Tuesday, November 24, 2026

वेध सुनीताबाईंचा - (मंगला गोडबोले)

जन्माला आलेली कोणतीही कलाकृती रसिकांकडून सादर झाली की प्रशंसेला पात्र ठरते, टीकेची धनी होते, दाद मिळविण्याचे कारण बनते किंवा मग दुर्लक्षित जाते... अनुभवाचा धनी होते. अशा अनुभवांचा मागोवा घेणारी ही सृजन-सूत्रे.

९ नोव्हेंबर २००९ रोजी पु. ल. देशपांडे यांच्या, पत्नी सुनीताबाई देशपांडे या काळाच्या पडद्याआड गेल्या. पुलंनी सुमारे नऊ वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतलेला होता. पुलंसारखा एक असाधारण लोकप्रिय कलाकार, त्याची सुनीताबाईंसारखी एक विलक्षण बुद्धिमती पत्नी आणि त्यांनी आपल्या नेक विचाराने आणि चोख कृतीने भारलेला एक काळखंड संपुष्टात आल्यावर त्यातल्या काही ठळक घटना, महत्त्वाचे पैलू शब्दात गोठवावेत असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटणं स्वाभाविकच होतं.

यापूर्वी 'अमृतसिद्धी पुल समग्रदर्शन' हा ग्रंथ पुलंच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध झाला तेव्हा मी त्यांची एक सहलेखिका होते. त्यामुळे सुनीताबाईंच्या स्मृतिग्रंथ लिहिण्यासाठी सहजच राजहंस प्रकाशनाने मला विचारलं. मी सुनीताबाईंच्या रोजच्या भेटीगाठींतली किंवा स्नेहातली कधीच नव्हते. प्रसंगोपात कवचित भेटले होते; पण असंख्य मराठी वाचकांप्रमाणेच मलाही त्यांचं आत्मपर लेखन 'आहे मनोहर तरी...' हे फार आवडलेलं होतं. मलाही इतर अनेकांप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आदर होता, कुतूहल होतं. त्यांना समजून घेण्याची ही शेवटची संधी मी साहजिकच घेतली. आपल्या बाजूने आपण चोख प्रयत्न करायचा असं ठरवलं.

पुल-सुनीताबाई हे आयुष्यभरात अनेक सद्भावना आणि अगणित लोकांच्या संपर्कात आलेले होते. त्यांच्याविषयीच्या आठवणी, किस्से, पत्रव्यवहार यांना तोटाच नव्हता. 'घेता किती घेशील दो करांनी' किंवा 'दोन डोळ्यांनी' अशीच परिस्थिती होती. मग मी माझ्यापुरतं एक मार्गदर्शक तत्त्व ठरवलं. जे पती-पत्नी दोघेही हयात नाहीत त्यांच्या दांपत्य जीवनाबद्दल आपण जास्त लिहायचं नाही. आपण त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनावरच भर घ्यायचा. दुसरं असंही ठरवलं की सुनीताबाई जशा थेट, रोखठोकपणे बघणाऱ्या होत्या तसंच थेट लेखन आपण करायचं. त्यामध्ये भावुकतेला, व्यक्तिपूजेला थारा घालायचा नाही. तसंच हळवं, काव्यात्म वगैरे होण्याच्या नावाखाली सत्य झाकायचं नाही. जे काही दिसलं, जाणवलं ते सौम्यपणे, पण स्पष्टपणे लिहायचं. निर्णयकाची भूमिकाही नको आणि समर्थकाचीही नको. तेवढा आपला अधिकार नाही हे मला नक्कीच कळत होतं.

त्यामानाने कळलं काय नव्हतं? तर या कामातली सांस्कृतिक जोखीम. काही माणसं इतिहासाविषयी लिहितात. ऐतिहासिक व्यक्तीविषयी लिहितात. त्यामागे मोठा वाचकवर्ग लागतो. उलट काही लेखक अगदी आजच्या ताज्या वास्तवाबद्दल लिहितात त्यांनाही चाहते असतात. सुनीताबाई वास्तवात नव्हत्या आणि पूर्णपणे इतिहासजमा झालेल्याही नव्हत्या. अक्षरशः काळपर्वा त्यांच्याबरोबर राहिलेलं, काही व्यवहार केलेले लोक आसपास होते. हळूहळू इतिहासात जाणारं वर्तमान समजून घेणं आणि शब्दबद्ध करणं अवघडच म्हणायचं. फारसा अभ्यास न करता त्यावर शेरेबाजी करणारे किंवा आपल्याला आठवतंय तेच बरोबर असं म्हणणारे खूप लोक निघतात. त्यांचं ऐकून घेतलं तरी शेवटी तारतम्याने आपल्याला जे योग्य वाटतं तेच लिहायला एक प्रकारचं आत्मबळ लागतं. दुसरी अडचण जाणवली ती त्यांच्या बहुचर्चितपणाची. देशपांडे दांपत्याविषयी नाना प्रकारे लिहिलं गेलंय, बोललं गेलं आहे, अजूनही कुठे कुठे बोललं जातंय. १२ जून १९९० रोजी म्हणजे त्यांच्या लग्नाच्या चव्वेचाळिसाव्या वाढदिवसाला प्रसिद्ध झालेलं त्यांचं आत्मपर लेखन 'आहे मनोहर तरी...' हे मराठी भाषेतलं प्रचंड वाचलं गेलेलं पुस्तक आहे. एवढं सगळं चौफेर विखुरलेलं असताना सुनीताबाईविषयी मी (किंवा कोणीही) नव्यानं काय लिहिणार, वाचकांना नवीन काय देणार हा मोठाच प्रश्न होता. सुनीताबाईंना लिहिण्याचा स्वभाव नाही, फारसं नवीन देणं शक्य नाही, मग लोकांनी आपलं पुस्तक का वाचावं? या प्रश्नांचा सामना करत असताना मला सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची, वागण्याची मानसशास्त्रीय अंगाने चिकित्सा करण्याचा मार्ग सापडला. माझ्या कुवतीने मी त्यावर वाटचाल केली.

तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपल्या काळाचं, आपल्या एकूण परिस्थितीचं उत्पादन असतो. त्या त्या संदर्भांमध्ये आपलं वागणं चूक किंवा बरोबर ठरत जातं. 'स्थितीचा असे किंकर प्राणिमात्र, स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र' हेच शेवटी खरं! त्या दृष्टीने मला मिळत गेलेले माहितीचे तुकडे सुसंगतपणे मांडून त्याच्या पार्श्वभूमीवर बाईंच्या कृतीउक्तीचा अर्थ मी लावात गेले. काही वेळा अर्थ लागला, काहीवेळा नाही लागला. जिथे लागला नाही तिथे तसंच सांगून टाकलं. सगळं निरपवादपणे कळलंच पाहिजे हा तरी आग्रह हा बाळगावा?

प्रत्येकाच्या जगण्याचा एक मूलस्रोत असतो. तो कळला की माणूस कळण्याची शक्यता वाढते. पुलंमधला कलाकार जपणं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ न देणं, त्याची प्रतिमा जपणं, त्यातून मिळालेल्या पैशाचं जपणं हे सुनीताबाईंच्या जीवनाचं मुख्य प्रयोजन होतं. त्यांच्या प्रगल्भतेमुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना ते फार लवकर समजलं होतं. इथे त्या सर्वसामान्यांच्या फार वर जातात. आपल्याला आयुष्यात काय मिळवायचंय, आपण आयुष्याकडून काय अपेक्षा करतो हे वेळेवर न कळणारे किंवा कधीच न कळणारे बहुसंख्य असतात. सुनीताबाईंच्या याबाबतच्या कल्पना तरुणपणीच स्पष्ट होत्या आणि त्या वास्तवात आणण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. दमणूक, कटुता, अपमान, जिवाचा रान केलं. आरोप हे सगळं सहन केलं आणि या कामाच्या आड येणाऱ्यांना निष्ठूरपणे दूर केलं. या प्रेरणेच्या प्रकाशात बाईंचं आयुष्य बघितलं तर
बरेच प्रश्न मिटतात. उत्तरं मिळतात. ती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे 'सुनीताबाई असं जगणं तोलाचं...' हे राजहंस प्रकाशनाचं पुस्तक.

स्वतःवर असं पुस्तक बनणं, आपल्याला कोणी चरित्रनायिका म्हणून सुनीताबाईंना खात्रीपूर्वक आवडलं नसतं. त्या व्यासपीठावर पुलंशेजारी बसायला, फोटो काढून घ्यायला, स्वतःला लेखिका म्हणून घ्यायला नकारच देत असत. तरीही त्यांच्यावर चरित्रनायिकापण आम्ही का लादलं? कारण त्यांनी निर्माण केलेला दातृत्वाचा आदर्श आणि त्यांनी धरलेली परिपूर्णतेची कास. आयुष्यात त्यांनी स्वतः आणि पुलंकडून अगणित परफॉर्मन्सेस, प्रयोग सादर केले; पण कोणताही प्रयोग कधीही कणानेही दुय्यम तिय्यम दर्जाचा होऊ दिला नाही. पतीने मेहनतीने मिळवलेले लक्षावधी रुपये सामाजिक कामांसाठी वापरले; पण नावाची, एका पैशाची परताव्याची कधी आस धरली नाही. उत्तम व्यवहाराने पैसा मिळवणं आणि उदार विचाराने तो खर्च करणं यांचा वस्तुपाठच जणू काही आधुनिक महाराष्ट्रापुढे त्यांनी ठेवला. पैशाविषयीचा निर्मोहीपणा आणि सदैव अत्युत्कृष्टटेचा ध्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन ठळक पैलू पुढच्या पिढ्यांसमोर अधोरेखित स्वरूपात राहावेत यासाठीच हा प्रयास होता. पैसा हे साधन न मानता साध्य मानणाऱ्या आणि तुटपुंज्या तयारीवर थाटामाटात कार्यक्रम सादर करून वाहवा मिळवायला धडपडणाऱ्या आजच्या मराठी माणसाला यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.

ते जे काही होईल ते होवो. पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने फेब्रु. २०१० ते जुलै २०१० हा माझा काळखंड नकळतपणे सुनीताबाईंच्या सहवासात गेला. त्यांच्याद्वारे पुलंच्या सहवासात गेला. एवढ्याच माझ्या छोट्या, सामान्य आयुष्याला तात्पुरती वेगळी उंची, वेगळी खोली लाभली ही काय थोडी कमाई म्हणायची?

लेखिका : मंगला गोडबोले | लोकमत | रविवार, दि. १५ मे २०११

पुस्तक घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा . 

Wednesday, November 11, 2026

झुंबर ! - (सुधाकर पारनाईक)

तुझ्या स्मृतींना घेऊन आली आजची रम्य प्रभात
तुझ्या स्मृतींनी आज उजळली अवसेची रात !

घरोघरी आज उजळले तुझ्या स्मृतींचे दीप
तुझ्या स्मृतींची बाग बहरली मनात आपोआप !

तुला पाहता दु:ख पळाले, व्यथाही विरघळली
उदास मुद्रेवर प्रसन्नतेची लहर सळसळली !

जादूगार तू, नाना चिजा तुझ्या पोतडीत
की अलिबाबा आला खजिन्याची गुहा उघडीत !

तूच दाविली रसिकांना नाना कलांची दालने
आनंदयात्री तू, हवेसे वाटे तुझ्यासवे चालणे !

बहुरूपी तू, नटवर्य तू, तूच खरा खेळिया
संवादिनीवर तव फिरती बोटे विजेसम लीलया !


बहुप्रसवा तुझी लेखणी, वाणीही अनुपम
निकोप विनोदाचा तुझ्याच लेखनातून झालासे उद्गम !

रंगभूमी वा रुपेरी पडदा किंवा असो मैफल
दिग्गजांच्या मांदियाळीत तूच येशी सदा अव्वल !

लक्ष्मीचा वरदहस्त तुझ्यावर, नसे धनाची वाण
औदार्यात तुझ्यासारखा कर्णावाचून अन्य कोण ?

पुरुषोत्तम तू, स्वनामधन्य, खरा रसिकराज
तुझ्या स्मृतींचे झुंबर झगमगते लाखो मनांत आज !

- सुधाकर पारनाईक

पु.ल. - एक आनंदयात्रा - (गिरीश पाठक)

काही आनंदयात्रांची समाप्ती कधीही होत नसते.पु.लं.नी आयुष्यभर केलेल्या आनंदाची पखरण ही अशीच एक आनंदयात्रा आहे.

माझ्या शाळकरी वयापासून कॉलेज जीवन, नंतर व्यावसायिक जीवनाचा सुरुवातीचा बराचसा काळ आणि सोळा वर्षांपूर्वी पु.लं.च्या निधनानंतरही आजतागायत वारंवार हवं तेव्हा मी त्यांनी निर्माण केलेल्या नवरसांचा परिपाक असलेल्या आनंदरसात भिजत आलेलो आहे.शब्द-सुरांनी त्यांनी आयुष्यभर वाटलेल्या अमृताचा आस्वाद इतर अनेकांप्रमाणे मी आकंठ घेत आलोय.

पु.लं.नी अपूर्वाईच्या प्रस्तावनेत म्हटलंय कि “आयुष्यात प्रवासवर्णन आणि आत्मचरित्र कधीच लिहायचे नाही असा संकल्प लहानपणीच सोडला होता. “अपूर्वाई” लिहून पहिला मोडला. आणि जरा विचार केल्यावर लक्षात आलं कि दोन्ही संकल्प ह्या एकाच पुस्तकात मोडलेत. कारण ह्या पुस्तकात मी केलेल्या प्रवासाऐवजी प्रवासात असलेल्या माझेच वर्णन आहे!” केवळ ह्याच नव्हे तर त्यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या विषयी इतरांनी लिहिलेल्या हरेक पुस्तकातून त्यांचं बहारदार दर्शन होत असतं.

ह्या माणसाचा मला इतका लळा का लागला हे मला सुनीताबाईंचं “आहे मनोहर तरी” वाचल्यावर समजलं. माझी बहुतेक स्वभाववैशिष्ट्ये मला त्यांच्या स्वभावात दिसून आली. काही व्यक्ती “देणार्याचे हात हजार” सारखे जीवनभर दान वाटत असतात.घेणारा आपल्या झोळीच्या कुवतीनुसार घेत असतो. त्यातलेच पु.लं. सुद्धा. मी मात्र पूर्वजन्मीचा घेणेकरी असल्यासारखा अनेकानेक झोळ्या भरभरून पु.लं. कडून घेत आलोय. साहित्य, विनोद, नाटक, अभिजात संगिताच्या दर्यात तर डुंबलोच; पण इंग्रजी भाषेचं ज्ञान पण घेतलं. मला ज्ञात असलेले कित्येक इंग्रजी शब्द- वाक्प्रचार ही त्यांचीच देणगी.

लेखक म्हणून थोर असणारे साहित्यिक माणूस म्हणून महान असतातच असं नाही. मात्र पु.लं. ह्याला अपवाद होते. आणिबाणीच्या काळात लोकशाहीच्या मुस्कटदाबविरुद्ध-दडपशाहीविरुद्ध उठवलेला आवाज, मुक्तांगण सारख्या संस्थांच्या द्वारे केलेली समाजसेवा, विपुल संपत्तीदान हे त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे द्योतक आहेत.

निसर्गनियमानुसार १६ वर्षांपूर्वी १२ जूनला पु.लं.च देहावसान झालं. “रावसाहेबां”च्या मृत्यूवेळी रावसाहेबांविषयी त्यांनी जे म्हटलं होतं, ते त्यावेळी प्रकर्षाने जाणवून गेलं; ‘आमची छोटीशी जीवने समृद्ध करण्यासाठी देवाने दिलेल्या ह्या मोलाच्या देणग्या…. न मागता दिल्या होत्या;न सांगता परत नेल्या!!’

पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय ,”पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते असं म्हणतात…” महाराष्ट्राला पडलेल्या ह्या सुंदर स्वप्नाची परिसमाप्ती होणारी पहाट कधीच होऊ नये असं वाटतं. “पूर्वरंग”च्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलंय, ”… यात्रा सफल झाली की मावंदे घालायचे. अक्षरांचे धन असलेल्याने पुस्तकाचे मावंदे घालायचे!”. त्याच धर्तीवर असं म्हणावसं वाटतं ‘ माणूस गेला की सुहृदांनी त्याच्या श्राद्धाचे पिंड घालायचे. कर्मकांडाचा तिटकारा असलेल्या माझ्यासारख्याने कृतज्ञतेपोटी भावफुलांची ओंजळ अर्पायची….’ अशीच वर्षानुवर्षे दर १२ जूनला..

गिरीश पाठक,
नासिक

Wednesday, November 4, 2026

शब्द-सुरांमधील 'आत्मीय' पत्रव्यवहार

दुसऱ्यांची पत्रे वाचू नये असे म्हणतात, म्हणणाऱ्यांना म्हणू द्या, पण ही पत्रे वाचायचा आणि इतरांना ती दाखवायचा मोह काही आवरत नाही. जिथे लोभ असतो तिथे मोह असायचाच !

पु. ल. आणि लता. एक शब्दांनी खिळवून ठेवणारा तर दुसरा(री) स्वरांनी आणि सुरांनी. एकाचा विषय बुद्धीचा तर दुसऱ्याचा हृदयाचा. देवी सरस्वतीचा वरदहस्त दोघांनाही भरभरून लाभलाय आणि त्याच्या कृपाप्रसादाचे आपण सर्वांनी आकंठ रसपान केलेलं आहे. ह्या दोघांच्या निम्नलिखित पत्रव्यवहारात झालेली विचारांची देवाण-घेवाण म्हणजे मराठी वाचकांसाठी एक आनंदाची पर्वणी ठरावी.

(दि. १६ जून १९७९ रोजी लताबाईंनी पु. ल. ना लंडनहून पाठवलेले पत्र..)

20, ABBEY Road,
London N.W.8
Tel.- (01)286-5132
Room No.- 170

ती. प्रिय पी. एल.

चरणस्पर्श !
तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे इथे आल्याबरोबर पत्र लिहायला हवे होते, पण १२ तारखेपर्यंत सारखी धावपळ चालू होती. १२ ला Albert Hall मध्ये The Wren Orchestra बरोबर कार्यक्रम होता. तुमच्या आशीर्वादाने कार्यक्रम चांगला झाला. चांगला म्हणजे लोकांना आवडला. या कार्यक्रमाची तिकिटे खूप लोकांना मिळाली नाहीत. त्यामुळे ३ जुलैला आणखी एक कार्यक्रम ठेवला आहे. उद्या Palladium मध्ये कार्यक्रम आहे. *यात एकच गोष्ट समाधानाची- म्हणजे माझी प्रकृती बरी आहे, तुमची तब्येत अलीकडे बरी नसते, त्यामुळे का कुणास ठाऊक, पण मला खूप काळजी वाटते. तुमच्यासारख्या माणसांना कधीही काहीही त्रास होऊ नये असे मनापासून वाटते. तुम्ही कुठेही असलात आणि मजेत आहात असे नुसते कळले तरी बरे वाटते.

आता तुमची प्रकृती कशी आहे? कळवाल का? जुलै ११ पर्यंत मी London मध्येच आहे. सौ. वहिनी बऱ्या आहेत ना? त्यांना माझा नमस्कार ! तुम्हाला पत्र लिहिताना फार भीती वाटते. कारण माझे मराठी जरा गडबडच आहे.*

तब्येतीची खूप काळजी घ्यावी.

नमस्कार,

तुमची- लता
१६.६.७९


*~*~*~*~*~*~*~*~*~*


(स्व. पु. ल. देशपांडे यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांना दिलेले पत्रोत्तर..)

प्रिय लता,

तुझ्या इतक्या गडबडीच्या कार्यक्रमात आठवण ठेवून पत्र पाठवल्याबद्दल मनापासून आभार. तुला सायनसचा त्रास होत असल्याचे तू सांगितल्यामुळे मला काळजी वाटत होती. गाणाऱ्यांचे आणि नाटकात काम करणाऱ्यांचे शरीर हेच वाद्य असल्यामुळे ते नादुरुस्त राहून चालत नाही. एवढेच नव्हे तर चार माणसांसारखी हया कलावंताचीही प्रकृती आज ठीक नसेल असा विचार करायला प्रेक्षकही तयार नसतात. काही वर्षांपूर्वी 'बटाट्याच्या चाळी'चा प्रयोग करीत असताना अचानक माझी पाठ धरली. तशा परिस्थितीत प्रयोग रेटला. लोक त्यातल्या विनोदाला हसत होते आणि मी मात्र मनात 'लेको, तुम्हाला हसायला काय होते? माझे इथे काय हाल चालले आहेत ते माझे मला ठाऊक!' म्हणत होतो. सिक लीव्ह वगैरे सोयी कलावंतांना नसतात.

तुझ्या सायनसने इंग्लंडच्या हवेत पळ काढला, हे वाचून मला खूप समाधान वाटले, तुझा कार्यक्रम चांगला झाला हे लिहिण्याची गरजच नाही. 'कार्यक्रम झाला' याचा अर्थच चांगला झाला.

माझी प्रकृती ठीक आहे. गुडघ्याचा संधिवात हेदेखील कलावंतासारखे लहरी दुखणे आहे असे मला वाटायला लागले आहे. विशेषतः साथीदार कलावंतासारखे, एखादे दिवशी माझे गुडघे अगदी मोकळेपणाने वागतात, तर कधी कधी एकाएकी निष्कारण आखडूपणा करायला लागतात. त्यांचे कधी काय बिनसते तेच कळत नाही. परवाच एक डॉक्टर आपण ऑपरेशन करून बघू म्हणाले। डॉक्टरांची बघण्याची हौस भागवण्याची जबाबदारी माझ्या अंगावर घ्यायची माझी इच्छा नसल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला. मला या सर्जन लोकांच्या 'ओपन करून बघू' या वाक्याची नेहमीच गंमत वाटते. नुसते उघडून बघायला आपले शरीर काय मोफत वाचनालयातल्या टेबलावर पडलेले मासिक वगैरे आहे असे यांना वाटते की काय? जाऊ दे।

तुझ्या पत्रातला Albert Hall, Palladium वगैरेचा उल्लेख वाचून पुन्हा एकदा इंग्लंडला जाण्याची माझी इच्छा बळावली. त्या देशात मी सात-आठ महिने काढले आहेत. जगातल्या बऱ्याच देशांत जायची संधी मला मिळाली.

मला इंग्लंड तर फार आवडतो. तसे प्रत्येक देशाचे आपापले वैशिष्ट्य आहे, जपान सुंदर आहे. इटली सुंदर आहे. पॅरिस किती छान आहे. पण भाषेच्या अडचणीमुळे तिथे अडाण्यासारखे वाटते. लंडनला मी पहिल्या दिवशीदेखील गिरगावात हिंडल्याच्या सहजतेने हिंडू लागलो. भाषा आली नाही की सर्दीने नाक चोंदल्याच्या अवस्थेत अत्तराच्या दुकानात गेल्यासारखे वाटते. इंग्रज तसा अबोल आहे, पण चतुराईने त्याच्या गळ्यातल्या टायची गाठ जरा सैल केली की गप्पागोष्टीत मस्त रंगतो. अर्थात आता लंडनचाही भेंडीबाजार झाला आहे. त्यामुळे आणि एकूणच जगातल्या सगळ्या महानगरांतून स्कायस्क्रॅपर संस्कृती आल्यामुळे लंडन-न्यूयॉर्क-टोकियो वगैरे इरॉस सिनेमापलीकडल्या मुंबईसारखीच झाली आहेत, हा भाग निराळा, पण इंग्लंडचा ग्रामीण विभाग अजूनही सुंदर आहे. तू शेक्सपीअरचे स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन हे गाव पाहिलंस का? जरूर पहा. तिथे दरवर्षी शेक्सपीअरच्या नाटकांचा उत्सव चालू असतो. तिथल्या रंगमंदिरात शेक्सपीअरची नाटकं पाहा. एव्हन नदीकाठच्या त्या गावात नुसते हिंडत राहणे हादेखील अपूर्व आनंद आहे. ज्या कलावंतांनी, साहित्यिकांनी मनुष्यसमाजाला आनंद दिला त्यांची शतका-शतकापूर्वीची राहती घरे ही माणसं किती काळजीपूर्वक जतन करून ठेवतात पहा. माणसातल्या कृतज्ञतेचे आणि त्यातूनच दिसणाऱ्या मनाच्या श्रीमंतीचे हे द्योतक आहे. नाही तर आपण लोक। छत्रपती शिवाजीमहाराजांचा वाडा आपण टिकवून धरू शकलो नाही, तिथे इतरांची काय कथा?

- सुनीताने तुला केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन आशीर्वाद सांगितले आहेत.

तुझा...
पी. एल.

ता. क. तू मायन्यात 'चरणस्पर्श' केल्यामुळे मी चाट झालो. वयाने लहान असल्यामुळे तुला मी चरणस्पर्श म्हणू शकत नाही. आणि तुझ्या लक्षावधी गीतांतल्या एकाही गीतातल्या चरणाला स्पर्श करावा असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे। पूर्वीचे राजे मुलूख पादाक्रांत करायचे, तू सारे जग 'पदाक्रांत' केले आहेस. हे तुझे सार्वभौमत्व चिरकाल टिको, ही शुभेच्छा।