Monday, October 14, 2019

कॉमेडीचे चालते फिरते दुकान: पु. ल. आणि स्टॅन्ड अप

सध्या सॅन्डअप कॉमेडी शो ला चांगलीच पसंती मिळत आहे. याच शोधून अनेक कलाकार आपल्याला गवसले. पोट धरुन हसवसा हसवता शेवटी अंतर्मुख कराला लावणारे हे शो अखेरर्पंत प्रेक्षकांना अक्षरशाः खिळवून ठेवतात. याच शोज् चा थेट संबंध महाराष्ट्राच्या लेखनीने पोट धरुन हसायला लावले त्या पु.ल. देशपांडे यांच्याशी आहे. पु.ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्ली मध्ये रेखाटलेल्या अनेक व्क्तीचित्रांवर अनेक स्टँडअप शो होतील इतका त्यात विनोद भरलेला आहे. यंदा पु.ल.यांची जन्मशताब्दी साजरी होत असताना स्टॅन्डअप कॉमेडी सारखे शोजही प्रेक्षकांच पसंतीस उतरत आहेत.


मराठी रंगभूमीने आजतागायत अनेक कौटुंबिक, ऐतिहासिक, सामाजिक नाटकांना आपल्या व्यासपीठाने खिळवून ठेवले आहे. संगीत नाटकांनी तर प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध केले आहे. संगीत सौभद्र, संगीत मानापमान, कट्यार काळजात घुसली यासारख्या या संगीत नाटकांची ताजीतवानी आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. एकीकडे सामाजिक नाटकांची धूम असताना विनोदी नाटकांनीही रसिक प्रेक्षकांना सात मजली हास्याची अनुभूती दिली. एक काळ होता जेव्हा पु. ल यांच्या वार्‍यावरची वरात, अत्रेंची मोरूची मावशी यासारख्या नाटकांनी माहोल केला होता. 

पुढे विनोदा मार्फत स्टॅन्ड अप कॉमेडी या नवख्या या कलेचा जन्म झाला. स्टॅन्ड अप म्हणजेच सर्वांसमोर आपल्याला जे जे वाटतंय ते परखडपणे मांडणे . यासाठी आपल्या अंगी असलेल्या निरीक्षणक्षमतेचा कस अगदी पिळवटून निघतो. कॉमेडीयन हे टोपण नाव स्टॅन्ड अप सादर करणार्‍याला दिले गेले. विनोदी लेखनाचे स्टॅन्ड अप म्हणजेच फ्री फॉर्म असल्याचेही म्हटले जाते. एखाद्या विषयी किंवा एखाद्या प्रसंगाविषयी विस्तारण करणे आणि हेच विस्तारण समोर बसलेल्या प्रेक्षक वर्गाला आपलेसे वाटणे म्हणजे सादर केलेला स्टॅन्ड अप यशस्वी झाला आहे याची पावतीच! भारतामध्ये स्टॅन्ड अप चा उगम हा 70, 80 च्या दशकातच झाला होता. तेव्हा ह्या कलेला स्टॅन्ड अप म्हटले जात नव्हते. 2009 नंतर या गोष्टीचा सगळीकडे बोलबाला झाला. आणि याच स्टॅन्ड अपची नाळ थेट पु. ल देशपांडेंशी जुळली आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. पु. लं.यांनी 70 ते 80 च्या दशकात म्हटलेले प्रसंग आजच्या घडीलाही तेवढेच संबंधित कसे करू शकतात ही एक वेगळीच अनुभूती आहे. अंतू बर्वा, चितळे मास्तर, रावसाहेब आणि अशी बरीच पात्र त्यांनी अशाप्रकारे रंगवली आहेत की त्यांच्यावर कितीही विनोद केलेला असला तरी कथेच्या शेवटी आपसूकच सहानभूती निर्माण होते. आणि हे सगळं होत असताना डोळ्याच्या कडा कधी पाणावून जातात हे कळतही नाही. 

पु. लंची निरीक्षणक्षमता एवढी अफाट होती की पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर डाकखिडकीच्या काउंटरची आणि भोकाची उंची ही फक्त पलीकडल्या मास्तराची टाळू आणि काही भाग पाहण्यासाठीच असावी असे त्यांना वाटावे ! त्यातच कमी म्हणून की काय त्यांनी रंगवलेल्या दामले मास्तर या पात्राची तुलना हरणटोळ सापासोबत करावी याचेही कौतुक. हे वर्ष पु. लंच जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा होतंय आणि आजही त्यांच्या साध्या लिखाण शैलीने हरएक वर्गाच्या माणसाला आपल्या विचारांत गुंतवले आहे. 

स्टॅन्ड अपची कमालच ती आहे की सगळे पात्र तुम्हा एकट्यालाच रंगवावी लागतात. प्रेक्षकांसमोर आपल्याला जे जाणवतंय, आपण जे पाहतो याचं सार लोकांसमोर मांडणे म्हणजेच स्टॅन्ड अप हे जर पु. लंना त्याकाळी समजलं असतं तर आज त्यांच्याच नावाचं पेटंट बनलं असतं . 

नंतरच्या काळात टेलिव्हिजनच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे रोपटं रुजू झालं. 1986 मध्ये जॉनी लिव्हरनी होप 86 या कार्यक्रमात सादर केलेल्या स्टॅन्ड अपला लोकांनी उचलून धरलं पुढे पुढे ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमानी आपली मूळ भारतीय सिनेसृष्टीत रोवायला सुरवात केली. विनोदी कार्यक्रमांची मागणी आणि लोकप्रियता भारतात वाढायला लागली. राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा या मंडळींनी घराघरात स्टॅन्ड अप पोहोचवला. नंतर काळाच्या ओघात या वार्‍यांचा वेगही कमी झाला. 

पुन्हा एकदा सगळीकडे शांत वातावरण असताना इंटरनेटच्या माध्यमातून स्टॅन्ड अपनी फिनिक्स पक्षा सारखी झेप घेतली.धन्य ते डिजिटल संक्रमण ज्यानी विनोदाचा वारसा देखील वेगाने बदलला. वेब सिरीज आणि युट्यूबच्या चॅनेल्सनी तरुणाईला नावे व्यासपीठ मिळवून दिले. तरुणाई झपाटल्यासारखी युट्यूब वरून स्टॅन्ड अप पाहू लागली. सेन्सॉर बोर्डचे बंधन नसल्याने तरुणाई अनेक नवीन विषयांवर मोकळेपणाने व्यक्त होऊ लागली. सुरवातीच्या काळात इंग्रजी आणि हिंदी भाषेतून विनोद सादर होत असताना मराठी तरुणाई आपल्या रांगड्या आणि सोज्वळ भाषेसह मैदानात उतरली. 

याचीच प्रचिती होते ते भारतीय डिजिटल पार्टी (भाडीपा ) नावाच्या पहिल्या वाहिल्या मराठी युट्यूब चॅनेल मधून. आज त्याला लाखो सबस्क्रायबर्स आहेत. पु. लंनी सादर केलेल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील पात्रांसारखा प्रयोग भाडीपा ‘नमुने’ मधून सादर करीत आहेत. आणि या गोष्टीला संपूर्ण नेटकर्‍यानी डोक्यावर उचलून धरले आहे.
उघडपणे कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टीनां वाच्यता मिळाल्याने तरुणाईने खूपशा मराठी स्टॅन्ड अप ला पसंती दिली आहे. सध्या चर्चेत असलेले विषय म्हणेज मराठी मध्यमवर्गीय माणूस, मुंबई लोकल आणि मी, पुणेकर जगात भारी या व्हिडियोंनी लाखों पेक्षा जास्त प्रेक्षकवर्गाला आपलेसे केले आहे.
आज पुलं नंतर एवढा काळ लोटला तरीही त्यांच्या कॉमेडीच्या चालत्या फिरत्या दुकानाला अध्याप टाळा लागलेला नाही याचे नवलच!

लेखिका: पूजा अजित कोर्लेकर

1 प्रतिक्रिया:

Kanchan Karai said...

दीपक, अजून ब्लॉग वाचला नाहीये पण तू हा ब्लॉग अजूनही बहरलेला आहे हे पाहून छान वाटलं आज जन्मशताब्दी पुलंची. जेव्हा त्यांची साईट नव्हती तेव्हा तुझा ब्लॉग होता. त्यांची पुस्तकं हातात नसली तर तुझा ब्लॉग वाचून समाधान व्हायचं. तुलाही आज खूप खूप शुभेच्छा आणि ब्लॉगसाठी आभार.