगडी बदलणाऱ्या पुढाऱ्यासारखा कधी आत्मारामपंताच्या गटांत तर कधी मोहाच्या पार्टीत आढळतो. आत्मा आणि विवेक एखाद्या निवडणुकीतल्या उमेदवाराने नवशिक्या मतदाराला पकडावे तसे - माझ्या मनाला पकडतात. एक अध्यात्माची जडीबुटी देतो. हृदय म्हणजे देवाचा देव्हारा - तो मंगल ठेवा - पवित्र ठेवा - तिथे तंबाखूचा का धूर न्यायचा? - तिथे पानाची थुंकी का साठवायची? व तिथे तो कोवळ्या पानांना चुरगळून केलेला चहा का ओतायचा? माझ्या हृदयात सोन्या मारुतीसारखे लहानसे देऊळ आहे - आणि एरवी पोटात जाणारी घाण - जीवजंतू - रक्तवाहिन्या वगैरे त्या देवळाच्या आजूबाजूंनी वहाणाऱ्या - गटारांसारख्या वाहतात. हे ऐकून मी गदगदतो. ह्या हृदयातल्या खेळांत बडवण्यासाठी घंटा असतील का असा एक चावट विचार मनाच्या मनात येतो. आणि मग विवेक आपल्या हातांतली कातडी पिशवी उघडतो. त्यांत निकोटीन, टॅनिन वगैरे भयंकर मंडळींची यादी असते. ही शरीराचा विध्वंस करणारी माणसे सिगारेट, चहा वगैरे मंडळींच्या पोटातून आपल्या पोटात जातात - शिवाय कॅन्सर. अरे बापरे! माझे भित्रे मन दचकून थरथरायला लागते आणि पोटातल्या ह्या खलबतांतून ओठांत उद्‌गार येतात -‌ मी सिगारेट सोडली. आजन्म सोडली.

तास-दोन तास जग किती पवित्र, मंगल दिसायला लागते. स्वत:च्या बायकोवर देखील खूप प्रेम करावेसे वाटायला लागते. वास्तविक तिचे ‘सिगारेट सोडा, सिगारेट सोडा’ हे टुमणे लग्न ठरल्या दिवसापासून चाललेले आहे. हर हर! ह्यासाठी मी त्या माऊलीचा किती वेळा अपमान केला. एकाएकी तिच्यापुढे जाऊन सौभद्रातल्या अर्जुनाप्रमाणे ‘‘कोण तुजसम सांग मज गुरुराया कैवारी सद्‌या’’ हे पद अंगविक्षेपासह म्हणावे असे वाटू लागते. पण आजूबाजूच्या विड्या ओढणाऱ्यांबद्दल मला घृणा वाटायला लागते. कचेरीत - ‘हं काढा सिगारेट’ म्हणणाऱ्या मित्रांना मी शांतपणाने - ‘मी सोडली सिगारेट’ असे सांगतो. ते हसतात मला. पण मी दाद देत नाही. मग नंतर सिगारेट सोडलेले लोक मला उपदेश करतात. कुणी म्हणतात हळूहळू कमी करा नाहीतर हार्टवर परिणाम होतो. कुणी म्हणतात - छे छे सोडायची म्हणजे सोडायची. - दिवसभर माझ्या डोक्यात एकच विचार. मी सिगारेट सोडली - त्या नादात कचेरीतल्या कामात चुका होतात. चेकवर सही करताना 'आपला नम्र' असे लिहून सही होते-डिस्पॅच्‌ क्लार्कदेखील हसतो - डिसोझा चिरूट ओढीत खोलीत येतो ती घाण सहन होत नाही म्हणून त्याला मी अत्यंत तुटकपणे खोलीतून हाकलून देतो - तो पलीकडल्या खोलीतून मला टेलिफोन करून "बायकोचा राग आमच्यावर कशाला काढतोस रे?" असे विचारतो. सगळ्यांचा समज आमचे घरात काहीतरी वाजले आहे असा होतो. माझे मलाही माझे असे का होते ते कळत नाही.

नेहमीप्रमाणे - ऑफिसच्या लंचरूममध्ये मंडळी जेवायला जमतात. आमच्या सेक्शनमधली नुकतेच लग्न होऊन रजेवर काश्मीरला गेलेली टायपिस्ट आजच रिझ्यूम झालेली असते - ती लडिवाळपणे जवळ येते - आणि - माझ्या नवऱ्याने हे तुम्हाला काश्मीरहून छोटेसे प्रेझेंट दिलेय म्हणते‌ - मी त्याला तुम्ही कसे जॉली आहात - तुम्ही आम्हाला आमचे बॉस आहात असे मुळीसुद्धा कसे वाटत नाही हे सगळे सांगितले आहे… वगैरे सांगून सुरेख कागदात बांधलेले प्रेझेंट देते - त्यात अक्रोडच्या की कसल्या लाकडाची सिगारेट केस असते. त्यात सिगारेटी देखील भरलेल्या असतात.

"हाच ना तुमचा ब्रॅण्ड?" मी निमूटपणाने हो म्हणतो. माझ्या अंत:करणात एका खाटेवर दम्याची उबळ आलेल्या म्हाताऱ्यासारखा आत्मा बसलेला आणि त्याच्या बाजूला डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारासारखा विवेक उभा असतो. आणि ते सज्जन मन एकेका झुरक्याबरोबर उर्दू मुशाहिऱ्यांतल्या रसिकांसारखे ‘‘वाहवा-क्या बात है-बहोत अच्छा सुभानल्ला’’ करीत असते.

- पु. ल. देशपांडे
अंक: केसरी सप्टेंबर १९६० (आकाशवाणी-मुंबईच्या सौजन्याने)

Monday, November 22, 2021

चिमणी - (पाळीव प्राणी - हसवणूक)

कावळ्या मागोमाग येणारा पक्षी म्हणजे चिमणी. वास्तविक या दोघात काहीच साम्य नाही .केवळ काऊशी यमक जुळावे म्हणून चिऊ येते .मात्र काऊ आणि चिऊ ह्या निदान मुंबईच्या पक्षीजमातीतला अनुक्रमे बहूजन समाज आणि कनिष्ठ मध्यम वर्ग आहे. संखेने विपुल ,कष्टाने जगणारा .सुबक पिंजऱ्यात बसून डाळींबाचे दाणे खाणारा ऐदी नव्हे .काऊ चिऊ बिचारे आपली स्वताची बोली बोलतात त्याना नागरांची शिकाऊ पोपटपंची जमत नाही . खाण्यापिण्यातला चोखंदळपणा परवडत नाही .खाऊ तर पेरू नाहीतर मरू ! हे गाणे पोपटाला ठीक आहे. किंबहुना आधी पेरू खाऊनच ती असली गाणी म्हणत असतात. चिमणा-चिमणीची आर्थिक परिस्थिती कावळ्यापेक्षा जरा बरी असते. नाही म्हटले तरी त्या सभ्य घराच्या वळचणीचा आसरा घेतात. काही माफक प्रणयक़ीडा करतात. फिरत्या वाचनालयातील मासिकातल्या कथा वाचून कारकूनाची पोर -पोरी जितपत प़ेम करतात तितक्याच. कावळे मात्र अगदी मजुर वर्गातले. शहरात पहाटे उठून कामावर जायचे नशीबात असेल ते शिळेपाके खाऊन दाटीवाटीनी राहायचे. चिमणा-चिमणी त्या मानाने लोअर डिव्हीजन क्लार्कच्या दर्जाने राहतात. सुट्टीत देशावर जाऊन पिकाच्या तूरयावर बसून येतात. 'हे' कामावर गेल्यावर चार घरट्यातल्या चिमण्या जमून मंडळे चालवतात थोडा चिवचिवाट करतात. एका खोलीच्या घरट्यात का होईना पण स्वतंत्र संसार थाटतात. कावळ्यांची घरे मजुराच्या खुराड्यासारखी दृष्टी आड सृष्टीत मोठ्या मोठ्या लोकांच्या पंख्यावर दिव्याच्या टोपणात, दिवाणखान्याच्या तुळईजवळ पोट भाडेकरू म्हणून राहण्याची धिटाई चिमण्याना जमते तशी कावळ्याला जमत नाही.

ह्या पक्ष्याला विलक्षण न्यूनगंड आहे. तो चिमण्या सारखा किंवा पारव्यासारखा एकदम कधीही घरात शिरत नाही. चिमण्याचिमणीपैकी चिमणी हा स्त्री समाज बराच पुढारलेला असल्याने तीही संसाराला हातभार लावते कावळी चारचौघात मोकळेपणाने वावरताना दिसतच नाही. मी तर तशी कावळी काळी की गोरी पाहिलीच नाही. गोरी नसावी कारण इतक्या कावळ्यापैकी एक तरी आईच्या वळणावर गेला असता. काक समाजात काकूना फारसे पुढे येऊ देत नसावेत म्हणूनच काॅलेजमधल्या मागासलेल्या मुलीना "काकू म्हणत असावेत .की काय ? कावळी मी पाहीली नाही तरी दामले मास्तर मुलीना "ए कावळे" म्हणत हे ऐकले आहे. त्याना गोविंदा ,अंतू ,हरी ,वेणू प़भी इत्यादी नावे समोर दिसत असूनही आठवत नसत. आमच्या काळी अमिताभ हर्षवर्धन,आशुतोष ,अर्चना सस्मिता इत्यादी मास्तरांची कवळी उडवणारी नावे नव्हती. पण आमची नावे सोपी असूनही दामले मास्तर बैलोबा ,गाढवा ,कावळे याच नावाने हाक मारत असत. हजेरी देखील ,देशपांड्या ,फडक्या ,साठ्या अशा लाडीक नावाने घेत असत .इतक्या गद्य वातावरणात बालपण गेल्यावर कुठली फुले व कुठले पक्षी ? खिडकीपाशी आपण होऊन येणारे कावळे चिमण्या आणि तळमजल्यावरच्या वाण्याकडले वळचणीला घुमणारे पारवे सोडले तर आमच्या बालजीवनातून पक्षी केव्हाच उडले होते आमच्या लहानपणी पक्षी उडत नव्हते असे नाही .पण चाळीच्या खिडकीतून जिथे आकाशच दिसायची पंचायत तिथे पक्षी कुठले दिसायला ?

पु.ल. देशपांडे 
(पाळीव प्राणी  - हसवणूक)

Friday, November 19, 2021

संगीत चिवडामणी

एकदा क्लासच्या दारात एक बगी उभी राहिली. बगीत एक म्हातारे सरदार, त्यांच्या तितक्याच म्हाताऱ्या सरदारीणबाई आणि एक तरुण मुलगी होती. बुबा दरबारी अदबीने बगीजवळ गेले.

"नारद संगीत विद्यालयाचे चालक आपणच का ?" "होय मीच!" "हं. गाणं शिकविण्याचे दर काय आहेत आपले?" "कोणाला- आपल्या ताईसाहेबांना- गाणं शिकायचं आहे का?" ताईसाहेबांकडे चोरून पाहात बुवांनी विचारले. "तिला गाणं शिकवून काय सिनेमात नाचायला पाठवायला सांगता काय आम्हाला?" बुवा चरकले. गाणे शिकवून नाचायला कसे पाठविता येईल?- हे कोडे तर त्यांच्यापुढे होतेच; परंतु ह्या म्हाताऱ्याला शिकवावे लागणार की काय ही भीती त्यांच्यापुढे उभी राहिली. "तसं नाही, आजकाल सरदार हुरगुंजीकरांच्या सूनबाईसाहेबांना मी शिकवितो गाणं-" "सरदार हुरगुंजीकर सेकंड क्लास सरदार आहेत; आम्ही फर्स्ट क्लास आहो!" सोन्याच्या घड्याळाचा छडा चाळवीत सरदार म्हणाले. "ह्यांना गाणं शिकवायला काय घ्याल?" म्हणजे? ह्या म्हातारीला सिनेमात नाचायला पाठवणार की काय? त्यांच्या बोटाच्या दिशेने त्या थेरङ्याकडे पाहात बुवा मनात म्हणाले. नशीब! पागेतल्या घोड्यांना सुरात खिंकाळायला शिकवा म्हणून नाही सांगितले! "काय?" "हो, शिकवू की!" बुवांच्या तोंडून शब्द गळून पडले. "शिकवा. तिला दमा आहे. गाण्यानं दमा बरा होतो म्हणे. परवाच काठेवाडच्या एका राजवैद्यानं सांगितलं आम्हांला. पाहायचं एकेक इलाज करून! उद्या या वाड्यावर." बगी पुढे गेली. बाहेरच्या बोर्डावर 'येथे दमाही बरा केला जाईल' ही अक्षरे लिहिण्याचा विचार बुवांच्या मनाला चाटून गेला. हे वैद्यकीय गाणे शिकवायला बुवा दोनचार महिने जात होते. 'सा' लावला की म्हातारी पाऊण तास खोकायची. एकदा पंचमापर्यंत जेमतेम पोहोचली आणि सुराला एक ह्या हिशेबाने पाचही प्राण तिच्या डोळ्यात गोळा झाले. दुसऱ्या दिवसापासून स्त्रीहत्येच्या पातकाच्या भीतीने बुवांनी शिकवणी सोडली. त्या शिकवणीला जाताना बुवा 'संगीताच्या व्हिजिट' ला निघालो म्हणायचे.
- पु. ल. देशपांडे संगीत चिवडामणी
नसती उठाठेव

Tuesday, November 16, 2021

कालातीत विचारवंत -- पिनाकीन गोडसे

शहर मेलबर्न. दिवस मे महिन्याचे. आमच्याकडे काही मैत्रिणी आल्या होत्या (पुणेकर नसल्याने तिसऱ्या वाक्यात हशा मिळवायची अट मला नाही). एकीने पुलंची पुस्तके बघून दुसरीला सांगितले की, "अरे हे फार विनोदी लेखक होते". मला कळेना की कीव कोणाची करावी माहिती देणारीची की माहिती जिला मिळाली तिची? की विनोदी लेखक एवढीच ओळख उरलेल्या पुलंची ? पण ते शब्द त्रास देत राहिले हे मात्र खरे. आधी एका लोकप्रिय कार्यक्रमात पु. ल. देशपांडेंच्या उल्लेख आद्य मराठी stand up comedian असा केला होता. हे म्हणजे रम चा उल्लेख शरीरात उष्णता निर्माण करणारे द्रव्य असा करण्यासारखे आहे. खरा आहे की नाही हा प्रश्न नाही पण पुरेसा नक्कीच नाही. ह्या पुरुषोत्तमाच्या अचाट आयुष्यातील एका उत्कृष्ट विचारवंताचा भाग थोडा उपेक्षल्यासारखा वाटतो म्हणून हा लेखन प्रपंच. पुलंवर एवढे विपुल लेखन झाले आहे की ह्यापुढे काही लिहणे म्हणजे पुनरोक्तीचा दोष पत्करुन लिहणे क्रमप्राप्त आहे. तसेच या लेखात पुलंचे शब्दच जास्त आहेत कारण ते वाचल्यावर आपण काही लिहूच नये अशी भावना प्रबळ होते.

पु. ल. देशपांडे ह्या असामीने महाराष्ट्राचे सांस्कृतिक विश्व अजूनही व्यापून टाकले आहे. पुलंना जाऊन २० पेक्षा जास्त वर्षे झाली, त्याआधी काही वर्षे ते आजारी होते. तरीही त्यांचे सांस्कृतिक ऋण महाराष्ट्र अजून अभिमानाने मिरवतो. हे न फिटणारे ऋण! ह्यांना आपण काय देणार! तेथे कर माझे जुळती असे म्हणून धन्य व्हावे. पुलंनी संस्कृतीच्या प्रत्येक अंगाला कडकडून मिठी दिली. संस्कृतीचे असे कुठले दालन नसेल जिथे पु. ल. बागडले नाहीत. हा समाजकारणी आपल्या विचारांचे मोती मुक्तहस्ते उधळत राहिला पण असे असताना जिथे काही अमंगल दिसले तिथे हाच माणूस पहार घेऊन उभा होता. ह्या सर्व सांस्कृतिक पराक्रमामागे एक सुंदर वैचारिक बैठक होती आणि ती पु.लंनी सदैव लख्ख ठेवली.

एखाद्या विचारवंताचे विचार समाज नेहमी एका प्रखरतावादी दृष्टिकोनातून पाहत आलाय. विचारवंत म्हटले की तो एखाद्या प्रखर विचारांची पाठराखण करणारा असतो असा एक ग्रह आहे. ह्याच ठिकाणी पुलंचे विचार निराळे ठरतात. ह्या माणसाने नेहमी मानवतावादी, सौंदर्यसाधक आणि आनंददायी विचारांची पाठराखण आणि पखरण केली. हे विचार तसे म्हटले तर साधेच आणि नेहमीचे होते. हे काय विचार झाले का? असा सुध्दा प्रश्न काहींना पडू शकेल. त्या काळी सुध्दा पुलंवर ते भाषणातून काही विचार देत नाहीत हा आरोप झाला होता. आचार्य अत्रे, S. M. जोशी, नरहर कुरुंदकर, दुर्गाबाई भागवत इ. परखड विचारवंतांची सवय तेव्हा महाराष्ट्राला होती, तेव्हा ह्या पुरुषोत्तमाच्या सरळ विचारांची थोडी उपेक्षाच झाली. जीवनातील श्रेयस आणि प्रेयस दोघांवर मनापासून प्रेम करणारे विचार सोप्प्या शब्दांत मांडताना पुलंनी कधी विचारांची सक्ती केली नाही. बरं, पुलंना काही अनुयायी तयार करायचे नव्हते की खुर्च्या मिळवायच्या नव्हत्या त्यामुळे लोकप्रियता किंवा समाजमान्यता त्या विचारांना थोडी आली नाही असे जाणवते. आज, इतक्या वर्षांनंतर समाजात जेंव्हा गुणग्राहकता, सहिष्णूता, सामाजिक उत्तरदायित्व, धर्मनिरपेक्षता इ. मूल्यांची सार्वत्रिक गरज जाणवते तेंव्हा ह्या कालातीत विचारवंतांची आठवण येते.

आजच्या 'वाद'ग्रस्त जगात एक मानवतावाद हरवलेला वाटत असताना महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाने सदैव केलेल्या मानवतावादी विचारांची आठवण येते. मानवतावादात माणुसकीचे महत्व अधिक आणि ते जागोजागी पुलंनी मांडले. संस्कार आणि संस्कृती ह्या मानवतावादावर परिणाम करत असतात आणि तो परिणाम चांगलाच असावा असा आग्रह त्यांनी धरला. संस्कृतीचा संदर्भ फक्त धर्मकार्य आणि सणासुदींशी जोडणाऱ्या जगाने पुलंचे संस्कृतीचे विचार उमजून घेतले पाहिजेत. एखाद्या समाजाने एकत्र येऊन केलेल्या कृतीस संस्कृती म्हणतात. ह्यात उच्च-नीच असणे हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. पुलंनी सर्व संस्कृतीचे धागेदोरे दाखवले पण ते उसवण्याचा किंवा मलिन करण्याचा प्रयत्न नाही केला. 'गणपतीबाप्पा मोरया'ची मुक्त आरोळी ही सुद्धा संस्कृती आणि आठवडाअखेरीस पब्ज मध्ये जाणे ही सुद्धा संस्कृती. पिठले आणि झुणका ह्याच्या सीमारेषा कळणे ही सुद्धा संस्कृती आणि केकवर ब्रॅंडीची फोडणी देणे ही सुद्धा संस्कृती. कंठ फुटला की गावे आणि सुकला की प्यावे ही सुद्धा संस्कृती आणि टिळकमंदिरात शिरताना वाकून नमस्कार करणे ही सुद्धा संस्कृतीच. संस्कृती ही फक्त कुळाचार अथवा परंपरेशी निगडित नसून मानवी मनाशी निगडित आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या भाषणात पुल म्हणतात की, "वर्षाची जत्रा आणि आठवड्याचा बाजार ह्यावर सारी संस्कृती उभी राहिली आहे." ह्यामागे मानवी मनाची अचूक जाण पुल सहजतेने दर्शवतात आणि संस्कृतीचा संदर्भ हा माणसांच्या एकत्र येण्याशी आहे हे ठसवतात.

तसेच संस्कार ह्या शब्दाचा अर्थ नमस्कार करणे, शुभंकरोती म्हणणे असे मानणाऱ्यांस पुलंनी मानवी संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. एका मुख्याध्यपकास "संडास कसा वापरावा ह्याचे तुम्ही काही संस्कार मुलांच्यावर केलेत का?" असं प्रश्न विचारून संस्कारांची व्यापकता दाखवतात. पुल लिहतात, 'संस्काराचे वर्तुळ अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या रुढींपुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे, त्या रूढी पाळणारे ते सुसंस्कृत आणि बाकीचे असंस्कृत असे सोयीस्कर गणित मांडले जाते. आपल्या घरातला केरकचरा शेजारीच्या वाडीत टाकणे, खिडकीतून पान थुंकणे अगर केसांची गुंतवळ टाकणे हा संस्कारहीनतेचा नमुना मानला जात नाही. वरच्या गॅलरीत लुगडी, चादरी वगैरे वाळत टाकून ती खालच्या मजल्यावरच्या लोकांच्या गॅलरीपर्यंत लोंबू देणे किंवा वेळेचे बंधन न पाळता आपल्यासाठी कुणालाही तिष्ठत ठेवणे किंवा पूर्वसूचना न देता कुणाहीकडे गप्पांचा अड्डा जमवयाला जाणे आणि भेटीची वेळ ठरवूनही वेळेवर न जाणे, लोकांना तिष्ठत ठेवणे- असली वागणूक हे एक संस्कार नसल्याचे लक्षण आहे हे फारसे कुणाला पटलेलं दिसत नाही. जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वागण्यातून सिद्ध होते ती खरी संस्कृती; ग्रंथात असते ती नव्हे.' माणुसकी ह्या विचारांची इतकी स्पष्ट पाठराखण पुलंसारखा विचारवंतच करू जाणे.

ह्या मानवतावादाला विवेकवादाची आणि सर्वसामावेशकतेची भरजरी झालर होती. मनाचे आणि बुद्धीचे कोपरे उजळून टाकणाऱ्या विचारवंताचे पुलंना नेहमी आकर्षण राहिले आणि त्या सर्व ठिकाणी पुल नतमस्तकच दिसतात. मग ते फुले असोत, शाहू महाराज असोत, साने गुरुजी असोत, आगरकर असोत, टिळक असोत, गांधी असोत, सावरकर असोत, की सेनापती बापट असोत. ह्या विचारधारेत बुवाबाजीचा बुरखा फाडणे, हमीद दलवाईंवर लेख लिहणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मदत करणे हे ओघाने आलेच. खाद्यविशेषांच्या परंपरागत संरक्षणासाठी जाती टिकाव्यात ह्या एकाच ठिकाणी पुलंनी (विशिष्ट हेतूपुरतीच आणि विनोदी अंगाने) जातीची पाठराखण केलेली दिसते. आपल्या अनेक लेखांतून, भाषणांतून आणि कृतींतून पुलंनी जात, धर्म, पंथ, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, घातक परंपरा, ईत्यादींचा समाचार घेतला आहे. शाहू, फुले, गाडगेमहाराज, आंबेडकर यांची नावे घेऊन आणि पुतळे उभारून त्यांचे विचार विसरणाऱ्या वृत्तीवर पुलंनी खरमरीत भाष्य केले. भगवंतापेक्षा मला भक्त आवडतो असे लिहणाऱ्या पुलंनी वारी आणि वारकऱ्यांमधील आनंद टिपतानासुद्धा 'भेदाभेद भ्रम अमंगळ' ही शिकवण विसरून दिंड्या काढणाऱ्या समाजाचा धि:कारच केला. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, बुद्ध, जैन, शीख इ. सर्व धर्मांतील अनिष्टतेवर पुलंनी नेमके बोट ठेवले. पापमुक्तीचे पास विकणाऱ्या पोपची आणि नाण्यांनी हात ओले करून स्वर्गाची दारे उघडणाऱ्या गयेच्या पंड्यांची कधी गय केली नाही की पूर्वजन्म, प्रारब्धयोग, ग्रहयोगाची भीती ठेवून ज्योतिषाकडे धाव घेणाऱ्यांची तळी उचलली नाहीत. संतांची जात पाहणाऱ्या समाजाची कानउघाडणी केली तर सत्तेसाठी जात-धर्म आदींचा उपयोग करणाऱ्या राजकीय वृत्तीचा निषेध केला. व्यक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ असतो हे जाणणाऱ्या या पुरुषोत्तमाने एखाद्या व्यक्तीचे सामाजिक भान सुटल्यास कानपिचक्या देण्यास हयगय केली नाही. मग ते कुळ-गोत्र-प्रवर-शाखा बघून मुलगी ठरवणारे तरुण असोत की शंकराचार्यांच्या दर्शनाला जाणारे पंतप्रधान असोत. एका पत्रात पुल लिहतात, 'विज्ञानाने निसर्गाची रहस्ये शोधायची चढाओढ सुरु केल्याक्षणी ह्या जुन्या व्यवस्थेचे धाबे दणाणू लागले. आजदेखील विध्वंसक अण्वस्त्रे हा विज्ञानाचा शाप नसून कधी राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली तर कधी स्वतःची सत्तापिपासा भागवण्यासाठी सज्ज असणाऱ्या गटांची ती निर्मिती आहे ही वस्तुस्थिती किती हुशारीने डावलली जाते आहे पाहा. धर्माच्या नावाखाली रक्ताचे पाट वाहत आलेले आहेत. त्या आसुरी वैरामागे विज्ञानाचा हात नसून स्वाधिकार प्रमत्त्तांचे डावपेच असतात ह्या सत्याकडे सत्तेच्या हातात हात घालून चालणारे धर्ममार्तंड आणि अध्यात्मिक गुरु किती निर्लज्जपणे कानाडोळा करत असतात. गौतम बुद्धांनी धर्मचक्रपरिवर्तन केले. यापुढे आवश्यकता आहे ती विज्ञान-धर्माची शिकवण देणाऱ्या एक नव्हे, असंख्य बुद्धांची. बुद्ध-निष्ठ; जर बुद्धी-निष्ठ नसेल तर तोही जुन्या चाकोरीतून निघून नव्या चाकोरीत जाऊन पडला आहे असेच मी मानेन. समोरची मूर्ती बदलेली असेल; पण पूजा, नावे बदलून त्याच आरत्या आणि नवा पुरोहितवर्ग! ख्रिस्ताच्या करुणेचा धर्मदेखील शेवटी पोप आणि पाद्री यांच्या चरितार्थाचा धर्मच झाला. तिथेही व्यापाराचीच तत्त्वप्रणाली आली. प्रत्येक पंथाने आपापली गिऱ्हाईके वाढवण्यासाठी कुठलेही अमानुष उपाय करायला मागेपुढे पाहिले नाही. वैरभावनेतून युद्धाची शस्त्रच नव्हे, तर शास्त्रेही तयार झाली.'

हे विचार मांडताना आजूबाजूला होणाऱ्या सामाजिक क्रांतीचे पुलंनी नेहमी स्वागतच केले. अशा वेळी पुलंची लेखणी आणि वाणी क्रांतीचे गुणगान करताना हातचे राखून काहीच करत नाही. ही क्रांती रक्तरंजित नव्हती. ही तळागाळात पोचणारी आणि मूलतत्व मानणारी क्रांती होती. शिवाजी जन्मावा पण बाजूच्याच्या घरात मानणाऱ्या मराठी मानसिकतेला चपराक देणाऱ्या क्रांतीची स्वप्ने पुलंनी पाहिली. पुल लिहतात, 'काशीची गंगा तृषार्त गाढवाच्या मुखी जेव्हा एकनाथ महाराजांच्या हातून जाते, तेव्हा तिथे मला क्रांती दिसते. आदिवासी घरट्यांतून बालआवाजीत वाचलेला धडा माझ्या कानी पडतो, तो क्रांतीचा मंजुळ सूर मला आवडतो. कॉलेजातला फॅशनेबल तरुण बसस्टॉपवर अनोळखी म्हातारीला हात देऊन बसमधे वर चढवतो आणि क्यूमधला स्वतःचा नंबर खुशीने गमावतो हे दृश्य मला मोठ्या शहरात दिसते, तेव्हा मला क्रांतीचे स्मित पाहायला मिळते. आजारी मोलकरणीला जेव्हा एखादी मालकीण "तू चार दिवस विश्रांती घे; मी भांडी घासीन", असे सांगताना मला आढळते, तेव्हा गोपद्मासारखी क्रांतीची पावले तिच्या दारी उमटलेली मला दिसतात'

पुलंच्या या विवेकवादाला विज्ञानवादाची जोड होती. 'पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलऱ्याने मारत होती. ते मरण लाखो लोकांनी केलेल्या नामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलऱ्याची लस शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकाने.' असे ठणकावून सांगताना पुलंचा विज्ञानवाद झळाळतो. हाच विज्ञानवादी आपली विचारांची बैठक पुढील वाक्यातून दर्शवतो. पुल लिहतात, 'आपल्या देशात इतके संत जन्माला येण्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा ऍनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणार संशोधक हा अधिक महत्वाचा वाटतो.'

सौंदर्योपासकता हा पुलंचा एक विशेष गुण होता. अतुलनीय निरीक्षणशक्तीतून जाणवलेले सौंदर्य दुसऱ्याला पोचवणे ह्याला त्यांनी आपले कर्तव्य मानले. हे सौंदर्य वसंताच्या गाण्यात त्यांना जसे दिसले तसेच रावसाहेबांच्या शिव्यांत दिसले. एका झाडावर येणाऱ्या पोपटांच्या थव्यात ते होते आणि चिवड्यातल्या शेंगदाण्यातसुद्धा. आगाऊ नामूमध्ये त्यांनी सौंदर्य पहिले आणि चौकोनी कुटुंबातसुद्धा. सौंदर्य द्राक्ष संस्कृतीतसुद्धा आहे आणि रुद्राक्ष संस्कृतीतसुद्धा आहे हे आग्रहाने सांगताना देशप्रेमाच्या चुकीच्या कल्पनांचा स्पर्शसुद्धा होऊ दिला नाही. चॅप्लिन जेवढा प्रिय तेवढाच शंकर घाणेकर. फ्लोरेन्समधील चित्रकार प्रिय आणि शर्वरीरॉय चौधरीसुद्धा. चितळे मास्तर प्रिय आणि जपानी प्राध्यपक तनाष्कासुद्धा. हॅम्लेटमध्ये सौंदर्य आहे आणि सौभद्रमध्येसुद्धा. वुडहाऊस जितका प्रिय तितक्याच इरावतीबाई प्रिय. शेक्सपिअर प्रिय आणि गदिमासुद्धा. रसेल मुखोद्गत आणि उपनिषदांचासुद्धा अभ्यास. एकाच सौंदर्यापायी! सौंदर्य टिपताना पुलंनी सौंदर्य हा एकच निकष मानला आणि म्हणूनच पुलंची व्यक्तिचित्रेसुद्धा व्यक्तित्वचित्र जास्त आहेत. आपले पूर्वग्रह, संस्कार आणि सामाजिक परिस्थितीच्या आहारी न जाता नीरक्षीरविवेकबुद्धीने सौंदर्य टिपणे फार कठीण असते. भल्याभल्यांना हे जमत नाही पण पुलंचा सौंदर्यग्राहक आणि सौंदर्यआग्रहक विचार हा सर्व अनिष्टांवर मात करून दशांगुळे पुढेच होता.

सवाई गंधर्वांचे 'तू है मोहम्मद सा दरबार' आणि अब्दुल करीम खां साहेबांचे 'गोपाला मेरी करुना' ऐकताना बाकी कुठल्याही बाबींचा विचार सुद्धा मनात येणे त्यांनी पाप मानले. रामदास, ज्ञानेश्वर आणि तुकारामाचे दाखले देताना तसेच भगवद्गीतेतील वचने उद्धृत करताना त्यांनी आपला निरीश्वरवाद कधी मध्ये येऊ दिला नाही. निरीश्वरवादी असूनसुद्धा मला गजाननाची मूर्ती आवडते असे लिहताना किंवा कोलंबोतल्या बुद्धासमोर नतमस्तक होताना सौंदर्याची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती हाच भाव. पंढरीच्या वारकऱ्यांच्या डोळ्यात त्यांना जे सौंदर्य दिसले तेच आनंदवनातल्या बोटे झडलेल्या माणसात. त्यामागील विचारांची चिकीत्सा किंवा खिल्ली उडवण्यापेक्षा त्यामागील सौंदर्य हुडकून ते दाखवण्यात पुलंच्या विचारांची जातकुळी दिसते. ह्याचा अर्थ पुलंनी बोटचेपेपणा किंवा लाळघोटेपणा केला असा मुळीच नाही. पुरस्कार स्वीकारताना त्यामागील दंडेलीशाहीचे वास्तव जगासमोर आणण्यास ते कुचरले नाहीत की आणिबाणीविरुद्ध आगपाखड करताना मागेपुढे पाहिले नाही. सेन्सॉरशिपची अपरिहार्यता सांगतानासुद्धा पुल म्हणाले होते की, 'प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची सेन्सॉरशिप आहे. एका गोष्टीला मात्र माझा विरोध आहे. सत्तेचा जो पक्ष असेल त्याचे तत्त्वज्ञानच सांगण्याची परवानगी आणि इतर तत्वज्ञाने सांगण्याची परवानगी नाही, अस जर सेन्सॉरशिप असेल तर ते मात्र लेखकाने फोडून काढले पाहिजे असे माझे मत आहे. कुठल्याही एका विशिष्ठ तत्वज्ञानाचा आग्रह धरणारे सरकार हे मी कधीही मान्य करणार नाही. हे म्हणजे माणसाला गुदमरून टाकण्यासारखे आहे. मला ज्याप्रमाणे लिहण्याचे स्वातंत्र्य पाहिजे तसेच न लिहण्याचे स्वातंत्र्यसुद्धा पाहिजे.' जेव्हा अनिष्ट गोष्टी समजत घडत होत्या तेव्हा त्यांचा समाचार घेण्यास ते चुकले नाही आणि वेळीप्रसंगी आपली सर्व सांस्कृतिक ताकद पणाला लावून हा विचारवंत त्या त्या गोष्टीतील सौंदर्य दाखवण्यास पुढाकार घेता झाला. मर्ढेकरांच्या कवितेंच्यामागे पुल उभे राहिले. आंनंदवनातल्या आनंदमेळा यशस्वी होण्यासाठी पुल उभे होते. बालगंधर्व आणि बालगंधर्व रंगमंदिरामागे पुल उभे होते. मराठी विज्ञान परिषद, NCPA, टिळक मंदिर, मुक्तांगण अशी किती नावे घ्यावीत! विविध ठिकाणी सौंदर्याचा साक्षात्कार होत असताना त्याबरोबरील विसंवादी बाबींची दखल घेण्यास पुलंनी कधी दिरंगाई केली नाही. संगीतातली अप्रतिम जाण असल्याने वादी-संवादी सुरांना बरोबर घेऊनच जायचे असते हे त्यांना पक्के माहित होते. आजच्या एका सापेक्षी दुर्गुणाबरोबर माणसाचे अस्तित्वच नाकारणाऱ्या जगात ह्या विचारांचे मोल फार आहे. मदर तेरेसांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या संततिनियमनाच्या भूमिकेवर टीका ते करू शकले. विष्णु दिगंबराच्या आणि भातखंड्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यातील उणिवा त्यांनी नजरेस आणल्या. आदरणीय विनोबांवर आमीत्यतेने लिहले पण त्यांच्या 'अनुशासन पर्व' ह्या उद्गाराचा समाचार घेतला. स्वतःचे श्रद्धास्थान असलेल्या बालगंधर्वांच्या उतारवयातील नाट्यप्रवेशांवरसुद्धा त्यांनी टीका केली. अशा वेळी त्या त्या प्रसंगावर भाष्य करणे जरुरी असते पण त्यासाठी त्या व्यक्तीचा आणि कार्याचा अनादर न होऊ देणे ह्याला एक वैचारिक अधिष्ठान लागते. विचारांचा सामना विचारांनी करावा त्यासाठी लाठी घेऊन धावण्याची किंवा चिखलफेक करण्याची गरज नसते हे पुलंनी सप्रमाण दाखवून दिले. या विचारांपायी हा सौंदर्यउपासक गांधींवर लिहू शकत होता आणि सावरकरांवर भाषण करू शकत होता. नाथ पै, अत्रे, SM, लोहिया, नानासाहेब गोरे, साने गुरुजी, सेनापती बापट अशा विविध विचारधारेच्या व्यक्तींवर भाष्य करताना त्यांच्यामागील सौंदर्यतेचा साक्षात्कार पुल सशक्तपणे दाखवून देतात. 'जो जो जयाचा घेतला गुण' हाच भाव.

ह्या सौंदर्यउपासकाच्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग आले की आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थानाचा विचार करून एखादा मूग गिळून गप्प बसला असता पण पुल बाह्य सरसावून पुढे झाले. ह्यामागे त्या सौंदर्याचा मला जो साक्षात्कार झाला तो तुम्हालाही व्हावा हा उद्दात हेतू होता. लंडनच्या आजीबाईंसमोर गणपतीची आरती म्हणणे असो की वस्त्रहरण नाटकाची स्तुती करणे असो. तमाशापरिषदेचे अध्यक्षपद असो की कोसलाची स्तुती असो. 'शाहिरी लावण्या आणि बिलोरी बांगड्या' असणाऱ्या मराठीवर पुलंनी निरतिशय प्रेम केले पण म्हणून दुसऱ्या भाषांचा किंवा बोलीभाषांचा दुस्वास नाही केला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातल्या भाषणात पुल म्हणतात, "जगातल्या प्रत्येक प्रकारच्या ज्ञानाची किंवा साहित्यातली प्रत्येक गोष्ट सर्वांच्या तोंडी असलेल्या भाषेत यावी असा दुराग्रह मी करत नाही. मला इंग्रजी कळतं म्हणून इंग्रजीत लिहलेला आईन्स्टाईनचा सिद्धांत कळतो किंवा सर्व शब्द कळत असूनही मराठी कविता कळते असे नाही. पण शब्दांच्या बाबतीत तो शब्द संस्कृतमधील असला, तर तो अधिक सभ्य आणि त्या जागी मराठीतला रूढ शब्द असला, तरी तो गावरान म्हणून काढून टाकण्याचा जो प्रकार आहे तो मला समजू शकत नाही". बोलीभाषेचा आदर करताना पुलंनी कोंकणी हि स्वतंत्र भाषा नाही हे ठासून सांगितले. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यातील बलस्थाने तसेच मर्यादा दाखवताना त्यातील सौंदर्य महत्वाचे असते हे सहज दाखवले. प्रमाण भाषा आणि बोली भाषा दोन्ही महत्वाच्या पण त्या दोहोंच्या मर्यादासुद्धा लक्षात घेणे महत्वाचे. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या गोष्टीची मर्यादा असल्याने त्याचे सौंदर्यमूल्य कमी होत नाही हे पुलंना उमगले होते आणि ते आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न त्यांनी मनापासून केला. रूढी-परंपरा-नियम ह्या बाबी पुलंनी सौंदर्याच्या साक्षात्कारापुढे गौण मानल्या. म्हणूनच कुमारांनी जेव्हा भूप रागात शुद्ध मध्यम लावला, किंवा पहाटे मारवा गायला, अथवा बालगंधर्वांनी बिहागाला कोमल निषाद लावला म्हणून अब्रह्मण्यम मानले नाही. हे सर्व करताना एखादा नकारात्मक सूर लागणे साहजिक असते पण हा स्वर पुलंनी शिताफीने टाळला. पुलंच्या प्रत्येक आविष्कारात एक आशावादी सूर असतो. विसंवादी सूर दाखवतानासुद्धा विरोधासाठी विरोध हा पुलंनी कधीच केला नाही. जी वृद्ध पिढी असते तिचे हल्लीच्या पिढीबद्दल तक्रार करणे हे वार्धक्याचेच लक्षण आहे असे म्हणणाऱ्या पुलंनी तरुणाईचे आणि नावीन्याचे स्वागतच केले. दीनानाथांचे कौतुक तसेच भीमसेनचे आणि तसेच अश्विनी भिडे-देशपांडेचेपण. केशवराव दात्यांचे कौतुक तसेच विजया मेहतांचे आणि तसेच अतुल परचुरेचेसुद्धा. जुने जरी उगाळत बसले नसले तरी जुने जाऊ द्या मरणालागुनी असे सुद्धा म्हटले नाही. एखाद्या कलेची किंवा असामीची कालनिरपेक्ष आनंद देण्याची शक्ती पुल जाणून होते

हे सौंदर्य हुडुकुन काढताना आणि तो दर्शविताना पुलंचा सर्वसामावेशकपणा सौंदर्याची खोली दर्शवतो. पॅरिस बद्दल पुल लिहतात, 'पॅरिस म्हणजे केवळ 'त्या रम्य रात्री' नव्हेत. केवळ ती निशामंडळे नव्हेत.- इथे लोकशाहीचे पहिले उष:सूक्त गायिले गेले. इथे एका झोलासारख्या साहित्यिकाने आपली लेखणी अन्यायाविरुद्ध तलवारीसारखी उगारली. इथे सोरबॉ विद्यापीठात उन्मत्त यौवन ग्रंथसंग्रहालयात नतमस्तक होऊन तासच्या तास समाधिस्थ झालेले दिसते आणि इथेच प्रस्तूसारख्या लेखकाने जीवनातला क्षण न क्षण पिंजण्याचा विराट प्रयत्न केला. आजही 'सारा बर्नहार्ट' थिएटरात मोलिअर लोकांना हसवतो आहे. ह्या शहराच्या अंतःकरणात दाटलेल्या सीन नदीने जे पाहिले ते जगातल्या फार थोड्या नद्यांनी पहिले असतील.'

पुलंवरच्या अनेक लेखांत त्यांना आनंदयात्री असे संबोधले आहे. हे अतिशय चपखल वर्णन आहे. त्यांच्या प्रत्येक लेखात, भाषणात, नाटकात, चित्रपटात, आणि आविष्कारात ह्या आनंददायी विचारांची पखरण सहज जाणवून येते. अगदी हुक्क्याचे झुरके घेणाऱ्या काकाजींपासून अमीनाचे गाणे ऐकणाऱ्या भैया नागपूरकरापर्यंत. दिनेशच्या बोबड्या बोलांत जसा आनंद आहे तसाच तर्कतीर्थांच्या ज्ञानोपासनेत आहे. आनंद घेणे आणि आनंद वाटणे ह्या विचारांवर पुलंनी निरतिशय प्रेम केले. जेथे जेथे हा आनंदाचा झरा त्यांना जाणवला तेथे तेथे ते समरसून गेले आणि हा आनंद आपल्या सर्वांपर्यंत पोचवायला कष्ट उपसले. आपण आनंदात असताना कुणाला तरी आनंदाची गरज आहे, हे लक्षात ठेवणं हेच पुलंनी माणुसकीचे लक्षण मानले. ह्या आनंदरंगात बाकी कुठल्याच मानवनिर्मित बंधने गौण ठरतात हे पुलंनी वारंवार दाखवून दिले. ह्या आनंदसागरात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्यांचे ऋण पुलंनी मानले आणि यथोचित कृतज्ञता व्यक्त केली. मग देवधर मास्तरांच्या भाषणात त्यांच्या पत्नीला वंदन करणे असो की कुरुंदकरांवरील पुस्तकाविषयी बोलताना ग्रंथ छपाईबद्दल तारिफदारी असो. अगदी केसरबाईंच्या गाण्याचे कौतुक करतानासुद्धा श्रीपाद नागशेकरच्या तबल्याचा उल्लेख येतोच. शेवटी विंदांनी पुलंना एका पत्रात म्हटलेच आहे की 'आनंद घेत घेत आनंद देणे आणि आनंद देता देता आनंद घेणे हे तुझ्या सगळ्या लिखाणाचे, कार्यक्रमाचे आणि आयुष्याचेच प्रधान सूत्र आहे.'

तळटीप - या लेखातील पुलंचा उल्लेख पुल आणि सुनीताबाई असा नाही वाचला तरी चालेल. सुनीताबाई हे एक स्वतंत्र विचारांचे सहृदय व्यक्तिमत्व होते. त्या एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहेत.

ता. क. - अक्षरास हसू नये.

'ह्या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायचीय' ह्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत,

-पिनाकीन गोडसे

पूर्वप्रसिद्धी- हितगुज २०२१ (दिवाळी अंक- महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया)

Monday, November 8, 2021

‘पुलं’चं साहित्य ‘टाइमलेस’ - आदित्य सरपोतदार

महाराष्ट्राच्या मातीतला कोणताही कलाकार पु. ल. देशपांडेंबद्दल विचारलं तर अगदी भरभरूनच बोलेल. आजच्या पिढीचे कलाकारही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने आजच्या पिढीच्या काही निवडक कलावंतांकडून त्यांच्या ‘पुलं’बद्दलच्या भावना जाणून घेतल्या. त्यातील पहिला लेख आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा. ‘पुलं’चं साहित्य टाइमलेस असल्याची भावना आणि ‘पुलं’च्या ‘पुढचं पाऊल’ चित्रपटावर काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

‘पुलं’ची नाटकं, सिनेमे, साहित्य मी लहानपणापासूनच पाहिलं, वाचलं. माझ्याकडे सुरुवातीपासूनच ‘निवडक पुलं’च्या कॅसेट्स होत्या. त्या मी नेहमीच ऐकल्या. आता त्या ‘सीडी’च्या माध्यमात आहेत. त्यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली,’ ‘बटाट्याची चाळ,’ ‘असा मी असामी,’ ‘वाऱ्यावरची वरात’ हे सगळंच ‘ग्रेट’ आहे. विशेषतः
त्यांचा विनोद जास्त भावतो. त्यांच्या साहित्यात आपली वाटणारी पात्रं आणि आपला वाटणारा विनोद खूप होता. ते लोकांना जास्त जवळचं वाटायचं.

आदित्य सरपोतदार, दिग्दर्शक‘पुलं’च्या लेखणीतून आलेली नाटकं अजरामर आहेत. त्या काळात फार लहान असल्याने ती प्रत्यक्ष पाहण्याचा योग कधी आला नाही. परंतु नंतर केलेलं त्याचं सादरीकरण जरूर पाहिलं. मुळात ‘पुलं’ हे कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही पिढीला भावणारे असेच आहेत. कारण त्यांचा विनोद अगदी साधा, सरळ, सोपा असायचा आणि त्यातून त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही खास आहे. इतकंच नाही, तर प्रत्येक साहित्यातली ‘पुलं’ची पात्रंही खूप इंटरेस्टिंग आहेत.

पु. ल. देशपांडे‘पुलं’ म्हणजे अशी एक व्यक्ती जी एकाच वेळी दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि विविधरंगी भूमिका साकारणारा चांगला नट अशा सगळ्याचं मिश्रण आहे. हे सगळं एका व्यक्तीच्या अंगी असणं म्हणजे खरंच कलेचं एक खूप मोठं वरदानच आहे. जगात अशी फार कमी लोकं सापडतील, जे सगळंच इतक्या उत्तम पद्धतीनं करतात. ‘देवबाप्पा’, ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटांमधून भेटणारे ‘पुलं’ खरंच खूप वेगळे आहेत. वेगळे भासतात. नवीन पिढीला त्यांची ही ओळख होणं गरजेचं आहे, ती करून दिली गेली पाहिजे असं वाटतं. पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव असे अनेक मोठमोठे पुरस्कार मिळवलेले ‘पुलं’ हे मराठी सृष्टीतले एकमेव असले पाहिजेत. ते खरंच ते ग्रेट होते. त्यांना किंवा त्यांची निर्मिती पाहणाऱ्या आजच्या पिढीतल्या प्रत्येकालाही एक वेगळीच प्रेरणा मिळते. आपणही असं काहीतरी करावं, असं मनोमन वाटतं.

‘पुलं’च्या बाबतीत घडलेली एक चांगली गोष्ट अशी, की त्यांच्या कामाचं ‘अर्काइव्हल’ बऱ्यापैकी केलं गेलं आहे. नाटकं सगळी झाली नाहीत, ती करणं अवघडही होतं; पण त्यांचे बरेचसे चित्रपट अजूनही महोत्सवांमध्ये दाखवले जातात. असं असलं तरी हे सगळं नवीन पिढीच्या सतत समोर येत राहिलं पाहिजे. ते आजवर येत राहिलं आहे आणि पुढेही येत राहील, असं मला वाटतं. प्रत्येक पिढीतला कोणीतरी ‘पुलं’बद्दल अगदी मनापासून काही तरी करत असतो.

‘पुलं’च्या लिखाणाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांच्या संपूर्ण लिखाणाचा बाज वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो बाज समजून घेऊन त्यावर कलाकृती निर्माण करणं गरजेचं आहे. त्यात थोडंसं जरी चुकलं, तर ते मग ‘पुलं’ राहत नाहीत. त्यांच्या साहित्यावर नवीन काही निर्माण करत असताना हा एक थोडासा धोका असतो.

'गुळाचा गणपती' चित्रपटात एका दृश्यातील 'पुलं'बहुतेक जणांना ‘पुलं’च्या नाटकांबद्दल जास्त वाटतं. का कोणास ठाऊक, मला मात्र त्यांच्या नाटकांपेक्षाही त्यांचे सिनेमे खूप आवडले. त्यांचे काही सिनेमे म्हणजे अगदी साधे, सरळ असे आणि सामान्य माणसाची कथा सांगणारे होते. त्यांचा कोणताही चित्रपट घेतला, तरी त्यात एका ठराविक मर्यादेपर्यंत विनोद आहे आणि एक सामाजिक संदेशही आहे. अशा त्यांच्या कोणत्याही एका सिनेमावर काम करायला मला आवडेल. तसं कामच करायचं, तर त्यांचा कोणताही एक सिनेमा निवडणं हे नक्कीच अवघड आहे. त्यांचं हे एक काम चांगलं आहे, असं म्हणणं खरंच अवघड आहे. त्यांनी अगदी निखळतेनं आणि निरागसतेनं केलेलं कोणतंही काम घ्या, ते काम बघण्याजोगं आहे आणि करण्याजोगंही आहे.

'पुढचं पाऊल' चित्रपटातील एक दृश्यत्यातल्या त्यात ‘पुलं’च्या कोणत्या साहित्यावर काम करायला आवडेल, असं मला विचारलंत, तर मी त्यांचं ‘पुढचं पाऊल’ हा चित्रपट निवडेन. या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद या दोन बाजू भन्नाट आहेत. हा एक खूप वेगळ्या धाटणीचा सिनेमा वाटतो. ‘चिमणराव गुंड्याभाऊ’मध्येही ते भावतात. अगदी शेवटपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत ते चित्रपटासाठी काम करत होते. त्यामुळे ‘देवबाप्पा’, ‘दूधभात’, ‘मोठी माणसं’, ‘मानाचं पान’ असे त्यांचे सगळेच सिनेमे कलाकृती म्हणून अप्रतिम आहेत.

‘पुलं’च्या बाबतीत अगदी खूप कमी लोकांना ठाऊक असलेली एक बाब म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना बरंचसं सामाजिक कार्यही केलं आहे. ‘मुक्तांगण’सारख्या अनेक संस्थांशी ते जोडलेले होते. याची नोंद फारशी घेतली जात नाही असं वाटतं. ती ही घेतली गेली पाहिजे. ‘पुलं’ म्हणजे संपूर्ण पुलं पाहिले गेले पाहिजेत असं वाटतं. ‘फिल्म अर्काइव्ह्ज’ला आजही ‘पुलं’चे चित्रपट उपलब्ध आहेत आणि ते कृष्णधवल स्वरूपात आहेत. त्यांनी अशा चित्रपटांचे खास महोत्सव आयोजित केले पाहिजेत, जेणेकरून ते आजच्या पिढीसमोर येतील. त्यासाठी मीही अनेकदा त्यांच्याशी बोलून याबाबत प्रयत्न केले आहेत.

आजही मी प्रवासात असताना गाडीत ‘निवडक पुलं’ ऐकत असतो. त्यात मग सखाराम गटणे असो किंवा ‘पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर’ असो किंवा मग आणखी काही... ते सगळंच मजेशीर आहे आणि हे खरं तर ‘टाइमलेस’ आहे असं मला वाटतं. ‘पुलं’ना तुम्ही कोणत्याही एका काळात थांबवू किंवा अडकवू शकत नाही. ‘पुलं’च्या साहित्यातलं काहीही घेतलं तरी ते आजच्या पिढीला चालणारं आणि कोणत्याही पिढीला आपलंसं वाटेल असंच आहे. ते साहित्य कोणत्याही एका काळात अडकणारं असं नाही. माणसाची वृत्ती कधीच बदलत नाही आणि ‘पुलं’चं साहित्य असंच प्रत्येक माणसाच्या वृत्तीशी खेळणारं आहे. त्यामुळे ते आजही आपलंसं वाटतं. केवळ आजच असं नाही, तर पुढच्या दहा पिढ्यांतही जे कोणी ते वाचेल, त्यालाही ते तेव्हाचंच वाटेल. असं ‘टाइमलेस’ असणं हेच ‘पुलं’च्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे.

- आदित्य सरपोतदार
मूळ स्रोत -> https://www.bytesofindia.com/P/IZVOBI
(शब्दांकन : मानसी मगरे)

Saturday, November 6, 2021

माझे जीवनगाणे - डॉ. प्रतिमा जगताप

सात नोव्हेंबर हा पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन, तर आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन. याचं औचित्य साधून ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘माझे जीवनगाणे’ या मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या, अभिषेकीबुवांनी गायलेल्या आणि ‘पुलं’नी संगीत दिलेल्या गाण्याबद्दल...

‘माझे जीवनगाणे’ हे गाणं ऐकतांना गाण्यातल्या पहिल्या तीन शब्दांबरोबर एकाच वेळी अभिषेकीबुवा, पु. ल. देशपांडे आणि मंगेश पाडगावकर या तीन महान व्यक्तींचं स्मरण होतं. एखादं गाणं असं जन्मत:च रत्नजडित स्वरमुकुट लेवून येतं. अनमोलत्वाचं बिरुद घेऊनच जन्माला येतं. तसंच या गाण्याचं झालं असं वाटतं... गाणं सुरू झाल्याबरोबर रसिकमनात आनंदलहरी उमटू लागतात. आपलं अवघं भावजीवन व्यापून टाकणारे मंगेश पाडगावकरांचे शब्द, अभिषेकीबुवांचे स्पष्ट उच्चार आणि लयकारीनं नटलेली गायकी आणि ‘पुलं’चं हवंहवंसं, रसिकांना आपलंसं करणारं, नव्हे पुलकित करणारं संगीत म्हणजेच ‘माझे जीवनगाणे’ हे गीत. रसिकहो हे लिहिता लिहिताच गाणं कानामनात सुरू झालंय...

माझे जीवनगाणे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा ना दिसू दे
गात पुढे मज जाणे... माझे जीवनगाणे...

कुणाचं आहे हे स्वगत? कवी पाडगावकरांचं, बुवांचं की ‘पुलं’चं ? आत्ता या क्षणी वाटतंय, की तिघांचंही... पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन. उद्या म्हणजे आठ नोव्हेंबरला ‘पुलं’चा जन्मदिन... या दिग्गजांच्या स्मरणयात्रेत कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या शब्दांची पालखी मन:चक्षूंपुढे झुलत चाललीय. खरंच हे गाणं ऐकणं म्हणजे एक अलौकिक अनुभव! शब्दांचा, स्वरांचा आणि गायनाचा... हा त्रिवेणी संगम आकाशवाणीतच व्हावा हा किती सुंदर योगायोग. ‘पुलं’ आकाशवाणीतच नाट्यनिर्माते होते, पाडगावकरही आकाशवाणीत कार्यरत होते आणि अभिषेकीबुवांनीही एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांनीही जवळजवळ साडेनऊ वर्षं आकाशवाणीत काम केलं होतं. ‘रेडिओत नसतो, तर असं चौफेर मी काहीच करू शकलो नसतो. नाटक, संगीत, दिग्दर्शन, स्वररचना या सगळ्या गोष्टी मी रेडिओमुळे मी करू शकलो,’ असं त्यांनी म्हटलं होतं. अभिषेकीबुवा १९४२च्या सुमारास पुण्यात आले. ‘गाणं हेच आपलं जगणं’ हाच ध्यास घेऊन बुवा मार्गक्रमण करत राहिले. अभिषेकीबुवांबद्दल ‘पुलं’ म्हणायचे, की दत्तगुरूंसारखे २१ गुरू त्यांनी केले. अभिषेकीबुवांनी विविध घराण्यांचा अभ्यास केला. मिंड, मुरकी, तान अशा प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला, प्रचंड मेहनत आणि रियाजानं कमावलेला आवाज ही बुवांची वैशिष्ट्यं. या सर्व वैशिष्ट्यांनिशी बुवांचं गाणं बहरत गेलं.

कधी ऐकतो गीत झऱ्यातून
वंशवनाच्या कधी मनातून
कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून
झुळझुळतात तराणे... माझे जीवनगाणे...

‘पुलं’ नाट्यनिर्माते म्हणून आकाशवाणीत असताना त्यांनी ‘भिल्लण’ ही संगीतिका केली होती. मंगेश पाडगावकरांचं काव्य, ‘पुलं’चं संगीत, मुख्य गायक पं. जितेंद्र अभिषेकी, विदुषी किशोरी आमोणकरही होत्या. आकाशवाणीवरून ही संगीतिका प्रसारित झाली होती, तेव्हा रसिक श्रोत्यांना श्रवणसुखाची पर्वणी अनुभवायला मिळाली असेल! आसमंतात ध्वनिलहरींऐवजी आनंदलहरी प्रसारित झाल्या असतील. ही संगीतिका प्रसारित होणार होती, तेव्हा बुवांनी आपल्या आईला, बहिणीला मोठ्या अभिमानानं सांगितलं होतं, ‘आज रात्री साडेआठ वाजता रेडिओ ऐका. तुम्हाला कळेल, की मी कोणत्या कामात गुंतलो होतो.’ रेडिओवर संगीतिका प्रसारित झाली आणि त्या संगीतिकेतील गाण्यांच्या आनंदलहरींवर आजतागायत मराठी मनं पुलकित होताहेत.

‘पुलं’ नेहमी म्हणायचे, की माझं पहिलं प्रेम संगीत! आणि मग साहित्य... बालगंधर्वांचं गाणं बालपणी कानावर पडलं आणि चांगल्या गाण्याचा बालमनावर झालेला संस्कार कधीही पुसला गेला नाही. गवई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही; पण उत्तम संगीतकार म्हणून ‘पुलं’ची ओळख अवघ्या संगीतविश्वाला झाली. ‘मी गाणं शिकतो’ या ‘पुलं’च्या एका लेखात त्यांच्या गाणं शिकण्याच्या धमाल गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मुंबईला गेल्यावर पांडुबुवांकडच्या गायनाच्या क्लासच्या गमती वाचून आपली हसून हसून पुरेवाट होते. पांडुबुवा सगळ्यांना ‘देवराया’ म्हणायचे. हे सांगून ‘पुलं’नी गाण्याच्या क्लासमधल्या गंमती सांगताना त्यांच्यातला एक मजेदार संवाद लिहिलाय.

‘आवाज आणि आवाजी यात फरक कोणता?’ मी तसा चेंगट आहे.
‘तसा फरक नसतो देवराया.’
‘पण मग आवाज केव्हा म्हणायचा न् आवाजी केव्हा म्हणायचं ?’
‘हे पहा, एखाद्या बाईला बाई केव्हा म्हणायचं न् बया केव्हा म्हणायचं, याचा काही कायदा आहे का? पोराला पोरगंही म्हणतात, कार्टंही म्हणतात. आमचंच बघा ना, गायन क्लासला कधी आम्ही कलेची सेवा म्हणतो, तर कधी पोट जाळण्याचा धंदा म्हणतो. आता ‘सा’ लावा देवराया.’
‘का हो बुवा, ‘सा’ला ‘सा’ का म्हणतात?’
‘देवराया, आता आपलं डोकं...’
‘काय?’
‘नाही, उदाहरणार्थ... आपलं डोकं..’
‘माझं डोकं, त्याचं काय?’
‘आपल्या डोक्याला काय म्हणतात?’
‘डोकं’
‘डोकं, खोकं का नाही म्हणत? तसंच ‘सा’ला ‘बा’ म्हणून कसं चालेल ?’
आणि मग मी ‘सा’ लावला.

‘पुलं’च्या गळ्यातल्या ‘सा’ऐवजी पेटीवरचा ‘सा’ मात्र फुलत गेला. त्या ‘सा’ने त्यांची आयुष्यभर संगत केली. संगीतातला ‘सा’ आणि साहित्यातला ‘सा’ त्यांचं जीवनगाणं बनून राहिले. पार्ल्यातल्या अजमल रोडवरच्या त्रिंबक सदनात २२ रुपयांना विकत घेतलेली पेटी ‘पुलं’ना खूप प्रिय होती. पुलं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नुसत्या नावानं मराठी मन हरखून जातं. तुसड्या, माणूसघाण्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटवणारं नाव म्हणजे ‘पुलं’! जिवंतपणी दंतकथा होण्याचं भाग्य लाभलेलं नाव म्हणजे ‘पुलं’! संगीतकलेबद्दल विलक्षण प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असणाऱ्या ‘पुलं’नी संगीताविषयी भरभरून लिहिलंय. आपल्या भाषणांमधून सांगितलंय. भावगीत गायनाबद्दल अतिशय तळमळीनं त्यांनी लिहिलंय, ‘भावगीत गायन हा संगीत प्रकार टिकावा, असं गायकांना वाटत असेल, तर अभिजात संगीताचा अभ्यास अपरिहार्य आहे. त्याशिवाय लयीची आणि स्वरांची मूल्यं समजणं अशक्यच आहे.’

पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन आणि उद्या ‘पुलं’चा जन्मदिन साजरा करताना कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आणि या दोन दिग्गजांच्या संगीतकलेनं मोहरलेली कविता गुणगुणत राहू या...

गा विहगांनो माझ्या संगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्या परी माझ्याही सुरातून
उसळे प्रेम दिवाणे... माझे जीवनगाणे...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४
(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदराचे पुस्तक आणि ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
https://www.bookganga.com/R/7W56G

मूळ स्रोत --> https://www.bytesofindia.com/

Saturday, October 30, 2021

चित्रपटातले पु.ल. - सतीश जकातदार

पु. ल. म्हणत असत की, 'मी चित्रपटात ! होतो त्यापेक्षा मी चित्रपटात नव्हतो, हेच अधिक महत्त्वाचे!'

पु. ल. देशपांडे यांनी १९४७ साली 'कुबेर' या चित्रपटातून मराठी चित्रसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. त्यावेळी देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. 'प्रभात' काळाचा अस्त झाला होता. युद्धोत्तर मराठी सिनेमाची पायाभरणी करत मराठी सिनेमा आकाराला येत होता. मध्यमवर्गासह कामगारवर्गही मराठी सिनेमाकडे आकर्षित होत होता. व्ही. शांताराम यांच्या 'लोकशाहीर रामजोशी' आणि 'जय मल्हार' सारख्या ग्रामीण-तमाशापटांना लोकाश्रय मिळत होता. राजा परांजपे, दत्ता धर्माधिकारी व अनंत माने हे आस्ते कदम आपला प्रभाव मराठी चित्रपटावर उमटवत होते.

बालगंधर्वांचा काळ ओसरला होता. तरीही त्यांच्या संगीताची मोहिनी रसिकांवर होती. मराठी रंगभूमी कात टाकून नवतेची कास धरली होती. पु. लं. याच काळात रंगभूमीवर कार्यरत होते. 'फर्गसन'मध्ये मराठी घेऊन बी.ए. करत असतांनाच त्यांनी धाडस करून चिंतामणराव कोल्हटकरांच्या 'ललितकला कुंज' या व्यावसायिक नाटक कंपनीत प्रवेश केला. तिथेच राम गणेश गडकरींच्या 'भावबंधन' व 'राजसंन्यास' या नाटकात ते चमकले. गडकरींच्या विनोदाची संथा त्यांना तिथे मिळाली. याच काळात त्यांनी मो. ग. रांगणेकरांच्या या 'नाट्यनिकेतन' या नवोन्मेषशाली नाटक कंपनीत प्रवेश मिळवला. तिथेही त्यांनी 'वहिनी' नाटकातील वल्लभच्या छोट्याशा भूमिकेनं लक्ष वेधून घेतलं.

नाटयनिकेतनच्या रांगणेकरांनी 'कुबेर' चित्रपटाची निर्मिती केली. त्यात पु. लं. नी नायिकेच्या भावाची भूमिका केली. धनाढ्य कुटुंबातील गाण्या-बजावण्यात रमलेल्या लाडावलेल्या तरुणाची ती भूमिका होती. या भूमिकेत त्यांना 'जा जा गं सखी...' हे गाणं म्हणण्याची संधीही मिळाली. या चित्रपटापासून पु. लं. चा चित्रपटप्रवास सुरू झाला. 'कुबेर' पाठोपाठ 'भाग्यरेखा' मध्ये नायिकेच्या भावाची भूमिका त्यांनी केली. इथे मात्र शांता आपटे नायिका होती.

"कुबेर' चे चित्रीकरण 'प्रभात स्टुडिओ'त चालू होतं. या दरम्यानच त्यांना नायकाची भूमिका चालून आली ती पु. रा. भिडे यांच्या 'वंदे मातरम' या चित्रपटात. विशेष म्हणजे पु. लं. च्या पत्नी सुनीता देशपांडेच या चित्रपटाच्या नायिका होत्या. भिडे स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेले. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवरचे कथानक घेऊनच चित्रपट आकाराला आला होता. पुढे मराठीविश्वात अजरामर ठरलेल्या पु. ल. गदिमा व सुधीर फडके या त्रिकुटाचा हा पहिला चित्रपट. 'वेद मंत्राहून महान, वंद्य वंदे मातरम्' हे अजरामर गीत याच चित्रपटातील.

'वंदे मातरम' चे दिग्दर्शक होते राम गबाले. गबाले, गदिमा अशा मित्रमंडळीत गप्पाष्टकं चालत आणि त्यातूनच एखाद्या चित्रपटाचं बीज उमलत असे. या मित्रांच्या आग्रहाखातरच पु. लं. नी आपल्या बहुविध पैलूंचे दर्शन चित्रपटातून घडवलं. तो काळ या मित्रमंडळीच्या दृष्टीने मंतरलेला होता. कच्चा आराखडा गप्पांगप्पांतून आकाराला येत असे आणि त्यातूनच पु. लं. च्या प्रतिमेला पंख फुटत असत. त्यातूनच पु. लं. नी चित्रसृष्टीतील लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार व प्रमुख अभिनेता-दिग्दर्शक आदि शिखरं पादाक्रांत केली. राम गबाले या मित्राखातर त्यांनी सात-आठ चित्रपटांतून आपल्या विविध पैलूंचे दर्शन घडविलं. 'कुबेर', 'भाग्यरेखा' व 'वंदे मातरम' या तीन चित्रपटांसह पु. लं. नी अवघ्या सात वर्षात (१९४७ ते १९५४) २४ चित्रपट केले. त्यातील फक्त पाच चित्रपटात त्यांनी नायिकाची भूमिका केली. या सा-या भूमिका परस्परांपेक्षा भिन्न होत्या.

'वंदे मातरम' मध्ये स्वातंत्र्य चळवळीचा कार्यकर्ता म्हणून ते दिसले तर व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेवरील 'पुढचं पाऊल (१९५०)' या चित्रपटात किस्न्या ढोलकीवाल्याची भूमिका त्यांनी केली. राजा परांजपे दिग्दर्शित या चित्रपटात किस्न्या पाऊल (१९५०)' या चित्रपटात शहरात पैसे कमवून खेड्यात शेती फुलविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या ढोलकीवाल्याची भूमिका पु. लं. नी झोकात सादर केली. गदिमा, सुधीर फडके व पु. लं. या त्रिकुटाला आणखी एक चित्रपट 'जोहार मायबाप जोहार' हा संतपट होता. त्यात भाबड्या संतपणाला साजेशी संत चोखामेळ्याची भूमिका पु. लं. नी अपार समजुतीने केली. 'चष्मा काढला की पु. लं. अगदी संत दिसतो' अशी प्रतिक्रिया गदिमांनी दिली होती. हाच चित्रपट १९७१ मध्ये 'ही वाट पंढरीची' या नावाने पुनर्प्रदर्शित झाला होता.

रशियन नाटककार निकोलाय गोगॉल यांच्या 'द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर' या नाटकाचे पु. लं. नी 'अंमलदार' या नावाने स्वैररूपांतर केले होते. एका विलीन झालेल्या संस्थानात लाचलुचपत कशी चालते याचा खरपूस समाचार घेणारी ही कथा. सर्जेराव हा गुंड तरूण या संस्थानात येतो. लोक त्याला सरकारी अंमलदार समजतात आणि त्यातून जी धमाल उडते त्याची गोष्ट! याच नाटकावर आधारित 'अंमलदार' चित्रपटात पु. लं. नी नाटकाप्रमाणेच पु. सर्जेरावची भूमिका केली. सर्जेरावने केलेल्या अखेरच्या भाषणात नकलाकार म्हणून पु. लं. चे सारे गुण या भूमिकेत सामावले होते.

जेम्स थर्बरच्या 'द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिटी' या चित्रपटावरून स्फूरलेला 'गुळाचा गणपती' हा चित्रपट 'सबकुछ पु. ल.' असा होता. त्यात त्यांनी स्वप्नाळू व बावळट ध्यान असणाऱ्या हरकाम्या पोराचं सोंग हुबेहूब उभं केलं होतं. 'गळाचा गणपती हा त्यांचा अजरामर विनोदी चित्रपट विविध छटांच्या सादर केलेल्या त्यांच्या या "सबकुछ पु. ल.' असा होता. त्यात त्यांनी स्वप्नाळू व बावळट ध्यान असणाऱ्या हरकाम्या पोराचं सोंग हुबेहूब उभं 'केलं होतं. 'गुळाचा गणपती' हा त्यांचा अजरामर विनोदी चित्रपट. विविध छटांच्या सादर केलेल्या त्यांच्या या बहुविध भूमिकेत पु. लं. चे अभिनय कसब दिसले पण 'परफॉर्मर पु. लं.' च्या तुलनेत हे प्रमाण अल्पच होतं.

चित्रपटात त्यांना अभिनय क्षमतेपेक्षा त्यांच्या लेखन व सांगितिक क्षमतेला अधिक वाव मिळाला. चित्रपटाचे संगीतकार म्हणून त्यांनी सुमारे दहा चित्रपटांना संगीत दिले. पु. लं. नी चित्रपटासाठी एकूण ८८ गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. त्यातील निम्म्याहून अधिक आज उपलब्ध आहेत. संगीताबाबत सूक्ष्म नजर असणारे व उत्तम पेटीवादक असणारे पु. ल. चित्रपटात येण्याअगोदर सुगम संगीतात मुशाफिरी करत होते. त्यांची अनेक भावगीतं लोकप्रिय होती. बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांच्या संगीताचा संस्कार घेऊनच त्यांनी चित्रपटातून आपलं सांगितिक कसब दाखवलं. श्रीधर पार्सेरकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'जा जा गं सखी, मुकुंदा (कुबेर)' हे गाणं पेटीवर म्हणत त्यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं तर 'मोठी माणसं (१९४९)' या चित्रपटाच्या निमित्ताने 'संगीतकार' म्हणून स्वतःची नाममुद्रा उमटविण्यास प्रारंभ केला. 'मानाचं पान', 'देव पावला', 'दूध भात', 'देवबाप्पा' आणि 'गुळाचा गणपती' असे त्यांची संगीतकार म्हणून गाजलेले चित्रपट.

पु. लं. स्वतः उत्तम गायक व उत्कृष्ट पेटीवादक असल्याने चित्रपटातील प्रसंगांना अनुरूप अशा अवीट गोडीच्या चाली ते सहजगत्या लावीत असत. 'नवरा-बायको' चित्रपटातील विष्णूपंत जोगांनी हे गाणं तर त्याकाळी बेफाट लोकप्रिय आहे. ही कुणी छेडिली तार' किंवा 'करू देत श्रृंगार' अशी अवीट गोडीची गाणी पु. लं. नी रसिकांना बहाल केली. त्यांची गाणी खास मराठी ढंगाची होती. काही उडती व सहजपणे ओठांवर रेंगाळणारी होती तर काही रागदारी संगीताचा प्रभाव असलेली होती. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या 'दूध भात' मध्ये गायलेला 'तोडी’ तर 'अंमलदार' मधील 'पुरिया' तर 'गुळाचा गणपती' मधील 'ही कुणी छेडिली तार' मधील केदार ही उदाहरणे चटकन आठवतात.

'गुळाचा गणपती' मधील 'इंद्रायणी काठी... देवाची आळंदी' हे तर कृष्णरावांचा प्रभाव लख्खपणे दिसणारं भजन.. पं. भीमसेन जोशींनी तर या भजनाला आपल्या मैफिलीत 'भैरवी' चं स्थान दिलं. पु. लं. नी चित्रपटातील गीतांना .पु. लं. नी कधी स्त्रीगीतं-लोकगीतांचे रंग भरले तर कधी ग्रामीण टच दिला. तर कधीकधी 'इथेच टाका तंबू' सारख्या गीतात" अरबी सुरांची लकेर साधली. मराठी वातावरणातला सच्चा सूर सांभाळणारा आणि पूर्वसुरींच्या संस्काराची लय जपणाऱ्या संगीताची पु. लं. नी चित्रपटातून पेरणी केली. आणि म्हणूनच आजही त्यांची अनेक गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. संगीताइतकेच पु. लं. नी चित्रपटाच्या पटकथा व संवादलेखनात आपले कसब दाखवलं. सुमारे १७-१८ चित्रपटांसाठी त्यांनी कधी कथालेखन केलं. तर कधी पटकथा-संवादलेखन केलं. 'मी लेखक होतोच, मला पटकथा सहज समोर दिसायची, मग मी आपला छोट्या-छोट्या प्रसंगाची माळ रचत जायचों' असं म्हणत पु. लं. नी सहजपणे पटकथा लिहिल्या. पु. लं. ची भाषाशैली लवचिक असल्याने त्यांनी संवादलेखन प्रसंगाला साजेसे पण खुमासदार केले.

जागा भाड्याने देणे आहे (१९४९) या चित्रपटात प्रियकर-प्रेयसी एकांत मिळावा म्हणून हॉटेलात जातात, पण वेटर सारखा घुटमळत असतो; आणि 'साब, क्या लाऊँ 5' असे सारखे विचारतो. त्यावर 'दो ऑम्लेट लाव और थोडसा वेळ लाव' असे चलाख उत्तर देणाऱ्या संवादाला पु. लं. स्पर्श होता. संवादातील सहजपणा पु. लं. च्या चित्रपटातील संवादलेखनात डोकावत होता. अनेक चित्रपटात त्याची उदाहरणे सापडतील. संवादातील नाटकीपणाला पु. लं. नी छेद दिला. अगदी अलीकडच्या डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'एक होता विदूषक (१९९३)' मधील संवादलेखन पु. लं. च्या लिखाणातील लवचिकपणाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारे आहे. या चित्रपटासाठी पु. लं. ना संवादलेखनाचे पारितोषिकही मिळाले होते. चित्रपटासाठी त्यांना मिळालेला बहुर्थी हा एकमेव बहुमान!

अवघ्या आठ-दहा वर्षांत २५-३० चित्रपटांची कारकीर्द, असूनही पु. लं. चित्रसृष्टीत रमले नाहीत. 'गुळाचा गणपती (१९५४) नंतर खरंतर चित्रसंन्यास घेतला. नंतर एक-दोन चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखन केले इतकेच पण ते रमले नाहीत. त्यांच्या लेखन, संगीत, नाटक या प्रांतातच अधिक रंगले. चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या अवलियाची शब्दचित्रे मात्र त्यांनी रंगविली. संगीतकार वसंत पवार, गदिमा, डॉक्टर केशवराव भोळे यांच्यावरील लेख त्याचीच साक्ष आहेत. पु. लं. चा सहभाग असलेल्या २८ चित्रपटांपैकी फार थोडे चित्रपट आज उपलब्ध आहेत. काळाच्या ओघात त्यांचे अनेक चित्रपट नामशेष झाले आहेत. चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. पु. लं. चे निवेदन असलेला दामूअण्णा मालवणकर अभिनित अनोखा 'लघुपट' राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध आहे, हे सुदैव!

पु. लं. नी स्वतः निवेदन केलेली 'फिल्म्स डिव्हीजन' निर्मित 'पु. ल.' ही डॉक्युमेंटरी 'निवडक पु. ल.' सारख्या अभिवाचनाच्या दृष्यफिती, पु. लं. चे पेटीवादन, काव्यवाचन, 'वाऱ्यावरची वरात' नाटक व पु. लं. भाषणाच्या दृष्यफिती हा सारा खजिना आजही मराठी माणसाचं विश्व 'इंटरनेट'वर व्यापून आहे. त्याचा आस्वाद वेळोवेळी लोक उत्साहाने घेत आहेत. पु. लं. ची जीती जागती ही दृक-प्रतिभा रसिकांना सदोदित स्मरणदायी ठरत आहे, हेही नसे थोडके!

आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे सदा सर्वकाळ मराठी मनात स्मरणाधीन राहिलेले पु. ल. चित्रसृष्टीत अल्पकाळ रमले तसेच त्यांच्या लेखनावर आलेल्या काही चित्रपटांत प्रेक्षक फारसे रमले नाहीत. 'म्हैस' या गाजलेल्या विनोदी कथेवरील 'चांदी' व 'म्हैस' हे दोन्ही चित्रपट बेतास बेतच होते. ते गाजले त्यांच्या 'स्वामीत्व हक्काच्या वादामुळे' तर पु. लं. च्या लेखनावर आधारलेला 'गोळा बेरीज' हा चित्रपट केवळ 'गल्ला बेरीज' ठरला. पु. लं. च्या विनोदाचे उथळ सादरीकरण म्हणूनच या चित्रपटाकडे बघितले गेले. अगदी या वर्षी आलेला पु. लं. च्या आयुष्यावरचा बायोपिक 'भाई' हा विपर्यास्त सादरीकरणामुळे गाजला. त्यात पु. लं. मधील अचाट अवलियामागे लपलेल्या दुर्दम्य माणसाचे दर्शन घडण्याऐवजी नको त्या प्रसंगांचे दर्शनच घडले. काळाच्या पडद्यावर अजरामर ठरलेला हा अष्टपैलू असामी रूपेरी पडद्यावर मात्र दुर्दैवी ठरला इतकेच! पु. लं. म्हणत असत की, 'मी चित्रपटात ! होतो त्यापेक्षा मी चित्रपटात नव्हतो, हेच अधिक महत्त्वाचे!'

सतीश जकातदार
१२ जून २०२१
सकाळ 
- (सदर लेखाचे लेखक हे आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव आणि चित्रपट चळवळीचे संयोजक आहेत.)