काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले. पु.ल. आणि सुनीताबाईंच्या प्रेमळ सहवासाने पावन झालेल्या थोरांनी त्यांच्याविषयी सांगितलेल्या काही आठवणी....
भाईकाकांचे एकुणच माणसांवर प्रेम होते. त्यांच्या घरी अनेक लोकांचा राबता असे. नाट्य, साहित्य, संगीत क्षेत्रातल्या व इतर मातब्बर मंडळीच्या सहभागाने मैफिली रंगायच्या. अनिल अवचटांनी म्हंटले आहे.
‘बेल दाबली की सुनिताबाई दार उघडत. प्रसन्न हसून ‘या~~’ म्हणत. मला, सुनंदाला कधीही या घराचा तुटक अनुभव आला नाही. बसायला सांगत आणि आत तोंड वळवून ‘भाई~~’ अशी हाक मारीत. आतून हसऱ्या चेहऱ्यानं पु.ल. येऊन बसत. त्यांना अलिकडेच घरच्या कपड्यात पाहिलं. पण त्या वेळी ते घरीही नेहमी खादी सिक्लचा झब्बा, पायजमा अशा स्वच्छ इस्त्रीच्या कपड्यांतच भेटले. सुनीताबाईंचा वावर स्वयंपाकघर ते हॉल अस असे. मधे दाराजवळ जरा खालच्या लेव्हलला फोन असे. आणि त्यासमोर त्याच उंचीचा, बुटका मोढा असे. फोन आला, तर सुनीताबाई त्या मोढ्यावर बसून फोन घेत. आमच्यासमोरच्या प्लेटमध्ये कधी बाकर वडी, कधी कडबोळी किंवा एका स्टीलच्या भोकं पाडलेल्या डब्यात डाळिंबाचे दाणे ठेवत. स्वयंपाकघर व्यवस्थित असे. मी कधी आत जाऊन म्हणालो की, ‘मी करतो चहा, तुम्ही बसा बाहेर,’ तर त्या म्हणत, ‘तू इथे घोटाळा करून ठेवशील. ते निस्तरण्यात माझा वेळ जाईल. तू बस जा बाहेर.’
पु.ल. घरी नसतानाही केवळ सुनीताबाईंकडेही मी व सुनंदा चक्कर टाकायचो. एकदा त्या भाज्या निवडत होत्या. पालेभाज्यांचे, भाज्यांचे ढिग पाहून म्हटलं, ‘कुणी येणार आहे?’
त्या म्हणाल्या, ‘नाही, भाई आता चार दिवस येणार आहे ना, त्याच्या आवडीच्या भाज्या, पदार्थ याची तयारी करून त्या फ्रिजमध्ये टाकून ठेवते. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेगवेगळं करता येतं. हे जर आता करून ठेवलं नाही ना, तर त्या वेळी काहीच करता येत नाही. तो आला की लोकांची गडबड सुरू होते. त्यांच्याकडे बघावं लागतं. म्हणून हे.’ सुनीताबाईंचं पु.ल.वरचं प्रेम कधी शब्दात व्यक्त व्हायचं नाही. पण ते असं व्यक्त व्हायचं.
दरवेळी जाताना मी नवीन काढलेली चित्रं, लाकडातील शिल्पं दाखवायला घेऊन जायचो. शिल्प समोरच्या टीपॉयवर ठेवलं, की ‘अग सुनीता~~’ अशी हाका मारायचे. त्या वेळी आलेल्यांनाही आवडीने ते दाखवायचे. त्या काळात सुनीताबाईंची भाची आणि तिचा नवरा डॉ. लोहोकरे कुटुंब पुण्यात जवळच राहायला आले. त्यांची दोन मुलं, म्हणजे पु.ल. सुनीताबाईंची नातवंडं, पु.ल.च्या घरात सतत खेळायला असत. त्यांना मी ओरिगामी देऊ लागलो. त्यांचं खेळून झाल्यावर सुनीताबाई ती ओरिगामी मॉडेल्स व्यवस्थित उचलून आत जाऊन एका ड्रॉवरमध्ये ठेवत. मी त्यांना अनेकदा म्हंटलं, ‘अहो, तुम्ही हे कशाला करता? मी परत करून देईन.’ त्या म्हणायच्या, ‘असू दे, तू गेल्यावर या मुलांनी हट्ट केला तर मी काय करू?’ नंतर मला कुणी सांगतही असे, कुणी मुलं खेळायला आली की सुनीताबाई ते ड्रॉवर बाहेर आणतात. टेबलावर सगळी मॉडेल्स मांडून ठेवतात आणि म्हणतात, याच्याशी खेळा. पण फाडायची नाहीत बरं का.’
व्यसनी मुलांबद्दल जेव्हा पु.ल. दापत्यांला कळलं तेव्हा त्यांनी आम्हाला घरी बोलावलं. दोघांनी सांगितल, ‘तुम्ही या मुलांसाठी काहीतरी करा. आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देणगी देणार आहोत.’ मला काय करावं हा प्रश्न पडला. पण सुनंदा धडाडीची. ती म्हणाली, ‘यांच्यासाठी सेंटर काढू.’ तिने सरकारी परवानग्या काढल्या आणि मेंटलमधल्या एका इमारतीत हे केंद्र सुरू झालं. सरकारनं बजावलं होतं, तुम्ही इथं नेमणाऱ्या सेवकवर्गाला सरकारी नोकरीवर हक्क सांगता येणार नाही. मग प्रश्न पडला. आमचा ट्रस्ट तोपर्यंत स्थापन झालेला नव्हता. सुनीताबाई म्हणाल्या. ‘ठिक आहे. पुढची सोय होईपर्यंत सेवकांचे पगार पु.ल. देशपांडे फाउंडेशनतर्फे करू. आम्ही व्यसनातून बऱ्या झालेल्या दहा-बारा तरुणांच कामावर घेतले. सगळ्यांचे पगाराचे चेक सुनीताबाई दर महिन्याला लिहून ठेवत. त्यांची आणि पु.लंची त्यावर सही असे. ‘मुक्तांगण’ या सस्थेंचा जन्म सुनीताबाईंच्या पुढाकरानेच होऊ शकला.अगदी मुख्य मंत्र्यांना फोन करून त्या ‘इतक्या चांगल्या कामांना अडचणी येऊच कश्या दिल्या जातात, शरम नाही का वाटत’ अशा शब्दांत सुनवायच्या. त्यानंतर प्रशासन धावत यायचे.
दिनेश ठाकुर आपल्या भाईकाकांच्या आणि माईआत्तेच्या नात्याबद्दल सांगतात ‘भाईकाका व माईआते यांचा माझ्यावरचा प्रभाव मी वेगळा काढुच शकत नाही. ही दोन व्यक्तिमत्वे जरी खूप वेगळी असली, तरी त्यांचा विचार व त्यानुसार ठरलेली कृती शेवटी एकत्रच व्हायची. आजी-आजोबा किंवा पार्ल्याच्या आजी असतानाही ठाकूर आणि देशपांडे कुटुंबियाचे ते दोघेही (प्रत्यक्षात माईआतेच!) कुटुंबप्रमुख होते. माईआते आपला सल्ला ठामपणे, आग्रहीपणे मांडून तर्काने समजून सांगायला जाई(व भाईकाकांनी दिलेले ’उपदेशपांडे’ नाव सार्थ करी.) तर भाईकाका तीच गोष्ट इतक्या सौ म्यपणे, सहज किंवा विनोदाने सांगत, की हेच योग्य, याला पर्यायच नाही, असेच सगळ्यांना वाटे.
भाईकाकांच्या बाबासाहेब पुरंदऱ्यांशी सहज गप्पा चालू असताना माईआतेचे भाष्य अगदी समर्पक होते... ’भाई, तू शिवाजी असतास आणि अफझलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त भरपूर गप्पा रंगवून परत आला असतास.’
विद्या बाळ म्हणतात ’मला नेहमीच या जोडप्याकडे बघताना असं वाटत आलं आहे की पु.ल. हे एक बहुरुपी, बहुआयामी कलावंत होते यात वादच नाही. मात्र त्यांचं कलावंतपण, त्यांचं मोठेपण, त्यांचा पैसा या साऱ्याची सुनीताबाईंनी निगुतीनं जपणूक केली. तीही स्वत:साठी नाहीच तर त्यात एक विलक्षण ताकदीची समाजाभिमुखता होती. पु.लं.नी खूप काही मिळवावं आणि त्याच्या गुणवत्तेची निगराणी करत, ते सुनिताबाईंनी इतर, काहींना हे समजलं तरी एकेकदा घेता आलं नाही. काहींना मात्र हे समजलंही नाही म्हणूनच त्याबाबत कितीकांनी काय काय तारे तोडले, ते ऎकून माझ्याच मनाला भोकं पडली!’
’आहे मनोहर तरी..’ हे शिर्षक कसे सुचले ह्याची हकिगत विजया राज्याध्यक्ष यांनी सांगतली आहे. ‘पी.एल. व सुनीताबाई आपल्या गाडीतून चालले होते. वाटेत ‘मनोहर बेकरी’ लागली. सुनीताबाईंचे कवितांबद्दलचे स्मरण पक्के. मनाची उपस्थितही विलक्षण. त्यांना ‘मनोहर’ या शब्दातून लगेच ‘आहे मनोहर, तरी गमते उदास’ ही ओळ आठवली. पाठोपाठ वाटले, आपल्या पुस्तकाला हे शिर्षक द्यायला काय हरकत आहे? पी.एल.नाही ते आवडले. श्री.पुं.शी चर्चा झाली. दुसरे एखादे अधिक चांगले शिर्षक सुचेपर्यंत ‘आहे मनोहर, तरी...’ हे शीर्षकच मनात ठेवायचे ठरले. दुसरे शीर्षक सुचले नाही, म्हणून ‘आहे मनोहर, तरी..’च कायम झाले. अनेकांप्रमाणे मलाही या कवितेचा संदर्भ ठाऊक नव्हता. मी विचारले, तेव्हा सुनीताबाईंऎवजी पीएल्नीच तो संदर्भ सांगितला. इतके ते शिर्षक त्यांनी आपलेसे केले होते. इतर शिर्षकांची त्यांच्या मनातली आठवण केव्हाच पुसली गेली असावी, इतके या नियोजीत शिर्षकावर ते खूश होते, असे वाटले. त्या त्या क्षणापुरते कशावर तरी, कोणावर तरी बेहद्द खूश असणे हा त्यांचा स्वभाव आहे. इथे तर सुनीताबाईंचीच कल्पना. त्यामुळे या खूश असण्याचे प्रमाण अर्थातच काही टक्के अधिक!’
मुकुंद टाकसाळे एका ठिकाणी म्हणतात..
‘सुनीताबाईंनी इतक्या काटेकोरपणे पु.ल.चा व्यवहार पाहिला. उत्तम व्यवहार करुन जोडलेले हे धन त्यांनी मुक्तहस्तानं समाजालाच परत देऊन टाकलं. पु.ल. सुनीताबाईंनी स्वत:साठी एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला मिळतील एवढेच पैसे दरमहा घेतले आणि टुकीनं संसार केला. जयंवत दळवींनी मला सांगितलेली एक आठवण आहे.
‘पु.ल.: साठवण’ या ग्रथांचे संपादन करण्याची कामगिरी दळवींनी उत्साहानं स्वत:च्या शिरावर घेतलेली होती. त्या काळात कधीतरी ते एका संध्याकाळी पु.लं.कडे गेले. सुनीताबाईंनी त्यांना विचारलं, ’तुम्ही काय घेणार? चहा की कॉफी?’
ती वेळ दळवींच्या दृष्टीनं ही दोन्ही पेये घेण्याची नव्हती. त्यामुळे ते गप्प राहिले. तेव्हा सुनीताबाईच पुढे त्यांना म्हणाल्या, "दळवी, खरं तर तुम्हाला ड्रिंक्सबद्दलच विचारायला हवं. परंतु पु.ल. देशपांडे फाउंडेशनमधून आम्ही आमच्यासाठी म्हणून महिन्याची जी रक्कम घेतो, त्यातून ड्रिंक्स ऑफर करणं आम्हाला खरोखरच परवडत नाही."
समजा, सुनीताबाईंनी आणखी रक्कम घेतली असती तर त्यांना कोण बोलणार होतं? पण बेचाळीसच्या चळवळीचे संस्कार घेऊन आलेल्या सुनीताबाईंना ही ‘चैन’ आवडणारीच नव्हती. आज पैशाला नको इतकी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. जिथून जे जे फुकटात मिळेल ते ते लाटण्याकडे लेखक-कलाकारांचा कल दिसतो. (उदाहरणार्थ, टेन पर्सेंटमधील फ्लॅट- एक पुण्यात आणि एक मुंबईत घेऊन ठेवणे.) या पार्श्वभूमीवर पु.ल.- सुनीताबाईंची साधी सात्विक राहणी खरोखरच ‘राजस’ वाटू लागते.
आपल्या स्पष्ट आणि सडेतोड वागण्यानं वागण्यानं स्वत:बद्दल गैरसमज निर्माण करायला आणि शत्रू वाढवायला सुनीताबाईंना आवडतं. ‘पु.ल. सारखा देवमाणुस कुठल्या कजाग बाईच्या तावडीत अडकलेला आहे’ अशीच त्यांची ‘इमेज’ त्यांनी घडू दिली. ‘पु.ल. सारखा मनस्वी (आणि आळशी) माणूस गप्पांच्या मैफलीतच फक्त अडकून राहिला असता तर त्याच्या हातून एवढं लेखन घडलंच नसतं. ‘बटाट्याची चाळ’ उभी राहू शकली नसती. लोकांचे सारे शिव्याशाप स्वत:च्या अंगावर झेलून सुनीताबाईंनी पु.ल. च्या आयुष्याला शिस्त आणली. पु.लं.च्या यशामागं आणि लोकप्रियतेमागं सुनीताबाईंसारखी खंबीर बाई उभी होती, हे कुणालाच नाकारता येणार नाही.’
सरोजिनी वैद्द सांगतात..
‘मॅजेस्टिक पारितोषिका’च्या एका वितरण समारंभात केशवराव कोठावळे यांनी पुलंना एक सुंदर भलामोठा पुष्पगुच्छ दिला होता. समातंभानंतर तो तसाच हातात धरून, अनेकांशी गप्पा मारताना पु.लं.ची थोडी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती. ती पाहून मी हात पुढं करीत सहज त्यांना म्हटलं, ‘मी सांभाळू का तुमचा हा गुच्छ? बिलकूल पळवणार नाही. घरी जाताना अगदी आठवणीनं परत देईन.’ त्यावर थोड्या वेळासाठी तो गुच्छ माझ्या हातात देत पु.ल. हळूच म्हणाले, ‘हा गुच्छ सुनीतासाठी आहे. तो घरी न्यावाच लागतो. ती यापुढेही आठ-दहा दिवस त्याचे सगळे लाड पुरवील. ह्यातलं शेवटचं फूल पूर्ण सुकेपर्यंत त्या फुलदाणीतलं पाणी वेळोवेळी बदलत राहिल...’
सुनीताबाईंविषयीच्या त्यांच्या अशा ओघाओघानं निघणाऱ्या उद्गारांत हळवेपणाबरोबरच आणखीही वेगवेगळे भाव असायचे. सुनीताबाईंची वागण्यातली शिस्त, त्यांचं काव्यप्रेम, त्यांनी दोघांनी बरोबर घालवलेले जगप्रवासातील गंभीर आणि गमतीदार क्षण यांबद्दलच्या त्यांच्या बोलण्यात पुष्कळ मोकळेपणा असायचा. बरेच जण समजतात तसा नात्यातील दडपणाचा भाग नसायचा. अनेक कंटाळवाण्या व्यावहारीक जबाबदाऱ्या स्वत:वर घेऊन सुनीतानं आपल्याला ‘मुक्त’ ठेवलं याची कृतज्ञ जाणीवही दिसायची. कधी कधी मधूनच खट्याळपणाही असायचा. ‘आहे मनोहर तरी’ बद्दल बोलताना एकदा गंभीरपणानं त्यांनी मला सांगितलं, हे लिहिणं ही तिची मानसिक गरजच होती. ‘मी ‘हूं’ म्हटलं; पण लगेच हलक्या सुरात मिस्किलपणे ते पुटपुटले-- तिला रॉयल्टीचा घसघशीत चेक आला तेव्हा मी तिला म्हटलं, ‘घे, माझेच पैसे आहेत, घे.’
मी नाटकी सुरात उद्गारले, ’हाच तो पुरुषी अहंकार बरं~’
त्यांच्या दोघांमधील नात्याच्या अशा लहानसहान गोष्टी पाहताना माझ्या मनात येऊन जायचं.... असं परस्पराचं स्वातंत्र्य मानणारं आणि वेळप्रसंगी त्याचा संकोचही करायला लावणारं जोडपं पाहण्याची सवय आपल्या समाजाला अजून लागायचीच आहे.’
सुधीर सवूर
‘भाई न्युयॉर्कमध्ये आले असताना माझ्या घरी आले होते. त्यादिवशी भाईंना भेटायला काही मित्रमंडळीही आली होती. मैफलीत भाई असताना ती रंगली नाही तरच नवल. अर्थातच मैफलीचे केंद्रबिंदू फक्त भाईच. त्यांना आवडेल म्हणून गीताने गोव्याच्या पद्धतीचे माशाचे हुमण केले होते. गप्पा मारता मारता जेवण संपले. भाईंनी आपण आतापर्यंत काय काय खाल्ले आहे हे सांगायला सुरुवात केली. भाई आपल्या खाद्दजीवनाचे वर्णन करीत असताना मी काही कारणासाठी स्वयंपाकघरात गेलो. सुनीतावहीनी माझ्या पाठोपाठ आत आल्या व मला म्हणाल्या की, "हे पहा, भाईला माशाच्या जेवणानंतर ओला नारळ खायला आवडतो. त्याला एखादा तुकडा नेऊन द्या आणि तो कसा खुलेल बघा." मी एका वाटीत खोबऱ्याचे तुकडे घालून ती भाईंसमोर नेऊन ठेवली. भाईंनी चमकून माझ्याकडे पाहिले. आपली आवड याला कशी कळली याचे त्यांना आश्चर्य वाटले असावे. सुनीतावहिनींकडे नजर जाताच त्यांच्या लक्षात आले. किंचित हसून त्यांनी मैफल पुन्हा सुरू केली. सुनीतावहीनी व भाई एकमेकांच्या आवडी कशा हळुवारपणे जोपासतात याची मला मिळालेली ही पहिली झलक. यानंतर काही वर्षांनी मला भाईंनी दिनेशला लिहिलेले एक पत्र वाचायला मिळाले होते. त्यात काही ओळी सुनीता वहिंनीनी लिहिल्या होत्या. त्यात त्यांनी लिहिले होते, तुझे भाईकाका ताटातला एखादा पदार्थ आवडला की जसा माझ्यासाठी थोडासा बाजूला काढून ठेवतात तसाच त्यांनी या पत्राचा थोडासा भाग माझ्यासाठी ठेवला आहे. मला आठवलं, की न्युयॉर्कच्या या मुक्कामात सुनीतावहीनी मला म्हणाल्या होत्या की, तुमची व भाईंची व्हेवलेंग्थ जुळली. अर्थातच हे सर्टिफिकेट सुनीतावहीनींकडून मिळाल्यामुळे त्याला विशेष महत्व होते.’
शरद पवार
‘पुलंच्या सुदैवाने त्यांना सुनीताबाईंसारख्या सहचारीणी लाभल्या. मराठी मनात आज पुलंची जी प्रतिमा आहे ती घडवण्यात सुनीताबाईंचा मोठा वाटा आहे. त्या स्वत: कर्तबगार, प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या होत्या. चिकित्सक रसिकता व कलागुण यांची देणगीही त्यांना लाभलेली आहे आणि स्वत:चे विचार व निष्ठा त्यांनी ठामपणे जपलेल्या आहेत. पण पुलंवरील प्रेमामुळे आपले सारे कर्तुत्व पुलंच्या बालसुलभ व्यक्तिमत्वाला सांभाळण्यात व कलागुणांना फुलवण्यात त्यांनी व्यतीत केले आणि पुलंमधील आदर्शवादाला उत्तेजन दिले. त्याचबरोबर त्यांनी पुलंच्या सामाजिक बांधिलकेच्या भावनेला उत्तेजन देऊन अनेक समाजोपयोगी उपक्रमांना आधार प्राप्त करून दिला.
निशिकांत ठकार..
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी॥ हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी?) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, "इतकं असेल. असं वाटलं नव्हतं." पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत?
पु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. कर्हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली.
गेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा
सोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा
पु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून? का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून? पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते.
भाई गेल्यानंतर सुनीताबाईंनी भाईंसाठी एक पत्र लिहिले त्यातला काही भाग-
"बोरकरांची एक ओळ आहे, ‘चंदन होवोनि अग्नि भोगावा’- जिंवत असताना, मृतावस्थेतही, कितीही उगाळलं तरी आणि शेवटी जळून जातानादेखील, त्या चंदनासारखंच आपल्या प्रकृतीधर्माप्रमाणे मंद दरवळत राहणं सोपं नाही. ज्या महाभागाला हे जमेल, त्याला अग्निदेखील भोगता येईल. ही खरी आत्मा आणि कुडीची एकरुपता. तो चिरंजीवच. नाहं हन्ति न हन्यते!
तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, "वहिनी, भाई गेले, तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं मानू नका. काहीही लागलं, तरी संकोच न करता सांगा, कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." हा खरचं त्या साऱ्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. कारण त्यांना कसं कळावं की, मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी नसणार. किंवा आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो.
तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला, त्या क्षणीच मी एक प्राण सोडला आणि दुसऱ्या स्वतत्रं जीवनात प्रवेश केला.
Robert Graves ची एक कविता आहे, मूळ शब्द आज निटसे आठवत नाहीत. पण मनाच्या गाभ्यात अर्थ मात्र या क्षणी जागा झालाय तो काहीसा असा -मृत्यूतून पुनर्जन्म होणे ही मोठीशी जादू किंवा अशक्यप्राय़ गोष्ट नव्हे. जीवन बहुधा पूर्णांशाने विझलेलं नसतंच. एखाद्या समर्थ फुंकरीने वरची राख उडून जाते. आणि आतला तेजस्वी जिंवत अंगार धगधगायला लागतो... आणि हेही तितकंच खरं की ते निखारे पुन्हा फुलायला लागतात, त्या वेळी त्यांच्यावरची आपण उडवून लावलेली राख आपल्याभोवती जमून दुसऱ्या कुणाच्या तरी फुंकरीची वाट पाहत आपल्याला लपेटून गुपचुप पडून असते. अहिल्येच्या शिळेसारखी-
एकटेपणा हा एकटा कधीच येत नसतो. सोबत भला मोठा आठवणींचा घोळका घेऊनच येतो. कवी खानोलकरांसारखा ‘तो येतो आणिक जातो.’ येताना कधी कळ्या घेऊन आला, तरी जाताना त्यांची फुलं झालेली हाती पडतील की निर्माल्य, हे त्याला तरी कुठे माहीत असतं? त्या क्षणी जे भाळी असेल, ते स्विकारायचं की नाकारायचं याचा निर्णय घेण्याचं तेवढं स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या हाती असतं. स्वातंत्र्य! ऍब्स्ट्रॅक्ट, कॉंक्रिट काहीही नाही-"
लेखातील भाग ‘पु.ल. नावाचे गारुड’ `आनंदयोगी पु.ल.' आणि ‘जीवन ज्योत दिवाळी अंक २००९’ मधुन साभार..
13 प्रतिक्रिया:
दिपक, सुनीताबाईंना श्रद्धांजली आपण सगळेच देत आहोत....पण त्यासाठी यासारखा उत्तम लेख आज पोस्ट केलास, मनापासून आभार. खर तर तुझ्या या प्रकल्पामूळे तू मराठी रसिकांना खूप काही देत आहेस....हा खजिना तू जगभरातल्या मराठी माणसासाठी खुला केला आहेस, आभार...
अरे काल पासुन तुझ्या या पोस्ट ची वाट पहात होतो. जेंव्हा समजलं, तेंव्हा पहिले पुलंप्रेम ला भेट दिली होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
khuuup chhan...
या पोस्टसाठी मनापासून धन्यवाद!
खुपच छान !!!! खरंच मनापासून धन्यवाद !!!!!
इतकी समर्पक श्रधान्जलि वाचून भरून आले. त्यामगचे प्रेम, जिव्हाळा आनि कष्ट पन दिसले.जाता जाता, नाना पातेकर म्हणाले तसे- भाईना वाढदिवसाचि सग्ळ्यात मोठी भेत सुनीताबाईनी दिली--त्याच भाईन भेटायला गेल्या.
ही साइट सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
सुनीताबाई 'उप'देशपांडे यांचा मृत्यु मनाला चटका लाऊन गेला..त्यांच्या आत्म्यास शांती लाभों हीच इश्वरचरणी प्रार्थना !!
दिपक, ही सुनिताबाई गेल्याची बातमी वाचल्यावर तू या ब्लॉगवर नक्की त्यांना आदरांजली वाहशील हे माहित होतं. हा लेख वाचताना खरंच हळवं व्हायला होतं..."मी आहे मनोहर तरी" वाचलं आणि खरं तर मला खूप विचित्र फ़िलिंग आलं होतं पण हा लेख त्यातले माझे झालेले बरेचसे गैरसमज दूर करणाराही आहे..धन्यवाद.
Khupach chan lekh...ya sarv aathavani vachun dolyatun pani aal...Pula aani Sunitabai yanchya aatmyas chirshanti labho hich eshwarcharni prarthana...
Beautiful...!!!
फारच छान ब्लॉग आहे, मनापासून धन्यवाद!
khuch apartime :)
'खाद्दजीवन' म्हणजे फारच झालं, माझे खाद्यजीवन हा लेख वाचलेला नाही कां तुम्ही?
Post a Comment