Thursday, November 27, 2025

नाटक

एखाद्या बगीच्यात एकाच मातीतून नानातऱ्हेची रंगीबिरंगी फुले फुलावी तशी साहित्यातही जीवनाच्या अनुभवांतून येणारी नानातऱ्हेचीच फुले फुललेली असतात. त्यातील काही कथापुष्पे असतात, काही काव्यसमाने असतात, काही तत्त्वज्ञानाचे वटवृक्ष असतात. साहित्याच्या या बागेत नाटक नावाचा एक वृक्ष असाच फुललेला आहे.

इतर साहित्याप्रमाणे एखादा अनुभव सांगण्याची आणि तो ऐकणाऱ्याच्या मनाला आनंद देण्याची इच्छा हीच नाटक ह्या साहित्य प्रकारामागली प्रेरणा असते. पण इतर साहित्यप्रकार आणि नाटक यांच्यात एक मुख्य फरक असा आहे, की नाटक हे तो अनुभव जणू काय पाहणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे प्रत्यक्ष घडतो आहे, अशा रीतीने दाखवण्याच्या उद्देशाने जन्माला घातलेले असते.

नाटकाला प्रेक्षक येतो तो नुसता ‘ईक्षक’ म्हणजे पाहणारा नसतो. प्र अधिक ईक्षक असतो. म्हणजे विशेष चोखंदळपणाने पाहणारा असतो. संगीताला ‘श्रोता’ येतो. म्हणजे फक्त ऐकणारा. गवई डोळ्याला दिसला नाही तरी तो गायनाचा आनंद घेऊ शकतो. आणि कादंबरीतला वाचक असतो म्हणजे पुस्तक हाती घेऊन वाचणारा. वाचणारा किंवा वाचलेले फक्त ऐकणारा माणूस मनापुढे ती ती दृश्य आणतो.

नाटकाचा प्रेक्षक मात्र डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि कानांनी ऐकण्यासाठी येत असतो. त्यामुळे नाटककाराला ती दृश्ये डोळ्यांपुढे रंगमंचावर आणून खरी आहेत असा आभास निर्माण करायचा असतो. हा आभास आहे हे प्रेक्षकाला ठाऊक असूनही तो क्षणभर ते खरे आहे असे मानण्याच्या तयारीने आलेला असतो. रंगभूमीवरचा महालाचा देखावा हा पडद्यावर रंगवलेला आहे हे ठाऊक असूनही तो त्याला नाटकापुरता खरा महाल मानायला तयार होतो. शिवाजी महाराज होऊन आलेल्या नटाने खोटी दाढीमिशी लावली आहे हे ठाऊक असूनही तो त्या आभासाला घटकावर सत्य मानायच्या तयारीने आलेला असतो. परंतु जर नटाने तो आभास आपल्या अभिनय कलेने टिकवला नाही तर मात्र त्याचे लक्ष उडते. म्हणजेच नाटक रंगमंचावर अवयशस्वी होते. म्हणून नाटकाचे लेखन उत्तम असून चालत नाही. ते प्रेक्षकापुढे आणणारे नट, नेपथ्यकार, त्या प्रसंगाला उठाव देणाऱ्या प्रकाशाची संयोजना करणारे कलावंत किंवा प्रसंगात व्यक्त केलेल्या भावनांना आणि वातावरणाला अधिक परिणामकारक करणारे संगीत-नियोजक ह्या सर्वांना आपली कला पणाला लावूनच ते दरवेळी उभे करावे लागते.

नाटकात जी माणसे दाखवली जातात त्यांना आपण नाटकातली ‘पात्रे’ म्हणतो. भांड्याला देखील ‘पात्र’ असा शब्द आहे. ही नाटकातली पात्रे देखील एका अर्थी भांड्यासारखीच असतात. म्हणजे त्या पात्रामध्ये जो रस भरलेला असतो, तो त्या पात्राचे जसे दर्शन घडते त्याला साजेसा हवा. करवंटीतून कोणी आमरस भरून घ्यायला लागला तर ते चमत्कारिक वाटेल किंवा सुंदर सुवर्णपात्रातून रॉकेल भरलेले ही रुचणार नाही. म्हणजे ते पात्र आणि त्याचे वागणे, बोलणेसवरणे हे एकमेकांच्या आतल्या आणि बाहेरच्या स्वरूपाशी एकरूप झालेले असले पाहिजे.

नाटकाला इंग्रजीत ‘प्ले’ म्हणजे खेळ म्हणतात. आपणही पूर्वी “नाटकाचे खेळ झाले” असे म्हणत होतो. जुन्या मराठीत नटांना ‘खेळीये’ म्हटले आहे. हा माणसामाणसांतल्या निरनिराळ्या कारणांनी निर्माण होणाऱ्या तेढीचा, मैत्रीचा, शत्रुत्वाचा, आकांक्षांच्या पुर्तीचा किंवा अपूर्तीचा जय-पराजयाचा खेळच असतो.
नाटककार रंगमंचावर जो खेळ दाखवतो तो आपल्या मनातही सुरू होतो.

कलेतून मिळणारा आनंद आणि समाजाचे आरोग्य किंवा समाजाचे हित साधणारी कला असली तर दुधात साखर.
तंबोऱ्याच्या षड्जाच्या दोन तारा एकमेकींशी तंतोतंत जुळल्या म्हणजे त्यातून आपोआप गंधार हा स्वर उमटतो. नाटकातला किंवा एकूणच कलेतला समाज हिताचा विचार हा असा आपोआप उमटला पाहिजे.

****

‘एक शून्य मी’ ह्या पु. लं. देशपांडे यांच्या पुस्तकातील, ‘नाटक’ ह्या लेखातील काही उतारे. पु.ल. हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांना भले स्वतःची ओळख ‘आम्हाला हसवणारा माणूस’ म्हणून करून घ्यायला आवडले होते, अर्थात ते सार्थही आहे. तरी त्या विनोदबुद्धी मागे खूप मोठा व्यासंग, प्रखर बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि कलोपासकता होती हे नक्कीच. या पुस्तकात त्या बुद्धीची धार जाणवून देणारे अनेक लेख आहेत त्यातीलच हा एक ‘नाटक’. आज रंगभूमी दिन आहे. तर त्यानिमित्ताने पुलंसारख्या एका श्रेष्ठ ( आणि माझ्या आवडत्या) नाटककाराचे नाटकाविषयीचे विचार इथे समोर ठेवले आहेत.‌ अन्य नाटककार, कलाकार, नेपथ्यकार, किंवा नाटकाशी संबंधित अन्य कलावंत यांच्याकरता तर ते महत्त्वाचे आहेतच परंतु एक प्रेक्षक म्हणूनही मला ते समृद्ध करणारे वाटले. म्हणूनच हा प्रपंच!

पूर्ण लेख ‘एक शून्य मी’ हे पुस्तक घेऊन त्यात वाचावा.

- प्रेरणा कुलकर्णी

Tuesday, November 18, 2025

यक्षाचे तळे ... सुनीताबाई ! - (श्रीकांत अ. जोशी)

असं म्हणतात कि, "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते" आणि असंही म्हंटलं जातं कि, "स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते." या दोन्ही उक्ती सिध्द करणारं उत्तम उदाहरण म्हणजे सुनीता पुरुषोत्तम देशपांडे, अर्थात विदुषी सुनीताबाई ... महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंची सुविद्य पत्नी! खरं तर हीच त्यांची ओळख आहे का? कारण एखाद्या व्यक्तीचं नाव आणि आयुष्य जेव्हा असामान्य व्यक्तीशी जोडल्या जातं तेव्हा बहुतांश वेळा त्याची अवस्था ही बोन्साय केलेल्या झाडासारखी होते, एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत वाढ खुंटलेल्या रोपट्यासारखी होते. कारण तिनं स्वतंत्रपणे काही करायचं ठरवलं आणि केलं तरीही समाजाचं त्या गोष्टींकडं लक्ष जात नाही आणि समजा गेलं तरी त्या असामान्य व्यक्तीचा ठप्पा लावूनच समाज ती गोष्ट स्वीकारतो. त्यामुळं असामान्य व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीचा संघर्ष सहसा कोणाला कळत नाही, कारण इतरांच्या दृष्टीनं असं होणं म्हणजे भाग्याची गोष्ट असते. उदाहरणच द्यायचं झालं तर अभिषेक बच्चन चं देता येईल. 'वन मॅन इंडस्ट्री' असं संबोधल्या जाणाऱ्या अमिताभ चा मुलगा असल्यानंतरही बॉलीवूड मध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अभिषेक बच्चनला प्रचंड संघर्ष आणि मेहनत करावी लागली. थोडक्यात काय कि, असामान्य माणसाशी जेव्हा तुमची कोणत्याही प्रकारे नाळ जोडली जाते तेव्हा इतरांच्या दृष्टीनं जरी ती भाग्याची गोष्ट असली तरी त्या जोडल्या गेलेल्या व्यक्तीसाठी मात्र तो प्रवास काट्यावरचा असतो.

या न्यायानं विचार केला तर पुलंसारख्या अवलियाशी नातं जोडल्यानंतर 'विदुषी' म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करताना सुनीताबाईंचा प्रवास किती कठीण राहिला असेल. पण स्वतः पुलंनी सुनीताबाईंविषयीच्या भावना व्यक्त करताना जे सांगितलं त्यातून सुनीताबाईंचं पुलंच्या आयुष्यातील योगदान आणि त्यांची उंची याची जाणीव होते आणि सृजनतेचा आणि प्रतिभेचा संगम किती सुरेख असतो याची आपल्याला प्रचिती येते. सुनीताबाईंविषयी बोलताना पु.ल. म्हणाले होते, "मी रिकाम्या तासाला शिक्षकांच्या कॉमन रूममध्ये बसलो होतो, एवढ्यात खादीची पांढरी शुभ्र साडी, खादीचाच पांढरा शुभ्र ब्लाउज, अंगावर एकही अलंकार नाही, कपाळावर कुंकू नाही अशी सुमारे १६-१७ वर्षांची गोरीपान तरुणी ही झपाझप दार उघडून आत आली. तिचं नाव 'सुनीता ठाकूर'! तिच्याविषयी अलिप्ततेनं बोलणं मला शक्य नाही. पण एकच सांगतो कि, तिच्या रूपानं मला माझ्या आयुष्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही गोष्टींचं वरदान लाभलं. खरं म्हणजे ३६ वर्षांपेक्षाही जास्त अशा आमच्या वैवाहिक आयुष्याची कहाणी ही तिनंच सांगायला हवी. पुष्कळ वेळेला मला प्रश्न पडतो कि, माणसाच्या आयुष्यामध्ये प्रयत्नाचं स्थान किती आणि दैवाचं किती? कठीण आहे सांगणं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून १९४२ च्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या सुनीता ठाकूर नावाच्या एका बुध्दीवान आणि संपन्न घराणातल्या मुलीला गरिबीचा वसा घ्यावा, माझ्यासोबत संसार करावा असं का वाटलं असावं? फक्त ५५ रुपयांमध्ये ६-७ जणांच्या संसाराचा गाडा मी ओढत होतो. बरं , माझं काही नाव आहे, यश आहे असंही काही नव्हतं. अशा या माझ्यासारख्या माणसाविषयी तिला ओढ का असावी आणि गेली अनेक वर्षे माझ्या आयुष्यातली मार्गदर्शक, माझ्या साहित्य, नाट्य वगैरे क्षेत्रातील सहकारिणी, त्यानंतर माझी अकाउंटंट, मॅनेजर सगळं काही, एवढंच नव्हे तर स्त्री पुरुषासाठी संसारात ज्या ज्या म्हणून खस्ता खाते त्या खस्ता काढणारी म्हणून तिनं का म्हणून माझ्याबरोबर रहावं, तिला माझी ओढ वाटावी आणि आजही आमचा संसार टिकून आहे हे सगळं गूढच आहे. बाकी एक, आमच्या संसारामध्ये सुखदुःखाच्या प्रसंगी आम्हाला जोडून धरणारा एक धागा आहे महत्वाचा, तो म्हणजे कवितेचा! कविता म्हणजे कविता करायचा नव्हे, कविता वाचायचा, कविता म्हणायचा. कदाचित त्यामुळंच तिच्यासोबतचा माझा प्रवास एखाद्या कवितेइतकाच यमकाला यमक जुळवत काव्यमय झाला असावा."

पु.ल. अर्थात भाईंनी सुनीताबाईंविषयी बोललेला शब्द न शब्द हा सुनीताबाईंचा मोठेपणा दर्शवणारा आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा होता. मला ही अशी माणसं मुरलेल्या लोणच्यासारखी वाटतात. ती जितकी जुनी होत जातात तितकी चविष्ट होत जातात. सुनीताबाई जितक्या शिस्तीबाबत काटेकोर तितक्या भाईंच्या विषयी हळव्या होत्या. पुलंच्या लेखनासाठी सुनीताबाईंनी काय काय केलं याविषयी प्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले सांगतात, "पुलंच्या लेखनासाठी सुनीताबाईंनी काय केलं नाही? त्यांना लिहिण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांच्यावर कोणतंही दैनंदिन काम पडू दिलं नाही. लिहिण्यासाठी लागणारी शांतता - निरामयता त्यांना मिळावी म्हणून दक्षता घेतली. नुसती दक्षताच नव्हे, तर जनापवादही घेतले. “भाई, तू आता नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या लेखनात बुडला आहेस. आता हे भाषणाचं निमंत्रण घेऊ नकोस.” असं भाषण ठरवायला आलेल्यांसमोर बजावणं असो, किंवा “तुम्ही आलात खरं, पण आता भाई तुम्हांला भेटणार नाही. तो महत्त्वाचं लिहितोय. ते झाल्यावर मी तुम्हांला बोलावेन.” असं एखाद्या अनाहूत पण सन्माननीय पाहुण्याला सांगणं असो. कोणामुळेही पुलंची लेखनाची तंद्री मोडणार नाही याबद्दल त्या सदैव सावध राहिल्या. पु.ल. लिहीत बसले असताना त्यांच्या खोलीत चहा, दाण्याची वाटी, सिगरेटची पाकिटं अशी 'कुमक' न सांगता पुरवली. पुलंनी तो खर्डा पूर्ण करून, वाचून दाखवल्यावर परखड मत दिलं. केवळ स्तुतिपाठकाची भूमिका कटाक्षानं टाळली."(सुनीताबाई - मंगला गोडबोले) यावरून पु. ल. मधील लेखक घडताना त्यात सुनीताबाईंचं योगदान किती अनमोल होतं हे लक्षात येतं.

लेखन, अभिनय, संगीत, अभिवाचन या पु.ल. यांच्या प्रवासात सुनीताबाई त्यांच्या मागे सावलीसारख्या उभ्या होत्या. तेव्हा त्या फारशा प्रकाशझोतात नव्हत्या. परंतु या जोडीनं बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा.सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्याचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरु केले तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य रसिकाला सुनीताबाईंची ओळख झाली. कविता हा या जोडीचा जीव कि प्राण होता. १९९० साली 'आहे मनोहर तरी' हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे सुनीताबाईंचे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्यानं साहित्य क्षेत्रात आणि पुलंच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळच उडवून दिली. त्यानंतर 'मनातलं आभाळ', 'अवकाश' आणि 'सोयरे सकळ' ही पुस्तकं लिहून त्यांनी लेखिका म्हणून साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'प्रिय जी.ए.' हे त्यांचं प्रकाशित झालेलं शेवटचं पुस्तक. जी.ए. कुलकर्णी हे सुनीताबाईंचे अत्यंत आवडते लेखक. त्या त्यांच्याशी वेळोवेळी पत्राद्वारे संवाद साधत. या पत्रांचा संग्रह म्हणजे 'प्रिय जी.ए.'! या पुस्तकानं साहित्य क्षेत्रात एक वेगळं दालन उघडून दिलं.
३ जुलै १९२६ रोजी रत्नागिरीला जन्मलेल्या सुनीताबाईंना त्यांचं व्यक्तिमत्व समृध्द करणारी कौटुंबिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी मिळाली. आपल्या 'सोयरे सकळ' या पुस्तकात त्यांनी ज्या तलावाचा 'यक्षाचे तळे' असा उल्लेख केला ते धामापूर येथील तलावाचे वर्णन आहे. अशा निसर्गसौंदर्याचं मुक्त हस्तानं उधळण असणाऱ्या वातावरणात सुनीताबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यामुळंच त्यांच्याजवळ एक सौंदर्यदृष्टी होती. भाईंना भेट म्हणून आलेल्या पुष्पगुच्छातील फुलांची त्या इतक्या सुंदर रीतीनं मांडणी करायच्या कि, पाहणारा पाहतच राहील! कवितेची ओढही कदाचित यातूनच निर्माण झालेली असावी. त्यांचे मामा राजा पाटेकर यांनी अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे यांच्याशी सुनीताबाईंचा परिचय करून दिला आणि सुनीताबाई सेवादलात सक्रिय झाल्या.

१९४२ च्या चळवळीत अण्णासाहेबांनी भूमिगत रेडिओची जबाबदारी सुनीताबाईंवर सोपवली, परंतु ते काम पूर्णत्वास गेले नाही. त्यानंतर त्यांच्यावर टाईम बॉम्ब तयार करण्याचे काम सोपवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोर्चाचे नेतृत्व करत मिल्ट्रीच्या ताफ्याचा मोठ्या हिमतीनं सामना केला. बंगाली आणि उर्दू भाषांचा त्यांचा अभ्यास देखील चांगला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मुंबईला आल्या. जुवळे नावाचे एक शिक्षणप्रेमी दादर भागात 'ओरिएंट हायस्कुल' चालवत होते. त्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. पुलंशी त्यांची प्रथम भेट झाली ती इथेच! पुलंसारख्या कलंदर वृत्तीच्या अवलियाला त्यांनी आईच्या मायेनं सांभाळलं. त्यांच्या सृजनशीलतेला कायम प्रोत्साहन दिलं. प्रसंगी कडव्या शिस्तीच्या आणि प्रसंगी संवेदनशील मनाच्या सुनीताबाईंमध्ये एक समाजसेविका दडलेली होती. त्याला त्यांनी आपल्या दातृत्वाची जोड दिली. 'पु. ल. देशपांडे फाउंडेशन' ची स्थापना करून त्यांनी या फाउंडेशन द्वारे अनेक संस्थांना लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. शिवाय त्याची कुठेही प्रसिध्दी होणार नाही याची काळजी घेतली. 'साधी राहणी उच्च विचार' या सुविचाराचा त्या मूर्तिमंत प्रतीक होत्या.

ज्या पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं त्या पुलंच्या ओठांवर कायम हास्य राहील, त्यांच्या लेखणीतून कायम आनंदाचा झरा वाहत राहील ही काळजी देवालाही असावी. म्हणून तर त्यांनी पुलंच्या आयुष्यात सुनीताबाईंना आणलं, जी एकाच वेळी त्यांची पत्नी होती, आई होती, मैत्रीण होती, सहचारिणी होती, समीक्षक होती आणि त्यांची प्रेरणा देखील. या एवढ्या भूमिका केवळ सुनीताबाईंसारखी स्त्रीच निभावू शकते. म्हणूनच लेखाचा समारोप करताना म्हणेल कि, जसं 'पु. ल. पुन्हा होणे नाही' तसंच 'सुनीताबाई देखील पुन्हा होणे नाही!'

श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ