माझ्या शाळकरी वयापासून कॉलेज जीवन, नंतर व्यावसायिक जीवनाचा सुरुवातीचा बराचसा काळ आणि सोळा वर्षांपूर्वी पु.लं.च्या निधनानंतरही आजतागायत वारंवार हवं तेव्हा मी त्यांनी निर्माण केलेल्या नवरसांचा परिपाक असलेल्या आनंदरसात भिजत आलेलो आहे.शब्द-सुरांनी त्यांनी आयुष्यभर वाटलेल्या अमृताचा आस्वाद इतर अनेकांप्रमाणे मी आकंठ घेत आलोय.
पु.लं.नी अपूर्वाईच्या प्रस्तावनेत म्हटलंय कि “आयुष्यात प्रवासवर्णन आणि आत्मचरित्र कधीच लिहायचे नाही असा संकल्प लहानपणीच सोडला होता. “अपूर्वाई” लिहून पहिला मोडला. आणि जरा विचार केल्यावर लक्षात आलं कि दोन्ही संकल्प ह्या एकाच पुस्तकात मोडलेत. कारण ह्या पुस्तकात मी केलेल्या प्रवासाऐवजी प्रवासात असलेल्या माझेच वर्णन आहे!” केवळ ह्याच नव्हे तर त्यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या विषयी इतरांनी लिहिलेल्या हरेक पुस्तकातून त्यांचं बहारदार दर्शन होत असतं.

ह्या माणसाचा मला इतका लळा का लागला हे मला सुनीताबाईंचं “आहे मनोहर तरी” वाचल्यावर समजलं. माझी बहुतेक स्वभाववैशिष्ट्ये मला त्यांच्या स्वभावात दिसून आली. काही व्यक्ती “देणार्याचे हात हजार” सारखे जीवनभर दान वाटत असतात.घेणारा आपल्या झोळीच्या कुवतीनुसार घेत असतो. त्यातलेच पु.लं. सुद्धा. मी मात्र पूर्वजन्मीचा घेणेकरी असल्यासारखा अनेकानेक झोळ्या भरभरून पु.लं. कडून घेत आलोय. साहित्य, विनोद, नाटक, अभिजात संगिताच्या दर्यात तर डुंबलोच; पण इंग्रजी भाषेचं ज्ञान पण घेतलं. मला ज्ञात असलेले कित्येक इंग्रजी शब्द- वाक्प्रचार ही त्यांचीच देणगी.
लेखक म्हणून थोर असणारे साहित्यिक माणूस म्हणून महान असतातच असं नाही. मात्र पु.लं. ह्याला अपवाद होते. आणिबाणीच्या काळात लोकशाहीच्या मुस्कटदाबविरुद्ध-दडपशाहीविरुद्ध उठवलेला आवाज, मुक्तांगण सारख्या संस्थांच्या द्वारे केलेली समाजसेवा, विपुल संपत्तीदान हे त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे द्योतक आहेत.
निसर्गनियमानुसार १६ वर्षांपूर्वी १२ जूनला पु.लं.च देहावसान झालं. “रावसाहेबां”च्या मृत्यूवेळी रावसाहेबांविषयी त्यांनी जे म्हटलं होतं, ते त्यावेळी प्रकर्षाने जाणवून गेलं; ‘आमची छोटीशी जीवने समृद्ध करण्यासाठी देवाने दिलेल्या ह्या मोलाच्या देणग्या…. न मागता दिल्या होत्या;न सांगता परत नेल्या!!’
पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय ,”पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते असं म्हणतात…” महाराष्ट्राला पडलेल्या ह्या सुंदर स्वप्नाची परिसमाप्ती होणारी पहाट कधीच होऊ नये असं वाटतं. “पूर्वरंग”च्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलंय, ”… यात्रा सफल झाली की मावंदे घालायचे. अक्षरांचे धन असलेल्याने पुस्तकाचे मावंदे घालायचे!”. त्याच धर्तीवर असं म्हणावसं वाटतं ‘ माणूस गेला की सुहृदांनी त्याच्या श्राद्धाचे पिंड घालायचे. कर्मकांडाचा तिटकारा असलेल्या माझ्यासारख्याने कृतज्ञतेपोटी भावफुलांची ओंजळ अर्पायची….’ अशीच वर्षानुवर्षे दर १२ जूनला..
गिरीश पाठक,
नासिक




0 प्रतिक्रिया:
Post a Comment