Tuesday, November 24, 2026

वेध सुनीताबाईंचा - (मंगला गोडबोले)

जन्माला आलेली कोणतीही कलाकृती रसिकांकडून सादर झाली की प्रशंसेला पात्र ठरते, टीकेची धनी होते, दाद मिळविण्याचे कारण बनते किंवा मग दुर्लक्षित जाते... अनुभवाचा धनी होते. अशा अनुभवांचा मागोवा घेणारी ही सृजन-सूत्रे.

९ नोव्हेंबर २००९ रोजी पु. ल. देशपांडे यांच्या, पत्नी सुनीताबाई देशपांडे या काळाच्या पडद्याआड गेल्या. पुलंनी सुमारे नऊ वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतलेला होता. पुलंसारखा एक असाधारण लोकप्रिय कलाकार, त्याची सुनीताबाईंसारखी एक विलक्षण बुद्धिमती पत्नी आणि त्यांनी आपल्या नेक विचाराने आणि चोख कृतीने भारलेला एक काळखंड संपुष्टात आल्यावर त्यातल्या काही ठळक घटना, महत्त्वाचे पैलू शब्दात गोठवावेत असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटणं स्वाभाविकच होतं.

यापूर्वी 'अमृतसिद्धी पुल समग्रदर्शन' हा ग्रंथ पुलंच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध झाला तेव्हा मी त्यांची एक सहलेखिका होते. त्यामुळे सुनीताबाईंच्या स्मृतिग्रंथ लिहिण्यासाठी सहजच राजहंस प्रकाशनाने मला विचारलं. मी सुनीताबाईंच्या रोजच्या भेटीगाठींतली किंवा स्नेहातली कधीच नव्हते. प्रसंगोपात कवचित भेटले होते; पण असंख्य मराठी वाचकांप्रमाणेच मलाही त्यांचं आत्मपर लेखन 'आहे मनोहर तरी...' हे फार आवडलेलं होतं. मलाही इतर अनेकांप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आदर होता, कुतूहल होतं. त्यांना समजून घेण्याची ही शेवटची संधी मी साहजिकच घेतली. आपल्या बाजूने आपण चोख प्रयत्न करायचा असं ठरवलं.

पुल-सुनीताबाई हे आयुष्यभरात अनेक सद्भावना आणि अगणित लोकांच्या संपर्कात आलेले होते. त्यांच्याविषयीच्या आठवणी, किस्से, पत्रव्यवहार यांना तोटाच नव्हता. 'घेता किती घेशील दो करांनी' किंवा 'दोन डोळ्यांनी' अशीच परिस्थिती होती. मग मी माझ्यापुरतं एक मार्गदर्शक तत्त्व ठरवलं. जे पती-पत्नी दोघेही हयात नाहीत त्यांच्या दांपत्य जीवनाबद्दल आपण जास्त लिहायचं नाही. आपण त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनावरच भर घ्यायचा. दुसरं असंही ठरवलं की सुनीताबाई जशा थेट, रोखठोकपणे बघणाऱ्या होत्या तसंच थेट लेखन आपण करायचं. त्यामध्ये भावुकतेला, व्यक्तिपूजेला थारा घालायचा नाही. तसंच हळवं, काव्यात्म वगैरे होण्याच्या नावाखाली सत्य झाकायचं नाही. जे काही दिसलं, जाणवलं ते सौम्यपणे, पण स्पष्टपणे लिहायचं. निर्णयकाची भूमिकाही नको आणि समर्थकाचीही नको. तेवढा आपला अधिकार नाही हे मला नक्कीच कळत होतं.

त्यामानाने कळलं काय नव्हतं? तर या कामातली सांस्कृतिक जोखीम. काही माणसं इतिहासाविषयी लिहितात. ऐतिहासिक व्यक्तीविषयी लिहितात. त्यामागे मोठा वाचकवर्ग लागतो. उलट काही लेखक अगदी आजच्या ताज्या वास्तवाबद्दल लिहितात त्यांनाही चाहते असतात. सुनीताबाई वास्तवात नव्हत्या आणि पूर्णपणे इतिहासजमा झालेल्याही नव्हत्या. अक्षरशः काळपर्वा त्यांच्याबरोबर राहिलेलं, काही व्यवहार केलेले लोक आसपास होते. हळूहळू इतिहासात जाणारं वर्तमान समजून घेणं आणि शब्दबद्ध करणं अवघडच म्हणायचं. फारसा अभ्यास न करता त्यावर शेरेबाजी करणारे किंवा आपल्याला आठवतंय तेच बरोबर असं म्हणणारे खूप लोक निघतात. त्यांचं ऐकून घेतलं तरी शेवटी तारतम्याने आपल्याला जे योग्य वाटतं तेच लिहायला एक प्रकारचं आत्मबळ लागतं. दुसरी अडचण जाणवली ती त्यांच्या बहुचर्चितपणाची. देशपांडे दांपत्याविषयी नाना प्रकारे लिहिलं गेलंय, बोललं गेलं आहे, अजूनही कुठे कुठे बोललं जातंय. १२ जून १९९० रोजी म्हणजे त्यांच्या लग्नाच्या चव्वेचाळिसाव्या वाढदिवसाला प्रसिद्ध झालेलं त्यांचं आत्मपर लेखन 'आहे मनोहर तरी...' हे मराठी भाषेतलं प्रचंड वाचलं गेलेलं पुस्तक आहे. एवढं सगळं चौफेर विखुरलेलं असताना सुनीताबाईविषयी मी (किंवा कोणीही) नव्यानं काय लिहिणार, वाचकांना नवीन काय देणार हा मोठाच प्रश्न होता. सुनीताबाईंना लिहिण्याचा स्वभाव नाही, फारसं नवीन देणं शक्य नाही, मग लोकांनी आपलं पुस्तक का वाचावं? या प्रश्नांचा सामना करत असताना मला सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची, वागण्याची मानसशास्त्रीय अंगाने चिकित्सा करण्याचा मार्ग सापडला. माझ्या कुवतीने मी त्यावर वाटचाल केली.

तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपल्या काळाचं, आपल्या एकूण परिस्थितीचं उत्पादन असतो. त्या त्या संदर्भांमध्ये आपलं वागणं चूक किंवा बरोबर ठरत जातं. 'स्थितीचा असे किंकर प्राणिमात्र, स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र' हेच शेवटी खरं! त्या दृष्टीने मला मिळत गेलेले माहितीचे तुकडे सुसंगतपणे मांडून त्याच्या पार्श्वभूमीवर बाईंच्या कृतीउक्तीचा अर्थ मी लावात गेले. काही वेळा अर्थ लागला, काहीवेळा नाही लागला. जिथे लागला नाही तिथे तसंच सांगून टाकलं. सगळं निरपवादपणे कळलंच पाहिजे हा तरी आग्रह हा बाळगावा?

प्रत्येकाच्या जगण्याचा एक मूलस्रोत असतो. तो कळला की माणूस कळण्याची शक्यता वाढते. पुलंमधला कलाकार जपणं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ न देणं, त्याची प्रतिमा जपणं, त्यातून मिळालेल्या पैशाचं जपणं हे सुनीताबाईंच्या जीवनाचं मुख्य प्रयोजन होतं. त्यांच्या प्रगल्भतेमुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना ते फार लवकर समजलं होतं. इथे त्या सर्वसामान्यांच्या फार वर जातात. आपल्याला आयुष्यात काय मिळवायचंय, आपण आयुष्याकडून काय अपेक्षा करतो हे वेळेवर न कळणारे किंवा कधीच न कळणारे बहुसंख्य असतात. सुनीताबाईंच्या याबाबतच्या कल्पना तरुणपणीच स्पष्ट होत्या आणि त्या वास्तवात आणण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. दमणूक, कटुता, अपमान, जिवाचा रान केलं. आरोप हे सगळं सहन केलं आणि या कामाच्या आड येणाऱ्यांना निष्ठूरपणे दूर केलं. या प्रेरणेच्या प्रकाशात बाईंचं आयुष्य बघितलं तर
बरेच प्रश्न मिटतात. उत्तरं मिळतात. ती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे 'सुनीताबाई असं जगणं तोलाचं...' हे राजहंस प्रकाशनाचं पुस्तक.

स्वतःवर असं पुस्तक बनणं, आपल्याला कोणी चरित्रनायिका म्हणून सुनीताबाईंना खात्रीपूर्वक आवडलं नसतं. त्या व्यासपीठावर पुलंशेजारी बसायला, फोटो काढून घ्यायला, स्वतःला लेखिका म्हणून घ्यायला नकारच देत असत. तरीही त्यांच्यावर चरित्रनायिकापण आम्ही का लादलं? कारण त्यांनी निर्माण केलेला दातृत्वाचा आदर्श आणि त्यांनी धरलेली परिपूर्णतेची कास. आयुष्यात त्यांनी स्वतः आणि पुलंकडून अगणित परफॉर्मन्सेस, प्रयोग सादर केले; पण कोणताही प्रयोग कधीही कणानेही दुय्यम तिय्यम दर्जाचा होऊ दिला नाही. पतीने मेहनतीने मिळवलेले लक्षावधी रुपये सामाजिक कामांसाठी वापरले; पण नावाची, एका पैशाची परताव्याची कधी आस धरली नाही. उत्तम व्यवहाराने पैसा मिळवणं आणि उदार विचाराने तो खर्च करणं यांचा वस्तुपाठच जणू काही आधुनिक महाराष्ट्रापुढे त्यांनी ठेवला. पैशाविषयीचा निर्मोहीपणा आणि सदैव अत्युत्कृष्टटेचा ध्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन ठळक पैलू पुढच्या पिढ्यांसमोर अधोरेखित स्वरूपात राहावेत यासाठीच हा प्रयास होता. पैसा हे साधन न मानता साध्य मानणाऱ्या आणि तुटपुंज्या तयारीवर थाटामाटात कार्यक्रम सादर करून वाहवा मिळवायला धडपडणाऱ्या आजच्या मराठी माणसाला यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.

ते जे काही होईल ते होवो. पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने फेब्रु. २०१० ते जुलै २०१० हा माझा काळखंड नकळतपणे सुनीताबाईंच्या सहवासात गेला. त्यांच्याद्वारे पुलंच्या सहवासात गेला. एवढ्याच माझ्या छोट्या, सामान्य आयुष्याला तात्पुरती वेगळी उंची, वेगळी खोली लाभली ही काय थोडी कमाई म्हणायची?

लेखिका : मंगला गोडबोले | लोकमत | रविवार, दि. १५ मे २०११

पुस्तक घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा . 

0 प्रतिक्रिया: