Thursday, March 26, 2026

चांदण्यांची झाडं - (ना. धों. महानोर)

माघी पौर्णिमेची रात्र. अतिशय सुंदर, स्वच्छ चांदण्यांचं आकाश. निरभ्र आकाश. भक्कम असा चांदण्यांचा प्रकाश. हलका थंड गारवा. हवेत व मोसंबीच्या बागेतही. एक हजार झाडं-फळांनी लदबदलेली. सोळा सोळा फूट अंतरावर दहा वर्षांची, एका रांगेत उभी असलेली, छान उठून दिसणारी मोसंबीची बाग. गारवा झिनमिन अंगभर चिपकणारा. मोसंबीच्या फुलांचा घनदाट दरवळ. सगळा आसमंत सुगंधित करणारा. दहा, अकरा, बारा वाजता वाढत जाणारी रात्र. लहानशा गवताच्या झोपडीजवळ मोसंबीच्या बागेत उतरलेलं माघी पौर्णिमेचं स्वच्छ निरभ्र चांदणं. शांत एकान्त. मध्येच वाऱ्यावर वाहत येणाऱ्या बांधावरल्या मोहाच्या शुभ्र फुलांचा मादक सुवास. मोहाच्या फुलांच्या नुसत्या सुवासाने सगळे तरतरीत झालेले.

पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कविवर्य बा. भ. बोरकर, वा. ल., आणखी शेतावरले पाच-सहा गडी. पाच-सहा साहित्यिक मित्र. माघी पौर्णिमेच्या रात्री मोसंबीच्या बागेत सबंध मराठी कविता, गाणी गप्पा, मस्करी, हास्यविनोद अशी चढाओढ चाललेली. रात्रीचे दोन कधी वाजले हे कळलंसुद्धा नाही. मी भाईंना (पु.ल.) म्हणालो, "थोडे डोळे बारीक करून एकटक बागेकडे पहा." मोसंबीच्या झाडांच्या काळपट सावल्या मोसंबीच्या झाडांखाली घर करून स्वस्थ बसलेल्या होत्या. एक हजार झाडं. झाडांमधलं जे अंतर होतं त्यात चांदण्यांचं आभाळ उतरलेलं. त्याचं त्या त्या आकाराचं चांदण्याचं झाड झालेलं. असं प्रत्येक चार-चार झाडांमध्ये एक-एक चांदण्यांचं झाड संबंध बगीच्यामध्ये दिसू लागलं. वारा आला म्हणजे त्या झुळुकीने जे झाड, नव्हे ते चांदण्यांचं झाड (मोठ्ठा झाडाचा पांढराशुभ्र झाडासारखा त्याचा ठिपका म्हणजेच झाड) हलायचं. दूर दूर अशा चांदण्यांच्या झाडांचं वाऱ्याच्या झुळकीसरशी लयबद्ध हलणं, मंद नाचणं.

आम्ही सांगितल्यावर मग बोरकर, सुनीताबाई, सगळ्यांनीच ती अस्तित्वात नसलेली परंतु प्रत्यक्षात असलेली चांदण्यांची झाडं मंद वाऱ्यावर, आमच्या कवितांवर, गाण्याच्या तालावर नाचताना पाहिली. आणि कसला आनंद ! हे वेगळं जग पाहिल्यावर, निसर्गाचं विलोभनीय सुंदर देखणं रूप पाहिल्यावर सगळेच वेडे झाले. बागेत पुन्हा पुन्हा डोळे टाकून पाहू लागले. निसर्गाच्या सचेतन मानवी जगण्याचा अपरंपार आनंद. सगळ्यांनी मिळून समूहाने कवितेचं आनंदगान गाताना, कविता म्हणताना बोरकरांनी अंगावरली शाल फेकून दिली आणि उभं राहून त्या चांदण्यांच्या झाडांमध्ये एकरूप होऊन ते मनसोक्त नाचू लागले. खूप नाचले. झाडांसोबतच्या डोळ्यांवर. अशा खूप रात्री. ऋतुवंत निसर्गाचं रूप. कवितेत कधीच न लिहिता आलेली, चित्रं उभी न करता आलेली त्यांची रूपं आजही मला पछाडून टाकताहेत, आनंद देताहेत. ते नीट लिहिता येत नाही... शब्दांपलीकडलं खरं म्हणायचं तर हेच. निसर्गाचं विविध रूपांनी नटलेलं, खुणावणारं आकाश, डोळे खुडून नेणारं आकाश.

- ना. धों. महानोर

Tuesday, March 10, 2026

पुलंनी आपल्या मेव्हण्याना लिहिलेलं हे पत्र..

(डॉ. श्रद्धानंद ठाकूर या आपल्या मेव्हण्याना पुलंनी लिहिलेलं हे पत्र गंमत म्हणजे डॉ. ठाकूरांनाही भाई हे टोपण नाव होतं.)

प्रिय भाई,

तुझे अमेरिकेहून पाठवलेले पत्र माझ्या वाढदिवसाच्या तारखेलाच लिहिलेले असल्यामुळे त्या दिवशी भरतभूमीत पोहोचणे शक्य नव्हते, पण आश्चर्य म्हणजे त्याच तारखेला खुद्द पुण्यातून पाठवलेल्या पत्राआधी मिळाले. यंदा माझ्या वाढदिवसाचा सप्ताह साजरा होत असल्यासारखी पत्रे येत आहेत. जन्तेला मी सत्तरीत शिरल्याचा भलताच आनंद झालेला दिसतो. वास्तविक ह्या वयातल्या वाढदिवसात वार्ध्यक्यसुलभ व्याधीखेरीज आणखी इतर कसलीही वाढ होत नसते. हे काही चतुर मंडळींनी जाणून मला एक आयुर्वेदिक उपचार पद्धती एक होमेपदी आणि एक ऍलोपथी अशी तीन घराण्यांची तीन पुस्तके वाढदिवसाची भेट म्हणून आली आहेत. एवढ्याने झाले नाही म्हणून एक अॅक्युपंक्चर तज्ज्ञ मला टोचून जाण्याचा मनसुबा व्यक्त करून गेले ते निराळे!

आज १८ तारीख. पण आजच्या डाकेलाही शुभेच्छापत्रे आली आहेत. एकदम हा इतका वर्षाव होण्याचे कारण मुंबई दूरदर्शनने एका कार्यक्रमात माझ्या गुळाच्या गणपतीतला इंद्रायणी काठी प्रसंग दाखवला आणि सुधीर गाडगीळने आज पु.लं.चा वाढदिवस आहे म्हणून उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजरात मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मध्यरात्री फोन येणे वगैरे चालू होते. सालाबादप्रमाणे अनेक परिचित अपरिचित मंडळी घरी येऊन शुभेच्छा देऊन गेली. त्यातच दिवाळी! (शिवाय जेमिनी सर्कस ह्या चालीवर) शुभा नितिन वगैरे आले होते. मोहन, अंजली, महेश सुमित्राही येऊन गेले. एका चाहत्याचा (?) फोन रात्री १२ ।। ला १० तारखेला आला. त्याला ८ ता.ला वाढदिवस झाल्याचे सांगितल्यावर, 'मला वाटलं अजून चालूच आहे. हैं हैं हैं! असे कोडगे उत्तर मिळाले. माझा वाढदिवस मी नवरात्रासारखा साजरा करतो अशी त्याची कल्पना असावी. एका उत्साही पत्रकाराने मला असेच ७ ता.ला मध्यरात्री जागवून ७० व्या वर्षाचे नवे संकल्प काय असे विचारले. 'इथून पुढे रात्री निवांत झोप घ्यावी, असे म्हणतो.' हे सांगून मी त्याला फुटवला! असा तर असो हा वाढदिवस.

तुझे ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचे वाचून खूप समाधान वाटले. वाटू द्यायची नाही म्हटले तरी काळजी वाटत होतीच. काळजी वाटण्यापेक्षा काळजी घेणे अधिक चांगले हे तत्त्वज्ञान कळते! मात्र तू त्या देशात जाऊन ऑपरेशन करून घेतलेस ते चांगले केलेस. तिथे ऑपरेशननंतरची देखभाल विशेष चांगली होते. मात्र विश्रांती ईज म्हणजे मस्टच घ्यायला हवी. (साला भर्डाचा स्टूडंट हाय!)

मात्र हे पत्र तुला मिळेल त्यावेळी तू व निर्मल डॉ. हबीकडून दिनेशकडे आलेली असणार. २२ नोव्हेंबरला रमाकांत अमेरिकेला जायला निघत आहे. विभाकडून तो दिनेशला फोन करीलच. त्याच्याबरोबर सुनीताने तुमच्यासाठी महाराष्ट्र टाईम्स, मौज, हंसचे दिवाळी अंक पाठवले आहेत. म.टा. व मौज मधे सुनीताचे लेख आले आहेत. जाणकार वाचकांची ह्या चिंतनपर लेखाला उत्तम दाद मिळाली आहे. सुधीर सवूर, गीता ह्यांना आमचे आशीर्वाद सांगणे. अमेरिकेला हेमंत संपून आता शिशिरागम झाला असणार. पुण्यातही आता थोडीफार थंडी पडायला लागली आहे. रात्रीच्या वेळी उष्ण तापमान १०-११० सेल्सीयस पर्यंत जाते. दिनेशला ज्योती गरम कपडे चढवते ना?

-भाई
(जीवनज्योत दिवाळी अंक २००९)