Saturday, December 12, 2015

पुलंना लिहिलेलं पत्र

मी अमोल लोखंडे. भाईंचा चाहता. किती मोठा ते सांगायला उचित परिमाण सध्यातरी उपलब्ध नाहीये. गेल्यावर्षी वाढदिवसानिमित्त मी त्यांना पत्र लिहिलं होतं. तुमचे ब्लॉग वाचत असता असं वाटलं की तुमच्याशी ते पत्र शेअर करावं!
जरूर वाचा!!


तीर्थस्वरूप भाई,
आपल्या चरणी बालके अमोलचा साष्टांग नमस्कार.
पत्र लिहिण्यास कारण की, येत्या आठ नोव्हेंबरला तुमचा जन्मदिवस आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! खूप दिवसांपासून... नाही खूप वर्षांपासूनचा आपला स्नेह आहे. (स्नेह हा शब्दही काही योग्य वाटत नाहीये.. त्यापेक्षा नातं हा शब्द योग्य) तर खूप वर्षांपासूनचं आपलं नातं आहे. मी तुमचा नातू आणि आमचे आजोबा! बरोबर ना? हे काही एका रात्रीत निर्माण झालेलं नातं नाहीये किंवा कुणी लादलेलंही नाही. हे आपोआप निर्माण झालेलं स्वीकृत नातं आहे. तसंही सध्याच्या काळात लादलेल्या नात्यांपेक्षा आपणहून स्वीकारलेली नातीच जास्त टिकाऊ असतात. माझ्या दुर्दैवाने मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही. तसा मी काही सखाराम गटणे नाही; त्यामुळं माझं वाचन अफाट वगैरे नाही. दहावीनंतरच्या सुटीत सहज उत्सुकता म्हणून मी तुमच्या रावसाहेब, हरीतात्या व नारायण या कथा ऐकल्या. विश्वेश्वराचा तो एक संकेतच असावा! मी आयुष्यभर ऋणी आहे त्या क्षणाचा ज्याने माझ्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण निर्माण केलं. कारण भरकटण्याच्या त्या अजाण वयात मला एका वेगळ्या खजिन्याचा शोध लागला होता. असा खजिना जो कितीही लुटला तरी न संपता वाढतच जाणारा. आयुष्यात पहिल्यांदा मला खरा आनंद गवसला. तुमच्यापासून काय लपवणार म्हणा! तुमच्या कथाकथनाच्या जवळपास सगळ्या ध्वनीफितींचा संग्रह हा मी बाबांच्या खिशातून पैसे चोरून केलाय. काय करणार! व्यापारी प्रवृत्तीच्या दृष्टीने जिथे 'साहित्य' म्हणजे ज्याची विक्री करून चार पैसे नफा मिळवण्याचीच गोष्ट असते तिथे हे माझं नवं वेड कसं मान्य होणार? तरी त्यातून कसंबसं अंग चोरत मी माझी हौस पुरी करत होतो. आजपर्यंत तुमच्या सगळ्या ध्वनीफितींची असंख्य पारायणं झाली पण तरीही त्यातून प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच शोध लागला. सततच्या अशा ऐकण्याने माझ्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आणि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मला तुमचीच ती मिश्कील मूर्ती दिसू लागली. एकदा (एकदा नाही कैकदा) तुम्ही माझ्या स्वप्नात आला होतात. तुम्हांला आठवतंय? अशाच एका स्वप्नात रावसाहेबांनी मला फोनवरून तुम्ही बेळगावात येणार असल्याची वर्दी दिली होती आणि मी धावतपळत पडत तुम्हाला भेटायला आलो होतो. 'रिझ' थेटराच्या त्या कट्ट्यावर कितीतरी वेळ आणि कितीतरी विषयावर आपण गप्पा मारत बसलो होतो. चार्लीबद्दल, अॉस्कर वाईल्डबद्दल काय भरभरून बोलला होतात तुम्ही! चार्लीबद्दल मी आधीपासून बरंच ऐकून होतो पण अॉस्कर वाईल्ड हे नाव प्रथम तुमच्या तोंडूनच प्रथम ऐकलं. त्यारात्री इंटरनेटवरून अॉस्कर ची चार नाटके ध्वनीफितीच्या स्वरूपात मिळवली आणि ऐकली. 'The Picture of Dorian Gray', 'A Woman of No Importance', 'The Importance of Being Ernest' आणि 'Lord Arthur Savile's Life' इ. नाटकांचं ध्वनीप्रसारण बीबीसी रेडिओवरून झाले आहे. तसं माझंही इंग्रजीचं ज्ञान हे इंग्रजांनी हाय खावी असंच आहे. पण तरीही अॉस्करची शैली इतकी साधी आणि सरळ होती की मला समजण्यास जास्त अडचण आली नाही. अजून त्याचं खूप काही वाचणार आहे.

चार्लीबद्दल तर काय सांगावं? उगाच शब्द वाया घालवणार नाही. अफलातून माणूस एवढंच म्हणेन. त्याचे बहुतेक सर्व सिनेमेही मी कैकवेळा पाहिले आहेत. याचे सिनेमेही काळाच्या समांतर जातात. द किड, सिटीलाईटस्, मॉडर्न टाईम्स, द सर्कस, द ग्रेट डिक्टेटर किती नावं सांगू!

तुमच्यामुळे माझ्या मनात जसं चार्लीबद्दल आकर्षण निर्माण झालं तसंच ते पंडित भीमसेनजी, पंडित वसंतराव देशपांडे, गदिमा यांच्याबद्दलही झालं. हे तुमचे माझ्यावर झालेले संस्कार आहेत असं मी मानतो. काय भारी चित्र असेल ना ते? तुम्ही सगळी मंडळी रात्र-रात्र वेगवेगळ्या विषयावर गप्पागोष्टी करत बसला आहात, अधूनमधून गाण्याच्या फर्माईशी पूर्ण करत आहात! याचा माझ्या मनावर असा काही परिणाम झाला की मी माझ्या आजूबाजूच्या कलाकार आणि कलंदर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊ लागलो. शोधल्याने सापडते. माझंही मैत्र विस्तृत झालं. यात वयाची, ज्ञानाची कसलीही अट नाही. प्रत्येकजण हा आनंदभोगी. कुणी गायक, कुणी वादक, लेखक, नृत्यकलाकार, चित्रकार.. खूप आणि खूपच. याबाबतीत मी रावसाहेबांचा आदर्श समोर ठेवला. मुक्त आस्वाद घेण्याचा. तुम्हाला एक सांगायचं राहिलंच; त्यादिवशी माझ्या घरी साक्षात् पंडित भीमसेनजी आले होते, आले ते आपल्या वाद्यवृंदासह तडक माझ्या खोलीत शिरले. मला काहीच कळेना. माझ्याशी एकही शब्द न बोलता पंडितजींनी 'जो भजे हरी को सदा' पासून ते राम, कृष्णाची सगळी भजने ऐकवली. सगळे एकामागून एक धक्के! शेवटी ती मैफिल संपली आणि त्यांचे सहकारी ती सगळी वाद्यं बंद करून गोल रिंगण करून बसले. फारच मजेशीर सीन होता तो. तुम्हाला सांगतो त्या रिंगणात मी असा कपाळावर प्रश्नचिन्ह घेऊन बसलेला की हे नेमकं काय चाललंय? आणि माझ्याशी अजूनही कुणी काहीच का बोलत नाही? माझ्यासमोर पंडितजी बसले होते शेवटी एकदाचे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, "आता बोल तुला काय बोलायचं आहे!" मी अजूनही धक्क्यातून नीट सावरलो नव्हतो. त्या परिस्थितीत मी त्यांना काय विचारावं? तर, "पंडितजी, तुम्ही पुलंचा सहवास अनुभवला आहात, त्यांच्यासोबत तुमची खूप चांगली मैत्री होती, तुमच्या कितीतरी मैफिलीत पुलंनी हार्मोनियमवर साथ केली. मला त्यांच्या काही आठवणी सांगाल का?" पंडितजी हसले व म्हणाले, "अरे खूप आठवणी आहेत. त्या सगळ्या सांगणं काही शक्य नाही पण भाईबद्दल एकच सांगतो. माझ्या पूर्वजन्मी देवाने प्रसन्न होऊन मला वर मागायला सांगितला होता. मी म्हटलं मला स्वर्गात राहायचं आहे." देव हसला आणि तथास्तु म्हणाला. पाहतो तो काय तर मी पुलंच्या काळात जन्मलो होतो. नुसता जन्मलोच नाही तर त्यांच्यासोबत मैत्रीही झाली." भाई, ते ऐकून माझ्या अंगावर शहारा आला आणि दचकून जागा झालो. तेव्हा समजलं की हे स्वप्न होतं. (त्यादिवशी मी बराच वेळ पंडितजींनी गायलेली भजने ऐकली होती बहूतेक त्यामुळेच हे स्वप्न पडलं असावं). अहो पंडितजींचं हे उत्तर ऐकून खरं सांगू का मला त्यांचा हेवा, असूया, मत्सर वगैरे वगैरे जे काही असतं ना ते सारं वाटू लागलं. मी ना भाई, सत्तरेक वर्षे आधी जन्मलो असतो तर खूप भारी झालं असतं. अजिबात तुमची पाठ सोडली नसती. (ती तशी आताही सोडलेली नाहीय हा भाग अलाहिदा!)
मी रत्नागिरीला शिकायला होतो त्यावेळी गाडी जेव्हा हातखंब्याच्या फाट्यावरुन जायची तेव्हा तुम्ही, तो मधू मलुष्टे, ती सुबक ठेंगणी, ते मास्तर, झंप्या, उस्मानशेट, स्थितप्रज्ञ कंडक्टर-डायवरची जोडगोळी, बिनधास्त कुठेही पानाच्या पिंका टाकणारा तो आर्डर्ली, असंख्य पिशव्या आणि मुख्य म्हणजे ते खादीधारी पुढारी व अपघातग्रस्त म्हैस या सर्वांची आठवण येत असे. यापैकी कुणीतरी तिथे दिसेल का म्हणून नकळत गाडीच्या खिडकीतून डोकावायचो आणि त्यापैकी बरीचशी पात्रे दिसायचीही; पण नाव बदलून! तशी तुमची सगळीच पात्रे मला सगळीकडे दिसतात. मी रत्नांग्रीत पाऊल टाकल्यावर पहिल्यांदा मधली आळी शोधून काढली. बरेच अंतू भेटले आणि अनुभवले. काही जणांना वाटतं की अंतू, नारायण, चितळे मास्तर, रावसाहेब म्हणजे विनोदी पात्रे आहेत आणि ती खळखळून हसवतात. 'पोफडे उडालेल्या भिंती आणि गळकी कौलै पाहायला वीज हो कशास हवी?', 'अरे दुष्काळ पडलाय इथे आणि भाषणे कसली देतोयस? तांदूळ दे!' 'अहो बायकोचं हेल्थ बोंबललं; कायतर टिबीगिबी झालं असणार! सिनेमाचं यवडा मोठा गल्ला येतंय फुड्यात!! कसं आवरणार मन?', 'वो पीयल, हे माणूस फुडारी होतंय म्हणजे काय शिकल्यावर होतंय वो सांगा की?', 'कशाला आला होता रे बेळगावात?', 'पुर्शा, फुकट रे तू! टाईम्स हँव चेंजड्' ही वाक्ये फक्त हास्याचे फवारे उडण्यासाठी नाहीत असं माझं ठाम मत आहे. भावूक नंदा, उचल्या हरी काळूस्कर, बढाईखोर नाथा कामत ही मात्र फार मजेशीर पात्रं आहेत. बाकी तुम्ही तुमच्या कथाकथनात या व्यक्तीरेखांना जे आवाज दिलेत ना ते अगदी त्यांचा स्वभाव व्यक्त करतात. त्यातल्या एकाचाही आवाज दुसऱ्या कुणाला दिलेला नाही हे विशेष. मी तुम्हाला विनोदी लेखकच नाही तर तत्त्ववेत्ता समजतो. तुमची भाषणे वाचल्याचा हा परिणाम दुसरं काय! अमेरिकेतील तुमचं अध्यक्षीय भाषण तर कळस आहे. १९८२ साली म्हणजे आजपासून साधारणपणे ३२ वर्षे आधी तुम्ही मुलांवर संस्कारांबद्दल तक्रार करणाऱ्या पालकांचे कान टोचणे खरंच गरजेचे होते. आई-वडिलांपेक्षा जास्त संस्कार हे आजी-आजोबा करत असतात. ह्यात जर ते नातवंड काँव्हेंटला शिकत असेल आणि घरात येऊन इंग्रजीतच बोलत असेल तर मग कसं होणार? अशामुळे आजीचा आणि नातवाचा संवाद संपत चाललाय हे तुम्ही जे म्हणालात ते मी अगदी तंतोतंत अनुभवलंय. आपलं रक्त आपल्या समोर बागडत असतं आणि आपण त्याच्याकडे परक्यासारखं पाहत राहतो हे चित्र फारच क्लेशदायक आहे. बरं त्या लेकराच्या आई-वडिलांचा इंग्रजीतच बोलण्याचा किती अट्टहास असतो बघा; स्वतःचं इंग्रजी बिनअस्तराचं आणि बाता अशा मारायच्या जणू त्यांच्या तोंडून शेक्सपियरच बोलतोय. असो. तुम्ही कान टोचणंच योग्य होतं.

तुमचं लिखाण हे काळाच्या समांतर जाणारं आहे म्हणूनच की काय आजच्या या टेक्नोसेव्ही महाराष्ट्रात तुमची लोकप्रियता टिकून आहे. आम्ही फेसबुक आणि व्हॉटसअपवर 'आम्ही असू पु.ल.कित' या नावाने एक समूह तयार केला आहे. तुम्हाला सांगतो या समूहात विशी ते अगदी सत्तरीत असणारे सदस्य आहेत. काहीजण अनेक वर्षांपासून परदेशात राहतायत. बरेचसे कॉलेजात शिकत आहेत आणि प्रत्येकजण हा तुमच्या साहित्याचा आनंदभोगी आहे. 'हे डूड, हाय बेब्स' म्हणणारी पोरं ज्यावेळी अंतूशेट, नारायण, रावसाहेब वगैरे मंडळींबद्दल एकमेकांना टाळ्या देत दिलखुलास गप्पा मारताना पाहतो त्यावेळी जगाला ओरडून सांगावंसं वाटतं की नाही हो नाही, आम्ही बिघडलेलो नाही! अजूनही आम्हांला चांगल्या-वाईटाची जाण आहे. भाई, तुमच्या लेखणीने आमच्या मृतप्राय संवेदना जागृत केल्या. जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघायला शिकवलं. आमची नजर सौंदर्यासक्त बनली व जीवन समृद्ध झालं. आयुष्यातील दुःखांची काटेरी टोकं तुमच्या नर्मविनोदी कानशीने बोथट झाली आणि मनं अनैतिक विचारांनी रक्तबंबाळ होण्यापासून वाचली. याहून अधिक ते काय हवं? देवाला समजलं की आपल्या सगळ्याच लेकरांचं दुःख आपण स्वतः काही हलकं करू शकत नाही. मग त्याने तुमच्यासारखे दूत निर्माण केले आणि या मर्त्यलोकात पाठवले. याबद्दल त्या देवाचे मात्र मी आभार मानतो. आता इथेच थांबतो. बाकी तिकडच्यांची चैनी असणार! रंभा-उर्वशी वगैरे काळजी घेत असतीलच!!
जन्मदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा!

तुमचं अजाण नातवंड,
अमोल लोखंडे
७५८८०१९८८४
(या नंबरवर कॉल येतो. पूर्ण पत्ता दिला तर पाहूणे येतील.)

Monday, November 9, 2015

प्रिय पु. ल. काका

प्रिय पु. ल. काका ,

लहानपणी मला रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती.  मग मी हळू हळू मोठी झाले. गोष्ट ऐकायची सवय मात्र कायम राहिली. पण तो जादू करणारा आवाज आता बदलला होता. तो होता तुमचा … पुलकीत आवाज. माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले. आयुष्यात असे किती पण अवघड उदास प्रसंग आले आणि असे वाटले कि आज तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतेही कथाकथन किंवा एकपात्री निवडावे आणि ऐकावे मन प्रसन्न होते आणि माणूस नावाच्या प्राण्यात पुन्हा एकदा प्रेमात पडते. तुमच्या काही काही लिखाणानी माझ्या वर फार सुक्ष्म संस्कार केले आहेत. तुम्हाला गम्मत सांगू, तुमचे चितळे मास्तर मला खरच भेटले होते , ज्यांनी मला शिकवले , आणि माझ्या बाबांनाही , ते पण कोणता हि विषय उत्कृष्ट शिकवू शकायचे , आणि तेव्हा पासून तुमची हि सगळी पात्रे , माणसे अगदी पूर्ण नाही तरी थोडी बहुत तरी सापडायला लागली . तुमच्या मुळे , माणसे वाचायचा छंद जडला . नाटके खरे तर बघायची असतात (तशी मी घरात कधी कधी ती करते सुद्धा ), पण ती वाचायची आवड मला का लागली माहितीये , कारण तुमचे "तुज आहे तुजपाशी " , माझ्या हातात पडले, आणि मी पुन्हा पुन्हा वाचून काढले . मी खूप नाटके पहिली किंवा वाचली त्या नंतर , पण का ठावूक या नाटकाशी माझे वेगळे नाते आहे , तीच पात्रे मला दरवेळी नवे काही तरी देवून जातात . काकाजी , आचार्य, उषा , सतीश , गीता , श्याम जणू माझे कुटुंबातले च आहेत . दर वेळी वाचताना , प्रत्येक मधला एक नवा विचार आणि भूमिका सापडते आणि जगण्याचा अर्थ हि.

तुमचा "नंदा प्रधान ","बबडू " "तो ", "भय्या नागपूरकर "माझ्या मनाला फार चटका लावून गेले . एक मात्र नक्की ह, "ती फुलराणी" मधील "तुला शिकवीन चांगलाच धडा " हे स्वगत , नाटकात काम करायची आवड असलेल्या प्रत्येकाला , लहान पाणी करून पाहावे असे वाटतच , आणि ती फुलराणी मात्र पक्की आपली मराठी वाटते बर का , भाषांतर असून हि . प्रवास वर्णन हे किती रंजक असू शकते ते पण तुम्हीच सांगितले ,त्यामुळे एका नवा साहित्य प्रकार आवडला . बटाट्याचा चाळी मधले चितन , बरच काही विचार करायला लावून गेली . आणि मराठी वांग्मायाचा गाळीव इतिहास , उपहासत्मक विनोद किती सकस असू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे . तुम्ही साहित्याची इतकी दालने खुली करून ठेवली आहेत न , कि कोणताही साहित्य प्रकार निवडावा आणि तुम्ही तो किती मनोरंजक पण काही हि गाजावाजा न करता एक विचार देवून ठेवणारा केला आहे . मी दर वर्षी तुमच्या बद्दल लिहित आलीये , पण शब्द आटले तरी तुमच्या बद्दलचे पेम आणि आदर कधीच कमी होणार नाही . अलौकिक प्रतिभा असूनही , पैश्याचा मागे न लागता , केवळ माणसांवर प्रेम करणारा आणि आपल्या साहित्य तून निरोगी मने तयार करणारा हा कलाकार . अर्थात तुमचा संसार तुमच्या पत्नीने इतका समर्थ पणे सांभाळला , म्हणून तुम्ही आम्हाला इतके भेटत गेलात.

तुमची पुस्तके आणि तुमचा आवाज हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे , इयत्ता चौथी पासून ते आज पर्यंत तुमचे लिखाण माझ्या साठी अजून तितकेच ताजे टवटवीत आहे आणि काही तरी देवून जाणारे आहे .
कारण कदाचित माझ्या वयानुसार त्यातून मला नवीन काही तरी सापडेल असे काही तरी तुम्ही त्यात दडवले आहे . चौथीत असताना मला त्यातले किती कळले असेल ते गुळाचा गणपतीच जाणो . पण माझा "गटण्या " होण्याची सुरवात मात्र झाली हे नक्की बर का . आज काल , समोरच्याला कळणारे आणि भिडणारे असे लेखन बहुधा चांगल्या लेखनात मोडत नाही , सतत काही तरी माहितीपर, तात्विक असे तरी लिहिले जाते किंवा मग ज्याला विनोद म्हणावे कि नाही अश्या प्रकारचे विनोद , कार्यक्रमात आणि लिखाणात दिसतात , म्हणजे अगदीच निराशावादी चित्र नाहीये तसे, तुम्ही कौतिक करावे असे काही चित्रपट आणि नाटके येत आहेत अजून , आमची मराठी अजून तशी जिवंत आहे , पण नवीन पुस्तकांचे म्हणाला तर जर अवघड चित्र आहे . रंगून जावून वाचावे किंवा ज्यामुळे वाचनाचे आवड निर्माण व्हावी असे तुमच्या सारखे लिहायला कधी जमेल का हो आम्हाला ? मान्य आहे कि तुम्ही आणि तुमचे लिखाण हे कालातीत आहे , पण आमचे दुर्दैव कि आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात भेटू नाही शकलो , पत्र व्यवहार करू नाही शकलो , असे कधीच नाही का होणार कि तुम्ही परत भेटाल ? . कसे झालाय माहितीये , पांडुरंग तोच आणि तिथेच असून पण वारकरी दर वर्षी नियमाने जातात कि त्याला भेटायला , तसे किती हि वेळा वाचले तरी तुमच्या लिखाणाची वारी करायची हे आमचे पण व्रत आहे , कारण हि ओढच जबरदस्त आहे .

माझे ना जरा गटण्या सारखे आहे , किती हि लेखक वाचले न तरी " पु ल आणि ____" 
मी ठरवले आहे आता कि आपल्याला मिळालेला हा आनंद , वाटायचा आपण , म्हणूनच , ज्यांना कुणाला पु ल न भेटायचे आहे , त्यांच्या साठी , आमचे दरवाजे नेहमीच खुले आहेत
तुज आहे तुजपाशी असे म्हणताना
तुम्ही आम्हाला काय दिले हे आम्हासच ठावूक
आमच्या पाशी , आजू बाजूला पण हे सगळे होताच
पण कोणत्या नजरेतून पाहायचे ते तुम्ही शिकवलत
गुरु दक्षिणा काय देणार तुम्हाला आम्हाला 'बस इतकाच सांगू कि
तुम्ही माणसांवर , साहित्येवर , कवितेवर , संगीता वर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम केले
तसच जमल तर करू आम्ही पण , तुमच्या इतके नाही जमणार कदाचित
पण १०० पर्सेंट नाही तरी छोटे मासे होऊ कि आम्ही
- तुमची एक वाचक

शीतल जोशी
८ नोव्हेंबर २०१५
मिसळपाव 
मूळ स्त्रोत --> http://www.misalpav.com/node/33618

Thursday, July 30, 2015

माझा एक अकारण वैरी

मराठी हॉटेलात तर मी गेलो की माधुकरी मागायला आलो अशीच सर्वांची समजूत होत असावी. आधी दहा दहा मिनिटे माझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. माझ्या नंतर माझ्यापुढे टेबलाला भिडलेले लोक गिळून जातात.

"अरे, आमची ऑर्डर कां नाही घेत?"

"बोला ना! आम्ही काय मनातले ओळखणारे अंतर्ज्ञानी आहोत की काय?"

आरोग्यमंदिरछाप हॉटेलात मला हा जबाब मिळाला होता. मी सहसा ह्या आरोग्यवाल्या हॉटेलात जातच नाही. तिथल्या मालकापासून फडकी मारणाऱ्या पोरापर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण घमेंड असते. आपण वास्तविक पत्रकारच व्हायचे, पण केवळ देशाचे आरोग्य सुधारायचे म्हणून पत्रावळी गोळा करतोय असा काहीसा भाव! एकतर पदार्थांची नावे निघंटु किंवा तत्सम आयुर्वेदिक ग्रंथातल्या नावासारखी चमत्कारिक!

'खदिरखाद्य' हे नाव वाचून मी भेदरलो होतो. श्रीखंडाचे पातेले विसळून 'पीयूष' करणारी ही जमात सर्वोदयकेंद्राची वाट चुकून आरोग्यमंदिरात आली आहे. "हे 'खदिरखाद्य' म्हणजे काय हो?" मी जरा हसत विचारले. तो 'ठोठावा म्हणजे उघडेल' या पाद्री चालीवर म्हणाला, "खाऊन पहा म्हणजे कळेल." एकूण वेटरजातीने आणि तिकीटकलेक्टरांच्या जमातीने हसायचे नाही अशी प्रतिज्ञा केलेली असावी. आतापर्यंत बटाटापुरीबरोबरची चटणी माझ्या धोतरावर सांडलेला एक वेटर तेवढा हसताना मी पाहिलाय. हसणारा तिकिटकलेक्टर दिसायचा आहे. पट्टीचे पानवाले हसतात. गादीचा पानवाला नाही हसत. पोष्टाच्या खिडकीतला माणूस कधीमधी हसतो. तारेच्या खिडकीतला सगळ्या जगाशी 'कडकटृ' करता करता 'गट्टी फू' करून बसलेला! कदाचित दिवसातून बऱ्याच वेळा 'काका एक्सपायर्ड', 'तात्या एक्सपायर्ड' असल्याच तारा करायला लागल्यामुळे त्याला सारे जगच सुतकात असते असे वाटत असेल. काही धंद्याचे आणि हसण्याचे इतके का वावडे? की हे प्राणिमात्र माझ्याच नशिबाला येते? बहुधा माझ्याच नशिबाला असावे. पूर्वी शाळामास्तर हसताना आढळला तर दिपोटी त्याला आंगठे धरून उभे करत असावे. पण ज्येष्ठ पुत्र चि. शंकर तथा गिरीश याची हेडमास्तरीण माझ्याशी बोलताना विप्रलंभशृंगार केल्यासारखी रंगवलेल्या ओठातून सारखी हसली होती. विप्रलंभशृंगारातच मला वाटते तसे काहीतरी हसतात. कदाचित दुसऱ्या कुठल्यातरी शृंगारात असेल - मुद्दा आहे हसण्याचा. सारांश, वेटर ह्या किटाणूचे आणि माझे कां जमत नाही, हा मला प्रश्न आहे. असल्या प्रश्नाला यक्षप्रश्न म्हणतात. पण विषय वेटर हा असल्यामुळे 'भक्ष्यप्रश्न' हा शब्द अधिक योग्य ठरावा.

अर्थात वेटर आणि मी ह्यांतील अहिनकुलत्वाला (वेटर अही- मी नकुळ.) केवळ वेटरच जिम्मेदार नसावा. हॉटेलात जाऊन भजी खाणे हे माझ्या बालपणी गोहत्येच्या जोडीचे पातक मानण्यात येत असे. घरातला तीर्थरूप म्हणवून घेणारा वैरी, शाळेतला मास्तर नामक गनीम आणि वयाने वडील असणारी तीर्थरूपांचे स्नेही नावाची कौरवसेना गावातल्या हाटेलांच्या पायऱ्यांवर सदैव टेहेळणी करत बसल्यासारखी असे. आल्या-गेलेल्या पाहुण्यांनी खाऊसाठी म्हणून दिलेले पैसे लगेच जप्त होत. ते पैसे बोरू घोरपडे शाईची पुडी, कित्ते वगैरे आणण्यासाठी खर्च होत. इतिहासातल्या औरंगजेबाबद्दल साऱ्या दुनियेला चीड असेल; पण बापाला स्वतःच्या हातांनी नजरकैदेच्या बेड्या घालणारा औरंगजेब हा माझा आदर्श होता. असली पुत्ररत्ने जन्माला आल्याखेरीज 'बाप' नावाचे हिंस्र श्वापद वठणीवर येणे शक्य नाही, याची मला खात्री होती. ह्या जमातीच्या असल्या क्रूर वागणुकीमुळेच हॉटेल ही एक चोरून जाण्याची जागा अशी मानसशास्त्रीय प्रतिक्रिया किंवा असे होण्याला जे काही म्हणतात ते झाले. म्हणून आजदेखील हॉटेलची पायरी चढताना काही कारण नसताना चेहऱ्यावर एक चोरटेपणाची छाया किंवा छटा पसरते. आणि तरबेज वेटर ही छाया किंवा छटा नेमकी हेरतो. आणि त्याचा आत्मा ह्या गिऱ्हाईकात दम नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष कर, त्याने दहा वेळा पाणी मागितले तरी देऊ नकोस, चहाचा कप त्याच्यापुढे आदळ, त्याच्या टेबलावर फडका मारू नकोस, असे बजावत सुटतो.
- माझा एक अकारण वैरी (अघळपघळ) पु.ल.

Thursday, June 25, 2015

मनोहारी आठवण

मोठ्या टीपॉयवर ‘पुलं’चा प्रसन्न फोटो होता, त्याच्या एका बाजूला रवींद्रनाथ टागोर अन्‌ दुसऱ्या बाजूला चार्ली चॅप्लिनचा फोटो होता...

फ्लॅटच्या दारावरील ‘पु. ल. देशपांडे’ ही वळणदार आणि रंगीत अक्षरं पाहूनच मन रोमांचित झालं अन्‌ बेल वाजवली. दार उघडायला साक्षात सुनीताबाई! तोच करारी चेहरा, डोळ्यांवर चष्मा, रुपेरी केस, फिकट रंगाची साडी, चेहऱ्यावर अत्यंत शांत भाव! माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडं पाहून विचारलं, ‘कोण हवंय आपल्याला?’

‘‘मी साताऱ्याहून आलो आहे. हे पुलंचंच घर ना! मी पुलंच्या फोटोंचं दर्शन घ्यायला आलो आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे ना! दुपारच्या वेळी त्रास दिल्याबद्दल क्षमस्व,’’ एका दमात मी संपूर्ण स्पष्टीकरण दिलं. फ्लॅटचं दार उघडून ‘या’ असं म्हणत हॉलमध्ये बसण्याची त्यांनी खूण केली आणि हळूहळू आतील खोलीच्या दिशेनं गेल्या. हॉलमध्ये मोठ्या टीपॉयवर ‘पुलं’चा प्रसन्न फोटो ठेवलेला होता. फोटोला हार घातलेला होता आणि थोडी फुलं फोटोपुढे ठेवलेली होती. भिंतीवर एका बाजूला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा फोटो, तर दुसऱ्या बाजूला चार्ली चॅप्लिनचा फोटो होता. ‘पुलं’च्या फोटोसमोर दोन क्षण डोळे मिटून शांत बसलो. नेमकं त्या वेळी शेजारच्या फ्लॅटमधून कुमार गंधर्वांचं गाणं ऐकू आलं. खरंच गाणं चालू होतं की तसा भास झाला हे मला कळलं नाही; परंतु तो क्षण पकडून ठेवावासा वाटला. अर्थात, तसा तो क्षण कायमस्वरूपी मनात जपला गेलाच. तोपर्यंत हातात पाण्याचा तांब्या-भांडं आणि एका डिशमध्ये फळं घेऊन सुनीताबाई हॉलमध्ये आल्या. शांतपणे खुर्चीत बसत, ‘काय करता आपण?’ विचारलं. यावर भाबडेपणानं, ‘पुलंची पुस्तकं वाचतो’ या माझ्या उत्तरावर मंद हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळी येत जा. अलीकडे माझी तब्येत ठीक नसते.’’ त्यानंतर बहुतेक प्रत्येक वर्षी ‘पुलं’च्या जन्मदिनी आणि स्मृतिदिनी भांडारकर रस्त्यावरील ‘मालती-माधव’ या इमारतीमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये जाण्याचा योग आला. ‘पुलं’च्या जाण्यानंतर सुनीताबाई मनानं खचल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वतःचं लेखन आणि ‘पुलं’च्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन करण्याचं काम सुरू ठेवलं होतं. पुलंवरं लोकांनी अमाप प्रेम केलं. सुनीताबाई देखील सिद्धहस्त लेखिका, अभिनेत्री, संवेदनशील व्यक्ती. याहीपेक्षा त्यांची अधिक ओळख म्हणजे ‘पुलंची पत्नी’! अर्थात, सुनीताबाईंनीदेखील त्यांची ही ओळख मनापासून निभावली. ‘पुलं’मधील कलाकाराला पूर्णपणे मोकळीक देऊन त्यातील ‘व्यवहार’ पाहण्याचं किचकट आणि अवघड काम त्यांनी केलं. परंतु, हे करताना स्वतःच्या विचारांतील आणि वागण्या-बोलण्यातील स्पष्टपणादेखील ठाम ठेवला. त्यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकातील ‘पुलं’च्या स्वभावाचं थोडं स्पष्ट शब्दांत त्यांनी केलेलं विश्‍लेषण वाचून मी थोडंसं चिडूनच पत्र लिहिलं होतं. एका सामान्य आणि अनोळखी वाचकाचं पत्र म्हणून त्या त्याकडं दुर्लक्ष करू शकल्या असत्या; परंतु सविस्तर आणि मुद्देसूद उत्तर पाठवून त्यांनी सुखद धक्का दिला होता. शिवाय, वाचन कायम सुरू ठेवण्याचा सल्लादेखील दिला होता.

३ जुलै हा सुनीताबाईंचा जन्मदिन. उत्तम लेखिका म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहीलच; पण त्याचबरोबर ‘पुलं’सारख्या प्रतिभावान लेखकाला अप्रत्यक्षपणे प्रेरणा देणारी सहचरिणी म्हणून देखील त्यांची आठवण कायम राहील. स्वतः ‘पुलं’देखील विनोदानं म्हणायचे, ‘आमच्या घरात मी ‘देशपांडे’, तर ही ‘उपदेशपांडे’!’ या जगाचा निरोप घेतानादेखील सुनीताबाई मनाला चटका लावून गेल्या. त्या दुर्दैवी दिवशी आकाशवाणीवरील सकाळच्या बातम्यांत त्यांच्या निधनाची बातमी सांगितली गेली आणि वैकुंठ येथे साडेआठ वाजता अंत्यसंस्कार असल्याचं कळलं. अनेकजण वैकुंठकडे धावले; परंतु अगदी काही मिनिटं उशीर झाल्यानं माझ्याप्रमाणेच अनेकांना त्यांचं अंतिम दर्शन झालं नाही. आयुष्यभर वेळेचा काटेकोरपणा पाळलेल्या सुनीताबाईंनी जातानादेखील वेळ काटेकोरपणे पाळली होती. वैकुंठभूमीतील त्या अग्नीतून धुरांचे लोट हवेत विरत होते. त्यातील एका उंच जाणाऱ्या नादबद्ध लकेरीकडे पाहत उपस्थितांपैकी एक ज्येष्ठ नातेवाईक महिला म्हणाल्या, ‘‘पोहोचली सुनीता भाईंकडे!’’ सर्वांचेच डोळे पाणावले.

आजही भांडारकर रस्त्यावरून जाताना ‘मालती-माधव’ इमारतीवर लावलेल्या नीलफलकाकडं पाहून जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात.या दांपत्यानं आपल्याला ‘मनोहरी’ आठवणी दिल्या, त्या कायम तशाच राहतील.

डॉ. वीरेंद्र ताटके
बुधवार, १० जून २०१५
सकाळ (मुक्तपीठ)

Monday, June 15, 2015

पु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी - (उपेंद्र चिंचोरे)

पूज्य पु. ल. देशपांडे ह्यांचे मला आलेले पत्र आणि आमच्या दोन संस्मरणीय भेटी :

११ जून १९८२ रोजी, मी सकाळी डेक्कन क्वीनने मुंबईस निघालो होतो ! पुणे स्टेशनवर अगदी सकाळी सकाळी फलाटावर गाणं ऐकू येत होतं, "भेटी लागी जीवा", संत श्रेष्ठ तुकारामांचा हा अभंग, श्रीनिवास खळे - आण्णांचे संगीत आणि स्वरसम्राज्ञी तीर्थस्वरूप लतादीदींचा मधाळ आवाज ! मी भारावल्या अवस्थेत गाणं ऐकता ऐकता गुणगुणत होतो. पुणे स्टेशन मागे पडलं. माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने मला बोलतं केलं. "काहो, तुम्ही गुणगुणताहात, एव्हढं आवडतं कां हे गाणं ? चाल, शब्द कां स्वर ?"

मी उत्तरलो, "तिन्ही गोष्टी अप्रतिम आहेत. विशेष म्हणजे लतादीदींच्या स्वरांचा मी वेडा आहे".


दादर येईपर्यंत ते मला दिदिंविषयी विचारात होते, अन मी बोलत होतो. दादर जवळ आले, तसे ते म्हणाले, " हे माझे कार्ड, मी माधव कानिटकर, प्रपंच, बुवाचा संपादक, मला दोन-चार दिवसात, लताबाईंवर लेख लिहून द्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी छापतो. तुमची भाषा सुंदर आहे."

झालं, ह्या गोष्टीला आठएक दिवस लोटले. अन मी नोकरी करत होतो, त्या गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये एक दिवशी एक युवक मला भेटायला आला. तो म्हणाला, "मी केदार कानिटकर, बाबांनी लेख मागितला आहे. मी केदारला म्हणालो, "अरे अजून मी लिहिला नाही ". दोन दिवसांनी केदार कानिटकर पुन्हा मला भेटला, म्हणाला, "बाबांनी तुम्हांला संध्याकाळी घरी बोलावलंय". मी पुण्याच्या टिळक रोडवरील माधवराव कानिटकर ह्यांचे घरी गेलो खरा, ते म्हणाले, "अहो, लेख का ना लिहिला, लवकर लिहा, मी छापतो तुमचा लेख"! मी लेख लिहून, कानिटकर साहेबांना नेऊन दिला. सप्टेंबर १९८२ च्या विशेषांकामध्ये तो लेख प्रसिद्ध झाला. त्याकाळी विशेषांकामध्ये लेखक- कवींच्या नावाबरोबरच त्यांचा पत्तासुद्धा छापला जात असे !

रसिकहो, २ नोव्हेंबर १९८२ रोजी मला एक पत्र आलं, "१०१ रुपाली, शिवाजीनगर, पुणे ५", ह्या पत्त्यावरील पांढ-या स्वच्छ पोस्ट कार्डावर, शाई पेनने लिहिलेले ते पत्र होतं, आदरणीय "पु. ल. देशपांडे" ह्यांचे ! त्यांनी पत्रात लिहिले आहे :

" प्रिय उपेंद्र चिंचोरे, नमस्कार,
लताबाईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे,
पण आपल्या लेखातील भाव मला खूप आवडला,
त्याला आवर्जून दाद देण्यासाठी हे पत्र,
आपला,
पु. ल."

पु.लंचे पत्र पाहून अन् वाचून मी आनंदाने नाचू लागलो, ज्याला त्याला ते पत्र दाखवू लागलो !

बरोब्बर सहा दिवसांनी म्हणजे ८ नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस होता. रुपाली ह्या त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मी ८ नोव्हेंबर ८२ रोजी समक्ष गेलो. मोठ्या श्रद्धेने, मनोभावे मी पु.लंना नमस्कार केला. ती माझी त्यांच्याशी झालेली पहिली भेट होय !

पुण्यातील भांडारकर रोडवरील, वंदनीय पु. लंच्या "मालती माधव" ह्या निवासस्थानीही जायची सुसंधी मला लाभली होती !

पूज्य शांताबाई शेळके पुण्याच्या के. ई.एम. रुग्णालयात तीनशे पंधरा क्रमांकाच्या खोलीत औषधोपचार घेत असतांना, एके दिवशी, अचानक पु. ल. आणि सुनीतावहिनी भेटायला आले आणि मग काय विचारता ? हास्य कल्लोळ, आणि हास्य कल्लोळच !

शांताबाई म्हणाल्या, "भाई हे चिरंजीव चिंचोरे".....
त्यावर पु. ल. पटकन म्हणाले, "हो, लताबाईंविषयी संग्रह करणारे, लेख लिहिणारे,"

मी लगोलग त्यांचे चरणस्पर्श दर्शन घेतले. मी धन्य धन्य झालो. रसिकांनो, अश्या नामवंतांच्या सहवासाने म्या पामराच्या जीवनाचे खरोखर सोनं झालं . तुम्हीच सांगा, ह्या पेक्षा वेगळे सोने ते कोणतं ?

पुढे शांताबाई ब-या होऊन, दवाखान्यातून घरी गेल्या, आणि एक दिवशी पु.लंना देवाज्ञा झाल्याची कुवार्ता कानावर पडली, हाय, बालगंधर्वमध्ये झालेल्या शोकसभेला, स्वतःची तब्येत बरी नसतांना, शांताबाईंनी, पु. लंच्या शोकसभेला जाण्याचा हट्ट धरला. मी त्यांना घेऊन बालगंधर्वमध्ये गेलो. शांताबाई भरभरून बोलल्या. पु.लंच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या.

मी माझ्या शालेय जीवनापासूनच पु.लंचा रसिक वाचक झालो. असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, खिल्ली, तुका म्हणे आता, अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, ती फुलराणी, वटवट वटवट, आम्ही लटिके ना बोलू, वयं मोठं खोटं, पुढारी पाहिजे, अपूर्वाई, पूर्वरंग, गोळाबेरीज, हसवणूक, कोट्याधीश पूल. गणगोत, गुण गाईन आवडी, खोगीर- भरती, लेकुर उदंड झाली, वा-यावरची वरात, अशी अनेक पुस्तके एकरूप होऊन वाचली.

आजही ब-याचवेळा पुलंचं कुठलंही पुस्तक हातात घ्या आणि वाचायला सुरवात केल्यावर पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो.

मला आठवतंय, माझ्या कॉलेजच्या जीवनात मी "अंमलदार"मध्ये भूमिका केली होती.

गुळाचा गणपती, दुधभात, देवबाप्पा, देव पावला, हे पु. लंच्या सुंदर संगीतानी सजलेले चित्रपट आजही मनाच्या गाभा-यात जसेच्या तसे ठाकले आहेत !

निर्माते-दिग्दर्शक राम गबाले आणि माझी गप्पांची मैफल अनेकवेळा राम गबाले ह्यांच्या निवासस्थानी रंगायची, पुलंच्या आठवणी हमखास त्यात असायच्या. रसिक वाचकांनो माझ्या जीवनातील ते खरोखरच मंतरलेले दिवस होते ! पु.लंची पुण्याच्या शनिवार वाड्यावर झालेली भाषणेही आवडीने ऐकली होती.

त्याकाळी पुणे आकाशवाणी केंद्रावरून पु.लंची प्रसारित झालेली भाषणेही ऐकण्याची संधी आम्ही चुकवायचो नाही. पु.लंच्या "नारायण"चे पारायण कितीवेळा करतो, त्याला गणतीच नाही.

आज बारा जून, पु. लंची पुण्यतिथी, वंदनीय पु. ल.आपल्यामुळेच आमचे भावविश्व खुलले, फुलले ! आपल्या चिरतरुण पवित्र स्मृतीला भावपूर्ण वंदन,

लेखक : उपेंद्र चिंचोरे
www.facebook.com/upendra.chinchore

Friday, June 12, 2015

साहित्यातील हृदयस्थ पु.ल. देशपांडे - आरती नाफडे

१२ जून २००० ला, ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची प्राणज्योत मालवली. मराठी साहित्याला अजरामर करणारा एक लेखक अनंताच्या प्रवासाला निघाला. लोकांमध्ये, समाजात कायम रमणारा नाटककार, संगीतकार, कलाकार परलोकात निवासासाठी निघून गेला. पण, तमाम मराठी मनांवर राज्य करणारा हृदयस्थ- हृदयात स्थित असलेला- लोकांच्या मनातील जागा कशी बरं मोकळी करू शकेल? साहित्यातील मंतरलेले आपले जग म्हणजे पु. ल.! त्यांच्या साहित्यिक प्रवासातील प्रवासी म्हणजे त्यांचे अनंत वाचक, चाहते, आप्त-मित्रमंडळी होत.

त्यांच्या साहित्यिक प्रवासात अनेक थांबे आहेत. जसे साहित्यिक पुल, विनोदकार पुल, सिनेमा-नाटकातले पुल, संगीतातले पुल... हे महत्त्वाचे थांबे आहेत. प्रत्येक थांब्याजवळ रेंगाळत राहावं एवढं विस्तीर्ण ज्ञान आहे, अनुभव आहे. जीवनाबद्दलची आस्था, जवळीक, आत्मियता हृदयाला स्पर्श करणारी आहे. म्हणून पुल-साहित्यातील वाचकाचा प्रवास सुखकारक व आल्हाददायक आहे.

आपल्या नातवानं लेखक व्हावं, असं पुलंच्या आजोबांना कायम वाटत असे, तर त्यांनी गायक व्हावं, असं त्यांच्या वडिलांना वाटे. पण, पुल मार्मिकपणे सांगतात- ‘‘मी दोघांनाही खूष केलं किंवा कुणालाच नाखुष केलं नाही.’’

आपल्या शाळेच्या वर्गासाठी, भावंडांसाठी छोटी नाटुकली लिहून देणं, सेवादलाच्या कलापथकासाठी छोटे कार्यक्रम लिहून देणं, येथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. १९४३ साली ‘अण्णा वडगावकर’ हे त्यांचं पहिलं व्यक्तिचित्र अभिरुची या मासिकात प्रसिद्ध झालं. ‘धनुर्धारी’ मासिकात कॉलेजविश्‍वाबद्दलचा एक मिस्कील लेख टोपण नावाने लिहिला असता, तुम्ही ‘विनोदी लेखनाकडे जास्त लक्ष द्या,’ असा सल्ला संपादकांनी पुलंना दिला होता. २६ जानेवारी १९५७ ला ‘तुझे आहे तुजपाशी’ या त्यांच्या सामाजिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि त्यांच्यातला दमदार लेखक जनमानसात दृढ झाला. पुढे त्याच वर्षी २५ एप्रिलला ‘सारं कसं शांत शांत’, ‘सदू आणि दादू’, ‘मोठे मासे छोटे मासे’ या तीन एकांकिका लोकांची भरघोस दाद घेऊन गेल्या व पु. ल. देशपांडे नावाला मराठी साहित्यात वजन प्राप्त झालं व ते वाढतच गेलं. पुलंच्या साहित्यात भाषेची जादू आहे. ‘‘भाषा हा मानवनिर्मित चमत्कार मला सर्वांत आवडतो,’’ असं ते ‘वंगचित्रे’मध्ये म्हणतात. बोलीभाषेवर पुलंचं फार प्रेम. त्यामुळे त्या भाषेचा सहजपणा, प्रवाहीपणा नैसर्गिकपणे त्यांच्या साहित्यात येतो. पुलंचे अनेक भाषांवर प्रभुत्व व अचाट शब्दसंग्रह त्यांच्या साहित्याचे वैभव वाढवतात. आपण पुलंचे साहित्य वाचायला सुरुवात केल्यावर मन आतल्या आत हसायला लागते. गालातल्या गालात हसत आपण एक एक पान उलटत असतो. मनाची मरगळ गळून पडते. मन हलकंफुलकं होत जातं व एका स्वच्छ, सुंदर प्रसंगाचे आपण साक्षीदार होतो. ‘वाचाल तर वाचाल’ ही साहित्यसंस्कृती प्रचीतीस येते.

पुलंच्या साहित्यातला संचार त्यांच्या विनोदी लेखात, ललित लेखनात, बालनाट्य, एकांकिका, विडंबन, व्यक्तिचित्र, प्रवासवर्णन... अशा अनेक प्रकारांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. पुलंना आवडलेले पाश्‍चात्त्य साहित्य अनुवादित करून त्यांनी मराठी वाचकांना सादर केलेले आहे. पुल मानवी मनाचे जाणकार, तज्ज्ञ, चिकित्सक होते, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यांची सर्व व्यक्तिचित्रे आजही लोकप्रियतेच्या उच्चांकावर आहेत.

‘गणगोत’, ‘मैत्र’, ‘गुण गाईन आवडी’ ही पुस्तके वास्तवातल्या व्यक्तींवर आधारित; तर ‘व्यक्ती आणि वल्ली’ काल्पनिक व्यक्तिमत्त्वावर आधारित आहेत. पुलंची काल्पनिक व्यक्तिचित्रे समाजजीवनात पार मिसळून गेलेली. म्हणूनच लग्नकार्यातल्या हरकाम्यात आपण ‘नारायण’ शोधतो. पुस्तकातील किड्याला ‘सखाराम गटणे’ म्हणतो. टपरीवर लाल चहाचा कप समोर आला तर ‘अन्तू बर्वा’च्या वेशात चहावाल्यावर खेकसतो. पुलंची अतिशय मार्मिक व्यक्तिचित्रं, त्या व्यक्तीच्या दर्शनीय रंगरूपापासून वर्णन करीत त्याच्या अंतरंगाच्या गाभ्यापर्यंत वाचकाला घेऊन पोहोचायचं, हे असामान्य कर्तृत्व पुलंच्या लेखणीचं.

पुलंच्या साहित्यप्रकारात जीवनदृष्टी देणारी प्रवासवर्णने मार्गदर्शक आहेत. ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ं, ‘जावे त्यांच्या देशा.’ पुलंमुळे खूप दूरचे देश मराठी माणसाशी जवळीक साधून गेले. त्यांच्यातला निरीक्षक वाचकांना अंतर्मुख करत गेला. आपला समाज, देश याकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन त्याला प्राप्त झाला. पुलंचे हे सामाजिक ऋण सहज फिटणारे नाही.

पुलंचे ललित साहित्यलेखन सामान्य ज्ञान आणि निरीक्षण यांनी परिपूर्ण आहेत. त्यांचे काही खास लेख ‘माझे खाद्यजीवन’, ‘पाळीव प्राणी’, ‘चाळीशी.’ पाळीव प्राण्यांविषयी, रेल्वे व पोस्टाच्या कारभाराविषयी लिहिताना तपशिलांचे बारकावे. मानवी संबंध व व्यवहार, शाब्दिक कोट्या, उपहास या सर्व विषयांचे संमेलन त्यांच्या साहित्यात वाचायला मिळते. शब्दांची आकर्षक मांडणी हे साहित्याचे मर्म आहे, हे पुल-साहित्य पुन:पुन्हा वाचावयास घेताना वाचकांना जाणवते.

पुलंचं साहित्य रंजकतेकडून वैचारिकतेकडे झुकू लागतं व म्हणूनच मानवी मनात घर करून राहतं. वाचकाच्या मनापर्यंत पोहोचणार सहज, प्रांजळ व प्रभावी वाङ्‌मय त्यांच्या साहित्यक्षेत्रातल्या कौशल्याची यशोगाथा आहे.

त्यांच्या जीवनप्रवासात जे काही उत्कट-भव्य त्यांना दिसलं- जाणवलं, ते सर्व त्यांनी आपल्या मराठी माणसापर्यंत आणून सोडलं. वाचकाच्या मनाच्या कक्षा जाणीवपूर्वक रुंदाव्यात, याकडे त्यांचा कल होता. त्यासाठी ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींची व्यक्तिचित्रं समाजासमोर आणली. देशातील कलाकारांना त्यांच्या कलेसोबत लोकांसमोर आणलं. इंग्रजी रंगभूमीवरची उत्तम नाटकं मराठी भाषेमध्ये आणली. मराठी साहित्याला आपल्या वाणीने व लेखणीने समृद्ध केले व मराठी माणसासाठी अजरामर साहित्य निर्माण करून भलंमोठं संचित समाजासाठी मागे ठेवून ते गेले.

मराठी वाचकाला तर वर्षामागून वर्ष पुरेल इतकं साहित्य आणि ते प्रसवणारी प्रतिभा कायम त्याच्या मनात घर करून राहील. त्यांचे हृदयस्थ लेखक हृदयात स्थिर होतील- कधीही न जाण्यासाठी. कारण, प्रत्येक वर्षीची १२ जून तारीख आली की, पुलंचं सर्व उपलब्ध प्रकाशित साहित्य, पुलंचे चित्रपट, भाषणाच्या ध्वनिफिती, त्यांना मिळालेले सन्मान, पुलंच्या प्रतिष्ठानाने दिलेल्या सामाजिक देणग्या- सर्व हृदयस्थ गोष्टी पुन्हा एकदा नव्याने ओठांवर येणार व लेखणीतून बाहेर पडणार...

- आरती नाफडे
तरुण भारत
१२ जून २०१५

Tuesday, March 10, 2015

कविता आणि पु.ल. - श्रीकृष्ण राऊत

हे प्रभो,
हे जन्मदात्या,
जलधारांचा वर्षाव करीत ये
आणि
कडकडून भेट आम्हाला़
जलकुंभांनी भरलेल्या रथातून ये,
गडगडत ये,
गर्जत ये,
जीवदान दे.
तुझ्या पाण्यानी भरलेल्या
पखालीची तोंडं
उघडू देत पृथ्वीच्या दिशेनं
सारे खंदक जाऊ देत भरूऩ
उंच सखल सारं सारं
येऊ दे एका पातळीवऱ
भरून जाऊ देत सगळे झरे, सगळे पर्‍हे़
तुडुंब भरून जाऊ दे पृथ्वी आणि स्वर्ग
आणि
गाईगुरांना सतत लाभू दे
मुबलक पाणी


ह्या आहेत काही ओळी पर्जन्यसूक्ताच्या़ वेदकालीन अज्ञात कवींनी रचलेल्या़ हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृतातल्या ह्या कविता आपल्यासाठी मराठीत कोणी आणलं ठाऊक आहे? आपल्या लाडक्या पु़ लं नी़. पु़ लं चा हा पैलू आम्हा मराठी वाचकांना कितीसा माहीत आहे?

कॅलेंडरच्या मागे छापलेल्या सखा श्रावण' या छोट्याशा लेखात पु़ लं. नी अनुवाद केला आहे पर्जन्यसूक्ताचा़ जीवनाला सर्वार्थानं आणि सर्वांगांनी परिपूर्ण रसिकतेनं भोगणारा सच्चा कलावंत म्हणजे पु़ ल़ समाजकारण आणि राजकारणातील विचारसरणीच्या बाबतीत पु़ ल़ जसे डावे-उजवे नव्हते, तसेच साहित्याच्या बाबतीत जीवनवादी कला की कलावादी जीवन या वादातही ते पडले नाहीत़ आपल्या रसिकतेला कोणत्याही संकुचित बांधिलकीची कुंपणं त्यांना कधी पडू दिली नाहीत़ ‘म्हणुनी ग्रंथाची आवडी' या लेखात त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्वच्छपणे मांडली आहे़ पु़ ल़ लिहितात, ‘साहित्याचे रोमँटिक, क्लासिकल वगैरे भाग करून त्यांची वजनं-मापं घेण्याची मला हौस नाही़. अजूनही कधीतरी पाल ग्रेव्हची ‘गोल्डन ट्रेझरी' उघडून“ब्रिज ऑफ साईज' सारखी कविता मी वाचतो़ केशवसुत हे माझे नित्याचे सोबती आहेत़ बालकवींची अधून-मधून भेट घेतो आणि मेघदूताबरोबरही हिंडतो़ कधी मर्ढेकरांना भेटावंसं वाटतं तर कधी ‘शीळ' घेऊन बसतो तर कधी ‘ऐसा गा मी ब्रह्म' बालकवींच्या फुलराणी' मला जसं वेड लावलं तशीच नारायण सुर्वेंची मनी ऑर्डर' मनुष्यनिर्मित दुःखानं पोळलेल्या कोण्या अभागी स्रीच्या सार्‍या वेदनांचे काटे माक्या मनात कायमचे रुतवून गेली आहे़. 

संतांच्या कवितेतून येणारा मराठमोळा थेटपणा पु़. लं. ना आपल्या काळजाचा कोपरा वाटतो़ पण देवाच्या आस्तत्वाविषयी साशंकता व्यक्त न करताही संतांना त्यांच्याच शब्दांत ते अचूकपणे पकडतात आणि एकप्रकारे संतांची पंचाईतच करून टाकतात़ पु़ ल़ म्हणतात, तुकोबाचा गाथा हा माझा लाडका ग्रंथ आहे़ पण माझा तुकोबा बडव्यांना दलाली देऊन पांडुरंगाची षोडषोपचारांनी पूजा करणारा नाही़ मला निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणारा आणि कधीतरी अननुभूत आनंदानं भरून येऊन भरल्या शेताचा । देतो मज वाटा । चौधरी गोमटा । पांडुरंग' म्हणणरा, विठ्ठलच विठ्ठल । वदवावी वाणी । नाही ऐसे मनी । ओळखावे' हे गुपित सांगणारा आणि गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' म्हणणारा तुका माझा वाटतो़'' 

ग़ दि़ माडगूळकरांचे गीत-रामायण जसे त्यांना आवडते तशीच त्यांची लावणीही त्यांना भावते़ कवितेच्या नवविध रसांपैकी कुठल्याही एखाद्या रसाला आधक भाव' देण्यापेक्षा प्रत्येक भाव रसिकतेने मानसिक आणि शारीरिक पातळीवर अनुभवणे त्यांना आधक नैसर्गिक वाटते़ म्हणूनच ते लिहितात-
‘चांगली कविता आजही मला मनात तरंग उठल्याचा किंवा आत काहीतरी झंकारल्याचा जवळजवळ शारीरिक म्हणावा तसा संस्कार करून जाते़ कुसुमाग्रजांची एक-एक कविता भेटत गेली ती अशीच कायामनांतून एकसाथ कंपने उठवत़ मग त्यात रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' हा भाव असो की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात'हा भाव असो़ पृथ्वीच्या पे्रमगीता' नं दिलेला हादरा हा मानसिकाइतकाच शारीरिक अनुभव होता़'' पु़ लं. ची साहित्यनिर्मिती जशी प्रयोगशील राहिली आहे तशीच त्यांची आभजात रसिकता परिवर्तनशील राहिली आहे़ या बाबतीत ते म्हणतात, मी वषानुवर्षे कुठलीही रेडिमेड मतांची झापडं लावून किंवा एकेकाळी आपलं मत अमुक असं होतं म्हणून त्याला हट्टानं चिकटून बसलो नाही़'' याचा प्रत्यय मर्ढेकरांच्या बाबतीत आला़ १९४६ मध्ये आभरुची' त मर्ढेकरांची पिपात मेले ओल्या उंदिर' ही कविता प्रसिद्ध झाली़ पु़ ल़ हे तेव्हाचे आभरुची' लेखक़ तोपर्यंत वाचलेल्या कवितांच्या पार्श्वभूमीवर मर्ढेकरांच्या या कवितेने त्यांना चांगलाच हादरा दिला़ पु़ ल़ ची टीका करण्याची पद्धत म्हणजे विडंबन करणे़ पु़ लं नी या कवितेचे विडंबन करून आपली टीका नोंदवली़ पुढे ही कविता तिच्यातल्या जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे' या ओळींनी चांगलीच गाजली़ तिच्यातल्या प्रतिमांचं नावीन्य अधोरेखित करणारं बरचंसं लेखनही झालं आणि पु़ लं नी आपल्या परिवर्तनशील रसिकतेने त्या एकट्या कवितेलाच नव्हे तर संपूर्ण मर्ढेकरांनाच मनापासून दाद दिली़ ते नुसती दाद देऊनच थांबले नाहीत तर मर्ढेकरांची कविता आधकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्या कवितांच्या आभवाचनाचे जाहीर कार्यक्रम त्यांनी सुनीताबाईंसोबत केले़. केवळ मर्ढेकरांच्या कवितांचेच नव्हे तर आरती प्रभू आणि बोरकरांच्या कवितांच्या आभवाचनाचे जाहीर कार्यक्रमही त्यांनी महाराष्ट्रभर केलेत़. बोरकरांच्या कवितांच्या आभवाचनाच्या कार्यक्रमाला त्यांनी दिलेलं नावही छान होतं-आनंदयात्रा़' 

या आनंदयात्रेच्या निमित्ताने पु़. ल़. अकोल्यात आले होते़ किशोर मोरे, दिलीप इंगोले अशी आम्ही मित्रमंडळी त्यांना भेटायला गेलो़ मराठी कवितेला गझलने झपाटल्याचा तो काळ होता़ एकच भाव उलगडून दाखवीत असेल तर ती गझल नव्हे तर गझलच्या फॉर्ममधली कविता' असे आग्रही प्रतिपादन सुरेश भट करीत होते़ पु़लं नी सुरेश भटांच्या रंग माझा वेगळा' या संग्रहाला प्रस्तावना लिहिलेली़ म्हणून त्यांनाच यातलं खरंखोट काय ते विचारावं म्हणून मी भीतभीतच या संदर्भात त्यांना विचारलं. तर ते दिलखुलासपणे म्हणाले, तसं काही नसतं हो़ एकच भाव उलगडून दाखवणार्‍या शेकडो गझला उर्दूत आहेत़ उर्दूत त्यांना गझल-ए-मुसल्‌सल म्हणतात़ मोमीनची वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के ना याद हो' ही याच प्रकारची गझल आहे़'' 

‘गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे' हे रंग माझा वेगळा' च्या प्रस्तावनेतील पु़ लं चे विधान अर्धवटपणे उद्धृत करणार्‍यांनी पु़ लं. वर खरे तर एक प्रकारे फार मोठा अन्यायच केला आहे़ कारण या अपुर्‍या विधानातून गझल-वृत्ती' म्हणजे नेमके काय, हे स्पष्ट होत नाही़ एखादे चटकदार वाक्य हातात सापडल्यावर ते दांडपट्टयासारखे आपल्या तोंडपट्टयावर चौफेर फिरवून गुळगुळीत करून टाकावे तसे या विधानाचे झाले आहे़. ‘गझल-वृत्ती' ला स्पष्ट करणार्‍या नंतरच्या ओळींच्या संदर्भातच खरे तर या वाक्याचे महत्व, वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या अध्यात्मिक संकल्पनांना साध्या, सोप्या भाषेत पु़ लंऩी मांडून कवितेच्या जन्माचा क्षण अचूकपणे पकडला आहे तो असा ‘गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे़ एवढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे़ स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृत्ती मानीत आलो आहोत़ क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खर्‍या प्रवृत्तीची गोडीच कळत नाही़ जीवनात नुसत्याच उंदीर-उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे़ निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे? पण काही क्षण तया धावपळीच्या अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात़ असा एखादा क्षणच कवितेला जन्म देऊन जातो़'' 

ह्या परिच्छेदात पु़लं नी निवृत्तीला ‘सूक्ष्म' आणि‘सुंदर' ही दोन विशेषणे एकाच वेळी का लावली आहेत हे आपण लक्षात घेतले तर ‘गझल वृत्ती' चे अंतरंग आपल्यासमोर स्वच्छ आरशासारखे उघडे व्हावे़ आजकालच्या कवितांचा जमाना म्हणजे मुक्तछंदाचा आणि मुक्तशैलीचा जमाना आहे़ छंदवृत्तांशी कवितेने जवळ-जवळ फारकत घेतली आहे़ प्रसाद गुणाशीही ती फटकूनच वागते आहे़ दुर्बोधता हा जणु काही तिचा अलंकार होऊ पाहतोय़ गाण्याची तहान लागलेल्या मनाला मुक्त छंदातल्या ह्या कविता रुख्यासुख्या वाळवंटासारख्या वाटतात़. मधूनच छोटीशी हिरवळ डोळ्यात भरली की मन प्रसन्न व्हावे तशी एखादी गेय कविता भेटते़ पण तथाकथित समीक्षेतही तिला गीत म्हणून दुय्यम लेखले असते आणि तिच्या निर्मात्याला गीतकार म्हणून हिणवलेले असते़ ग़ दि़ माडगूळकर आणि ना़ घ़ देशपांडयांनाही हे भोगावे लागले आहे पण यातून किती मोठ्या परिमाणाची वजाबाकी झाली आहे याची तीव्र जाणीव फक्त पु़ लंच देऊ जाणोत कागदावरचे मुद्रण ही सोय आहे़ पण उच्चार हा शब्दांचा मूळधर्म आहे़ कवितेला कागदातच गुंडाळून ठेवणे म्हणजे शब्दांचा गळा आवळणे आहे़ कविता गेय आहे हे कवितेचे दूषण ठरावे हे दुर्दैव आहे़ आता छापखाना नैसर्गिक आणि गाता जिवंत गाळा अनेसर्गिक ठरला आहे़ जातिवृत्तांचे कवितेला ओझे वाटू लागले आहे़ आणि म्हणूनच कविता रसिकांच्या रंध्रारंध्रातून झिरपत न जाता, त्यांच्या मनात कायमची न मुरता कागदोपत्री जमा होत आहे़ पाठांतर हे खिशात खुळखुळणार्‍या रोकडीसारखे आहे़ आपल्या श्वासाइतकेच ते आपले स्वतःचे असते़'' पु़लं सारख्या जातिवंत आणि चोखंदळ रसिकाने दिलेला इशारा आमच्या कवी आणि समीक्षकांना केव्हा कळेल कोण जाणे !

पु़ लं च्या लेखनात कुठेतरी एक वाक्य आहे की, ‘आमच्या काळी बोलण्याची आणि लिहिण्याची भाषा एकच होती़' या वाक्यातील आमच्या काळी' या कालसंबोधनातून ती आज तशी राहिली नाही हे आपसूकच ध्वनित होते़.

कविता ही आज बोलण्याच्या भाषेपासून किती दूर गेली आहे याचे प्रत्यंतर अलीकडच्या कविता वाचल्या की आपल्याला सहज लक्षात येते़ तिचा रसिकांशी संवादच होत नाही़ प्रतिमांच्या नावीन्याच्या हव्यासापायी घडवलेल्या कृत्रिम भाषेत ती बोलते आहे़ 

मर्ढेकरांच्या काव्यशैलीसंबंधी लिहितांना विजया राजाध्यक्ष या मुद्याकडे आपले लक्ष वेधतात-
बोलण्याची भाषा व (औपचारिक) लेखनाची भाषा यातील अंतर कमी करणे हा कवीचा प्रयत्न असतो़''
असा प्रयत्न आज किती कवींच्या कवितांत आपल्याला दिसतो? रसिकांनी कवीच्या पातळीवर यावं असे आवाहन करणार्‍यांचे ओ-रडणे केवळ अरण्यरुदन ठरते ते बोलण्या-लिहिण्यातील भाषेच्या दरीमुळेच़ पु़लंनी विद्रोही कवितेचं मनापासून स्वागत केलं दाद देताना तिला भरभरून झुकतं माप दिलं. यशवंत मनोहरांच्या उत्थान गुंफा' वर महाराष्ट्राच्या दर्जेदार वृत्तपत्रात कालचा पाऊस' शीर्षकाने हातचे काही न राखता लिहिले़ त्यातील शोषणसंबंधाचे वैश्विक चिंतन मुळातूनच वाचण्यासारखे आहे़ पण हे पाहून अनेक कवी असूयेने म्हणायचे की आम्ही दलित असतो तर आमच्यावरही पु़लं नी असेच लिहिले असते़' असे म्हणून पु़लं च्या सच्च्या रसिकतेला जातीयतेच्या मापानं जोखणार्‍या कवींनी आपली बौद्धिक दिवाळखोरीच खरे तर जाहीर केली होती़.

प्र.श्री़ नेरुरकरांना लिहिलेल्या पत्रात पु़ ल़ म्हणतात, नारायण सुर्वे, दया पवार वगैरे मंडळी साहित्यात आल्यानंतर मला जे काही वाटले ती माझी भावना मला टागोरांच्या एका दीर्घ कवितेत सापडली़''

रवींद्रनाथांच्या ह्या कवितेचे नाव ‘ऐकतान वृंदवादन'. पु़ लं. नी केलेल्या त्या कवितेच्या स्वैर अनुवादातील हा एक अंश-

मी जाणतो-
माझी कविता कितीही वेड्यावाकड्या वळणांनी गेली
तरी सर्वगामी नाही झाली़
शेतकर्‍याचे जिणे जगणारे हे बहुजन
श्रमातून आणि शब्दांतून
मिळवत असतात सत्याचे कण़
जो आहे मातीपाशी
त्या कवीच्या वाणीकडे
लावून बसलो आहे काऩ
साहित्याच्या ह्या आनंदभोजनात
मी जे नाही शकलो रांधू
जे नाही शकलो वाढू-
ते काढणार्‍यांच्या आहे मी शोधात,
ते सत्य यावे उजेडात़
उगीचच नसता आव आणणार्‍यांनी
फेकू नये धूळ डोळ्यात,
दाखवू नये खेटा दिमाख-खरे मोल दिल्याशिवाय़
असला आणून आव मिरवणं
ही आहे एक चोरी़.
बरे नाही-बरे नाही-ही आहे नकली-
षौकीन पद्यमजुरी़

ये
अज्ञात जनांच्या
मूक मनांच्या
कविराया-ये़
मर्मातल्या वेदना येऊ देत उफाळून
ह्या प्राणहीन देशात
जिथे चारी दिशा आहेत गानहीन;
अपमानांच्या तापाने
इथली भूमी झाली आहे
आनंदहीन, शुष्क, वैराण़
कविराया,
तू कर ती रसपूर्ण,
अंतरीची उर्मी
आता उरली आहे तुक्यातच़
तूच दे तिला प्राणवायू आणि पाणी़
साहित्याच्या ह्या वृंदावन-संगीत-सभेत
ज्यांच्या हाती एकतारी
त्यांचा आता व्हावा गौरव़
सुखे-दुःखे ज्यांची मुकी,
जगापुढे जे सतत उभे
खाली घालून माना-
ऐकव-अरे ऐकव,
जवळ असूनही जे दूर होते
आता त्यांच्या ऐकव ताना़

तुझी आणि त्यांची एक आहे जात,
तुक्या ख्यातीमुळेच ते होतील विख्यात़
-मी वारंवार
तुलाच नमस्कार करीऩ''


ना़ धों. महानोरांची तुलना करायला पु़लं ना रवींद्रनाथांशिवाय दुसरा कोणी का सापडत नाही याचे उत्तरही आपल्याला मिळते ते या कवितेतच़.
(अकोला आकाशवाणीच्या सौजन्याने)


-- श्रीकृष्ण राऊत