Wednesday, November 11, 2026

झुंबर ! - (सुधाकर पारनाईक)

तुझ्या स्मृतींना घेऊन आली आजची रम्य प्रभात
तुझ्या स्मृतींनी आज उजळली अवसेची रात !

घरोघरी आज उजळले तुझ्या स्मृतींचे दीप
तुझ्या स्मृतींची बाग बहरली मनात आपोआप !

तुला पाहता दु:ख पळाले, व्यथाही विरघळली
उदास मुद्रेवर प्रसन्नतेची लहर सळसळली !

जादूगार तू, नाना चिजा तुझ्या पोतडीत
की अलिबाबा आला खजिन्याची गुहा उघडीत !

तूच दाविली रसिकांना नाना कलांची दालने
आनंदयात्री तू, हवेसे वाटे तुझ्यासवे चालणे !

बहुरूपी तू, नटवर्य तू, तूच खरा खेळिया
संवादिनीवर तव फिरती बोटे विजेसम लीलया !


बहुप्रसवा तुझी लेखणी, वाणीही अनुपम
निकोप विनोदाचा तुझ्याच लेखनातून झालासे उद्गम !

रंगभूमी वा रुपेरी पडदा किंवा असो मैफल
दिग्गजांच्या मांदियाळीत तूच येशी सदा अव्वल !

लक्ष्मीचा वरदहस्त तुझ्यावर, नसे धनाची वाण
औदार्यात तुझ्यासारखा कर्णावाचून अन्य कोण ?

पुरुषोत्तम तू, स्वनामधन्य, खरा रसिकराज
तुझ्या स्मृतींचे झुंबर झगमगते लाखो मनांत आज !

- सुधाकर पारनाईक

0 प्रतिक्रिया: