त्रेपन्न साल उजाडले. पुण्याला ' गुळाचा गणपती ' नावाच्या माझ्या चित्रपटाचे शूटिंग चालले होते. आऊटडोअर लोकेशन पाहायला मी देहू - आळंदीच्या दिशेला गेलो होतो. संध्याकाळी पाच - साडेपाचाच्या सुमाराला बादशाहीच्या बोळातल्या माझ्या बिऱ्हाडी परतताना नाक्यावर वामनराव देशपांडे मला भेटले.
" चला - असाल तसे चला"
मी माझ्या आळंदीच्या अबीर बुक्क्यात होतो. मी म्हटले, " कुठे चला?"
" अहो कुमार आलाय!"
" काय म्हणता काय? कुमार हिंडाफिरायला लागला?"
"अर्धा तास गायची परवानगी मिळालीय त्याला डॉक्टरची - गणूकाका कात्र्यांच्या क्लासात चला, फडक्यांच्या वाड्यात."
तसाच त्या दिशेने सुटलो. तीसचाळीस मंडळी होती. वसंत देशपांडे होता, अरविंद मंगरुळकर, वृद्ध मेहबुबखाँसाहेब होते, मारुलकरबुवा, मूछकाका पटवर्धन, भास्करबुवा जोशी. सुरुवातीला गणूकाकांनी कुमारला पुष्पहार वगैरे दिला. मग थोडावेळ वझेबुवांचे शिष्य भास्करबुवा जोशी गायले. मग वसंत देशपांडे गायला. मग हळूच कुणीतरी कुमारला सुचवले, " म्हणणार का काही?" त्याच्या चेहऱ्यावर एक मिस्किल हास्य उमटले. स्वारी दोन तंबोऱ्यात बसली. बसण्यातला तोच डौल. तंबोऱ्याचे गुंजन सुरू झाले. समोर उतू जाणारा आनंद चेहऱ्यावर दाटलेली स्नेहीमंडळी आणि गेली पाचसहा वर्षे आम्ही ज्या षडजासाठी आसुसलो होतो तो षडज लागला त्याच ताकदीचा. म्हातारे मेहबूबखाँ आजूबाजूचा शिष्ट समाज काय म्हणेल याची फिकीर न करता आपल्या खास मुशेलमानी मऱ्हाटीत उद्गारले,
" व्वा! अवो, चड्डीत मुतायच्या उमरीचं होतं, तेव्हापासून पयल्या 'सा ' ची हीच ताकद की वोss! जियो - आमचं उमर ऊन जाईS!"

कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. पाच वर्षांपूर्वीचाच, कानांना ' आता अवधारिजो जी ' असे जरासे बजावून सांगणारा तोच, तसाच षड्रज लागला आणि त्यापूर्वी कुणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चिजेचा अद्भुत मुखडा कानी पडला, " मारुजी भूलो ना म्हाने. " अस्ताई म्हटल्यावर पुन्हा चिजेच्या तोंडाकडे येताना मारूजी मधल्या ' जी ' वर कुमार कोमल रिषभावर दोनच सेकंद असेल पण अश्या ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, ' सोहनीभटीयार ' आणि म्हणाला, " गेल्या काही वर्षांत असे काही नवीन राग आणि चिजा झाल्या आहेत. "
शेवटी कुणाच्या तरी हाताला यशाची गुरूकिल्ली लागली आणि कुमार त्या आजारातून उठला. रामूभय्यांनी तर साऱ्या इंदूरला गावजेवण घालायचे बाकी ठेवले होते. गणूकाकांच्या क्लासात त्या संध्याकाळी कुमारचे गाणे ऐकून मी आणि वसंत देशपांडे माझ्या घरी परतल्यावर मध्यरात्र उलटेपर्यंत त्या अनुभवाचा आनंद आठवीत बसलो होतो. त्या दिवशी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीवरचा हार कुणीतरी मला प्रसाद म्हणून दिला होता. त्या हाराशी ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन आणि कुमारची ही मैफिल निगडित झाली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून तो हार कित्येक दिवस जपून ठेवला होता.
कुमारच्या स्वरांचे मयूरपंख फुलले की एक प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. या भाग्याचा धनी मी का झालो? हे धन मला देऊन गेलेल्या किती म्हणून कलावंतांचे स्मरण करावे! झोळी खूप भरलेली आहे.पण कुमारने भरभरून दिलेल्या सुवर्णक्षणांच्या मुठी मोजदादीपलीकडल्या आहेत.
- पु. ल. देशपांडे
गुण गाईन आवडी



